एका मित्राच्या लग्नाचं निमित्त असल्याने सर्व मित्र बऱ्याच दिवसानंतर पुण्याला एकत्र जमले. सर्वांना वेळ असल्याने २-३ दिवस कुठेतरी ट्रीप काढावी अशी टूम मी काढली. अर्थात आमच्या मित्रांमध्ये ही टूम दरवेळी मलाच का काढावी लागते, हे मला अजून तरी समजलेले नाही. परंतु मी कधीच मलाच टूम का काढावी लागते ह्याबद्दल हरकत घेत नाही, कारण एकदा टूम काढली की मला फक्त बॅग भरणे एवढंच काम करायचं असत. कुठे जायचं, कधी निघायचं आणि कसं जायचं असल्या प्रश्नांचा विचार आजपर्यंत तरी मी ह्या मित्रांबरोबर फिरताना केला नाही.
खरंतर बऱ्याच दिवसांपासून कर्नाटकला फिरायला जाण्याची इच्छा होती, पण गोव्याच्या एवढं जवळ जाऊन गोव्याला न जाता कर्नाटकला जायचं ही कल्पनाच मनाला पटत नसल्याने दरवेळी राहून जायचं. यावेळीही अगदी तसाच विचार चालू असतानाच एका मित्राने म्हणजेच पंक्याने “गोव्याला जाणार असेल, तर मी येणार नाही” असं ठामपणे सांगितले. सगळ्यांनी आपली विचारचक्रे गोव्याला जाऊन काय काय करायचं, याऐवजी २-३ दिवसात दुसऱ्या कुठल्या ठिकाणी जाता येईल, या दिशांनी फिरवली. कर्नाटक, मध्यप्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये २-३ दिवस जाऊन येणे शक्य असल्याने या तीन राज्याचा विचार करण्यात आला. सरतेशेवटी कर्नाटकपासून गोव्याचं सर्वात कमी असलेले अंतर ह्या एकमेव मुद्द्याने कर्नाटकला जाण्याचे अखेर निश्चित करण्यात आले. जुन महिना चालु असल्याने पावसाचाही विचार करावा लागत होता. पाऊस नुकताच सुरु झाल्याने जोग धबधब्याला किती पाणी असेल ही धाकधूक मनात होतीच, पण जोग धबधब्यालाच जायचं ट्रीपच्या एक दिवस आधी सर्वानुमते ठरलं. सगळ्यांच्या इच्छाशक्तीपुढे अखेर पावसाचा विचार न करता जोग धबधबा–मुरुडेश्वर–पॅलोलेम बीच–दूधसागर धबधबा अशी एक ट्रीप करण्याचे ठरले.
ऑफिसमधून सर्वांना निघेपर्यंत रात्रीचे ७ वाजले होते. सर्वजण आवरून आणि ठरलेल्या ठिकाणी भेटून शुक्रवारी १२ जूनला रात्री ९ वाजता प्रवासाला पुण्यातून सुरुवात झाली. ह्या सगळ्या गडबडीत "मला जेवायला वेळच मिळाला नाही" अशी तक्रारवजा माहिती देत "जेवायला थांबूया" असा आग्रह तुषारने (आमचे गाडी चालक-मालक) धरला. "घरून जेवूनच निघालो आहे, विशेष भूक नाही" असे म्हणत त्याचा आग्रह म्हणुन सर्वांनी थोडंथोडं म्हणत बरच काही खाऊन घेतलं आणि पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झालो.
पहिल्यांदा जोग धबधब्याला जायचं असल्याने NH४ वरून पुणे-सातारा-कोल्हापूर-हुबळी-धारवाड रोडला साधारण ६ वाजेपर्यंत पोहोचलो. ह्या रोडवरून कालघाटगी गावाकडे प्रवास सुरु केला.
