यादवकालीन शिल्पसमृद्ध मंदिर: पिंपरी दुमाला

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
17 Jun 2015 - 7:57 pm

असंच कधीतरी, कुठूनतरी पुणे-नगर रस्त्यावर रांजणगावच्या आसपास पिंपरी दुमाला येथे एक शिल्पसमृद्ध यादवकालीन मंदिर आहे ह्याची माहिती मिळाली होती. नक्की ठिकाण कुठे ते माहित नव्हते. मग काय निघालो शोधत आम्ही.

पेरणे फाटा ओलांडल्यावर दोन तीन ठिकाणी विचारतच जावे लागले. एका ठिकाणी डावीकडचा रस्ता पिंपरी दुमाला येथे जातो अशी माहिती मिळाली. तिथून घुसलो. चांगला डांबरी रस्ता थोड्याच वेळात कच्च्या खडबडीत रस्त्यात रूपांतरीत झाला. मग अतिशय लहानलहान वाड्या लागू लागल्या. ठिकठिकाणी विचारत खराब रस्त्याने एकदाचे पिंपरी दुमाला येथे जाऊन पोहोचलो.

गाव तसं लहान. मंदिर गावात शिरल्याशिरल्यानंतर थोडं पुढं आहे. सोमेश्चर मंदिर हे आजचं नाव. पूर्वीचं काय ते नक्की माहित नाही. मूळात मूळचं मंदिर शिवाचंच होतं की काय अशी शंका मंदिर नीट पाहिल्यावर मनात उभी राहते. गावकर्‍यांनी मंदिराला छानसं कुंपण घातलंय. मंदिर नीटनेटकं ठेवलंय. पण मूळच्या मंदिरावर रंगरंगोटीचे दुर्दैवी अविष्कार ह्या मंदिराच्याही वाट्याला आलेत.

पूर्वी हे भूमिज शैलीत बांधलेले मंदिर असावे. आज शिखराचा भाग आधुनिक आहे. तर मंदिराच्या अंगाचा भाग १००/२०० वर्षांपूर्वी भग्नावस्थेतून जीर्णोद्धारीत केलेला आहे. सभामंडपाचा भाग जीर्णोद्धारीत दिसत असून गाभार्‍याच्या बाह्य भाग हा मूळाच्याच शैलीत दिसतो. ह्या जीर्णोद्धारात मूळाच्या अनेक मूर्तींची जागा बदललेली येथे स्पष्टपणे दिसते. इतकेच नव्हे तर आवारात असलेले वीरगळही भिंतींमध्ये आधाराचे दगड म्हणून लावल्याचे येथे आढळते. मंदिराच्याच शेजारी खोलवर बांधून काढलेली एक अतिशय देखणी पुष्करिणी आहे.

पिंपरी दुमाला सोमेश्वर मंदिर
a
मंदिराच्या पुढ्यात नंदीमंडप आहे तर आवारात एका बाजूला यज्ञवराह आणि मत्स्याची मूर्ती आहे. यज्ञवराह म्हणाजे विष्णूचा तिसरा अवतार-वराहवतार. हा जेव्हा वराहाच्या पूर्ण रूपात दाखवला जातो तेव्हा तो यज्ञवराह म्हणवला जातो तर जेव्हा शिर वराहाचे आणि धड विष्णूचे अशी मूर्ती असेल तेव्हा तो नरवराह म्हणू ओळखला जातो. यज्ञवराहाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अंगावर विष्णूच्या लहानलहान असंख्य मूर्ती कोरलेल्या असतात तर सुळ्यांवर पृथ्वी धारण केलेली असते आणि पायातळी नाग असतो जे पाताळाचे प्रतिक मानले जाते. पुणे जिल्ह्यात तीन ठिकाणी यज्ञवराहाच्या मूर्ती आहेत- लोणी भापकर, पिंपरी दुमाला आणि चाकणचे चक्रेश्वर मंदिर.

इथली यज्ञवराहाची मूर्ती अत्यंत भग्न झालेली आहे. त्याच्याच बाजूला मत्स्याची मूर्ती आहे. सुरुवातीला ही मूर्ती पाहून ही कासवाची असावी असे वाटून माझी गफलत झाली होती. पण नीट पाहता हीचे तोंड मत्स्याशी जास्त मिळतेजुळते आहे. हा विष्णूचा पहिला अवतार मत्स्यावतार.

यज्ञवराह
a

मत्स्यावतार
a

मत्स्य आणि वराह
a

मंदिराच्या पुढ्यातला नंदीमंडप
a

चला तर आता मंदिराच्या बाह्यांगाचा एक फेरफटका मारूयात. पण तत्पूर्वी मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी लावून ठेवलेली एक विष्णूमूर्ती बघूयात.

