शहाणे करोनी सोडावे, सकलजन ? सर्वसामान्याकडे विवेक आणि शहाणपण उपजत असते यावर विश्वास ठेवावा की ठेऊ नये ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
29 May 2015 - 7:40 pm
गाभा: 

समर्थ रामदास स्वामींच एक वाक्य आहे, "आपणांसी जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे; शहाणे करोनी सोडावे, सकलजन" प्रथम दर्शनी बहुतांश लोकांना भावेल असा हा एक सुविचारच आहे. हे वाक्य मला स्वतःला धरून मोठ्यासंख्येतील मराठी लोकांना प्रेरणादायी आणि लोकप्रीय असल तरी या वाक्यातील, शहाणे करोनी सोडावे, सकलजन हा भाग गैरसमज निर्माण करणारा ठरतो का ? स्वतःची/समुहाची व्यक्तिगत मते/दृष्तीकोण आणि त्या पाठीमागचे हितसंबंध दुसर्‍यांवर लादण्याच अनाठायी लाभ घेण्यास शहाणे करोनी सोडावे, सकलजन प्रवृत्त करू शकेल का ?

समर्थ स्वामीजींनी ज्या परिस्थितीत हे लिहिल तेव्हा त्यांचा उद्देश केवळ ज्ञान आणि माहितीच नाही तर विवेक वाटण्याचाही असेल का ? त्यात काही चुकीच आहे अस नाही. केवळ माहिती आणि ज्ञान उपलब्ध करून देणे आणि शहाणे करून सोडण्याच्या दृष्टीने आपल्याला अभिप्रेत असलेला विवेकाचा रंग दुसर्‍यांच्या विचारांवर चढवण्याचा उद्देश ठेवणे यात फरक आहे. सर्वसामान्याकडे विवेक आणि शहाणपण उपजत असते यावर विश्वास ठेवावा की ठेऊ नये ? या बद्दल मला नेहमी प्रश्न पडतो.

सेंसॉरशीपच समर्थन सर्वसाधारणपणे सर्वसामान्याकडे शहाणपण आणि विवेक उपजतपणे नसतो या आधारावर केले जाते का ? मी सेंसॉरशीप बोर्डावर असेन अथवा न्यायाधीश असेल तर एखादी गोष्ट सेंसॉरेबल आहे की नाही, दुसर्‍यांनी आस्वाद घेण्याच्या दृष्टीने योग्य आहे की नाही याचा मला निर्णय घेता येत असतो. पण मी जेव्हा सेंसॉरशीप बोर्डावरून अथवा न्यायाधीशपदाच्या जबाबदारीतून मुक्त होतो- तेव्हा मी पुन्हा एकदा सर्वसामान्य होतो- त्या नंतर इतरांनी कशाचा आस्वाद घेतला पाहीजे याचा निर्णय घेण्याची एकेकाळी क्षमता असलेला मी पुन्हा एकदा अगदी स्वतः बाबत निर्णय घेण्यास अक्षम कसा होतो ? किंवा सेंसॉरशीप बोर्डावर अथवा न्यायाधीशपदावर पोहोचण्या आधी माझा विवेक सर्वसामान्य माणसाचा म्हणून अक्षम स्थितीत असतो. सर्वसामान्य व्यक्ती असतानापेक्षा मी सेंसॉरबोर्डाचा मेंबर अथवा न्यायाधीश बनत असेल तर माझ्यात नेमके असे कोणते बदल होतात की मी केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही निर्णय घेण्या एवढा सक्षम होतो.

मिपाकर सदस्य चुकलामाकला यांची एक कविता मागच्या महिन्यात आली आहे. न्याय मला दिसला होता...... त्यात ते म्हणतात,

न्याय मला दिसला होता.
आपल्या विचारांच्या टोकदार लेखणीत, जळजळीत अनुभवाची शाई भरून, रखरखीत सत्याची कविता रेखणाऱ्या एका साध्या नि:शस्त्र म्हाताऱ्या कारकूनाला फटकारून शिक्षा सुनावणाऱ्या कर्तव्यदक्ष मुखांत,
न्याय मला दिसला होता.
क्षीणपणे ओरडत होता तो,
मला वाचवा.....मला वाचवा.....

:प्रेषक, चुकलामाकला, Tue, 21/04/2015 - 11:44

प्रेषक चुकलामाकला यांनी संदर्भ नमुद केला नसला तरीही बहुधा कवि वसंत दत्तात्रेय गुर्जरांच्या कवितेबद्दलच्या एका न्यायालयीन निर्णयाची पार्श्वभूमी यास असण्याची शक्यता वाटते. कवि वसंत गुर्जरांची सदर न्यायालयीन लढाई अद्याप पूर्ण व्हायची आहे ही वसंत गुर्जरांची २० वर्षांहून अधिक काळचालू असलेली लढाई पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालया पर्यंत पोहोचू शकली तर भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षा अधिक नेमकेपणाने पुढे येऊ शकतील अशी शक्यता आहे.

