नमस्कार,
आम्ही २ वर्षापुर्वी पुण्यात एक २ बीएचके घेतला होता. घर घेताना अर्थातच बिल्डरच्या फायद्यासाठीच लिहील्या गेलेल्या, अत्यंत एकतर्फी अॅग्रीमेंट्वर सह्याही केल्या होत्या. तेव्हा आपल्याला घर विकुन बिल्डरनेच आपल्यावर अनंत उपकार केले आहेत की काय अशी शंका यावी इतक्या अटी होत्या. आजुबाजुला माहिती काढली असता अॅग्रीमेंट् अशीच असतात असे समजले आणि मग बाकी घराचा प्लान वगैरे चांगला असल्याने व्यवहार करुन टाकला.
त्या अॅग्रीमेंट्मधील काही अटी साधारण अशा:-
१. बिल्डिंगच्या आजुबाजुचा मोकळा भाग (पार्किंगच्या बाजुने असतो तो जायचा यायचा रस्ता), इमारतीमागील बाग आणि मायनस मधले पार्किंगला जाण्या येण्याचा मार्ग हे प्रमोटर कडे राहतील.
२. इमारतीसमोर बरीच मोकळी जागा आहे. तिथे एक शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधणार असं आधीच सांगितलं होतं. तर त्याच्या बांधकामात आम्ही कोणताहि अडथळा आणणार नाही. आणि नियम १ मध्ये सांगितलेल्या सर्व जागा ह्या कॉम्प्लेक्स सोबत कॉमन असतील.
आमच्या इमारती समोर रस्ता रुंदीकरण झाल्याने वाढीव एफ.एस.आय मिळत असल्याने हे बांधकाम अजुन सुरु नाही. पण आता सुरु होईल. मागच्या २ वर्षात अनेकदा मागे लागुनही बिल्डर सोसायटी करुन देत नाही. आणि समोरच्या बांधकामासोबत एकत्र सोसायटी करु म्हणे. आम्हाला तसे नको आहे. तर आम्ही आमची सोसायटी फॉर्म करु शकतो का? तसे केल्यास "मी सह्या करणार नाही" असं बिल्डरने सरळ सरळ सांगितलं आहे.
आता म्हणे एक पत्र त्याने पाठवले आहे ज्यात वर दिलेल्या अटी परत लिहील्या आहेत आणि आमची हरकत नाही म्हणुन सह्या करायला पाठवले आहे. जरी आधी अॅग्रीमेंट् मध्ये आम्ही सह्या केल्या असल्या तरी
१. असे मान्य केल्याने आमची सिक्युरिटी धोक्यात येत आहे.
२. मायनस फ्लोअर मधुन पायर्यांनी कुणीही सरळ आमच्या बिल्डींग मध्ये घुसु शकेल. शिवाय मायनसला ठेवलेल्या गाड्यांची सुरक्षितताही धोक्यात येते आहे.
तर आम्ही ह्याला विरोध करु शकतो का?
आम्ही केलेल्या अॅग्रीमेंट्मध्ये मॅजेस्टिक गेट वगैरे बाबींचाही समावेश होता जे अजुन बिल्डरने करुन दिलेले नाही. एकदा मीटींग झाली होती त्यात तो म्हणे की समोरचे कॉम्प्लेक्स बांधुन झालं की त्यात मी ते करेन. पण नक्की कसे होईल ते माहिती नाही..
प्लान प्रमाणे त्याने पार्किंगमध्ये थोडा बदल केल्याने (पैसे वाचवायला बहुदा) आता लिफ्ट लॉबीच्या चहु बाजुंनी पार्किंग आले आहेत. जर सर्वांनी आपापल्या पर्किंग मध्ये गाड्या लावल्या तर मेन गेट मधुन लिफ्ट लॉबी पर्यंत यायला वाट नाही. ह्याचा विरोध करुनही अजुन त्यावर उपाय नाही.
सोसायटी करुन देतो म्हणूनही ह्यावर अजुन काहीच हालचाल नाही.
हे सर्व अॅग्रीमेंट् मधील अटींचे उल्लघंन आहे का? आम्ही ह्यावर निश्चित कारवाई कशी करु शकतो?
ग्राहक मंच ह्याबाबत कशी मदत करु शकते?
प्रतिक्रिया
15 May 2015 - 1:26 pm | खेडूत
बिल्डरने महागडा वकील आधीच ठेवलेला असतो - सर्व प्रोजेक्ट्सचं तो एकत्र निस्तरतो .