ही इथली सर्वात देखणी मूर्ती. कित्येक शतकांच्या उनपावसाच्या मार्‍याने आज ही बर्‍यापैकी झिजली आहे. समभंग मुद्रेत ही मूर्ती असून शंख, चक्र, गदा ही आयुधे स्पष्ट दिसत आहेत तर पायापाशी गरुड विष्णूला प्रणाम करीत आहे. बाजूला इतर काही अनुयायी दिसत आहेत. नक्षीदार प्रभावळीत मस्तकाच्या वर गणेशमूर्ती कोरलेली असून डावी उजवीकडे बहुधा ब्रह्मा आणि महेश आहेत. ही मूर्ती सोडून मंदिराच्या आवारात इतरही असंख्य भग्न विष्णूमूर्ती आहेत.

विष्णूमूर्ती

a

चला तर आता मंदिराच्या बाह्यांगाचा एक फेरफटका मारूयात.

मंदिरांच्या बाह्यभागावर सुरसुंदरी, वादक, ऋषी, भैरव, चामुंडा, विष्णू, गणेश, महावीर तसेच काही वैशिष्ट्यपूर्ण मूर्तीही येथे आहेत. इथल्या मूर्ती तशा देखण्या नाहीत. बहुधा १३/१४ व्या शतकात यादव राजवट संपता संपता हे मंदिर बांधले गेले असावे. साहजिकच मूळच्या शैलीतली वैशिट्ये कायम राहूनही देखणेपणाचा मात्र येथे लोप झालेला दिसतो.

बाह्यभिंतींवरील सुरसुंदरी.

a

सुरसुंदरींच्या मध्ये मधेच वीरगळ चिणलेले दिसतात.

a

येथे काही मैथुनशिल्पे सुद्धा आहेत.
a

इथल्या एका भिंतीवर खूप आगळीवेगळी शिल्पे आहेत. कावड घेतलेला पुरुष, मोठे वृषण असलेला पुरुष, बाळाला जन्म देत असलेली स्त्री.

आगळीवेगळी शिल्पपट्टीका

a

बाळाला जन्म देणार्‍या स्त्रीची प्रतिमा मी लोणी भापकर येथील मंदिरावर पण पाहिलेली आहे. अशा शिल्पांचा उद्देश काय असेल ते कळात नाहीत पण बहुधा सृजनाचे प्रतिक म्हणून अशी शिल्पे कोरली जात असावी.

पिंपरी दुमाला येथील जन्मदात्र्या आईची प्रतिमा
a

भिंतीत चिणलेले वीरगळ येथे ठायी ठायी दिसत राहतात. इथल्या वीरगळाअंचे वैशिष्ट्य म्हणाजे हे वीरगळ त्रिस्तरीय आहेत. सहसा वीरगळ ४ स्तरांचे असतात. सर्वात वरचा थर शिवपिंड व नमस्कार करणारा वीर, दुसरा थर वीराला अप्सरा कैलासास घेऊन जाताना. तिसरा लढाईचा थर तर चौथा धारातीर्थी पडलेला वीर. येथे मात्र अप्सरांच्या थराचा अभाव दिसतो.

a

a

शिल्पपट्टीकेच्या शेजारीच ऋषी, जैन साधक अशा काही प्रतिमा आहेत.

a

सभामंडपाचा भाग संपवऊन आपण आता गर्भगृहाच्या बाह्यभागाशी येतो. येथे मंदिराचा मूळाचा भाग कायम राहिलेला दिसतो. इथल्या भिंतीवर जागोजागी विविध मूर्ती आहेत. इथल्या कोष्ठांमध्ये तसेच त्यांछ्या आजूबाजूला देखील मूर्ती कोरलेल्या दिसतात.

तप करणारा ऋषी

a

ऋषी, गोमटेश्वर, अनुयायी आणि गणेश

a

इथल्या देवकोष्ठात भैरवाची मूर्टी देखील आहे. हाती कपाल आणि खट्वांग, डमरू आणि त्रिशूळ, गळ्यात नरमुंड आणि संपूर्ण नग्न अशी ही भैरवाची प्रतिमा

भैरव
a

भैरवाच्याच जोडीला येथे नंदीवर बसलेल्या शिवाची मूर्ती देखील आहे.

शिव
a

मंदिराचा पार्श्वभाग
a

इथल्या भिंतींवर मातृशक्तीचे प्रतिक असलेल्या काही मूर्ती आहेत.( मातृका नव्हेत) पैकी एकीच्या एका हाती आंब्याचा घोस तर दुसरे हाती बीजापूरक धारण केलेले दिसते. तिच्याच बाजूला दर्पणसुंदरी आहे. तर दोघींच्या मध्ये एका सुंदरीने हाती नाग पकडलेला आहे.