कालघाटगी येथून जोग धबधब्याला जाताना काढलेले फोटो
ह्या दोन पक्षांचा फोटो ते सकाळी-सकाळी आपलं आवरण्यात मग्न असतानाच काढला
“गाडी घेतल्यापासून, गाडीचा एकही फोटो नाही काढला” अशी माहिती तुषारने दिल्याने गाडीचाही एक फोटो काढला.
जोग धबधब्याला जाताना एका पुलावर गाडी थांबवली असता एक पक्षी माझा फोटो काढा म्हणुन पोझ देऊन बसला होता. ह्या ट्रीपमधे कुणालाच नाराज नाही करायचे असे ठरलेले असल्याने एक फोटो त्याचाही घेतला.
रमतगमत १३ जूनला सकाळी ११ वाजता एकदाचे जोग धबधब्याला पोहोचलो.जोग धबधब्याला वातावरणही आल्हाददायक होत. हलकासा पडणारा पाऊस आणि मधेच एकदम पडणाऱ्या उन्हामुळे पुढचे एक दोन दिवस तरी काही वेगळं पाहायला मिळणार अशी खात्री पटली. जोग धबधबा येथे एक दिवस राहायचे असल्याने हॉटेल शोधण्यास सुरुवात झाली. एक दोन हॉटेल पाहून जोग धबधबा येथे कर्नाटक सरकार चालवत असलेले मयुरा रिसोर्ट हे हॉटेल ठरवले. आम्हाला आलेल्या एकंदरीत अनुभवावरून मयुरा रिसोर्ट अतिशय उत्तम आहे.
जोग धबधब्याचे वातावरण सकाळी एकदम ढगाळ असल्याने काही पाहायला मिळणार की नाही ही शंका संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरणाबरोबर विरत गेली. पाऊस गायब होऊन संध्याकाळी एकदम मस्त ऊन पडले होते. थोडीफार विश्रांती घेऊन मग एक फेरफटका जोग धबधब्याभोवती मारला.
फेरफटका मारत असताना धबधब्याचे पाणी जेथून पडत आहे, तिकडे जाण्याची इच्छा आमच्यापैकी एक दोघांना झाली. तिकडे जाता येईल कि नाही यावर सप्या आणि माझ्यात बरीच चर्चा होऊन तिकडे जाण्याचे ठरले. जाता आले तर ठीक नाहीतर सहज फेरफटका मारून एखादा चहा पिउन रूमवर येत येईल असा विचार करून बाहेर पडलो.
सेल्फी
धबधब्याचे पाणी जेथून पडत आहे तिकडे जात असताना मधेच एका कुटुंबाचा घेतलेला फोटो
१४ जूनला सकाळी सगळे आवरून जोग धबधब्याला टाटा बायबाय करत मुरुडेश्वरला प्रयाण केले.
मुरुडेश्वरला जाण्यापूर्वी गुगलवर तेथील काही फोटो पाहिले असल्याने अतिशय उत्साही वाटत होते, परंतु तेथील भक्तीमय वातावरण पाहता ही जागा आपल्यासाठी नाही, असे उगाचच तेथील गर्दी पाहून वाटून गेले आणि लवकरच दर्शन घेऊन तिथून काढता पाय घेतला.
शंकराची ही मूर्ती १५३ फूट उंच आहे, असे तेथे लिहिलेल्या माहितीवरून समजले. खरेखोटे शंकर भगवान जाणे.
मंदिराच्या समोर असलेल्या गोपुराचा फोटो, प्रत्येकी १० रुपये तिकीट देऊन उदवाहनाच्या सहाय्याने गोपुरात वरपर्यंत जाता येते.
दर्शन घेण्यासाठी बरीच मोठी रांग असल्याने मिळालेल्या वेळात काढलेला हा मुरुडेश्वर समुद्रकिनाऱ्याचा फोटो.
