सुधागड विषयी-
सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. सुधागड हा फार प्राचीन किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. हा गड विस्ताराने फारच मोठा आहे.
महादरवाजा किल्ले सुधागड
इ.स. १६४८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. याबाबत असा उल्लेख आढळतो की, ‘साखरदर्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकर्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.’ शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून सुधागड असे नामकरण केले.
प्रवास वर्णन –
किल्ले सुधागड….
नाव तसे ऐकलेले पण तिथे जाण्याच भाग्य अजूनपर्यंत मला लाभले न्हवते. दिनांक २४/१२/२०१३ रोजी सकाळी १0.०० वाजता. शिव दुर्गप्रेमी वांद्रे बळवंतराव दळवी यांचा फोन आला कि गणेश आज संध्याकाळी किल्ले सुधागड भेटीसाठी निघायचंय. सुधागड हे नाव ऐकून आनंद झाला मी पुन्हा एकदा विचारलं नक्की सुधागडचना तर ते बोलले हो सुधागडच !
आणि माझी लगेच तयारी सुरु झाली. घरी फोन करून सांगितलं कि मी आज किल्ले सुधागडला जाणार आहे. तर नेहमीप्रमाणे आमच्या सौभाग्यवती उद्या सुट्टी आहे वाटत?
म्हटलं हो ! मग म्हणाल्या ; जा कि तुम्हाला कोण आडवणार…!
रात्री घरी जावून पोटात भर टाकली आणि निघालो. वांद्र्याला जावून शिव दुर्गप्रेमी वांद्रे म्हणजे बळवंतराव दळवी साहेब यांना भेटलो व ते आणि मी विलेपार्ले येथून स्वराज्य प्रेमी मंडळ यांच्या मंडळाला घेवून हि सुधागड मोहीम करायची होती. शिवरायांचा इतिहास त्यांचा पराक्रम आताची तरुण पिढी विसरत चाललीय. त्यांच्या मनात, रक्तात शिवराय आणि शिवप्रेम फुलाव, शिवरायांचा पराक्रम. त्याचं शौर्य, त्यांची नीती, विचारधारा, त्यांचे संस्कार या मुलांच्या मनावर घडावेत म्हणून हि मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेत लहान थोर अशा ९८ उत्सुकांनी, शिवप्रेमींनी सहभाग घेतला. ५ वर्षाच्या मुलीपासून ते ६५ वर्षांच्या आजीपर्यंत या सार्यांची उत्सुकता पाहून खूपच कौतुक वाटले.
आणि रात्री १.०० वाजता कुडकुडणाऱ्या थंडीत आमचा प्रवास सुरु झाला. ५.३० वाजता श्री क्षेत्र पाली बल्लाळेक्ष्वराचे दर्शन घेवून पुढे ८ किलोमीटर वर असणारे नाडसूर / धोंडसे या गावी पोहचलो. समोरच किल्ले सुधागडच्या दरयातून उगवणाऱ्या सूर्य नारायणाचे दर्शन आणि सुधागडचे दर्शन एकत्रितरित्या होण्याचा एक वेगळाच अनुभव आला.
किल्ले सुधागडच्या दरयातून उगवणाऱ्या सूर्य नारायणाचे दर्शन
चहा पाणी करून आम्ही सकाळी ९.०० वाजता गडाच्या दिशेने पाहिलं पावून टाकलं. काही अनुभव स्थानिक लोक आणि दळवी साहेबांकडून गडावर जाणाऱ्या मार्गाचा थरार ऐकण्यात आला होता. मी २ ते २.५ तासांचा रस्ता हा एका भयाण जंगलातून जातो. वाटेत मोठ मोठे दगड असून गडावर चढायला त्यातून मार्ग काढायचा आहे. गडावर जाणाऱ्या पायऱ्या आता राहिल्या नाहीत. हे ऐकताच आम्ही काही लोकांच्या हातात काठ्या दिल्या त्याचा आधार घेवून गड चढा अस समजावून सांगितलं.
गडाच्या दिशेने
एव्हाना आम्ही गाव सोडून त्या जंगलात प्रवेश केला आणि पाहतो तर काय गडावर चढायला एकही पायरी शिल्लक नाहीय. पाण्याच्या प्रवाहाने येथील पायऱ्या नष्ट झाल्या होत्या. छोटे मोठे दगड वाहून, घसरून संपूर्ण रस्ताच गायब झालेला दिसून आला. त्यातून मार्ग काढताना लहान मुले वि वृद्धांची चांगलीच दमछाक होत होती. काही तरुण मुले सहज चढून जात होती तर काही महिला वर्ग आता थकत आला होता. बरोबर पाण्याच्या बाटल्या होत्या त्यातील एक एक घोट घेत अर्धातास चालल्यावर थोडा आराम करून पुन्हा गड चढायला सुरवात होत होती.