बीजापूरक धारण केलेली स्त्री आणि दर्पणसुंदरी
a

त्याच्याच जवळपास विषकन्येची एक मूर्ती आहे. विषकन्येसोबतच असितांग भैरव आणि सुरसुंदरी आहेत.

a

विषकन्या जवळून
a

सुरसुंदॠ अभिसारिका प्रियकराला भेटायला नटूनथटून चालली आहे तर तिला एक मर्कट त्रास देते आहे. ती त्या मर्कटला एक थप्पड देते आहे. तिच्याच शेजारी डावीकडे एक घंटानाद करणारी पुरुषमूर्ती आहे.

सुरसुंदरी अभिसारिका
a

चामुंडेची एक अतिशय देखणी मूर्ती येथे आहे. अस्थिपंजर शरीर, खोबणीतून बाहेर आलेले डोळे, विचकलेल्या दाढा, लांबट स्तन, गळ्यात विंचू आणि नरमुंडमाला, हाती डमरू अआणि त्रिशुळावर नरमुंड आणि पायातळी प्रेत ही चामुंडेची वैशिष्ट्ये येथेही आहेत. ही चामुंडा ओठांमध्ये बोट ठेऊन शीळ घालत आहे.

चामुंडा
a

चामुंडेच्या शेजारी वेताळगण आणि सुरसुंदरी पुत्रवल्लभा आहे. पुत्रवल्लभा म्हणजे कडेवर लहान बाळ घेतलेली स्त्री.

सुरसुंदरी पुत्रवल्लभा
a

ह्या मूर्तीशेजारीच नटराज शिव आहे.

a

मंदिराचे बाह्यांग
a

एके ठिकाणी भिंतीत कठोर तप करणारा ऋषी आणि नागप्रतिमा आहे.
a

परत येथे जैन साधक किंवा महावीर आणि नागप्रतिमा दिसते.
a

सुरसुंदरी आणि वादक
a

मंदिरांच्या बाह्यांगाचा फेरफटका मारून आपण मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करतो.
प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस प्रतिहारी तसेच सेवक कोरलेले आहेत. सभामंडप नक्षीदार स्तंभांवर कोरलेला असून स्तंभांच्या जंघ्यांवर विविध प्रकारची शिल्पे, किर्तीमुखे आणि नक्षी इत्यादी कोरलेली आहेत.

प्रवेशद्वारावरील प्रतिहारी
a

सभामंडप

a

स्तंभांवरील काही शिल्पे -वाली आणि सुग्रीव
a

तीन पुरुष आणि चार पाय असलेले आभासी शिल्प
a

वादक
a

पुन्हा एकदा चामुंडा
a

गर्भगृहाचे दारावर देखील प्रतिहारी कोरलेले असून मंदिरातील सर्वात देखणे स्तंभ तेथेच आहे.

गर्भगृहाचे प्रवेशद्वार
a

सोमेश्वर महादेव
a

गाभार्‍यातून बाहेर पडून पुष्करिणीपाशी गेलो. अतिशय देखणी पुष्कर्णी आहे ही. पूर्णपणे बांधीव. खोलवर उतरत गेलेली.

a

येथून अगदी जवळच दुसरे एक लहानसे मंदिर आणि तेथेच एक भव्य पुष्करिणी आहे. ती मात्र आवर्जून पाहालायच हवी. रामेश्वराचे ते मंदिर.

रामेश्वर मंदिर
a

रामेश्वर पाहिल्यावर तिथून निघालो तर रांजणगाव ७ किमी अशी पाटी दिसली. अतिशय चांगला रस्ता. ह्या रस्त्याने रांजणगावच गणपती, मंदिराचे आवारातील सतीशिळा आणि वीरगळ पाहून घरी परतलो.

काही टिपलेले क्षण

a

a

a

a

a

प्रतिक्रिया

कंजूस's picture

17 Jun 2015 - 8:20 pm | कंजूस

हा पिंपरी दुमालाचा लेख प्रथमच लिहित आहात का? कारण याचा उल्लेख वल्ली यांच्या इतर लेणी आणि मंदिरांच्या संदर्भांत आलेला आहे. मला असे म्हणायचे आहे की या मंदिराचीच माहिती देणारा लेख आहे वाटतं. फोटो थोडे उमटले आहेत ते आवडले.बाकीचे पाहिल्यावर आणखी विचारेन.

