तोरण्याचा रात्रीचा ट्रेक

आकाश खोत's picture
आकाश खोत in भटकंती
28 Apr 2015 - 11:05 am

मी आणि माझे मित्र ट्रेकला बऱ्याचदा जातो. पण रात्री सहसा नाही. आणि उन्हाळ्यात तर नाहीच. शक्यतो दिवसा आणि पावसाळ्यात. म्हणजे ट्रेक, पावसात भिजणे, हिरवळ, वारे या सगळ्यांचा आनंद घेता येतो.

पण एखाद्या डोंगरावर रात्रीचा मुक्काम करणे, रात्री चंद्रप्रकाशात भटकणे अशी इच्छा बऱ्याच दिवसापासून होती.

एकदा माझे मित्र हरिश्चंद्रगडावर जाउन राहिले होते, पण तेव्हा मला जाता आलं नाही. त्यावेळी ते दिवसा किल्ला चढले होते आणि रात्री तिथे मुक्काम केला होता. त्यांनी केलेली मजा ऐकुन पुढच्या वेळी जायचंच असं माझ्या मनात मी ठरवलं होतं.

Torna

तशी संधी गेल्या आठवड्यात आली. मी, अक्षय, सागर असे तिघे शनिवारी तोरण्याला गेलो आणि तिथे राहून रविवारी परत आलो. बाकीच्या मित्रांना काही न काही कारणामुळे येता आलं नाही.

यावेळीसुद्धा दिवसा किल्ला चढुन रात्री मुक्काम करायचा असंच ठरवलेलं असलं तरीही आम्हाला निघायला उशीर होत गेला आणि आम्ही तोरण्याच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे गावात पोहोचलो तेव्हा ९ वाजत आले होते, आणि अंधार पडला होता. गावात वीज गेलेली होती, आणि मेणबत्त्या, बॅटरीवर चालणारे काही दिवे सोडल्यास पूर्ण काळोख होता.

आम्ही एका हॉटेलमधून पाण्याची बाटली घेतली. तिथल्या काकांकडून थोडी माहिती घेतली. त्यांना असे रात्री ट्रेक करणाऱ्या लोकांचा आणि त्यांना काय काय लागतं याचा पूर्ण अनुभव असावा.

"त्यांनी तुम्ही पाणी घेऊन जा, वाटल्यास विकत घ्या किंवा माझ्या नळावर बाटल्या भरून घ्या पण पाणी घेऊन जा. एक वेळ खायला कमी पडलं तर चालतं पण पाणी कमी पडायला नको."

"तुमच्याकडे लाईटची काय सोय? बॅटरी आहे कि नाही?"

"उद्या जेवायचं काय करणार? हा माझा नंबर घेऊन ठेवा. तिकडून फोन करून ऑर्डर देऊन ठेवा. तुम्ही येईपर्यंत जेवण इथे तयार असेल. एवढं थकून आल्यावर वेळ जायला नको."

"तुम्हाला रस्ता माहित आहे कि नाही. खात्री नसेल तर मी गावात एक गाईडचा पत्ता सांगतो त्याला सोबत घेऊन जा तो तुम्हाला अर्ध्या रस्त्यापर्यंत घेऊन जाइल. पुढे सरळ रस्ता आहे, तुम्ही सहज जाल."

अशी प्रश्नांची सरबत्ती करून सगळी माहिती घेतलीसुद्धा आणि पुरवलीसुद्धा. एक रस्ता सांगितला, त्या रस्त्यात गाईडचं घर आहे. त्याची लागल्यास मदत घ्या. काहीही लागलं तर मला फोन करा, मी तुमची अडचण सोडवून देईन, किल्ल्यावर काम चालू असल्यामुळे आधीच पन्नासेक लोक वरच आहेत त्यामुळे काळजी करू नका. असा धीर पण दिला. असा माणूस ट्रेकवर जाताना भेटलाच पाहिजे . त्यांचे प्रश्न अगदी थेट होते आणि त्यामुळे एखादा काही विसरला असेल किंवा त्याने त्याचा विचार केलेला नसेल तरी त्याची तयारी होऊन जाइल.

त्यांच्या बोलण्यामुळे आम्हाला धीर मिळाला होताच. तोरण्याला आम्ही याआधी काही वर्षांपूर्वी गेलो होतो. तेव्हा एका शेत आणि ओढ्यावरून जाणारा रस्ता आम्हाला आठवत होता. पण यावेळी आम्ही वेगळ्याच रस्त्याला लागलो. आणि त्या काकांनी सांगितलेल्या वस्तीमधून गेलोच नाही, आणि त्यामुळे तो गाईड आम्हाला भेटलाच नाही.

