ओळख किल्ल्याची
स्वराज्याच्या गडकोठाची सफर करण्याची मला खूप आवड आहे.. त्यात छ. शिवाजी राजांचा भक्त असल्याकारणाने त्यांचा इतिहास जवळून पाहण्याचा मोह तर खूपच. मला गडांना भेट द्यायला जास्त वेळ भेटत नाही. तरीही मी वेळ काडून गड किल्ल्यांना भेट देतो. आज पहायची इच्छा झाली तो इतिहासाचा साक्षीदार रांगणा किल्ला या किल्ल्याला पसिद्धगड असेही म्हणतात. समुद्र सपाटीपासून सुमारे ७७० मीटर उंचीवर असणारा हा किल्ला. शिलाहार वंशीय राजा महामंडलेश्वर भोज (दुसरा) ने इसवी सन ११८७ च्या आसपास बांधला. बहामणी राजा महमद गवाण याने इसवी सन १४७० मध्ये जिंकला. १८५७ पर्यंत आदिलशहाच्या ताब्यात तर, १६५९ ला शिवाजी महाराजांनी विजापुरांकडून जिंकून घेतला, आणि १६६६ ला या गडाला पुन्हा विजापुरकरांनी ताबा मिळवला, ५ सप्टेंबर १६६६ मध्ये पुन्हा शिवाजी महाराजांनी जिंकला १६७०-७१ मध्ये शिवाजी महाराजांनी या गडाची डागडूगी केली. या डागडूगीसाठी ६००० होन खर्च केल्याची इतिहासात नोंद आहे…
सकाळी सकाळीच किल्ल्याच्या दिशेने
अशा किल्ल्याला भेट देण्यासाठी मी आणि माझे मित्र आम्ही मुंबई वरून निघालो कोल्हापूरच्या दिशेने. कोल्हापूर वरून थेट ७० कि. मी. अंतरावर असलेले पाटगाव या गावी उतरलो. तेथे वस्ती करून गावातल्या जाणकार लोकांकडून गडाबद्दल माहिती गोळा केली. हा गड सह्याद्रीच्या कड्यात वसलेला, तेथे रस्ता दगड धोंड्यांनी भरलेला, आणि घनदाट जंगल त्यात वाघ, गवरेडे आणि अस्वलांची खूप भीती, जंगलाची अवघड वाट आणि या प्राण्यांची भीती यामुळे स्थानिक लोकांशिवाय येथे जास्त कोणी फिरकत नसल्याची माहिती मिळाली.. आमच्याकडे “टव्हेरा” ही गाडी होती. ही गाडी जंगलात घालणे शक्य न्हवते. म्हणून जंगलातील वाटेची आणि या जंगलात जाईल अशी गाडी घेवून जाण्याचा सल्ला गावातील लोकांनी दिला. गावातली एक गाडी आम्ही ठरवली. आणि स्वारी पहाटेच निघाली सरळ किल्ला रांगण्याच्या दिशेने.
अतिशय खडतर प्रवास.
भयाण जंगलाचा रस्ता पार करत आम्ही निघालो मुखी फक्त राजाचं नाव होत.. आज मराठयांच रक्त सळसळल होत. भयाण जंगलातून जाणारा अवघड मार्ग, आजुबाजूच भयाण जंगल अंगावर शहारे आणत होत. जवळ जवळ ६ ते ७ कि. मी आत जंगलात आम्ही शिरलो. आत गेल्यावर माहिती पडल कि तेथे एक आदिवासी पाडा आहे. त्याच नाव चीकेवाडी फक्त २६ / २७ लोकांची वस्ठी असलेला हा पाडा. या जंगलात त्यांचा वावर असल्याने गाडी जाईल असा रस्ता अजूनही आहे. दगड धोंड्यातून वाट कडत आम्ही निघालो.
जिथे जिथे जायला रस्ता न्हवता तिथून वाट काडत आम्ही गडावर निघालो. मनात एकच लक्ष होत ते फक्त गडावर पोहोचण्याच.