जाण्यासाठी दौंड स्टेशन सोयिस्कर पडेल का?रांजणगावला राहून एक दिवसात पाहून येता येईल?

अनुप ढेरे's picture

17 Jun 2015 - 8:30 pm | अनुप ढेरे

हा वल्लींचाच आयडी आहे बहुधा.

रांजणगावला राहून एक दिवसात पाहून येता येईल?"

वल्लींना हायजॅक करून, वेरूळ आणि पुण्याच्या आसपासची, लेणी बघू या का?

पुण्याहूनही अर्ध्या दिवसात अगदी सहज पाहून होतं.

पॉइंट नोटेद....

पुढची पुणे ट्रिप तुमच्या सवडीनुसार आखू.

आकुर्डीहून,बेडशी लेणी आणि हे मंदिर, एका दिवसात करता येईल का?

प्रचेतस's picture

18 Jun 2015 - 8:52 am | प्रचेतस

एका दिवसात करता येतील पण दोन्ही ठिकाणं विरुद्ध दिशांना आहेत.
त्यापे़षा बेडसे, भाजे, कार्ले ह्या तीन लेण्या एका दिवसात करता येतील किंवा भुलेश्वर, पिंपरी दुमाला हे एकत्र जोडता येतील.

प्रचेतस's picture

17 Jun 2015 - 9:43 pm | प्रचेतस

हो.
ह्या मंदिरावर पहिल्यांदाच लिहितोय. सुरसुंदरींच्या निमित्ताने यातील काही तुरळक छायाचित्रे इतरत्र आली होती.

दौंड खूपच गैरसोयीचे आहे. पुण्याला उतरून नगरच्या दिशेने जाणारी कोणतीही बस पकडून रांजणगावला उतरायचे. तिथून जीप किंवा सहा आसनी मिळू शकेल.

अनुप ढेरे's picture

17 Jun 2015 - 8:31 pm | अनुप ढेरे

शिल्पे भारी आहेत. ते ३ लोक चार पाय शिल्प अगदीच गंडलय पण.

मुक्त विहारि's picture

17 Jun 2015 - 8:31 pm | मुक्त विहारि

पुढच्या पुणे भेटीत, मुलाला घेवून वल्लींबरोबरच वेळ काढावा लागणार.

सर्व फोटो पाहिले.शेवटून तिसरा वीरगळच आहे का? सुरसुंदरी आणि दर्पणसुंदरी कशी ओळखायची?अभिसारिकेला नेहमी मर्कटच का भेटतो ?तिचे शिल्प मनोरंजनार्थ असावे.

सहिच रे, चंडिकेचे शिल्प लय ड्यांजर वाट्टय

अवांतर : वल्ली च चांगले होते, नया नाम मे मज्जा नय

स्वच्छंदी_मनोज's picture

17 Jun 2015 - 9:23 pm | स्वच्छंदी_मनोज

नेहेमी प्रमाणेच उत्तम लेख आणी डीट्टेलवार माहीती.

अवांतराबाबत स्पाला +१००.. पुर्वीचे वल्लीच जास्त चांगले होते.

आज शेक्सपियरने सांगीतलेले "नावांत काय आहे?" हे वाक्य बर्‍यापैकी पटले.

(कुणी लिहिले आहे? ह्या पेक्षा काय लिहिले आहे? हे बघणेच जास्त योग्य.)

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jun 2015 - 11:47 pm | अत्रुप्त आत्मा

@ पुर्वीचे वल्लीच जास्त चांगले होते.>> बगा बगा! आम्मिच येकटे नै बोलत! :-\

दू दू दू नामांतरित हत्ती! :-\

लेणी,शिल्पकला इत्यादीसाठी "वल्ली"च राहू द्या.टारगटपणासाठी "टल्ली" नाव घ्या हवेतर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jun 2015 - 6:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेणी दगड़ शिल्प मंदिर चामुंडा वीरगळ इ इ वल्लीच आयडी चांगला होता.

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jun 2015 - 6:38 am | अत्रुप्त आत्मा

गजेंद्रपावकवल्ली - हे ही चालेल! :-D
म्हणजे त्यात हत्ती+आगोबा+वल्ली ,असं सगळच येइल. ;-) शिवाय संस्कृत वाटत असलेने आपोआपच हुच्च ही नै का झालं? ;-)

यशोधरा's picture

17 Jun 2015 - 9:06 pm | यशोधरा

मस्त लेख आणि फोटो.

वीरगळामध्ये असलेले चार थर अनुक्रमे वरपासून खालपर्यंत प्रक्रियेचे दर्शक आहेत असं मानलं, तर वरून दुसर्‍या अप्सरेच्या थराचं प्रयोजन कळलं नाही.

