आजोबा ३००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग १

सतीश कुडतरकर's picture
सतीश कुडतरकर in भटकंती
17 Apr 2015 - 2:01 pm

आजोबा ४००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१-भाग १

गिरीविराज हाईकर्स, डोंबिवलीच्या पहिल्या पिढीतील लढवय्यांची साहसकथा लिहिताना मला स्वतःला खूपच आनंद होत आहे. मी स्वतः या मोहिमेचा साक्षीदार नव्हतो, अर्थात १९९१ साली मी शाळेतले धडे गिरवीत होतो. जबरदस्त इच्छाशक्तीने भरलेली हि चित्तरकथा गेली २३ वर्षे काळाच्या पडद्याआड आठवणींच्या जळमटांखाली दडलेली होती. किरण अडफडकर काकांनी २१ दिवसांच्या मोहिमेदरम्यान घडलेल्या प्रत्येक क्षणाचे अगदी बारीक बारीक तपशील आपल्या दैनंदिनीमध्ये लिहून आपल्या आठवणींच्या कोपऱ्यात जपून ठेवले होते. भारतीय गिर्यारोहण विश्वातील पहिलीच सर्वाधिक उंचीची यशस्वी कृत्रिम प्रस्तरारोहण मोहीम असूनही याची कुठेही म्हणावी तशी वाच्यता झाली नाही. साधनांची कमतरता, मनुष्यबळाची वाणवा, कमकुवत आर्थिक बाजू असूनही केवळ आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीने मोहीम यशस्वी करणाऱ्या या सगळ्या शिलेदारांच कतृत्व काळाच्या पडद्याआड कायमच विस्मृतीच्या खोल गर्तेत विरून जाऊ नये म्हणून आम्हा नवीन पिढीकडून त्यांना हा मानाचा मुजरा!

मोहिमेतले शिलेदार:

किरण अडफडकर, सुभाष पांडियन, अनिल दगडे, अनिल इमारते, मिलिंद आपटे, नंदू भोसले, आनंद नाकती, अशोक शिबे, पुंडलिक तळेकर, शेखर फाटक, नरेंद्र माळी, कुट्टीदुरई पांडीयन, दत्ता शिंदे, महेंद्र साटम, शैलेश अमृते, बालाजी अय्यर, दिनेश रुपारेल.
========================================================================================

http://www.misalpav.com/node/31022 - भाग २
http://www.misalpav.com/node/31023 - भाग ३
http://www.misalpav.com/node/31024 - भाग ४ अंतिम

खरतर या मोहिमेची सुरुवात फेब्रुवारी १९९० पासून झाली असेच म्हणावे लागेल. किरण व इतर सहकाऱ्यांनी रतनगडचा ट्रेक आखला होता. सोबत किरणच्या कंपनीतील सहकारी दिलीप आणि सुराडकर हे दोघेही प्रथमच येत होते. हा ट्रेक आखण्यामागे आमचा मुख्य हेतू म्हणजे रतनगड व सभोवतालचा परिसर नजरेखालून घालणे व त्यातूनच एखादी अवघड मोहीम हाती लागते का ‘ते’ पाहणे. रतनगडाच्या माथ्यावरून सभोवतालचा परिसर पाहून चक्क वेड लागायचीच वेळ येते. एकाहून एक सरस असे थरारक कडे, अगदी ताशीव (गुळगुळीत) स्वरुपात सुमारे २००० ते ३००० फुट खोल दरीत उतरलेले पाहून उरात धडकी न भरली तर नवल! तरीही धुक्यात पहुडलेला परिसर नीट दिसत नव्हता म्हणून बर. पहिल्या प्रथम किरणच लक्ष वेधून घेतलं ते कात्राबाईच्या कड्याने. सुमारे २५०० फुट उंचीचा कडा पाहून आम्हाला इथवर येण्याचं समाधान वाटलं. खर तर खूपच दुरून आम्ही त्याच दर्शन घेत होतो व त्यामुळे नक्की कल्पना येत नव्हती. पण काहीतरी (पूर्वीपेक्षा सरस) थरारक हाती गवसलं होत हे नक्की! तशाच धुकट वातावरणात संधी साधून दोन फोटो काढले. नंतर फोटो पाहिल्यानंतर सदर कड्यावर आरोहण करण्याची मोहीम जवळ जवळ नक्की करण्यात आली व त्या दृष्टीने पुढील तयारी सुरूही झाली.

