आल्प्सच्या वळणांवर - अंतिम भाग
नद्या, फुलं, टुमदार घरं, बोगदे, आल्प्समधील घाट, तळी यांनी भारावून जात मागची आल्प्स सहल संपली आणि पुन्हा कधी जायला मिळतंय याचे इमले बांधणे चालू झाले. योगायोगाने एक जवळचे नातलग युरोप सहलीला येणार होते, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी कुठे जाता येईल का, हा आढावा घेताना ही दुसरी सहल ठरली. त्यांची टुर आणि आमच्या सुट्ट्या हे जुळवून बघता स्विस-फ्रान्सच्या सीमेवरचे शामोनि (Chamonix) हे ठिकाण पक्के झाले. हे ठिकाण मध्यवर्ती धरून मग ४ दिवसात आजूबाजूचे जे शक्य आहे ते बघायचे असे ठरले. मागच्या वेळी अपार्टमेंटचा अनुभव चांगला आल्याने इथेही पहिले त्यासाठी शोध घेतला, ४ रात्रींसाठी अगदी मोक्याच्या जागी अपार्टमेंट मिळाले. जवळचे काय बघता येईल यावर विचार झाला, खरेदी झाली आणि मार्गस्थ झालो.
संपूर्ण स्विस पार करत फ्रान्स मध्ये पोहचायचे होते. एकूण ६-७ तासांचा प्रवास असल्याने एक दिवस आधीच ऑफिस संपवून ३ तास पुढे जर्मनी-स्विस सीमेवरील बासेल (Basel) ला जाऊन मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी खरी भटकंती सुरु झाली.
इथून पुढे याच मार्गावर असलेली एक चीज फॅक्टरी हा पहिला ब्रेक होता. मागच्या स्विस भेटीतच चीज मेकिंग बघायची इच्छा होती ती यावेळी पूर्ण झाली. बासेलहून निघालो आणि आजूबाजूची हिरवळ आणि लाल कौलांची टुमदार घरं दिसू लागली. हे सगळे जर्मनीत देखील दिसत असले तरीही स्विसची एक वेगळीच पद्धत आहे जी भुरळ घालते. जर्मनीत बहुतांशी प्रवास हा ऑटोबाह्न (Autobahn) म्हणजेच एक्स्प्रेसवेने होतो. आजूबाजूला बरेचदा उंच झाडी असतात, तर कधी शेजारच्या गावातल्या लोकांना गाड्यांच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून उंच भिंती बांधलेल्या असतात. स्विसमध्ये मात्र बहुतेक रस्ते हे अंतर्गत गावांमधून जातात, त्यांच्या निसर्गाचे योग्य रूप दिसावे म्हणून रस्तेही तसेच आहेत. त्यामुळे स्विसमध्ये तुलनेत आजूबाजूचे देखावे अधिक दिसतात आणि प्रकर्षाने वेगळेपण जाणवते. मागच्या वेळी सप्टेंबरचा शेवट असल्याने झाडांचे रंग बदलले होते ते यावेळी सगळीकडे हिरवेगार दिसत होते आणि वसंत असल्याने फुले बहरणे नुकतेच चालू झाले होते. हळूहळू आल्प्स दुरून दिसू लागला आणि थोड्याच वेळात आम्ही ग्रुयेरे (Gruyere) या प्रसिद्ध चीज फॅक्टरीसमोर उभे होतो.
आंतरजालावरून साभार
ग्रुयेरे हे गाव आणि त्या गावाच्या नावावरूनच आलेले हे चीज. स्विसमधील फ़्रिबोर्ग (Fribourg) या भागातले हे प्रसिद्ध चीज. खास करून बेकिंग, चीज फॉन्ड्यु या प्रकारात आणि बरेचसे फ्रेंच सुप्स, सलाड यासाठी हे चीज वापरले जाते. साधारण ५ महिने ते १० महिन्याच्या कालावधीत त्याची चव बदलत जाते.