जवळ जवळ एक दीड तासांनी आम्ही निम्मा गड सर केला आता हात पाय थकले होते. वाटेत हनुमान मंदिर लागलं. एका भल्या मोठ्या झाडाखाली एखादा तपस्वी भासावा असा हा मारुतीरायाचा अवतार. बाजूने पडझड झालेला कठडा, भिंती आणि मध्ये हि असणारी मारुती रायांची मूर्ती मनाला खूप शांती आणि चैतन्यदायी शक्ती देवून जाते.
मारुतीरायां
मारुतीरायांच हे दर्शन म्हणजे अजून बराच गड चढायचाय त्यासाठी शक्ती मिळावी म्हणून असावं बहुतेक. मारूतीच दर्शन घेवून आम्ही पुढे चाललो अजून १५ /०२० मिनिटे चढून पुढे गेल्यावर तानाजी टाके म्हणून एक तानाजी तलाव लागलं. एका भल्या मोठ्या पाषाणी दगडात कोरलेल्या/खोदलेल्या या तलावातले थंड पाणी प्राशन केलं. आणि विसावा घेतला एक नवल वाटलं हे बांधकाम कौशल्य पाहून काय योजना असेल हा किल्ला बांधताना एका दगडात तलाव खोदने हे काय साधेसुदे काम नाहीय.
थोडा विसावा
थोडासा विसावा करून पुन्हा एकदा गड चढायला सुरवात केली जवळ जवळ दोन अडीच तासांच्या या चढाई नंतर शरीर पूर्ण पणे थकलं होत. कधी एकदा वरती जातोय असच वाटत होत. किल्ला आता जवळ जवळ येतोय हे पाहून पायांनी थोडा आपोआप वेग घेतला. आणि डोळे विस्पुरले अंगातला क्षीण आपोआप कमी झाला कारण थोडं पुढे आल्यावर समोरचं दिसला तो महादरवाजा या दरवाजाकडे पाहून रायगडाची आठवण झाली. तितकेच मजबूत बांधकाम आणि इतक्या उंचावर कस हे साध्य केल असेल. किती किती मेहनत आपल्या पूर्वजांना घ्यावी लागली असेल. स्वराज्याच रक्षण करण्यासाठी हे गडकोठ उभे केले. हे गडकोट म्हणजे आपला जिता जागता, प्रत्येक मराठ्याच्या नसानसांत वाहणारा जिवंत इतिहास आणि त्याच इतिहासाचे हे साक्षीदार असलेला हा सह्याद्री आणि याच सह्याद्रीतल्या या सुधागडला पाहून मन थक्क होत होत. अंगातली रग रग मोहरून आली होती
अगदी रायगड सारखाच तसाच हुबेहूब महादरवाजा किल्ले सुधागडचा हि दिसून आला. आत शिरल्यावर तटबंदीची थोडी पडझड दिसून आली. त्यातून मार्ग काढून वरती आलो किल्ला सर केल्याच समाधान लाभलं. खाली पाहतो तर माझ्याकडे समोर आ वासून पाहणारी खोल दरी दिसली. महादरवाजाच्या वरती चढून आपोआप मुखातून एक शिवगर्जना झाली. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज कि. आणि बाकीच्या सर्वांनी जय असा मोठा आवाज केला. मग अजून थोडा चढाव चढून वरती माळावर आलो समोरच भोराई मातेचं मंदिर दिसले.
भोराई माता
समोरच एक दीपमाळ दिसली आणि त्यावर एक हत्ती कोरला आहे त्याने आपल्या पाठीवर ती दीपमाळ धरून ठेवली आहे. अशी दीपमाळ मी पहिल्यांदाच पाहिली. मंदिरात प्रवेश केला, देवीच दर्शन घेतलं. आणि बाजूंच्या वट्यावर चिंतन करत बसलो अजूनही आमच्यापैकी काहीजण गडावर चढले न्हवते. सर्वांना गडावर चढायला आजून अर्धातास तरी लागेल याचा अंदाज घेवून मंदिरातच त्या थंड फरशीवर मी माझ थकलेलं अंग टाकलं आणि कधी गाढ झोप लागली कळलच नाही. जवळ जवळ अर्ध्या तासाने जाग आली मंदिराच्या बाहेर आलो तर सर्वजण गड चढून आले होते. शिवदुर्ग प्रेमी वांद्रे हे आणि मी सर्वांची चौकशी करून आता गड फिरण्यास सुरवात करायचं ठरवलं.