लगेचच पावसाळ्यात १५ ऑगस्ट १९९० ला डोंबिवलीहून गिरीविराजची टीम रेखी करण्यासाठी रवाना झाली. या वेळी खालून म्हणजे कोकणातून (आसनगाव-शहापूर-डोळखांब-डेहणे-आजोबा-कात्राबाई) कात्राबाईच्या पायथ्याशी पोहोचण्याच ठरलं होत. डेहणे गावाच्या पुढे असलेल्या चिंचपाडा गावातून एक स्थानिक वाटाड्या घेतला आणि कात्राबाईच्या घळीच्या रोखाने निघालो. कात्राबाई आणि रतनगडची मागील बाजू जिथे एकमेकांना मिळतात त्याच घळीतून काळू नदी ओढ्याच्या रुपात बाहेर पडते व पुढे-पुढे तिचे पात्र आणखी रुंदावत जाते. (तसाच एक ओढा शेजारच्या टेकडीच्या मागील बाजूने (बाण/सांधण च्या दिशेने) येऊन डेहणे गावाजवळ एकत्र भेटतात आणि काळू नदीच्या नावाने पुढे प्रवास करतात) पावसाळ्यात चिंचपाडा-डेहणे परिसर संपूर्णपणे पाण्याखाली असतो. पाऊस धो-धो कोसळत होता, सभोवताली दाट धुके पसरल्याने सकाळचे सात कि रात्रीचे सात हेच कळत नव्हत. धुवांधार पावसाने आमची रेखी पार कोलमडून टाकली. वर्षभराच्या दुराव्यानंतर काळू नदीला आता आपल्या प्रियकराच्या अर्थात सागराच्या बाहुपाशात विरघळून जाण्याची घाई झालेली असल्याने तिने आमचे मनसुबे हाणून पाडले. कात्राबाईच्या घळीत निघालेलो आम्ही, दुथडी भरून वाहणारे ओढे, त्यांच्या प्रवाहातून मनाविरुद्ध वाहून जाणारे भलेमोठे दगडधोंडे,वरून मध्येच केंव्हाही गडगडाट करीत कोसळणाऱ्या दरडी व दाट धुक्यामुळे सोबत वाटाड्या असूनही आम्हाला परत फिरावं लागलं. आता पावसाळा थांबेपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्यायच नव्हता.

दरम्यान डिसेंबर-१९९० व मार्च-१९९१ यामधील काळात आम्ही दोन प्रस्तरारोहणाच्या मोहिमा संपवल्या होत्या. शेवटी २९ मार्च, १९९१ ला अशोक शिबेच्या जीपने पुन्हा एकदा डेहणे गाव गाठले. मार्च महिना संपत आलेला होता आणि वैशाखातल्या रणरणत्या उन्हाची चाहुल लागली होती. काळू नदीचा शृंगारही संपलेला असल्याने तिचे पात्र कोरडे पडले होते. नदीच्या शुष्क झालेल्या पात्राचे ओरखडे शेजारच्या डोंगरधारेवर पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा करीत असलेल्या निष्पर्ण झाडांवर उमटलेले दिसत होते.

चिंचपाडा-डेहणे गाव आजा पर्वताच्या पायथ्याशी तर आजासारख्या पुराणपुरुषाच्या शेजारी 'करांडा' आपला गोतावळा घेऊन बसलाय. करांड्याच्या सर्वोच्च माथ्यावरून एक धार खाली काळू नदीच्या पात्रात उतरते. स्थानिक लोक तिला 'चिंधीची धार' म्हणतात. हि 'चिंधीची धार' पार केली की आलीच आपली लाडकी कात्राबाई. हा संपूर्ण प्रवास काळू नदीत पडलेल्या दगडधोंड्यांनी भरलेल्या पात्रातूनच आहे. कात्राबाईची पाहणी करीत असताना एक दिसून आले कि आपण जसा कडा शोधतोय तसा हा नाही. फार तर आठ दिवसात मोहीम संपलीच असती. कारण आम्ही कात्राबाईवरून खाली उतरणारी जी धार आहे तिच्या अगदी समोर होतो. अर्ध्यापेक्षा जास्त भाग हा कारवी आणि मातीच्या घसाऱ्याने भरलेला असल्याने, या धारेवरून चढाई करणे आम्हाला आव्हानात्मक वाटले नाही. (काही वर्षांनंतर पुण्याच्या एका संस्थेने याच धारेवरून चढाई करून कात्राबाई सर केल्याचा दावा केला. कात्राबाईचं खर आव्हान या धारेच्या बाजूला असलेली सरळसोट कातळभिंत, जी आम्हाला धुक्यामुळे दिसली नव्हती) या धारेच्या अगदी विरुद्ध बाजूस हाकेच्या अंतरावर आहे रतनगडाची मागील बाजू. पण आम्ही यापेक्षाही चढाई करण्यास अवघड अशा कड्याच्या शोधात होतो, त्यामुळे कात्राबाईच्या कड्यावर काट मारण्यात आली.

हीच ती कात्राबाईची धार:-
From Aajoba 1991

प्रत्येकवेळी पहिल्यापेक्षा अवघड असाध्य मोहीम आखून तो साध्य करण्याचे जे व्यसन लागले होते त्यामुळे साहजिकच कात्राबाईचा कडा आम्ही बाद ठरविला. आता पुढे काय?

कात्राबाईच्या रेखीसाठी आम्ही डेहणेच्या पुढील चिंचपाडा गावात आमची जीप ठेवली त्याचवेळी गावातच समजले कि मुंबईची काही गिर्यारोहक मंडळी आजोबावर चढाई करण्यास आली आहेत. कात्राबाईला जाणारी वाट पूर्णपणे आजोबाच्या संपूर्ण कड्याला वळसा घालूनच पुढे सरकते त्यामुळे साहजिकच सीतेच्या पाळण्यापासून गुहेरीचे दार नावाने ओळख असलेल्या खिंडीपर्यंत पसरलेल्या आजोबाच्या कड्याचे संपूर्ण दर्शन आम्ही घेतले होते. (त्या खिंडीचे नाव त्यावेळेस आम्हाला माहित नव्हते).