ह्या रस्त्यावर काम चालू होतं. वाळू आणि खडकाचे ढिगारे बाजूने पडलेले होते. आम्ही त्या चढणीवर चालत गेलो. आम्ही एक दीड तास त्या रस्त्यावर चालतच गेलो. चढामुळे चांगलाच दम लागत होता. पुढे चालून सिमेंटचा रस्ता लागला. तो चांगलाच दूर आणि वरपर्यंत दिसत होता. आम्हाला वाटलं आता हाच रस्ता थेट किल्ल्यापर्यंत नेउन सोडतो कि काय. म्हणजे एका अर्थाने किल्ला सहज साध्य झाला असता, आणि दुसऱ्या अर्थाने पायवाटेने जाण्यात जी मजा असते ती येणार नव्हती.

पुढे जात जात तो रस्ता अचानक मधेच संपला! पुढे उंचवटा आणि झाडी होती. त्यापुढे रस्ताच दिसत नव्हता.

आता काय करावे हा प्रश्न होता. किल्ल्याकडे जाण्याच्या अनेक वाटा असतात. एखादी वाट जास्त वापरात असते, पण बाकी वाटासुद्धा असतात. कोणी सोबत नसताना आणि खाणाखुणा नसतील तर सहसा आपल्याला दिशा बघुन, त्या रस्त्याकडे बघुन अंदाज घ्यावा लागतो, आणि त्यावर अवलंबुन राहावं लागतं.

आम्ही येताना काकांनी सांगितलेला वस्तीवाला रस्ता एक, आणि एका छोट्या फाट्यावर असे दोन रस्ते सोडले होते. आता त्यापैकी एखादा बरोबर असणार आणि हा चुकलेला होता हे स्पष्ट होतं. खाली जायला आणि बघायला खुप वेळ लागला असता.

आम्ही इथूनच पुढे झाडीत जाऊन रस्ता शोधायचं ठरवलं आणि झाडीतुन किल्ल्याच्या दिशेने चढायला सुरुवात केली. पण लोकांच्या चालण्यामुळे जी बनलेली असते अशी मळलेली वाट सापडली नाही.

आम्ही एका छोट्या पठारावर पोचलो. एका बाजूला एक टेकडी दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि त्या पलीकडे किल्ला अशी अवस्था झाली.

आम्ही विचार करत होतो काय करावं. दोन डोंगरांच्या मध्यभागी समोर बऱ्याच वेळचा एक दिवा दिसत होता. आता तिथे दोन दिवे दिसत होते आणि हलताना दिसत होते. आमच्या बॅटरीचे जसे प्रकाशझोत पडत होते तसेच झोत त्या दिशेने यायला लागले.

अक्षयला ते किडे वाटत होते, पण किडे एवढ्या दुरून दिसणार नाहीत, आणि त्यांचा एवढा मोठा झोतसुद्धा दिसणार नाही असं म्हणुन आम्ही त्याचं म्हणणं खोडुन काढत होतो. सागरने आमची बॅटरी घेऊन त्यांच्या दिशेने हलवली आणि प्रतिसाद दिला. आणि अचानक ते दिवे खाली यायला लागले. आम्हाला तो आमच्याच दिशेने येतोय असं वाटायला लागलं.

ते लोक वेगाने खाली येत होते. ते ट्रेकरच असावेत. पण एक दोनच बॅटरीच्या प्रकाशामुळे एक दोघंच असणार असं वाटत होतं. कदाचित ते आम्हाला मदत हि करणार असतील. पण कोण ते माहित नसताना विश्वास कसा ठेवणार?

आम्ही त्यांना टाळायला म्हणून थोडा वळसा घालून चढायला लागलो. चंद्रप्रकाशात तात्पुरतं स्पष्ट दिसत होतं म्हणुन बॅटरीसुद्धा बंद करून ठेवली. पण तसं फार लांब जात आलं नाही कारण पुढे जाऊन त्या डोंगराची कडा आली. खाली दरीच (फार खोल नाही, पण न उतरण्यासारखी) होती.

