माझे शिक्षण पुण्यात झाले तेव्हा आलेला एक अनुभव.
मी इंजीनियरिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये राहात होतो तेव्हा आमची खानावळ होती, तिचे नाव F Club. तिथे काम करायला विठृ्लराव होते. ते दर महिन्याला आम्हाला बिल द्यायचे आणी ते एका बँकेत भरावे लागायचे. ती बैंक जंगली महाराज रोड वर होती. (आता नाव विसरलो.) तिथे काम करणारा कॅशियर एकदम उद्धट होता, पण महिन्यातून एकदाच त्या बँकेत जाणे होत असे, त्यामुळे मला कधी फारसा त्रास झाला नही. पण एकदा मात्र तशी वेळ आली.
एकदा मी घाई-घाईत बँकेत बिलाचे पैसे भरायला गेलो तेव्हा slip च्या मागे १०० च्या किती नोटा, ५० च्या किती नोटा ते लिहायला विसरलो. नशिबाने समोर नेमके तेच कॅशियर. अंगावर एकदम खेकसले "हे काय, मागे एंट्री कोण करणार?" मी म्हणालो, चूक झाली, घाई-घाईत आलो म्हणून विसरलो, जरा स्लिप द्या, आत्ता भरून देतो किंवा तुम्ही जरा please भरलेत तर बरे होईल. तर ह्या महाशयाना राग आला आणी ती स्लिप माझ्या अंगावर फेकून म्हणाले "ते काही आमचे काम नाही. नीट काम करता येत नाही तर येता कशाला इथे मरायला? नीट स्लिप भरून ये नंतर." मी ठीक आहे म्हणालो.
त्या दिवशी संध्याकाळी मी माझ्या मावसभावाच्या दुकानावर गेलो (त्याचे अप्पा बलवंत चौकात दुकान होते.) त्याच्याकडून मी १ रुपयाची ४०० नाणी घेतली. त्यापैकी २ नाणी बदलून २ रुपयाचे १ नाणे टाकले. दुसरया दिवशी दुधाच्या एका रिकाम्या पिशवीत हे सगळे पैसे भरून ऐन गर्दीच्या वेळी मी पुन्हा बँकेत हजर झालो आणी लायनीत उभा राहिलो. समोर तेच कॅशियर पुन्हा होते. मी स्लिप आणी दुधाची पिशवी समोर ठेवली.
लगेच साहेब खेकसले, हे काय आहे?
मी: पैसे
कॅशियर: आता गर्दी आहे. नंतर या.
मी: का म्हणून? मी लायनीत आलो आहे.
कॅशियर: बर मग, पैसे ठेउन जा. नंतर पावती घेउन जा.
मी: मला नंतर यायला वेळ नाही. मी लायनीत आलो आहे, आणी बँकेची वेळ संपली नाही अजून, त्यामुळे मी थांबतो की.
कॅशियर: हे इतके सुटे पैसे मोजायला वेळ लागेल. नोटा घेउन या.
मी: हे भारतीय रिज़र्व बँकेने जारी केलेले पैसे आहेत. तुम्ही ते घ्यायला नकार देत असाल तर मला तसे कागदावर लिहून द्या, मग मी काय करायचे ते बघतो.
कॅशियरसाहेबानी कुरकुरत पैसे मोजायला सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे २ रुपयाचे नाणे आणी १ रुपयाचे नाणे यांचा आकार जवाळपास सारखा असल्यामुळे त्यांचा गोंधळ झालाच.
कॅशियर: हे ४०० रुपये नाहीत. ३९९ च आहेत.
मी: तुम्हाला ते २ रुपयाचे नाणे मिळाले का? दाखवा माला. मी स्लिपच्या मागे तुमच्या नियमानुसार १ रुपयाची ३९८ नानी अणि २ रुपयाचे १ नाणे असे ४०० रुपये म्हणून लिहिले आहे.
आता कॅशियरच पारा चढायला लागला.
कॅशियर: ही दुधाची थैली घेउन जा तुमची. पैसे कमी आहेत.