तिकिटे काढायला गेलो आणि सवयीने जर्मन मधून बोलायला सुरुवात केली. गोड हसून समोरच्या काकू इंग्रजीतून बोलू लागल्या. हा संपूर्ण फ्रेंच भाषिक स्विसचा भाग असल्याने इथल्या लोकांचे जर्मन म्हणजे ना के बराबर, पण इंग्रजी येतं व्यवस्थित. ऑडीओ गाईड आणि प्रत्येकी काही चीजचे samples तिकीटासोबत मिळाले आणि आमचे कान ऑडीओ गाईडवर केंद्रित झाले. चेरी नावाच्या एका गायीने 'चला, मी तुम्हाला सांगते चीज मेकिंगची गोष्ट' असे म्हणत आणि गळ्यातल्या घंटांच्या आवाजात आमचे स्वागत केले आणि आम्ही निघालो, चीज मेकिंग बघायला.
या भागातल्या बहुतांशी गायी या पांढऱ्या काळ्या रंगाच्या आहेत. उन्हाळा सुरु झाला की या गायी डोंगरावर चरायला जातात आणि मग पुढचे सहा महिने या शक्य तेवढ्या बाहेरच राहतात. डोंगरावर वाढणारे सर्व प्रकारचे गवत हे यांचे मुख्य खाद्य. तसेही स्विसमध्ये ठिकठीकाणी ज्या गायी दिसतात, त्या सदानकदा फक्त खाली तोंड करून काहीतरी खातानाच दिसतात. एवढ्या कशा खातात, बसत नाहीतच की काय असा प्रश्न पूर्वीही पडला होता, त्याचे उत्तर यावेळी काही प्रमाणात मिळाले. चेरीने तिचे रोजचे चारा आणि पाण्याचे जे अबब आकडे सांगितले ते ऐकून आम्ही गार झालो होतो. या डोंगरावर वाढणाऱ्या मुख्य वनस्पती म्हणजे व्हॅनिला, थाईम इत्यादी. नशीब नशीब म्हणतात ते हेच. व्हॅनिला फ्लेवरचे पदार्थ रोजच्या जेवणात, काय मजा आहे. :) या वनस्पतींचा खरा फील यावा म्हणून इथे स्मेल सिम्युलेटर्स होते, (याला काही वेगळे नाव असेल तर माहित नाही) ज्यावरून आपण डोंगरावर ते खातानाचा फील घेऊ शकतो . आता हे सुगंध काही नवीन नव्हते, पण तरीही अनुभवायला आवडले. यालाच म्हणतात खास लोकाभिमुख आकर्षण तयार करणे. येणार्याची पन्चेद्रिय जागृत करायची आणि त्यांना खराखुरा अनुभव द्यायचा. खालच्या दुसऱ्या फोटोत जे पदार्थ दिसत आहेत, ते ते स्वाद या चीजमध्ये सापडतात, त्यात अक्रोड, विविध फुले नि अजून बरेच प्रकार होते. दिवसभरात दोन वेळा जवळपासचे शेतकरी/दुधवाले इथे दुध आणून देतात, आणि सर्वसाधारणपणे ४८ चीज राउंड एका दिवसात तयार होतात. ४०० लिटर दुधापासून ३५ किलो वजनाचा चीजचा एक राउंड मिळतो.
हा झाला पहिला टप्पा, चीज साठी कच्चा माल मिळवण्याचा. पुढे सुरु होते प्रत्यक्ष काचेपलीकडे दिसणारे चीज मेकिंगचे तंत्रज्ञान. आधीची बॅच संपली असल्याने सगळे बंद होते. पण तिथल्याच एका स्क्रीनवर पूर्वीच्या काळची पद्धत आणि एकावर आता आधुनिक तंत्रज्ञान वापरून नवीन पद्धत याचे व्हिडीओज दाखवत होते. तंत्रज्ञानाने गोष्टी किती सोप्या झाल्या आहेत हेही दिसत होते,
सर्वप्रथम तांब्याच्या या मोठ्ठ्या भांड्यांमध्ये दुधात बॅक्टेरियल कल्चर्स मिसळून ते सेट होण्यासाठी ठेवले जाते. त्यानंतर त्याला उष्णता देऊन मग दह्याच्या स्वरूपातील चीजची जाणकारांकडून चाचणी घेतली जाते. नंतर ते साच्यांमध्ये भरून, त्यावर ग्रुयेरेचे शिक्के मारून घन स्वरूपातील चीजचे राउंड तयार होतात. मग पुढे त्यात मीठ मिसळले जाते आणि चीजची रवानगी कोठारघरात होते. ग्रुयेरेच्या चीज मेकिंग प्रोसेसची सविस्तर माहिती इथे वाचता येईल.
