हनी केक - मसाला मारके (Gewürzter Honig Kuchen)

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in पाककृती
22 Mar 2015 - 10:53 pm

बेकिंग आणि केक्सच्या पाककृतींचे एक पुस्तक बरेच दिवसांपासून कपाटात आहे असा साक्षात्कार शनिवारी रात्री अचानक झाला. मग बघुयात काही करता येतंय का म्हणून चाळायला सुरुवात केली आणि Gewürzter Honig Kuchen (Honey Cake) ची पाकृ वाचताना लक्षात आले की बहुतांशी सगळे साहित्य हे आपल्या भारतीय स्वयंपाकातील मुलभूत मसाले दिसताहेत. शिवाय करायला सोपी कृती. मग लगेच रविवारी हा प्रयोग करायचा हे पक्के झाले. त्यात काही बदल करता येतील का यावर विचार करून सकाळी सकाळी तयारीला सुरुवात केली. आता प्रयोग आहे, तोही बेकिंगचा म्हणजे तो अपयशी होण्याची शक्यता नाकारणे हे अतीच झाले. कारण यापुर्वी काही यशस्वी तर काही सपशेल अपयशी प्रयोगांचा अनुभव आहे. ;) पण झाला हा यशस्वी तर देऊयात मिपावर, अशा अति आशावादी आविर्भावात सगळे साहित्य एकत्र केले, मिपावरील सुगरणी आणि बल्लवाचार्याना स्मरून पहिला फोटो काढण्यात आला आणि पुढे काम सुरु झाले.

साहित्य -
मैदा - १२५ ग्रॅम
बेकिंग पावडर - १ टीस्पून
सुंठ पूड - १ टीस्पून
दालचिनी पूड - १ टीस्पून
बेकिंग सोडा - १/२ टीस्पून
बटर - ६० ग्रॅम
मध - १०० ग्रॅम
ब्राऊन शुगर - ६० ग्रॅम
१ मोठे अंडे
दुध - १२० मिली
लिंबाची किसलेली साल - १ टीस्पून किंवा आवडीप्रमाणे
मिश्र मसाले (Lebkuchengewürz - लेबकुखेनगेव्युर्त्स) - २ टीस्पून
यात दगडफूल, सुंठ, बडीशोप, धणे, लवंग, विलायची, जायफळ, मिरे या मसाल्यांची पूड वापरली जाते. याला जर्मन भाषेत लेबकुखेनगेव्युर्त्स असे म्हटले जाते. लेबकुखेन हा नाताळ दरम्यान केला जाणारा पारंपारिक जर्मन केक आणि Gewürz म्हणजे मसाले. हे वरचे साहित्या बघता आपला नेहमीचा चहा मसाला हा याला उत्तम पर्याय. त्यामुळे मी २ टीस्पून चहा मसाला आणि त्यात किंचित जायफळ पूड आणि धणेपूड मिसळली. तुम्ही आवडीप्रमाणे बदल करू शकता.

कृती
ओव्हन १८० डिग्री वर प्रीहिट करायला ठेवा. एका केकच्या भांड्याला बटर लावून घ्या.
मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि सगळे मसाले एकत्र करून घ्या.

https://lh5.googleusercontent.com/-695fImSuwBQ/VQ72VZ4JmWI/AAAAAAAAEhQ/4F2k2pN7bbA/w866-h577-no/DSC_0437.jpg

बटर, ब्राउन शुगर आणि मध हे सगळे एका भांड्यात मंद आचेवर गरम करा आणि ढवळत रहा. मिश्रण एकजीव होऊ लागले की गॅस बंद करा.
हे मिश्रण हळूहळू मैद्याच्या मिश्रणात ओता. आता यात लिंबाची साल, अंडे आणि दुध घाला.
सगळे एकत्र करून घ्या. थोडे सैलसर मिश्रण तयार होईल.

https://lh6.googleusercontent.com/-G8stoOx5SMg/VQ72Z1hoWyI/AAAAAAAAEhc/ZZvQvmSSNVI/w866-h577-no/DSC_0440.jpg

हे आता केकच्या भांड्यात ओत आणि ३५-४० मिनिटे बेक करा. दालचिनी चा मंद सुवास हळूहळू घरभर पसरू लागेल. केक फुगलेला दिसू लागेल. टूथपिक किंवा सुरीने केक झाल्याची खात्री करून घ्या आणि ओव्हन बंद करा.

