गिरनार मोहीम

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in भटकंती
13 Apr 2015 - 7:23 pm

Dattatray Mountain

गिरनार मोहीम

सौराष्ट्रातील जुनागढ शहराला लागुनच असलेल्या गिरनार पर्वतावर गुरु दत्तात्रयाचे वसतीस्थान आहे असे मानले जाते. गिरनार पर्वताच्या दहा हजार पायर्या चढून गेल्यावर डोंगराच्या उंच सुळक्यावर गुरु दत्तात्रयाच्या पादुका आहेत. हा पर्वत तीन मोठ्या डोंगरांत, विभागला गेला आहे. पहिल्या डोंगराच्या एक हजार पायर्या चढून गेल्यावर तेथे जैन तीर्थक्षेत्र आहे. तेथून पुढे चार हजार पायर्या चढल्यावर अंबामातेचे देऊळ आहे. येथून दोन हजार पायर्या उतरून आणि पुन्हा तीन हजार चढून गेल्यावर गिरनार पर्वताच्या सर्वात उंच शिखरावर गुरु दत्तात्रयाच्या पादुका आहेत. गुरु दत्तात्रयांनी येथे तप केले होते असा खुपश्या धार्मिक ग्रंथात उल्लेख आहे.

१९९६ साली ह्या पर्वतावर चढण्याचा प्रथम योग आला. माझे मुंबईचे काही मित्र, राजकोटला सहकुटुंब सहपरिवार सौराष्ट दर्शनाला आले होते. द्वारका, दिव, सोमनाथ, भालका तीर्थ, (जेथे कृष्णाच्या पायाला बाण लागला आणि त्यांनी आपले अवतार कार्य संपवले ती जागा) वगैरे झाल्यावर आम्ही जुनागढला गिरनार पर्वतारोहणासाठी पोहोचलो. सोबत संपूर्ण कुटुंब काबिला असल्यामुळे सकाळी आठ वाजता, बरोबर भरपूर खाण्यापिण्याचे पदार्थ घेऊन पर्वत चढायला सुरवात केली. थोड्याच वेळात उन्हाने आणि चढण्याच्या श्रमाने दमछाक झाली, बायकांना उन्हे लागू लागली आणि मुलांचे चेहरे लालबुंद झाले. त्यातच वरून उतरणाऱ्या भाविकांनी आमचा अवतार बघून, चुकचुकायला सुरवात केली त्यावरूनच आमचे काहीतरी चुकले आहे हे आम्हाला कळून चुकले. जर दत्तात्रयाच्या पादुकांपर्यंत जायचे असेल तर सकाळी चार वाजताच चढणे श्रेयस्कर असते आणि चढण काही ठिकाणी अगदी पंचेचाळीस डिग्रीत असल्यामुळे सोबत कमीत कमी सामान नेले तरच चढता येते, ही बहुमुल्य माहिती मिळाली. ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास' ह्या म्हणीनुसार आम्ही आमचे ध्येय दत्तात्रयाच्या पादुकांवरून थेट जैन तीर्थक्षेत्र, इतके खाली आणले. शेवटी वाटेत बसत, दगडांना टेकत, दुपारी बाराच्या टळटळीट उन्हात कसेबसे जैन तीर्थक्षेत्रापर्यंत पोहोचलो आणि तिथल्याच धर्मशाळेत डोळे मिटले, (दुपारच्या वामकुक्षीसाठी, गैरसमज नसावा). पण त्याचवेळी लवकरच दत्तात्रयापर्यंत जायचेच ही खुणगाठ मनाशी बांधली.

कर्मधर्मसंयोगाने पुढच्याच वर्षी गिरनारला जायचा योग आला. माझ्या एका मेहुणीने अंबा मातेला काहीतरी नवस केला होता तो नवस फेडण्यासाठी गिरनारच्या अंबे मातेच्या दर्शनासाठी जायचे ठरले. त्याचवेळी मी त्यांना दत्तात्रयाची महती पटवून, दत्तात्रयाचे दर्शन घेण्याची गळ घातली आणि ते देखील लगेच तयार झाले. मागच्या अनुभवावरून आम्ही डिसेम्बर महिन्यातल्या एका पहाटे सहा वाजता चढायला सुरवात केली. खरे तर पहाटे चार वाजताच पर्वत चढायला सुरवात करणार होतो पण आसपास मिट्ट काळोख असल्यामुळे सहा वाजताची वेळ ठरवली. सहा वाजता देखील तसा खूपच अंधार होता. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, गिर जंगल जवळच असल्यामुळे त्या जंगलातून माँ शेरावालीची वाहने ‘माँ’च्या दर्शनाला येऊन, प्रसाद म्हणून आम्हालाच गट्टम करण्याची शक्यता असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. तिसरे तेव्हढेच महत्त्वाचे कारण म्हणजे ह्या पर्वतावरील अनेक गुहांतून वेगवेगळे, साधू, बैरागी, बाबा, राहत असल्याने, आणि माँ शेरावालीच्या वाहनांपेक्षा, पायात वहाण न घालणारी ही मंडळी जास्त धोकादायक आहेत, असे स्थानिक लोकांचे एक मत होते. ह्या पर्वतावर एकटी-दुकटी गेलेली अनेक मंडळी हरवल्याच्या कित्येक घटना आहेत. सोबत मेहुणी असल्यामुळे, शेवटी सकाळी सहा वाजता, पर्वतावर दत्तात्रयाच्या, अंबे मातेच्या दर्शनाला आलेल्या भाविकांबरोबर चढायला सुरवात केली. डोंगर चढायची तर जाउच द्या, साधे पायी चालायची देखील फारशी सवय नसल्यामुळे लवकरच थकायला झाले. सूर्य जसजसा उगवत होता,तसतसा सुरवातीचा उत्साह मावळू लागला होता. सूर्यदेवाने आपली पहाटेची कोवळी किरणे काढून घेऊन त्या जागी तप्त किरणे पाठवून दिली होती, त्यामुळे संपूर्ण अंग भाजून निघत होते. बरोबर अगदी कमीतकमी सामान म्हणून प्रत्येकी एक छोटी पाण्याची बाटली आणि एक छोटा पार्ले-जी चा पुडा घेतला होता. तो पुडा पहिल्या शंभर पायर्यांतच धारातीर्थी पडल्यामुळे, फक्त पाण्यावरच भागवावे लागणार होते. चढत होतो तेथून अंबे मातेचे शिखर, भल्या पहाटे शुक्र तारा जसा आकाशात दिसतो, तसे उंच दिसत होते, त्यामुळे इतके कसे आणि कधी चढून होणार ह्या कल्पनेने पाय अजूनच कापत होते. त्यामुळे तोंडाने देवाचे नाव घेत, शिखराकडे न बघता पायर्या चढत राहिलो. वाटेत, पार दत्तात्रयाच्या पादुकांचे दर्शन घेऊन उतरणारे भाविक बघून मत्सर वाटत होता. एका-दोघांकडे चौकशी करता त्यांनी रात्री बारा वाजता चढायला सुरवात केल्याचे सांगितले आणि तोंडचे पाणीच पळाले. म्हणजे त्यांना दत्तात्रयाच्या पादुकांपर्यंत जाऊन उतरण्यासाठी आठ तास लागले होते तर. आता इथे-तिथे न पाहता, एक-एक पायर्या चढत राहिलो. थोड्याच वेळात एक हजार पायर्यांच्या पहिल्या टप्प्यावर पोहचलो. परतून येताना जैन देरासरमध्ये दर्शनाला जाऊ असे ठरवून पायर्या चढत राहिलो. बरोबर सकाळी दहा वाजता अंबे मातेच्या शिखरावर पोहोचलो. देऊळ दगडी भक्कम बांधणीचे असून एकदम सुस्थितीत आहे. हात-पाय धुवून देवीचे दर्शन घेतले, मेहुणीने तिचा नवस फेडला. देवळात बसून देवीची प्रार्थना म्हंटली. सर्व मनासारखे झाले पण देवळातील साधू, बैराग्यांचा सूळसुळात, उर्मट भाषा, अरेरावी काही वेळा अप्रत्यक्ष रीत्या केलेली धमकावणी बघून, उबग आली. असो.