मी: अहो, असा चालणार नाही. ग्राहकाचे पैसे घेउन अफरातफर केल्याचा मला संशय आहे. मला तक्रार करायची आहे.
कॅशियर: मग मेनेजरबरोबर बोला.
मी: अहो असं कसं, मेनेजर ला बोलावा इथे. मी गरीब विद्द्यार्थी आहे. माझ्या दृष्टीने १ रुपयाला खूप किम्मत आहे. तुम्हीच बोलवा त्याला इथे. त्याला इथे येउन कॅश चेक करू दे किती आहे ते, आणी ठरवू दे.
एव्हाना लायनीमधले लोक ओरडायला लागले. ते ऐकून मेनेजर पण आला तिथे की काय चालु आहे ते बघायला. त्याला मी शांतपणे सांगितले, काल काय झाले आणी आज काय झाले. ते ऐकून मेनेजर त्या कॅशियरला म्हणाला की याला ४०० रुपयाची पावती देऊन मोकळे करा. मी माझ्या जबाबदारीवर ४०० रुपये accept करतो.
त्या दिवसानंतर त्या कॅशियरने मला कधीही त्रास दिला नही. अगदी कळ्कट, फाटक्या नोटा मी त्याला दिल्या तरीही.
प्रतिक्रिया
25 Nov 2008 - 11:30 am | विजुभाऊ
असाच अनुभव मला आपुलकीने वागणार्या ब्यान्केत यायचा
मुम्बैच्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणार्या थंडीची आठवण येऊन तुमचे गाल आरक्त होत असतील तर याचे आश्चर्य बाळगु नका. त्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
25 Nov 2008 - 11:34 am | सहज
उदय शेठ मस्त.
25 Nov 2008 - 11:38 am | घाशीराम कोतवाल १.२
ज॑बर्या हाणलात ब्यांकेच्या कॅशियरला लगे रहो =)) =)) =)) =))
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
25 Nov 2008 - 11:47 am | सुक्या
असल्या अडेलतट्टु कारकुनाची जिरवल्याबद्द्ल अभिनंदन. काही कारकुंडे साले खुप माजुरडे असतात. बरे झाले जिरवली ते.
आपले पैसे असे देतात कि त्यांच्या बापाचा माल वाटतायत.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
25 Nov 2008 - 2:24 pm | छोटा डॉन
लेख आवडला. मस्त वाटला खुसखुशीत शैलीमुळे ...
+१, सहमत आहे.
अवांतर : उदयसाहेबांची गाडी "बोटक्लबातुन" निघालेली दिसतेय. असो.
इथे जास्त चर्चा नको, खरडी / व्यनीतुन संपर्क साधा ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
25 Nov 2008 - 11:49 am | महेश हतोळकर
मस्तच रे भावा!
25 Nov 2008 - 12:02 pm | नाशिककर
जमलयं!!!!!!!!!!!!!!
25 Nov 2008 - 1:41 pm | माउ
वा वा!
५० पैसे ची नाणी का नाही नेली?
25 Nov 2008 - 1:47 pm | सखाराम_गटणे™
>>५० पैसे ची नाणी का नाही नेली?
५ पैसे ची नाणी पण चालतात.
25 Nov 2008 - 2:18 pm | शक्तिमान
उपयुक्त माहिती =)) !
25 Nov 2008 - 2:06 pm | सुनील
बँक खाजगी होती, सहकारी होती की सरकारी?
आणि शीर्षकातील पुण्याचा उल्लेख कशासाठी ते समजले नाही. नाही म्हणजे असा अनुभव अन्यत्रही येऊ शकतो!
असो, बरी जीरवलीत!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
25 Nov 2008 - 2:10 pm | शक्तिमान
अहो... हा अनुभव पुण्यात आला म्हणून पुणे लिहीले आहे त्यांनी.
फार मनाला लावून घेऊ नये.... :P
25 Nov 2008 - 2:35 pm | टारझन
होय खटकलंच ... "पुण्याच्या" बँकेतील अनुभव...