आजोबाने खरोखरच एखाद्या पुराणपुरुषाप्रमाणे आपल्या मुलाबाळांवर लक्ष ठेवण्यासाठी मध्यवर्ती स्थान पटकावलय. याच्या नजरेच्या टप्प्यात काय नाही. पश्चिमेला माहुलीची डोंगररांग, थोडे पूर्वेकडे सरकल्यास दक्षिणेस गोरख-मच्छिंद्र, सिद्धगड हि त्रिमुर्ती, त्यांच्या अलीकडे दुर्ग, ढाकोबा, नाणेघाट आणि जीवधन. तसेच आणखी पूर्वेकडे सरकल्यास माळशेज डोंगररांग, हरिश्चंद्रगड, कलाडगड, नकटा (नाप्ता) आणि परिसर, इथून थोडे उत्तरेकडे सरकल्यास आजोबाच्या पूर्वेला त्याचे सखे सोबती करांडा आणि कात्राबाई, रतनगड, मुडा, घनचक्कर. रतनगडाची शेजारीण सांधण दरी आणि तिच्या पलीकडे अलंग, मदन, कुरंग आणि कळसुबाईची डोंगररांग.

From Aajoba 1991

या पर्वताची डेह्णे-चिंचपाडा गावाकडील बाजू एका सरळ रेषेत थेट कोकणात उतरत नाही तर अक्षरशः कोसळते. या आजा पर्वताच्या पायथ्याशी एक टेकडी आहे, टेकडीच्या माथ्यावर वाल्मिकी आश्रमाचा पसारा मांडलेला आहे आणि पायथ्याशी आहे डेहणे-चिंचपाडा गाव. या टेकडीच्या माथ्यापासून सुरु होतो आजोबाचा उत्तुंग कडा. मुंबईची गिर्यारोहक मंडळी कड्यावर दिसतायत का हे पाहण्यासाठी सोबतच्या दुर्बिणीने रॉकपॅच जेव्हढा पाहता येईल तेव्हढा नजरेखालून घातलेला होता. किरणने दुर्बिणीच्या नजरेतून सारा कडा पालथा घातला, कड्याच्या अवघड मार्गावरून पुन्हा पुन्हा नजर फिरवली पण कुणीही नजरेस पडेना. कात्राबाईचा कडा बाद ठरवून फिरताना मुद्दाम आजोबा डोंगराच्या कड्याची संपूर्ण रेखी केली व त्यातूनच एक अवघड मार्ग गिरीविराजच्या मोहिमेसाठी किरणने मनातल्या मनात निवडला. दुपारी चिंचपाडा गावात परत फिरलो व जीप घेऊन वाल्मिकी आश्रमाच्या वाटेला लागलो. कड्याचं आता खूप जवळून दर्शन होत होत, पण कड्यावर गिर्यारोहक मंडळी काही दिसेनात, तसेच पाहत-पाहत वाल्मिकी आश्रमात पोहोचलो. तिथे आश्रमाजवळच स्लीपर हायकर्स व ईगल मोंटेनिअर्स यांचे दोन बॅनर्स लावलेले आढळले. म्हणजेच दोन्ही संस्थांनी मिळून हि मोहीम हाती घेतली होती. काही ओळखीचे चेहरे वाटले पण त्यातील बहुतेक मंडळीनी किरणला ओळखले आणि त्यांच्यात कुजबुज सुरु झाली. त्यांच्या कॅंपवर प्रवेश केला, शिळोप्याच्या गप्पा झाल्यावर त्यातीलच एकाने किरणला त्यांनी निवडलेला चढाईचा मार्ग दाखवण्यास सुरुवात केली. त्यांनी निवडलेला मार्ग पाहून किरणला हायसे वाटले, कारण त्यांनी निवडलेला मार्ग किरणने ठरवलेल्या मार्गापेक्षा पूर्णतः भिन्न होता व कड्याची मध्यवर्ती उंची सोडून सीतेच्या पाळण्याच्या वरच्या बाजूला होता. म्हणजे आजोबाच्या उत्तुंग भिंतीची मध्यवर्ती चढाई अद्यापही अभेद्य होती. किरणने नियोजित केलेला मार्ग आणि या लोकांनी हाती घेतलेला मार्ग या दोहोंमध्ये अक्षरशः जमीन अस्मानाचा फरक होता. त्यांनी निवडलेल्या मार्गाची उंची जास्तीत जास्त ५००-६०० फुट असेल. पण किरणने निवडलेला मार्ग हा आजोबाच्या अगदी मध्य भागातून जात होता आणि उंची ३००० फुटांच्या वर होती.

त्याचवेळी किरणने गिरिविराजचा मार्ग तेथेच बसून नक्की केला. परत जाताना वाटेत सुभाष, नरेंद्र इत्यादींशी चर्चा करून थोडं खाली उतरल्यावर पुन्हा एकवार आम्ही दुर्बिणीच्या साहाय्याने गिरिविराजच्या मोहिमेसाठी संपूर्ण मार्ग नजरेखालून घातला व त्यानुसार जीपमध्येच आखणी करायला सुरुवात केली.