देवळाबाहेर आलो समोरच्या एका छोट्या हॉटेलमध्ये बसून चहा-नाश्ता केला आणि सहजच चहा देणार्या मुलाला दत्तात्रय येथून किती दूर आहे हे विचारले. त्यावर त्याने आकाशाकडे केलेल्या हाताच्या दिशेने पाहिल्यावर धडकीच भरली. आम्ही जेथे उभे होतो तेथून दूर समोरच्या डोंगराच्या उंच सुळक्यावर एक ध्वजा फडकताना दिसत होती, ते होते दत्तात्रयाचे स्थान. म्हणजे हा डोंगर उतरून पुन्हा ह्याहून थोडा उंच डोंगर चढल्यावर पादुकांचे दर्शन होणार होते. आम्ही एकमेकांकडे पाहिले, आणि मेहुणीच्या मुखातून अंबे माताच वदली. “मला वाटते आपण दत्तात्रयाचे दर्शन पुढच्या वेळेस करू या, आता उनही खूप वाढले आहे, तेथे पोहोचायला अजून चार तास जातील, पुढच्या वेळेस लवकर चढायला सुरवात करू म्हणजे सकाळी अकरा वाजेपर्यंत दत्तात्रयापर्यंत पोहोचू, तुम्हाला काय वाटते ?” आम्हाला काय वाटायचे, बरंच वाटलं ! पडत्या फळाची आज्ञा ! आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऐनवेळी कच खाल्याचा आरोप आता आमच्यावर होणार नव्हता, शिवाय स्त्री-दाक्षिण्य दाखवता आले ते वेगळेच. शेवटी दत्तात्रायाला तेथूनच हात जोडले आणि परतीच्या प्रवासाला लागलो.

पण मनातून दत्तात्रय जात नव्हते.

साधारणपणे दर पाच वर्षांनी आमची बदली व्हायची. त्याप्रमाणे २००० साली राजकोटहून दुसर्या ठिकाणी बदली होणार हे जवळ जवळ निश्तिच होते. ही बदली कुठे होणार ह्याची काहीच शाश्वती नव्हती त्यामुळे नवीन ठिकाणाहून दत्तात्रायासाठी पुन्हा राजकोटला येणे थोडे कठीणच होणार होते. म्हणून मी व माझ्या पत्नीने, २००० सालच्या जानेवारी महिन्यात दत्तात्रयाला जायचेच असा निश्चय केला आणि त्याची पूर्वतयारी म्हणून रोज सकाळी पाच-पाच किलोमीटर चालायला सुरवात केली. राजकोट पासून पन्नास किलोमीटरवर एक ‘चोटीला' नावाचे,‘चंडी-चामुंडा' मातांचे देवस्थान आहे. हे देखील एका टेकडीवर असून, देवळात पोहोचण्यासाठी एक हजार पायऱ्या चढाव्या लागतात. सराव होण्यासाठी तसेच स्टॅमिना वाढण्यासाठी, एक-दोनदा ह्या देवळात देखील गेलो. शेवटी जानेवारी २००० साली, ठरल्याप्रमाणे दत्तात्रयाला जाण्यसाठी जुनागढला येऊन राहिलो. आधीच्या दोन अनुभवांवरून डोंगर चढायला कमीतकमी सकाळी चार वाजता सुरु करणे गरजेचे होते कारण सकाळच्या थंड वातावरणात अंबा मातेपर्यंत पोहोचलो तरच पुढे दत्तात्रय करणे शक्य होणार होते. पण जानेवारी महिन्यात उजाडते देखील तसे उशिराच त्यामुळे काळोखातच पायऱ्या चढायला सुरु करायला लागणार होत्या. पहाटेपूर्वीचा अंधार, कडाक्याची थंडी, अंधारात श्वापदांची भीती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या डोंगरावरील विविध गुहांमध्ये राहणाऱ्या साधू, गोसाव्यांची एक अनामिक भीती, ह्यामुळे इतक्या लवकर पायऱ्या चढायला लागणे थोडे जोखीमिचेच होते. तरीदेखील, पायथ्याशी असलेल्या हनुमानाच्या मूर्तीला नमस्कार करून देवाचे नाव घेऊन बरोबर चार वाजता पायऱ्या चढायला सुरवात केली. सर्वात आधी दोन चांगल्या पाच फुटी सरळसोट बांबूच्या हलक्या पण मजबूत काठ्या विकत घेतल्या, ज्या चढण्यासाठी तसेच उतरताना तोल सावरण्यासाठी आवश्यक होत्या. डोक्यावर उन्हापासून रक्षणासाठी कॅप्स, अंगात एक हलका स्वेटर, जवळ पाण्याची छोटी बाटली आणि थोडे ड्राय फ्रुट्स घेतले. गोड बिस्किट्स खाल्याने तहान लागते म्हणून हा बदल केला होता. माथेरानप्रमाणेच ह्या पर्वतावर राहणाऱ्या लोकांसाठी, वेगवेगळ्या देवळांसाठी, लहानसहान हॉटेलसाठी लागणारे सामान पाठीवरुनच वाहून न्यावे लागते. कर्मधर्म संयोगाने असे सामान वाहून नेणारे काही लोकं पायऱ्या चढत होते, आम्ही त्यांच्या सोबत राहूनच पायऱ्या चढू लागलो. डोलीवाल्यांनी काही अंतरापर्यंत आमचा पिच्छा पुरवला पण आमचा निश्चय बघून ते थोड्याच वेळात निघूनही गेले. आमच्या सारखीच इतरही काही भक्त मंडळी डोंगर चढत होती, काही लोकांनी रात्रीच चढायला सुरवात केली होती ते आता परतीच्या प्रवासाला लागले होते. बरोबर सकाळी आठ वाजता, पाच हजार पायऱ्या चढून आम्ही अंबा मातेच्या देवळापर्यंत पोहोचलो. देवदर्शन करून, एका टपरीत चहा घेऊन आम्ही लगेच दत्तात्रयाच्या वाटेला लागलो.

