अंजनेरी, नाशिकपासून जेमतेम वीसएक किमी असलेले गाव. त्र्यंबकेश्वराला जवळजवळ खेटूनच असलेले. गावापाठीमागेच असलेल्या अंजनेरी -ब्रह्मगिरीच्या सणसणीत कातळीभिंतींमुळे अतिशय लक्ष्यवेधी. अंजनेरी किल्ला आणि कातळकोरीव जैन लेणी ह्याच डोंगरावर. हनुमानाचे जन्मस्थान म्हणून अंजनेरी प्रसिद्ध. ह्याच लहानशा गावात भारतातील एक प्रसिद्ध संस्था आहे ती म्हणजे भारतीय नाणेशोध संस्थान अर्थात 'इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ रिसर्च इन न्यूमिस्मॅटिक स्टडीज'. लोकप्रभेच्या गेल्या पर्यटन विशेषांकात प्रा. पद्माकर प्रभुणे सर जे स्वत:ही नाणकशास्त्राचे उत्कृष्ट संशोधक आहेत ह्यांनी ह्या संस्थेवर एक उत्तम माहितीपूर्ण लेख लिहिला होता.
ह्याच अंजनेरीत यादवकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेली तब्बल १६ मंदिरे विखुरलेली आहेत. यातली बहुसंख्य मंदिरे ही जैन असून उर्वरित ४ हिंदू मंदिरे आहेत. आज ही सर्वच मंदिरे बहुतांशी भग्नावस्थेत आहेत.
ही सगळी मंदिरे यादवकालीन. साधारण ११ व्या, १२ व्या शतकात ही बांधली गेली तेव्हा देवगिरीचे यादव हे सार्वभौम नव्हते. ते कधी राष्ट्रकूट तर कधी चालुक्यांचे महाअमात्य होते. तेव्हा यादवांची राजधानी नाशिकजवळचे सिंदिनेर अर्थात सिन्नर ही होती. तर अंजनेरी येथे यादवांचीच एक शाखा अधिष्ठित होती. सेऊणचंद्र यादव (तिसरा) जो यादवांचा एक महासामंत असावा हा मुख्य यादवांपैकी नाही कारण हेमाद्रीचे राजप्रशस्तीत किंवा यादवांचे इतर लेखांतही ह्याचा उल्लेख आढळत नाही. ह्या सेऊणचंद्राचा एक शिलालेख मात्र इकडे आहे. यादवांची इकडील शाखा जैन धर्माचे पालन करत असावी किंवा ह्यांच्या घरामधील एक महाल जैन घराण्यातील असावा त्यामुळे इथे जैन मंदिरांची संख्या जास्त आहे.
इथे नागर, फांसना आणि भूमिज अशा विभिन्न शैलीची मंदिरे आहेत. त्यामुळे मंदिरशैलीचा अभ्यास करणार्यांना इथे पर्वणीच आहे.
प्रसिद्ध ब्रिटिश संशोधक हेन्री कसिन्स यांच्या (Henry cousins- Medieval Temples of Dakhan) ह्या पुस्तकांत ह्या मंदिरांविषयीचा उल्लेख पुढीलप्रमाणे येतो.
The village of Anjaneri picturesquely situated on the eastern slope of the northern spur of Anjaneri or Anjaneri hill, about fourteen miles west of Nashik. Just below the village, in the plain, scattered over an area about half a square mile, there have been innumerable small shrines, of which sixteen now stand in whole or in part, while rest are represented by mounds upon which lie heap of their material- columns, images,beams, and other carved stones. The most striking feature about these remains is that they all appear to have built upon a small scale, and they are independent temples and not satellites to a larger one. They all seem to rest upon a brick foundations, and have been dedicated to various deities, the most important being Jaina, Two Vaishnava and the rest Shiva. They face all four points of the compass.
नाशिकहून एकदा वैतरणा धरणावर फेरफटका मारायला जाणार होतो तेव्हा तेथील एक डोंगरभटका मित्र हेमंत पोखरणकर त्याने वाटेतील अंजनेरी गावात काही जुनी मंदिरे आणि शिलालेख आहेत त्यांना अवश्य भेटी दे असे आग्रहाने सांगितले होते. तेव्हा मंदिरे बघण्यात काडीचाही रस नसलेल्या भावंडांबरोबर वैतरण्यावर फेरफटका मारून परत येताना गाडी अंजनेरीत गावातून आत वळवली. गाडी कच्च्या रस्त्याला लगेचच एक डावीकडे लहानसे मंदिर दिसते.