फोटो सौजन्य: यो रॉक्स
From Aajoba 1991

From Aajoba 1991

मार्गाचे रेखांकन
From Aajoba 1991

From Aajoba 1991

साधारपणे २० दिवस ह्या अवघड चढाईसाठी लागणार होते. सतत १०/१२ सपोर्टिंग टीम मेंबर्स, ५/६ बेसकॅम्प मेंबर्स व ६/७ लीड क्लाइम्बर्स असा सुमारे २५ माणसांचा ताफा लागणार होता. घरी पोहोचल्यावर त्यानुसार सर्व बजेट बनवायला घेतले. कारण या मोहिमेसाठी आर्थिक मदत पुष्कळ लागणार होती व त्याची तयारी आत्तापासूनच करावी लागणार होती. आमचे बजेट असे होते.
अंदाजे कींमत
१. प्रसरणशील खिळे (३०० नग) Expansion bolt - रू. १०,०००/-
२. १००० फुट दोर रु. १२,५००/-
३. रेशनिंग, मेडिकल, वाहतूक व्यवस्था रु. १०,०००/-
४. फोटो व स्लाईड रु. ४,०००/-
५. कॅमेरा आणि उच्च क्षमतेची झूम लेन्स रु. १५,०००/-
६. व्हिडीओ शुटींग रु. ३०,०००/-

छायाचित्रण व व्हिडीओ शुटींगवर खर्च करण्याचे कारण म्हणजे हि मोहीम भारतीय गिर्यारोहणक्षेत्रातील सर्वात मोठी व अवघड मोहीम ठरणार होती त्यामुळे तो खर्च अत्यावशक होता.

तत्कालीन पद्धतीप्रमाणे गिर्यारोहण क्षेत्रात कोणत्याही मोहिमेचा दर्जा हा ती यशस्वी करताना चढाईसाठी घेतलेला मार्ग, म्हणजेच क्लाइम्बिंग रूट हा महत्वाचा असतो . त्यानुसार आतापर्यंत मुंबईकर गिर्यारोहण संस्थांनी साध्य केलेल्या अवघड मोहिमांपैकी पहिले स्थान द्यावे लागते कोकणकड्याच्या मध्यवर्ती चढाईला. सुमारे १४०० फुट उंचीचा हा कडा सर करताना त्याला सुमारे ४२ दिवस लागले व एकूण १४० एक्सपानशन बोल्ट वापरावे लागले होते. मुलुंडच्या समिट हायकर्स व पुण्याच्या 'पुणे वेण्चर्स (टेल्को ग्रुप)' ने मिळून मिलिंद पाठकच्या नेतृत्वाखाली सन १९८८ ऑक्टोबर मध्ये हि मोहीम यशस्वी केली होती.

सर्व प्रथम १९८३ साली ठाण्याच्या गिरीविहार या संस्थेने कृत्रिम प्रस्तरारोहण सुरु केले. चारुहास जोशी यांच्या नेतृत्वाखाली १०० एक्सपानशन बोल्ट वापरून त्यांनी ४०० फुटी जीवधनच्या वानरलिंगी सुळक्यावर प्रथम चढाई केली. त्यानंतर हॉलिडे हायकर्स, केव्ह एक्स्प्लोरर्स, नेचर लवर्स, पुण्याच्या काही संस्थांनी थोड्याफार मोहिमा यशस्वी केल्या. पण ह्या सर्व चढाया करताना कोणत्याही एकाच संस्थेने यांत सातत्य मात्र दाखवलं नाही.

या काळात 'गिरीविराज हायकर्स' म्हणजे आम्ही दोराशिवाय गिर्यारोहण मोहिमांचा सपाटा लावला होता. १९८३ ते १९८६ पर्यंत एकूण २८ मोहिमा दोराशिवायच यशस्वी केल्या त्या देखील कमीत कमी वेळात. पण १९८७ पासून आम्ही देखील एकाहून एक अवघड मोहिम आखून १८ मोहिमा यशस्वी केल्या. न करून सांगणार कोणाला, खिशात दमडीसुद्धा नाही. त्यात सर्वच साहित्य देशाबाहेरून मागवावे लागायचे. पण याचा फायदा हाच कि दोर सोडून इतर साहित्य स्वतःच बनवण्याचे कौशल्य प्राप्त केले. त्यात दोराशिवायच चढाईचा धाडसी प्रकार अंगी बाणवल्यामुळे मोठमोठ्या मोहिमांचे दडपण नाहीसे झाले होते.

ढाक भैरीच्या सुळक्यावर दोराशिवाय चढाई- किरण अडफडकर आणि सारंग अडफडकर
From Aajoba 1991

त्याची खरी पावती मिळाली ती 'हिमालयन क्लब'' च्या ''सह्याद्री बुलेटीन'' या पुस्तकाच्या रूपाने. त्यांनी मेजर रॉक क्लाइम्बिंग इन सह्याद्री १९८५-१९९० या सदरात गिरीविराज हायकर्सचे तब्बल १४ मार्ग देऊन प्रस्तरारोहणातील आमचे सातत्य मान्य केले होते. (संदर्भ: ‘द सह्याद्री बुलेटीन- जुने १९९० नं. २’). त्या नंतर जानेवारी १९९२ च्या आवृत्तीत सुद्धा दोन रूट छापून आले. त्याच वेळी सदर पुस्तकात स्लीपर हायकर्स व ईगल मोंटेनिअर्स या संस्थांच्या आजोबा कड्याच्या क्लाइम्बिंग रूटची माहिती छापून आली होती.