पुण्यात रहायचं म्हंटलं तर पुणेरीपणा हवाच की ! तुम्ही दाखवला .. .हाबिणंदण ... आम्ही अशी अद्दल आमच्या कॉलेजच्या रेल्वे कंसेशन पास देणार्या खडूस बाईला घडवली होती... सगळ्यांनाच खडूसपणा दाखवल्याने सगळेच काट खाऊन होते... आम्ही येताजाता तिच्याकडे पाहून हसायचो मुद्दाम .. कोणतीही कमेंट पास करणे नाही .. पण तिला जाणवून द्यायचो की तिच्यावर हसतोय ..
असो .. पुण्याचा इजय असो ...
- टारझन
25 Nov 2008 - 2:13 pm | जैनाचं कार्ट (not verified)
प्रत्येक जागी पुणे - गैर पुणे वाद जरुरी आहे का सुनिल ?
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ
25 Nov 2008 - 2:18 pm | छोटा डॉन
सुनीलभौ, इथे त्या "पुणे - गैर पुणे" ह्याचा काही तरी विषय होता का ? लेखात पार्श्वभुमी आहे म्हणुन नाव घेतले, जर त्याने "पिंपळगाव बुद्रुक " म्हटले तरीहे चालेले पण सत्य पहायला गेले तर घटना पुण्यातली आहे म्हणुन "पुणे" नाव घ्यायलाच हवे ...
असो. त्यात आपण काय एवढे "संवेदनाशील" झालात ते समजले नाही ...
तसे आजकाल बरेच जण "पुणे" ही नाव काढले की "संवेदनाशील" होतात.
कॄपया इथे ही चर्चा नको, धाग्याचे वाट्टोळे होते.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
25 Nov 2008 - 4:50 pm | संताजी धनाजी
एकदम बरोबर केलेत! कुठल्याही कर्मचार्याने ग्राहकाशी [किंवा कोणाशीही] उध्द्टपणे वागु नये.
परंतु मी पण ग्राहकाभिमुख काम करणार्या लोकांना थोडा "बेनिफिट ऑफ डाउट" देतो. कारण ते पण तेच तेच काम सतत करुन "इरीटेट" झालेले असतात. आणि ग्राहकाभिमुख काम असेल तर झालेच डोक्याचे कडबोळे. आपल्याकडचे ग्राहक लोक पण काही कमी नसतात!
- संताजी धनाजी
25 Nov 2008 - 11:04 pm | भाग्यश्री
व्वा... तुमची आयडीआ आवडली!! त्या कॅशिअरचं तोंड पाहण्यासारखं झालं असेल!
बाकी, काही कॅशिअर्स असेच असतात.. काय बिघडलेलं असतं त्यांचं देवास ठाऊक...
http://bhagyashreee.blogspot.com/
26 Nov 2008 - 2:08 pm | खुसपट
एकदा कॅशियरचे काम दिवसभर करून पहा.दुसर्याचे पैसे दिवसभर ,ते सुद्धा मुद्दाम घुसडलेल्या मळक्या/चिकटवलेल्या नोटा निवडून बाजूला काढून, मोजायचे काम वैताग आणणारे वाटणारच.फुलवाले, भाजीवाले यांच्या पानाचे डाग पडलेल्या/चुरगळलेल्या नोटा तुम्हीतरी रोज हसर्या चेहर्याने मोजाल ? किरकिर्या बँक ग्राहकांची संख्या खडूस कॅशियर्स पेक्षा ५० पट अधिक आढळेल. बँकेत २/३ तास उभे राहून निरिक्षण करा. मानसिकता ही वयावरही अवलम्बून असते. असो.
बँकेत ८ पावसाळे काढलेला ( खुसपट )
26 Nov 2008 - 4:25 pm | मनीष पाठक
किरकिर्या बँक ग्राहकांची संख्या खडूस कॅशियर्स पेक्षा ५० पट अधिक आढळेल.