नागर शैलीत बांधलेले हे लहानसे मंदिर. ह्याला सभामंडप नसून मुखमंडप आहे. जो दोन नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे. प्रवेशद्वारातील नकसदार चौकट आहे. द्वारपट्टीकेवरील गोमटेश्वर आदी जैन प्रतिमांवरुन हे मंदिर जैन आहे हे अगदी सहजच ओळखू येते. गर्भगृह मूर्तीरहित आहे.
१. मंदिराचा दर्शनी भाग
२. नागर शैलीतील शिखर
मुखमंडपातील उजवीकडच्या स्तंभाच्या जंघेखालती एक देवनागरी शिलालेख आहे. "रवंळरनाथ जोगी". हा बहुधा एखादा जैन योगी असावा.
३. देवनागरी शिलालेख
४. द्वारपट्टीकेवरील जैन मूर्ती
५. जळमटांमध्ये विखुरलेल्या गोमटेश्वर प्रतिमा
६. प्रवेशद्वारांवरील प्रतिहारी
हे मंदिर पाहून पुढे सरकलो. थोडे पुढे जाऊन सरळ गेल्यास दोन हिंदू मंदिरे तर डावीकडे वळल्यास ३ मंदिरे आणि २ मठांचे एक संकुल दृष्टीस पडते तर संकुलाच्या समोरच अजून एक भग्न मंदिर आहे.
सर्वप्रथम हे मंदिरसंकुल पाहूयात.
तीन मंदिरे व दोन मठांचे असे हे जैन संकुल पैकी एका मंदिरात सेऊणचंद्र यादव (तृतीय) ह्याचा स्पष्ट असा देवनागरी भाषेतील शिलालेख. संकुल बहुतांशी भग्नावस्थेत असून वीरगळ, मूर्ती, मंदिराचे तुटलेले स्तंभ्, आमलक असे जागोजागी विखुरलेले आहेत.
७. मंदिरसंकुल
८. मंदिरसकुल पाठीमागच्या बाजूने
संकुलाच्या प्रवेशद्वारातून आत येताच अवशेषांमधून वाट काढत काढतच आपले मंदिर दर्शन सुरु होते. डावीकडच्या मठात कित्येक मूर्ती तशाच ठेवलेल्या आहेत. मग त्यात कधी गणपती दिसतो, कधी महावीर, कधी सरस्वती, कधी यक्ष, कधी वीरगळ तर कधी इतर जैन देवता.
९. मठात विखुरलेल्या मूर्ती -गणपती
१०. मठात विखुरलेल्या मूर्ती
११. मठात विखुरलेल्या मूर्ती- महावीर
https://lh5.googleusercontent.com/-1UuDKesPgtA/UZM_kKWdFkI/AAAAAAAAYms/k...
१२. मठात विखुरलेल्या मूर्ती- हिंदू देवता
१३. ह्या मठासमोरच कित्येक वीरगळ हारीने मांडून ठेवलेले आहेत आणि ह्यातले काही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
१४. काही वीरगळ
१५. काही वीरगळ
१६. ह्या वीरगळाचे खालचे बाजूच्या चौकटीत एक सैनिक दुसर्या सैनिकाचे केस धरुन त्याला ओढताना दाखवला आहे.
१७. तर ह्या वीरगळात दोन वीर धराशायी झालेले दिसत आहेत.
ह्या इथेच अजून एक आगळावेगळी शिळा आहे. प्रथमदर्शनी तो वीरगळ वाटत असला तो वीरगळ नाही. ती आहे चौमुखी. जैन धर्मात संम्लेखन व्रताला फार महत्व आहे. स्व ओळखणे. अर्थात स्वतःच्या आत्म्याला शारीरबंंधनातून मुक्त करणे. म्हणाजेच उपोषण करुन प्राणत्याग करणे. साधकाच्या ह्या व्रताच्या स्मरणार्थ येथे अशा प्रकारची एक शिळा कोरलेली आहे.
ह्यात दोन चौकटी असून वरच्या चौकटीत भगवान महावीर आहेत तर खालचे चौकटीत जैन साधक अन्नपाण्याचा त्याग करुन व्रताचे पालन करताना दाखवला आहे. साधकाचे खालचे बाजूस पूर्णपणे खराब झालेला असा अतिशय अस्पष्टसा शिलालेख आहे.
१८. वीरगळ (डावीकडे) आणि चौमुखी(उजवीकडे)
१९. चौमुखी (जवळून)
२०. ह्याचबरोबर मंदिराचे मागचे बाजूसही अनेक भग्न मूर्ती ओळीने मांडून ठेवल्या आहेत.
