पटकन होणारा माशांचा प्रकार
तिलापिया, कॅटफिश या सारख्या माशांचे फिले ३-४
एक जुडी कोथिंबीर
सहा-सात पाकळ्या लसूण (अमेरिकेत मिळणार्या जाडजूड पाकळ्या, चांगल्या ना़जूक पाकळ्या मिळण्याचं भाग्य असेल तर १५-२० )
दोन-तीन तिखट हिरव्या मिरच्या.
एक चहाचा चमचा जिरं
हळद, तिखट, मीठ लिंबाचा रस ( भारता बाहेर असाल तर लाइम जूस घ्यावा, शक्यतो लेमन जूस नको )
तेल.
फिले धुऊन, पुसून कोरडे करावेत. त्यांचे साधारण दीड इंचाचे तुकडे करावेत ( बाईट साइझ ).
तुकड्यांना हळद, मीठ, किंचित तिखट ( किंवा मालवणी मसाला/बीअर बाटली मसाला यापैकी एक ) लावून बाहेर अर्धा तास किंवा फ्रीज मधे २४ तास पर्यंत ठेवावे.
कोथिंबीर, लसूण, मिरच्या अन जिरं एकत्र वाटावं. पाणी अगदी कमी घालावं वाटताना.
पसरट पातेल्यात सढळ हाताने तेल घालावे ( सगळे तुकडे एकाच थरात मावतील एवढे पातेले असावे ). तेल चांगले तापले की हळू हाताने माशांचे तुकडे त्यात घालावेत. एका बाजूने जरा लालसर झाले की परतावेत. परतून दोन-तीन मिनिटांनी हिरवे वाटण, चवीपुरते मीठ घालावे. माशांचे तुकडे तुटू न देता सगळं वाटण नीट हलवावं. गॅस थोडा मंद करावा. वाटण शिजलं की गॅस बंद करावा व लिंबाचा रस पिळावा.
पार्टीसाठी करायचं असल्यास मासे आधी परतून ठेवता येतील व वाटण सुद्धा आधी करून ठेवता येईल. वाढायच्या आधी तासभर दोन्ही फ्रीजमधून काढून बाहेरच्या तापमानाला येऊ द्यावे.
प्रतिक्रिया
1 Dec 2008 - 8:21 am | संदीप चित्रे
पण येऊन खाल्याशिवाय काय चव कळायची नाही ब्वॉ !! :)
1 Dec 2008 - 11:37 am | पांथस्थ
बीअर बाटली मसाला म्हणजे काय हो? नावानेच तोंडाला पाणी सुटले....
माझ्या कडे एक तिलापीया फ्राय ची पा.कृ. आहे ती टाकतो सवडीने.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
2 Dec 2008 - 7:21 pm | कपिल काळे
हो तेच म्हणतो बीअर बाटली मसाला म्हणजे काय?
पा़कॄ मस्त.
2 Dec 2008 - 9:23 pm | शोनू
हा मुंबईमधे मँगलोर स्टोअर्स मधे मिळतो. माझ्या माहितीप्रमाणे वसई भागातील ख्रिश्चन लोकांचा मसाला आहे. साधारण मालवणी मसाल्याच्या जवळपास चव असते अन त्यांच्यामधे जवळपास सर्व पदार्थांमधे हा मसाला वापरला जातो.
पॅकेजिंगचा सुळसुळाट व्हायच्या आधी हा मसाला रिकाम्या बीअरच्या बाटल्यांमधून विकत असत म्हणून बीअर बाटली मसाला असे नाव पडले आहे. अजूनही बीअरच्या बाटल्यांमधूनच मिळतो.
सांताकृझला अकबरलीजच्या थोडं पुढे ( खारच्या दिशेने जाताना ) एक दुकान आहे तिथे मिळत असे पूर्वी.
2 Dec 2008 - 9:27 pm | सुनील
मुंबईतील मराठी भाषक ख्रिस्ती समाज, ज्यांना इस्ट इंडियन असे म्हणतात, ते वापरत असलेला मसाला. थोडाफार मालवणीसारखाच स्वाद असतो. ठाण्यात कोलबाड भागात काही दुकांनात मिळतो.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.