थरार लिंगाण्याचा !!

सह्यमित्र's picture
सह्यमित्र in भटकंती
5 Feb 2015 - 1:16 pm

पुणे जिल्ह्याच्या नैऋत्येला असलेला वेल्हे तालुका दुर्गम म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या कुशीत छोटी छोटी गावे अतिशय दुर्गम ठिकाणी वसलेली आहेत. उंच सखल डोंगर दऱ्या, मुसळधार पाउस, सोसाट्याचा वारा, अभावानेच असणारे गाडी रस्ते, शिक्षण, आरोग्य आदी मुलाभूत सोयींचा अभाव अशा परिस्थितीत येथील गावकरी राहत असतात. भात, वरई , नाचणी हि येथील प्रमुख पिके पण त्यासाठी देखील भरपूर मेहनत आणि निसर्गाची लहर हे घटक आहेतच. परिस्थिती आता बदलत आहे पण अजूनही येथील जीवन खडतर आहेच.

तोरणा ते रायगड ह्या भ्रमंतीत हा भाग अगदी जवळून बघता येतो. हा मार्ग हरपुड, वरोती , मोहरी ह्या छोट्या छोट्या गावातून जातो. मोहरी हे त्यातले ऐन घाट माथ्यावर वसलेले छोटेसे गाव आहे. गाव म्हणण्या पेक्षा वस्तीच. ह्या गावातून थोडसे पुढे गेल्यावर रायलिंग चे पठार लागते. ह्या पठारावरून अगदी समोरच उभा दिसतो तो लिंगाण्याचा दुर्लघ्य सुळका आणि त्याच्या मागे आहे दुर्गदुर्गेश्वर रायगड ! इथूनच बोराट्याच्या नाळेतून उतरून खाली कोकणात रायगडा कडे जाता येते. बोराट्याच्या नाळेच्या जराशी बाजूला आहे सिंगापूरची नाळ. ही वाट मोहरी जवळील सिंगापूर गावातून खाली कोकणात दापोली गावात उतरते. असे हे ठिकाण ट्रेकर्स मंडळीं मध्ये प्रसिद्ध नसते तरच नवल!

तोरणा-रायगड भ्रमंती करून हा भाग पायाखाली घालावा असे फार दिवसापासून मनात आहे. तो योग अजून यायचाय पण निदान रायलिंग पठारावरून लिंगाणा आणि रायगड ह्यांचे दर्शन घ्यावे असे वाटत होते. तो योग ह्या वर्षी जून मध्ये श्रीकांत मुळे आला. पाऊस अजून सुरु व्हायचा असल्याने पठारावरून रायगड आणि लिंगाणा ह्यांचे सुरेख दर्शन घडले. ह्या पठाराला रायलिंग हे नाव देखील रायगड-लिंगाणा ह्यावरूनच पडले असावे. ह्या भेटीतच लिंगाणा सर करण्याच्या इच्छेने मनात परत उसळी घेतली.

लिंगाणा हा पुणे-रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेला उंचीमुळे अतिशय दुर्लघ्य पण विस्ताराने अगदीच छोटा किल्ला. खरे तर 'watch tower'. इतिहासात महाराजांनी लिंगाण्याचा वापर कारागृह म्हणून केल्याचे उल्लेख आढळतात. कोकणातून सुमारे २८०० फूट उंचावलेला आणि ७०-८० अंशातून सरळ उभा असलेला सुमारे १००० फूट उंचीचा सुळका हे ह्याचे वैशिष्ट्य . माथ्यावर चढायला सरळ वाट अशी नाहीच. एकच बिकट वाट जी ५-१० फूट रुंदीच्या अतिशय अरुंद धारेवरून ७०-८० अंशात (काही ठिकाणी ९०) वर चढत जाते. त्यातून घसारा असलेली अतिशय निसरडी माती ह्यामुळे ह्याच्या दुर्गमतेत भरच पडली आहे. म्हणूनच ह्याचा वापर कारागृह म्हणून होत असवा. दोर आणि शिड्या लावून कैदी वर चढवायचे आणि मग दोर-शिड्या काढून टाकायच्या. पळण्याचा प्रयत्न केला तर १००० फुटावरून कोसळून कपाळमोक्ष ठरलेला. शिवाय ह्याचे भौगोलिक स्थान बघता राजधानी रायगड वरून देशावर चढणाऱ्या महत्वाच्या घाट वाटांवर लक्ष ठेवण्या साठी देखील ह्याचा उपयोग होत असावा.
Lingana1

