२०१४ म्हणजे खुप कमी ट्रीप झालेले वर्ष असे मला वाटत होते. पण सहज काल ट्रवल डायरी हातात आली, आणि आपण २०१४ ला नाही नाही म्हणता, ऑफिस मधील टीम बरोबर गोवा(मार्च), कोलाड व्हाईट वाटर राफ्टींग( ऑगस्ट), आनि काशीद बीच(डिसेंबर) या ट्रीप केल्या आहेत शिवाय स्वता, दूधसागर ट्रेक ( सप्टेंबर) आणि विसापुर ( जुलै) आणि अजिंठा-वेरुळ फॅमिली ट्रीप (डिसेंबर) केलेली आहे असे जानवले. म्हणजे ट्रेक खुप कमी केले आहेत पण २०१४ सहलींच्या बाबतीत अगदीच नाखुष करणारे नव्हते जेव्हडे मी समजत होतो.
फक्त ही माहीती मी इतर कोठे लिहिली नव्हती बस्स. म्हणुन ही भटकंती थोडक्यात येथे देतो.
ऑफिस टीम बरोबर ट्रीप म्हंटले की आधी दारु पिणारे कीती.. आराम करण्यासाठी येणारे किती.. एकत्र मजा करता यावी म्हणुन येणारे कीती आणि निसर्ग आवडतो म्हणुन येणारे कीती हे हिशोब मी करतो. मी निसर्ग आवडतो या कॅटेगरीत येतो शिवाय फिरायला खुप आवडतेच, पण आमच्या टीम मध्ये दारु--आराम-आणि एकत्र टीम मध्ये खेळने(न फिरता) हेच आवडत असल्याने मला जास्त फिरायला आवडत नाही त्यांच्याबरोबर.
त्यामुळे कंपणीचा गोवा प्लॅन फायनल झाला की मी माझा वयक्तीक बाईकचा साईड प्लॅन पन करुन ठेवला.( गोवन पैसा ताईचे विशेष आभार त्यासाठी)
ऑफिसमध्ये ७ वाजेपर्यंत काम करुन एकदाचे आम्ही ८ वाजता वॉल्वोत बसलो.मुंबई मध्ये मी बर्याचदा अनुभवले आहे की शेवटपर्यंत सर्व काम आटपुन प्रवासाला निघावे लागते, आमचे पुणे त्यामानाने सुखी म्हणावे लागेल( वयक्तिक अनुभव).
प्रवासात झोप येत नसल्याने माझे कायमच हाल होतात, ते झालेच. पहाटे मात्र कोकण किनारपट्टी सुंदर दिसत होती.. नंतर हळुहळु सुर्य धडपडत डोंगरावरती येताना दिसला आणि आम्ही म्हापसा ला पोहचलो. १३ जनांच्यात ७ बाईक घेतल्या, बॉस ची वेगळी. मला ही छुप्या प्लॅन साठी वेगळी बाईक हवी होती, मात्र बॉस सोडल्यास फक्त ५ जनांना व्यवस्थीत बाईक चालवता येत होती, त्यामुळे नाईलाजाने माझा मित्र धीरज माझ्या बाईक वर आला.( मुंबईतील मुलांना निट बाईक का चालवता येत नाही काय माहीत) मी यमहा FZ घेतली होती, बाकी सर्वांच्या अॅक्टीवा होत्या.
सुरुवात
आम्ही ४ बिएचके फ्लॅट बुक केला होता, अतिशय सुंदर फ्लॅट, किचन पण होते, आणि स्विमिंग पुल पण. मज्जाच मजा. खुप ऐसपैस फ्लॅट मिळाल्याने सर्वजन आनंदी होते
गेल्या गेल्या आवरुन, पोटात भर टाकुन मी गोवा दर्शन थोडेशे करुन यावे म्हणुन बाहेर पडलो, इतर सर्व जन आराम करणार होती रुम मध्येच. मी मस्त कलंगुट साईड ला एक फेरी मारुन आलो, थोडा उसाचा रस प्यालो. कलंगुट समुद्र किनारा सुंदर होता लांबुनच पहात होतो.. मस्त एकदम
मी येण्या अगोदरच माझा सर्व छुपा प्लॅन पण टीम ला शेअर केला होता, त्यामुळे निदान जे करता येण्या सारखे आहे ते करावे असे ठरले होते. त्यामुळे कलंगुटला मस्त देखावे पाहताना फोन वाजला.