आता दोन हजार पायऱ्या उतरायच्या होत्या आणि अजून तीन हजार चढायच्या होत्या. ज्यांना डोंगर चढायचा अनुभव आहे त्यांना हे माहित असेलच की डोंगर चढणे जितके कष्टाचे असते तितकेच किंवा त्याहूनही जास्त त्रासदायक, उतरणे असते कारण उतरताना शरीराचा संपूर्ण तोल पुढच्या बाजूला असतो आणि त्याने पायावर एक प्रकारचा ताण येतो. उतरताना फार सांभाळून उतरावे लागते नाहीतर पडण्याचा धोका संभवतो. पुन्हा देवाचे नाव घेऊन पायऱ्या उतरायला सुरवात केली, ही गिरनार पर्वताची मागची बाजू असल्यामुळे थंड वाऱ्यापासून सुटका झाली आणि उतरणे थोडे सुसह्य झाले. दोन हजार पायऱ्या उतरल्यावर पुन्हा काळ्या कातळांनी युक्त चढण समोर उभी राहिली. मनात आले, का आलो आपण येथे ? का यायचे ठरवले ? आता पुन्हा यायचे नाव म्हणून काढायचे नाही. हा भाग पुढच्या डोंगराचा चढण्याचा भाग असल्यामुळे वाहणारे थंड वारे अंगाला झोंबत होते त्यामुळे एव्हढे श्रम करून देखील हुडहुडी भरत होती. अंगात स्वेटर होता परंतु कानाला वारे झोंबत होते. नाकाचे टोक, कानाच्या पाळ्या, हातांची बोटे जाणवतच नव्हती. हातातल्या काठीवर जोर देऊन चढायला सुरवात केली. ही चढण जवळ जवळ ४५ डिग्रीच्या कोनात होती त्यामुळे श्रम जास्त पडत होते, दोन पायऱ्यामधली उंचीही जास्त असल्यामुळे पायांवर खूप ताण पडत होता, छाती धडधडायला लागली होती, जवळचे पाणी संपल्यामुळे घसा कोरडा पडला होता, पण त्याच बरोबर आता लक्ष्यही समोर दिसायला लागले होते. शिखरावरील दत्तात्रयाच्या स्थानावर बांधलेल्या घंटांचा नाद त्या शांत वातावरणात, वारा फिरेल तसा ऐकू येत होता, तेथेच कॅसेट प्लेयरवर लावलेली भक्ती गीते ऐकू येऊ लागली होती. आता पायर्यांवर वर्दळ वाढू लागली होती. दत्तात्रयाच्या पादुकांचे दर्शन घेऊन खाली उतरणारे भाविक जोरजोराने, “जय भोलेनाथ, अलख निरंजन, जय मातादी” वगैरे ओरडून चढणाऱ्या भक्तांचा उत्साह वाढवीत होते. आता सुवासिक उदबत्तीचा गंध, साधू-गोसाव्यांचे मंत्र उच्चारण ऐकू येऊ लागले आणि पादुकांच्या आपण अगदी जवळ पोहोचलो आहे, ह्याची अनुभूती होऊ लागली. शेवटी अंदाजे अकरा वाजण्याच्या सुमारास दत्तात्रयाच्या स्थानापाशी पोहोचलो. डोंगराच्या अत्त्युच टोकावर, अंदाजे शंभर-सव्वाशे चौरस फुट भागात मधोमध दत्तात्रयाच्या दगडी पादुका कोरल्या होत्या. बाजूलाच एक शिवाची पिंडी, जमिनीत खोचलेला एक त्रिशूळ, अश्याच एका खोचून उभ्या केलेल्या लोखंडी सळईला काही पितळी घंटा टांगल्या होत्या. तेथेच एक सतत पेटणारी धुनी होती जिच्या आजूबाजूला, अंगावर, कपाळावर भस्माचे पत्ते ओढलेले, केसांच्या जटा बांधलेले, पूर्णपणे रापलेले आणि अंगावर कमीतकमी वस्त्रे असलेले चार-पाच साधू मंत्र म्हणत बसले होते. एका थाळीत भाविक पैसे वाहत होते, धुनीच्या जवळ पन्नासेक उदबत्त्या एकत्र खोचून पेटत होत्या. आम्ही देखील पादुकांना नमस्कार केला, काही पैसे वाह्यले, साधूंनी कपाळावर त्या धुनितले भस्म लावले. त्या इतक्या उंचीवर कोणतेही छप्पर नव्हते कि भिंती नव्हत्या, त्यामुळे चांगलीच थंडी वाजत होती, वाहणारे वारे कानाला वेगवेगळ्या आवाजाची जाणीव करून देत होते. मुसळधार पावसात त्या ठिकाणी कसे वाटत असेल ह्या विचाराने देखील थोडे धसकायला झाले. आसपास नजर फिरवली तर एका बाजूला अंबामातेच्या देवळाचे शिखर दिसत होते आणि बाकी तिन्ही बाजूला कमी उंचीचे डोंगर आणि जंगल. दूरवर खूप खाली शेताचे वेगवेगळ्या छटातील हिरवे चौकोन आणि त्यांच्या मधूनच जाणारा रस्ता दिसत होता. आता उन वाढायला लागले होते, त्या ठिकाणी पाच-दहा मिनिटे घालवून आम्ही पादुकांना परत एकदा नमस्कार करून उतरायला सुरवात केली. गेली काही वर्षे मनात असलेला विचार पूर्ण झाला आणि तोही पत्नी बरोबर, म्हणून आनंद, समाधान होतेच आणि त्याच बरोबर एक प्रकारची हुरहूर मनात दाटत होती. उतरताना वाटेत भेटणाऱ्या भाविकांना उत्साह देत, देवीचा, दत्तात्रायाचा जयघोष करीत पायथ्याशी पोहोचायला दुपारचे दोन वाजले. म्हणजे प्रवासाला एकूण दहा तास लागले. थकून भागून हॉटेलवर पोहोचलो, एक क्रोसिनची गोळी घेतली, काहीतरी हलके खाऊन घेतले आणि जी ताणून दिली ते सरळ रात्रीच्या जेवणालाच उठलो. पुढचे अनेक दिवस पाय आणि सर्व अंग दुखत होते. मनातील इच्छा पूर्ण झाल्यामुळे समाधान लाभले आणि पुन्हा दत्तात्रयाच्या दर्शनाचे नाव काढायचे नाही असे मनोमन ठरवले.

पुढे २००८ साली भारत सोडून अमेरिकेत येऊन स्थायिक झालो आणि मनात पुन्हा दत्तात्रयाचे विचार पिंगा घालू लागले. वाटले पुन्हा एकदा दत्तात्रायाला जाऊन यावे, बरोबर एक चांगला कॅमेरा घेऊन जावे आणि सुंदर फोटो काढावेत. आधीच्या तिन्ही वारीत जवळ चांगला कॅमेरा नव्हता त्यामुळे ह्या पर्वताचे नयनरम्य तर काही ठिकाणी रौद्र स्वरूप, शांतपणे पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी, कॅमेर्यात बंदिस्त करता आले नव्हते. ती रुखरुख मनात होतीच. अमेरिकेत आल्या आल्या एक चांगला DSLR कॅमेरा आणि लेन्सेस घेतल्या होत्या, आता भारत वारीचे आणि त्याहूनही जास्त दत्तात्रयाचे वेध लागू लागले.