लिंगाणा, रायलिंग पठारावरून. उजवीकडे मागे दुर्गदुर्गेश्वर रायगड (पावसाळ्या आधीचा फोटो )

मनातील ही इच्छा पूर्ण करण्याची संधी अगदी अवचित पणे चालून आली. त्याचं झालं असं, आमच्या शूटर्स कम ट्रेकर्स ग्रुप मध्ये २५-२८ डिसेंबर ह्या सलग सुट्ट्यांमध्ये काय बेत आखावा ह्यावर एकमत काही केल्या होईना. शेवटी दोन गट पडले. एक गट बोक्याच्या नेतृत्वा खाली कोयना सर्किट ला जाण्याचा मताचा होता ज्याचे प्राधान्य ट्रेकिंगला होते तर दुसरा श्रीकांत च्या नेतृत्वा खाली नाशिक रीजन मध्ये जाण्याच्या मताचा होता ज्याचे प्राधान्य फोटोग्राफी ला असणार होते. मी बोक्याच्या गटात होतो. अशा वेळेस जी परिणीती व्हायची तीच झाली कोयनेचा plan सदस्य संख्या आणि प्रवासाचे वाहन ह्यांचा मेळ बसेना म्हणून रद्द होत आला (जो नंतर बोक्याने एकट्याने केला!) तर तिकडे नाशिकच्या प्लान मधून अगदी ऐन वेळे पर्यन्त विविध कारणांनी गळती सुरु होती. त्यातून कुठेच न जाणाऱ्यांचा एक तिसरा गट तयार झाला :-).

मंगळवारी शेवटी कोयनेचा प्लान रद्द होण्यावर शिक्कामोर्तब झाले आणि मी जाम वैतागलो. गृहखात्याची नाराजी ओढवून का होईना पण ४ दिवस भटकायची मिळालेली परवानगी वाया जाणार असे दिसू लागले. ४ दिवसाची सुट्टी घरी बसून काढायला मन तयार नव्हते. तेवढ्यात मागील वर्षी ह्याच सुमारास 'Explorers' ह्या संस्थेने लिंगाणा Climb आयोजित केला होता ते आठवले. लगेच जुन्या mails मधून तो मेल शोधला आणि 'Explorers' च्या site वर जाउन चेक केले. १९-२८ डिसेंबर सलग batches आहेत हि माहिती पाहून उत्साहित झालो. लगेच त्यांच्या office ला फोन केला आणि जागा उपलब्ध आहेत का ह्याची चौकशी केली सुदैवाने २७-२८ च्या batch ला जागा होत्या. लगेच मग ऋतुराज ला फोन करून हि माहिती दिली. तो सांगतो म्हणाला पण एकूणच त्याच्या देहबोलीवरून तो तयार होईल असे वाटत होते. पण बुधवारी दुपार पर्यंत त्यांच्या कडून काही संपर्क झाला नाही तेव्हा जरा धाकधूक वाटली. पण अखेर 'I am in' असा त्याचा ping आला आणि आनंदाने लगेचच 'Explorers' च्या office ला फोन करून जागा उपलब्ध असल्याची खात्री करून घेतली. Online पैसे ट्रान्स्फर केले आणि registration form भरणे इत्यादी सोपस्कार पार पडले. ४ दिवसाची सुट्टी अगदीच वाया जाणार नाही म्हणून छान वाटले त्यातून २ दिवस घरची आघाडी सांभाळून हे करता येणार होते त्यामुळे तिकडून खुसफुस होण्याचा प्रश्न नव्हता. बुधवारी office मधून येत असतानाच लिंगाण्याला जायचे वेध लागले.