शिवरायांची गाथा, काही पराक्रमातले शिवरायांचे नियोजन, त्यांची युद्धनीती यावर त्यांच्याशी चर्चा करता करता कधी गड पादाक्रांत केला ते कळलच नाही.
ते आणि मी आता गड फिरण्यास सुरवात करायचं ठरवलं. भोराई मंदिराच्या बाहेर आलो. तर समोरच काही पाषाणी स्तंभ दिसले खाली चौकोनी व वरती गोलाकार घुमटी अशा जवळ जवळ ३० ते पस्तीस स्तंभ दिसले
वीरगळी
आम्हाला जास्त काही माहित नसल्याने आम्ही बळवंतराव दळवी यांना प्रश्न केला हे काय आहे तर त्यांनी या वीरगळी आसल्याच सांगितलं. आम्ही त्याला वळसा टाकून आता गडाच्या चोर वाटेकडे वळलो.
शिवरायांच्या प्रत्येक गडावर बिकट प्रसंगी गडावरून निसटून जाण्यासाठी केलेली सोय म्हणजे चोरवाट. आपण याला चोरवाट म्हणतो पण खरे नाव काही वेगळेच असू शकते. आम्ही ती चोरवाट अगदी जवळून पाहिली काही मुले तर आत प्रवेश करून किल्ल्याच्या तटबंदी बाहेर हि कस जायचं याच प्रत्याशिक करूनच बाहेर आली.
आता सामोर भल मोठ पाठार आणि चहु बाजूंनी पसरलेला सह्याद्री त्याची शिखर जणू आकाशाशी स्पर्धाच करत होती. ते सह्याद्रीच पहाडी सौंदर्य पाहून मन अगदी भरून आलं होतं अस वाटत होतं कि हा सह्याद्रीचा संग कधी सुटूच नये. या पठारावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा घनगड, कोरीगड, तैलबैल्या दिसतो.
पठारावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा घनगड, तैलबैल्या दिसतो.
सह्याद्रीच हे निसर्गसौंदर्य पाहताना मन आगदी थक्क झालं दळवी साहेबांकडून आणि आजूबाजूच्या दिसणाऱ्या सह्याद्रीच्या कड्यांची माहिती घेत होतो, घनगड, कोरीगड, तैलबैल्या अशा कड्यांची त्यांनी आम्हाला ओळख करून दिली. वरील चित्रात उजव्याबाजूला एक तटबंदी दिसतेय हे बांधकाम कौशल्य पाहून मन थक्क होतेच त्याच बरोबर मनाला बरेचसे प्रश्न पडतात. इतक्या उंचावर आणि ते हि या निसटत्या कड्यावर जिथे माणूस उभाही राहू शकत नाही अशा ठिकाणी हि काळ्या अवजड दगडाची पाषाणी तटबंदी बांधणे म्हणजे खूपच जोखमीचे काम. प्रसंगी प्राणही गमवावे लागेल असेच, अशा ठिकाणी बांधकाम करणे कसे काय शक्य आहे?
हे तेंव्हाच शक्य होईल !
जेंव्हा स्वराज्याचे वेड लागेल
स्वधर्मावर परकीय आक्रमण होईल
शिवरायांचे हे मावळे लाखांना का भारी होते… याची प्रचीती हे बांधकाम पाहताना आली
हि तटबंदी सुधागडाच्या संरक्षणासाठी आहे.
थोडं मध्यावर आल्यावर एक वाडा दिसला. पण आम्हाला काहीच याबद्दल माहीत न्हवत, बळवंतराव दळवी यांनी आम्हाला या वाड्याविषयी माहिती सांगण्यास सुरवात केली.
सुधागड किल्ल्यावर असणारा पंत सचिवांचा सरकारवाडा हा इ.स. १७०५ साली बांधला
सुधागड किल्ल्यावर असणारा पंत सचिवांचा सरकारवाडा हा इ.स. १७०५ साली बांधला आहे. आजूनही वाडा थोड्याफार मजबून अवस्थेत आहे चौसोपी आकाराच्या या मजबूत व भव्य वाड्याची आम्ही पाहणी सुरु केली.