सर्वजन चापोराला( दिल चाहता है चे काही शुटींग ह्या फोर्ट वरती झाले होते) निघाले होते, त्यामुळे मागोमाग मी निघालो आणि त्यांना जॉईन झालो.चापोरा फोर्ट तसा हिस्टोरिकल गोष्टी साठी कमी फेमस आहे, परंतु येथुन अरबी समुद्र, वॅगॅटॉर बीच खुप सुंदर दिसतो.. सनसेट पण खुप सुंदर दिसतो परंतु आम्ही भर उन्हात फोर्ट चढत होतो. इतिहास नसला तरी
गोव्यातील हवा उष्ण अजिबात वाटली नाही, थंड झुळुक हलकीच स्पर्श करुन जायची. फोर्ट वरुन अरबी समुद्र, वॅगॅटॉर(vagator) बीच खुपच मोहक दिसत होता.
फोर्ट चढताना काढलेले काही फोटो
मित्रः धीरज कोळी
चापोरा फोर्ट वरुन
वॅगॅटॉर बीच खुपच आवडल्याने , फोर्ट पाहिल्यानंतर आम्ही वॅगॅटॉर कडे निघालो, आणि गोव्याच्या पहिल्या बीच ला माझा पदस्पर्श झाला. गोवा आवडण्याचे सर्वात पहिले कारण होते , लहानपणी एक दुजे के लिये मध्ये दाखवलेला गोवा.
गोवा खरेच सुंदर आहे असे रोड वरुन फिरताना ही जानवत होते.
संध्याकाळी बागा बीच वर फिरुन.. आम्ही फ्लॅट वर आलो .. संदिप सरांनी(सपोर्ट मॅनेजर) चिकन बनवले होते, अपेक्षेपेक्षा जास्त छान झाले होते, त्यामुळे फडशा पाडला गेला.
सकाळी लवकर उठुन माझा प्लॅन अमलात आणल्या जाणार होता, परंतु काल झोपलोच नसल्याने निघायला ७:१५ झालेच. तरीही एकदा प्लॅन वर नजर टाकली.
अरपोरा - बिचोलीम/डिचोली (मयेम लेक) - नार्वे ( सप्तकोटीश्वर मंदिर) - अरावलेम वाटर्फॉल आनि गुफा - बोंडला ( Wildlife sanctuary)- तांबडी सुर्ला ( महादेव मंदिर - १००० वर्षापुर्वीचे) आणि पुन्हा रिटर्न.
गोवा म्हणजे फक्त मजा, बीच , दारु अशी समिकरण झाले आहे, पण हे तंतोतंत खरे नाही. गोवा अगदी छोटंसं राज्य असलं तरी इथली सत्तर टक्के जमीन वनक्षेत्रात मोडते. इथे चार अभयअरण्य आहेत, जंगल आणि माणुस येथे एकमेकांच्या संगतीने वाढतो असे दिसले.. इथले ग्रामिण जीवन.. इथले लोक.. त्यांची राहणी ही खुप साधी आणि छान आहे, फक्त कृतिम झगमगाट आणि समुद्रकिणार्यावरची झिंग या पेक्षा हा नैसर्गिक गोवा खरेच सुंदर आहे.. निसर्गात येवुन फक्त आपल्याच नसेत राहणे आणि याच साठी गोव्याला येणे मला तरी योग्य वाटत नाही.
