शनिवारी संध्याकाळी नाक्यावर बसलो असताना अचानक सांधण दरी चा विषय निघाला आणि जायच असेल तर आताच गेलं पाहिजे नंतर पाऊस लागला कि पुढच्या वर्षी शिवाय जायला जमणार नाही, दरीत काही ठिकाणी छातीभर पाणि असतं वगैरे वगैरे चर्चा झाल्या आणि उद्याच म्हणजे रविवारी पहाटे निघायचं ठरलं. एक दिवसात सामरद मार्गे पुर्ण सांधण दरी उतरून पुन्हा सामरदला येउन मग घरी एव्हढ सगळं करायचं तर पहाटे लवकर निघ्ण्याशिवाय पर्याय न्हवता.
पहाटे ४.३० ला मी, सुजीत, गिरीष आणि भूषण, भूषणच्या गाडीतून निघालो, म्हणजे मोटारच्या यंत्राचा आवाज पहाटे ४.३० ला चालु झाला. ठाणे ते सामरद अंतर साधारण १७० कि.मी. ठाणे-शहापूर-कसारा-इगतपुरी-घोटी-शेंडी-उड्दवणे-सामरद असा प्रवास सुरु झाला. कसारा घाटाच्या आधी चहापानासाठी थांबलो तेवढीच गाडीलाही विश्रांती. पुढे वाटेत घाटघर धरण परिसर आणि धरणाचे बॅकवॉटर याचा फ़ोटो घेण्यास थांबलो. पोस्टर कलर ने चित्र रेखाटलं असाव असे एक-दोन सुंदर फ़ोटो मिळाले.
भूषणच्या फेसबुक प्रोफ़ाइल साठी १-२ फ़ोटो काढले आणि सामरद कडे रवाना झालो.
साधारण ०८.०० च्या सुमारास सामरद गावात पोहोचलो. गावातील श्री. निवॄत्ती यांचा मोबाईल नंबर होताच, त्यांच्याशी संपर्क होताच ते देखील लगेच आमच्या स्वागतासाठी हजर झाले. "अहो आत्ता आलात त्यापेक्षा काल रात्री आला असतात तर भरपुर काजवे बघायला मिळाले असते, सध्या काजवे महोत्सव चालु आहे, त्यासाठी सुध्दा भरपुर लोक आलेत" इति श्री. निवॄत्ती. मी मनात म्ह्ट्लं म्हणजे आम्ही मनातच म्हणायचे "च्यायला सांधण दरी ऊतरताना डोळ्यांसमोर काजवे येणारच आहेत पुन्हा रात्री कशाला काजवे बघा. काहीही हा (श्री) निवॄत्ती." त्यांच्याच घरासमोरील मोकळ्या जागेत गाडी पार्क केली आणि चहासाठी थांबलो. घरच्या बागेत छान जास्वंद फुलला होता लगेच क्लिकुन टाकल
वाफाळलेला कोरा चहा घेतला आणि ०८.३० च्या सुमारास सुप्रसिध्द सांधण घळीच्या दिशेने निघालो.
सामरद गावाच्या पुढे साधारण १५.२० मि. चालल कि एक वाडी लागते तिथे भरपुर गाड्या लागल्या होत्या त्यावरुन एकंदर गर्दीचा अंदाज आला.
वाडीहुन आणखी १० मि पुढे गेलो आणि सांधण घळीच्या मुख्य वाटेला लागलो.
काही क्षणातच घळीजवळ दाखल झालो.
हौशी पर्यट्कांनी घळीच्या तोंडाशीच गर्दी केली होती.
या सर्व गर्दीला लिलया पार करत आम्ही पुढे निघालो, वाटेत एके ठिकाणी पाणी साठले होते, आता जुन महिन्यातच गुडघाभर पाणी होते तर पावसाळ्यानंतर छातीभर पाणी नक्कीच असेल बर झालो आताच आलो ते.
घळीतील अद्भुत दृश्य क्लिकत चाललो होतो.
घळीत येणारे हौशी लोक्स साधारण अर्धातास घळीत चालतात आणि पुन्हा आल्या पावली मागे सामरद गावात येतात. पण आम्हाला संपुर्ण घळ उतरुन जायची होती. आता आम्ही जसजसे पुढे जात होतो तशी हौशी पर्यट्कांची गर्दी कमी झाली आणि घळीत आम्ही चौघे आणि असंख्य लहान मोठे दगड एवढेच उरलो.