आता हुश्श म्हणून प्रयोग यशस्वी झाल्यामुळे सुटकेचा निश्वास टाकला आणि याचे नामकरण काय करावे असा विचार मनात आला. भारतीय मसाल्यांचा सढळ हस्ते वापर असलेला हनी केक म्हणून याचे नाव हनी केक - मसाला मारके असे केले. केक गार झाला की पिठीसाखर भुरभुरवा, गरमागरम चहा किंवा कॉफीसोबत आस्वाद घ्या.

https://lh3.googleusercontent.com/-v0LM3Nk0cuo/VQ72V_Op7vI/AAAAAAAAEhU/IxLITTmbAv8/w866-h577-no/DSC_0448.jpg

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

22 Mar 2015 - 11:39 pm | श्रीरंग_जोशी

पाककृती रोचक दिसत आहे.

सादरीकरण आवडले.

अगदी वेगळा आणि मसालेदार केक आवडला. स्वाद सुरेख असणार यात शंका नाही.

स्पंदना's picture

23 Mar 2015 - 4:27 am | स्पंदना

स्वादिष्ट दिसतो आहे केक.

बेकींग पार पडल्याबद्दल आभिनंदन!!

त्रिवेणी's picture

23 Mar 2015 - 7:36 am | त्रिवेणी

मस्त केक. पण बेकींग मध्ये नेहमीच मार खाते सो फक्त बघणार.

सुरेख ! तू आलीस की आमच्यासाठी हाच्च खाऊ आण ! :)

मी अजून मागच्या महिन्यात केलेल्या 'जलवा कुकीज' च्या धक्क्यातून बाहेर पडलेली नाही. त्यामुळे करून बघण्याचे धाडस नाही. :))

मस्तच!नक्की करेन.मितान असले धक्के बरेच खाल्लेत.तरी धाडस करेन म्हणतेय.

अजया's picture

23 Mar 2015 - 8:50 am | अजया

आधी बराच वेळ मिश्र मसाल्यांचे जर्मन नाव जीभेला आला फोड फोड करत वाचले!!मग पाककृती वाचली!!

भारी! कधी बोलावताय खायला? :-)

अत्रुप्त आत्मा's picture

23 Mar 2015 - 9:53 am | अत्रुप्त आत्मा

नविन प्रकार .

@भारतीय मसाल्यांचा सढळ हस्ते वापर असलेला हनी केक म्हणून याचे नाव हनी केक - मसाला मारके असे केले.>>> ठिक...पण हे रेस्टॉरंट श्टैल झाले. ते पूर्ण भारतीय करायचे झाले तर "हनी-मसाला केक",एव्हढेच ग्वॉड वाटेल. हाय ना? :)

'मधु-मसाला मृदुवडी ' हे नाव कस्काय वाटतय बुवा ? +)

पिवळा डांबिस's picture

23 Mar 2015 - 11:18 am | पिवळा डांबिस

ही ही ही... =))
कैच्या कै!!!!
केकला मृदुवडी म्हणणे म्हणजे आमच्या गोयांच्या मारियाला सुगंधा म्हणण्यापैकी आहे!!!!
तिची नशा थंय, हिचों गंध हंय!!!!
:)

पिवळा डांबिस's picture

23 Mar 2015 - 9:32 pm | पिवळा डांबिस

बाकी मृदुवडी हा शब्द छान आहे.
कदाचित सुरळीच्या वड्यांना वापरता येईल...

स्मिता श्रीपाद's picture

23 Mar 2015 - 11:05 am | स्मिता श्रीपाद

मस्त दिसतोय मसालेदार केक...

पिवळा डांबिस's picture

23 Mar 2015 - 11:09 am | पिवळा डांबिस

या वीकांताला नक्की करुन पाहीन.
पण आमच्याकडे हा तुमचा 'लेबकुखेनगेव्युर्त्स' मिळत नाही.
तसे इतर गेउत्सर्ग मिळतात पण त्यात काही अर्थ नाही.... :)
मी आपला ऑल स्पाईस मसाला घालून पाहीन...