गुरुवारी प्रशांत ने नाशिक च्या प्लान मधून माघार घेतली आणि तो हि लिंगाण्याला यायची चौकशी करू लागला. सुदैवाने जागा अजून शिल्लक होत्या. लगेचच त्याने बुकिंग confirm केले. प्रशांत येतोय हे समजल्यावर मी आणि ऋतुराज दोघांनाही बरे वाटले. आमच्या त्रिकुटाने सह्य भ्रमंतीची सुरुवात एकत्रच केली आणि बरेच किल्ले आम्ही एकत्र पालथे घातले. पण गेल्या काही वर्षात तिघांची भटकंती सुरु असली तरी तिघांचा एकत्र जाण्याचा योग जुळून आला नव्हता. ह्या निमित्ताने तो योग आल्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला जाणार होता.

आत्तापर्यंतची बहुतेक भटकंती कुठल्याही ग्रुप मधून न जाता स्वतंत्र आखणी करून केलेली. त्यामुळे नाही म्हंटले तरी ग्रुप बरोबर नवशिक्या सारखे आरामात जात आहोत हि जाणीव टोचत होती. पण लिंगाणा climb हे वेगळे प्रकरण आहे हे जाणून होतो. सोप्या ते मध्यम स्वरूपाच्या प्रस्तरारोहणाचा अनुभव असला तरी लिंगाण्या सारख्या ठिकाणी जायला लागते ती तांत्रिक प्रस्तरारोहणाची (Technical Climbing ) माहिती आणि साधने दोन्ही आपल्याकडे नाहीत हे हि जाणून होतो आणि अशा ठिकाणी आगाऊ धाडस मुळीच शहाणपणाचे नसते. ह्या सर्व बाबींचा विचार करता सध्या तरी तांत्रिक प्रस्तरारोहणा साठी अशा माहितगार संस्थे बरोबरच जाणे योग्य ह्याची खूण गाठ मनाशी बांधली.

शनिवारी दुपारी १ वाजता explorers च्या कार्यालयात पोहचायचे होते. तिथूनच सर्वांनी एकत्र निघण्याचे नियोजन होते. मुख्य प्रस्तारारोहण आणि राहणे, प्रवास तसेच खाण्या पिण्याची सर्व व्यवस्था explorers कडूनच होणार असल्याने तयारी साठी फार काही करायचे नव्ह्ते. शनिवारी सकाळी इतर कामे आटोपली आणि पाण्याच्या बाटल्या ,जास्तीचे कपडे, स्लीपिंग bag, torch , first -aid, swiss-knife अशी काही महत्वाची निवडक सामुग्री गोळा करून backpack सिद्ध केली. बरोबर एक छोटा पिट्टू पण घेतला ज्याचा उपयोग मुख्य climb च्या वेळेस करायचा होता.

१२:३० च्या सुमारास explorers च्या टिळक रस्त्यावरील कार्यालयात पोहचलो. लोक अजून जमत होते. प्रशांत येउन बसला होता. ऋतुराज वाटेत होता. तिथे लगेच explorers च्या प्रतिनिधीने हजेरी घेऊन दुसऱ्या दिवशीचे pack lunch आणि T -Shirt सुपूर्द केला. ते बघून explorers चे नियोजन व्यवस्थित असल्याचा अंदाज आला. अर्ध्या तासात एक एक करत सर्वजण तिथे हजार झाले. आमच्या गटात नववी मधल्या मुला पासून पन्नाशी च्या तरुणां पर्यंत सर्व वयोगटातले लोक सामील झाले होते.