एकूण ३२ एक्सपानशन बोल्ट व ९ पिटॉन वापरून त्यांनी ५५० मीटरचा (म्हणजेच १७८० फुट उंचीचा) कडा २८ मार्च ते ०१ एप्रिल १९९१ मध्ये सर केला होता (फक्त पाच दिवस?). त्यापैकी स्लीपर हायकर्सची हि पहिलीच कृत्रिम प्रस्तरारोहण मोहीम, तर ईगल मोंटेनिअर्सच्या खात्यातील हि सर्वात जास्त बोल्ट असलेली मोहीम. सुमारे २००० फुट उंचीचा कडा सर करताना फक्त ३२ बोल्ट वापरले म्हणजे खरंतर त्यांनी मुख्य मध्यवर्ती चढाईस हात न घालता वेगळाच मार्ग निवडला होता (अर्थात धबधब्याचा). त्यातही शेवटचा १००० फुटांचा तिरकस रेषेतील मार्ग होता त्या मार्गावर कोणीही सामान्य ट्रेकर्स आरामात चालत गेला असता आणि जेंव्हा सिध्द करून दाखवण्याच आव्हान देण्यात आलं तेंव्हा गिर्यारोहण महासंघाच्या भर मिटिंगमधून पळ काढण्यात आला. असो!

गिरीविराजच्या बाबतीत सांगायचं झाल्यास आम्ही प्रस्तरारोहण किंवा गिर्यारोहणाचं कोणतही शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेतलेलं नाही. पण स्वबळावर एकलव्यासारख खपून आम्ही आज गिर्यारोहणात एव्हढी प्रगती साधली आहे. तसेच आमची एकच संस्था अशी आहे कि ज्यांनी प्रस्तारारोहणास लागणारी सर्व साधने स्वतःच खपून मेहनीतीने तयार केली होती. तसेच कितीही मोठी अवघड मोहीम आम्ही कोणत्याही इतर संस्थेची मदत न घेता व तीही सलगपणे यशस्वी करू शकतो आणि तीही कमीत कमी वेळात. याची साक्ष देतील पांडवकडा, नागफणी अर्थात डयुक्स नोजची पाठीमागील भिंत, ढाक भैरीची भिंत, पालीचा सरसगड, मुंब्रा देवी, इत्यादी मोहिमा.

आमच्या दृष्टीने आम्ही काढलेल्या खर्चाच्या डोंगराकडे पाहता इतकी मोठी रक्कम जमा होणे थोडे कठीणच होते. तरी पण व्हिडीओ शुटींगला काट देणे व छायाचित्रणामध्ये कपात करून साधारण ३० हजार रुपयापर्यंत तरी खर्च अत्यावशक होता. पैसे जमवण्यासाठी प्रत्येक सभासदाकडे डोनेशन बुक दिले गेले व प्रत्येकाने जास्तीत जास्त कितीही पण कमीत कमी १००/- रुपये तरी जमवलेच पाहिजे हे बंधन घातलं. त्या दृष्टीने सर्वचजण प्रयत्नाला लागले, त्यातच अनिल दगडेच्या प्रयत्नांनी त्याचा मित्र जगताप याने प्रवीण खामकर, दूरकुंडे व अपराध साहेबांच्या मदतीने श्री. एकनाथ बांदल यांची भेट घडवली व बांदल साहेबांनी थेट महाराष्ट्राचे तत्कालीन क्रीडामंत्री श्री. शामराव अष्टेकर यांचेपाशीच आम्हाला सर्व लवाजम्यानिशी नेले. अष्टेकर साहेब आमच्या गिर्यारोहाणातील कामगिरीवर खूपच खुष झाले व त्यांच्यामुळे आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून आजोबा मोहिमेसाठी एकूण रू. १५,०००/- अनुदान त्वरित मंजूर झाले. त्यामुळे आम्ही आर्थिकबाबतीत थोडे निशंक झालो. कारण आता पैशाअभावी आमची मोहीम रद्द होणार नव्हती.

From Aajoba 1991

या चढाईसाठी वापरण्यात आलेलं सर्व साहित्य आम्ही स्वतःच बनवलं होत. तो काळच असा होता कि सहजासहजी साहित्य बाजारात उपलब्ध नव्हत, काहीवेळेस ते थेट नेपाळवरून आणावे लागत होते अथवा महागडी आयात करावी लागत होती. साहित्याच्या अभावामुळे एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे आम्ही सह्याद्रीतील तब्बल २८ सुळके दोराशिवायाच सर केले होते. पण मोठी मोहीम हाती घ्यायची तर साहित्य आवश्यक होत. पैसा गाठीशी नव्हता, मग काय? आम्ही खेळाशी प्रामाणिक होतो आणि काहीही करून या खेळात मोठी उंची गाठायची दुर्दम्य इच्छा होती. त्यातच सुभाष लेथ मशीनवर लोखंडाच काम करायचा आणि किरणही कारखान्यात कामाला असल्याने दोघांनाही मशीन हाताळण्याची सवय होती. मग काय लागले कामाला. एक एक करीत दोर सोडून सर्व साहित्यच बनवून टाकल.

त्याचवेळी इतरही बाबींकडे लक्ष पुरविणे आवश्यक होते. आम्ही सर्व कामे प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे वाटून दिलीच होती व प्रत्येकजण स्वतःच्या कुवतीनुसार कामालाही लागला होता. किरणने त्याच्या अंधेरीतील एका पार्टीला भेटून त्याच्याकडून सुमारे १००० एक्सपानशन बोल्ट देणगीच्या रूपाने मिळवले. आता निदान बोल्ट साठी ३/४ वर्षे धावपळ करण्याची आवश्यकता नव्हती. फक्त बोल्टसाठी रींग बनविण्याच काम पुंडलिक तळेकरवर सोपवले. प्रथम आम्ही रिंग बेंड करण्यासाठी एक डाय बनवली आणि नंतर बाजारातून योग्य मापाची सळई घेऊन त्याच्या ३०० रींगा बनवल्या. त्याच्यावर प्लेटिंग करून त्या गंजरोधक बनविल्या.