एखादे घर स्थानिक उपद्रवी सज्जनाला दिलेले असते.
तुम्हाला त्या केसेस घेणारे वकील आणि ग्राहक पंचायत- यातून मार्ग काढून देतील.
असे वकील पहिले आहेत की केस तुमची घेतील अन आतून बिल्डरला विकले जातील!
भारतात पैसेवाल्याना अधिक न्याय मिळाल्याची उदाहरणे सर्वत्र दिसतात.
म्हणून या बाबतीत करार करण्यापूर्वी विचार करावा लागतो. एका वकिलाकडून तपासून मग घर घ्यायचं का नाही ठरवावे.
हा झाला नकारात्मक भाग.
पण समूहाची शक्ती असतेच. एकत्रित ५०-६० जण प्रयत्न कराल तर उपयोग होऊ शकतो!
15 May 2015 - 1:29 pm | टवाळ कार्टा
म्हणजे कै? जरा डिट्टेल मध्ये लिहिता का?
15 May 2015 - 1:48 pm | खेडूत
घर घेण्यापूर्वी बिल्डर गोड बोलत असतो. त्या काळात ड्राफ्ट करार बघायला देतो. तो विश्वासू वकिलाला दाखवायचा. धोक्याची कलमे माहित करून घ्यायची.
सह्या करायच्या ठिकाणी मंडई भरलेली असते. सगळा करार पहायला वेळ दिला जात नाही. तेव्हा महत्वाची कलमे तरी पाहून घ्यावीत - तसेच बघायला दिलेला आणि सही करायचा करार तोच आहे याची खात्री करावी. ( म्हणजे समजा पृष्ठ १४/३१/४० वरचे काही डीटेल्स लक्षात ठेवून तपासणे इ. )
मला सुदैवाने दोन्ही वेळा चांगले बिल्डर्स मिळाले!
15 May 2015 - 1:49 pm | पगला गजोधर
अश्या परिस्थितीत तुम्हा सर्व सभासदांची एकी महत्वाची, तुम्हाला पजेशन लेटर, ओ सी (मनापा) कडून मिळाले आहे का ?
एका चांगल्या वकिलाच्या सल्ल्याने तुम्ही सर्व एकीने सोसायटी स्थापण करू शकता (चू भू दे घे ), मिपावरील कायद्याचे जाणकार प्रकाश टाकतीलच… असो तुमच्या कडच्या जमेच्या बाजू दोन आहेत १. प्रत्यक्ष ताबा २. सभासदातील एकी …
15 May 2015 - 2:03 pm | पिलीयन रायडर
तशी कागदपत्र क्लिअर आहेत. कम्प्लिशन सर्टीफिकेट आणि पझेशन लेटर मिळालेले आहे.
बिल्डर माणुस वाईट नसुन बेरकी आहे. तो स्वतःचा सर्वात जास्त फायदा करायला बघणार हे तर सरळ आहे..
सभासदांची एकी हा खर कळीचा मुद्दा आहे. सोसायटीची कामे म्हण्जे बिनपगारी फुल अधिकारी असतात. कुणाचा कुणाला पायपोस नाही.. कुणाला निवडुन न दिल्याने ऑथरीटी नाही. त्यामुळे कुणी निर्णय घेत नाही. सावळा गोंधळ आहे खरा. ही कामे आउट्सोर्स करता येतात का? तसे करावे का?
15 May 2015 - 2:20 pm | पगला गजोधर
एकदम बरोबर…….
"तसे करतात का / तशी सर्विस उपलब्ध आहे का ?", या बद्दल काही माहिती नाही, पण हे म्हणजे तैनाती फौज स्वीकारण्या सारखे होईल. बिल्डरला जास्ती काही करावे लागणार नाही, सभासदात फुट टाकली की त्याचे काम होते (मत भूल … डीवाइड अंड रूल !)
कोणीतरी पुढाकार घेऊनच अशी कामे करायला लागतात ! (तुमच्या सोसायटीत शासकीय विभागातून (कोर्ट/रेल्वे/महसूल/सहकार/शिक्षक/बँक ) निवृत्त झालेले जेष्ठ नागरिक असतील, तर त्यांची अमुल्य मदत अश्या पुढाकाराच्या कामात होतेच होते …. )
कागदपत्रे क्लियर आहे त्यामुळे, तुम्हा सर्वाना एकीने सोसायटी स्थापायला शक्य आहे असे वाटते ! (चू भू दे घे, जा प्र टा …. )
16 May 2015 - 9:47 am | पगला गजोधर
तुम्ही सर्वांनी आपापले सेल-डीड करून घेतले असेलच त्याच्याकडून .... नुसते अग्रीमेंट नव्हे...खूप महत्व आहे त्याला...