म्हापसा ओलांडल्यावरती रस्त्यावर गर्दी अजिबात नव्हतीच... गोव्याचे हे रुपडे वेगळेच भासत होते, गर्दी .. फॉरेनर्स फक्त बीच च्या बाजुला, इकडे सगळीकडे सामसुम. एक वेगळाच गोवा नजरेत येत होता.. आणि तितकाच आवडत होता. मी बर्याच ठिकानी छोटे छोटे थांबे घेतले.. कुठे मस्त चहा पी कुठे थोडासा नाष्टा.. प्रवासात भेटणार्या लोकांशी मस्त गप्पा मारत , परिस्थीतीचा हालहवा घेत मी पुढे चाललो होतो. विशेष सांगण्या सारखी गोष्ट म्हणजे त्यांना मराठी कळत होते आणि त्यांची थोडीफार शब्दाची लकब मला जमली होती... त्यामुळे बोलण्यास छान वाटत होते. तितक्यात मयेम लेक आला, हॉटेल मध्ये जाऊन थोडा चहा घेतला, ८:३० वाजुन गेले होते. लेक मध्ये तिकट काढुन उगाच एक फेरफटका मारला , नंतर त्या शांतेत्त थोडा समरसुन गेलो.. पुन्हा पुढे निघालो. हॉटेल वाल्याने नार्वे चा रस्ता सांगितला होता . थोडे पुढे उलट्या दिशेने जावे लागत होते पण जवळच आहे असे सांगितले.
शांत मयेम लेक
नार्वे ला जाताना रस्त्यावरुन घेतलेले काही फोटो
सप्तकोटीश्वर मंदिर
द्वीपपाड क्षेत्र महाथोर⃓ जेथे देव सप्तकोटेश्वर
वारवें राहिवास मंदिर⃓ स्थान सप्तऋषींचे ⃓
सप्तधातूंचे लिंग म्हणती⃓ नवरत्नांची ज्योती⃓
ऐसीनवल प्रभा स्थिती⃓ योजवेता भूषणाते⃓
सप्तकोटीश्वराचे लिंग पाषाणाचे नाही. ते सप्तधातूंचे आहे. सप्तधातूंचे शिवलिंग अन्य कोठेही नाही.
शककर्ते शिवराय १६६८ च्यादरम्यान डिचोली महाल काबीज करून डिचोलीला आले. त्यांनी तेथे सप्तकोटीश्वराविषयी ऐकले. लगेच ते डिचोलीहून निघून नार्व्याला येऊन पोचले. तिथे त्यांनी सप्तकोटीश्वराचे दर्शन घेतले. ते धांतूमय शिवलिंग पाहून राजास अतिशय संतोष झाला. आणि पोर्तुगिजांनी जे भ्रष्ट केले होते त्याचा जिर्नोधार राज्यांनी केला.
माडांच्या सावलीत विसावलेले हे मंदिर खरेच खुप सुंदर आहे, आत जाताना एक थरार वाटला, स्वता शिवाजी राजांनी बांधलेले हे मंदिर आणि सप्तधातुतील शिवलिंग. खुप प्रसन्न वाटले. एकमेव मंदिर जेथे शिवरायांनी आपले नाव कोरले जिर्नोधारानंतर.
सप्तकोटेश्वर मंदिर
अरावलेम धबध्ब्याकडे
उन्हाळा असला तरी पाणी होते नशिब , नाही तर कोणीच काही माहिती सांगत नव्हते.
तेथुन विचारत विचारत सुंदर रस्त्यांवरुन.. मी अरावलेम धबधब्यापाशी आलो, विशेष म्हणजे जवळ जवळ ५ किमी च्या परिघात याबद्दल विचारले तरी कोणी स्पष्ट याबद्दल निटसे सांगु शकले नाही. उन्हाळा असल्याने पाणी कमी होते तरी येथे ही २-३ रशियन दिसले, तेथुन मग नागनाथ मंदिरात जावुन नंतर गुफेकडे चाललो होतो, रशियन रस्ता चुकले होते, ते चुकुन वॉटर्फॉल जिकडुन होता त्याबाजुने गुफेकडे चालले होते. त्यांना रस्ता निटसा सांगितला आणि आम्ही नंतर एकत्रच गुफेकडे गेलो. साध्याश्याच गुफा होत्या.