शेवटी २०१२ च्या जानेवारीत भारतवारी नक्की झाली. लगेच मुंबईच्या मित्रांना माझे दत्तात्रयाच्या दर्शनाला जाण्याचे विचार कळवून टाकले आणि त्या सगळ्यांना त्याची तयारी करायला सांगितली. हाताशी अजून तीन महिने होतेच, लगेच मागच्या वेळेसारखे चालायला सुरवात केली, इथे जवळपास उंच डोंगर नसल्यामुळे एका वीस मजली इमारतीत दर शनिवारी आठ-दहा मजले जिन्याने चढण्याचा सराव सुरु केला. मित्रांना देखील नॅशनल पार्कची गांधी टेकडी चढायचा सराव करायची सूचना दिली. मनात उत्साह होताच पण आता वय वाढत होते, शरीर कितपत साथ देईल ह्याची मनात थोडी शंका होतीच. त्यात हळूहळू एक एक करत मित्रांनी माझ्या ह्या मोहिमेतून काढता पाय घ्यायला सुरवात केली. शेवटी आठांपैकी फक्त एकच मित्र बरोबर यायला तयार झाला. २८ जानेवारी २०१२ला मुंबईत उतरलो आणि दुसर्याच दिवशी फ्लाईटने राजकोट गाठले. तेथून एक भाड्याची गाडीकरून रात्रीच जुनागढला जाऊन मुक्काम केला. आमच्या गाडीचा ड्रायव्हर सतरा अठरा वर्षांचा एक तरुण होता त्याने देखील आमच्याबरोबर दत्तात्रयाच्या दर्शनाला यायची तयारी दाखवली. त्याचा जन्म राजकोटचा असून देखील त्याने एकदाही गिरनार पर्वातावर पाय ठेवला नव्हता त्यामुळे त्याला चांगलीच उत्सुकता होती. मी एकूण तीनदा आणि दत्तात्रयापर्यंत एकदा जाऊन आल्यामुळे मला अंदाज आणि अनुभव होता. पण आता वय वाढत चालले होते त्यामुळे थोडी धाकधूक होतीच. पण सर्व विचार बाजूला सारून सकाळी चार वाजता गिरनारचा पायथा गाठला. सर्व जामानिमा मागच्या वेळेसारखाच होता, ह्या वेळी फक्त एक कॅमेरा आणि त्याच्या तीन लेन्सेस जास्तीच्या होत्या. पायथ्याशी असलेल्या हनुमानाचे दर्शन घेऊन चढायला सुरवात केली. मिट्ट अंधार असल्यामुळे शिखर दिसत नव्हते, फक्त ह्यावेळी पायार्याच्या वाटेवर इलेक्ट्रिकचे पिवळे दिवे लावलेले दिसत होते. त्या दिव्यांचा पायाखालची वाट दिसण्यासाठी उपयोग शून्य होता पण ते तिथे आहेत हे त्यांचे अस्तित्व दाखवण्यापुरता त्यांचा उपयोग होत होता. नाही म्हणायला पायर्यांचा नागमोडी रस्ता कसाकसा वर जातो हे कळत होते. अंधाराचा आणखी एक फायदा असतो आणि तो म्हणजे एकूण किती चढायचे आहे हे नवीन व्यक्तीस न कळल्यामुळे, मनावर कोणतेही दडपण येत नाही. जर शिखर आधीच दिसले तर “अजून इतके चढायचे आहे” ह्या विचारानेच छाती दडपून जाऊ शकते. आम्हाला बघितल्याबरोबर, डोलीवाले आमच्याबरोबर चालू लागले. थोड्यावेळाने त्यांनी त्यांची नेहेमीची टेप सुरु केली, “चढण किती अवघड आहे, वाटेत पाणी देखील मिळत नाही, जंगली श्वापदं एकट्या-दुकट्यास धरून जाऊ शकतात” वगैरे वर्णन करू लागली. पण आमचा निर्धार बघून ते शेवटी माघारी फिरले. हवेत कमालीचा गारवा होता, सर्वत्र शांतता पसरली होती, नजर जाईल तिथपर्यंत निरभ्र आकाशातले तारे चमचम करताना दिसत होते. पूर्वेला शुक्राची तेजस्वी चांदणी लवकरच सूर्योदय होणार हे सांगत होती. जंगलातले विविध पक्षी मनमोहक आवाजात एकमेकांना साद घालीत होते. जसजसे वर चढत होतो, तसतसे जुनागढ शहर खाली खोल खोल जात होते. शहरातले पिवळे, पांढरे दिवे आकाशातल्या तार्यांशी स्पर्धा करीत होते. हातातल्या कॅमेराचे वजन होतेच तरी देखील लवकर उजाडेल आणि सुंदर फोटो टिपता येतील ही आशा होती. अंधारातच जैन देरासर मागे टाकले आणि वर चढत राहिलो. आता उजाडू लागले होते आणि पायाखालची वाट दिसायला लागली होती. पूर्वेकडून सूर्य उगवायच्या आधी, सहस्ररश्मी येत आहे हे सांगायला त्याची पिवळी, तांबूस किरणे पसरली होती. पक्षी आकाशात उडताना दिसू लागले होते, हवेत एक प्रकारचा गंध पसरला होता. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत आमचे चढणे चालूच होते. अंदाजे ८ वाजता आम्ही अंबे माताच्या डोंगरावर पोहोचलो. देवीचे दर्शन घेतले, प्रसाद घेतला, समोरच्याच हॉटेलमध्ये उभ्यानेच चहा घेतला आणि न थांबता पुढे चालायला लागलो. समोरच दत्तात्रयाचा उभा काळा कभिन्न, पूर्ण कातळांनी भरलेला डोंगर दिसत होता. आता दोन हजार पायर्या उतरायच्या होत्या आणि पुढे तीन हजार पायऱ्या चढायच्या होत्या. इथपर्यंत चढूनच पायात गोळे आले होते, आता उतरताना काठीचा चांगलाच उपयोग होऊ लागला होता. शरीराचा पूर्ण भार काठीवर टाकून झपाझप उतरू लागलो. हा सर्व भाग भक्कम काळ्या दगडांच्या पायर्यांचा आहे. पायर्यांच्या दोन्ही बाजूला भिंत आहे त्यामुळे आधारासाठी भिंत धरता येते. लवकरच उतरून झाले आणि पुन्हा चढ सुरु झाला. हा चढ चांगलाच उभा, कित्येक ठिकाणी जवळ जवळ ४५ डिग्रीत आहे. दोन पायर्यांतील अंतर देखील काही ठिकाणी जास्त आहे, त्यामुळे चांगलीच दमछाक झाली. काठीवर भार टाकत एक एक पायरी चढत राहिलो, काही ठिकाणी भिंतीवर रेलून थोडा श्रमपरिहार केला. आता अचानक थंड वारे वाहायला लागले होते, त्यामुळे कानात वारा शिरत होता आणि थंडी वाजत होती. हाताचे पंजे गार पडू लागले होते त्यामुळे कॅमेर्याने फोटो काढणे देखील अवघड होऊ लागले होते. तरी जमतील तसे फोटो काढत होतो. खुपसे चढून आल्यावर तोच परिचित धूप, उदबत्तीचा सुगंध दरवळू लागला, घंटानाद ऐकू येऊ लागला. आता समोरच शिखर दिसत होते, त्यामुळे अंगात उत्साह संचारला. उरलेल्या पायर्या भराभर चढत शिखरावर पोहोचलो. आता शिखरावर एक टुमदार देऊळ बांधलेले दिसत होते, मधोमध पादुका, बाजूलाच शिवलिंग, त्रिशूळ आणि त्याच्याच बाजूला एक अग्निकुंड धगधगत होते. देवळात खुपश्या उदबत्त्या, धूप पेटवला होता त्यातच यज्ञकुंडातला धूर पसरला होता त्यामुळे तेथे एक प्रकारचे गूढ वातावरण पसरले होते. देवळात दोन साधू आणि एक सरकारी कर्मचारी (हे त्याच्या अंगातल्या युनिफॉर्ममुळे कळले) बसला होता. एक जमिनीत घट्ट बसवलेली, कुलूप लावलेली दानपेटी होती. पादुकांवर फुले, अक्षता गंध तसेच खुपसे पैसे वाहिले होते. एका मोठ्या थाळीत साखरफुटाणे, फुले, पैसे, कुंकू होते. आम्ही देखील दर्शन घेतले आणि तेथेच बाजूला बसलो. थोडा वेळ डोळे मिटून देवाची प्रार्थना म्हंटली, आणि समोरच्या थाळीत काही पैसे ठेवले. एका साधूने आम्हाला थोडा प्रसाद आणि फुले दिली. देवळातून बाहेर आलो आणि थंड जोरदार वारे अंगाला झोंबू लागले. तरी हिम्मत करून देवळाला एक प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा घालताना इतक्या उंचावर निसर्गाचे ते रौद्र स्वरूप बघून त्यापुढे आपण किती क्षुद्र आहोत ह्याची जाणीव झाली. इतक्या उंचावर बाराही महिने, अगावरच्या जेमतेम वस्त्रानिशी राहणाऱ्या साधू, बाबा, जोगी, गोसाव्यांविषयी कौतुक मिश्रित आदर वाटू लागला. जोरदार वाहणाऱ्या थंड वार्यात कशीबशी प्रदक्षिणा पूर्ण करून आम्ही उतरायला लागलो. वाटेत खूप ठिकाणी फोटो काढले, वर चढणाऱ्या भक्तांना गुरु दत्तात्रयाचा जयघोष करीत हिम्मत दिली आणि शेवटी दुपारी एकच्या सुमारास पायथ्याशी पोहोचलो. पायथ्याशी मॉलिश करणारी मंडळी उतरणाऱ्या भक्तांना मॉलिश करवून घेण्याची विनंती करीत होती. आपल्याहून मोठ्या वयाच्या व्यक्तीला आपल्या पायांना हात लावू देणे मला प्रशस्त कधीच वाटले नव्हते, त्यामुळे ह्या आधी कोणत्याही व्यक्तीला कधीही पायांना हात लावू दिला नव्हता. परंतु मॉलिश केल्याने पाय दुखत नाहीत हे एका माहितगाराकडून कळल्यामुळे एका मॉलिशवाल्याकडून पोटर्यांना आणि तळपायांना मॉलिश करून घेतले. तेथल्याच एका हॉटेलमध्ये जेवलो आणि कारने परतीचा राजकोटचा रस्ता पकडला.