आणि १ ते २ तासांच्या प्रवासानंतर आम्ही रांगणाच्या जवळ पोहचलो. पुढे जायला रस्ता न्हवता. गाडी तेथेच उभी करून आम्ही पायीच निघालो. रंगण्याच टोक तेथून दिसत होत. जवळ जवळ एक ते दीड कि. मी. अंतराचा रस्ता होता. वाट , काडत आम्ही निघालो, डोक्यावर सूर्य आता चांगलाच तळपत होता. गर्मी ही वाढली होती. घामाच्या धारा अंगावरून वाहत होत्या. आणि आम्ही आठवत होतो तो शिवप्रताप, आपले राजे व त्यांचे मावळे स्वराज्यासाठी याच दगडधोंड्यातून कसे ये जा करत होते..
हळूहळू गड जवळ येत होता अशी उत्कंठा वाढत होती आणि जंगल पार करून आम्ही बाहेर आलो आणि समोरच रांगण्याचा पडझडीला आलेला बुरुज पाहून मन थोड हळहळल पण अंगात जोश आणून आम्ही पुडे निघालो.
डाव्या बाजूने गडावर जाणारी एक अरुंद वाट दिसली. बाजूला खोल दरी, वाटेवर तटाचे पडलेले दगड त्यातून वाट काडत आम्ही गडावर चढलो. आत प्रवेश करताच समोर निंबाळकर वाडा लागला. संपूर्ण पडझड झालेला हा वाडा आणि त्या वाड्यात असणारी एक विहीर दिसली.. विहिरीत अजूनही पाणी होत पाला पाचोळा, माती पडून पाणी खराब झाल होत. समोरच जरा पुढ गेल्यावर एक भुयारी मार्ग दिसला. हा मार्ग कुठे जातो यांची काहीच कल्पना नाही
एक भुयारी मार्ग
आत अंधार असल्यामुळे आत जाता आलं नाही. पक्या दगडांनी बांधलेला हा मार्ग खूप काही सांगून जातो. याच्या द्वारावरच हनुमंताची कोरीव मूर्ती दगडी पाषाणावर आहे. त्यावर साचलेली धूळ आणि सेवाळ साफ करून आम्ही पुढे निघालो. बुरुजावर भगवा झेंडा फडकत होता.
मारुतीराया
त्याला मुजरा करून आम्ही गणेश मंदिराकडे निघालो. कोरीव दगडात असलेली हो मूर्ती कीती जुनी असावी याचा प्रत्यय पाहिल्यावर आला.
गणेश मंदिर
गणेशाची मूर्ती
श्री गणेशाला वंदन करून आम्ही रांगणा देवी (रांगणाई ) च्या दर्शनाला निघालो. गडावर ही घनदाट जंगल पाहायला मिळालं. वाटेत जाताना जंगली जांभूळ, पेरूची झाडे, औदुंबर अशा जंगली फळांचा आस्वाद घ्यायला मिळाला. पेरू आणि जांभूळ इतके खाल्ले कि दुपारच्या जेवणाचीही आठवण झाली नाही.
जंगली जांभूळ, पेरूची झाडे, औदुंबर अशा जंगली फळांचा आस्वाद घ्यायला मिळाला.
या फळांचा आनद घेत आम्ही रांगणा देवी (रंगाणाई) च्या मंदिरासमोर आलो. दुरूनच मंदिर दिसलं. मंदिर आता पडझडीला आलंय. पण समोरची पाषाणी दीपमाळ अजूनही आहे तशीच भासली.
पाषाणी दीपमाळ
रांगणा देवी (रंगाणाई)
रांगणाईच दर्शन घेवून बाहेर आल्यावर उजव्या बाजूला थोड चालल्यावर एक शिवकालीन तलाव आहे. आश्चर्य म्हणजे बाजूलाच जवळ जवळ २०० ते ३०० मीटर उंचीची खोल दरी आणि तरीही तलाव तुडुंब भरलेला. हे दृश पाहून तोंडात बोट गेल्याशिवाय राहत नाही. खोल दरीच्या बाजूला जरी उभ राहील तरी अंगावर काटा येतो. समोरून वाहणारे जोराचे वारे. आणि आवाक्यात भासणारा कोकण, आणि त्याचे दिव्य दर्शन घडवणारा रांगणा आज आम्ही जवळून पाहत होतो.
बाजूलाच जवळ जवळ २०० ते ३०० मीटर उंचीची खोल दरी आणि तरीही तलाव तुडुंब भरलेला.