आता वेध लागले होते तांबडी सुर्ला या प्रसिद्ध मंदिराचे , आण रस्त्यातच एक गोवन मुलगा भेटला (नेव्हील), थोडेशे बोलणॅ झाले, त्याच्या घराजवळ पाणे प्यालो, त्याला पण इच्छा झाली माझ्याबरोबर तांबडी सुर्ल्याला यायची त्यामुळे मी त्याला बरोबर घेतले, त्यामुळे जंगल, रस्ता,, वेगवेगळी वळणे यांचे मला काहीच वाटले नाही, आम्ही कमी वेळात जंगलात पोहचलो. हेमाडपंथीय शिल्पकलेच उत्तम उदाहरण म्हणजे हे मंदिर आहे. गोव्यातील हे बहुतेक एकमेव यादवकालीन मंदिर. तांबडी सुर्ला ला जाण्याचा मार्ग खुप जंजलातुन आहे , आणि अतिशय मस्त आहे, मंदिराच्या सुरवातीलाच सुंदर असा झरा ( नदि?) दिसतो, पावसाळ्यात त्या झर्याच्या उगमाला सुंदर धबधबा आहे असे ऐकले.
तांबडी सुर्ला कडे जाताना
मांडवी नदी
बंधारा
मंदिराकडे
मंदिर
त्यानंतर आम्ही बोंडला (Wildlife sanctuary) ला गेलो. वेगवेगळे प्राणी बघितले. आणि पुन्हा माघारी निघालो. त्याच्या घरी त्याला सोडुन मी पुन्हा आल्या त्या मार्गाने आरपोरा ला आलो.
बोंडला कडे जाताना
वाघ
नंतर टीम बरोबर नेहमीची मज्जा , अंजुना बीच, शनिवारचे रात्री भरणारे मार्केट ह्या सर्व गोष्टीं पाहिल्या. शनिवार असल्याने व्हेज जेवन जेवलो अतिशय छान होते ते ही.
मित्राच्या मोबाईल मधुन
क्रमशः
(पुढील भागात दूधसागर ट्रेक)
(नोट : माझे कुठल्याही धाग्यावरचे फोटो प्रोसेसिंग केलेले नाहित)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
ही वाट भटकंतीची १३: वेरुळ - अजिंठा http://www.misalpav.com/node/30895
ही वाट भटकंतीची १२ : हिमाचल http://www.misalpav.com/node/29393
ही वाट भटकंतीची ११ : तुंग:http://misalpav.com/node/22303
ही वाट भटकंतीची ८-९-१०: रोहिडा-लोहगड-बेडसे.
ही वाट भटकंतीची ७: राजगड...स्वराज्याचा शिल्पकार : http://www.misalpav.com/node/20849
ही वाट भटकंतीची ६ - कार्ला लेणी.
ही वाट भटकंतीची ५ - किल्ले पुरंदर : http://www.misalpav.com/node/20592
ही वाट भटकंतीची ४ - केरळ : http://www.misalpav.com/node/20316
ही वाट भटकंतीची ३ - रतनगड: http://www.misalpav.com/node/19239
ही वाट भटकंतीची २ - सांदण दरी: http://www.misalpav.com/node/18728
ही वाट भटकंतीची १ - राजा रायगड: http://www.misalpav.com/node/18323
प्रतिक्रिया
5 May 2015 - 8:06 pm | विवेकपटाईत
एक वेगळ्या गोव्याचे चित्रण. गोव्या बाबत धारणा बदलली
5 May 2015 - 8:11 pm | खंडेराव
मंदीर खासच आहे, मला आवडलेले शिवमंदीर
5 May 2015 - 8:45 pm | अत्रुप्त आत्मा
झकास!
5 May 2015 - 9:02 pm | मोहनराव
तुमचा प्लॅन तर उत्तम झालेला दिसतोय. फोटो छान आलेत.
5 May 2015 - 9:04 pm | प्रचेतस
सुरेख रे गणेशा.
तांबडी सुर्लाचे मंदिर यादवकालीन म्हणतोस ते ठीक पण हे यादवांनी बांधले का कदंबांनी? मंदिराचे शिखर मला किंचित वेस्सर पद्धतीचे वाटत आहे.
फोटो खूपच छान आलेत.
पुभाप्र.