मी हे दत्तात्रयाचे दर्शन दुसर्यांदा घेतले होते. मनात काही वर्षे घोळत असलेल्या विषयाला पूर्णविराम मिळाला होता. हवे तसे फोटो काढायला मिळाले होते महत्त्वाचे म्हणजे चढताना अथवा उतरताना, दत्तात्रयाच्या आशीर्वादाने आणि अंबे मातेच्या कृपेने काही विघ्ने आली नव्हती. थकायला तर भरपूर झाले होते पण एक अघोषित संकल्प पूर्ण झाल्याचे समाधान लाभले. मन एकदम प्रसन्न झाले आणि डोळे भरून आले.

आता ह्या गोष्टीला देखील तीन वर्षे उलटली आणि मनात पुन्हा दत्तात्रयाचे विचार घोळू लागले आहेत. मग येता का मंडळी माझ्याबरोबर ?
Girnar Entrance

प्रतिक्रिया

सौन्दर्य's picture

13 Apr 2015 - 7:25 pm | सौन्दर्य

GirnarGirnar

मस्त लेख. फोटो अजून असायला हवे होते लेखात.

प्रचेतस's picture

13 Apr 2015 - 9:22 pm | प्रचेतस

हेच म्हणतो.

खेडूत's picture

13 Apr 2015 - 7:51 pm | खेडूत

चांगली माहिती ,
त्यावरून हा एक धागा आठवला .

कविता१९७८'s picture

13 Apr 2015 - 8:54 pm | कविता१९७८

छान माहीती, एकदा जायला हवे

वेल्लाभट's picture

13 Apr 2015 - 9:21 pm | वेल्लाभट

फोटो पुरलेच नाहीत. शॅ!

सौन्दर्य's picture

13 Apr 2015 - 10:05 pm | सौन्दर्य

मिपावर फोटो अपलोड करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता त्यामुळे फक्त निवडक फोटो अपलोड केले. अजून काही चांगले फोटो आहेत ते लवकरच लोड करीन म्हणतो. प्रतिसादांबद्दल आभार.

बापरे!! फारच अवघड दिसतय हे प्रकरण!
लेखन आवडले व त्या ठिकाणी जाऊन आल्यासारखे वाटले, आता प्रत्यक्ष जायला नको.

विअर्ड विक्स's picture

14 Apr 2015 - 11:25 am | विअर्ड विक्स

या होळीला गिरनार दर्शन झाले. पायर्यांची संख्या प्रत्येकजण वेगले सांगतात. आम्हाला ९९९९ सांगण्यात आल्या. पहिल्या ३ हजार पायरयापर्यंत क्रमांक नोंदवलेले आहेत. गिर-सोम्नाथ -गिरनार अशी सहल होती. लेख लिहायला फार आळस केलेला आता आपला लेख पाहून लवकरच उरकायला लागेल असे दिसतेय ….

सौन्दर्य's picture

14 Apr 2015 - 7:12 pm | सौन्दर्य

विवी, तुमचे पण अनुभव येऊ द्यात की. वाचायला आवडतील. मी देखील हा लेख ३ वर्षानंतर लिहितोय.