15 May 2015 - 3:02 pm | काळा पहाड
असं बिल्डर लोकांबद्दल सहानूभूतीनं वागू नये. बिल्डर हा वाईट'च' असतो. रस्त्यावर मरताना दिसला तरी बिल्डरला पाणी पाजू नये.
हो. पण त्यापेक्षा सोसायटीतले कुठलेतरी एक उत्साही रिटायर्ड आजोबा पकडा. त्यांना पगार द्या आणि ते जास्त चांगलं होईल कारण त्यांचा पण त्यात इंटरेस्ट असेल.
15 May 2015 - 2:30 pm | झकासराव
सोसायटी फॉर्मेशन करु शकतो स्वतः
असे वकील लोकं असतात जे फॉर्मेशन करुन देतील.
साधारण रेट पर मेम्बर ५००० पर्यंत आम्हाला सांगितला होता.
पण आमच्या लोकांमध्ये एकी असल्याने (आणि उपद्रवी लोकाना ह्या कामात सहभागी करुन घेतल्याने) बार्गेन करु शकलो.
३००० एका सभासदाचे ह्या हिशेबात फॉर्मेशन झाले.
बिल्डर कडुन काहि डोक्युमेन्ट्स लागत असणारच नक्की. ती कशी मिळवायची ह्यासाठी तोच वकील सल्ला देउ शकेल.
15 May 2015 - 2:39 pm | द-बाहुबली
हो. ६०% लोकांचे इंडेक्स २ तयार असतील तर बिल्डरला सोसायटी निर्माण करणे रोखता येणार नाही. चांगला वकिल गाठा.
एकदा सोसायटी झाली तिच्या एनोसी शिवाय बिल्डरला फार काही करता येणार नाही. लक्षात घ्या हा वाढीव एफेसाय सोसायटीला मिळतो.
तुम्ही घाइ करुन स्वतंत्र सोसायटी निर्माण केलीत तर हा वाढीव एफेसाय वापरायला बिलडरला तुमच्या सोसायटीला पैसे द्यावे लागतील( माझा ६th सेन्स सांगतो किमान ९० लाख रुपये, जे तुमच्या सोसायटीच्या हक्काचे असतील) हे वाचवायला तो एकत्रीत सोसाय्टी करायच्या मागे आहे. आणखी कोणतेही कारण एकत्रीकरणामागे नाही.
हो का ? बघुन घेउ.
चांगला वकिल त्वरीत गाठा.
- मी वकील नाही.
15 May 2015 - 6:23 pm | रेवती
चांगला वकील त्वरित गाठण्याशी सहमत पण तोच वकील बिल्डरकडून खरेदी केला जाऊ शकतो, त्यावेळी धक्का बसवून घेऊ नका, आमच्यायेथेही नुकतेच घडले आहे. ऐनवेळी बिल्डिंगमधील बरेच सदस्य जौ दे ना! म्हणत बाजूला सरण्याची शक्यता ध्यानात घ्या.
15 May 2015 - 11:35 pm | द-बाहुबली
हाहाहा. एक बॅकप वकिल हवाच :) मुळात बिल्डरला अशा सेटींगला वेळ मिळु न देणे महत्वाचे.
तसेच सोसायटी हा प्रकार सहकार खात्यात मोडत असल्याने एखादी जेष्ठ व्यक्ती जीने कधी जिल्हा सहकारी बॅंक, कारखाना, दुध संघ तत्सम ठीकाणी काम केले असेल तीची सोबत, सल्ला, मार्गदर्शन मिळाले ( त्यांची ओळख कामी येणे या द्रुष्टीकोनातुन) तर अजुन उत्तम.
15 May 2015 - 2:52 pm | अत्रन्गि पाउस
सोसायटी व्हायला एवढा त्रास तर मग कन्व्हेयन्स ला काय होईल ??
आमच्या सोसायटीला १३ वर्षे झाली तरी कन्व्हेयन्सच्या नावाने बोंब आहे ...
Fools build houses and wise stay in them हे कधी कधी खरे वाटते ...
15 May 2015 - 2:57 pm | काळा पहाड
१. बर्याच लोकांना ११ लोकांना बरोबर घेवून सोसायटी स्थापन करता येते (बिल्डर च्या संमती शिवाय) याची माहितीच नसते. तुम्ही ग्राहक पंचायती बरोबर संपर्क साधा.
