"माझा मराठाचि बोलु कवतुके, परि तो अमृतातेहि पैजा जिंके|" असं ज्या मर्हाटीचं वर्णन ज्ञानोबामाऊलींनी केलं त्या मायमराठीला तिच्या ज्ञात अज्ञात लेकरांनी असंख्य लेणी चढवली. पूर्वापार म्हणी, वाक्प्रचार, लावणी, पोवाडे, आर्या, गण-गौळण, गोंधळ, भारुड, बतावणी, अभंग, भजने, कटाव, फटके एक ना अनेक. त्यात एक महत्त्वाचे लेणे म्हणजे स्त्रीगीते.
मर्हाटमोळ्या स्त्रियांच्या कष्टाचा उद्गार या स्त्रीगीतांतून नानापरीने व्यक्त झाला आहे. ज्ञानदेवांच्याही पूर्वी महानुभावी पंथातील धवळे रचणारी महदांबा ही पहिली ज्ञात मराठी कवयित्री मानायला हरकत नसावी. पण कदाचित त्याही आधीपासून असंख्य स्त्रियांनी जात्यांवर दळण दळताना, शेतात काम करताना म्हटलेल्या ओव्या, फुगड्या-झिम्म्मा खेळताना म्हटलेली गाणी कोणी रचली याबद्दल काही माहिती कुठेही मिळत नाही.
"अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके, तेव्हा मियते भाकर"
लिहिणार्या बहिणाबाईंनी विपुल ओव्या लिहिल्या आहेत. मात्र त्याही आधीपासून ओव्यांनी मराठी स्त्रियांना सगळ्या कामांमधे आणि प्रसंगातून साथ केली आहे. या ओव्यांमधे स्त्रियांचे सगळे भावविश्वच आपल्यासमोर उलगडते.
पहिली माझी ओवी पहिला माझा नेम
तुळशीखाली राम पोथी वाची
म्हणत कोणत्याही कामाची सुरुवात करणार्या माऊलीला नंतर आपल्या बाळाला भरवताना, जोजवताना ओव्याच तोंडी यायच्या.
आमुचा **** बाळ । खेळाया जाई दूर ।
त्याच्या हातावरि तूर । कोणी दिली ॥
आमुचा **** बाळ । खेळाया जाई लांब ।
त्याच्या हातावरि जांब । कोणी दिला ॥
माझ्या ग अंगणात । सांडला दुधभात ।
जेवला रघुनाथ । ... बाळ
ये गं तु गं गाई| चरुनी भरुनी|
बाळाला आणुनी| दुध् देई||
गाईंचा गुराखी| म्हशींचा खिल्लारी|
बाळाचा कैवारी| नारायण||
तिन्हीसांजेच्ही वेळ| वासरू कुठं गेलं||
नदीच्या पाण्या नेलं|*** बाळाने||
पालख पाळणा|मोत्यांनी विणिला||
तुझ्या मामानं धाडीला| ---- बाळा||
अंथरूण केलं| जाई मोगर्याचं||
सख्या गोजिर्याचं| अंग मऊ||
बाळाबरोबर लेकीचीही आठवण यायची
माझ्या गं दारावरनं । रंगीत गाड्या गेल्या।
भावाने बहिणी नेल्या । दिवाळीला
ल्येकापरायास लेक कशानं उणी झाली
आईबापाला ओवी गाते कैलासी ऐंकुं गेली
वाणियाच्या घरी खडीसाखर मोलाची
माझिया घरामंदी लेक ल्येकाच्या तोलाची
थोरला माझा लेक वाडयाचा कळस
धाकुटी बाळाबाई माझ्या दारीची तुळस
पाणी प्यायच्या निमित्ताने या गृहिणीकडे टक लावणार्या वाटसराला चालू लाग म्हणून ती ओवीतूनच कसे सांगते बघा,
वाटेच्या वाटसरा नको करुंस उभा घोडा
कंथ माझा जंगलांत मोजे वाघिणीच्या दाढा
या भरताराचं नानापरीचं कवतिक ओव्यातून ओसंडून वाहतं.
टिपूर चांदनं चांदन्याजोगी रात
शेजेच्या भरताराची देवासारखी सोबत
रेशीमकाठी धोतरजोडा, पदर जरीदार
माझा नेसला तालेवार
अंगात अंगरखा वर केसांचा गरका
माझ्या भरताराचा साज शिपायासारखा
दिवाणला जातां मागं पुढं माणूस
मधी घरधनी, मोतियाचं कणीस
माझ्या अंगनात चाफाचंदनाची मेख
घोडा बांधितो माझा देशमुख.
तिन्ही सांजा झाल्या दिवादीपक माझ्या हाती
घरधनियांच्या बारा बैलाच्या जोडया येती
घोडीला घासदाणा देते डाळ हरबर्यााची
शिंगी माझ्या सुभेदाराची
दिवाणाला जातां उजवा घालावा गनपती
धनियांना येतो यशाचा विडा हाती
वाटेवरली इहीर सुनी बांधली मोडीव
नाव हौशाच तोडीव
खुतनीच्या गादीवर रजई वेलाची
हौशा राजसाची रानी मी हौसेच्या तोलाची
ज्याच्या जिवावर ती सासरी रहाते, त्याचे आईबाप मात्र तिला तळहातावर झेलत नाहीत. सासुरवाशिणीला काय काय सोसावं लागतं तेही ओव्यातूनच व्यक्त होतं.