म्हणजे:
१. वीराने शंकराची भक्ती केली
२. अप्सरा वीराला स्वर्गात घेऊन गेल्या (???)
३. वीराने युद्ध केलं
४. वीर धारातीर्थी पडला

१-३-४-२ हा क्रम जास्त बरोबर वाटतो.

प्रचेतस's picture

17 Jun 2015 - 9:40 pm | प्रचेतस

नाही नाही.
वीर धारातीर्थी पडल्यावर तो कैलासाप्रत पोचलाय हे सर्वात वरचा थर दाखवत असतो. सर्वात वरचा थर सगळीकडे सारखाच असतो.इतर तीन थर मात्र बरेचवेळा बदलत असतात.

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आणि रोचक लेख.

लेख नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण.या शिवमंदिरात एवढ्या जैन प्रतिमा कशा आहेत?

प्रचेतस's picture

17 Jun 2015 - 9:46 pm | प्रचेतस

यादवांचे काही महाल जैन घराण्यातले होत शिवाय जैन धर्माला त्यांचा राजाश्रय होता त्यामुळे यादव, शिलाहार यांच्या राजवटीतील कित्येक मंदिरांवर जैन प्रतिमा अगदी सर्रास दिसतात.

मनोज श्रीनिवास जोशी's picture

17 Jun 2015 - 9:47 pm | मनोज श्रीनिवास जोशी

मंदिरांकडे बघण्याची नवी दृष्टी देणारा लेख आवडून राहिला आहे!

पैसा's picture

17 Jun 2015 - 10:42 pm | पैसा

बाळाला जन्म देणारी स्त्री म्हणजे लज्जागौरी.

या देवळातली सगळी शिल्पे एका कालखंडातली वाटत नाहीत. काही जुन्या पद्धतीची आहेत तर काही तेवढीशी प्रमाणबद्ध नाहीत.

प्रचेतस's picture

18 Jun 2015 - 8:55 am | प्रचेतस

बाळाला जन्म देणारी स्त्री म्हणजे लज्जागौरी नव्हे. लज्जागौरी ही बाळाशिवाय आणि उत्तानपादासनात असते.
इथली शिल्पे फारशी प्रमाणबद्ध नाहीत कारण बहुधा हे मंदिर राजाश्रयविरहित असावे व कोण्या धनिकाने बांधले असावे. अर्थात हा केवळ तर्कच. तसा कुठलाही पुरातत्वीय पुरावा येथे नाही.

पैसा's picture

18 Jun 2015 - 11:00 am | पैसा

रा.चिं.ढेर्‍यांचे लज्जागौरी वाच प्लीज. हे पुढे दिलेले अठराव्या शतकातील काष्ठशिल्प आहे. अशी शिल्पे कुरुंदवाड आणि गोव्यातील कुर्डी येथे मिळायाचा उल्लेख आहे.

lajjagauri

हे पुस्तक आता वाचलेच पाहिजे.

यज्ञवराहाची अवस्था बघून वाईट वाटलं.

सूड's picture

17 Jun 2015 - 10:52 pm | सूड

रच्याकने, त्या मत्स्यावताराच्या मूर्तीत चार पाय आणि शेपूट दिसतेय तरी तो मत्स्यावतार कसा?

प्रचेतस's picture

18 Jun 2015 - 8:57 am | प्रचेतस

ते माशाचे पर आणि शेपूट समजावेत. येथील शिल्पाकृतीचे मुख कासवमुखाशी कुठल्याह्ही प्रकारे जुळत नाही मात्र ते मत्स्यमुखाशी चांगलेच जुळते तसेच कासवाचे कवच पण येथे दिसत नाही.

नेहमीप्रमाणेच उत्तम लेख.

त्या शिल्पात मत्स्यावताराच्या शेपटाचा विशिष्ट आकार आणि खवल्यांचाही अभाव दिसत आहे. मत्स्यावताराचे शिल्प हे एका बाजूने असल्याचे सर्वत्र पाहिलेले आहे, तर कूर्मावतार हा टॉप व्ह्यू म्हणजेच वरून घेतल्याप्रमाणे चित्रांत/शिल्पांत पाहिलाय. त्यामुळे हा मत्स्यावतार असावा ह्या तुमच्या मताशी थोडा असहमत आहे.

बॅटमॅन's picture

18 Jun 2015 - 2:49 pm | बॅटमॅन

असेच म्हणतो. कासवाचे कवच म्हटले तर देवळांमधल्या शिल्पांत नेहमी नरम पाठीचे कासवच दाखवतात, कवच अ‍ॅज़ सच जाणवते कुठे?