आत्ता पुढे गोकर्णला जायचे असे अगोदर ठरले होते परंतु मुरुडेश्वर पेक्षाही जास्त भक्तीमय वातावरण आणि गर्दी गोकर्णला असते, असे एका जाणकार मित्राने म्हणजेच राव्ह्ल्याने बजावल्याने तिकडे न जाता गोव्याला जाऊया असे ठरले. पाळोले बीच(दक्षिण गोवा) पाहिला नसल्याने आणि अंतरही कर्नाटकमधून जवळ असल्याने पाळोले बीचला जाण्याचे ठरले. गोव्याला जायचे म्हंटल्यावर परत सगळ्यांमधे एक वेगळा उत्साह संचारला. कर्नाटकमधून गोव्याला जाताना रस्ता नुकताच बांधला असल्याने एकदम काळा कुळकुळीत आणि त्यावर मारलेले पांढरेशुभ्र पट्टे पाहून एक फोटो रस्त्याचाही घेतला.
१४ जूनला रात्री एकदाचे ९ वाजता गोव्याला पोहोचलो. गोव्याला विशेष असे काही फिरलो नाही त्यामुळे फोटोही काढले नाहीत. गोव्याला १४ जूनची रात्रभर विश्रांती घेऊन सकाळी सगळे आवरून दूधसागरला जाण्यास निघालो.
पॅलोलेम बीचकडून दूधसागरकडे जाताना रस्त्यात हे महाशय मधेच भेटले.
दूधसागरला काही खायला मिळणार नाही हे माहित असल्याने रस्त्यात एका साध्याच हॉटेलवर दुपारच्या जेवणाचा कार्यक्रम उरकून घेतला. साधंसच जेवण कडाडून भुक लागल्यामुळे सगळ्यांनी पटकन संपवलं.
साधारण ३ वाजता सोनालीम गावात पोहोचल्यावर यापुढील प्रवास खासगी वाहनाने करता येणार नाही अशी माहिती मिळाली. दूधसागर धबधब्यापर्यंत जाण्यासाठी ११ किमी अंतर पार करायला सर्वांना एकतर चालत किंवा काही सरकारनमान्य वाहने तेथील गावकरी चालवतात त्याने जावे लागते.
गावकरी चालवत असलेल्या सरकारनमान्य वाहनाचा दर प्रत्येकी ४०० रुपये किवा एक वाहन २४०० रुपये (जास्तीत जास्त ७ माणसे) असा आहे. आम्ही ५ जण होतो त्यामुळे एक वाहन करण्याचे ठरवले. जेथून वाहन घेतले तेथेच प्रत्येकी ५० रुपये देऊन लाईफ जॅकेट आणि प्रत्येकी २० रुपये प्रवेशदर म्हणुन द्यावे लागतात. २ दिवस प्रवासाने थकलेलो असल्याने आणि दुपारी ३:३० वाजता शेवटची गाडी जात असल्याने जास्त विचार न करता एक वाहन ५ जणामध्ये घेऊन करून दूधसागर धबधब्याकडे जाण्यासाठी निघालो. जंगलातून कच्या रस्त्याने प्रवास करून ४:१५ वाजता दूधसागरला पोहोचलो.
“५:१५ वाजता परत या” अशी ताकीद देऊन ड्रायव्हर आराम करत बसला आणि आम्ही दूधसागरच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. साधारण १ किमी चालत गेल्यावर समोर दूधसागरचे उंचावरून पडणारे पाणी मन प्रसन्न करून गेले. एकंदरीत नजारा पाहून एवढ्या लांब केलेल्या प्रवासाचे सार्थक झाले.
“५:१५ वाजता परत या” ड्रायव्हरच्या विनंतीला मान देत आम्ही ५:३०ला परत येउन सरकारमान्य गाडीत बसलो आणि ६:१५ वाजता सोनालीम गावात पोहोचलो. ड्रायव्हरला विचारले असता वाहनाची सुविधा २० जूनपर्यंतच चालू असते त्यानंतर नदीचे पाणी वाढल्याने बंद होते अशी माहिती मिळाली. दूधसागर धबधब्याचा अविस्मरणीय अनुभव घेऊन साधारण ६:३० वाजता एक चहा पिऊन पुण्याकडे म्हणजेच परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. परतीचा प्रवास दूधसागर-मोलेम-बेळगाव आणि मग NH४ मार्गे पुणे असा होता.