आम्हाला इथे थांबावं लागलं. आता मागे जाणं आणि परत रस्ता शोधणं, आणि त्यासाठी बॅटरी चालु करणं भाग होतं. आणि ते दिवे समोरच घुटमळताना दिसत होते. आणि ते आमच्या बॅटरीचा प्रकाश दिसला कि हालचाल करत होते हे आमच्या लक्षात आलं होतं.

रात्रीचा ट्रेक करायचा तर एक जुजबी संरक्षण म्हणून सागरने चाकू आणला होता. तो काढायला सांगितला तर तो पेपरात गुंडाळून अगदी खाली ठेवला होता. त्यावर खरंच लुटारू आले तर त्यांना जरा थांबा चाकू काढून घेतो म्हणणार आहेस का म्हणून आमचे जोकसुद्धा झाले. आम्हाला भीती सुद्धा वाटत होती आणि त्या परिस्थितीवर सतत हसु सुद्धा येत होतं.

आम्ही निघुन बराच वेळ झाला होता त्यामुळे आम्ही थोडं थांबून खाउन घ्यायचं ठरवलं. मी घरून धपाटे नेले होते. ते काढुन आम्ही खाल्ले. आणि सोबत त्या दिव्यांकडे लक्ष ठेवुन होतो. काही वेळ खाली घुटमळल्यानंतर ते परत किल्ल्याच्या दिशेने जायला लागले. हळूहळू ते बरेच वर पोहोचले आणि दूर गेले. आमचासुद्धा आराम झाला होता.

आम्ही पुन्हा उठलो. सागरने चाकू हातातच ठेवला होता. आम्ही दोन पावलं पुढे गेलो आणि आता अगदी जवळ बॅटरीचे झोत दिसायला लागले. आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आम्ही आधीच्या ठिकाणी पाहिलं तेव्हा ते दिवे तिकडे दिसत नव्हते . म्हणजे जसे आम्ही काही वेळ बॅटरी बंद करून गेलो होतो तसे तेसुद्धा खाली येऊ शकले असतील.

आम्ही पुन्हा मागे फिरून बसलो. आता आम्ही तिथेच झोपायचा आणि मग सकाळी किल्ल्यावर जायचा विचार करत होतो. पण ते झोत इतक्या जवळ होते कि तिथे थांबण्यावरूनसुद्धा आमचं एकमत होईना. आम्ही काही क्षण तसेच शांत बसलो आणि तेवढ्यात माझा फोन वाजला. एवढ्या शांततेत त्याचा चांगलाच मोठा आवाज झाला. माझ्या बायकोचा फोन होता. आम्ही कुठवर पोहोचलो का ते बघायला ती थोड्या थोड्या वेळाने फोन करत होती. मी पटकन फोन कट केला.

अगदी गझनी आणि तत्सम सिनेमासारखा तो सीन होता. मी त्या दोघांना म्हटलं तुमचेपण फोन सायलेंट करा. अक्षयचा फोन सायलेंट होताच आणि सागरचा फोन बंदच होता.

आता त्या प्रकाशझोतात काही माणसे दिसली आणि अजून झोत दिसायला लागले. तो ट्रेकर्सचा बराच मोठा ग्रुप होता. एवढा मोठा ग्रुप असल्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला. आधी एकच झोत दिसत असल्यामुळे आम्हाला खात्री वाटत नव्हती, पण आता तो प्रश्न मिटला होता.

आम्ही त्यांच्या दिशेने प्रकाशझोत आणि हाक मारून साद दिली. त्यांचा प्रतिसाद आला. त्यांना आम्ही सांगितलं आमचा रस्ता चुकलाय. आम्ही एका छोट्या टेकडीवर उभे होतो आणि रस्ता तिच्याखालून होता. त्यांनी आम्हाला रस्त्याची कल्पना दिली. त्यांचा फोन नंबर दिला. आम्ही म्हटलं आम्ही रस्ता शोधून तुमच्यामागून येतो.

आतापर्यंत ते दोन रहस्यमयी दिवे सोडले तर बाकी सर्व सामसूम होती, आणि निर्जन भाग होता. आता चांगली माणसं भेटल्यामुळे उत्साह आला. "गणपती बाप्पा मोरया" करून आम्ही निघालो.