शिवाय शेपटाचा विशिष्ट आकार नसलेला मत्स्यावतार अन्यत्र कुठे पाहिला आहे का?

प्रचेतस's picture

18 Jun 2015 - 3:08 pm | प्रचेतस

तसा मत्स्यावतार मी अन्यत्र पाहिल्याचे स्मरते.
अर्थात हिंदू मायथॉलोजिकल शिल्पं ही तशी बर्‍याच वेळा हायब्रीड असतात.
वरील शिल्प कदाचित मत्स्य नसून कूर्म असेलही पण तसे छातीठोकपणे सांगता येणार नाहीच.

मत्स्य नसून कूर्म असेलही पण तसे छातीठोकपणे सांगता येणार नाहीच.

there you go!! याचाच अर्थ तो 'मत्स्यच आहे' असंही छातीठोकपणे सांगता येणार नाही.

बॅटमॅन's picture

18 Jun 2015 - 6:21 pm | बॅटमॅन

धन्यवाद.

गणेशा's picture

18 Jun 2015 - 12:08 am | गणेशा

नेहमीप्रमाणे मस्त

मंदिर सुंदर आहे. चांगली माहिती!

विशाल कुलकर्णी's picture

18 Jun 2015 - 10:13 am | विशाल कुलकर्णी

लै भारी..
भेट द्यायला हवीच एकदा !

पॉइंट ब्लँक's picture

18 Jun 2015 - 11:17 am | पॉइंट ब्लँक

एका विस्मृतित गेलेल्या मंदिराची छान माहिती दिली. फोटो पण सुंदर आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jun 2015 - 11:45 am | डॉ सुहास म्हात्रे

खास वल्ली-ष्टैलचा प्रचेतस यांचा लेख ! :)

माहित नाही कुठून कुठून लेणी आणि देवळे शोधून काढतो हा माणुस. मग मस्त फोटो आणि वर्णनाने भुरळ घालतो. अश्याने बघायच्या गोष्टींची यादी वाढत जाऊन फक्त महाराष्ट्र पहाण्यातच सगळं आयुष्य जाईल आणि दुसरीकडे भटकायला वेळच उरणार नाही ना ?! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jun 2015 - 12:12 pm | अत्रुप्त आत्मा

@ माहित नाही कुठून कुठून लेणी आणि देवळे शोधून काढतो हा माणुस. मग मस्त फोटो आणि वर्णनाने भुरळ घालतो. अश्याने बघायच्या गोष्टींची यादी वाढत जाऊन फक्त महाराष्ट्र पहाण्यातच सगळं आयुष्य जाईल आणि दुसरीकडे भटकायला वेळच उरणार नाही ना ?! ;)>> +++१११ हम्न्ये ये सफ़र आगुबाबा पत्थरवाले के साथ किया है| आगुबाबा से लाइव्ह सुनने में जितना मज्जा आता है,वैसाही मजा इदर पढने में भी आता है|

नाखु's picture

18 Jun 2015 - 12:14 pm | नाखु

हे ठिकाण "मोराची चिंचोली" नजीक आहे काय? चिंचोलीला जाऊन ३ वर्षे झाली म्हून चौकशी.

धन्याशेठ बरोबरच्या इतर सजीव शिल्पांची नावे काय?

चौकस नाखुस.

मोराच्या चिंचोलीजवळच आहे पण रांजणगावच्या खूपच जवळ आहे.
इतर सजीव शिल्पे म्हणजे बुवा आणि वप्या. अडीच वर्षांपूर्वी येथे गेलो होतो. :)

लेख खूप आवडला. या निमित्ताने महाराष्ट्रातील यादवकालीन व त्याअगोदरच्या काळात बांधलेल्या देवळांची लिस्ट कुठे मिळेल काय? किमान पुणे जिल्ह्यातील अशी लिष्ट मिळाली तरी बास.

प्रचेतस's picture

18 Jun 2015 - 1:15 pm | प्रचेतस

संध्याकाळी काही टंकतो

धन्यवाद, लिष्टीचा इंतजार आहे.

प्रचेतस's picture

18 Jun 2015 - 3:26 pm | प्रचेतस

पुण्यातील काही.

१. यवतचा भुलेश्वर
२. पूरचा कुकडेश्वर
३. (नारायण्)पूरचा नारायणेश्वर
४. सासवडचा संगमेश्वर
५. सासवडचा चांगावटेश्वर
६. खिरेश्वरचा नागेश्वर
७. नायगावचा सिद्धेश्वर
८. माळशिरस-यवत
९. नाझरे- कोथळे
१०. लोणी भापकर

यातली शिल्पसमृद्ध अशी पिंपरी दुमाला, भुलेश्वर, नागेश्वर, लोणी भापकर आणि काही प्रमाणात चांगावटेश्वर अशी इतकीच आहेत.