सर्वजण जमून निघे पर्यंत १:३० वाजला होता. दुपारची वेळ असल्याने traffic चा फारसा त्रास न होता गाडी हायवेला लागली. इतर सदस्यांची ओळख अजून झालेली नव्हती त्यामुळे आम्ही तिघेच जुन्या ट्रेक्स पासून जागतिक राजकारणा पर्यन्त विविध विषयांवर गप्पा मारत होतो. प्रशांत नुकताच इस्राईल ला जाऊन आला असल्याने तो त्यांचे तेथील अनुभव सांगत होता. गाडी नसरापूर फाट्याला वळल्याची जाणीव रस्त्याने करून दिली. तिथून पुढे वेल्ह्यात चहा साठी एक break झाला आणि गाडी तोरण्याच्या बाजूने पुढे निघाली. उंच सखल प्रदेश, अरुंद आणि वळणा-वळणाचा रस्ता त्यामुळे driver अतिशय सावधपणे गाडी हाकत होता. डावीकडे उंचच उंच तोरणा उभा असलेला दिसत होता. त्याचा बुधला तर अगदी उठून दिसत होता. भट्टी , पासली अशी गावे मागे पडून गाडी केळद खिंडी च्या दिशेने चढू लागली.

खिंड ओलांडून लगेचच उजवीकडे सिंगापूर-मोहरी कडे जाणारा कच्चा रस्ता लागला. सुमारे १० किमी चा हा रस्ता आहे. कच्चा रस्ता असल्याने गाडीचा वेग १०-१५ च्या आसपासच होता. सिंगापूर च्या अलीकडे डावीकडे लांबवर लिंगाण्याचा सुळका पहिल्यांदा दिसला.

Lingana2

मोहरीच्या वाटेवरून लिंगाण्याचे प्रथम दर्शन

त्याला बघूनच उत्साह दुणावला. मोहरी ला पोहचे पर्यंत ५:१५ झाले होते. राहायची व्यवस्था मोहरीच्या सरपंचांच्या घरात केलेली होती. ६:०० ला ओळखपरेड आणि उद्याच्या प्लान चे de -briefing होणार होते. तोपर्यंत वेळ होता म्हणून फिरत घाट माथ्याच्या बाजूला गेलो. तिथे बसून निवांत गप्पा मारत ऋतुराज ने आणलेल्या बाकरवड्यांचा फडशा पाडला . परत येउन ओळखपरेड साठी रिंगणात उभे राहिलो. एकूणच गटात विविध वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील लोक आले होते.त्यातील काहींचा तर हा पहिला-दुसराच ट्रेक होता हे ऐकून जरा आश्चर्यच वाटले. ओळख परेड, equipment ची माहिती आणि उद्याच्या प्लान चे de -briefing झाल्यावर सर्वांना climbing आणि rappelling साठी आवश्यक असणारे Harness, carabiners, descender, helmet , miton, tape sling इत्यादी साहित्य देण्यात आले. ह्या साहित्याचा देखील सेट व्यवस्थित लावलेला होता. इथेही explorers चे नियोजन चांगले असल्याचे दिसून आले. कुठल्याही साहसी क्रीडाप्रकारात योग्य तंत्र आणि safety equipment वापरायला पर्याय नाही.

रात्रीच्या जेवणात मस्त नाचणीची भाकरी, रस्सा भाजी, ठेचा, कांदा असा बेत होता. अजून काहीच शारीरिक कष्ट केले नसले तरी सह्याद्रीच्या मातीचा परिणाम म्हणून कि काय नेहमी पेक्षा जास्तच जेवण झाले. हवेतला गारवा जेवणानंतर जास्तच जाणवू लागला. प्रथेप्रमाणे जेवणानंतर गार हवेत काही वेळ आकाश दर्शन झाले. नऊ च्या सुमारास आत जाऊन उद्या बरोबर घ्यायचे सामान तेवढे ठेवून backpack जरा हलकी केली आणि झोपायची तयारी सुरु केली . पहाटे २ ला उठायचे असल्याने लवकर झोपणे आवश्यकच होते. कोणत्याही trekking ग्रुप मध्ये एक तरी पट्टीचा घोरणारा लागतोच तसा इकडेही होता ! त्यामुळे झोपे लागे पर्यंत १०:३० वाजले.