कवि वसंत गुर्जरांच्या यांच्या जीवन संघर्षाच्या या अध्यायाची माहिती अल्पशा प्रमाणात रेघ ब्लॉगच्या या पोस्टीतून आणि या पोस्टीतून झाल्याचे वाचण्यास मिळते. वसंत गुर्जरांच्या कविते बद्दल अंतीम निर्णय येईल का आणि काय येईल हे काळच सांगेल पण सर्वोच्च न्यायालयाचा हा (अंतरीम?) निर्णय (या दुव्यावर सुद्धा वाचण्यास उपलब्ध) सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा बर्‍यापैकी स्पष्ट करणारा पण काही जणांना सुखावणारा असला तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षा वाढवू इच्छिणार्‍यांना थोपवून धरणारा ठरेल का ?

या धागा लेखाचा उद्देश समर्थकृत उक्ती अथवा न्यायालयीन निर्णयाचा अनादर करणे नाही. तसे पाहता समर्थांच्या उक्तीत आणि गुर्जर विषयक न्यायालयीन निर्णय आपापसात प्रत्यक्ष संबंध काहीच नाही, केवळ मला पडलेला आणि कोड अद्याप न सुटलेला एक प्रश्न " सर्वसामान्याकडे विवेक आणि शहाणपण उपजत असतात या वर विश्वास ठेवावा अथवा ठेवू नये ?" तुम्हाला काय वाटते ?

* हे सुद्धा पहा [वसंत गुर्जरांच्या कवितेमधून फिरताना-राजा ढाले ]

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

29 May 2015 - 9:36 pm | विवेकपटाईत

देश, काळ, परीस्थिति, कार्य, धंधा त्यानुसार विवेक आणि शहाणपणाची परिभाषा ही बदलत असते. समर्थांनी संपूर्ण देश आपल्या पायाखाली तुटवला होता. त्यांचे ज्ञान चतुर्दृष्टी होते. त्या काळात आपले ज्ञान आणि अनुभव दुसर्यांना देण्यात अत्यंत कंजूसी करत असे, ज्ञान गुप्त ठेवण्यास लोकांचा कल असे. अश्या लोकांसाठी समर्थांचा उपदेश असेल. आपले ज्ञान लोकांना वाटा, गुप्त नका ठेऊ.

चर्चिल यांचे या आशयाचे वाक्य आहे की लोकशाही ही काही सर्वोत्त्म व्यवस्था नाही पण आपणास त्या पेक्षा अधिक चांगली व्यवस्था माहित नाही. त्या मुळे काही बाबी ह्या वरील प्रतीसादानुसार स्थळ, काळ, व्यक्त्ती सापेक्ष बदलत राहणार. फार विचार करु नये.

श्रीरंग_जोशी's picture

29 May 2015 - 11:18 pm | श्रीरंग_जोशी

अगदी थोडक्या शब्दांत नेमकं लिहिलंय.

अवांतर: माहितगार साहेब. शीर्षके इतकी मोठी का लिहित बुवा? मिपाच्या वेब अप्लीकेशनमधल्या शीर्षकाची लांबी तपासायची असते की काय ;-) ?

नाखु's picture

30 May 2015 - 5:04 pm | नाखु

दोन्हीस

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 May 2015 - 11:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्वसामान्याकडे विवेक आणि शहाणपण उपजत असते यावर विश्वास ठेवावा की ठेऊ नये ?

जरूर विश्वास ठेवावा... कारण तो असतोच... नैसर्गिक विवेक आणि शहाणपणाच्या बळावरच मानव आजपर्यंत अनेकदा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जाऊन केवळ तगून राहिलेला नाही तर पृथ्वीवरचा सर्वश्रेष्ठ प्राणी बनला आहे. मात्र, त्याबरोबर हे जाणणेही महत्वाचे आहे की, नीतिमत्ता आणि न्याय या संकल्पना मानवी इतिहासात स्थल-काल-व्यक्ती-सापेक्षाने सतत बदलत राहिलेल्या आहेत.

माणसाचा विवेक आणि शहाणपणा नैसर्गिकरित्या नीतिमत्ता, न्याय व तर्कवाद यांच्यापेक्षा जास्त स्वतःच्या तात्कालिक स्वार्थी फायद्याच्या विचाराने प्रभावित होतो हे सार्वकालीक सत्य आहे...

म्हणून "विवेक आणि शहाणपणा = नीतिमत्ता आणि न्याय" असे समजणे चूक आहे. त्या संकल्पना एकमेकांपासून संपूर्णपणे वेगळ्या आहेत.

हे उपजतच असते परंतू त्याच्या उच्चनीचमध्यम अशा पातळी असतात.कित्येकवेळा सुस्तपणा आणि अती समाधानीपणा विवेक आणि शहाणपणास मेंदुच्या माळ्यावर टाकतो.शिवाय धार्मिक आणि सामाजिक विचारसरणी एखाद्याला अथवा मोठ्या समुदायास विवेक वापरापासून परावृत्त करते.