ईथुन पुढची वाट ही मोठ मोठ्या दगड-धोंड्यावरुन भसाभस खाली ऊतरणारी होती. वाटेत २-३ ठिकाणी रॅपलींग कराव लागत याची माहिती होतीच पण १ तास झाला तरी अजुन रॅपलींग स्पॉट आला न्हवता.
शेवटी काही वेळानी आम्ही रॅपलींग स्पॉटला आलो. आता आमच्यातला या क्षेत्रातला एक्मेव अनुभवी सुजीत पुढ्च्या तयारीला (म्हणजे रॅपलींगच्या) लागला.
आणि अवघ्या काही मिनीटातच रॅपलींगला सुरुवात झाली. आधी गिरिष, मग भुषण, मग मी आणि शेवटी रोपला यु टाकुन सुजीत ऊतरणार असे ठरले. लगेच गिरिष निघाला देखील
साघारण ४५ फुटाचा हा पॅच पार करुन अवघ्या काही मिनीटातच आम्ही तिघे आणि नंतर रोपला यु टाकुन सुजीत खाली आला. आता रोप ओढुन घेणे ह्या कामाला सुरुवात झाली. पण वरच्या एका दगडाच्या कपारीत रोप अडकला आणि काही केल्या खाली येईना, म्हणजे सुजीत आणि गिरीष रोप ला लटकले तरी रोप तसुभरही खाली येईना. शेवटी सुजीतने झुमार लावुन पुन्हा वरती जाण्याचा निर्णय घेतला म्हणजे रोप जिथे अडकला असेल तिथुन तो सोड्वता येईल.
या ठिकाणी तु रोपच निट आणला न्हवतास वगैरे आ-रोप केले आणि रॅपलींगच्या ठिकाणी क्लायबींग करणारा सुजीत वगैरे फिरक्या घ्यायला लागलो. शेवटी पुन्हा सुजीत वरती चढला ज्या कपारीत रोप अडकत होता तिथे पॅकींग घातले आणि पुन्हा खाली आला. आता पुन्हा रोप खेचुन घेण ह्या कामाला सुरुवात झाली आणि विशेष त्रास न देता रोप खाली आला. ह्या सगळया गडबडीत अर्धा तास फुकट गेला. तिथेच थोडावेळ विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो. एक पॅच झाला आणखी दोन पॅच बाकी होते. पुढ्च्या पॅचचा आधी दोन दगडांच्या कपारीतुन आडव रांगत जायच होत.
ह्याच कपारीतुन आडव रांगत जाव लागत
कपारीतुन बाहेत पडलो की पुन्हा एक पॅच द्त्त म्हणुन हजर होताच पण हा पॅच मोठा न्हवता आणि फक्त बिले देउन ऊतरता येणार होत त्यामुळे रॅपलींगच्या साधन सामुग्री काढ्ण्याचा आणि जोडण्याचा वेळ वाचणार होता.
हा पॅच पार करुन पुढे गेलो तर १५-२० मिनीटात आणखी एक पॅच आलाच. या ठिकाणी देखील बिले घेऊन ऊतरण शक्य होत.
आता मात्र सर्व पॅच संपले आणि १२.३० च्या सुमारास आम्ही घळीच्या दुस-या टोकाशी आलो.
ह्याच वाटेने पुढे आलो आणि समोर बाणच्या सुळक्याचे आणि जरा बाजुला असलेल्या डोहाचे मस्त दर्शन झाले. बाणचा सुळका आणि हा डोह आमच्या परिचयाचा होता कारण काही वर्षांपुर्वी मी, सुजीत, गिरिष डोळखांब-साकुर्ली-बाण सुळका मार्गे रतनगडावर गेलो होतो. डोहाचे आणि बाण सुळक्याचे फोटो काढले आणि डोहाच्या बाजुला एका सावलीत पोटपुजेसाठी बसलो.