२. सगळे फ्लॅटधारक बरोबर घेवून तुमच्या नगरसेवकां बरोबर संपर्क साधा. आजूबाजूच्या सोसायटीच्या चेअरमन ना सोबत घेवून हे काम करता आलं तर बघा. जमल्यास आमदारांशीही संपर्क साधा.
३. तुम्ही लिहिलंय की
ज्यावेळी सोसायटी फॉर्म होईल त्यावेळी फ्लॅटचा बिल्ट अप एरिया सोसायटी हॅन्ड ओव्हर करावा लागेल. हे भाग बिल्ट अप चा भाग आहेत का? जर असतील तर बिल्डर बिल्ट अप एरिया च्या काही भागावर अनधिकृत रित्या ताबा ठेवतोय. तेव्हा जरी तुम्ही हे सही केलेलं असेल तरी हे कोर्टात बिल्डर विरूद्ध जावू शकतं.
तुम्ही कुठल्याही पत्रावर उगीचच सही करू नये. आधी तुमच्या वकीलाला दाखवा.
ता.क. जनरली बिल्डर लोकांबाबत 'दिसला तर ठेचा' हे धोरण योग्य. पण कायद्याचं राज्य वगैरे काहीतरी असल्यानं तसं करता पण येत नाही. पण फक्त एक सांगतो. लोक ५० हजार रुपयांसाठी काहीही करायला तयार होतात. तुमचे तर सर्वांचे मिळून कित्येक शेकडो करोड घामाचे पैसे पणाला लागले आहेत. 'जंटलमन लोकांनी' व्हायोलंट झाल्याशिवाय भारत सुधारणार नाही.
15 May 2015 - 6:42 pm | बबन ताम्बे
सामान्य माणसाला शक्य नाही हो हे. चेह-यावर गुर्मी आणि पैशाचा माज. आमच्या बिल्डरने बेसमेंटमधे जिथे जागा असेल तिथे पार्किन्ग करून विकलीत. बरं बुक करताना कागदावर काही कळत नाही की कार पार्किन्ग करायला प्रॉब्लेम येणार आहे. फ्लॅटचा ताबा घेतल्या नंतर कार लावताना लक्षात आले बाजूच्या दोन पिलरमुळे खूप मागे पुढे करायला लागतेय. पहील्यांदा तर कार घासलीच. तसाच बिल्डरच्या ऑफीसमधे गेलो तक्रार घेऊन, तर त्या माजोरड्याने हात वर केले. काय तर म्हणे आता पार्किंग बदलून मिळणार नाही. वर म्हणतो की मी स्वतः माझी मोठी गाडी लावून बघीतली आहे. त्याला म्हटले की चल लावून दाखव, तर प्रचंड उर्मटपणे बोलायला लागला.
15 May 2015 - 3:20 pm | गणेशा
ह्याबद्दल जास्त माहिती नाही... पण बॉमकेश म्हणतात तसेच वाटले मला पण.
माझा ही के घराच्या ७/१२ बद्दल प्रश्न आहे ( बिल्डर सहि देत नाही, अजुन) परंतु तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळाल्यावर निवांत विचारतो...
15 May 2015 - 4:47 pm | पिलीयन रायडर
विचारा हो..
महत्वाचा मुद्दा आहे हा..
15 May 2015 - 4:50 pm | पिलीयन रायडर
सगळ्यांच्या प्रतिसादातुन कळलेल्या गोष्टी
१. सभासदांची एकी महत्वाची
२. ६०% जनता एकत्र येऊन सोसायटी फॉर्म करु शकते.
३. वाढीव एफ.एस.आय सोसायटीला मिळेल (सध्याच्या इमारतीला की नवीन बांधायची आहे समोर तिला? कारण शेवटी प्लॉट एकच आहे ना?)
थोडक्यात तातडीने सोसायटी फॉर्म करावी.
कन्व्हेयन्स डीडला बिल्डर काय ताप देऊ शकतो?
15 May 2015 - 4:51 pm | पिलीयन रायडर
आणि हो..
ह्या संदर्भात जे काही कायदे आहेत ते कुठे मिळतील?
(संपादन गेलं काय?)
15 May 2015 - 11:24 pm | द-बाहुबली
आत्ता सोसायटी अस्तित्वात आहे का ? अर्थातच नाही.