सासरी सासुरवास, माहेरी माहेरवास
सत्तेचा परी घास, सासर्यास ॥१॥
सासरचे बोल, कडू कारल्याचा पाला
गोड बोलून दिली मला, बाप्पाजींनी ॥२॥
सासरचे बोल, जसे कारल्याचे वेल
गोड कधी का होईल, काही केल्या ॥३॥
सासरचे बोल, जशा रेशमाच्या गाठी
सैल कर माझ्यासाठी, भाईराया ॥४॥
सासरचे बोल जशा, रेशमाच्या गाठी
माने बसल्या न सुटती, काही केल्या ॥५॥
सासरचे बोल, जसा वळचणीचा वासा
लागतो ठसाठसा, येता जाता ॥६॥
सासरचे बोल, जसे पाण्याचे शिंतोडे
पाहावे माझ्याकडे, भाईराया ॥७॥
सासरचे बोल, कडू काडेकिराईत
जरी नाही गिळवत, गोड मानी ॥८॥
सासरचे बोल, कडू विष्याचे गं प्याले
तुझ्यासाठी गोड केले, मायबाई ॥९॥
सासरचे बोल, जसे निवडुंगाचे घोस
जातीवंताच्या मुली सोस, सोनुबाई ॥१०॥
सासरचे बोल, जसे मिरियांचे घोस
शीलवंताच्या गं लेकी! तू सारे सुख सोस ॥११॥
सासरचे बोल, भाऊ ऐकतो चोरोनी
नेत्र आले गं भरोनी, भाईरायाचे ॥१२॥
दीर बोलती दीरपणी, नणंदा बोलती टाकूनी
वाग पायरी राखूनी, बहिणाबाई॥१३॥
सासूचा सासुरवास, नणंदाबाईची जाचणी
कशी कोमेजून गेली, माझी शुक्राची चांदणी ॥१४॥
सासूचा सासुरवास, रडवी पदोपदी
लेक थोराची बोलेना, कोणाशी परी कधी ॥१५॥
बापे दिल्या लेकी, नाही पाहिले घरदार
पाहणार परमेश्वर, दुसरे कोण ॥१६||
बापे दिल्या लेकी, आपण बसले सुखे ओटी
मायेला चिंता मोठी, वागण्याची ! ||१७||
माझे ग मायबाई, नको करु माझा घोर
रत्न दिलेस तू थोर, लेकीहाती ॥१८||
सासरच्या कष्टाबद्दल अस्फुट बोलणार्या राजसेला राम-सीतेच्या कहाणीतही तिचीच कथा दिसते.
रामाची ग सीता लक्ष्मणाची ग वयनी
दशरथाची पहिली जेष्ठ सून
सीतेला सासुरवास कैकयीने केला
रामासारखा भ्रतार तिला नाही भोगू दिला
तिच्या लेखी कैकयी या दुष्ट सासूनेच सीतेला वनवासाला जायला भाग पाडले, आणि मग तिची रामाबरोबर ताटातूट झाली. राम-लक्ष्मणाचं आदर्श नातं तिच्या लेखी कसं आहे,
राम चाले वाटे लक्षुमण झाडी काटे
असा बंधु नाही कोठे त्रिभुवनी
राम चाले वाटे लक्षुमण झाडी पाला
असा बंधु नाही झाला त्रिभुवनी
इठोबाबरोबरच रुसलेल्या रखुमाईलाही तिच्या विश्वात तेवढेच मोठे स्थान आहे.
अशा पंढरपुरात माझ काय देन -घेण
सांगते पाडु रंगा तुझ्या साठी मला येणे .
अशी रुसली रुक्मिण अशी शेजारी बसेना
असा अबिर -गुलालाचा वास हिला ग सोसेना
अशी रुसली रुक्मीण गेली पदमपुरात
असा प्रीतीचा विठ्ठल मिठी घालितो गळ्यात
ओव्यातून जे मराठी स्त्रीजीवनाचं दर्शन होतं तसंच हादगा, भोंडला, भुलाबाई, मंगळागौरीच्या खेळाची गाणी यातूनही होतं. जुन्या काळात स्त्रियांना विरंगुळा म्हणून हे सगळे कार्यक्रम केले जात होते. रोजच्या आयुष्यात जे दिसत होते, सहन करावे लागत होते त्या सगळ्याचेच चित्रण या गाण्यातूनही होते.
एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू
दोन लिंबू झेलू बाई तीन लिंबू झेलू
तीन लिंबू झेलू बाई चार लिंबू झेलू
चार लिंबू झेलू बाई पाच लिंबू झेलू
पाचा लिंबाचा पाणोठा
माळ घालू हनुमंता
हनुमंताची निळी घोडी
येता जाता कमळे तोडी
कमळाच्या पाठीमागे बसली राणी
अग अग राणी इथे कुठे पाणी
पाणी न्हवे यमुना जमुना
यमुनेच्या काठी बारीक वाळू
तेथे खेळे चिल्लार बाळू
चिल्लार बाळाला भूक लागली
सोन्याच्या शिपीने दूध पाजले
रुप्याच्या पलंगी निजविले
नीज रे नीज रे चिलार बाळा
मी तर जाते सोनार वाडा
सोनार दादा सोनारीण बाई
गौरीचे मोती झाले का नाही
गौरीच्या घरी तांब्याच्या चुली
भोजन घातले आवळीखाली
उष्ट्या पत्रावळ्या चिंचेखाली
पान सुपारी उद्या दुपारी ........
या गाण्यातही एक भुकेने रडणारा कोणी चिल्लारबाळ आहे. तसेच एका गाण्यात कोंडून मारणारं सासर आहे. त्या लहानग्या सासुरवाशिणीला सुखाची परमावधी म्हणजे पोटभर खायला आणि खेळायला मिळणे. ते ती कसं व्यक्त करते बघा.
अक्कण माती चिक्कण माती खळगा जो खणावा
अस्सा खळगा सुरेख बाई गहु जे रोवावे
अस्से गहु सुरेख बाई जातं जे मांडावं
अस्सं जातं सुरेख बाई रवापिठी जी दळावी
अश्शी रवापिठी सुरेख बाई करंज्या कराव्या
अश्शा करंज्या सुरेख बाई तबकी ठेवाव्या
अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई पालखी ठेवावा
अश्शा पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया /(खायाला) मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारितं
या सासरी सासूबाई सुनेला कशा धाकात ठेवत की, माहेरी जाऊ का म्हटलं की कार्ल्याचा वेल लावण्यापासून त्या कारल्याची भाजी करून जेवणाचं सगळं आवरून मग त्या सुनेने माहेरी जायचं.
कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं
मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याचा वेल लावला हो सासूबाई लावला
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा……
कारल्याला कार्ली येउ दे गं सुने येउ गं
मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याचा कार्ली आली हो सासूबाई आली
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा……
कारल्याची भाजी कर गं सुने कर गं
मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी केली हो सासूबाई केली
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा……
कारल्याची भाजी खा गं सुने खा गं
मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई खाल्ली
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा……
आपलं उष्ट काढ गं सुने काढ गं
मग जा अपूल्या माहेरा माहेरा
आपलं उष्ट काढलं हो सासूबाई काढलं
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा……
आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा…..
आणली फणी घातली वेणी गेल्या राणी माहेरा माहेरा…..
मामा हा नेहमी लाडका. त्याची बायको ती मामी मात्र तेवढीशी आवडत नाही. मग तिला काळी म्हणायचं.
एका हाताची फुगडी
मामा देतो लुगडी
लुगड्याला नाही दोरा
मामा माझा गोरा
मामी माझी काळी
शेवंतीची जाळी
तसाच भाऊराया म्हणजे बहिश्चर प्राण. पण त्याला आपल्यापासून दूर नेणारी भावजय मात्र दोडकी!
इस इस बाई इस
दोडका किस
माझ्याने दोडका किसवेना
दादाला बायको करवेना
केली होती ती लुळी पांगळी
तिचं नि माझं पटेना
नखुल्या बाई नखुल्या
चंदनाच्या टिकुल्या
एक टिकली उडाली
गंगेत जाऊन बुडाली
गंगेला आला लोंढा
भिजला माझा गोंडा
गोंड्याच्या पदरी काडी
भिजली माझी साडी
साडीच्या पदरी रुपाया
भाऊ माझा शिपाया
शिपायाने केली बायकॊ
बायको गेली ताकाला
विन्चू चावला नाकाला
नाक करतय फणफण
उड्या मारते ठणाठण!
झिम्मा खेळतानाही मायेचं माहेर आणि छळणारं सासर आठवतंच.
झिम पोरी झिम कपाळाचं भिंग
भिंग गेलं फुटून पोरी आल्या उठून
पोरीत पोरी मीच गोरी
सई सई गोविंदा येतो मजवरी गुलाल टाकितो
या या गुलालाचा भार आमच्या वेण्या झाल्या लाल
आमच्या वेण्या मोकळ्या सोनियाच्या साखळ्या
घडव घडव रे सोनारा माणिक मोत्यांचा बिलवरा
बिलवराला खिडक्या आम्ही लेकी लाडक्या
लाड सांगू बापाला मोती मागू कापाला
दोनतीन बैलांची लागली झोंबी ग लागली झोंबी
तिथं माझं खटवं हरवलं की हरवलं
धाकट्या दीराला सापडलं ग सापडलं
धाकट्या दीराने काय माझं केलं ग काय माझं केलं
सासूबाईंशी सांगितलं ग सांगितलं
सासूबाईनी काय माझं केलं ग काय माझं केलं
दोनतीन चाबूक चमकाविले ग चमकाविले
ते बाई चाबूक दूरच्या दुरी ग दूरच्या दुरी
माझं माहेर पंढरपूरी ग पंढरपुरी
पंढरपूरीचं काय बाई साजे ग काय बाई साजे
पंढरपुरीच्या बांगड्या साजे ग बांगड्या साजे
येता जाताना खाळखुळ वाजे ग खाळखुळ वाजे
सासूसुनांचं भांडणही होतं
अग अग सुने,
काय म्हणता सासूबाई
हातातल्या बांगड्या काय ग केल्यास, काय ग केल्यास
आली होती वहिनी तिला मी दिल्या, तिला मी दिल्या
सासू चोरटी,
सून कारटी
अस्से छळवादी सासू सासरे, दीर नणंदा हिला घरी बोलावायला येतात तेव्हा मात्र ती सगळे नक्को म्हणते. मात्र 'तिकडची स्वारी' बोलावायला आली की हरखून निघतेच!