एव्हाना दिड वाजुन गेला होता, थोडा विसावा घेऊन करोले घाटाच्या वाटेला लागलो. करोले घाटानेच पुन्हा आम्हाला सामरद गावात पोहोचायचे होते. डोहाच्या ऊजव्या बाजुने पाण्याच्या वाटेने निघालो पण करोले घाटाची वाट काही मिळेना, दरम्यान आमचे स्नेही श्री. प्रसाद वेलणकर काही महिन्यापुर्वी ह्या वाटेने गेले होते त्यांच्याशी संपर्क केला आणि वाट विचारुन घेतली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही वाटेवरच होतो पण वाट काही केल्या मिळत न्हवती त्यात अजुन अर्धा पाउण तास फुकट गेला २.३० वाजुन गेले आणि अचानक आकाश ढगांनी भरुन आले आणि आता वाट शोधण्यासाठी आम्ही चारही दिशांना चार जण पांगलो. साधारण ३ च्या सुमारास वाट मिळाली आणि एके ठिकाणि बाणाचे मार्क दिसले तेव्हा तर वाटेची खात्रीच पटली. पण आता जोरदार पाऊस येणार अशी लक्षण दिसायला लागली. आणि एक-दोन थेंब अंगावर पडलेच. तातडीने कॅमेरो बॅगेत टाकला आणि पावसाने झोड्पुन घेत करोले घाट चढ्त राहिलो. साधारण अर्धा तास पावसाचा मार खाल्ल्यावर आम्ही पठाराच्या जवळ पोहोचलो.
आकाश क्लिअर झाल आणि मागे लांबवर असलेला आजोबा पर्वत दिसला.
बरोब्ब्रर ४.१५ च्या सुमारास आम्ही पठारावर पोहोचलो, आणि लांबवर दिसत असलेली सामरद गावातील घर पाहुन खुष झालो. पठारावर एक गुराखी मामा भेटले त्यांच्याशी पावसाच्या, गुरा ढोरांच्या गप्पा मारल्या. मामाचे आणि गुरांचे फोटो काढुन लगेच मामाला दाखवले, मामा जाम खुष झाला.
पठारावरुन मागच्या बाजुला रतनगड आणि खुटा तर समोर अलंग पासुन कळसुबाई पर्यंतची संपुर्ण रांग लई भारी दिसत होती.
अलंग पासुन कळसुबाई पर्यंतची संपुर्ण रांग
मामांचा निरोप घेऊन सामरद गावाच्या दिशेने निघालो.
साधारण ४.३० च्या सुमारास श्री. निवॄत्ती यांच्या घरी धडकलो. कोरडे कपडे गाडीतच ठेवले होते ते घातले तोपर्यंत मामानी मस्तपैकी पोहे आणि चहा तयार केला होताच. गावातुनच १०० रु लिटर ह्या दराने दोन बाटल्या पेट्रोल भरुन घेतल कारण एकतर गाडीत पेट्रोल कमी होत आणि पुढे घोटी गावापर्यंत पेट्रोल पंप न्हवता.
चहा पोह्यांवर ताव मारुन सॅका भरुन मामांचा निरोप घेतला आणि ५.३० च्या सुमारास सामरदहुन निघालो ते ९.३० च्या सुमारास नाक्यावर दाखल झालो. अश्यातर्हेने बरेच दिवसांपासुन मनात असलेला सांधण व्हॅलीचा ट्रेक पुर्ण झाला.
बज्जु गुरुजी
ता.क. : श्री. निवॄत्ती - सामरद गाव - संपर्क - ०९५५२०६२१८४
प्रतिक्रिया
10 Jun 2015 - 2:32 pm | क्रेझी
मस्त फोटो! वृत्तांत आवडला :)
10 Jun 2015 - 2:43 pm | चिमी
भारी फोटु .. मस्त वर्णन.. :)
10 Jun 2015 - 2:45 pm | होबासराव
मस्तच
10 Jun 2015 - 2:48 pm | एस
झक्कास!
10 Jun 2015 - 3:16 pm | मुक्त विहारि
आणि सुंदर फोटो...
10 Jun 2015 - 3:18 pm | कंजूस
प्रथमच सांधण दरीचे सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे फोटो पाहता आले.दरीचा शेवट म्हणजे अगदी खाली डेहणेपर्यंत आहे का?मधल्या जागा उतरणे दोराशिवाय शक्य नाही.निवृत्ति तुमच्याबरोबर रॅपलिंग करून खाली आला होता का?
11 Jun 2015 - 9:06 am | बज्जु
कंजूस शेट,
१) दरीचा शेवट डोहा पर्यंतच आहे, डेहणे पर्यंत जायची गरज नाही,
२) मधल्या जागा उतरणे दोराशिवाय शक्य नाही. त्यामुळे सगळी साधन सामग्री घेऊन गेलात तर ऊत्तम
३) निवृत्ति रॅपलिंग करून खाली आले न्हवते.