आम्ही पुन्हा मागे गेलो, सुदैवाने आम्हाला फार मागे जावं लागलं नाही. ५-७ मिनिटात आम्हाला बरोबर पायवाट सापडली. आणि पुढे एक खूप मोठा ग्रुप असल्यामुळे ते कुठे आहेत आणि कसे जात आहेत याचा अंदाज येत होता. आमची आणि त्यांची भेट झाली नाही. कारण बरोबर रस्त्यावर लागून येईपर्यंत ते खूप पुढे गेले होते.

आम्ही चुकीच्या दिशेने चढून आल्यामुळे आम्ही दमलो होतो. आम्ही वारंवार थांबुन आराम करत पुढे गेलो.

पायवाटेने बरंच पुढे गेल्यावर एक पठार लागतं आणि त्यापुढे खरा किल्ला सुरु होतो, आणि तोच या ट्रेकचा अवघड भाग आहे.

दगडाची अगदी चिंचोळी आणि छोटी चढण आहे. आणि ओबडधोबड पायऱ्या. काही ठिकाणी आधारासाठी रेलिंग लावल्या आहेत. पण त्या सलग नाहीत. त्यामुळे जिथे त्यांच्यात खंड आहे तिथे चढताना थोडं अवघड होतं. अशा ठिकाणी पाठीवर सामान आणि एका हातात बॅटरी घेऊन चढताना आमची चांगलीच कसरत झाली.

किल्ल्याचा पहिला दरवाजा आला तेव्हा आम्हाला वाटलं झालं आता. पण अजून बरीच वाट शिल्लक होती. शेवटी जेव्हा आम्ही किल्ल्यावर पोहोचलो तेव्हा अगदी आनंदाने आणि उत्साहाने "जय भवानी, जय शिवाजी",
"गोब्राम्हण प्रतिपालक क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय" अशा घोषणा दिल्या.

आतापर्यंत दोन वाजले होते. चुकलेल्या रस्त्यामुळे आम्हाला खूप जास्त वेळ लागला होता. आम्ही थकलो होतो. गडावर एक सपाट जागा पाहुन आम्ही सतरंजी पसरली. आणि शाल घेऊन झोपलो.

त्या आधी मला फोटोग्राफिचे काही प्रयोग करायचे होते. त्यासाठी खास एका मित्राकडून ट्रायपॉड आणला होता. तो पाठीवर गडावर घेऊन आलो होतो. पण त्यावर कॅमेरा लावण्यासाठी एक प्लेट असते तीच त्या बॅगमध्ये नव्हती. तो मित्र मी ती बॅग आणली तेव्हा घरी नव्हता त्यामुळे हे आधी कळलं नाही. ती बॅग इथपर्यंत आणुन पचका झाला होता.

तो प्रयोग फसल्यावर आम्ही झोपायचा प्रयत्न केला. ती सतरंजी, वजनास हलक्या म्हणून आम्ही आणलेल्या शाली, सगळंच तोकडं होतं. आणि काही वेळातच भयानक वारं सुटलं. आमची पुन्हापुन्हा थंडीमुळे झोपमोड होत होती. मला आणि सागरला थोडीतरी झोप लागली. पण अक्षयला तर काहीच झोप लागली नाही. ह्यात आमची पांघरूण आणि सतरंजीची खेचाखेच पण झाली.

zenda

शेवटी पाऊणेसहाला आम्ही उठूनच बसलो. सगळं गुंडाळुन पुन्हा बॅगेत भरलं. आणि पूर्वेला जाऊन सूर्योदय पाहिला. फोटो काढले.

grp

आमच्याशिवाय तिथे आणखी २-३ मोठे ग्रुप होते. अक्षय आणि सागरचे प्रत्येक किल्ल्यावरचे ठरलेल्या पोजमध्ये आणि ठरलेल्या भावांमध्ये फोटो काढून झाले.

गडावर फेरफटका मारून मंदिर बघून आम्ही पुन्हा खाली निघालो. खाली जाताना उन्हाचा चांगलाच त्रास झाला. अगदी पाहता पाहता उन वाढलं आणि पहाटेचा जोरदार वारा सुद्धा पूर्णपणे थांबला.

वाटेत एका ठिकाणी आम्ही सोबत नेलेले मुरमुरे, शेव, फरसाण, कांदा याची भेळ बनवून नाश्ता केला. आम्ही ४-५ पाण्याच्या बाटल्या नेल्या असल्या तरी सकाळी जाताना एकच शिल्लक होती. आणि गडावर कुठे पिण्याचं पाणी मिळालं नाही. तीच एक बाटली आम्ही खालपर्यंत पुरवली.