अरडी ग बाई परडी ग
परडीमधे काय ग
परडीमधे फूल ग
दारी मूळ कोण ग
दारी मूळ सासरा
सासर्याळनी काय आणलं ग बाई
सासर्यानी आणले गोठतोडे
गोठतोडे मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा ग बाई, लावा ग बाई
झिपरं कुत्रं सोडा ग बाई, सोडा ग बाई
अशीच सगळ्या नातेवाईकांची आणि दागिन्यांची वासलात लावून झाली की शेवट बाईंचा पती येतो आणि तो गंठण आणतो मग बाई सासरी जायला तयार होतात!!
अरडी ग बाई परडी ग
परडीमधे काय ग
परडीमधे फूल ग
दारी मूळ कोण ग
दारी मूळ पती ग
पतींनी काय आणलं ग बाई
पतींनी आणली गंठण
गंठण मी घेते सांगा मी येते
चारी दरवाजे उघडा ग बाई, उघडा ग बाई
झिपरं कुत्रं बांधा ग बाई, बांधा ग बाई
आपल्या बाळात तिला यशोदेचा कन्हय्या दिसतो.
कृष्णा घालितो लोळण, यशोदा आली ती धावून
काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून
आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
आई मला साप दे आणून त्याचा चाबूक दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
शेतीबागायतीचे अनुभव गाण्यातून येतात.
उठी उठी रे माळिया, बैल जुंप रे रहाटाला
बैल जुंप रे रहाटाला, रे पाणी जाऊंदे पाटाला
पाणी जाऊंदे पाटाला रे केतकीच्या बनाला
त्यातलं एक कणीस येऊ दे शंकराच्या पुजेला
कधी कधी विनोदीही गाणी दिसतात. घरात चंद्रकळा, हार सगळं असताना दमडीचं तेल आणायला सांगणार्या सासूला काय बाई म्हणावं!
काळी चंद्रकळा नेसूं मी कशी
गळ्यांत हार बाई वाकूं कशी
पायांत पैंजण चालूं कशी
बाहेर मामाजी बोलूं कशी
दमडीचं तेल मी आणूं कशी
दमडीचं तेल बाई आणलं
सासूबाईचं न्हाण झालं
वन्सबाईंची वेणी झाली
मामांजींची दाढी झाली
उरलेलं तेल झांकून ठेवलं
लांडोरीचा पाय लागला
येशीपातूर ओघळ गेला
त्यातन हत्ती वाहून गेला
वेगवेगळे सण गाण्यातून येतात
चल ग सये वारुळाला, नागोबाला पुजायाला
ताज्या लाह्या वेचायला, हळदीकुंकू वहायला
लग्नाप्रसंगी आठवतात त्या ओव्या.
मांडवाला मेढी घालाव्या ठेंगण्या
बहिणी चिमण्या उषाताई
मांडवाला मेढी सरशा सूत्रधारी
चुलता कारभारी उषाताई
घातला मंडप त्याला लावियलें छत्र
नवरी शोभते घरात उषाताई
घाणा भरियेला विडा ठेवियेला
आधी नमियेला गणराज
घाणा भरियेला खंडीच्या भाताचा
आमुच्या गोतांचा गणराय
आधी मूळ धाडा दूरी दूरींचीये
आम्हा कुळीचीये जोगेश्वरीला
आधी मूळ धाडा घुंगराची गाडी
शालजोडीचे वर्हाडी गणराय
आधी मूळ धाडा चिपळूण गांवा
परशुराम देवा आमंत्रण
नागवेली बाई आगरी तुझा वेल
कार्य मांडले घरी चल भाईरायांच्या
पतीदेवाचे नाव घ्यायचे उखाणे तर कधी गमतीशीर, कधी हे लांबलचक! हा एक बघा, तिच्या लहानशा जगातलं उत्तम काय ते ती सांगते आहे.
कोलापुरी तपेलं आंघुळीला, पाट चंदनाचा बसायला, जरीकाठी धोतर नेसायला,
सान येवल्याचं, खोड बडुद्याचं, केशरी गंध लावायला,
शिवपुजेला पाणी गंगाभागीरथीचं, जेवायला ताट चांदीचं,
आंबेमोहराचा भात, वर केशरी वरण दाट,
तबक बिंदलीचं, डबा माऊलीचा, डब्या गजनीच्या,
कात कोकणचा, चुना भोकरचा, पान रामटेकचं,
जायपत्री जयगावची, लवंग विजापूरची, चिकणी सुपारी सोलापूरची,
लाल लाल गादी मुंबईची, लोड साताऱ्याचं,
उशी पुण्याची किनखापाची, पलंग कराडचा मोराचा,
हिऱ्यामाणकांच्या झुंबरांचा झाला लकलकाट
......... रावांच्या जिवावर हळद-कुंकवाचा गजर दाट...