बाकी पुण्याजवळची अजून काही नगर-सातारा जिल्ह्यात आहेत.

पेडगाव- लक्ष्मीनारायण, बाळेश्वर, मल्लिकार्जुन, भैरवनाथ
भिगवणाच्या अलिकडे-पळसदेव
रतनवाडीचे अमृतेश्वर
अकोले येथील सिद्धेश्वर,
टाहाकारी येथील एक मंदिर.

आणि बाकी कित्येक अशी आहेत.

बॅटमॅन's picture

18 Jun 2015 - 6:22 pm | बॅटमॅन

अतिशय धन्यवाद.

यांपैकी कुकडेश्वर आहे ते पूर गाव नक्की कुठेय?

शिवाय- नारायणेश्वराच्या एंट्रन्सवरतीही चांगावटेश्वर असा शिलालेख कोरल्याचे पाहिले आहे.

पूरचा कुकडेश्वर म्हणजे चावंड किल्यानजीकचं एक लहानसं गाव. जुन्नर-नाणेघाट मार्गावर.

अच्छा, धन्यवाद 'प्र'ल्ली आणि कंजूस.

जुन्नर -पुरफाटा-चावंडफाटा-घाटघर-{ नाणेघाट करता} अंजनावळे बस जाते.पुरफाट्यापासून एक किमी आहे कुकडेश्वर.

स्वच्छंदी_मनोज's picture

18 Jun 2015 - 7:39 pm | स्वच्छंदी_मनोज

आणी हे मंदीर नुकतेच ASI ने पुर्नबांधीत केले आहे. पुर्वी ह्या मंदीराचे दगड इतस्तः पडले होते आता मंदीर सुरेख आहे.

स्वच्छंदी_मनोज's picture

18 Jun 2015 - 7:49 pm | स्वच्छंदी_मनोज

शंका - खिरेश्वर चा नागेश्वर त्याही पेक्षा जुना असू शकेल काय? कारण ह्याच्या मंदीरात छताला असलेले कोरीव नक्षीदार दगड अत्यंत सुंदर आहेत आणी अजुन कुठे असे आहे काय? जश्या नक्षीदार टाईल्स असाव्यात तसे मोजून मापून हे चौकोनी दगड छताला बसवले आहेत. आणी ह्याच्या जवळच असलेल्या लेण्या (त्यासुद्धा आत बांधत गेलेल्या) हे बघून ही शंका घ्यायला वाव आहे काय?

प्रश्ण - जसे यादवकालीन शिव मंदीरे आहेत तशीच शिलाहारकालीन शिव मंदीरे ठाणे जिल्हात बांधली गेलीत, बहुदा १२ असावीत जशी की अंबरनाथ, कौपीनेश्वर, आटगांव, लोनाड. ह्या मंदीराची माहीती आहे काय तुझ्याकडे?

प्रचेतस's picture

18 Jun 2015 - 8:25 pm | प्रचेतस

नागेश्वर साधारण कुकडेश्वराच्या समकालीन आहे. ही दोन्ही मंदिरे उत्तर कोकणचा शिलाहार राजा झंझ ह्याने बांधलेली मानली जातात. ठाण्यात शिलाहारांनी अनेक मंदिरे बांधली आहेत पण ती वेगळ्या राजांनी. अंबरनाथचे शिवालय मुन्मुणी याने बांधले तर कौपिनेश्वर, आटगांव बहुधा अपरादित्याने बांधलेली आहेत.
पण झंझाने बांधलेली १२ शिवालये ही घाटमाथ्यावर होती. आजमितीस २/३ वगळता इतर सर्वच नाहिशी झालीत.

शिलाहार राजा अपरादित्याच्या पन्हाळे ताम्रपटात झंझाने केलेल्या मंदिरनिर्मितीचा पुढिलप्रमाणे उल्लेख आहे.

श्री झंझराजो दिवसकर इव ध्वस्तनि:
शेष दोषः शंभर्यो द्वादशोपि व्यरचयद
चिरा त्कीं तनानी स्वनाम्ना सोपानानी

ह्याने बांधलेली काही मंदिरे पुढीलप्रमाणे
त्र्यंबकेश्वर (सध्याचे नाही) , त्रिंगलवाडी, बेलगाव, टाकेद, रतनवाडीचा अमृतेश्वर, हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, पूरचा कुकडेश्वर, खिरेश्वरचा नागेश्वर, भोरगिरी. बाकीची नेमकी कुठे आहेत ते आता आठवत नाहीत.
शिवाय वरील यादित उल्लेख केलेली मंदिरे हीच झंझाने बांधलेली आहेत याचीही शाश्वती देता येणार नाही कारण अमृतेश्वर, कुकडेश्वर, नागेश्वर ही मंदिरे सोडली तर इतर मंदिरे आज अस्तित्वात नाहीत.