इथल्या मंदिरांना सभामंडप दिसत नाहीत. ती जागा येथे मुखमंडपांनी व्य्यापली आहे. ह्या संकुलातील तिन्ही मंदिरे जवळपास सारखीच आहे. नक्षीदार स्तंभ, प्रवेशद्वाराची चौकट, द्वारपट्टिकेवरील जैन तीर्थकर, देवतांच्या मूर्ती. आणि सर्वच गाभार्यांमध्ये आज मूर्ती नाहीत.
२१. मंदिराचा दर्शनी भाग
२२. द्वारपट्टीकेवरील भगवान पार्श्वनाथांची मूर्ती. मस्तकाभोवतीचा नाग हा धरणेंद्र यक्ष आहे.
२३. गाभार्यात दगडी पीठासन आहे मात्र रिकामेच
दुसरे मध्यभागातील मंदिर सर्वात मोठे आहे. ह्यात सभामंडपही असून द्वारपट्टीकेवर पार्श्वनाथांची आणि जैन देवतांच्या मूर्ती आहेत. सभामंडपात एका भिंतीत सेऊणचंद्र (तृतीय) ह्याचा भलामोठा शिलालेख असून तिथेच जवळाच सरस्वतीचीदेखील मूर्ती आहे.
२४. द्वारपट्टीका
२५. सभामंडप
२६. सभामंडपाचे कमळाच्या आकृतीसारखे नक्षीदार छत
सेऊणचंद्राचा शिलालेख
मंदिराच्या सभामंडपातील एका भिंतीत सेऊणचंद्र (तिसरा) ह्याचा शिलालेख आता आपण पाहूयात.
शिलालेखाची सुरुवात
ओ पंच परमेष्ठिभ्यो नमः | स्वस्ति श्री शक संवत १०६३ दुदुंभिनाम संवत्सरांतग्गत ज्येष्ठ सुदि पंचदश्यां सोमे अनु
राधानक्षत्रे सिद्धियोगे अस्यां संवत्सरमासप़षदिवसपूर्व्वायां तिथौ समाधिगताशेषपंचशब्द....
अशी होऊन शेवट
...श्रीकोलेश्वरपण्डितसुतेन दुष्टगणकगजकंठीरवेण साधुगणकचरणावृंद मकरंदलुब्धषट्पदेन श्री दिवाकरपण्डितेन हट्टशासनं सै शैलपट्टे लिखिटमितिं...मंगल महाश्री|
अशी होते.
शिलालेखाची सुरुवात "ओ पंच परमेष्ठिभ्यो नमः" म्हणजे अर्हत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू ह्या पाच परमश्रेष्ठींना वंदन करुन होते.
ह्या शिलालेखात सेऊणचंद्र आणि त्याचा अमात्य पाणुमडऊरी यांची प्रशस्ती गायली असून शके १०६३ साली ह्या दोघांनी विचारविनिमय करून दोन हाटगृहे (दुकाने) श्री चंद्रप्रभ स्वामी (८वे जैन तीर्थंकर) ह्यांचे मंदिरासाठी करमुक्त करुन दान केली. लाहड साधुम वत्सराज साधू व दशरथ सांधू यांनी पण श्री चंद्रप्रभ तीर्थंकर व य्थील एक शिवालयास दान केले (चंद्रप्रभाय देवाय कंदर्पदहनाय च) व हे शासन कोलेश्वर पंडिताचा पुत्र दिवाकर पंडित ह्याने एका शिळेच्या पट्टावर अंंकित केले.
ह्या सेऊणचंद्राचा उल्लेख हेमाद्रीचे राजप्रशस्तीत किंवा यादवांचे मुख्य शाखेच्या इतर कुठल्याही शिलालेखांतील अथवा ताम्रपटातील वंशावळीतील नाही. मात्र त्याचवेळी हा सेऊणचंद्र स्वतःला ह्या शिलालेखाद्वारे द्वारावतीपुरपरमेश्वर, विष्णुवंशोद्भव, यादवकुलकमलिका, विकासभास्कर, यादवनारायण अशी बिरुदे धारण करतो. ह्याचाच अर्थ तो मूळ यादवांपासून विभक्त होऊन अंजनेरीत स्थलांतरीत झालेल्या यादवांच्या एका शाखेपैकी असावा.
२७. सेऊणचंद्र (तृतीय ) ह्याचा हा शिलालेख
इथले तिसरे मंदिर जवळपास निम्मेअधिक जमिनीत गाडले गेले आहे. रचना किंचित वेगळी आहे.