वाड्याला दोन दरवाजे असून ऐसपैस ओटा आहे. जुने बांधकाम पाहण्यास मिळालं या वाड्याला दोन बंद खोल्या आणि एक माडी आहे. त्यापैकी एका खोलीत भांडी असून ती आपल्याला स्वयंपाक करण्यास वापरतात. एक खोली बंद असून त्यामध्ये विश्वस्त मंडळाचे सामान ठेवलेले असते. काही कार्यक्रम अथवा सण असल्यास ती वापरात येते.वाड्याच्या आंगणात पाणी ठेवण्यासाठी एक रांजण बनविलेल दिसतं तसेच मसाला व इतर काही वाटण्यासाठी एक दगडी पाषाणी वरवटा दिसला वाड्यात अजूनही खूप चांगली स्वच्छता ठेवण्यात आली आहे. संपूर्ण ओटा हा शेणाने सारवण्यात आला होता.
खूप खूप फिरल्यावर आता तहान लागली होती. मग आम्ही पिण्याच्या पाण्याच्या टाक्याच्या दिशेने चालू लागलो. तीन टाकी दिसली दगडी पाषाणात कोरलेली अर्धवट पाण्याने भरलेली हि टाकी पाहून एक आश्चर्य वाटले कि इतक्या उंचावर हे पाणी कसे काय? हाच प्रश्न मनाला पडत होता पाहतो ते सर्वच नवल होत. गडावर अजूनही काही पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. टकमक टोक, शिव मंदिर, बांधीव टाकी, पूर्वेकडील बुरुज, गोमुख असलेलेर टोक, विशाल कोठारे संपूर्ण सुधागड एक परिपूर्णतेच प्रतिक वाटतो. सपाट पठार व त्यावरील असणारी तलाव हे पाहून निसर्गाच एक वरदान त्या दुर्ग दुर्गेश्वाराला लाभलेलं दिसून आलं.
आता आम्ही परतीच्या प्रवासाचा विचार करू लागलो. गडावरून पुन्हा परतावं अस वाटतच न्हवत पण गडावरून उतरणे खूप महत्वाच होत आमच्या सोबत लहान लहान मुले होती. त्यात एक वृद्ध आजी होती आणि गड फिरता फिरता दुपारचे १.४५ वाजले होते. थोड्याच वेळात घड्याळात दोनच ठोका पडणार होता. पोटात तहान आणि भुकेने आता शरीराला थकवा जाणवत होता आणि पुन्हा खाली उतरून गावापर्यंत जाणे म्हणजे अजून दोन तासांचा थरारक प्रवास याचा विचार करून आम्ही गड उतरयला सुरवात केली.
महादरवाजा
पुन्हा महादरवाजा जवळ आलो. आता सुधागडाचा निरोप घ्यायची वेळ आली पुन्हा मागे वळून महादरवाजाकडे पाहिलं आणि मनात विचार आला. काय माहित पुन्हा येईन कि नाही. आणि नकळत हात जोडले गेले शेवटच दर्शन सुधागडचे घेवून पाठ फिरवली. आणि पुन्हा त्या दगड धोंड्याच्या आणि भयान जंगलाच्या सुधागडाच्या कुशीतल्या वेड्या वाकड्या वळणा वळणाच्या जीर्ण झालेल्या पण एक वेगळाच गारवा देणाऱ्या वाटेतून परतीचा प्रवास सुरु केला.
शिव दुर्गप्रेमी बळवंतराव दळवी साहेबांच्या अनुभवाचा या मोहिमेला चांगलाच फायदा झाला. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. संपूर्ण स्वराज्य मित्र मंडळ विलेपार्ले यांच्या मनात शिवप्रेम जागे करण्याचे महान कार्य हातून घडले.
ही मोहीम कशासाठी होती –
शिवरायांचा इतिहास त्यांचा पराक्रम आताची तरुण पिढी विसरत चाललीय. त्यांच्या मनात, रक्तात शिवराय आणि शिवप्रेम फुलाव, शिवरायांचा पराक्रम. त्याचं शौर्य, त्यांची नीती, विचारधारा, त्यांचे संस्कार या मुलांच्या मनावर घडावेत म्हणून हि मोहीम राबवण्यात आली होती. या मिहीमेला उत्पुर्त प्रतिसाद देवून स्वराज्य मित्र मंडळ विलेपार्ले यांनी एक आदर्शवत मोहीम राबवली.
प्रवास वर्णन-
लेखक/ कवी – गणेश पावले.
९६१९९४३६३७
काही क्षणचित्रे –
वरून दिसणारा पायथा
या उत्तुंग सह्याद्री सोबत एक फोटो काढायचा मोह आवरू शकलो नाही
या मुलांना किल्ला आणि इतिहास सांगताना खूप काही शिकायला आणि शिकवायला मिळाले
प्रवास वर्णन-
लेखक/ कवी – गणेश पावले.