विअर्ड विक्स's picture

14 Apr 2015 - 8:38 pm | विअर्ड विक्स

टंकवीतो लवकरच अजून कोणी नंबर लावण्याआधी ...

कविता१९७८'s picture

14 Apr 2015 - 11:40 am | कविता१९७८

गोसावी आणि गुहेत राहणार्‍या साधुंची भीती असते म्हणजे गृपने जाणेच योग्य ठरेल का की दोन-तीन जणांनी गेलेले चालेल, खरंच वाघांपासुन तिथे काही भीती आहे का?

विअर्ड विक्स's picture

14 Apr 2015 - 12:34 pm | विअर्ड विक्स

गिर आणि जुनागढ जवळपास ६० किमी अंतरावर आहे. त्यामुळे वाघ आणि सिंह येथे येतात हि तर अफवा आहे. कारण पायर्या सोडल्या तर दोन्ही बाजूला दाट झादिसुद्धा नाही आहे. गिरनार मंदिराच्या प्रवेशाच्या उजव्या हातास जुनागड forest department चे कार्यालय आहे. तेथेसुद्धा सावधानतेच्या सूचना पाहण्यात नाहीत.

group ने यासाठी जावे कि कारण सरसकट पायर्या चढताना सोबत असलेली केव्हाही चांगली.

कविता१९७८'s picture

14 Apr 2015 - 12:52 pm | कविता१९७८

कुठल्या स्टेशन वर उतरुन पुढे कसे जायचे , राहण्याची सोय, याची डीटेल मधे माहीती मिळेल का,

विअर्ड विक्स's picture

14 Apr 2015 - 1:42 pm | विअर्ड विक्स

by flight - जुनागडला विमानतळ आहे पण चालू नाही. राजकोटला विमानाने उतरून २-२.३० तासात जुनागड गाठू शकता.
by train - जुनागडला जाण्यासाठी बर्याच ट्रेन आहेत. गिरनार हे जुनागड पासून अंदाजे १० किमी अंतरावर आहे. जुनागडला पोहोचताच आपल्याला एका पर्वत रांगेचे दर्शन घडेल तेच गिरनार ! कारण गिरनार सोडला तर तेथे पूर्ण मैदानी परिसर आहे. येथे लोकल रिक्षा पायथ्याशी सोडतील. गिरनारच्या पायथ्याशी साधूंच्या घरी सुद्धा राहण्याची व्यवस्था होते. पायर्यांच्या सुरुवातीस मारुती मंदिर आहे तेथे सोय होते. पैसे आपल्या मर्जीनुसार द्यावेत.महत्त्वाचे सांगायचेच राहिले कि साधूंचे घर असले तरी स्वच्छता असते आणि गरम पाणी सुद्धा मिळते. जुनागड तसे बर्यापैकी विकसित आहे पण तेथील हॉटेल मध्ये राहिलेलो नाही त्यामुळे माहिती देऊ शकत नाही. गीरनार चढायला साधारणतः तेथील लोक सकाळी ५ वाजता सुरुवात करतात. पण परतीच्या प्रवासात थोडे उन लागते. त्यामुळे बरोबर खाणे पिणे असेल तर शक्यतो रात्री १२.० वाजता सुरुवात करावी म्हणजे सकाळी ५.० वाजता मंदिर उघडण्याच्या वेळेस आपण तिथे हजार असाल. तसेच ६.- ६.३० ला परतीचा प्रवास सुरु केला तरी सकळी १०.० पर्यंत खाली उतराल.

डोली ने जाणार असाल तर माणशी ५- २० हजार इतका खर्च येतो. आपल्या वजनावर नि आपल्या पेहरावावर भाव ठरतो. ६० किलोपर्यंत ५ हजार रुपये घेतात त्यापुढे वजन असेल तर त्यांच्या मर्जीने भाव ठरतो. डोली म्हणण्यापेक्षा तो एक प्रकारचा झोपाळा च आहे. अनुभवाने ठरवा.

गिरनार दर्शनाचा स्वानुभव तर अविस्मरणीय आहे. तो लवकरच टंकीन.

कविता१९७८'s picture

14 Apr 2015 - 2:16 pm | कविता१९७८

धन्यवाद, डोली ने जाण्याचा प्रश्नच नाही , दर्शनापेक्षा पर्वत चढायची इच्छा जास्त आहे.

विअर्ड विक्सनी चांगलीच माहिती दिली. गोसावी,साधूंची भीती अश्यासाठी म्हंटले आहे की त्यांचा पेहराव, त्यांचे वागणे, त्यांचे बोलणे हे फार वेगळे असते,कित्येकांच्या हातात चिलीम वगैरे असते. त्यांच्या गुहेत गेल्यास ते बळजबरीने देवासमोर पैसे वगैरे ठेवायला भाग पडतात. सर्व तसे नसतील तरी एकट्या-दुकट्याने त्यांच्या गुहेत न शिरलेलं बरं. गिरनार जवळच गिर जंगल आहे जे सिंहासाठींचे अभयारण्य आहे. उन्हाळ्यात, दुष्काळ असल्यास ते त्यांचे जंगल सोडून इतरस्त भटकू शकतात. जरी गिरनारच्या पायर्या चढताना आसपास दाट झाडी नसली तरी रात्रीच्या/पहाटेच्या अंधारात सावध असलेलं केव्हाही चांगलं. जुनागढ शहरातील हॉटेल्स ठीक आहेत. २०१२साली मी आणि माझा मित्र एका रात्रीचे आठशे रुपये देऊन राहिलो होतो. हॉटेलवाल्याला सांगून ठेवल्यास भल्या पहाटे चार वाजता देखील रिक्षा मिळू शकते. रिक्षा साधारणपणे पन्नास ते ऐंशी रुपये घेते, मीटर नसल्यामुळे भाव आधीच करणे श्रेयस्कर. शक्य असल्यास रात्रीच बारा-एकच्या सुमारास चढायला सुरवात करावी. रात्रीच्या अंधारात हवामान थंड असल्याने श्रम कमी पडतात तसेच अजून किती चढायचे आहे हे न कळल्यामुळे मनावर ताण येत नाही. एकट्याने जाताना कंटाळा, थकवा येऊ शकतो म्हणून ग्रुपने चढणे योग्य. चढताना एक काठी अवश्य घ्यावी, कमीत कमी सामान बरोबर असावे. अंगात स्वेटर, कानटोपी, मफलर असलेला बरा कारण सुरवातीला थंडी वाजते, जसजसे चढण्याचे श्रम होतात, उकाडा होतो आणि शेवटी दत्तात्रयाच्या पायर्या चढताना वाहणाऱ्या वार्यामुळे खूप थंडी वाजू शकते. वाटेत खाण्यापिण्यासाठी अंबाजीच्या शिखरापर्यंत अधेमधे सोय आहे परंतु दत्तात्रयाच्या पायर्या चढताना तशी सोय नाही त्यामुळे स्वताजवळ थोडेफार खाण्याचे पदार्थ (सुकामेवा) बाळगणे योग्य. डोली फार महाग पडते आणि ती आरामदायक नाही. जुनागढला अजूनही दोनचार प्रेक्षणीय स्थळे आहेत त्यामुळे दोन दिवस जुनागढला राहू शकता, पहिला दिवस प्रेक्षणीय स्थळांसाठी आणि दुसरा दिवस गिरनार दर्शनासाठी. मी राजकोटला पाच वर्षे राहिल्यामुळे आणि जुनागढ हे माझे मार्केटींगचे क्षेत्र असल्यामुळे ह्या प्रदेशाची बर्यापैकी माहिती आहे. अजून काही माहिती हवी असल्यास कळवावे. सर्व प्रतिसादांसाठी आभार.