6 May 2015 - 4:47 pm | पैसा
त्या काळचा लिखित इतिहास उपलब्ध नाही. जो होता तो पोर्तुगीजांनी संपवला. गोव्यात १० वे शतक ते १४ वे शतक कदंबांचे राज्य होते हे नक्की. देऊळ हेमाडपंती शैलीत आहे. मात्र सभामंडपात छतावर कमळाची आकृती आहे. हे कदंबांचे मुख्य चिन्ह समजले जाते. शिखराची शैलीही कदंबांनी बांधलेल्या हाळशीच्या भूवराह देवळाला मिळतीजुळती आहे.
हे देऊळ रामचंद्र यादवाचा सेनापती हेमाद्री याने १२ व्या शतकात बांधले असे म्हटले जाते. अर्थात हे देऊळ तेव्हाचे गोपकपट्टण, किंवा चंद्रपूर (चांदर, गोवा) यापासून बरेच लांब आहे. खरे तर कर्नाटकला जवळ. त्यामुळे हे खरे असू शकेल. आता आपण गोवा म्हणतो तो प्रदेश तेव्हा अर्थातच वेगळा होता.
6 May 2015 - 5:44 pm | गणेशा
मला तर येव्हडे ही माहीती नव्हते.. मग वल्लीला काय सांगणार..
तरीही नेट वर वाचल्यावरुन .. ते कदंब-यादव कालीन मंदिर आहे.. असेच लिहिले आहे. जैन स्टाईल पण म्हणत आहे, आता मला काय जैन --नागर स्टाईल कळत नाही जेव्हडी माहीती ती वल्ली तु लिहिलेल्या लेखावरुनच
मात्र
शिखर पुर्ण झालेले नाही असे वाटतेच आहे.. मंदिर आत्ताच येव्हड्या जंगलात आणि दुर आहे, जवळा वस्ती नाहीच कुठली तर तेंव्हा जेंव्हा ते बांधले होते तेंव्हा तर मला वाटते ते एकदम एकाकी आणि अनअॅक्सेसेबलच असणार.. कदाचीत मुसलमानांपासुन आणि इतर आक्रमकांपासुन शाबुत ठेवण्यासाठी असेल.
6 May 2015 - 6:01 pm | प्रचेतस
हेमाद्रीचा संदर्भ मिळाला.
कदंब घराण्यातील जयकेशि ह्याचा द्वितीय पुत्र शिवचित हेमाडि हा राजा झाला. त्याचे सोन्याचे नाणे उपलब्ध असून त्यावर ' श्रीसप्तकोटीश्वरलब्धवरशिवचित वीरहेमाडिवर मलवर मारि' असा लेख आहे.
गोव्यातीलच ह्याच्याच नावाने प्रसिद्ध झालेल्या हेमाड बारशे विभागातील उगे नामक गावात हेमाडदेवाचे म्हणून एक देवालय दाखवतात.
शिवाय यादवांचा श्रीकरणाधिप हेमाद्री ह्याची स्वारी इकडे झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे हां हेमाडि म्हणजेच कदंब शिवचित्त हेमाडि हाच असावा.
6 May 2015 - 11:00 pm | पैसा
मी वाचले होते त्याप्रमाणे त्याचे बिरुद शिवचित्त परमदेव होते. ते त्याने राज्याभिषेकानंतर घेतले असावे. पण हा तोच आहे ज्याने महादेव देऊळ तांबडी सुर्ला इथे बांधले. कारण काळ बरोबर जुळतो आहे. ११४७-८१. गोपकपट्टण इथे सप्तकोटेश्वराचे देऊळ त्याने बांधले होते जे मलिक काफूरने नष्ट केले. पण तांबडी सुर्लाचे देऊळ दुर्गम भागात आणि राजधानीपासून दूर असल्याने वाचले.
(अवांतरः तांबडी सुर्लाचे विकि पान साफ चुकले आहे.)
5 May 2015 - 11:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त सहल !
नेहमीच्या "सन अँड सँड" पेक्षा अधिक सुंदर बरीच ठिकाणे गोव्यात आहेत. त्यांचे दर्शन करवल्याबद्दल धन्यवाद !