सध्य स्थितीमधे फक्त आपल्या बिल्डींग्ज व रीकामी जागा इतकेच आहे.
एफ.एस.आय सोसायटीला मिळणार आहे. म्हणून सर्वप्रथम ती फॉर्म करावी लागेल. म्हणजेच सध्य स्थितीमधे प्रोजेक्टमधे अधिकृत इनक्लुड केलेल्या बांधलेल्या व रिकाम्या जागा यात अंतर्भुत होतिल. याबरोबरच आपणास वाढीव एफ.एस.आय सुधा मिळेल/ लागु होइल. पण कदाचीत आपल्या बिल्डींगचे स्ट्रक्चर अजुन मजले चढवण्यासाठी योग्य नसेल अथवा आपली(सोसाय्टीची) इछ्चा नसेल म्हणून वा इतर कोणत्याही कारणाने आपण मिळालेला एफ.एस.आय वापरणार नाही. अशा वेळी तो आपणास (सोसाय्टीला) कोणत्याही बिल्डरला विकता येउ शकतो.
आता बिल्डरला हा एफ.एस.आय वापरायचा आहे ( जे सोसायटी केल्या शिवाय शक्य नाही). पण त्याचे पैसे सोसायटीला मात्र द्यायची इछ्चा नाहीये म्हणून तो शॉर्टकट काय काढत आहे, तर त्याचे नवीन बांधकाम याच सोसायटीमधे इनक्लुड करायचा प्रयत्न करत आहे (एकत्रीकरण) जेणे करुन आपल्या सोसायटीला मिळालेला एफ.एस.आय त्याला आपोआप (फुकटच) वापरता येइल.
पण आपण त्वरा करुन एकदा का सोसायटी बनवलीत तर सोसाय्टीच्या आवारातील रिकाम्या अथवा कोणत्याही जागी बांधकाम करायला (सोसायटी प्लान/ प्रोजेक्ट ब्लुप्रिंट बघावी)त्याला सोसायटीची परवानगी काहीही झाले*** तरी घ्यावीच लागेल. ज्यासाठी त्याच्या कडुन वाढीव एफ.एस.आय ची रक्क्म मोबदला म्हणून घेउ शकता. नाहीतर सरळ हा एफ.एस.आय सोसायटी दुसर्या कोणत्याही बिल्डरला विकुन तितकाच पैसा उभा करु शकेल. व मग मात्र आपल्या बिल्डरला तेथे काहीही लुडबुड करता येणार नाही.
बिल्डरला हे सर्व टाळायचे असल्याने तो तुमची स्वतंत्र सोसायटी उभी करु देत नाही असे सकृत दर्शनी स्पष्ट दिसत आहे.
*** मी आपले अॅग्रीमेंट प्रत्यक्ष वाचलेले नसल्याने वरील वाक्य ९९% निसंधीग्ध धरावे १००% नाही. तरीही एकदा सोसायटी झाली तर काहीही उपद्व्याप करायला बिल्डरला सोसायटीची परवानगी नेहमी घ्यावीच लागेलच असे माझा कॉमनसेन्स सांगतो. बाकी हे सर्व व्यवहारज्ञानाचे बोल आहेत. आपण या मुद्यांवर वकिलाशी चर्चा करणेच श्रेयस्कर.
15 May 2015 - 11:27 pm | द-बाहुबली
आणी हो बिल्डरला मिळालेला एफ.एस.आय तो त्याला हव्या त्या प्रोजेक्टमधे वापरु शकतो. काही नियम व अटी आहेत पण त्या अजिबात जाचक वगैरे नाहीत.
15 May 2015 - 5:10 pm | नूतन सावंत
उपनिबंधक ,सहकार यांच्या कार्यालयात किंवा शासकीय प्रेस मध्ये चौकशी करावी.
15 May 2015 - 5:13 pm | सनईचौघडा
रोजच्या म. टा. पेपर मध्ये एका ठाण्याचे वकिलांना सोसायटी संदर्भात ग्राहाकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यानी दिलेली उत्तरे कधी भविष्यात गरज लागेल म्हणुन मी काळजी पुर्वक जपुन ठेवली आहे. म्हणुन जसे मला सापडेल तसे इथे ड्कवत जाईन.