ही खोल दरी म्हणजे सह्याद्रीच वैभव, कुणा परक्याची, गनिमाची हिम्मत होणार नाही. यातून वाट काढायची. हे नयनरम्य दृश पाहताना आपोआप मराठा असल्याचा अभिमान भरून वाहत होता. संपूर्ण रांगणा फिरून झाल्यावर परतीचे पावूल उचलत न्हवते, या निसर्गाच्या, इतिहासाच्या सानिध्यात जगावे आणि येथेच मारावे अस मनाला वाटत होत.
अंगात जोश असला तरी उष्ण उन्हाने अंगात थकवा आला होता आता आम्ही परतीला निघालो.
ही खोल दरी म्हणजे सह्याद्रीच वैभव, कुणा परक्याची, गनिमाची हिम्मत होणार नाही. यातून वाट काढायची.
स्वराज्याच्या या शिलेदाराला लाखो सलाम, मुजरे करत जड पावलांनी हर हर महादेव, जय शिवराय, चा नारा देत आम्ही रांगण्याचा निरोप घेतला.
जय शिवराय
लेखक- गणेश पावले
किल्ले रांगणा वरील केमेराबद्ध केलेले काही क्षण..
किल्ले रांगणा ची सफर एक अविस्मरणीय सफर ठरली…. अंगावर रोमांच उभा करणारा जंगलातला प्रवास नेहमीच लक्षात राहील. जेवणाची व्यवस्था केली न्हवती पण जंगली मेव्याने त्याची गरज भासवू दिलीच नाही.
हा किल्ला पाहून एक मात्र खंत मनात राहिली कि, आपले स्वराज्याचे साक्षीदार लवकरच इतिहास जमा होणार. त्यांची पडझड खूपच वेगाने होत आहे आपल्या पुढच्या पिढीला इतिहास फक्त पुस्तक रुपात उरणार हे अंतिम सत्य.
आपला
गणेश पावले
९६१९९४३६३७
प्रतिक्रिया
29 May 2015 - 2:27 pm | प्रसाद गोडबोले
मस्तच !!
29 May 2015 - 2:57 pm | वेल्लाभट
सुरेखच ! उन्हाचा सीझन उगीच निवडलात. हाल झाले असणार. फोटोतून अंदाज येतोय. असो.
ही शोकांतिका जवळपास सगळ्याच किल्लयांची आहे. काही मोजके वगळता.
असं म्हटलं की दुर्गवीर सारख्या संस्थांचं कौतुक करावं तितकं कमी वाटतं.
29 May 2015 - 3:19 pm | ganeshpavale
दुर्गवीर…. म्हणजे किल्ल्यांचे बुरुजच ते कितीही काळ उन्हात तळपू शकतात…
अजित दा… नितीनराव पाटोळे, संतोषदा हसुरकर… हि नावे हे गडकोट टिकवून ठेवतील.
29 May 2015 - 3:24 pm | वेल्लाभट
एक नंबर बोललात....
प्रचंड अभिमान वाटतो. नुसताच अभिमान नाही हातभाराची इच्छाही आहे. बघू कधी जमेल.
29 May 2015 - 3:50 pm | ganeshpavale
मी वेळ मिळाला कि जातोच
29 May 2015 - 3:55 pm | प्रचेतस
मस्तच.
रांगण्यासारखा आडरानातला किल्ला पाहायला मिळणे भाग्याचंच.
29 May 2015 - 7:08 pm | जयंत कुलकर्णी
खरा रांगणा कोकणातून चढायचा. फक्त जेव्हा केव्हा जाल तेव्हा खालून वाटाड्या मात्र घेण्यास विसरु नका.......मी दोन तीन वेळा केला आहे......भयंकर छान.... एकदा जाऊन बघा...
29 May 2015 - 7:21 pm | बॅटमॅन
छान सफर.
रांगणा किल्ला संभाजीकाळात आणि नंतर तसा बर्यापैकी अॅक्टिव्ह होता. संताजी-धनाजी यांच्या स्वार्यांदरम्यान याचे नाव सापडते.
पंधराएक वर्षांमागे रांगण्यावर नाही, पण जवळच्या भुदरगड किल्ल्यावर गेलो होतो ते आठवलं. त्याचंही तसंच आहे- प्रचंड मोठं पठार. अन एक मोठ्ठं तळं आहे, पण खोली मात्र खूपच कमी.