बेळगाव सोडल्यावर रात्रीचे जेवण करायला थांबलो असता मेनूमध्ये "मलई रोटी" असा एक पदार्थ होता. बटर रोटीला मलई+ कोथिंबीर+चटणी लावून हा भन्नाट प्रकार बनवला होता. आम्ही सहजच उत्सुकता म्हणुन एक मागवला आणि मग चव आवडल्याने प्रत्येकी ३ मलई रोटी झाल्यावर आता बास म्हणत थोडासा भात घेऊन जेवण आवरत घेतलं.
जेवण जास्त झाल्याने झोप सगळ्यांनाच अनावर झाली होती, परंतु अनावर झालेल्या झोपेवर मात करत साहेबांनी म्हणजेच राव्ह्ल्या आणि तुषारने रात्रभर गाडी हाकत सकाळी ४ वाजता सर्वांना पुण्यात मुद्देमालासकट पोहोचवल्याबद्दल मंडळ दोघांचेही आभारी आहे. थोडीशी विश्रांती घेऊन मग रोजच्या रहाटगाडग्याला थोड्याश्या अनिच्छेनेच सुरुवात केली.
पूर्ण ट्रिपचा गूगल नकाशा गूगलवरून साभार.
सुचना : ह्या भटकंती वर्णनात वापरलेली सर्व फोटो आमचे परममित्र “पंकज झरेकर” उर्फ “पंक्या” यांनी काढलेले असून त्यांच्या पूर्वपरवानगीनेच येथे अपलोड केले आहेत.
मिसळपावच नाही तर आंतरजालावर "आपण लिहिलेले कुणीतरी वाचावे" असा पहिलाच प्रयत्न असल्याने सांभाळून घ्यावे हि विनंती
प्रतिक्रिया
23 Jun 2015 - 11:17 am | टवाळ कार्टा
मस्त...पण फोटो दिसत नैत :(
23 Jun 2015 - 11:19 am | स्पा
पंकज झरेकर”,,वाटलेच .. जबराट फोटो काढतो हा माणूस
याने माझाही राजगडला एक फोटो काढलेला होता. ;)
दुध सागराचा एकाच फोटो???????
23 Jun 2015 - 11:26 am | अविनाश पांढरकर
पंकज झरेकर हा दुसरा आहे. आणि तुम्ही जो समजताय तो वेगळा आहे.
23 Jun 2015 - 11:30 am | स्पा
ओह ओक्के ओक्के :)
15 Jun 2017 - 3:16 pm | भटकंती अनलिमिटेड
कोणंय हा पंकज झरेकर?
19 Jun 2017 - 5:11 pm | भटकंती अनलिमिटेड
राजगडला फोटो? कुठला बरं?
23 Jun 2015 - 11:42 am | झकासराव
छान.. :)
23 Jun 2015 - 11:55 am | कंजूस
मस्त आहे.मलई रोटी!
23 Jun 2015 - 12:01 pm | अजया
मस्त ट्रिप आणि फोटो तर बेस्ट!
23 Jun 2015 - 2:02 pm | नाखु
वर्णन आणि चांगले लिखाण
पाप-पुण्य सेम सेम असल्याने फक्त निम्मे फोटो दिसले (नकाश्या धरून) बाकी पुण्यवान झाल्यावर दिसतील.
प्रतिक्षेत
नाखुस वाटपाहे
23 Jun 2015 - 2:36 pm | खटपट्या
फोटो दीसत नाहीत.
24 Jun 2015 - 12:31 am | अत्रुप्त आत्मा
पाण्यातला पोझपक्षी आणि ते सोज्वळ माकड कुटुंब आवडले.