आम्हाला उतरताना असा त्रास होत होता आणि किती तरी शाळेच्या/उन्हाळी शिबिरांच्या सहली तिकडे चालल्या होत्या. त्यांनी असल्या उन्हात लहान मुलांना घेऊन आखलेला बेत पाहुन आम्हाला आश्चर्य वाटलं.

येताना आम्ही जिथे चुकलो होतो ती जागासुद्धा पुन्हा पाहिली. अगदी थोडक्याने आम्ही चुकलो होतो. रात्री थंड वाऱ्यात गप्पा मारत आम्ही सहज जे अंतर चाललो होतो, तेच आता उन्हात खूप जास्त वाटत होतं. कधी एकदा संपेल असं झालं होतं. आणि त्रासाचं एक कारण म्हणजे आमचं रात्रभर जागरण झालेलं होतं. खाली येईपर्यंत चांगलेच गळून गेलो होतो आम्ही. कसेबसे आम्ही खाली पोहोचलो, आदल्या रात्री ज्या काकांकडे चौकशी केली त्यांच्याकडे थंडगार पाणी आणि ताक प्यायलो, आणि पुन्हा घरी निघालो.

आमचा पहिलावहिला रात्रीचा ट्रेक असा मजेदार आणि अविस्मरणीय झाला होता. त्यातून आम्ही काही धडे सुद्धा शिकलो.
१. रस्ता माहित नसेल तर दिवसा ट्रेक करून रात्री मुक्काम करणे उत्तम.
२. रात्रीच ट्रेक करायचा असेल तर रस्ता माहित असलेला कोणी सोबत हवा.
३. संरक्षणासाठी चाकू किंवा काही सोबत घेतलं तर ते पटकन हातात येईल असं ठेवावं. :P
४. उन्हाळ्यात पाणी कितीही सोबत नेलं तरी कमीच पडतं.
५. फोटोग्राफीसाठी सोबत नेलेल्या साहित्याची आधी ट्रायल करावी. :D
६. सोबत नेलेल्या पांघरुणाचीसुद्धा (!) लांबी रुंदी बघून ट्रायल करावी.

हे सगळं आम्ही शिकून आलो असलो तरी त्या दोन दिव्याचं रहस्य मात्र सुटलं नाही. :D

http://skyposts.blogspot.in/

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

28 Apr 2015 - 11:26 am | किसन शिंदे

छान लिहीलाय वृत्तांत! रच्याकने तोरण्याच्या मशाली हा लेख वाचलाय का कधी?

गणेशा's picture

28 Apr 2015 - 12:53 pm | गणेशा

प्रवास वर्णन आवडल एकदम...

एस's picture

28 Apr 2015 - 1:21 pm | एस

तोरणा खूपच बदललाय तर आता! दुसरा सिंहगड/राजगड... पंधरा-वीस वर्षांपूर्वी या गडाच्या वार्‍या केल्यात, जवळजवळ प्रत्येक वाटेने उतरलो-चढलो आहे. तेव्हा मेंगाईचं मोडकळीस आलेलं, पत्रे उडालेलं एकुलतं एक मंदिरच काय ते होते आडोश्याला. रात्रीचं मुक्कामाला कोणीच थांबत नसे. मला रात्री तोरण्यावर एकटंच फिरायला फार आवडायचं. यावर एक कविताही केली होती इंग्रजीत. तोरण्याच्या कातळकड्याच्या पायथ्याला अगदी निरुंद पाऊलवाट आहे, तिने बरेच अंतर प्रदक्षिणा घालता येते. येथे चोरपाणी आणि इतर मानवनिर्मित छोट्या गुहा आहेत. सरपटत आत जावं लागे. झुंजारमल माचीच्या खालच्या बाजूला एक मोठी गुहा असल्याची वदंता ऐकून तिथेही बराच शोध घेतला होता, पण काही सापडले नाही.

माझा अतिशय आवडता किल्ला. आता अजिबात जाववत नाही.

चांगलं लिहिलं आहे. सुट्टी काढायला लागू नये म्हणून बरेच जण रात्री जातात आणि गटात अगोदर गेलेला कोणी नसला की फसगत होते. इथे पाणी (एक छोटं दोनफुटी कुंड सोडून) नाहीच याउलट राजगडावर पाणीच पाणी आहे. मी एकदा दिवाळीनंतर गेलो होतो तेव्हा वाटेवरती खूप जाडजूड मोठी गांडुळं ओला चिखल गाठण्याची धडपड करत होती.