जर मालक सोसायटी बनवुन देत नसेल तर मिळालेले उत्तर
"
संबंधित नियमांअनुसार नवीन बांधकाम झालेल्या इमारतीत ' सोसायटी ', ' कान्डोमिनियम ' किंवा कंपनी स्थापन करणे हा फ्लॅट खरेदी करणाऱ्यांचा ' हक्क आहे. कायदेशीररीत्या अशी संस्था अस्तित्वात आणणे ही बिल्डर/प्रमोटरची जबाबदारी आहे. बिल्डर/प्रमोटर कायद्याने बंधनकारक असलेले त्याचे कर्तव्य पार पाडत नसेल तर फ्लॅट खरेदीदारांना आपल्या सोयीप्रमाणे ' सोसायटी ', ' कान्डोमिनियम ' किंवा कंपनी स्थापन करण्याचा कायदेशीर हक्क आहे. ' सोसायटी ', ' कान्डोमिनियम ' किंवा कंपनीच्या स्थापनेचा जमिनीच्या मालकीशी काही संबंध नाही आणि जमिनीचा (भूखंडाचा) मालक कोणीही असला तरी ते करता येते. मी अशी ठाम शिफारस करीन की सर्व फ्लॅट खरेदीदारांनी ( ' युनिट पर्चेसर्स ') एकत्र येऊन ' सोसायटी ', ' कान्डोमिनियम' किंवा कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करावी. "
15 May 2015 - 5:15 pm | पिलीयन रायडर
हे कधीच्या मटा मध्ये आले आहे? तो पेपर शोधुन कात्रण लावते बोर्डावर सोसायटी मध्ये..
15 May 2015 - 5:27 pm | रुस्तम
http://maharashtratimes.indiatimes.com/-/articleshow/21542675.cms
15 May 2015 - 5:15 pm | झकास
Visit https://sahakarayukta.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx
Menu -> डाउनलोड -> गृहनिर्माण पुस्तिका
ह्यात २ pdf दिसतील. पैकी housing manual २०१२ पहा.
ajoon outdated झालं नसावं.
15 May 2015 - 5:35 pm | पिलीयन रायडर
अत्यंत उपयुक्त साईट -
https://sahakarayukta.maharashtra.gov.in/Site/Information/ListingUploadO...
इथे ते दोन मॅन्युअल्स आहेत.
15 May 2015 - 5:17 pm | सनईचौघडा
ते माहीत माहित नाही पिरातै पण मी त्याची एक एक्सेल शीट बनवुन ठेवली आहे. घरी जावुन बघतो.
धन्यवाद.
15 May 2015 - 5:23 pm | पिलीयन रायडर
http://maharashtratimes.indiatimes.com/-/articleshow/21542675.cms
सापडलं इथे!
15 May 2015 - 5:46 pm | पगला गजोधर
"सहकारी गृहनिर्माण संस्था समस्या आणि उपाय" व यासारखी सेल्फ-हेल्प पुस्तके मिळू शकतात.....
15 May 2015 - 6:05 pm | माम्लेदारचा पन्खा
https://sahakarayukta.maharashtra.gov.in/1135/Housing-Manual?Doctype=964...
ही लिंक पहा... यावरील हाऊसिंग मन्युअल मधून बर्याच शंकांचे निरसन होईल.....
15 May 2015 - 6:42 pm | रेवती
बिल्डर म्हणू नये चांगला आणि फ्ल्याट म्हणू नये आपला ही नव्या काळाची म्हण आहे. ;)
पुण्यातील आमच्या सोसायटीचे काम आउटसोर्स केले आहे. दोन वयस्कांकडे सोपवले होते पण ते वारल्यानंतर आमच्यासाराखे तिथे रहात नसलेले व धावपळ करणारेच जास्त असल्याने कामासाठी कोणी उपलब्ध नाही. एकजण तर अचानक वारले त्यमुळे मध्यंतरी फार पंचाईत झाली होती.
मग एका नवीन गरजू सीए फर्मला काम सोपवले आहे व सोसायटीतील एक काकू ज्या घरच्या जबाबदार्यांमधून मोकळ्या झाल्यात, त्या कामे बघतात. वर एका प्रतिसादात म्ह्टल्याप्रमाणे बिल्डरने एक दुर्जन कुटुंब पेरले आहे. रेसिडेन्शियल भागासमोरच जी दुकाने बांधतात त्यात त्या मनुष्याचे दुकान आहे, त्याचे घर मात्र नव्हते. त्याने एक फ्लॅट जवळ्जवळ २० वर्षांनी विकत घेतला कारण आता एफ एस आय वाढीव मिळालाय व घरे मोठ्या आकाराची होणार म्हणून व सगळी सूत्रे हातात घेतली. व्यवहारात अनेकांचे शिव्याशाप घेतले मग एकेदिवशी खरेच रक्ताच्या उलट्या होऊन हॉस्पिटलात गेल्यावर त्या काकूंकडे जबाबदारी आपोआप आली. त्या अजून तरी खूप चांगल्या आहेत.