अगदी बरोबर! कारण बँकेच्या शाखांपेक्षा पर्यायाने कॅशियर्सपेक्षा ग्राहक जास्तच असनार ना! :)
बाकी बराच धडा शिकवला कॅशियरला.
मनीष पाठक
26 Nov 2008 - 4:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
एकदा कॅशियरचे काम दिवसभर करून पहा.दुसर्याचे पैसे दिवसभर ,ते सुद्धा मुद्दाम घुसडलेल्या मळक्या/चिकटवलेल्या नोटा निवडून बाजूला काढून, मोजायचे काम वैताग आणणारे वाटणारच.
एकदा नोकरी म्हणून स्वीकारल्यावर तक्रार का करावी, तेही ज्यांची चूक नाही त्यांच्यावर वैताग दाखवून? यापेक्षा कितीतरी जास्त मनस्ताप देणारी कामं लोक हसतमुखाने करतात.
लेखाबद्दल: बरा बदला घेतलास रे!
26 Nov 2008 - 10:59 pm | भाग्यश्री
ह्म तुमचं बरोबर आहे! मला माहीत नाहीए कॅशिअरचे नोकरीतले त्रास, म्हणून त्याच वागणं असं इत्यादी.. म्हणूनच म्हटलं 'देवालाच ठाऊक'.. तुम्ही सांगितलंत त्याबद्द्ल थँक्स.. कटकटी तर असणारच.. पण जिथे लोकांशी संपर्क येतो अशा कामात चिडचिड्,वैताग दाखवताना जरा संयम बाळगलेलाच बरा नाही का?
अदिती म्हणते त्याच्याशी सहमत..
http://bhagyashreee.blogspot.com/
26 Nov 2008 - 11:00 pm | भाग्यश्री
प्र.का.टा.आ..
27 Nov 2008 - 2:02 am | सुक्या
एकदा कॅशियरचे काम दिवसभर करून पहा.
तुम्ही जे सगळं लिहीलय ते कॅशियरचे काम आहे. कॅशियर नोटा मोजुन देतो म्हनुन काय तो कुनावर उप्कार करत नाही. काम सगळेच करतात. काम करताना कॅशियरला वैताग येत असेल तर त्याने वैताग न येणारी नोकरी करावी. आपला वैताग दुसर्यावर ओरडुन काढु नये.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
11 Dec 2008 - 3:29 pm | भडकमकर मास्तर
काम करताना कॅशियरला वैताग येत असेल तर त्याने वैताग न येणारी नोकरी करावी.
अगदी अगदी हेच म्हणतो...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
26 Nov 2008 - 12:29 am | पाषाणभेद
सुंदर अनुभव लिहीला आपण.
मला माझा अनुभव आठवला. मी देवळाली (नाशिक) येथील "अबक" बँकेच्या शाखेत सॉफ्टवेअर देखभालीसाठी जात असे. सहाजीकच मला कॅशीअर च्या केबीन मध्ये प्रवेश असे. ते कॅशीअर ग्रहस्थ फार गमती , हसतमुख व उमदे व्यक्तिमत्वाचे होते.
तेथील कॅशीअरची केबीन काचेने पुर्ण बंद होती. त्यातून बोलायचे म्ह्ट्ले तर ओरडावे लागे. त्या दिवशी माझी व त्यांची पहिलीच भेट होती. मी कॅशीअर केबीन मध्ये गेलो. समोर केबीन बाहेर ग्राहक ओळीत ऊभे होते. मला ते म्हटले, "पाषाणभेद, आता समोरील माणसांच्या गमती बघायच्यात काय ?" मी हो म्हटले.
ते समोरच्या माणसाशी हसत संवाद करू लागले.
कॅशीअर: काय रे वेड्या येथे काय करतो आहे?
(समोरील व्यक्ती चक्क कॅशीअर हसुन बोलतो हे बघून तो सुध्धा हसुन मोठ्या आवाजात प्रतीसाद देत असे.)
व्यक्ती : जरा १०० च्या नोटा द्या.
कॅशीअर: बापाचा माल आहे, घे तू.