सत्याचे प्रयोग's picture

28 Apr 2015 - 3:17 pm | सत्याचे प्रयोग

भगव्याचा फोटो भारी

मोहनराव's picture

28 Apr 2015 - 4:52 pm | मोहनराव

छान लिहीलाय वृत्तांत! पुर्वतयारी केलेली कधीही चांगली..

वेल्लाभट's picture

28 Apr 2015 - 5:12 pm | वेल्लाभट

एक ऐकीव किस्सा :
दोन मुरलेले ट्रेकर्स रात्री मुक्कामी तोरण्याला जाण्याकरिता सहाच्या सुमारास चढायला निघाले. वाटेत एके ठिकाणी एक माणूस घोंगडी घेऊन खाली बसलेला होता. त्याने त्यांना अडवून 'आता वर जाऊ नका. गडाचे दरवाजे बंद झालेत' असं सांगितलं. 'ह्या! आम्ही नेहमी येतो....' इत्यादी युक्तिवाद झाल्यानंतर त्याने पुन्हा इशारा दिला, की तुम्ही उद्या या आता गडाचे दरवाजे बंद झालेत. हसून जेंव्हा ते दोघे पुढे जाऊ लागले तेंव्हा घोंगडी काढून एक सहा फूट आडदांड व्यक्ती त्यांच्यासमोर उभी ठाकली. संपूर्ण मावळ्याच्या वेषातील त्या व्यक्तीने जेंव्हा तलवारीला हात घातला तेंव्हा हे दोघे कुल्याला पाय लावून जवळपास धावत किल्ला उतरले.

तरीही आदरयुक्त कुतुहल म्हणून पुढे तीन एक वेळा त्याच मार्गाने त्याच वेळी जाऊन बघितलं. परंतु तो मावळा पुन्हा दिसला नाही.

तुमचा लेख मस्त. फोटो फारच त्रोटक. अजून भरपूर आवडले असते. तीनही फोटो अप्रतिम आलेत.

किसन शिंदे's picture

28 Apr 2015 - 7:54 pm | किसन शिंदे

तोरण्याचे असे बरेच ऐकिव किस्से असावेत असा अंदाज आहे.

पॉइंट ब्लँक's picture

28 Apr 2015 - 8:06 pm | पॉइंट ब्लँक

भारी किस्सा आहे राव.

पॉइंट ब्लँक's picture

28 Apr 2015 - 8:05 pm | पॉइंट ब्लँक

मस्त वर्णन केलं आहे ट्रेकचं. फोटो एकदम भारी आहेत :)

रुपी's picture

29 Apr 2015 - 12:33 am | रुपी

फोटोही मस्तच!

पैसा's picture

29 Apr 2015 - 12:47 am | पैसा

खूप छान लिहिलंय. फोटो आवडले. प्रतिसादातील इतर किस्से पण आवडले!

अत्रुप्त आत्मा's picture

29 Apr 2015 - 12:57 am | अत्रुप्त आत्मा

थ्रिल थ्रिल .. थ्रीलिंग!

श्रीरंग_जोशी's picture

29 Apr 2015 - 2:32 am | श्रीरंग_जोशी

अनुभवकथन आवडले.

सानिकास्वप्निल's picture

29 Apr 2015 - 12:27 pm | सानिकास्वप्निल

ट्रेकचे वर्णन आवडले, फोटो ही छान आहेत.
अजुन थोडे मोठे हवे होते फोटो.

आकाश खोत's picture

30 Apr 2015 - 12:16 pm | आकाश खोत

धन्यवाद सर्वाना

एक एकटा एकटाच's picture

30 Apr 2015 - 9:10 pm | एक एकटा एकटाच

लेखनशैली चांगलीय

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 May 2015 - 2:31 pm | राजेंद्र मेहेंदळे

तोरणा आणि राजगडला कितीही वेळा जाउ शकतो. समाधान होत नाही. आणि प्रत्येक ऋतुमध्ये वेगळा अनुभव येतो.

२ वेळा तोरणा-राजगड जोड ट्रेक आणि एकएकदा तोरणा आणि राजगड सेपरेट ट्रेक केलाय. पण ह्या दंतकथा ऐकुन कधी तोरण्यावर मुक्काम केला नाही. :)

फोटो आवडले.लिहित राहा.