हे संपूर्ण बघून बाहेर आलो की खाली त्यांचे कोठारघर आहे जिथे पुढे हे चीज ठेवले जाते. योग्य प्रमाणात आणि सर्व बाजूंनी हवा खेळती राहावी, याकरिता एका स्वयंचलित यंत्राद्वारे दर दोन दिवसांनी या चीजच्या तुकड्यांची बाजू बदलून ते परत ठेवले जातात. कमीत कमी ३-४ महिने इथे राहून मग पुढे हे चीज दुहेरी चाचणीनंतर दुकानांत आणि नंतर लोकांच्या पोटात जाण्यासाठी तयार होते.
अर्ध्या ते पाउण तासात जेव्हा बाहेर पडलो तेव्हा भूक लागली होती. इथे लोक तिकीटासोबत मिळालेले चीज नुसतेच खात होते आणि 'असे कसे हे लोक नुसते चीज एवढे खाऊ शकतात' असे मी म्हणणार तेवढ्यात नवरा 'वाह, सहीये की हे चीज' असे म्हणाला. चीज बद्दल मुळात सुरुवातीला अमुल चीज एवढीच माझी ओळख होती. त्यातल्या असंख्य प्रकारांशी हळूहळू ओळख वाढत गेली तशीच आवड निवडही ठरू लागली. असं काही नाहीये की मला चीज अजिबातच आवडत नाही किंवा डाएट चा विचार करून मी खात नाही, पण असं फक्त चीज इतर कुठल्या पदार्थाशिवाय खाणं हे वेगळं वाटतं. मग ते कौतुक ऐकतच त्याहून जास्त चीज असणारे मेन्युकार्ड चाळायला सुरुवात केली.
स्विस मध्ये ठिकठीकाणी त्यांचे झेंडे असतात हे मागच्या वेळी पाहिले होतेच. इथल्या खुर्चांवर झेंडे होते, आणि ते कमी वाटले म्हणून हे जेवणातही आले.
इथे नेमके नावडत्या प्रकारातले चीज आले, नुकत्याच ओव्हनमधून आलेल्या या चीजच्या वासाने असह्य झाले, आणि त्यातले चीज बाजूला काढून खाणे हे काही चिवड्यातून दाणे निवडून काढण्यासारखे नव्हते. अन्न हे पूर्णब्रम्ह म्हणत शक्य तेवढे संपवले. चीज फॉन्ड्यु घेण्याचा विचार होता, पण ते घेतले नाही यातच धन्यता मानली. त्यांच्याच दुकानात एक चक्कर मारली आणि मग बाहेर पडलो.
इथेच पुढे डोंगरावर एक किल्ला/गढी आहे, ते मुख्य ग्रुयेरे गाव. पायी किंवा गाडीने इथपर्यंत जाता येतं. आम्ही वेळ असल्याने पायी निघालो. याला आपण आपल्या भाषेत वरचे ग्रुयेरे आणि खालचे ग्रुयेरे किंवा पायथ्याचे अन गडावरचे असे म्हणू शकतो.
खास युरोपियन पद्धतीने प्रत्येक रेस्टॉरंटबाहेर टेबल आणि त्यावर निवांत गप्पा मारत, उन्हे खात बसलेले लोक दिसत होते, फ्रेंच प्रभाव असल्याने लोकांच्या टेबलवर बीयरपेक्षा वाईन अधिक दिसत होती. गावातून रस्ता आता गढीपाशी जात होता.
हे आजोबा निवांत बाकावर बसून उन्हाळ्याची सुरुवात अनुभवत होते.
या वरच्या फोटोत जी इमारत दिसते आहे, तिथे बहुधा वृद्धाश्रम असावा असा अंदाज. इथे नेहमीच वृद्धांसाठीच्या उत्तमोत्तम सोयी आहेत हे पाहिले आहे, परंतु एका पर्यटनस्थळी, तेही तिथल्या अगदी मध्यवर्ती चौकात हे पहिल्यांदाच बघितले.
दूरवर पर्वतशिखरांवर बर्फ दिसत होता.