सगळ्या संसाराचा खेळ मांडला आहे, त्यातून पार पडण्यासाठी ती सतत देवाची आळवणी करते आहे. तीच भोंडला, हादगा, भुलाबाई खेळतानाही ओठात येते आहे.
ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतय पारावरी
गोदावरी काठच्या उमाजी नायका, आमच्या गावच्या भुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा
आमच्या आया तुमच्या आया, खातील काय दुधोंडे
दुधोंडयाची लागली टाळी ,आयुष्य दे रे भामाळी
माळी गेला शेता भाता, पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबोथेंबी, थेंबोथेंबी आडव्या लोंबी,
आडव्या लोंबती अंगणा
अंगणा तुझी सात वर्षे, भोंडल्या तुझी सोळा वर्षे
अतुल्या मतुल्या चरणी चातुल्या,
चरणी चारचोडे, हातपाय खणखणीत गोडे
एकेक गोडा विसाविसाचा, साडया डांगर नेसायच्या
नेसा गं नेसा बाहुल्यांनो, अडीच वर्षे पावल्यांनो
अशी ही साठा उत्तरांची कहाणी, पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर झाली नाहीये. अजून खूप काही आहे की जे इथे एकत्र करू शकले नाहीये, पण या बाहुल्यांचा खेळ असाच चालू दे. आणि त्यांचा खेळ मांडू दे ही त्या गणनायकाला प्रार्थना!
(ऋणनिर्देशः अनाहितामधील स्त्रीगीतांबद्दलचे धागे आणि डॉ. सरोजिनी बाबर यांचं "महाराष्ट्रः लोकसंस्कृति व साहित्य" हे १९८७ चं पुस्तक)
प्रतिक्रिया
27 Feb 2015 - 5:10 am | मुक्त विहारि
"वाखूसा"
27 Feb 2015 - 5:13 am | संदीप डांगे
छान लिहिले आहे. लहानपणी भुलाबाईची गाणी ऐकली आहेत. एक निराळीच गूढ आर्तता असायची त्या गाण्यांमधे. त्याची आठवण झाली.
27 Feb 2015 - 6:08 am | अत्रुप्त आत्मा
भरपूर काही अठवलं...
माहितीपूर्ण मस्त लेखन. :HAPPY:
27 Feb 2015 - 6:15 am | कंजूस
लहानपणी बहिणीबरोबर हादग्याला जाताना यातली बरीच ऐकली आहेत. सासू -सून ,भावजय-नणंद ही त्रासदायक नाती नसती तर यातली बरीच गायब झाली असती. पुढच्या पिढीने ही दुष्ट नाती तशीच ठेवली आहेत परंतू गाणी विसरत चालली. एक नवरा आणि दोन सवती पूर्वीही होत्या परंतू श्रीमंतांनाचा परवडणारा नाद असल्यामुळे कदाचित यावर लोकगिते नसावीत .जे इथे सासू -सुनेचं तेच परदेशी सावत्र आई वि॰ मुलगी या नात्याचं आहे. फक्त तिकडे गाणी नाहीत त्यांचे हुंकार वाड्यांच्या कोरीव दगडांमागे दडपले आहेत {ह्विएन्ना बुडापेस्ट}.
तोपर्यँत रुणझुणत्या पाखरा जा माहेरा सुगंधाची कर बरसात.
27 Feb 2015 - 7:09 am | स्रुजा
मला वाटतं , या नात्यांमुळे होणारा त्रास व्यक्त करायला त्या काळी हक्काची जागा कदाचित त्या जात्यानेच दिली असावी. शिवाय सुरक्षित ! नकळत ओव्यांचा आधार घेतला जात असणार भावना मोकळेपणाने मांडायला.
किती ही हक्काची सखी असली तरी नात्यांची , वेळेची, अंतराची मर्यादा येत असणार. माहेरच्यांना काळजी वाटू नये म्हणून म्हणा किंवा सासरची मान मर्यादा डागाळायची नाही म्हणून मिटल्या ओठांनी सोसून पुन्हा हसू खेळवलं जात असणार. माझं सुख हंड्या झुंबरं टांगलं , माझं दुख माझं दुख तळघरात कोंडलं ही पण बहुदा बहिणाबाईंचीच कविता !
तुम्ही म्हणता तसे त्रास अजून ही आहेत पण आता व्यक्त व्हायला व्यासपीठ उपलब्ध आहेत, स्त्रिया मोकळेपणाने खोट्या मानापमानांचं जोखड झुगारू शकतात. कविता आज ही आहेत च पण सुदैवाने आता काव्यात उमटणार्या दु:खाची जात आणि वीण दोन्ही बदलले आहेत.