24 Jun 2015 - 2:05 am | रुपी
छान..
24 Jun 2015 - 5:47 am | श्रीरंग_जोशी
सुंदर फोटोज अन वर्णन.
जिओ मिपावर या लेखाचा झेंडा रोवावा ही विनंती.
24 Jun 2015 - 2:26 am | मधुरा देशपांडे
मस्त वर्णन अन फोटो.
24 Jun 2015 - 5:01 am | रेवती
मस्त फोटू व वर्णन! तुमची गाडीही आवडली.
24 Jun 2015 - 8:37 am | अमितसांगली
धबधब्याचे अजुन फोटो हवे होते...
24 Jun 2015 - 9:04 am | नूतन सावंत
सुरेख फोटो आणि वर्णही, अशाप्रकारे एक ट्रीप करायचे ठरवले आहे.कारण एकदा गोव्याहून गोकर्ण आणि मुर्डेश्वरचा बेत ठरवला होता.पण रस्ता अतिशय खराब होता, त्यामुळे गोकर्णपर्यन्तच जाता आले.(खराब रस्ता=१० किमीला ३५ मिनिटे.)
24 Jun 2015 - 11:02 am | साधा मुलगा
फोटो आणि वर्णन आवडले.
24 Jun 2015 - 11:32 am | योगविवेक
मनातल्या मनात राहतात. पैकी ही एक!
सुंदर प्रवास वर्णन आणि सोबत नकाशासह छायाचित्रे! वा! मस्त पावसाळी वातावरणात भजी आणि वाफाळता चहाचे घुटके घेत मिसळपावचे सदस्य म्हणून हे लेखन वाचायला मिळत असल्याचे समाधान!! आणखी काय हवे?
24 Jun 2015 - 2:13 pm | सूड
वृत्तांत छान!!
संपादकानुं त्या 'पॅलोलेम'चं काहीतरी करा एकदा. पोर्तुगीजांनी नावांची वाट लावलंनीत आणि आपली लोकं पण खरे उच्चार न बघता तेच उच्चार करत असतात.
24 Jun 2015 - 3:12 pm | अविनाश पांढरकर
@सुरन्गी, अत्रुप्त, रुपी, झकासराव, कंजूस, अजया, मधुरा देशपांडे, रेवती, सुरन्गी : धन्यवाद
@टका, खटपट्या, नाद खुळा : फोटो थोबाडपुस्तकावर असल्याने ऑफिसमधून दिसत नाहीत.
@अमितसांगली, स्पा : धबधब्याचे अजुन फोटो मिळाले की टाकतो.
@श्रीरंग_जोशी : धन्यवाद, जिओ मिपावर लेखाचा झेंडा रोवला आहे.
@योगविवेक : मनातल्या बऱ्याच सहलींपैकी ही एक होती. अजुन बर्याच आहेत, पाहू किती पूर्ण होतात.
@सूड : पॅलोलेमचा मला बरोबर उच्चार सांगा, संपादन असल्याने मीच योग्य उच्चार टाकतो धाग्यात.
24 Jun 2015 - 3:24 pm | कपिलमुनी
पॅलोलेमचा मला बरोबर उच्चार = पाळोले
24 Jun 2015 - 3:34 pm | सूड
+१
24 Jun 2015 - 3:39 pm | केदार-मिसळपाव
ते धबधब्याचे फोटो तर एकदम मस्त.
24 Jun 2015 - 4:56 pm | वाचन प्रेमी
अप्रतिमंं
25 Jun 2015 - 1:00 pm | चौथा कोनाडा
भन्नाट आटोपशीर सहल-वर्णन !
फोटोही क्लासच ! आणखी माहिती-पुर्ण !
25 Jun 2015 - 8:10 pm | जुइ
फोटो आणि वर्णन दोन्ही खासंच! झटपट केलेली सहल आवडली.
25 Jun 2015 - 8:26 pm | पैसा
पहिल्याच प्रयत्नात छान लिहिलंय! फोटोही आवडले.