प्रसरणशील खिळे- Expansion bolt
From Aajoba 1991

बोल्ट पाठोपाठ किरण आणि सुभाषने स्वतःच २ कामचलाऊ ‘झुमार’ तयार करून घेतले. त्यासाठी किरणने प्रथम आकारानुसार ड्राईंग बनवले व नंतर लोखंडी जाड पत्रा घेऊन तो वळवून जुमारची प्लेट बनवली व त्यात योग्य ते पार्ट बसवून झुमार तयार केले. मोठमोठ्या मोहिमेसाठी हे जवळ असणे आवश्यक असतात. कमीत कमी वेळात जास्त उंची गाठण्यासाठी यांचा उपयोग होतो. पण तत्कालीन परिस्थितीत तो खूप महाग असल्याने आम्हाला तो विकत घेण शक्यच नव्हत.

(झुमार (Ascender)
From Aajoba 1991

(झुमार (Ascender) - दोराच्या साहाय्याने फक्त वर जाण्यासाठी याचा उपयोग होतो. लीड क्लाइम्बर रोप Anchor केल्यावर अर्थात बांधल्यावर सेकंडमॅनला वर येण्याचा इशारा करतो. तिथे पोहोचण्यासाठी सेकंडमॅन, सैनिक जशी कमांडो पद्धत (रोप मोकळ्या हातात धरून) वापरतात तशी इथे वापरू शकत नाही. कारण उंची, सुरक्षितता आणि मानवी शरीराची मर्यादा. अशा वेळेस झुमार हे उपकरण वापरतात. या झुमारच्या उघडणाऱ्या तोंडामध्ये खालील बाजूस वाकलेल्या बारीक दातांची शृंखला असते. रोप या उघडणाऱ्या तोंडामधून पास केला जातो. झुमार रोपच्या तुकड्याने हार्नेसला बांधण्यात येतो. जेंव्हा आपण संपूर्ण वजन त्या झुमारवर देतो त्यावेळेस त्याचे वाकलेले दात रोप मध्ये घुसतात आणि तुम्ही त्याचठिकाणी लॉक होऊन जाता. आता तुम्हाला आणखी वर जायचे असते. त्यासाठी आणखी एक झुमार कंबरेशी बांधलेल्या झुमारच्या खाली रोपवर अडकवतात. तुम्हाला वर जाण्यासाठी तुमच्या कंबरेला बांधलेल्या झुमारवरचे तुमचे वजन खाली असलेल्या झुमारला अडकवलेल्या छोट्याश्या शिडीवर स्थानांतरीत करून उभे राहावे लागते. वरच्या झुमारवरील वजन गेल्यामुळे तो झुमार हलकेच वर सरकवला जातो. असेच वजन स्थानांतरीत करून आपण रोपच्या साहाय्याने इच्छित स्थळी पोहोचतो.)

कॅराबीनर
From Aajoba 1991

कॅराबीनर हे कुठेही अडकवता येणारे एक बहुउपयोगी साहित्य आहे. वरच्या फोटोत कंपनी मेड कॅराबीनर मध्ये एक open gate दिसत आहे. ते gate बंद करण्यासाठी तो स्क्रू फिरवावा लागतो. पण एव्हढ बारीक काम करण आमच्या आवाक्याबाहेरच होत. मग एक युक्ती सुचली. डावीकडच्या गिरीविराज मेड कॅराबीनर मध्ये तुम्हाला एक छोटी रिंग दिसत असेल. तीच रिंग आम्ही gate बंद करण्यास वापरली. हि रिंग कोणत्याही दिशेस पडली तरी gate open होत नाही. या कॅराबीनरसाठी आम्ही EN-8 या प्रकारचे लोखंड वापरले आणि जेंव्हा प्रयोगशाळेत याची तपासणी केली तेंव्हा ते १३०० किलो वजनभार दिल्यावर फक्त वाकले, तुटले मात्र नाही. (२००६ मध्ये जेंव्हा आम्ही कोकणकडा सर केला तेंव्हा सुद्धा कंपनी मेड स्क्रू कॅराबीनर आमच्याकडे नसल्याने आम्ही हार्नेसला हेच लोखंडी कॅराबीनर वापरले होते, ज्याची कोणी कधी साधी कल्पना सुद्धा करू शकणार नाही आणि आम्हाला वेड्यातच काढतात.)

पिटॉन/पेग - कपारींमध्ये ठोकून त्यात कॅराबीनर अडकवतात आणि रोप पास करून स्वतःस सुरक्षित करण्यात येते.
From Aajoba 1991

चोकनट-छोट्याछोट्या छिद्रांमध्ये अडकवून त्यात कॅराबीनर अडकवतात आणि रोप पास करून स्वतःस 'तात्पुरते' अर्थात कामचलाऊ सुरक्षित करण्यात येते.