व्यक्ती : धन्यवाद
कॅशीअर: रात्री दारु पितोस ना?
व्यक्ती : हो ना. आज लवकर कॅश लागते आहे.
कॅशीअर (उदास चेहेर्याने): बिनडोक्या, रात्री कशी मजा केली ?
काही नाही. दुपारी परत भरणा करायला येतो.
कॅशीअर: हो ये ना. येथे जेउन येथेच झोप मग.
व्यक्ती : हो नक्की येईल.
नंतर दुसर्या ग्राहकाशीही अशाच प्रकारे संवाद झाला.
मला ते नंतर म्हटले, "काय पाषाणभेद, मजा आली का नाही "
मी: आपण धन्य आहात.
कॅशीअर: अरे, कामाचा ताण हलका करण्यासाटी करावे लागते.
नंतर मी जेव्हा जेव्हा तेथे जात असे, तेव्हा तेव्हा ते हा किस्सा करत.
-( गुणग्राहक)पाषाणभेद
27 Nov 2008 - 12:47 am | शितल
मस्त अनुभव :)
पण ह्या बॅन्क वाल्यांचा मला अजुन वाईट अनुभव आला नाही त्यामुळे काही बोलत नाही.
9 Dec 2008 - 1:18 pm | सोनम
:)) :)) :)) :)) :)) :)) :))
>>५० पैसे ची नाणी का नाही नेली?
५ पैसे ची नाणी पण चालतात.
अहो मर्द सावळा,
ती नाणी जर नेली असती तर कॅशिअरच्या रागात अजून भर पडली असती रे.
बँक खाजगी होती, सहकारी होती की सरकारी?
अहो सुनील, बॅकेला महत्त्व नाही. कारण कोणतीही बॅक असली तरी हाच अनुभव येतो सर्रासपणे.
(पुण्याची सोनम) राम राम मिपा
9 Dec 2008 - 3:48 pm | भडकमकर मास्तर
एकदम भन्नाट अनुभव आहे , उदय...
चांगली जिरवलीत...
कॊलेजात अकरावीत असताना एस्पीमधून शेजारच्याच एका बँकेत खाते काढायला गेलो होतो तेव्हा तिथल्या एका कारकुनाने ( फॉर्ममधले ते दिव्य हिंदी समजेना म्हणून त्याला विचारायला गेलो तर) फार बोल लावले होते.... त्याला त्रास द्यायला अशीच काही युक्ती काढायला हवी होती...
असो....राष्ट्रीयकृत ब्यांकेतून कर्ज मिळवणे हा एक असाच रम्य अनुभव असतो...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
11 Dec 2008 - 10:04 am | भिंगरि
मला तुमचि प्रतिक्रिया देण्याचि पध्दत आवडलि. अदितिशिहि सहमत.
11 Dec 2008 - 6:32 pm | अभिषेक पटवर्धन
बँकांचा विषय निघालाच आहे म्हणुन एक किस्सा सांगतो. मी पुण्यात सीए ची आर्टीकलशीप करत असतानाचा आहे. एका अबक बँकेच्या सर्विस ब्रॅच च्या ऑडीट साठी मी नेहमी जात असे. ती ब्रॅच म्हण्जे एक संग्रहालयच होते. एका पेक्शा एक नग भरले होते. (जनरली बॅकेला डोइजड झालेली माणस सर्वीस ब्रँच मधे टाकतात असा माझा अनुभव आहे. उदा: वशिल्याने लागणारी किंवा युनियन ची लोक ई.)