बादवे, रुणझुणत्या पाखरा जा रे माझ्या माहेरा आणि घाल घाल पिंगा वारा माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात ही ती दोन गाणी आहेत. तुमच्या प्रतिसादानंतर दोन्ही ऐकुन झाली :)
27 Feb 2015 - 7:15 am | स्रुजा
बाकी पैसा ताई, हळवं केलंस, फारच सुंदर लिहिलयेस.
27 Feb 2015 - 7:28 am | कंजूस
मिक्सर लावल्यावर टिव्हीचा आवाज ऐकू येत नाही तर गाणी कुठे गाणार ?आता कुणाचं बोलणं ऐकायचं नसेल तर मिक्सर लावतात.अशी होते अभिजात मराठीची गळचेपी.राजकीय पक्षांच्या मिक्सिंगमुळे नाही.-अवांतर प्रतिक्रिया.
27 Feb 2015 - 8:53 am | बोका-ए-आझम
सुंदर!गदिमांनी आपल्या कवितांना आपल्या आईच्या ओव्यांची दुहिता म्हटलेलं आहे त्याची आठवण झाली!
27 Feb 2015 - 9:15 am | खटपट्या
खूप छान !! "आता तरी जाउ का माहेरा" आणि "सासरचे बोल" एकदम मस्त !!
प्रिन्टआउट काढून ठेवले आहे. आई खूष होईल !! :)
27 Feb 2015 - 9:24 am | आनन्दिता
बहीणाबाईंची अजुन एक ओवी आहे. माझ्या खुप आवडीची. एक सासुरवाशीण आणि एक योगी यांच्यातलं संभाषण.
योगी-
बसलो मी देवध्यानी
काय मधी हे संकट
बाई बंद कर तुझ्या
तोंडातली वटवट
माझं माहेर माहेर
सदा गाणं तुझ्या ओठी
मंग माहेरून आली
सासरले कशासाठी ?
सासुरवाशीन -
आरे लागले डोहाये सांगे
शेतातली माटी
गाते माहेराचं गानं
लेक येईल रे पोटी
देरे देरे योग्या ध्यान
एक काय मी सांगते
लेकीच्या माहेरासाठी
माय सासरी नांदते
देव कुठे देव कुठे
भरीसनी जो उरला
अरे उरीसनी माझ्या
माहेरात सामावला
27 Feb 2015 - 11:35 am | पैसा
जबरदस्त आहे हे!
27 Feb 2015 - 12:08 pm | सविता००१
आनंदिता, हेच लिहायला आले होते.
27 Feb 2015 - 3:01 pm | सूड
ह्या ओळी ह्यातल्या आहेत हे आता कळलं.
27 Feb 2015 - 4:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर !!!
27 Feb 2015 - 10:40 am | जागु
मस्त लेखन.
27 Feb 2015 - 11:13 am | पिशी अबोली
अप्रतिमच!
27 Feb 2015 - 11:45 am | स्पा
सॉलिड लिहिलंय
सहीच ग
27 Feb 2015 - 11:53 am | पदम
मस्तच.
27 Feb 2015 - 12:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
शॉल्लेट!!
27 Feb 2015 - 12:11 pm | सविता००१
सॉलिडच लिहिलं आहेस.
माझ्या गं दारावरनं । रंगीत गाड्या गेल्या।
भावाने बहिणी नेल्या । दिवाळीला
ल्येकापरायास लेक कशानं उणी झाली
आईबापाला ओवी गाते कैलासी ऐंकुं गेली
वाणियाच्या घरी खडीसाखर मोलाची
माझिया घरामंदी लेक ल्येकाच्या तोलाची
थोरला माझा लेक वाडयाचा कळस
धाकुटी बाळाबाई माझ्या दारीची तुळस
या अतिशयच आवडल्यात.
वाखू अर्थात साठवलीच आहे
27 Feb 2015 - 1:54 pm | पैसा
प्रत्येक ओवी आणि गीताचे पदर उलगडत गेले असते तर लेख वाढत गेला असता, म्हणून जास्त लिहिले नाही. आता ही पुढची ओवीच बघ.
ती दारावरून जाणार्या रंगीत गाड्या बघते आहे. तिच्या मैत्रिणी माहेरी जात आहेत. पण तिला न्यायला रंगीत गाडी आली नाहीये. कदाचित भावाला यायला जमलं नसेल, कदाचित भाऊ नसेलच. ते दु:ख, मैत्रिणींबद्दल किंचितशी असूया या ओवीत ती सांगते आहे.
27 Feb 2015 - 10:11 pm | आदूबाळ
याच प्रभावळीतल्या म्हणव्यात अशा काही ओव्या:
माझ्या गं दारावरनं | कोण गेली सवाशीण ||
काजळ-कुंकू बाळंतीण | ***** बाई ||
**** इथे बाळंतिणीचं नाव.
माझ्या गं दारावरनं | कोण गेली परकराची ||
हाती अंगठी हिरकणीची | ~~~~ बाई ||
~~~~ इथे घरातल्या परकर्या मुलीचं नाव.