सस्नेह's picture

23 Mar 2015 - 11:13 am | सस्नेह

आहा !
केक नावाच्या प्रकाराला फुगवण्याइतकी हवा अजून आपल्यात नाय बॉ ! त्यामुळे करून बघणार नाही +D
तूच ईकडे येताना घेऊन ये माझ्यासाठी !

भलताच देखणा आहे केक आणि त्याचे प्रेझेंटेशन!

वा मधुरा.. मस्तच दिसतोय केक. करुन बघायला पाहिजे एकदा.

सूड's picture

23 Mar 2015 - 3:03 pm | सूड

मस्त!!

मिपापरंपरेप्रमाणे महत्त्वाचा प्रश्नः हा केक अंडे न घालता कसा करता येईल? ;)

सविता००१'s picture

23 Mar 2015 - 3:44 pm | सविता००१

मस्त पाकृ.
पण काय डेंजरस नाव आहे गं हे...लेबकुखेनगेव्युर्त्स
त्यापेक्षा हनी केक - मसाला मारके हेच मस्त

अरेवा मस्त आहे केक !! करून बघावा वाटतोय ..

मधुरा देशपांडे's picture

23 Mar 2015 - 5:00 pm | मधुरा देशपांडे

सर्व प्रतिसादकांचे आभार.
@स्वॅप्स - कधीही या. अजुन नवीन पदार्थ बनवुन तुमच्या हस्ते फोटो काढुन घेईन. :)
@गुर्जी - इथे सगळी "हॉटेलात आलेली माणसं". म्हणुन पदार्थाचे नाव पण त्या स्टाईलीत. *biggrin* तसे "हनी-मसाला केक" किंवा "मसालेदार हनी केक" ही चालेलच.
@स्नेहाताई - 'मधु-मसाला म्रुदुवडी' - :))) पुढच्या वेळी पाकृ टाकण्यापुर्वी तुला व्यनि करते. तु शोधुन दे असे एखादे नाव.
@मितान, स्नेहाताई, मी आले की कट्ट्याला हाच केक. :)
@पिडांकाका - 'लेबकुखेनगेव्युर्त्स' मिळत असुनही मी आपला 'चहा मसाला' वापरला. सगळे घटक तेच आहेत. तुम्ही ऑल स्पाईस किंवा चहा मसाला, कुठ्लाही वापरु शकता.
@सुड - मिपापरंपरेच्या या प्रश्नाबद्दल धाग्यातच डिसक्लेमर टाकणार होते. पण म्हटले येउ द्यावा प्रश्न आधी. ;)
तर हा पहिलाच प्रयोग असल्याने अंडे न घालता कसे होईल याचा अंदाज नाही. ईच्छुकांनी करुन बघणे आणि कळवणे.

आणि हो, एकत्र कट्टा करा...उगाच फक्त महिलांचा नको. हा केके मिळणार असेल तर मी नक्की येतोय कट्ट्याला! :-)

@स्वॅप्स - कधीही या. अजुन नवीन पदार्थ बनवुन तुमच्या हस्ते फोटो काढुन घेईन.

अगदी, अगदी! :-D

मोहनराव's picture

23 Mar 2015 - 6:59 pm | मोहनराव

मस्तच!! नक्कि करुन बघतो.

स्वाती दिनेश's picture

23 Mar 2015 - 8:50 pm | स्वाती दिनेश

Gewürzter Honig Kuchen सहीच लागतो..
मस्त!
स्वाती

(स्वगत- खूप खूप दिवसात केकृ केली नाहीये कोणतीच..)

स्रुजा's picture

23 Mar 2015 - 9:26 pm | स्रुजा

क्या बात हे ! भरपूर बिझी गेलाय तुझा वीकांत. केक काय केला, भटकंती चा पुढचा भाग काय टाकला.
मी करून बघेन आणि या वीकांताला तुला फोटु टाकते. खरंच बिनअंड्याचा कसा करतात मला पण सांगा बुवा. घरचे आले की निम्म्या रेसिप्या बाद होतात या अंड्यापायी.

