कॉमेडी ऐसपैस

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
21 May 2015 - 5:48 pm

" तर आता पहा, नवराबायकोतील हा धम्माल संवाद!!" एक तोकड्या कपड्यांतली वाळकी मुलगी, तिच्या कमावलेल्या आवाजात सांगत असते. तिच्या शब्दाशब्दाला मागचा वाद्यवृंद ठणाणत असतो.
एक अत्यंत जाडी,बेढब पण साडी नेसलेली बाई स्टेजवर प्रवेश करते. आताशा, स्टेजवर प्रत्येक पात्राने नाचत नाचत आणि वाजत गाजतच प्रवेश करायचा असतो. तसा डिफॉल्ट प्रोग्रॅमच आहे ना! शिवाय प्रत्यक्ष काही वाक्य उच्चारण्याच्या आधीच नुसत्या आगाऊ देहबोलीवरच प्रेक्षकांचे आणि परीक्षकांचे हंशे वसूल करायचे असतात.
तर ही बे.बा.(बेढब बाई) स्टेजवर एक राऊंड मारतीये तोच तिचा अत्यंत अंगविक्षेपी काटकुळा नवराही(का. न.) येतो आणि ते दोघेही कुस्तीतल्या मल्लांसारखे एकमेकांभोवती फिरु लागतात. एकमेकांच्या एवढे जवळ असूनही त्यांचे आक्रस्ताळी संवाद मात्र तारस्वरांत सुरु होतात.
बे.बा.: अहो, कधीपासून मेली एक गंमत सांगायची आहे तुम्हाला, पण तुमचं लक्ष कुठाय ?
का. न. : गंमत ? म्हणजे परत पाळणा हलणारे की काय ? अरे देवा, आता या गाळीव रत्नाचं काय करु?
बे.बा. : इश्य्!(असं म्हणून ते धूड बेक्कार लाजतं) तुमच्या जिभेला काही हाड ?
का. न. : जिभेलाच काय, माझ्या बर्‍याच अवयवांना हाड नाहीये.
बे.बा. : शी, तुमचे ते नेहमीचेच पीजे पुरे झाले हं. मी काय म्हणत होते....
टी.व्ही. समोर बसून आपल्याला जराही हंसू येत नसले तरी तिथे प्रेक्षक आणि परीक्षक वाक्या वाक्याला हंसून टाळ्या वाजवत असतात.
का. न. : (वेड पांघरुन) तू काहीतरी पाळण्याचं म्हणत होतीस.
बे.बा.: काहीतरीच काय, मी आता मांजर सुद्धा पाळणार नाही.
का. न. : अगं त्या पाळण्याचं नाही गं, या पाळण्याचं. (जोजावल्यासारखे हातवारे करत)
बे.बा. : गपा आता. मला तुम्ही कुठली गोष्ट सांगूच देत नाही. असा वैताग आलाय! आणि त्यांत कायम असा एरंडेल घेतल्यासारखा चेहरा काय करुन बसता ?
का. न. : मग काय करु? उगाचच त्यांच्या सारखं(परीक्षकांकडे बोट दाखवून) हंसायला मला नाही जमत. साला विकेंडला सुद्धा रमी खेळायला नाही मिळत.
बे.बा. : अग्गंबाई! म्हणजे त्या सटवीला आता रमी म्हणण्यापर्यंत मजल गेली वाटतं तुमची ?
का. न. : ह्यॅ! त्या रमू बद्दल नाहीये बोलत. रमी म्हणजे ते सिक्वेन्स लावून खेळतात नं पत्याचे डाव? त्याबद्दल बोलतोय.
बे.बा. : बघा, बघा, त्या सटवीचा उल्लेख झाल्याबरोबर गालाला खळ्या पडल्या, आणि माझ्यासमोर मात्र कायम दुर्मुखलेले.
का. न. : अगं, विळ्या-भोपळ्याची मोट बांधल्यावर तो विळा कधीतरी हंसेल का ? मी तुझा नवरा आहे, म्हणजे ईंग्रजीत हसबंड!
बे.बा. : ही काय नवीन बातमी आहे का ?
का. न. : ज्याचं हंसणं कायमचं बंद झालेलं असतं ना, त्यालाच हसबंड, म्हणजे हंसणं बंद असं म्हणतात.
बे.बा. त्यावरुन आणखी काहीतरी कंठाळी बोलते, मग तो बोलतो. सगळी जुगलबंदी जास्तीत जास्त अंगाभिनय करुनच चालते. शेवटी त्या दोघांनाच दम लागून ते थांबतात. मग परीक्षक त्यांची भरभरुन स्तुती करतात. दहा पैकी नऊ गुण देतात. ती दुक्कल खाली उतरते, दुसरे कोणी त्यांची जागा घेऊन(वर चढताना उगाचच त्या निर्जीव रंगमंचाच्या 'पायी लागु' करुन) रंगमंच दणाणून सोडतात. वाद्यवृंदातील वादकांसकट सगळे अगदी, पुल किंवा पीजी वुडहाऊस च्या तोडीचा विनोद ऐकल्याच्या थाटात हंसत रहातात आणि आपला हात नकळतपणे चॅनेल बदलतो.

संस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतमुक्तकमौजमजाअनुभवमतविरंगुळा

प्रतिक्रिया

अनिता ठाकूर's picture

21 May 2015 - 5:56 pm | अनिता ठाकूर

दहापैकी अकराहि मार्क्स देतात. सर्रास!! काहिही..अं!!!

पगला गजोधर's picture

21 May 2015 - 6:12 pm | पगला गजोधर

.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 May 2015 - 6:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

मोहनराव's picture

21 May 2015 - 6:37 pm | मोहनराव

क्या बात.. क्या बात (साला डालभात..)