वरून दिसणारा सभोवतालचा परिसर
हा खरा मुख्य किल्ल्याचा भाग. खूपशी आपल्या वाड्यांची आठवण करून देणारा. इतिहासाची माहिती देणारा एक शो पण होता, ज्यात खूप काही असेल असे वाटले नाही आणि वेळही कमी होता. त्यामुळे उर्वरीत किल्ल्यात फिरलो.
आतल्या विविध खोल्यांमध्ये चित्रे, फर्निचर, जुन्या वस्तू, पूर्वीच्या काळी वापरात येणारी स्वयंपाकाची उपकरणे असे सगळे ठेवले होते.
एकदा बघण्यासारखे नक्कीच होते, तिथून दिसणारे आजूबाजूचे दृश्यही सुंदर होते. पण स्विस पर्यटन व्यवस्थेच्या मार्केटिंगची झलक पुन्हा एकदा दिसली. एका साध्याशाच वास्तूला, अत्याधुनिक सुविधा देऊन आणि तरीही तिचे जुनेपण तसेच राखत ती एक पर्यटन आकर्षण म्हणून आमच्यासमोर उभी होती. आम्ही मनातल्या मनात एकीकडे रोज कुठल्याशा वाड्याचे मोठ्या इमारतीत होणारे रुपांतर आठवत होतो. इतिहास जपण्यात, त्याहूनही पर्यटनक्षेत्र विकसित करण्यात आपण किती कमी पडतोय याची प्रकर्षाने जाणीव अशा वेळी होतेच.
इथून बाहेर पडलो आणि शामोनिकडे Chamonix प्रयाण केले. रस्त्यात एका घाटातील दुकानात कॉफी घ्यायला म्हणून थांबलो. इथून खालचे गाव दिसत होते, एकीकडे डोंगरावर द्राक्षांची शेतं होती. या गावात सगळीकडे ठोकळ्यासारख्या इमारती दिसत होत्या जे वेगळे जाणवले.
हॉटेल कितीही छोटे असू द्या, कितीही निर्जन ठिकाणी असू द्या, तिथल्या खिडक्या फुलांनी बहरलेल्या हव्यातच.
आता हवेत गारवा जाणवत होता. जसजसे वर चढत गेलो, तसतसा बर्फाळलेला आल्प्स अजूनच जवळ दिसू लागला.
फ्रान्सची सीमारेषा ओलांडली आणि रस्त्यात प्र चं ड फरक जाणवला, नुसते खड्डे आणि बऱ्याचशा बेपर्वाईने गाड्या चालवणारे लोक. स्विस मधले रस्ते जर्मनीच्या तुलनेत खूप चांगले आहेत याचा अनुभव होताच. आणि फ्रान्स मधले रस्ते आजवर पाहिलेल्या मुख्य युरोपीय देशांमध्ये सर्वात वाईट्ट आहेत याचा प्रत्यय यावेळी आला. इथून पुढे ४ दिवस रस्तेच काय, प्रत्येक बाबतीतला फ्रेंच कारभार अनुभवला. आधीच मधल्या काळात नवरा कामानिमित्त फ्रान्स मध्ये येउन जाऊन होता, तेव्हा त्याला प्रत्येक वेळी काहीतरी त्रास झाला होता, हे असे रस्ते दिसू लागले आणि तिथपासून मग हे पूर्वीचे दिवस आठवण्याचे प्रमाण वाढले. तरीही डोंगरातून जाणारा वळणदार रस्ता आणि हिमशिखरे ते सगळे विसरायला भाग पाडत होती.
शामोनि प्रसिद्ध आहे ते तिथून जवळच दिसणाऱ्या मोन ब्लाँ (Mont Blanc) या शिखरासाठी. हे खरं तर आल्प्सचे सर्वात उंच शिखर आहे. टॉप ऑफ युरोप म्हणून ज्या युंगफ्राऊ (Jungfrau) या शिखराची जाहिरात केली जाते, ती फक्त जाहिरात आहे. इथे हे शिखर सर्वात उंच नसून, तिथवर पोहोचवणारी रेल्वे आणि त्यांचे रेल्वे स्थानक हे हे आल्प्समधील सर्वात उंचावरचे स्थानक आहे. शामोनिपासून रोपवे आणि लिफ्टच्या मदतीने वर गेल्यास या संपूर्ण फ्रांस, स्विस आणि इटलीतील परिसराचा आणि आल्प्सचा पॅनारोमा व्ह्यू दिसतो. हा भाग जगभरातील स्कीईंग करणाऱ्या लोकांसाठी खास आवडीचा आहे. या सगळ्याचे फोटो पुढच्या भागात येतीलच.
