उन्हाळा हा फिरण्यासाठी फारसा योग्य सीझन नाही त्यामुळे सहलीच्या ठिकाणांचे पर्याय कमी असतात पण शालेय सुट्ट्या या वेळेस असल्याने ट्रिपचे नियोजन करायचे आहे.
सहकुटुंब फिरता येतील . गाडीने जाउन ४ दिवसात ट्रिप करायची आहे कारण ऐन वेळेस ट्रेन बुकिंग मिळत नाहीत.
अशा पर्यटन स्थळांची माहिती ( हॉटेल, पाँईटस, प्रवास , इतर) हवी आहे .
मी शोधलेली काही ठिकाणे
१. सापुतारा : पुण्याहून ३५० किमी असणारे हे गुजरात मधले थंड हवेचे ठिकाण आहे. हस्तकला प्रदर्शन, तलाव , बोटींग, रोप वे, सुर्यास्त पाँइट ही आर्कषणे आहेत. येताना वणीची सप्तश्रृंगी देवी बघता येते. जास्त वेळ असेल तर नाशिकच्या वाईन फार्म्स मध्ये सुद्धा दिवस घालवता येतो.
२. महाबळेश्वर : पुण्यापासून १२० किमी वर आहे. वेण्णा लेक आणि बरेच पॉईटस आहेत.जानेवारी ते मार्च स्ट्रॉबेरीचा सीझन असतो. तापोळा देखील छान आणि जवळ आहे. तापोळाला बोटींग करता येते.
३. दांडेली : पुण्यापासून ४४० किमीवर दांडेली अभयारण्य (कर्नाटक) आहे. आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण आहे.हे अभयारण्य जंगल सफारीसाठी प्रसिद्ध आहे. रात्री कॅम्पिंगची सोय करतात. नदीमधले राफ्टिंग आणि रॅपलिंग असे साहसी खेळसुद्धा आहेत. बरेचजण इथे पक्षीनिरीक्षणासाठी येतात. रहाण्यासाठी खासगी, सरकारी होटेल्स आहेत.
माबोवरचा दुवा
इतर काही ठिकाणे माथेरान , चिखलदरा अशी आहेत. कोकणामध्ये उन्हाळ्याचा त्रास खूप होतो म्हणून तो विचार टाळला आहे.
तुम्हाला माहिती असलेली पर्यटन स्थळे सुचवून मदत करा :)
प्रतिक्रिया
23 Apr 2015 - 2:25 pm | मोहनराव
उत्तम धागा!! उन्हाळ्यात सहलीचे पर्याय कमी असतात हे खरे!
मी पयला!
23 Apr 2015 - 2:28 pm | प्रचेतस
आंबा घाट - सह्याद्रीतील सर्वोत्तम जंगल ह्या परिसरात आहे. राहण्यासाठी रिसॉर्ट्स आहेत. नाईट सफारी आहे. विशाळगड, गजापूरची पावनखिंड अशा भटकंती करता येतात. हवा म्हणाल तर भर उन्हाळ्यातही बर्यापैकी गार असते.
27 Apr 2015 - 11:46 am | नितिन५८८
वल्ली एखादा दुआ पाठवा किंवा काही संपर्क असेल तर पाठवा
27 Apr 2015 - 11:54 am | प्रचेतस
http://www.hornbillresortamba.com/
http://www.jungleresortamba.in/
http://pawankhind.in/
27 Apr 2015 - 12:25 pm | नितिन५८८
धन्यवाद खूपच छान माहिती मिळाली
24 Apr 2015 - 9:52 am | पैसा
उलट उन्हाळ्यात कोकणात जाणे सेफ! घाम येतो त्याने आपला उष्णतेपासून बचाव होतो. उष्माघात होणार नाही याची ग्यारण्टी! खरे तर कोकणात कोणत्याही सीझनला तापमानात फार फरक होत नाही. दिवसाच्या कुठच्याही वेळेला समुद्रात डुंबा. जमेल त्या प्रकारात आंबे फणस हादडा!
24 Apr 2015 - 11:21 am | सुबोध खरे
या वर्षी कोकणात भयंकर गरम आहे शिवाय आंबे फारसे नाहीत. कालच आमचे आई वडील परत आले.श्री क्षेत्र परशुराम येथे ( आमचे घर आहे) तेथे अक्षय तृतीया उत्सवासाठी जाऊन आले. साधारणपणे आमच्या वडिलांना फारसे उकडत नाही परंतु यावेळेस त्यांना पण भरपूर गरम झाले आणि मुंबईत गार आहे असे म्हणत होते म्हणजेच यावर्षी कोकणात फार गरम होत असावे.
24 Apr 2015 - 12:26 pm | पैसा
हाहा! यंदा आंबे नाहीत हे नेहमीचंच! अर्थात जयगड आणि जैतापूर प्रकल्पांमुळे आंब्यांचे पीक कमी होत आहे अशी स्थानिकांची तक्रार आहे.