उगा काहितरीच's picture

21 May 2015 - 7:01 pm | उगा काहितरीच

अती झालं अन हसू (नाही) आलं .

सतिश गावडे's picture

21 May 2015 - 7:15 pm | सतिश गावडे

भारीच. मस्त खेचलीये त्या कॉमेडीवाल्यांची.

मुक्त विहारि's picture

21 May 2015 - 10:02 pm | मुक्त विहारि

कशाबद्दल आहे?

पैसा's picture

21 May 2015 - 10:07 pm | पैसा

महागुरू कुठेत?

सतिश गावडे's picture

21 May 2015 - 10:12 pm | सतिश गावडे

यात महागुरु नसतात. एक ताई, वाजवणारे आणि इतर परिक्षक असतात. सध्याच्या ताईंना "कॉमेडी ऐसपैस" खेळताना पाहून धक्काच बसला होता. त्यांनी एका चित्रपटात खुपच सुंदर काम केले होते.

पैसा's picture

21 May 2015 - 10:14 pm | पैसा

मराठी शिरेलींचा अभ्यास करायला पायजे आता!

जयंत कुलकर्णी's picture

22 May 2015 - 9:38 am | जयंत कुलकर्णी

त्या "माझ्या दातांचे माप घ्या " असे सांगण्यासाठी तोंड वेंगाडतात त्या का ?

प्रदीप's picture

21 May 2015 - 10:13 pm | प्रदीप

:)

खटपट्या's picture

21 May 2015 - 10:29 pm | खटपट्या

कोणता कारेक्रम हाये हा ? नाव द्या. बघतो एकदातरी...

म्हण्जे हा नक्कीच हॉलीवूडचा सिनेमा नसावा....

(डिस्कव्हरी आणि नॅशनल जियॉग्राफीक प्रेमी) मुवि

नाखु's picture

22 May 2015 - 9:34 am | नाखु

निरिक्षण आणि यातले गुरु म्हणजे कहर आहे नुस्ता!!!

विनोदी आणि हास्यास्पद यातले नेमके अंतर माहीत असलेला.
मुकाट वाचक नाखु

फक्त मार्कच देत नाहीत कै ! एक ताई तर शेल्फी सुद्धा काढायच्या कलाकारांसोबत

मदनबाण's picture

22 May 2015 - 12:12 pm | मदनबाण

हल्लीचे कॉमेडी /गाण्याचे / नाचण्याचे शो पाहुन, यापेक्षा अजुन मुर्खपणा पहावयाचा उरला नाही... याची खात्री पटली आहे !

{डिस्कव्हरी सायन्स ट्यून इन करणारा}

मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi

चित्रगुप्त's picture

22 May 2015 - 12:56 pm | चित्रगुप्त

मस्त लिहीलेय.

बरोबर आहे, खुप बोअर करत आहेत ते आजकाल .... कॉमेडीचा फालतु पणा केलाय फक्त..
पहिल्यांदा थोडे तरी चांगले विनोद होते तरी, नविन पर्व तर चॅनेल बदलवायला भाग पाडतेच...

तुषार काळभोर's picture

22 May 2015 - 2:01 pm | तुषार काळभोर

आम्ही एक्स्प्रेस बघायचो, ते अमृतासाठी.
बाकी आजकाल 'चला हवा येऊ द्या' बघतो.

क्रेझी's picture

22 May 2015 - 2:26 pm | क्रेझी

हा कार्यक्रम किंवा अशाच धाटणीच्या कार्यक्रमासाठी जे लेखक आहेत ते लेखक मिपा, मीम सारख्या मराठी ब्लॉगवर सुध्दा लिहीत होते/आहेत तेंव्हा असं काही बघितलं की थोडं विचित्र वाटतं!!

मित्रहो's picture

23 May 2015 - 12:20 pm | मित्रहो

असा समज असावा. प्रेक्षकांना खोटा डोलारा, खोटे हसू आणि खोटेच विनोद दाखविले की ते खूष होतात असा समज असावा. निर्माता आणि मुख्य म्हणजे MBA केलेल्या चॅनेलमधील मॅनेजरचा असा समज असतो. असेल कुठलातरी डेटापॉइंट त्यांच्याकडे. रोज उगाच रडल्याने सिरीयल्स चालतात तर रोज उगाच हसल्याने कॉमेडी का चालू नये?
दुसरे म्हणजे अति झाले. दर आठवड्याला काय नवीन लिहीणार आणि काय नवीन करऩार. राजकीय किंवा सद्य घडामोडीवरील व्यंग सोडले तर दर आठवड्याला नवीन शक्य नाही. तसेही तो प्रकार परमफॉर्मंसचा आहे त्यामुळे लिखाण हे गौण असते. बऱ्याच कार्यक्रमात त्यात काम करनारेच अंगविक्षेपांच्या मधेमधे काहीतरी संवाद घालतात.
कदाचित मराठीतही टिव्ही चॅनेलव्यतिरीक्त दुसरे विनोदाचे साधन हवे. AIB नेहमीच कमरेच्या बरेच खाली उतरते पण TVF मात्र बऱ्याचदा मजा आणते. माझ्या आवडीचे ते Tech Conversation With Dad. नवीन पिढीला भावनार, कमरेखाली विनोद नसनार तरीही मनुराद हसवनार, उत्तम लेखन आणि संयत अभिनय यांचा उत्तम संगम आहे. कदाचित मराठीतही असेच काहीतरी समांतर हवेय. तेंव्हा या लोकांना कळेल हे जे करताहेत ते कोणीही करु शकतो तेंव्हा जवळ साधन आहेत म्हणून त्याचा दुरुपयोग करु नये.