शामोनीला पोचलो आणि अपार्टमेंट जिथून बुक केले होते तिथे तसा फोन केला. बाहेर कुठेच पार्किंगला जागा दिसत नव्हती. महत्प्रयासाने तिथली मुलगी भेटली आणि आमच्या हातात वेगवेगळ्या ८ किल्ल्यांचा जुडगा दिला. 'लो बहु, आजसे सारी जिम्मेदारी तुम्हारी' वगैरे डायलॉग माझ्या डोक्यात आले, पण याचे करायचे काय आता हा प्रश्न त्याहून मोठा होता. ती तिच्या इंग्रजीतून प्रयत्न करत होती आणि आम्ही ते लक्षात ठेवण्यासाठी प्रयत्न करत होतो. एक होती अंडरग्राउंड पार्किंगचे दार उघडण्यासाठी, एक तिथून लिफ्टने वर येण्यासाठी, एक इमारतीच्या मुख्य दारासाठी आणि एक अपार्टमेंट साठी. या सगळ्याचे दोन सेट. काहीही माहिती त्यावर लिहिलेली नाही, बरं या आपल्या किल्ल्यांसारख्या नाही ना, सगळ्या इलेक्ट्रॉनिक चिप. आणि त्यातच ती इकडची तिकडे लावू नका, तुम्ही अडकून पडाल, आमची सिस्टीम मग ते रेकॉर्ड करत नाही असे काय काय सांगू लागली, त्याने आम्ही उगाच जास्त चक्रावलो. तिला म्हणणार होतो की बाई, बस आत गाडीत, सोबतच जाऊ पण तिच्यासोबत तिचा कुत्रा होता आणि त्यामुळे गाडीत बसणे शक्य नव्हते. पार्किंगची पहिली किल्ली बरोबर चालली आणि आम्ही आत शिरलो. तिथल्या खाणाखुणा काहीही कळत नव्हत्या. दोनदा गोल चक्कर मारून आम्ही परत तिथेच. शेवटी जागा मिळेल तिथे गाडी लावून तिला शोधत गेलो.
तिने अपार्टमेंट दाखवली आणि औपचारिक व्यवहार पूर्ण करून आम्ही गाडी कुठे लावली हे शोधायला बाहेर पडलो. तुम्हाला J नावाच्या इमारतीजवळ गाडी लावायची आहे असे ती म्हणाली होती, आणि आम्ही A to I एवढेच बघू शकत होतो, शेवटी एकदाचे ते सापडले. आपण कुठले दिशादर्शक चुकून पाहिले नाहीत की काय असे वाटत होते, पण तसे काही झाले नव्हते. पुन्हा एकदा फ्रेंच कार्यपद्धतीबद्दल चर्चा करतच गाडी शोधली, सगळे सामान घेतले आणि अपार्टमेंटमध्ये जाऊन लगेचच सोबत आणलेले सामान काढून खादाडीला सुरुवात केली.
दुसऱ्या दिवशी उठून पाहिले तर मुसळधार पाऊस सुरु होता आणि थोड्याच वेळात त्याची जागा हिमवर्षावाने घेतली. त्यामुळे कुठेही जाण्यात अर्थ नव्हता, आजूबाजूचे काहीच दिसत नव्हते. अजून एक मित्र देखील युरोप टूर दरम्यान इथे भेटणार होता, त्यामुळे त्याला भेटलो. एक दिवस बर्फामुळे वाया गेला असे आम्ही म्हणत होतो तर त्यांच्यासोबत असलेले सगळेच जण पहिल्या पावसाप्रमाणे या सगळ्याचा आनंद घेत होते. त्यांचा आनंद बघून आम्हीही त्यात सामील झालो. तसेही बाहेर फिरता आले नाही यापेक्षा मित्रांना भेटण्याचा आनंद निश्चितच जास्त होता.
दुसऱ्या दिवशी जायचे होते या लेक जीनेव्हा च्या काठावर असलेल्या Voire या सुंदर फ्रेंच खेड्यात.
