जकार्ताच्या आठवणी : ७ : तमन सफारी

आकाश खोत's picture
आकाश खोत in भटकंती
27 May 2015 - 7:14 pm

भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६

आतापर्यंत माझे इंडोनेशियामध्ये २ आठवडे चांगले गेले होते. माझी ट्रिप अर्धी संपली होती. तसेच कामाचा महत्वाचा भागसुद्धा संपला होता. आता ऑफिसमध्ये जरा निवांत वेळ चालला होता. बाहेर आणखी मजा करण्यासाठी हीच वेळ होती. विशलिस्टमधली पुढची जागा होती तमन सफारी. ह्या जागेबद्दल माझ्या ऑफिसमध्ये सर्वांनीच खूप शिफारस केली होती. ते कशासाठी हे भेट देऊन आल्यानंतर मलाच समजले. आणि आता मीसुद्धा इंडोनेशियाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला हि जागा सुचवेन.

i1
तमन मिनी इंडोनेशियासारखाच तमन सफारी हासुद्धा (तमन म्हणजे पार्क) अतिशय भव्य आणि नियोजनबद्ध पार्क आहे. ४०० एकरांवरती पसरलेल्या या पार्कमध्ये प्राण्यांनी भरलेले दाट जंगल आहे, एक बेबी झु आहे, फन पार्क आहे, प्राण्यांचे शोज, आणि आणखी काही साहसी खेळ असं बरंच काही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर योजना आखून यशस्वीपणे राबवणाऱ्या इंडोनेशियन लोकांना सलाम!

मागच्या खेपेप्रमाणेच तमन मिनीलासुद्धा माझी एकट्यानेच जायची तयारी होती. पण ऑफिसमध्ये एका सहकाऱ्याने नुकत्याच आलेल्या मीनाक्षीशी ओळख करून दिली. तिची हि दुसरी जकार्ता ट्रीप असली तरी तिने अजून बऱ्याच जागा पाहिल्या नव्हत्या. तमन सफारी तिलासुद्धा पहायचं होतं. ती आणि तिची आमच्याच कंपनीची पण जकार्तामधेच दुसऱ्या क्लायंटकडे आलेली दीपा नावाची मैत्रीण, असे आम्ही तीन जण झालो. आम्ही रविवारसाठी एक टॅक्सी बुक केली.

आमचा टॅक्सीचालक सुजा, हा साधारण इंडोनेशियन लोकांप्रमाणे सुसभ्य आणि प्रसन्न माणूस होता. त्याला यायला दहा मिनिटे उशीर झाला म्हणून त्याने कमीत कमी ३ वेळा आमची माफी मागितली असेल. आम्ही ट्राफिक टाळण्यासाठी सकाळी अगदी लवकर निघालो.

i2
सुजाने त्याला माहित असलेल्या एका शॉर्टकटने आम्हाला तिथे अगदी लवकर पोहोचवलं. त्या खेड्यापाड्यातून जाणाऱ्या रस्त्यावर मला आमच्या लहानपणीच्या दार्जीलिंग ट्रीपचीच आठवण आली. तसाच डोंगराळ भाग, अरुंद रस्ते, चहाचे मळे अशा बऱ्याच सारख्या गोष्टी होत्या. माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. दार्जीलिंग सिक्कीमची आमची खूपच झकास ट्रीप होती ती.

आम्ही तिकीट काढलं आणि या पार्कचा पहिला भाग म्हणजे सफारी सुरु झाली. सफारी म्हणजे आत असलेल्या फन पार्कपर्यंतचा रस्ता घाट आणि जंगलातून जातो. आणि या भागात त्यांनी भरपूर प्रकारचे प्राणी त्यांना नेमून दिलेल्या जागेत सोडले आहेत. अर्थात त्यांच्यावर काही प्रमाणात नियंत्रण असतं. पण ते बांधलेले नसतात. त्यांच्या अगदी नैसर्गिक निवसाप्रमाणे हि जागा असल्यामुळे मोकळे इकडून तिकडे फिरत असतात. या प्राण्यांना सावकाश बघत आतल्या पार्कमध्ये जाताना एक दीड तास सहज जातो.

i3
तमन सफारीच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी लोक गाजर विकत होते. आम्ही ते घेतले नाहीत पण त्यांचं प्रयोजन आम्हाला इथे आल्यावरच कळलं. इथे येणारे लोक गाजर घेऊन येतात आणि जे शाकाहारी प्राणी आहेत त्यांना खाऊ घालतात. तिथल्या प्राण्यांनासुद्धा याची सवय असल्यामुळे ते गाजराच्या आशेने आपल्या गाडीच्या अगदी जवळ येउन खिडकीतून डोकावतात.

i4
सफारी खूपच जबरदस्त होती. जिराफ, झेब्रा, हिप्पो, यासारखे बरेच प्राणी मी पहिल्यांदाच पाहिले. आणि वाघ सिंह, अस्वल, यांना आधी पाहिले असले तरी असं मोकळं फिरताना कधीच नाही. पिंजऱ्यामध्ये किंवा सर्कसमधेच पाहिले होते.