२८. संकुलातील तिसरे मंदिर
२९. संकुलातील पडझड
३०. संकुलातील पडझड
संकुलातून बाहेर आल्यावर समोरील बाजूस असेच एक नागर शैलीतील लहानसे मंदिर आहे. शैली आधीच्या मंदिरांसारखीच
३१. अजून एक भग्न मंदिर
३२. नागर शैलीतील जैन मंदिर दर्शनी भाग (पाठीमागे अंजनेरी नवरा सुळका)
ह्यांनंतर येतात ती एकाशेजारी एक असणारी हिंदू मंदिरे. ही वैष्णव मंदिरे असून ही जैन मंदिरांनंतर (साधारण बारावे शतक) बांधली गेली असावीत. ह्यांचीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे.
३३. पडझड झालेले मंदिर
हे मंदिर भूमिज शैलीतील आहे. मंदिराच्या पार्श्वभागी वर वर चढत जाणारे मजले अगदी स्पष्टपणे दिसतात.
३४. भूमिज शैलीतील शिखर
मंदिराच्या बाह्यभिंतींवर त्रिविक्रम विष्णू (वामनावतार), विदारण नरसिंह आणि पूर्णरुपातील विष्णू अशा प्रतिमा कोरलेल्या आहेत.
३५. त्रिविक्रम विष्णू
३६. विदारण नरसिंह
३७. विदारण नरसिंहाचीच अजून एक मूर्ती
३८. विष्णू
द्वारपट्टीकेवर लक्ष्मी अधिष्ठित असून गाभार्यातही पूर्वी भिंतींवर असलेल्या नृसिंहाचीच मूर्ती सध्या आणून ठेवलेली दिसते.
३९. द्वारपट्टीका
४०. प्रवेशद्वारावरील चौकट व गाभार्यातील पीठासनाचे खालचे बाजूस असलेला गरुड
ह्याचे शेजारचे मंदिर जवळपास संपूर्ण भग्न झालेले असून द्वारचौकटींशिवाय काहीही शिल्लक नाही.
४१. पूर्ण भग्नावस्थेतील शेजारचे मंदिर
४२. शिल्लक राहिलेली द्वारचौकट. मध्यभागी लक्ष्मी अआणि शेजारी गणेश
४३. भग्न मंदिर
४४. भग्नावस्थेतील मंदिर व त्याशेजारील अंजनेरी नवरा सुळका
अंजनेरीसारख्या इतक्या लहान खेडेगावात इतके भग्न सौंदर्य असेल असे वाटले नव्हते.
वेळेअभावी फक्त इतकीच मंदिरे पाहता आली इतर मंदिरे थोड्याश्या आतल्या भागात आहेत नाईलाजाने ती न पाहताच निघावे लागले. मात्र ती पुढच्या खेपेस पाहिली जातीलच ह्याची खात्री आहे.
* सेऊणचंद्र तृतीय ह्याचे विषयीची माहिती व शिलालेखातील वाचन याकरिता डॉ. ब्रह्मानंद देशपांडे लिखित 'देवगिरीचे यादव' ह्या पुस्तकातून संदर्भ घेतलेले आहेत.
प्रतिक्रिया
10 Apr 2015 - 12:32 am | वेल्लाभट
क्या बात है वल्ली साहेब
सुरेख सुरेख सुरेखच माहिती! अंजनेरी ला जायचंच आहे तेंव्हा यासाठी वेळ काढणारच्च. अफलातून.
तुम्ही ही माहिती लिहायची मेहनत घेतलीत त्याबद्दल अनेक आभार. या गोष्टी कळणारच नाहीत लोकांना.
10 Apr 2015 - 12:40 am | माहितगार
नेहमीप्रमाणेच 'वल्लीशैली'तील वाचकास तृप्त करणारा सुरेख लेख ! पु.ले.शु.
10 Apr 2015 - 1:03 am | सुहास झेले
भग्न अवशेषांना शब्दाने नव्याने उभारी देण्याची कला आहे यार तुझ्या लेखणीत... मस्त माहितीपूर्ण लेख. आता अंजनेरीला नक्की जाणार... अनेक अनेक आभार :)
10 Apr 2015 - 7:56 am | स्पा
एक णंबर लेख.
कडक फटु आणि माहिती
11 Apr 2015 - 12:33 am | किसन शिंदे
जाताना यालाही खेचून न्यायचा. ;)
11 Apr 2015 - 2:38 am | अत्रुप्त आत्मा
आणि या +११११११ देणार्याला नको का??? ;)
10 Apr 2015 - 6:41 am | पॉइंट ब्लँक
छान माहिती दिली आहे आणि फोटोही आवड्ले. :) ASI च्या देखरेखी खाली आहेत का ही मंदिर?