सानिकास्वप्निल's picture

23 Mar 2015 - 10:15 pm | सानिकास्वप्निल

ए काय मस्तं दिसतोय केक, पाककृती ही आवडली..चव ही छानचं असणार, चवीचा अंदाज येतोय केक बघून :)

मी नक्की बनवणार आहे हा केक, घरात फाईव्ह स्पाईस पण आहे व चहा-मसाला ही, करुन बघणारच.

स्वाती२'s picture

24 Mar 2015 - 11:47 pm | स्वाती२

छान दिसतोय केक!

पिलीयन रायडर's picture

25 Mar 2015 - 5:27 pm | पिलीयन रायडर

अहाहा!!!
खासच कॉम्बिनेशन आहे!!

यशोधरा's picture

25 Mar 2015 - 8:03 pm | यशोधरा

केक भारी दिसतो आहे!

प्राची अश्विनी's picture

30 Mar 2015 - 11:59 am | प्राची अश्विनी

मधुराताई, बनवला केक, मैद्याऐवजी गव्हाचे पीठ घेतले. पण एकदम सुंदर झाला.

दिपक.कुवेत's picture

30 Mar 2015 - 2:29 pm | दिपक.कुवेत

असा स्पाईसी केक खायला मजा येईल हे नक्कि. आणा ती प्लेट ईकडे....

स्वाती राजेश's picture

30 Mar 2015 - 5:39 pm | स्वाती राजेश

केलाच पाहीजे... स्पायसी केक..
छान रेसिपी.. अन ..फोटो सुद्धा... :)
मधुरा... कीप इट अप..

मधुरा देशपांडे's picture

30 Mar 2015 - 9:34 pm | मधुरा देशपांडे

सर्वांचे परत आभार. प्राची अश्विनि, केक करुन आवर्जुन कळवल्याबद्दल विशेष धन्यवाद. मैद्याऐवजी नेहमीच्या कणकेचा करुन बघावा असे डोक्यात होतेच. आता तुम्ही कळवल्यामुळे लवकरच करेन. :)

कविता१९७८'s picture

31 Mar 2015 - 7:18 am | कविता१९७८

मस्तच

मदनबाण's picture

1 Apr 2015 - 10:37 am | मदनबाण

आहाहा... :)
दालचिनीची चव असलेला केक कसा लागत असेल याचाच विचार करतोय !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..

निवेदिता-ताई's picture

1 Apr 2015 - 1:08 pm | निवेदिता-ताई

मस्तच

स्वीत स्वाति's picture

27 Jun 2015 - 2:31 pm | स्वीत स्वाति

अंड्याला पर्याय काय वापरता येईल ..

मधुरा देशपांडे's picture

27 Jun 2015 - 7:11 pm | मधुरा देशपांडे

मूळ पाकृत जे साहित्य होते, ते तसेच मी वापरले होते. त्यामुळे अंडे न घालता कसा होईल हे माहित नाही.

स्वीत स्वाति's picture

30 Jun 2015 - 10:26 am | स्वीत स्वाति

ठीक आहे मग फक्त फोटो पाहून समाधान मानावे लागणार .

पद्मावति's picture

27 Jun 2015 - 5:24 pm | पद्मावति

वॉव....मस्तं आणि फारच वेगळी चव असणार याची.
फोटो तर क्लास.....

पैसा's picture

30 Jun 2015 - 11:36 am | पैसा

ट्राय मारू काय? पण पाकृचे विडंबन झाले तर कोण खाणार?

मधुरा देशपांडे's picture

30 Jun 2015 - 1:10 pm | मधुरा देशपांडे

मिपाकट्ट्यापुर्वी (माझ्यासोबतच्या नाही) ट्राय कर. म्हणजे समजाच विडंबन झाले तर सोबत घेऊन जा कट्ट्याला आणि केक खाल्ला तर काजुची पाकिटे फ्री फ्री फ्री अशी झैरात कर. मग केक संपणारच. हाकानाका. ;)