स्वच्छंदी_मनोज's picture

20 Jun 2015 - 12:01 am | स्वच्छंदी_मनोज

जबरी माहीती..अनेक धन्यवाद ह्या माहीती बद्दल.

झकासराव's picture

18 Jun 2015 - 4:41 pm | झकासराव

भारी आहे लेख. :)

पाटील हो's picture

18 Jun 2015 - 5:00 pm | पाटील हो

फोटो भारी , सवडीने वाचण्यात येईल .

स्वाती दिनेश's picture

18 Jun 2015 - 5:06 pm | स्वाती दिनेश

लेख आवडला, नवी माहिती समजली. फोटोही आवडले.
स्वाती

टवाळ कार्टा's picture

18 Jun 2015 - 5:52 pm | टवाळ कार्टा

लास्टच्या फोटोत धन्या एकदम ड्याशींग दिस्तोय नै...एक्दम बॉडीबिल्डींगची पोज आहे :)

cartoon

खटपट्या's picture

19 Jun 2015 - 8:26 pm | खटपट्या

खूप छान फोटो आणि माहीती.

रामेश्वर मंदीर आणि त्यासमोर पुष्करीणी (बांधलेली वीहीर) हे ठरलेलेच असते का? असे विचारण्याचे कारण माझ्या आजोळी आणि माझ्या गावी, दोन्ही ठीकाणी रामेश्वराचे देउळ आहे आणि दोन्ही देवळांसमोर चित्रातल्याप्रमाणे बांधलेल्या वीहीरी आहेत. शेजारच्या गावातही असेच आहे.

प्रचेतस's picture

19 Jun 2015 - 11:13 pm | प्रचेतस

केवळ रामेश्वरच असं नाही पण बहुतेक सर्वच प्राचीन मंदिरांत पुष्करिणी असतेच असते. जेथे पुष्करिणी दिसत नाही तेथे हमखास नदी असते

मंदिरातील देवतेच्या अभिषेकाच्या दृष्टीने ही पाण्याची सोय केलेली आढळते आणि मंदिरांचे कुठले ना कुठले द्वार त्या पाण्याच्या दिशेने असते.

योगेश आलेकरी's picture

4 Dec 2015 - 9:24 am | योगेश आलेकरी

चंडिका व चामुंडा मधील फरक कृपया स्पष्ट कराल का ?? भुल्श्वरला चंडिका आहे की चामुंडा की विषकन्या.. ????

प्रचेतस's picture

4 Dec 2015 - 9:38 am | प्रचेतस

चंड म्हणजे क्रुद्ध.
चंडिका हे दुर्गेचे क्रोधित रूप आहे. तर चामुंडा ही मातृकांपैकी एक आहे. दोघीही शाक्त परंपरेतल्याच. चंडीकेची लक्षणे सामान्यतळ दुर्गेप्रमाणेच असतात तर चामुंडा ही सापळ्यासारखी, भयप्रद, पोटात विंचू, हाती कपाल आणि प्रेतवाहन असणारी.

भुलेश्वरला चंडिका नाही, मात्र महिषासुरमर्दिनी आहे, चामुंडा आणि विषकन्या ह्या सुद्धा आहेत. विषकन्या मात्र देवी नसून नायिका आहे.

एक सामान्य मानव's picture

4 Dec 2015 - 11:25 am | एक सामान्य मानव

ह्यातिल काही प्रतिमा बेलूर व हळेबिडू येथे अगदी अशाच आहेत. उदा. सुन्दरी व मर्कट, भैरव, चामुंडा ह्या तर स्पष्ट आठवतात. इतक्या दुरवरील मंदीरात हे साम्य कसे?

मूर्तींमध्ये साम्य तसे कमी. कारण शैली वेगळी असते. होयसळ शैली खूप सालंकृत आहे. मात्र भारतभर लक्षणे तीच आढळतात.

सुरेख लेख! मंदिरांकडे असे कधी पाहिले नव्हते.

पद्मावति's picture

5 Dec 2015 - 3:14 pm | पद्मावति

अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण लेख.

बिन्नी's picture

5 Dec 2015 - 5:49 pm | बिन्नी

उत्तम लेख.
फोटो ही आवडले.