बरोबर २ वाजता leaders ने call देऊन सगळ्यांना जागे केले. फारशी कुरकुर न करता सगळेच पटापट जागे झाले. आवरून झाल्यावर पहाटे ३:०० ला मस्त गरमागरम कांद्या पोह्यांचा नाश्ता !! इस बात पे एक FB पोस्ट तो बनता है बॉस ! लगेच प्रशांत ने फोटो काढून FB वर टाकून दिला. इथून बोराट्याच्या नाळे पर्यंत साधारण ४५ min चे चालणे आहे. वाट तशी चुकण्या सारखी नाही, पण उगाच वाट शोधण्यात वेळ जाऊन पुढे उशीर होऊ नये म्हणून गावातून दगडू मामांना बरोबर घेतले होते.

पहाटे ची वेळ असल्याने गारवा चांगलाच जाणवत होता. बहुतेक प्रत्येकाने अंगात स्वेटर, जर्किन, स्कार्फ इ. घातलेच होते. अर्थात चालल्यानंतर काहीच वेळात उष्णता निर्माण झाल्यावर त्याची गरज भासणार नव्हती हा भाग वेगळा. पहाटेच्या गार हवेत पावले झपाझप पडत होती. काहीच वेळात बोराट्याच्या नाळेच्या तोंडाशी येऊन थांबलो. इथे सगळ्यांना harness, tape sling, carabiner , इत्यादी safety equipment बांधून घ्यायला लावले. इथून बोराट्याची नाळ साधारण १/३ उतरून उजवीकडे traverse मारून लिंगाणा आणि मुख्य सह्यधार ह्यांच्या मधील खिंडीत जायचे होते तिथून लिंगाण्याचा मुख्य climb सुरु होतो.

बोराट्याची नाळ अंधारातच torch च्या प्रकाशात उतरायला सुरुवात केली. बोराट्याची नाळ हि हरिश्चंद्राच्या नळी च्या वाटेच्या तुलनेत अरुंद आणि तीव्र उताराची आहे. खडक ठिसूळ असल्याने प्रत्येक पाऊल जपूनच टाकावे लागत होते. कुठला दगड निसटून सुटेल हे सांगता येत नव्हते. अंधार असल्याने उतरण्याचा वेगही कमीच होता. साधारण २००-२५० मीटर उतरल्यावर उजवीकडचा traverse लागला. हा traverse थोडासा अवघड आहे. होल्ड्स आहेत पण खाली exposure बरेच आहे. त्यामुळे explorers च्या leads नी इथे पण safety rope लावलेला होता. त्यात tape sling ला लावलेला carabiner अडकवून self-anchor करून पुढे जायचे होते. एक क्षण असे वाटले कि हा patch आपण सहज negotiate करून जाऊ. तेवढ्यासाठी कशाला self -anchor? पण लगेच तो विचार झटकला safety comes first ह्याला स्मरून safety rope ला anchor केले. Rock Climbing काय किंवा एकूणच साहसी खेळांमध्ये बऱ्याचदा असे वाटते की मी अनुभवी आहे मला safety ची गरज नाही अथवा मी अनुभवी असल्याने safety equipment वापरणे हे भ्याडपणाचे दिसेल. अशा विचारांना थारा न देणेच योग्य. अनाठायी साहस आणि आत्मविश्वास हा आपल्याला धोक्याचा ठरू शकतोच पण त्याच बरोबर तो इतरांना तापदायक पण होऊ शकतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे. साहसी खेळांमध्ये धोका पत्करावा लागतो हे खरेच पण योग्य प्रशिक्षण घेऊन, विचार पूर्वक, सुरक्षे ची पुरेशी उपाययोजना करून पत्करलेला धोका आणि उत्साहाच्या भरात अथवा अति-आत्मविश्वासाने केलेले वेडे धाडस ह्यात फरक आहे.