10 Apr 2015 - 6:10 pm | प्रचेतस
हो.
ही मंदिरे एएसआयच्या अखत्यारित आहेत. पण तारेचे कुंपण घालण्यापलीकडे जीर्णोद्धाराचे कुठलेही दृश्य काम अजून दिसत नाहीये.
10 Apr 2015 - 7:31 pm | प्रसाद गोडबोले
मग एक एक करुन शिल्पं आणुयात का उचलुन आपल्या चिंचवडात ;)
10 Apr 2015 - 10:49 pm | पॉइंट ब्लँक
हम्म. थोडं निराशाजनक आहे कारण कर्नाटकात काही ठिकाणी जोरात काम चालू आहे. उदा. तल़कडू.
12 Apr 2015 - 11:35 am | पैसा
हाळशीला जमिनीत संपूर्ण गाडले गेलेले एक मंदिर व्यवस्थित खोदून वर काढले आहे.
5 May 2015 - 4:41 pm | पॉइंट ब्लँक
ह्या माहितीबद्दल धन्यवाद :)
10 Apr 2015 - 9:27 am | मदनबाण
सुरेख माहिती आणि मस्त फोटो... दगडी पीठासन विशेष आवडले.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- चला राया घेउन चला मला राया... ;)
10 Apr 2015 - 10:32 am | सविता००१
किती सुंदर असतील ही सगळी मंदिरं छान असताना..
आत्ता इतक्या पडझडीत सुद्धा सुरेख दिसताहेत.
फोटो आणि लेख नेहमीप्रमाणेच अप्रतिम.
10 Apr 2015 - 10:37 am | कविता१९७८
मस्त माहीती, एकदा जायला हवे
10 Apr 2015 - 11:09 am | सतीश कुडतरकर
प्रस्तरारोहणाच्या निमित्ताने गेलो होतो. पण मंदिर पाहण्यासाठी वेळ नव्हताच. तुम्ही छान संकलन केलेले आहे.
प्राची क्र. ३ वरून उत्सुकता चाळवली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रवळनाथाची पुष्कळ मंदिरे आहेत. जवळपास एक गाव सोडून पुढल्या गावात. काळाच्या ओघात काही जैन देवस्थाने हिंदू मंदिरात रुपांतरीत झालेली आहेत. या "रवंळरनाथ जोगी" चा तिकडच्या रवळनाथाशी काही संबंध तर नसावा?
असही 'रावळ' हे नाव गुजरात्यांमध्ये आहेच. त्यातच तेथील 'सावंत' 'राणे' सारखी वतनदार मंडळी आपलं मूळ राजस्थानशी जोडतात. कदाचित त्याच्यांबरोबर हा रवळनाथ तिकडे आला असण्याची शक्यता आहे.
10 Apr 2015 - 6:13 pm | प्रचेतस
कोकणच्या रवळनाथाचा इकडील जैनपंथीय जोग्यांचा संबंध नसावा. कोकणात रवळनाथ म्हणजे शंकराचा/भैरवाचं रूप मानलं जातं.
भारतात बर्याच ठिकाणी जैनपंथीय जोग्यांचे शिलालेख आहेत. मकरध्वज, अच्यंतधज, रत्नधज, सिध भयंकर नाथ जोगी हे यांपैकी काही.
15 Apr 2015 - 1:28 pm | सतीश कुडतरकर
पोथी/पुराण या ग्रामदैवताना शंकर/पार्वती यांची रूपं समजतात. स्थानिक ग्रामजीवन नाही.
असो. तो विषयच वेगळा असल्याने, विराम.
10 Apr 2015 - 12:05 pm | गणेशा
अप्रतिम माहिती पुन्हा एकदा ...
खरेच असा सारा इतिहास शब्दबद्द होण्याची गरज आहे..
लिहित रहा...वाचत आहे
10 Apr 2015 - 12:26 pm | बॅटमॅन
अप्रतिम माहिती. विशेषतः तो शिलालेख फार म्हणजे फारच आवडल्या गेला आहे. अंजनेरीस एकदा गेलेच पाहिजे!
10 Apr 2015 - 1:01 pm | नाखु
ला अनुमोदन.
एखादा कट्टा करावा काय मे महिन्यात !!
10 Apr 2015 - 2:41 pm | प्रसाद गोडबोले
अंजनेरीस एकदा गेलेच पाहिजे! >>> अनुमोदन !