जुइ's picture

14 Apr 2015 - 11:52 pm | जुइ

ह्या नव्या ठिकाणाची माहिती करुण दिल्याबद्दल आभारी आहे. आपण चिकाटीने हा खडतर मार्ग दोनदा सर केल्याबद्दल अभिनंदन!!!

क्रेझी's picture

15 Apr 2015 - 10:01 am | क्रेझी

२०१० मधे मी, माझे बाबा आणि माझा भाऊ असे आम्ही तिघेजण गिरनार पर्वताची वारी करून आलो. माझ्या आई-बाबांनी २००९ मधे पहिल्यांदा इथे भेट दिली आणि त्यानंतर खास आम्हा दोघांना हा १०००० पाय-यांचा अनुभव काय असतो हे दाखवायला म्हणून मुद्दाम घेऊन गेले.

गिरनार पर्वताच्या पायथ्याशी ब-याच गावक-यांची घरे आहेत जेथे रहायची व्यवस्था होऊ शकते अगदी माफक दरात.तिथे धर्मशाळा सुध्दा आहे पण साधारण थंडीच्या दिवसांमधे किंवा फेब्रुवारीपर्यंत तिथे जागा बुक्ड असतात. असो, तर आम्हांला तिथे एका घरामधे एक खोली मिळाली. बाबांना आधीचा अनुभव असल्यामुळे खाण्या-पिण्याचं काय न्यायचं आणि पहाटे किती वाजता सुरूवात करायची हे सगळं माहित होतं. त्यानुसार आम्ही दुस-या दिवशी पहाटे ४वाजता तयार होऊन खाली आलो. जिथे राहत होतो त्याच माणसाकडून प्रत्येकासाठी एक मोठी काठी घेतली आणि चढायला सुरूवात केली. सोबत फक्त ऑरेंजच्या गोळ्यांची तिन पाकिटं घेतली.

आमच्या सोबत ब-याच लोकांनी चालायला सुरूवात केली. ते सगळेजण राजस्थान का कुठून तरी आले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या ग्रुपमधे अगदी ६महिन्याच्या बाळापासून ते वय वर्षे ७० पर्यंतची सर्व लहान-मोठी मंडळी, बायका होत्या.

सुरूवातीला अंधार होता तेंव्हा आणि उत्साह होता त्यामुळे भराभर आम्ही १००० पाय-यांचा टप्पा ओलांडला. पुढे ५००० पाय-यांचा टप्पा येईतो साधारण ८वाजून गेले होते मग मात्र पाय अगदी जड आणि जॅम झाले होते.

उन्हामधे आजूबाजूचा निसर्ग स्वच्छ दिसत होता. इतक्या दाट जंगलामधे असं काहितरी कोणीतरी बांधून उभं केलंय ह्यावर विश्वासच बसत नव्हता! जेंव्हा पाय-या उतरून परत वर चढण दिसायला लागली तेंव्हा वाटलं आपण चायना वॉलच बघतोय समोर!

सकाळी ११वाजता एकदाचे आम्ही पोहोचलो मंदिरापाशी! दर्शन घेतलं, घंटा वाजवली आणि बाहेर पडलो.

तिथे असं समजलं की, मंदिरामधे बांधलेली घंटा वाजवली की तिचा आवाज स्वर्गामधे ऐकू जातो. त्या मंदिराची उंची पाहता मला वाटलं खरंच असं होतही असेल ;) म्हणून आम्ही परत एकदा जाऊन घंटा वाजवून आलो :p

उतरतांना जवळपास धावतच आम्ही खाली उतरलो.तरी तीन-एक तास लागले आम्हांला.

गिरनार पर्वत चढून-उतरून खाली येणं हा शारिरीक कसोटीचा पण मानसिक समाधानाचा अत्युच्च बिंदू वाटला निदान माझ्यापुरता तरी :)

कविता१९७८'s picture

15 Apr 2015 - 12:07 pm | कविता१९७८

गिरनार पर्वत चढून-उतरून खाली येणं हा शारिरीक कसोटीचा पण मानसिक समाधानाचा अत्युच्च बिंदू वाटला निदान माझ्यापुरता तरी :)

मलाही त्यासाठीच जायचंय.. पदयात्रा करते तेव्हाही अनुभवतेच पण गिरनार पर्वत ही चढायची इच्छा आहे.

सौन्दर्य's picture

15 Apr 2015 - 8:32 pm | सौन्दर्य

गिरनार पर्वत चढून-उतरून खाली येणं हा शारिरीक कसोटीचा पण मानसिक समाधानाचा अत्युच्च बिंदू वाटला निदान माझ्यापुरता तरी :) - एकदम सहमत. छान अनुभव.

विअर्ड विक्स's picture

15 Apr 2015 - 10:48 am | विअर्ड विक्स

गिरनार चढ उतार ( जेवण , साधुभेट ) धरून ६.४५ तासात संपविला आहे. हे जेव्हा तिथल्या लोकांना सांगितले तर त्यांना धक्काच बसला…. थरार लवकरच डकवितो.

कविता१९७८'s picture

15 Apr 2015 - 12:04 pm | कविता१९७८

वाट पाहतोय..

सविता००१'s picture

15 Apr 2015 - 1:55 pm | सविता००१

फार कुतूहल आहे.

मॅक's picture

15 Apr 2015 - 12:55 pm | मॅक

मस्तच......