तळटीप - लेखात बरेच फ्रेंच शब्द आहेत. त्याचे अचूक उच्चार कुणा जाणकारांना माहित असल्यास सांगावे.
क्रमशः
प्रतिक्रिया
25 Jun 2015 - 5:23 am | नंदन
टूरिष्टी ठिकाणांऐवजी जरा निराळी सफर आवडली. पुढील भागांतल्या पॅनोरॅमिक दृश्यांची आणि लेक जिनेव्हाच्या फोटूंची प्रतीक्षा आहे.
25 Jun 2015 - 6:58 am | अजया
किती सुंदर ठिकाणं!पुभाप्र.
25 Jun 2015 - 6:59 am | श्रीरंग_जोशी
नयनरम्य फोटोज अन माहितीपूर्ण लेखन.
पुभाप्र.
25 Jun 2015 - 7:16 am | यशोधरा
सुरेख!
25 Jun 2015 - 8:09 am | यसवायजी
वॉव.
25 Jun 2015 - 8:52 am | पाटील हो
भारीच .
25 Jun 2015 - 9:00 am | कंजूस
मस्तच!!
25 Jun 2015 - 9:56 am | उदय के'सागर
अहाहा.... धन्यवाद ह्या आल्प्स मेजवानी साठी. पु.भा.प्र. :)
25 Jun 2015 - 10:11 am | प्रभाकर पेठकर
व्वा! अप्रतिम आणि प्रामाणिक वर्णन. सुंदर छायाचित्रांनी सजविलेली भटकंती आवडली.
पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत आहे.
25 Jun 2015 - 10:42 am | स्पा
खपलोच... सुंदर फोटोज
25 Jun 2015 - 12:00 pm | स्वाती दिनेश
खरंच आहे, आल्पसच्या वळणांवर पुन्हा पुन्हा जावे वाटतेच वाटते..
स्वाती
25 Jun 2015 - 12:14 pm | अविनाश पांढरकर
किती सुंदर ठिकाणं!
25 Jun 2015 - 12:17 pm | मृत्युन्जय
सुंदर. पुभाप्र.
25 Jun 2015 - 12:40 pm | खटपट्या
जे काही फोटो दीसले ते अतिसुंदर.
आता वाचतोय...
25 Jun 2015 - 12:52 pm | कपिलमुनी
सुंदर सफर, फोटोसुद्धा अप्रतिम
25 Jun 2015 - 1:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
वाकड्या वाटेने जाणारी पण प्रसिद्ध वाटांच्याएवढीच तर कधी कधी किंचित जास्तच रोचक सफर ही तुमची खासीयत झाली आहे ! फोटो तर लाजबाब !
पुभाप्र.
25 Jun 2015 - 2:25 pm | पद्मावति
वाह फारच सुंदर...
मस्त वर्णन आणि फोटो....खूप आवडले.
25 Jun 2015 - 2:30 pm | के.पी.
ओहो!छान छान फोटो आणि झक्कास वर्णन! :))
25 Jun 2015 - 5:20 pm | सूड
पुभाप्र!!
25 Jun 2015 - 6:11 pm | केदार-मिसळपाव
येवु द्या पुढचा भाग...
शामोनी आणि मों ब्लों सुरेख आहेत.
पु.भा.प्र.
25 Jun 2015 - 6:15 pm | स्रुजा
सुंदर !
26 Jun 2015 - 8:43 am | जुइ
युरोपातील वेगळ्या वाटेवरील सफर आवडली.
26 Jun 2015 - 11:12 am | स्नेहल महेश
पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत आहे.
27 Jun 2015 - 1:28 am | सानिकास्वप्निल
सुंदर वर्णन, सुंदर फोटोंनी नटलेला लेख :)
वाचतेय.
27 Jun 2015 - 10:40 am | पैसा
खूप छान लिहिलंस! फोटो पण झक्कास!
1 Jul 2015 - 7:03 am | वेल्लाभट
वाह वाह वाह वाह ! प्रतिसाद द्यायला उशीरच होतोय.... पण क्या बात है ! सुरेख फोटो !
खाद्यपदार्थांचे फोटो विशेष माउथवॉटरिंग !
तो लटकवलेला घट; नीटनेटक्या इमारती..... इट फील्स सो प्लेजन्ट...