10 Apr 2015 - 1:05 pm | राजेंद्र मेहेंदळे
अशी माहीती आमच्यासारख्या सामान्य वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी वल्लीं चे अनेक आभार
10 Apr 2015 - 1:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नेहमीप्रमाणेच सुंदर माहितीपूर्ण लेख.
-दिलीप बिरुटे
10 Apr 2015 - 2:43 pm | सस्नेह
अवशेष असून इतके डौलदार, तर सुस्थितीत असताना किती सुंदर असतील !
रच्याकने त्या शिळालेखात काय लिवलय सांगा की जरा !
10 Apr 2015 - 6:14 pm | प्रचेतस
शिलालेखाची सुरुवात, अंत आणि आशय वर लिवलाय की ओ. :)
13 Apr 2015 - 12:17 pm | सस्नेह
मी शिलालेखाच्या खाली पाहिलं, वरती दिलय ते ध्याअनात आलं नाही !
बाकी शिलालेख शिंल्पांच्या मानाने सुस्थितीत दिसतो.
10 Apr 2015 - 5:27 pm | अत्रुप्त आत्मा
व्वाह!
10 Apr 2015 - 6:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर माहिती आणि प्रचि... आणि नेहमीच्या रसज्ञ वल्ली शैलीत ती अजूनच खुलली आहेत !
आपल्या पुरातत्व खात्याने अश्या अमुल्य प्राचीन वास्तूंच्या बाबतीत दाखवलेली नेहमीची अनावस्था उव्दिग्न करणारी असते :(
10 Apr 2015 - 7:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
फोटो नेहेमीप्रमाणेचं मस्तं. बाकी लेणीशास्त्रातलं ओ की ठो कळत नाही.
10 Apr 2015 - 7:37 pm | सूड
शिलालेख कोरणार्याचं अक्षर प्रचंड आवडलं आहे. बाकी लेख नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण!
10 Apr 2015 - 8:00 pm | अवतार
अ पिक्चर इज वर्थ अ थाउजंड वर्डस !!
मनापासून आभार
10 Apr 2015 - 10:04 pm | शिव कन्या
सुंदर
11 Apr 2015 - 5:15 pm | स्पंदना
एक एकए फोटो पहात पहात इतका वेळ गेला!!
वल्ली सुरेख चित्रण अन माहिती.
म्या आपली त्या अंजनेय सुळक्याकडे पहात राह्यली. माहीतच नव्हत हनुमानाचा जनम पण इथलाच.
नाशिककडे जाताना एक गांधार नावाच गाव अन नदी लागते. ते ही मोठ्या कुतुहलाच वाटल होतं.
काय राव वाल्या कोळी पण महाराष्ट्रातलाच. वाल्ह गाव आहे, अन तेथे जंगलात अजुन मोठे मोठे हंडे अन रांजण आहेत म्हणे. आता ह्नुमान पण आपल्या येथलाच!!
12 Apr 2015 - 10:03 am | लॉरी टांगटूंगकर
मस्त! खल्लास फोटो.
12 Apr 2015 - 11:44 am | पैसा
नेहेमीप्रमाणेच अप्रतिम माहिती.
वर आलेल्या रवळनाथाबद्दलः रवळनाथ हा खरे तर राखणदार देव. तो सहसा महालक्ष्मीसोबत असतो. गोव्यात मूळगाव इथे आणि रत्नागिरीजवळ बसणीला अशी महालक्ष्मी रवळनाथाची मंदिरे जोडीने आहेत. एका कथेप्रमाणे रवळनाथ हा महालक्ष्मीचा भाऊ असे ऐकले आहे. तसेच कार्तिकेयाप्रमाणे त्याच्याही देवळात स्त्रियांनी जाऊ नये अशी प्रथा आहे. महालक्ष्मी/महालसा या मुळातल्या सांतेरी. या रवळनाथ आणि सांतेर/महालसा/महालक्ष्मी या मूळ लोकदैवतांचे संस्कृतीकरण होताना त्यांना महालक्ष्मी आणि शंकराचे स्वरूप मानले गेले.
अंजनेरी (अंजनारी) या नावाचा एक मोठा डोंगर रत्नागिरी लांजा रस्त्यात आहे. त्याच्या पोटातून कोकण रेल्वेचा प्रसिद्ध मोठा बोगदा खणलेला आहे. या नावामागे काय कथा आहे कोणा स्थानिक लोकांना विचारून बघते.
12 Apr 2015 - 12:58 pm | एस
वा! छायाचित्रकारांसाठी पर्वणीच आहे हा परिसर. संपूर्ण परिसराचे लांबून किंवा वरून घेतलेले एखादे छायाचित्र आहे का?
13 Apr 2015 - 10:28 am | प्रचेतस
अगदी.