तेव्हा या ब्रँच मधे एक अतिशय वात्रट शिपयी होत. पुण्यामधल्या ३३ ब्रँचेसच चेक क्लीअरींग रोज २ वेळा तीथे येत असे. एक दीवस एक नवीन शिपई ब्रँच मधे जॉइन झाला. पोरगेलेसा दीसणारा बिचारा जो जे म्हणेल ते काम मुकाट्याने करत होता. सन्ध्याकळी त्याला मॅनेजरने क्लीअरींग घेउन जायला सांगितल. वास्तवीक, हे क्लीअरींग स्टेट बँकेच्या क्लीआरिंग हाउस मधे द्यायच असत. पण तो बिचारा मॅनेजरला विचारायला घाबरत होत की कुठे नेउ हे चेक्स. त्याने शेवटी या वात्रट शिपयाला हे विचरलं. ह्या महाभागाने त्याला ते सिटी पोस्टात टाकायला सांगितलं. या बिचारयाला पण हे खरं वाटलं. त्याने सरळ ते चेक्स च पुडकं पोस्टात नेउन टाकलं.
स्टेट बँकेत जेव्हा वेळेवर क्लीअरींग पोचलं नाही तेवा त्यान्नी मॅनेजर ला फोन केला. त्याने याला विचारल्यावर ते पोस्टात असल्याच कळलं. मॅनेजर सकट सगळ्यांची पुंगी टाईट. (नॅशनलाईज्ड बँकेच एका दीवसाचं क्लीअरींग साधारण ३०-४० कोटी रुपयाचं असतं)
मग मॅनेजर आणि दोन्ही शिपायांची वरात सिटी पोस्टात. पोस्ट मास्तर म्हणाले की पुडकं शोधा पण माझी माणसं मिळणार नाहीत. दीवसभराच्या टपाला मधुन एक पुडकं शोधणं कीती दिव्य काम आहे कल्पना करा. शेवटी रात्री २-२.५ वाजता ते सापडलं.
नसतं सापडल तर मॅनेजर सकट सगळे घरी गेले असते.
दुसय्रा दिवशी मॅनेजर ने सगल्या ऑफीसला जे झापलयं. याच ब्रॅंच च्या अनेक सुरस रम्य कथा माझ्याकडे आहेत. पण त्या परत कधी तरी
11 Dec 2008 - 6:52 pm | सुनील
जरूर लिहा तुमच्या सुरस कथा.
माझी एक लहानपणीची आठवण -
वडिलांनी एक पाकिट रजिस्टर पोस्टाने पाठवण्यासाठी माझ्या हातात दिले. मी पोस्ट ऑफीसात गेलो. एका खिडकीत पाकिटाचे वजन करून, किती रुपयांचे स्टॅम्प लागतील ते जाणून घेतले. स्टॅम्पची खिडकी वेगळी. तिथे जाऊन स्टॅम्प विकत घेतले. पाकिटाला चिकटवले. आणि पाकिट परत पहिल्या खिडकीत जाऊन देण्याऐवजी सरळ पेटीत टाकले!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
11 Dec 2008 - 9:39 pm | भडकमकर मास्तर
मस्त गोष्ट... अजून येउद्यात....
माझ्या एका नेशनलाइज्ड बँकेत शिपायाने एक महत्त्वाचा चेक (चुकून) १५ दिवस ड्रॉवरमध्ये टाकून ठेवला होता... मी हवालदिल होतो...त्याची आठवण झाली...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
23 Dec 2008 - 3:29 am | llपुण्याचे पेशवेll
>>माझ्या एका नेशनलाइज्ड बँकेत
वा मास्तर! तुमच्या न्याशनलाईझ्ड ब्यांका(एकापेक्षा अधिक. संदर्भ: माझ्या एका) पण आहेत वाटते!
(ह.घ्या. हे वे. सां. न. ल.)
पुण्याचे पेशवे
Since 1984
23 Dec 2008 - 3:40 am | भास्कर केन्डे
वा पाटवर्धन साहेब! हसून हसून पुरेवाट झाली.
अंमळ मजेशिर किस्सा. अजून येऊ द्यात.
राग मानून घेणार नसाल तर एक प्रेमळ सल्ला: सहज वापरातल्या मराठी शब्दांऐवजी इंग्रजी शब्दांचा वापर करायचे टाळता आले तर आपले लेखन वाचताना रसभंग होणार नाही.
उदा., जनरली = साधारणपणे, सर्वीस ब्रँच = सेवा शाखा, वगैरे.