एक छोटीशी सूचना : "शककर्ते शिवराय १९६८ च्यादरम्यान डिचोली महाल काबीज करून डिचोलीला आले." या वाक्यातला सन दुरुस्त करायची गरज आहे असे वाटते.
6 May 2015 - 5:10 am | श्रीरंग_जोशी
सुंदर वर्णन व तपशीलवार वर्णन आवडले. गोव्याच्या अंतर्गत भागांचे वर्णन असल्याने अधिकच भावले.
6 May 2015 - 10:32 am | प्रमोद देर्देकर
खुप सुंदर फोटो गणेशा. सप्तकोटेश्वर मंदिराचा फोटो तर अप्रतिम आलाय. एका वेगळ्या गोव्याचे दर्शन घडवलेत.
6 May 2015 - 10:49 am | ज्ञानोबाचे पैजार
हा गोवा कितीही फिरा कमीच पडतो.
(गोव्याच्या प्रेमात पडपडलेला) पैजारबुवा,
6 May 2015 - 12:48 pm | गणेशा
सर्वांचे आभार.. एक्काजी म्हंटल्याप्रमाणे बदल केलेला आहे. धन्यवाद
6 May 2015 - 3:55 pm | सत्याचे प्रयोग
पुन्हा जावेसे वाटते
6 May 2015 - 4:21 pm | कपिलमुनी
हा तुम्हाला कुठे दिसला हो ?
6 May 2015 - 4:37 pm | गणेशा
मुनीवर्य प्रश्नानेच घायाळ केले हो.. प्रश्न असा आहे की हा तुम्हाला दिसलाच कसा असा प्रतिप्रश्न मनात डोकावला की काय असे वाटले..
उत्तर : बोंडला (Wildlife sanctuary) मध्ये दिसला बिचारा.
आनखिन एक फोटो द्यावा म्हणतोय
6 May 2015 - 5:53 pm | श्रीरंग_जोशी
वाह, खासंच टिपली आहे वाघाची देहबोली. हा वाघ मध्यमवयीन असावा असा अंदाज आहे. मिपावरील व्याघ्रप्रेमी अधिक नेमकेपणाने सांगू शकतील.
यावरून मी काढलेला एक व्हिडिओ आठवला.
6 May 2015 - 6:07 pm | गणेशा
व्हिडिओ आवडला.. हा वाघ मला म्हतारा वाटला होता.. अश्या प्राण्यांना जंगलात खुले सोडुन दिले पाहिजे असे वाटते नेहमी..
तुझ्या चित्रफितीमधील वाघ गोंडस आहेत अगदी.. एकदम two brothers मधील 'संघा' आठवला
8 May 2015 - 2:53 pm | कपिलमुनी
एकदम भारी चित्रपट !
7 May 2015 - 2:14 pm | कपिलमुनी
सहजासहजी दिसत नाहीत . आणि दिवसा तर अजून अवघड !
मोकळ्या जंगलामधला वाघ फार राजेशाही वाटतो !
फारच नशीबवान तुम्ही!
आता गोव्याला जंगल सफारी केली पाहिजे
6 May 2015 - 10:42 pm | कंजूस
गोवा प्रत्येकाला वेगळाच दिसतो हेच खरे.गणेशा आवडला तुमचा गोवा आणि बोंडल्याचा वाघोबा तसेच तांबडि सुर्ला अन मांडवी.
7 May 2015 - 4:07 am | जुइ
गोव्याचे वेगळे दर्शन भावले!
7 May 2015 - 8:29 am | प्रीत-मोहर
गोवा म्हणजे बीच ,नशा , मजा मस्ती ईई कल्पना फिट्ट बसल्यात लोकांच्या डोक्यात फक्त किनारपट्टीचा भाग पाहिल्याने.
तुमच्या या धाग्याने माझ्या गोव्याबद्दलचे थोडे तरी गैरसमज दूर होतील.
(अस्सल गोवन) प्रीमो
7 May 2015 - 10:11 am | गणेशा
धन्यवाद... तरी मी म्हंटले पाहिजे..