जयन्त बा शिम्पि's picture

16 Apr 2015 - 12:30 am | जयन्त बा शिम्पि

आम्ही सुद्धा गिरनार पर्वतावर दोन वेळा थेट ' दत्ताच्या पादुका ' पावेतो जावून आलो आहोत. पहिल्या वेळी गिरनारला जाण्यापुर्वी, मला वडिलांकडून योग्य मार्गदर्शन मिळाले होते. वडिलांनी सांगितले होते कि जातांना नाश्ता , फराळ वगैरे काहीही खावयाचे नाही. फारच तहान लागली तर दोन नारळ सोबत ठेवायचे. एक अंबाजी मातेच्या मंदिराजवळ फोडून, त्यातील पाणी प्यावयाचे व आतील खोबरे खावयाचे. दुसरे नारळ , दत्ताच्या पादुका जेथे आहेत , तेथे फोडून , खोबरे खावयाचे. फराळाचे जिन्नस सोबत न्यायचे , पण येतांना खाण्यासाठी ! ! इतर काही वजन वाढेल असे सोबत न्यावयाचे नाही. १९७९ च्या मे मधील ते दिवस होते. दोन्ही मुलांना ( वय वर्षे साडेतीन व सव्वा दोन वर्षे ) घेवून तर गिरनार चढणे शक्यच नव्हते. पण ज्यांच्याकडे आम्ही आदल्या दिवशी मुक्कामी थांबलो होतो , त्या जुनागढ निवासी नातेवाइकांनी, आमच्या दोन्ही मुलांना , सांभाळण्याची हमी घेतल्याने , आम्ही हे धाडस करावयाचे ठरवीले. त्यांनी आम्हाला फराळ म्हणुन
दशम्या, चटणी करुन दिली होती. सुचनेप्रमाणे आम्ही दोन नारळ सोबत घेतले होतेच.कमीत कमी वजन म्हणुन मी पायजामा व साधा शर्ट घातला होता आणि विशेष म्हणजे पायात काहीही न घालता , अनवाणी निघालो होतो. त्यावेळी ' बिसलरि ' ची फ्याशन नव्हती, त्यामुळे पाण्याची साधी बाटली सुद्धा जवळ घेतली नव्हती. नातेवाइकांचा , इयत्ता आठवीत असणारा मुलगा आमच्या बरोबर येणार होताच. जनागढ एस टी बस स्थानकावरुन ' गिरनार तळेठी ' ( गिरनार पायथा ) येथे जाण्यास निघालो. बरोबर साडेसहा वाजता , आम्ही गिरनारच्या पायर्‍या चढण्यास सुरवात केली.जैन मन्दिरे येतांना पहाण्याचे अगोदरच ठरवून ठेवल्याने , आम्ही फारच कमी वेळात अंबाजी मातेच्या मंदिराजवळ जावून पोहोचलो. जरी मे चा महीना असला तरीही, सकाळी सकाळी थंडगार वारा आमच्या सोबतीस होता, त्यामुळे फारसे श्रम असे झालेच नाहीत. ठरल्याप्रमाणे एक नारळ फोडून, त्यातील पाणी पिवून, तहान शमविली आणि खोबरे खाता खाता, चढण्यास सुरवात केली. पाच सहा पायर्‍या चढायच्या आणि पुन्हा सपाट प्रुष्ठभागावर पाच सहा पावले चालत जाणे , असा तो मार्ग आक्रमावा लागतो. पथ्य पाळल्याने , आम्ही अवघ्या दोन तासात , दत्ताच्या पादुकांजवळ पोहोचलो.( अर्थात , दोन्ही मुलांना घरी टाकून आलो होतो त्यामुळे , त्यांनी नातेवाइकांना त्रास देण्याच्या , अगोदर घरी पोहोचण्याची काळजी हेही एक जलद गतीचे कारण होतेच ! ! ) दत्ताच्या पादुकांचे दर्शन घेवून, तेथे एक नारळ फोडला. थोडी विश्रांती घेवून, खाली उतरण्यास सुरवात केली.खरोखर भूक लागल्याने, अंबाजी मंदिराजवळ , सोबत आणलेला फराळ खाल्ला. पाणी-विक्रेते होतेच. पाणी पिवून, खाली उतरावयास लागलो. " चढणे कठीण , पण उतरणे सोपे " अशी समजूत होती, पण येथे तो अंदाज चुकला ! ! अंबाजी माता मन्दिर ते जैन मन्दिर याच्या दरम्यान, आमच्या पायात , विशेषत: पोटर्‍यात चांगलेच गोळे आल्याचे जाणवू लागले.
जैन मंदिर पाहुन झाल्यानंतर तर एकेक पाउल टाकतांना , जणू हत्तीच्या पावलाप्रमाणे ,पावले पडत गेलीत. साडेबारा च्या सुमारास आम्ही घरी पोहोचलो.मुलांनी काहीही त्रास दिला नव्हता , हे समजल्यावर फार फार बरे वाटले.
मागील अनुभव जमेस असल्याने , १९९१ साली , पुन्हा एकदा , गिरनार चढाई , पुर्ण करुन आलो.

श्रीरंग_जोशी's picture

16 Apr 2015 - 7:19 am | श्रीरंग_जोशी

अनुभवकथन खूप आवडले. लेखनशैली एकदम खुसखुशीत आहे.

मुक्तागिरीला असा पायर्‍या चढण्या-उतरण्याचा अनुभव आहे. परंतु तुमच्या गिरनार मोहिमेच्या तुलनेत ते काहीच नाही.

प्रतिसादांमध्ये इतरांनी लिहिलेले अनुभवही आवडले.

स्पंदना's picture

16 Apr 2015 - 6:41 am | स्पंदना

काय सुंदर ठिकाण आहे हे! खरच!
या लेखामुळे बाकिच्या लोकांचे अनुभव कथन वाचायला मिळाले.
मस्त वाटल सगळेच अनुभव वाचताना.

अनुभव आवडले सर्वांचेच. डोंगर चढायची केवळ आवड असल्यानेच माझी भटकंती चालते परंतू शारिरिक क्षमता नाही. पायऱ्या पाहिल्या की(सप्तश्रृंगीची जुनी वाट ,विरारची जिवदानी वगैरे) धडकीच भरते कारण पाय फार दुखतात यापेक्षा खडी चढण परवडते. उतरताना मात्र हळूहळू एकेक पायरी उतरण्यापेक्षा धावत उतरल्याने त्रास कमी वाटतो आणि तसेच करतो. सह्याद्रीचे चढ पश्चिमेला असल्याने दुपारी दोनला चढताना उन पाठीवर सैकवर पडते आणि तासातासाने सौम्य होते त्यामुळे दुपार बरी वाटते शिवाय वरती आसरा असतो आराम करून दुसरे दिवशी निघता येते. असे बहुतेक गिरनारला करता येत नसावे त्यामुळे त्रासदायक ठरत असेल. (माझी मते पटण्यासारखी नसतील)तिकडे न जाताच लिहिले आहे क्षमस्व.

दिपक.कुवेत's picture

16 Apr 2015 - 3:29 pm | दिपक.कुवेत

कठिण काम दिसतय. पण गिरनार बघायची/चढायची उत्सुकता ताणली गेलेय. फोटो अजून असले तर नक्कि अ‍ॅड करा

सस्नेह's picture

16 Apr 2015 - 6:21 pm | सस्नेह

पहिला फोटो बघूनच धडकी भरली !
तेवढं दत्तमहाराजांच्या पादुकांचं दर्शन आम्हालाही घडवलं असतंत की !

सस्नेह's picture

16 Apr 2015 - 6:21 pm | सस्नेह

पहिला फोटो बघूनच धडकी भरली !
तेवढं दत्तमहाराजांच्या पादुकांचं दर्शन आम्हालाही घडवलं असतंत की !

अनय सोलापूरकर's picture

17 Apr 2015 - 3:53 pm | अनय सोलापूरकर

लेख
असाचअनुभव शिखरजी यात्रेचा आहे जम्ल्यास टन्क्तो
http://en.wikipedia.org/wiki/Shikharji