15 May 2015 - 9:04 pm | कंजूस
टका सौ टका बरोबर बोललेत. मी स्वत: ८५ साली वकील केला होता अॅग्रिमेंट बघण्यासाठी .त्यांनी सांगितले अर्धा टक्का फी चेकने घेतो .चारपाच जागांचे पाहू. मी जागा पाहून आवडल्यावर भेटत असे .आता तुमच्या केसमध्ये वर दिलेले अभिप्राय बरोबर आहेत. शेवटी शंभरेक सभासदांचे एकमत होत नाही.शुभेच्छा.
16 May 2015 - 12:14 am | माम्लेदारचा पन्खा
टका सौ टका बरोबर बोललेत
टका कधी बोलला त्याच्या सौ शी ? मिपावर अजून साधी बातमीही नाही ह्याची? :-))
16 May 2015 - 7:13 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी अगदी. आता भेटला कट्ट्याला पुण्याच्या की मा.पं. काढु त्याची. =))
16 May 2015 - 9:44 am | टवाळ कार्टा
:|
16 May 2015 - 7:16 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुमच्याकडे सकाळ येत असेल तर गेल्या २ आठवड्यामधले पेपर तपासा. त्यामधे प्रॉपर्टी सदर येतं त्यामधे ह्यासंबधीचे एक दोन सल्ले वाचल्याचं आठवतं. आमच्याकडची रद्दी टाकली आहे त्यामुळे फोटो देउ शकत नाही.
16 May 2015 - 9:35 am | कंजूस
सौ टका विनोद आवडला असं म्हटलं की -अच्छा तर मुलाचं ना व विनोद आहे का ? अगदी समर्पक हौ ही कॅामेंट येणारच.
विषयाकडे वळतो नाहीतर टवाळांच्या अड्ड्यात मेंबर वाढताहेत असं रविवारच्या पेपरात लगेच छापून येईल.
सोसायटीच्या कामात अधिकृत मदत करण्यासाठी सरकारने हौझिंग फेडरेशन केले आहे आणि प्रत्येक सोसायटीला त्याचे सभासद होणे अनिवार्य केले आहे.कियदेशिर मदत करतात आणि यांचे नाव काढले तरी बिल्डरलोक टरकून असतात.बरेच सोसायटी सभासद यांची मदत न घेता खासगी वकीलांकडे जाऊन वेळ आणि पैसे वाया घालवतात.ठाण्यात यांचे कार्यालय तलावपाळीजवळ आहे,पुण्यातले शोधा.जे काम पाच रुपयांच्या कोर्ट फी स्टँपने होते तेच काम खासगी वकील फक्त अडीच हजार रुपयात करून दाखवतो.सोसायट फॅार्म करूनही देतात.
16 May 2015 - 9:37 am | जेपी
एक प्रश्न-छोट्या शहरात जिथे एका इमारतीत 10 पेक्षा कमी सदनिका असतात तिथे कंचा कायदा लागु होतो?? MOFA 2010 काय आहे??
16 May 2015 - 10:09 am | श्रीरंग_जोशी
विषय फारच महत्वाचा आहे.
मी पाच वर्षांपूर्वी बाणेरमध्ये फ्लॅट खरेदी केला. मोक्याचे ठिकाण, फ्लॅटची रचना, बिल्डिंगची रचना मला खूप आवडली अन तेव्हा (अमेरिकेतून येऊन एका आठवड्यात) जे काही ४-५ पर्याय पाहिले त्यामध्ये हा सर्वाधिक उजवा होता. आजही कुणी घरी प्रथमच आलं की फ्लॅटचं कौतुक केल्याखेरीज राहत नाही.
त्या बिल्डरने मागाहून बर्याच गोष्टींमध्ये सर्वच फ्लॅटधारकांना बरेच फसवले. मूळ फ्लॅट बाबत आजही काही तक्रार करण्यासारखे नाही.