माझी मामीआजी (आईची मामी) तान्ह्या मुलांना झोपवायला या ओव्या म्हणत असे. आणखीही असाव्या, पण माझ्या स्मृतीत अडकून राहिलेल्या या दोन आणि वरची "भावानं बहिणी नेल्या".
तिच्या लहानपणी खरंच भाऊ रंगीत बैलगाड्या घेऊन न्यायला येत असावेत आणि परकर्या पोरींच्या हाती हिर्याच्या अंगठ्या असाव्यात. किंवा हे सगळं "विशफुल थिंकिंग" ही असेल. पण तिच्या धाकट्या भावांपासून पासून ते पतवंडांपर्यंत चार पिढ्या गुमान झोपल्या खर्या...
28 Feb 2015 - 5:56 pm | पैसा
होय, ती हिरकणीची ओवी ऐकलेली आहे. अशा ओव्यांमधे माहेर नेहमीच तालेवार असतं आणि सासर द्वाड!
27 Feb 2015 - 12:11 pm | प्रचेतस
उत्तम लेखन.
संध्याकाळी जमल्यास यादवकालीन मराठीतील काही स्त्रीगीतं देण्याचा प्रयत्न करतो.
गाथासप्तशतीत तर विपुल आहेत मात्र ती महाराष्ट्री प्राकृतात असल्याकारणाने त्यास मराठी मानता येणार नाही.
27 Feb 2015 - 1:34 pm | एस
तीपण द्या. आजच्या मराठीतली नसली तरी तेव्हाच्या मराठीतील होतीच ना! मग काय झालं!
27 Feb 2015 - 1:46 pm | प्रचेतस
मासल्यासाठी हे बघा..
एक्को पण्हुअई थणो बीओ पुलएइ णहमुहाहिओ|
पुत्तस्स पिअअमस्स अ मज्झणिसण्णाए घरणीए||
आता ह्याला मराठी कसे मानणार? ;)
27 Feb 2015 - 4:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
बघा, बघा. किती पुरातन काळापासून आमच्यावर काव्ये रचली जात आहेत ! ;)
पण याचा अर्थ काय ?
27 Feb 2015 - 4:42 pm | प्रचेतस
अर्थासाठी व्यनी करा. ;)
27 Feb 2015 - 12:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
अप्रतिम !
हे खरे लोकसाहित्य आहे. लिहीली गेली नाही म्हणून अशी किती मौक्तीके जनमानसातून विरून गेली असतील, कोण जाणे !
वाखूसाआ.
27 Feb 2015 - 1:07 pm | ऊध्दव गावंडे
सुंदर ! लेखना ला 'जागतिक मराठी भाषादिना' चा आजचा दिवस पण छान साधला.
27 Feb 2015 - 1:48 pm | मंजूताई
खूप छान संकलन... वाखूसा
27 Feb 2015 - 1:49 pm | पलाश
मस्तच !! लहानपणीच्या भोंड्ल्याच्या आणि हो त्याबरोबरच खिरापतीच्याही आठवणी वर आल्या. :) "हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली" अन "श्रीकांता कमलाकांता अस्सं कस्सं झालं" हे गाणं मला आजपण आठवतं आणि आवडतं !!! !!! बाळांना झोपवताना तुम्ही सुरवातीला दिलेल्या दोन ओव्या
"आमचा/ची ***** बाळ। खेळायला जाई दूरी॥ त्याच्या/तिच्या हातावरी पूरी। साखर मागे" व
"आमचा/ची ***** बाळ। खेळायला जाई लांब॥ त्याच्या/तिच्या हातावरी जांब। पिकलेला॥" अशा पाठभेदासह अंगाई म्हणून आजही घरी वापरात आहेत.
किती छान आहे हे सगळं!! जपायला हवं हे. आज तुमच्या लेखाच्या निमित्तान हे पुन्हा एकदा जाणवल. धन्यवाद.
27 Feb 2015 - 2:01 pm | अजया
सुरेख लिहिलंय.एकेक गीत स्रीजन्मा ही तुझी कहाणी सांगणारं.
27 Feb 2015 - 2:05 pm | प्रचेतस
इथे स्त्रीगीतांचा खजिनाच आहे.
27 Feb 2015 - 2:08 pm | पैसा
मस्तच! लिंकसाठी बहुत धन्यवाद! आता खाप्रे.ऑर्ग बंद झाली काय?
27 Feb 2015 - 2:12 pm | बॅटमॅन
होय बंद झालीय फॉर सम रीझन. :( त्या विशाल खापरे/खाप्रे नामक गृहस्थाला काँट्याक करावयास हवा.
27 Feb 2015 - 2:07 pm | बॅटमॅन
हादग्यात यातली काही गाणी ऐकली होती. एक लिंबू आणि दोन लिंबूवाल्या गाण्याची खंप्लीट व्हर्जन पहिल्यांदा इथेच पाहिली. बाकी गाणीही मस्तच! बहुत धन्यवाद!
जाताजाता: मानसोल्लास अथवा अभिलषितार्थचिंतामणी नामक कर्नाटकात लिहिलेल्या संस्कृत ग्रंथात (इ.स. ११३२ च्या आसपास) महाराष्ट्रातील स्त्रिया जात्यावर ओव्या म्हणतात असा उल्लेख आणि छोटे सँपल्सही दिलेत म्हणतात. ते कुठे मिळाले तर पाहतो.