ज्यांना साधन साधन सामग्री घेऊन जाणे शक्य नाही, किंवा सांधण घळ ऊतरुन डोहापाशी एक रात्र मुक्काम करायचा आहे त्यांनी श्री. निवृत्ति यांच्याशी संपर्क साधावा, ते अतीशय माफक दरात, रोप ई. सामग्री ची व्यवस्था करतात शिवाय आगाऊ सुचना दिल्यास निवासासाठी टेन्ट, जेवणाची देखील सोय केली जाते. (रेटः साधारण रु ५०० प्रती माणशी)
10 Jun 2015 - 3:32 pm | निळूभाउ
वर्णन शैली सुन्दर आहे. लिहीत राहा...
10 Jun 2015 - 3:41 pm | मोहनराव
छान!
10 Jun 2015 - 4:18 pm | अजया
मस्त फोटो आणि वर्णन.
10 Jun 2015 - 4:26 pm | सानिकास्वप्निल
वर्णनशैली आवडली, फोटो पण मस्तं.
10 Jun 2015 - 4:29 pm | नाखु
करून येणे शक्य होईल, उतरता येणार नाही.
एप्रिल महीना ठिक आहे का जाण्यासाठी ?
फोटो व वर्णन मस्त आहे.
नाखु
10 Jun 2015 - 6:17 pm | गणेशा
अप्रतिम ... मस्त एकदम..
मागे वल्ली मुळे सांदण दरी केली असलेल्या आठवणी आल्या.. तो शेवटाचा तिरक दगड ढासळाच शेवटी.. त्या खाली फोटो काढला होता...
साम्रद गाव .. सभोवताल पण मस्त आहे एकदम ...
पुन्हा निवांत लेखन वाचेल.. आता फोटो पाहिले फक्त ...
10 Jun 2015 - 6:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त झाला ट्रेक. फोटो खास आवडले.
10 Jun 2015 - 7:56 pm | शिव कन्या
रौद्रभीषण सुंदर.
10 Jun 2015 - 8:06 pm | प्रचेतस
सांदण दरी गर्दी नसण्याच्या काळात तीनदा केलेली आहे. नंतरही जायचे अनेकदा लांबणीवर पडत गेले. आता परवाच मित्रांबरोबर जाणार होतो पण पुणे कट्ट्यामुळे बेत रहित केला तेच आमचे दोन मित्र येथे एका फोटोत (वरुन विसाव्या फोटोत) दिसत आहेत. गेलो असतो तर तुमची अनपेक्षितपणे भेट झाली असती.
11 Jun 2015 - 9:09 am | बज्जु
नक्कीच वल्ली साहेब,
आपली प्रत्यक्ष भेट झाली असती तर आणखी मजा आली असती. असो.
ईतक्यात कुठे जायचा काही प्लॅन ?
आम्ही जुन एन्ड ला लोणावळा-भिमाशंकर करु म्हणतोय.
10 Jun 2015 - 8:15 pm | एक एकटा एकटाच
थरार आवडला
10 Jun 2015 - 10:22 pm | जुइ
फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले. सांधण दरीतील ट्रेक बद्दल प्रथमच एकले.
11 Jun 2015 - 12:30 am | वेल्लाभट
कड्डकच ! कड्डकच !
क्या बात है राव. क्लास.
11 Jun 2015 - 10:09 am | Maharani
जबरदस्त..फोटो पण उत्तम
11 Jun 2015 - 10:27 am | सुनिल साळी
फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले. मागच्याच शनिवारी रतनगडावर जाउन आलो. तेव्हाच सांधन दरी खुणावत होती पण वेळे अभावी जमले नाही. आता मात्र राहावत नाही. काजवे महोत्सव 1 नंबर.
11 Jun 2015 - 2:14 pm | पैसा
लै भारी!
11 Jun 2015 - 2:33 pm | राजेंद्र मेहेंदळे
झकास ट्रेक झालेला दिस्तोय..
11 Jun 2015 - 3:28 pm | पॉइंट ब्लँक
भारिच ट्रेक :)
14 May 2016 - 3:16 pm | अभिजीत अवलिया
श्री निवृत्ती ह्यांचा नंबर बदलला असल्यास कुणाकडे आहे का? वरील नंबर आता त्यांचा नाही.
14 May 2016 - 9:29 pm | चलत मुसाफिर
सुंदर छाया-वृत्तांत. प्रत्यक्ष भ्रमणाची तीव्र इच्छा झाली आहे. पाहू कधी योग येतो ते.
15 May 2016 - 11:09 pm | हकु
वा. खूप छान छायाचित्र आणि मस्त वर्णन वाचायला मिळालं. ते ही अगदी वेळेवर! ;)