तुमच्या (तुम्ही, पैसा आणि बिपिन कार्यकर्ते) २०११ च्या गोव्या वरील लेखामुळे तर हे मला कळाले होते.. आणि त्यात प्लॅन पैसा ताई कडुन घेतला असल्याने श्रेय त्यांचेच. गोवन लोक मात्र आवडले.. एकदम साधे आहेत.. माझे पुण्यातील कॉलेजमधले मित्र - मैत्रीणी पाहिले होते तेंव्हा वाटायचे गोव्यात सर्रास दारु पिने.. रात्री पार्ट्या करणे हीच संस्कृती आहे... जसे वाटले तसे नव्हतेच.. गाडी पंक्चर झाली तेंव्हा गाववाल्यांनी केलेली मदत खासच होती..
निसर्गाने खुप दिले आहे गोव्याला
7 May 2015 - 10:08 am | आकाश खोत
गोव्यातल्या बऱ्याच वेगळ्या ठिकाणांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
हा लेख बुकमार्क करून ठेवतोय, गोव्याला जाताना वाचीन पुन्हा. :)
7 May 2015 - 10:12 am | पैसा
छान लिहिलंस गणेशा, फोटो पण चांगले आलेत. फक्त गावांची नावे वाचताना दर वेळी दचकतेय! =)) कारण आमच्या सवयीतले उच्चार पार वेगळे आहेत! हे बघ.
चापोरा = चोपडे
वॅगॅटॉर = वाघाथर
अरपोरा = हडफडे
बिचोलीम/डिचोली = दिवचल
मयेम = मयें
अरावलेम = हरवळे
अंजुना = हणजुणे
7 May 2015 - 11:56 am | गणेशा
वाचुन मला ही हसु आले आता... अरावलेम ला तेथे हरवळेचे बोलत होते हे आठवले... बाकी वाघाथर सोडला तर कुठलीच गावाची नावे स्थानिक भाषेत ऐकली नाहीत.. मी आपले इंग्लिश स्पेलिंग वरुन लिहिले.. आपण संपादित करु श्कतो ही नावे.. बघतो ..
मी असे नकाशातील नावावरुन लिहिले म्हणजे
chapora - चापोरा = चोपडे
vagator - वॅगॅटॉर = वाघाथर
Arpora - अरपोरा = हडफडे ( आता ह्या स्पेलिंग ला हडपडे कसे बोलायचे .. अरे देवा )
bicholim - बिचोलीम/डिचोली = दिवचल
Mayem - मयेम = मयें
Arvalem - अरावलेम = हरवळे
anjuna - अंजुना = हणजुणे
7 May 2015 - 1:50 pm | पैसा
असू दे रे! याला कारण पोर्तुगीज. त्यांना स्थानिक नावे म्हणता यायची नाहीत. त्यांनी चित्रविचित्र नावे दिली आणि त्यांची पोर्तुगीज स्पेलिंग हट्टाने चालू ठेवली. शब्दाच्या शेवटच्या अनुस्वाराला "एम" केले. ती स्पेलिंग्ज अजून ठिकठिकाणी बोर्डांवर असतात. पण आम्ही बोलताना मूळ नावे म्हणतो!
7 May 2015 - 2:15 pm | कपिलमुनी
पहिल्या वेळी फारच घोळ झाला होता
पेडणे = pernem हे काही पचनी पडेना आणि रस्ता सापडेना
8 May 2015 - 8:56 am | सुनील
चालायचच!
आपण नाही त्यांच्या अल्फान्सोचे 'हापूस' करून वचपा काढला!! (बिचारा अल्फान्सो थडग्यात तळमळत असेल!)
गोवा-कट्ट्याच्या धाग्यावर आदुबाळ यांनी BENAULIM SALCETTE असे रोमन लिपीत लिहिले आहे म्हणून बरे!
आता बॅनॉलिम साल्सेट म्हणजेच, बाणावली, साष्टी हे ज्यांचा गोव्याशी (पर्यटक म्हणून वगळता) अन्यथा संबंधच नाही, त्यांना कसे समजावे?