From Aajoba 1991

हार्नेस अर्थात कमरपट्टा - किरणकाकांनी आपल्या नेहमीच्या शिलाई मशीन वर शिवलेला
From Aajoba 1991

तंबू - किरणकाकांनी आपल्या नेहमीच्या शिलाई मशीन वर शिवलेला
From Aajoba 1991

पुली - Pulley
From Aajoba 1991

डीसेंडर (Descender) - एखादा कडा नुसत्या हातापायांच्या साहाय्याने आपण उतरू शकलो नाही तर टेक्निकल इक्विपमेण्ट्स वापरून तो उतरणं शक्य असतं. कड्याच्या टोकावर जाऊन थेट खाली उतरणं यालाच डिसेंडिंग म्हणजेच रॅपलिंग म्हणतात. बिले देण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होतो.

डीसेंडर (Descender)-यातील २ नंबरचा आम्ही बनवलेला आहे ज्याचा य्प्योग आम्ही आजही करतो.
From Aajoba 1991

बिले डिव्हाइस- स्वतःच डोक लाऊन बनवलेलं
From Aajoba 1991

(Belay - लीड क्लाईम्बर स्वतःबरोबर दोन दोर घेऊन जातो. एक Supply दोर असतो ज्याच्या साहाय्याने आवश्यक साधनसामुग्री त्याच्यापर्यंत पोहोचवली जाते. दुसरा मुख्य दोर त्याच्या कंबरेला बांधलेला असतो, हा दोर त्याचा जीवनरक्षक असतो ज्याच नियंत्रण सेकंडमॅनकडे असते. फोटोत दाखवल्याप्रमाणे सेकंडमॅन दोर हळूहळू सोडत राहतो, या दोराचे घर्षण त्या belay device वर होते, त्यामुळे दोर नियंत्रितपणे सोडता येतो. एखादे वेळेस लीड क्लाईम्बर तोल जाऊन खाली पडला तर सेकंडमॅन, दोर त्या belay device भोवती आवळून धरतो. जेणेकरून लीड क्लाईम्बरचे पडणे नियंत्रित होते. दोर तुम्ही जर थेट हातात पकडला तर तुम्हाला ते शक्य होणार नाही. कारण होणाऱ्या आघाताने दोर तुमच्या हातातून सुटणार आणि घर्षणामुळे तुमचा हात भाजून निघणार. यासाठी सेकंड मॅनलाही स्वतःस anchor करून ठेवावे लागते.)

Belay Technique
From Aajoba 1991

पुढे:
एक ५०० फुटी दोर विकत घेण्यात आला ते काम दत्ता शिंदेने केले. त्या शिवाय १००० फुटी दोर नुकताच गेल्या मोसमात आम्ही खरेदी केला होताच सामान वाहून नेण्यास सॅक अत्यावश्यक होत्या. त्यासाठी अॅसल्युमिनिअमचे पाईप घेऊन ते वाकवून त्याच्या फ्रेम बनवायचे काम विजय सावंतला देण्यात आले. त्याने एकूण ११ फ्रेम तयार करून दिल्या. फ्रेमही खूप उशिरा मिळाल्याने अगदी जाण्याच्या दिवसापर्यंत कुट्टी, विजय, पुंडलिक आणि सुभाष त्या पूर्ण करण्याच्या मागे लागले होते. शेवट पर्यंत सॅक तयार झाल्याच नाहीत, त्यामुळे अक्षरशः गोण्यांमध्ये सामान भरण्यात आले. आज आपण सॅकशिवाय साधा तासाभराच्या ट्रेकचा सुद्धा विचार करू शकत नाहीत. त्यात आम्ही धान्याच्या गोण्या वापरल्या होत्या.

दरम्यान किरणने ४/५ रात्री खपून ७-८ माणसे मावतील एव्हढा एक तंबू स्वतः शिवला. त्याचेही थोडेफार काम शिल्लक होते, ते थेट आजोबाला पोहोचल्यावर करण्याचे ठरले. याशिवाय लाकडे फोडण्यासाठी कुऱ्हाड, टिकाव, कोयता, सुरे व वेळप्रसंगी आत्मसरंक्षणासाठीची सामग्री घेतली. त्याकाळी आजोबाच्या सभोवताली असलेल्या रानात जंगली श्वापदांचा मुक्त संचार असल्याने याची गरज होती.

आम्हीच तयार केलेल्या कॅराबीनर्सची साफसफाईचे काम करण्यात आले, नवीन पिटॉन, चोकनट बनविण्यात आले.
आठ दिवसआधी खाद्यपदार्थांची खरेदी सुरु करण्यात आली. महेंद्र, दत्ता, नंदू, शैलेश वगेरे मंडळी या कामी जुंपली. क्लाइम्बिंग टीमसाठी लागणारे खास अन्नपदार्थ ''फास्टफूड'' (सुका मेवा) महेंद्रने भायखळा येथे जाऊन खरेदी केले. शिवाय डाळी, तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर, गुळ, चहा, दुध पावडर, मसाल्याचे पदार्थ, औषधे इत्यदि खरेदी करून झाले.

या मोहिमेस आम्ही एकूण खर्च काढला होता रु. ८१,५००/- . पण आम्ही जास्तीत जास्त २५,०००/- रुपयेच जमवू शकलो होतो. त्यामुळे नवीन कॅमेरा घेणे, व्हिडीओ शुटींग करणे व इतर अवास्तव खर्च यांना काट देणे भाग पडले. अतिशय काटकसर करून जेमतेम कशीबशी आमची मोहीम आम्ही पूर्ण करू शकत होतो. खर तर या मोहिमेच व्हिडीओ शुटींग होणे अत्यंत आवश्यक होत, पण म्हणतात ना, सारी सोंग आणता येतात पण पैशाचं नाही.