तसे छायाचित्र मात्र मजकडे नाही. अंजनेरी डोंगरावर चढूनच ते घेता येईल.
13 Apr 2015 - 12:08 pm | अन्या दातार
शिखरांच्या भूमिज आणि नागर या २ प्रकारांबद्दल जरा विस्कटून सांग ना. नक्की फरक कसा केला जातो यामध्ये इ. इ.
13 Apr 2015 - 12:48 pm | प्रचेतस
भूमी म्हणजे मजला.
भूमिज शैलीत मंदिराच्या शिखरभागात मूळ शिखराची प्रतीकृती असलेली लहान लहान लघुशिखरे एकेक मजल्यांसारखी वर वर चढत गेलेली आढळतात. त्या भागास कूटस्तंभावली असे म्हणतात. भूमीज शिखरांत शिखराचा खालचा भाग आणि आमलक ह्यांना जोडणारी सलग अशी एक पट्टी बाजूंना असते. हेमाडपंती शैली ही भूमिज शैलीच. हेमाद्रीच्याही कितीतरी आधीपासून ही शैली प्रचलित होती. महाराष्ट्र, कर्णाटक आणि गुजराथेत भूमिज मंदिरे बरीच आढळतात. अंबरनाथचे शिवमंदिर हे महाराष्ट्रातील पहिले भूमिज मंदिर मानले जाते.
तर नागर शैली म्हणजे एक उंच शिखर आणि त्याचे खालचे बाजूला थोड्या कमी उंचीची शिखरे अर्थात शृंग आणि उपशृंग. मध्य प्रदेश, उत्तर भारतातील मंदिरे नागर शैलीतील आहेत. नागर शैलीत शिखरांवर बहुधा आमलक असतोच. महाराष्ट्रात पेशवेकाळात बांधली गेलेली म्हणजे त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, नाशिकचे काळाराम मंदिर ही नागर शैलीतील. उभट शिखरांमुळे ही मंदिरे उंच भासतात.
भूमीज शैली.
रतनवाडीचा अमृतेश्वर - भूमीज शैली.
सिन्नरचा गोंदेश्वर - भूमीज शैली.
कायगाव टोके मंदिर- नागर शैली
भीमाशंकर - नागर शैली.
13 Apr 2015 - 6:18 pm | एस
वा! उपयुक्त माहिती.. आता ते 'आमलक' म्हणजे काय ते पण सांगा! :-)
13 Apr 2015 - 6:22 pm | बॅटमॅन
आमलक इज़ संस्कृत फॉर आवळा. कळसाखालचा थोडा भाग आवळ्यागत दिसतो म्हणून त्याला आमलक म्हणतात इतकेच. आता तो शेप तसाच का बनवल्या जातो ते वल्लीच जाणे.
13 Apr 2015 - 9:14 pm | प्रचेतस
येक्झेक्टली.
आमलक लै जुन्या काळापासून प्रचलित आहेत. बहुधा गोल आकारामुळे आणि त्यावरच्या आवळ्यासारख्या नक्षीमुळे स्तंभ अथवा शिखरांना उठाव प्राप्त होतो म्हणून तो आकार तसा बनवला गेला असेल.
अंजनेरीतील शिखराचा तुटून पडलेला आमलक
14 Apr 2015 - 4:41 pm | नाखु
तुम्ही दोघांमुळे काय आणि कसे पहायचे हे कळले तरी आमची देऊळवारी सुफल संपूर्ण !
==========================================================
सध्या मिपावर "सर" म्हणण्याचा प्रघात आहे तेव्हा दोघांना सर म्हटले तर चालेल ना सर
4 May 2015 - 11:59 pm | योगविवेक
वल्ली, आपल्या सचित्रमालेने आमच्या ज्ञानात भर पडली.शिवाय प्राचीन मंदिरांच्या विविध रचनांचे विष्लेषण ही अगदी अपूर्व...
वरील अमलकाच्या मध्यातील चौकोनी भाग सांधे जुळवायला केलेली सोय आहे कि काय खुलासा करावा ही विनंती...
5 May 2015 - 11:37 am | प्रचेतस
धन्यवाद योगविवेक.
>>वरील अमलकाच्या मध्यातील चौकोनी भाग सांधे जुळवायला केलेली सोय आहे कि काय>>
होय.
ह्या मंदिरांची शैली अतिशय साधी सोपी.
प्रत्येक भागाला मेल फिमेल कनेक्टर केलेले असतात. त्यामुळे कुठल्याही बाह्य गिलाव्याशिवाय हे भाग सांधून मंदिरे झपाट्याने उभारता येतात.