९६१९९४३६३७
प्रतिक्रिया
21 May 2015 - 2:01 pm | वेल्लाभट
सहीच ! सुपर.
21 May 2015 - 2:08 pm | अत्रुप्त आत्मा
खास!
21 May 2015 - 2:12 pm | प्रचेतस
तुम्ही दिलेल्या फोटोतील शिळा ही वीरगळ नसून थडं आहे.
सुधागडावर याव्यतिरिक्त वीरगळ आणि सतीशिळा देखील आहेत.
21 May 2015 - 3:33 pm | स्वच्छंदी_मनोज
वल्ली + १.
.. त्या मारुतीला बाजारपेठ मारुती म्हणतात.. जेव्हा गड नांदता होता तेव्हा इथे गडाखालचे परवानगीचे मेट होते आणी त्या मेटाच्या आजूबाजूला थोडीफार बाजारपेठ होती म्हणून हा बाजारपेठ मारूती :)
आतापर्यंत सुधागडला अनेक वेळा गेलोय तरी मनाचे समाधान होत नाही.. अनेक घाटवाटा आणी ठाणाळे आणी खडसांबळे लेण्या ह्याच्या संरक्षणाच्या उद्देशाने इ.स. पुर्वीची बांधणी असलेला हा किल्ला म्हणजे कुठल्याही ऋतूत मस्तच असतो..हा परीसर माझ्या खास आवडीचा असल्याने घाटवाटांच्या निमित्ताने ह्या परीसरात अनेक वेळा ट्रेक्स झालेत. ह्या एरीयात असलेल्या (म्हणजे मला माहीत असलेल्या) भोरप्याची नाळ आणी गुटक्याची वाट एवढे सोडले तर सगळ्या घाटवाटा झालेल्या आहेत.
रच्याकने.. फार पुर्वी (अगदी फार नव्हे पण ८-१० वर्षांपुर्वी) गडावर कधीही गेले की एक निरव शांतता असायची, आपन आणी फक्त आपणच, असे असल्यावर जो आनंद मिळायचा तो हल्ली नाहीसा झालाय, गेल्यावर्षी गेलो होतो तेव्हा तिथला बाजारीपणा, गर्दी, गोंगाट बघून परत आता जावेसे वाटत नाही :(
अवांतर : त्या परीसरातल्या खडसांबळे लेण्यांवरती मी एक लेख लिहीला होता, त्याची झैरात :) - http://www.misalpav.com/node/29976
21 May 2015 - 3:42 pm | गणेशा
छान वर्णन आणि सफर
21 May 2015 - 3:52 pm | कंजूस
फोटो चांगले आहेत.वरचे दोन तलाव ,पाण्याची तीन टाकंआणि पडकी कोठारे यांचेही फोटो असले तर टाका.
22 May 2015 - 4:39 pm | उमा @ मिपा
चांगलं लिहिलंय.
५ वर्षाच्या मुलीपासून ते ६५ वर्षांच्या आजीपर्यंत … तुम्हा सर्वांच्या उत्साहाला __/\__
22 May 2015 - 5:10 pm | अजया
तुमचं शिवदुर्गप्रेम जाणवतंय लेखातुन.गडावर गेल्यावर वाटणारे भारावलेपण,वेगळेच.त्याचा अनुभव तुम्ही घेतलात आणि इथे सगळ्यांना तो लेखाद्वारे पोचवलात.धन्यवाद!
23 May 2015 - 10:51 am | पैसा
छान लिहिलंय. अजून लिहा.
कोणीतरी माहीतगार माणसांनी सांगा, शिवाजी महाराजांनी भोरप्याच्या डोंगरावर किल्ला बांधला तो म्हणजे प्रतापगड असं शाळेच्या पुस्तकातही वाचलेलं आहे. भोरप्याचे डोंगर दोन आहेत का?
23 May 2015 - 11:05 am | प्रचेतस
भोरप्याचा डोंगरावर बांधलेला किल्ला म्हणजे प्रतापगड. तर सुधागड हा प्राचीन किल्ला होता. त्याचे पूर्वीचे नाव भोरपगड. प्राचीन टाकी, खोदीव गुहा ह्या आजही तेथे दिसतात. महाराजांनी ह्या टेहळ्या दुर्गाला तटाबुरुजांचा साज चढवून अधिकच देखणे आणि भक्कम बनवले व् सुधागड नाव दिल्हे.
25 May 2015 - 1:16 pm | पाटील हो
फोटो आणि वर्णन दोनी भारी
25 May 2015 - 1:24 pm | एक एकटा एकटाच
छान लिहिलय
फ़ोटो ही उत्तम