27 Feb 2015 - 2:11 pm | मधुरा देशपांडे
फार सुंदर लिहिलं आहेस पैसाताई.
27 Feb 2015 - 2:15 pm | स्नेहल महेश
छान लिहिले आहे.भरपूर काही अठवलं
27 Feb 2015 - 2:38 pm | विशाखा पाटील
छान संकलन.
27 Feb 2015 - 2:52 pm | वेल्लाभट
अप्रतिम ! अप्रतिम ! अप्रतिम धागा
किती जुनी किती नवीन काव्य वाचायला मिळाली ! वाह वाह वाह वाह !
सुरेख ! सुरेख
मनापासून धन्यवाद!
27 Feb 2015 - 3:01 pm | सूड
आवडलं!!
27 Feb 2015 - 3:27 pm | भावना कल्लोळ
अप्रतिम धागा
27 Feb 2015 - 4:25 pm | स्वाती दिनेश
सुरेख धागा!
स्वाती
27 Feb 2015 - 6:28 pm | मनीषा
किती साधे , सोपे शब्दं आणि रचना ..
पण त्यातून स्त्री चे सार भावविश्वं साकारलेले ...
छान लेखन आणि संकलन .
27 Feb 2015 - 6:51 pm | रेवती
मस्त धागा! सगळ्या ओव्या, गाणी म्हणून बघितली. वाचनखूण साठवतीये.
27 Feb 2015 - 7:10 pm | आतिवास
लेख आवडला.
27 Feb 2015 - 8:31 pm | भाते
पैसाताई, संपादकीय कामातुन वेळ काढुन असे अप्रतिम लेख यापुढेही लिहित जा हि नम्र विनंती.
27 Feb 2015 - 10:17 pm | मयुरा गुप्ते
पहिल्या वाक्यापासुन शेवटच्या वाक्यापर्यंत अखंड गाणी गुणगुणत लेख वाचायला एवढी मजा क्वचितच येते.
शहरातल्या बालपणातही ही गाणी थोडी वेगळी होती. बरेचसे गावाकडील विशिष्ठ संदर्भ तेव्हाही डोक्यावरुन गेले होते, पण माय्-लेक किंवा माय-लेकरु, सासु-सुन, सासरची इतर खाष्ट मंडळी ह्यांच्याविषयी तक्रारी समजण्यासाठी भाषेची अडचण कधीच नाही जाणवली. ह्यामध्येच ह्या ओव्या, गीतांची थोरवी आहे.
अतिशय सोप्प्या शब्दांचे सामर्थ्य एवढ्ं जबरदस्त आहे की आताच्या आता आईकडे जावं असं वाटणं, पुन्हा एकदा लहान होउन त्या गमती-जमती करावसं वाटणं...डोक्याचा पार भुंगा करुन जाते.
धन्यवाद पै ताई.
-मयुरा.
27 Feb 2015 - 10:41 pm | स्वाती२
सुरेख लिहिलयं! छान संकलन!
28 Feb 2015 - 12:27 am | बहुगुणी
अप्रतिम धागा, वाचनखूण साठवलीच आहे, दुवाही पुढे पाठवणार.
27 Feb 2015 - 10:45 pm | प्रास
छान लिखाण. काही ओव्या, गीतं थोड्याफार फरकाने व्यवस्थित आठवली....
28 Feb 2015 - 1:57 pm | सस्नेह
अप्रतिम संकलन आणि ओढाळ लेख !
'श्रीकांता कमलाकांता' ची उणीव जाणवली..
28 Feb 2015 - 5:38 pm | इशा१२३
अत्यंत सुंदर झालाय लेख.प्रतिसादहि छान.किती जुनी स्त्रीगीत वाचायला मिळाली.
मस्त संकलन.
28 Feb 2015 - 5:46 pm | भाग्यश्री कुलकर्णी
अप्रतिम...लहानपणीची सय उगाचच दाटुन आली...
19 Jul 2019 - 7:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अशी रुसली रुक्मिण अशी शेजारी बसेना
असा अबिर -गुलालाचा वास हिला ग सोसेना
अशी रुसली रुक्मीण गेली पदमपुरात
असा प्रीतीचा विठ्ठल मिठी घालितो गळ्यात.
माझं आवडतं आहे, पण ओळी काही आठवतं नाही. कोणाला येतं का हे संपूर्ण ?
- दिलीप बिरुटे
17 Jun 2024 - 8:20 pm | कर्नलतपस्वी
रखमीण हीच रुसण वंगाळ
देवा विठ्ठलाला गार पाण्याची आंघूळ
रुसली रुखमीण जाऊन बसली तळ्याला
प्रितीचा पांडुरंग हात घालीतो गळ्याला
इठ्ठला शेजारी रुखमीण बसना
अबीर बुक्याची हिला गरदी सोसना
https://ruralindiaonline.org/en/articles/anjanabais-songs-from-the-heart/
19 Jun 2024 - 5:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभार....!
-दिलीप बिरुटे