अनेक फसवणुकींपैकी काही:
फ्लॅट घेतानाच तीन वर्षांची मेन्टेनंस फी घेतली. फ्लॅट्स टप्प्या टप्प्याने विकले होते. आम्ही घेऊन दोन वर्षे झाल्यावर सांगितले की पहिल्या फ्लॅटमध्ये रहायला येवून त्या फ्लॅटधारकांना तीन वर्षे पूर्ण झाली आहेत अन बिल्डरची मेन्टेनंसची जबाबदारी संपली. या घटनेच्या दोन महिने आधी काही लोकांनी तीन वर्षांची फी भरून नव्याने फ्लॅट खरेदी केली होती.
तसेच स्विमिंग पूल व क्लबहाउसचे बांधकाम वर्षानुवर्षे केले नाही. काही महिन्यांपूर्वीच ते पूर्ण झाले.
याखेरीज इतरही अनेक बाबी जसे सोसायटी बनवण्याला संपूर्ण असहकार्य. सहकार आयुक्तांकडे तक्रार केल्यावर त्याने सुनावणीच्या वेळेस डझनभर फ्लॅटधारकांसमोरच आयुक्तांना सांगितले की फ्लॅटधारक गुंडगिरी करतात. यांना जर सोसायटी स्थापन करून मिळाली तर काही फ्लॅटसचे बांधकाम जे बाकी आहे ते हे लोक करू देणार नाहीत.
आयुक्तांनी फ्लॅटधारकांच्या बाजूने निर्णय दिला अन सोसायटी बनली. त्या सुनावणीच्या वेळी याच बिल्डरच्या दुसर्या प्रकल्पातील मंडळीही याच कारणासाठी तेथे खेटे मारताना दिसली.
सोसायटी बनल्यावर लिफ्ट्स ला मेंटेनन्स पुरवणार्या कंपनीने काही लक्ष रुपयांचे थकीत बिल मागितले. बिल्डरने सरळ हात वर केले. कंपनीने लिफ्ट्स बंद करण्याची धमकी दिली. शेवटी नव्या सोसायटीने अर्ध्या बिलावर तडजोड करून लिफ्ट कंपनीचे बिल स्वतः भरले.
मधल्या काळात पालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक नगरसेवकाद्वारे बिल्डरवर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्नही अयशस्वी झाला.
त्यानंतर सदस्यांच्या चर्चेचे अनेक राऊंड होऊन वकीली सल्ले घेऊन ग्राहक न्यायालयात दावा टाकण्यात आला आहे. दाव्याची एकत्रित रक्कम कितीतरी कोटी रुपयांमध्ये असल्याने तो थेट राष्ट्रीय पातळीवरच्या ट्रिब्युनलमध्ये दाखल करावा लागला. त्याची तारीख असली की दोन सदस्य सोसायटीच्या खर्चाने विमानाने दिल्लीला जातात व हॉटेलमध्ये राहतात. निकाल लागण्याची चिन्हे अजून तरी दिसत नाहीत.
बहुतांश पदाधिकारी मातं कंपन्यांमध्ये असल्याने त्यांना प्रत्यक्ष कामे करणे (जसे पैशांची वसूली अन इतर अनेक) शक्य नाही. त्यामुळे काही निवृत्त ज्येष्ठ नागरिकांनाच ही कामे करावी लागतात (त्यापैकी एक माझे वडील).
बिल्डरने एक दोन फ्लॅट्स अशा व्यक्तिंना विकले आहेत (त्याच्यासाठी काम करणारे कंत्राटदार वगैरे) ज्यांनी आजवर एकदाही सोसायटीचे शुल्क भरले नाही.
यापुढे आम्ही भारतात फ्लॅट, जमीन वगैरे खरेदी न करण्याचे ठरवले आहे. अशा संपत्तीत आपली कष्टाची कमाई अडकवून ठेवण्यापेक्षा शरीर धडधाकट असताना तोच पैसा विश्वभ्रमंती करण्यात घालवण्याचा विचार आहे. बघुया किती प्रत्यक्षात आणता येते ते.
22 May 2015 - 5:24 pm | झकासराव
मधल्या काळात पालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक नगरसेवकाद्वारे बिल्डरवर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्नही अयशस्वी झाला>>
अहो पार्टी फन्ड मिळत असेल तर आपल्या घरच्या दोन चार मतदानाचे फारसे कौतुक नसते.
हिशेबात पारदर्शकता नसणे हा बिल्डर लोकांचा व्यवछेदक गुण आहे.
त्याविषयी विचारल्यास समोरच्याची अक्कल काढण्याची गुर्मी मात्र अति.
भारतात ज्याच्याकडे पैसा जास्त तोच बरोबर अशी नवी संस्क्रुती निर्माण झाली आहे.