26 Jun 2015 - 6:18 pm | पद्मावति
वाह मस्तं प्रवासवर्णन.
फोटो आणि वर्णन दोन्हीही उत्तम. छान लिहिलय.
26 Jun 2015 - 6:48 pm | मुक्त विहारि
आवडले..
26 Jun 2015 - 7:43 pm | सुबोध खरे
दुधसागर धबधबा पाहण्याचा सर्वात स्वस्त आणी सुंदर उपाय म्हणजे मडगाव वरून लोंडा ला जाणारी कोणतीही गाडी पकडा.आणि तसेच परत या. फोटोत दिसतो आहे त्या पुलावरूनच ती गाडी जाते. आणी परत येताना त्याच पुलावर उभी राहते. इंजिनाचे आणी गाडीचे ब्रेक व्यवस्थित आहेत या तपासणीसाठी तिथे थांबवणे आवश्यक आहे म्हणून. दोन वेगवेगळ्या वेळेला तो धबधबा पाहता येतो आणि त्या गाडीतून तो पूर्ण ब्रागान्झा घाट इतका सुंदर दिसतो कि वर्णन करणे शक्य नाही.
नौदलात असताना गोव्यात साडेचार वर्षे काढली आहेत आणि सरकारी खर्चाने रेल्वेचा भरपूर वेळेस प्रवास केला आहे.
30 Jun 2015 - 1:05 pm | अविनाश पांढरकर
दुधसागर धबधबा एकदा रेल्वेने जाऊनही पहिला आहे. एवढ्या जवळून दुधसागर धबधबा पाहणे म्हणजे एक रोचक अनुभव आहे. २ ऑगस्ट २०१३, शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता निजामुद्दीन- गोवा रेल्वेने पुण्यातून प्रवास सुरु करून ३ ऑगस्टला पहाटे ४ वाजता दूधसागरला उतरलो. पहाट संपून दिवस सुरु होत जातो आणि भव्यदिव्य दूधसागरचे दर्शन होते, हा एकदम अवर्णनीय अनुभव आहे. प्रत्येकाने जमल्यास एकदा तरी तो घ्यावाच. दिवसभर दूधसागर आणि आसपासचा परिसर पाहून संध्याकाळी ४ वाजता त्याच गोवा-निजामुद्दीन रेल्वेने उलटा प्रवास करत रविवारी ४ पहाटे वाजता पुण्यात पोहोचलो होतो.
त्यावेळी काढलेले काही फोटो खाली देत आहे.
1 Jul 2015 - 1:00 am | पद्मावति
ऑलमोस्ट अनरीयल. सही आहे. चेन्नई एक्सप्रेस मधे हाच दाखवाला होता का?
26 Jun 2015 - 8:06 pm | अरवीन्द नरहर जोशि.
फारच चांगले लेखन आहे.
26 Jun 2015 - 9:13 pm | खटपट्या
वर जे साधसं जेवण म्हणून जेवणाचा फोटो आहे ते काही साधसं नाही. :)
चक्क बांगडे आहेत जेवणात जे आम्हाला अम्रुतासमान आहेत...
12 Jun 2017 - 11:08 pm | राहुल करंजे
तुम्ही गाडीऐवजी रेल्वेने गेला असता तर अजून मजा आली असती,, मी रेल्वेने गेलेलो... असो, धारवाड ते गोकर्ण या रोडवर्ती प्राण्यांची काही भीती नाहीना, कारण मी बाईक वरती चाललोय
13 Jun 2017 - 10:44 am | मनिमौ
तेवढ फोटोच कायतर बघा. बाकी सुंदर भटकंती.पाळोळे किनार्याला जाताना तुम्ही कारवार मार्गे गेलात का? कारवार चा टागोर बीच पण स्वच्छ आहे एकदम. तसेच तिथले अॅक्वेरियम पाहण्या सारखे आहे.