माझा नवाकोरा कॅमेरा वापरायला हि सुवर्णसंधी होती. आणि मी ती पुरेपूर वापरली. अशा प्राण्यांचे फोटो काढून मला खूपच आनंद झाला. माझ्यासाठी इंडोनेशिया ट्रीपमधला तो सर्वात भारी दिवस होता. मी सतत फोटोच काढत होतो. त्या दिवशी मी शेकडो फोटो काढले असतील.

i5
आता याला खरीखुरी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी तर नाही म्हणता येणार. कारण ते प्राणी पिंजऱ्यात जरी नसले तरी नियंत्रित होतेच. पण माझ्या मते प्राण्यांना जवळून बघण्यासाठी साधा झु आणि खरं जंगल यातला हा सुवर्णमध्य आहे.

खऱ्या जंगलामध्ये एका जंगली प्राण्याच्या दर्शनासाठीसुद्धा कधी कधी एक दिवस निघून जातो. कधी कधी तर काहीच हाती लागत नाही. माझे फोटोग्राफर मित्र सांगतात कि कधी कधी जंगलात २-३ सफारी करूनसुद्धा एकदाहि वाघ सिंह दिसत नाहीत. आणि साध्या झुमधले प्राणी अतिशय सुस्त आणि कंटाळलेले वाटतात. तमन सफारीसारख्या ठिकाणी सर्व प्रकारच्या प्राण्यांना पाहण्याची खात्री असते, आणि ते मोकळे फिरत असतात. त्यांना नेमुन दिलेली निवासस्थानेसुद्धा त्यांच्या नैसर्गिक निवासांसारखीच असतात.

हा पार्क मला खूप आवडला. मला असा एखादा पार्क भारतातसुद्धा असावा असं वाटून गेलं. या धर्तीवर बनवलेला पार्क अजून मला तरी माहित नाही. अशा प्राण्यांचे फोटो काढण्याची हि माझी पहिलीच वेळ होती. आणि लवकरच खरी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करण्याचीसुद्धा संधी मिळावी अशी इच्छा आहे.

सफारीमधले फोटोज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

सफारी जवळपास दोन तासांत संपली. आणि आम्ही आतल्या फन पार्कमध्ये पोचलो. हा बाकी कुठल्या हि फन पार्कसारखाच होता. काही राईड्स, प्राण्यांचे खेळ, 4D सिनेमा, खाण्याचे अड्डे, असं बरंच काही होतं. इथली विशेष गोष्ट म्हणजे इथे पेंग्विन्स, आणि कोमोडो ड्रॅगन पाहायला मिळतो. (हा ड्रॅगन सिनेमामध्ये आपण पाहतो तसा मुळीच दिसत नाही. आणि आगसुद्धा ओकत नाही. :D )

i7
पार्कच्याच बाजूला एक बेबी झु होता. तिथे माणसाळलेले सिंह वाघ, त्यांचे बछडे, साप माकड असे प्राणी होते. थोडी फी भरून इथे तुम्ही या प्राण्यांसोबत फोटो काढू शकता. मी सिंहासोबत एक फोटो काढून घेतला. तो सिंह बांधलेला होता, त्याचा ट्रेनर छडी घेऊन समोर उभा होता, तरी त्याच्या बाजूला बसून फोटो काढायला थोडी भीती वाटतेच. :D

बेबी झु आणि फन पार्कमधले फोटोज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

i8
त्या पार्कमध्ये आणखी बरेच शो होते. सी लायन शो आणि डॉल्फिन शो मी पुन्हा एकदा पाहिले. त्या नंतर काऊ बॉय शो पाहिला, बाइकवरचे स्टंट पाहिले. आणि शेवटी एक टायगर शो पाहिला. टायगर शो मधले फोटोज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

तमन सफारीमधला दिवस खूपच छान गेला. मला इथे येउन गेल्याबद्दल खूप आनंद झाला. तुम्ही जर कधी इंडोनेशियाला गेलात तर तमन सफारीमध्ये नक्की जा. :)

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

27 May 2015 - 10:27 pm | श्रीरंग_जोशी

हा ही भाग उत्तम झालाय.

हिंस्त्र प्राण्यांना माणसावळून त्यांचे पर्यटकांबरोबर फोटो काढून घेणे ही पद्धत कल्पक वाटत असली तरी प्राण्यांना प्राण्यांसारखे जगू द्यावे हेच उत्तम.

फोटोज आवडले. तुमचाही फोटो छान आहे.

छान भाग.हे सर्व शो थायलंडला पण असतात.नक्की कोणी कोणाची कल्पना घेतलीये कुणास ठाऊक.तिथल्या सफारी वर्ल्डमध्ये असा वाघाचा शो बघताना अतिशय वाईट वाटल्याने निघुन आलो होतो.वाघासारखं देखणं रुबाबदार जनावर जंगलातच शोभतं.या शोजमध्ये पार त्याची सर्कस करुन टाकतात.एखादा घरंदाज माणूस रस्त्यावर आल्यासारखं वाटतं :(

पद्मावति's picture

1 Jun 2015 - 9:57 pm | पद्मावति

हा भाग ही मस्त झाला आहे. सगळेच भाग छान जमले आहेत. गाजरखाऊ बंदर तर एकदम क्यूट!!.