क्रमशः

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Apr 2015 - 2:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमच्या प्रयत्नांना _/\_

व्वा अतिशय माहीतीपुर्ण लेख........टाळ्या झाल्या पाहिजेत ...या लेख मालिकेसाठी शुभेच्छा :)

अत्रुप्त आत्मा's picture

17 Apr 2015 - 2:18 pm | अत्रुप्त आत्मा

पाय लागू सरकार...

स्पंदना's picture

17 Apr 2015 - 2:20 pm | स्पंदना

शब्द नाहीत ही सगळी कामगिरी मापायला.

सतिश भाऊ धन्यवाद!!

काय माणस असतील ही? घरातल्यांची हालत झाली असेल यांच्या असल्या डोकेबाजीला झेलताना. पण नशिब म्हणुन एकाला एक असे सुरेख मोती सापडत गेले, अन एक सुरेख गोफ तयार झाला डोकॅलीटीचा.

काय भन्नाट माणसं!काय ते वेड _/\_

प्रमोद देर्देकर's picture

17 Apr 2015 - 3:46 pm | प्रमोद देर्देकर

आज हे वाचताना अंगावर शहारा आला. आणि तो दोन वीरांचा फोटो पाहुन "हिरकणी" कशी गड उतरुन गेली असेल तेही रात्रीच्या अंधुक प्रकाशात याची थोडी फार कल्पना आली. ध्यन्य ती माऊली.

बाकी तुम्हा सर्व वीरांना __/\_.

तुषार काळभोर's picture

17 Apr 2015 - 4:13 pm | तुषार काळभोर

AWW!

शरभ's picture

17 Apr 2015 - 4:50 pm | शरभ

:S

वेल्लाभट's picture

17 Apr 2015 - 4:52 pm | वेल्लाभट

काय बोलायच?

कमाल. केवळ कमाल आहात तुम्ही सर्वच गिरिविराज...

मनराव's picture

17 Apr 2015 - 6:40 pm | मनराव

एक णंबर !!!

यशोधरा's picture

17 Apr 2015 - 7:52 pm | यशोधरा

Wow! ढाकच्या सुळक्यावरच्या चढाईचा फोटो पाहून श्वास अडकला आहे!

तुषार काळभोर's picture

18 Apr 2015 - 8:17 am | तुषार काळभोर

फोटो पाहिल्या पाहिल्या पायात मुंग्या आल्यासारखं वाटलं!

मयुरा गुप्ते's picture

17 Apr 2015 - 10:11 pm | मयुरा गुप्ते

नुसते फोटो बघुन धडकी भरते तर प्रत्यक्षात करतेवेळी कल्पनाच करवत नाही.
अतिशय शास्त्रशुध्द आणि माहितीपूर्ण लेखमाला.
दंडवत!

-मयुरा.

सुबोध खरे's picture

18 Apr 2015 - 9:32 pm | सुबोध खरे

--/\--
काय खाऊन हि माणसं वाढतात हो?
अफाट धैर्य आहे.
दंडवत स्वीकारा.

सतीश कुडतरकर's picture

20 Apr 2015 - 2:50 pm | सतीश कुडतरकर

धन्यवाद लोक्स!

प्रचेतस's picture

20 Apr 2015 - 6:26 pm | प्रचेतस

निव्वाळ अफाट.
मानाचा मुजरा तुमच्या मोहिमांना _/\_

ऋतुराज चित्रे's picture

10 Sep 2015 - 11:02 am | ऋतुराज चित्रे

सलाम तुमच्या जिद्दीला.

डावीकडच्या गिरीविराज मेड कॅराबीनर मध्ये तुम्हाला एक छोटी रिंग दिसत असेल. तीच रिंग आम्ही gate बंद करण्यास वापरली. हि रिंग कोणत्याही दिशेस पडली तरी gate open होत नाही.

अफलातून कल्पना! हाताळण्यास सोपे व १००% सुऱक्षीत.

नया है वह's picture

10 Sep 2015 - 11:11 am | नया है वह

_/\_

पद्मावति's picture

10 Sep 2015 - 1:48 pm | पद्मावति

जबरदस्त!
पु.भा.प्र.

मम्बाजी सर्वज्ञ's picture

10 Sep 2015 - 2:15 pm | मम्बाजी सर्वज्ञ

ह्यातल्या शोधांचे पेटंटस घेतलेत कि नाही? जरी नव निर्मिती नसली तरी डिझाईन चे पेटंट घेतल्यास उपयोग होऊ शकतो. विशेषतः ते बिले डिव्हाईस.

सस्नेह's picture

11 Sep 2015 - 3:49 pm | सस्नेह

अतिशय अभ्यासपूर्ण तपशील.

अरिंजय's picture

16 May 2017 - 7:39 pm | अरिंजय

संपुर्ण लेखमाला एका बैठकीत वाचुन काढली. या मोहिमेतील सर्व शिलेदारांना साष्टांग दंडवत. कुठलीही आधुनिक साधने नसताना व जी आहेत ती सगळी स्वतः बनवुन, सगळ्या अडचणींवर मात करुन असले साहस करायला वेडेपणाच अंगी असावा लागतो. धन्य आहे ही पब्लीक.

दशानन's picture

16 May 2017 - 8:46 pm | दशानन

एकदम कडक सलाम या टीमला!

देवा! अप्रतिम, देखणी आणि दैवी कामगिरीचाच हा नमुना!
सलाम!