1 Oct 2015 - 2:03 pm | भटकंती अनलिमिटेड
भूमिज शैली म्हणजेच शिखर-शिखरी रचना म्हणतात ती का? अशीच रचना कोकमठाणच्या शिवमंदिरालाही आहे.
1 Oct 2015 - 3:53 pm | प्रचेतस
हो. तीच.
कोकमठाण पण भूमिज शैलीत बांधलेले आहे. अंबरनाथचे शिवमंदिर भूमिज शैलीत बांधले गेलेले महाराष्ट्रातले सर्वात पहिले मंदिर.
1 Oct 2015 - 3:31 pm | बोका-ए-आझम
ही कोणती शैली आहे?
1 Oct 2015 - 3:54 pm | प्रचेतस
अंजनेरीची मंदिरे वेगवेगळ्या शैलीत आहेत. भूमिज, नागर, वेस्सर.
13 Apr 2015 - 7:10 pm | शैलेन्द्र
मस्त वल्ली
13 Apr 2015 - 7:35 pm | आजानुकर्ण
खूपच सुंदर लेख. __/\__
15 Apr 2015 - 7:58 pm | पद्मश्री चित्रे
सुंदर माहिती व छायाचित्रे .
17 Apr 2015 - 1:56 pm | पियुशा
वल्ल्या दंडवत घ रे बाबा __/\__
3 May 2015 - 1:19 pm | हेम
वा: सागर! संदर्भलेख म्हणून संग्रहीत केलाय..
-हेम
4 May 2015 - 12:34 am | पाषाणभेद
छान लेख
1 Oct 2015 - 2:07 pm | भटकंती अनलिमिटेड
अंजनेरीच्या मंदिरात मला एक फार सुंदर फोटो मिळाला होता. माझ्या कल्पनेनुसार मी तिला ब्रह्मांड आणि त्याला शक्तीदात्री माता/देवी असे नाव दिले होते.
हा तो फोटो.
1 Oct 2015 - 3:59 pm | प्रचेतस
सरस्वती आहे ती.
1 Oct 2015 - 3:27 pm | बोका-ए-आझम
Henry Cousins यांच्याबद्दल किंवा त्यांच्या पुस्तकाबद्दल अजून लिहा ना. एखाद्या संपूर्ण भिन्न संस्कृतीमधल्या लेखकाने आपल्या संस्कृतीतल्या सौंदर्यावर केलेलं भाष्य वाचायला उत्सुक आहे.
1 Oct 2015 - 3:57 pm | प्रचेतस
हेन्री कझिन्सने सौंदर्यावर भाष्य असे केलेले नाही पण तो मध्ययुगातील मंदिरांबाबत एक उत्तम संशोधक होता. कझिन्सचं मेडिवल टेम्पल्स ऑफ दखन येथून उतरवून घेता येईल. महाराष्ट्रातील अशी बरीच ऑफबीट मंदिरे त्याने अभ्यासली आहेत.
1 Oct 2015 - 4:38 pm | भटकंती अनलिमिटेड
व्वा! याची फोटोकॉपी बाड होते आमच्याकडे. ई-आवृत्ती मिळाली म्हणजे सोने पे सुहागा!
1 Oct 2015 - 6:16 pm | इशा१२३
सुंदर माहितीपुर्ण लेख.अवशेष इतके सुरेख आहेत तर मुळ मंदिर किती देखणी असतील.
1 Oct 2015 - 11:21 pm | दत्ता जोशी
माहिती बद्दल धन्यवाद. पुण्याच्या आसपास पण अशी प्राचीन मंदिरे दिसतात.. विशेषतः उरली कांचन, सासवडच्या आसपास. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काही प्राचीन मंदिरे पांडव कालीन असल्याचे सांगण्यात येते. त्याविषयी माहिती द्याल का? किवा आधीच धागा झाला असल्यास कृपया लिंक मिळेल का?
2 Oct 2015 - 12:15 am | प्रचेतस
उम्म्म..तसं अधून मधून लिहितो जुन्या मंदिरांवर काहीबाही.
पुण्याजवळ असणारी मंदिरं बहुतांशी यादवकालीन आहेत. १२/१३ व्या शतकातली. यवतचा भुलेश्वर, नायगावचा सिद्धेश्वर, सासवडचे संगमेश्वर, चांगावटेश्वर, पुरचा नारायणेश्वर, लोणीभापकर ची ३/४ मंदिरे, तिथून जवळच असलेला पांडेश्वर, लिंपणगाव, इनामगाव, पेडगाव, पिंपरी दुमाला अशी बरीच मध्ययुगीन मंदिरे आहे इकडील पफिसरात.