परशुराम जवळ इंडस्ट्रियल एरिया आणि जंगलतोड यामुळे हवामानात टोकाचे बदल झाले का माहीत नाही. पण ८ दिवसांपूर्वी मी लांजा इथे होते, त्या भागात रात्री पंखे बंद करावे लागत होते. थंडीच होती बर्यापैकी! गोव्यातही नेहमीसारखीच हवा आहे. जास्त फरक जाणवला नाही.
24 Apr 2015 - 3:58 pm | स्पा
कितीही उन्ह असो वा नसो, कोकणात गेल्याशिवाय जिवाला चॆन पडत नाही.
यावेळी सुद्धा मे महिन्यात बाइक काढून मस्त मुंबई - दापोली- गुहागर- रत्नागिरी करणार आहे
24 Apr 2015 - 5:57 pm | पैसा
तारखा कळव. रत्नागिरीत असले तर नन्दादीप आणि अनन्न्याला बोलावून घेऊ आणि कट्टा करू (मुविंची आठवण काढून).
24 Apr 2015 - 9:43 pm | स्पा
नंदादिपाला अगोदरच कळवलेले आहे, मागचा आमचा कट्टा रत्नदुर्गावर झालेला , शिवाय त्याचेसोबत थिबा पॅलेस, टिळक वाडा, आणि रत्नाग्री हिंडलो होतो, लय धमाल
27 Apr 2015 - 11:56 am | नितिन५८८
आम्हाला कोकणातले समुद्र किनारी,घरगुती राहणे आणि जेवण असलेले पत्ते द्या राव
27 Apr 2015 - 12:31 pm | पैसा
अवघड आहे, पण गणपतीपुळे, सिंधुदुर्गातील तारकर्ली, देवबाग, भोगावे, आणि अनेक ठिकाणी माफक दरात हे सगळे मिळते. गोव्यातही मिळेल. पण मला अशा हॉटेलात रहायची कधी वेळ आली नाही त्यामुळे सांगू शकणार नाही. दापोलीच्या आसपासही अशी रिसॉर्ट्स आहेत.
24 Apr 2015 - 10:57 am | विशाखा पाटील
योग्य वेळी आलेला धागा.
मेमध्ये कुर्गला जाण्याचा पर्याय कसा आहे ? कुणाला माहिती असल्यास मार्गदर्शन करावे.
24 Apr 2015 - 11:18 am | सुबोध खरे
मे मध्ये कुर्ग भरपूर गरम असते.
24 Apr 2015 - 11:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सापुता-यात उन्हाचं काही खरं नाही,मी गेलोय बोटिंग आणि रोपवे ठीक आहे, पण तेवढ्यासाठी एवढ्या उन्हात कब्बी नै.
अजुन येऊ द्या माहिती ?
-दिलीप बिरुटे
24 Apr 2015 - 11:24 am | टवाळ कार्टा
कोकणात काजूच्या, आंब्याच्या, केळीच्या, नारळांच्या बागेत जा जिथे भरपूर सावली आणि एखादी विहिर असेल...जेवण जवळ असुद्या...मस्त पैकी सतरंजी अंथरुन पत्ते कुटत बसा...विहिरित डुबक्या मारा...दुपारी तिथेच मस्त ताणून द्या....जगात दुसरे काही सुख शोधायला जाणार नै मग :)
24 Apr 2015 - 2:50 pm | कपिलमुनी
नक्की कुठे ?
24 Apr 2015 - 8:59 pm | टवाळ कार्टा
अश्या बागा कोकणात बर्याच आहेत...अधिक माहितीसाठी पैसा तैंना व्यनी करावा
- कोकणहित
27 Apr 2015 - 1:08 pm | लॉर्ड फॉकलन्ड
सापुतारा नाशिकहून ८० किमि म्हणजे पुण्यापासून अंदाजे २९० किमि आहे.हे हिलस्टेशन नाही.रोप्वे,बोटिंग चांगले आहे,पण महाबळेश्वरसारखी थंड हवा नसते.एकदा नक्कीच जाण्यासारखे आहे.
27 Apr 2018 - 8:42 pm | कपिलमुनी
या वर्षीची ट्रीप ठरवताना धागा सापडला , यातच भर घालावी
27 Apr 2018 - 10:28 pm | प्रचेतस
हंपी.
मागच्या वर्षी ह्याच वेळी हंपीमध्ये होतो. उन्हाचा त्रास होतोच मात्र कमी गर्दी आणि मोठ्या दिवसामुळे हंपी निवांत अनुभवता येते, शिवाय हॉटेल्स सवलतीच्या दरांत मिळतात.(लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक सोबत असतील तर मात्र ह्या दिवसात जाऊ नये)
28 Apr 2018 - 9:32 pm | कंजूस
पुणे/ मुंबई/नागपूर/जळगाव/नाशिक-----पासून जवळची मजेची ठिकाणं असं नाव पाहिजे.
उन्हाळ्यात सुटीत मामाच्या गावाला लाड होतात तोपर्यंत जावे.