खिंडीत पोहचलो तोपर्यंत ५:३०वाजले होते. leaders आणि इतर सदस्य मागून येत होते. खिंडीतून लिंगाण्याचा माथा हा साधारण १००० फुटावर आहे. ही चढाई साधारण दोन टप्प्यात आहे खिंडी पासून गुहे पर्यंत साधारण ४५०-५०० फूट आणि गुहे पासून माथ्यापर्यंत वरती अजून ४५०-५०० फूट. खिंडीतून वरपर्यंत पूर्ण चढाई हि ७०-८० अंश च्या कोनातून आहे काही ठिकाणी ९० अंश देखील. पूर्ण चढाई ही ५-१० फूट रुंदीच्या अतिशय अरुंद धारेवरून आहे. वाटेत सगळीकडे घसारा आहे त्यामुळे ही चढाई अजूनच खडतर झाली आहे.

इथून खरा technical climb सुरु होत असल्याने leaders येई पर्यंत तिथेच थांबून राहिलो. ग्रुप बरोबर जाताना leaders चे ऐकणे हा नियम पाळायलाच हवा. काहीच वेळात leaders पैकी १-२ जण तिथे येउन पोहचले. त्यांनी सगळ्यांची safety equipments परत check केली. ५-६ leaders आधीच येउन वर गुहेत राहिले होते. त्यांनी कालच येउन खिंडीतून वर पर्यंत main line fix केली होती. आत्ता देखील त्यातले काही जण गुहेतून खाली निम्म्यात येऊन वर येणाऱ्या मेंबर्सना बिले द्यायला उभे होते.

Rock Climbing मध्ये सुरक्षे ला सर्वोच्च प्राधान्य असणे आवश्यक आहे. Explorers team ने हे मानक पूर्णपणे पाळत सुरक्षेची पूर्ण काळजी घेतलेली होती. मगाशी सांगितल्या प्रमाणे खिंडी पासून माथ्या पर्यंत सलग सुरक्षा दोर लावलेले होते. Climbing मध्ये आरोहण करणाऱ्या सदस्याच्या सुरक्षितते साठी मुख्यत्वे दोन दोर असतात. एक असतो तो वर सांगितल्या प्रमाणे लावलेला सुरक्षा दोर त्या दोराला आरोहाकाने स्वतःला कायम अडकवून घ्यायचे असते. म्हणजे चुकून तोल गेलाच तर आरोहक सरळ खाली न पडता दोराला लटकून राहू शकतो . तसेच ह्या दोराचा वापर जिथे नैसर्गिक खाचा मिळत नाहीत तेथे आधार म्हणून पण करतात. Tape Sling आणि Carabiner च्या सहायाने आरोहक स्वतःला ह्या दोराशी जोडून घेतो. दुसरा दोर असतो तो बिले साठी. बिले चा रोप आरोहाकाच्या कमरेला असलेल्या harness मध्ये carabiner च्या सहायाने अडकवितात. हा दोर वरच्या टप्प्यावर असलेला belyaer नियंत्रित करतो. आरोहक जस जसा वर येत जाईल तास तसा हा रोप belyaer वर खेचून घेतो त्यामुळे आरोहक चढताना सटकला तरी बिले रोप ला लटकून राहतो. हा दोर नियंत्रित करायला तो खडकाला मारलेल्या piton (एक प्रकारचा हुक) मधून ओवून घेतात. ह्यासाठी कधी कधी विशेष बिले device देखील वापरतात जे friction controlled असते.

सगळ्यांचे harness check करून झाले. वरून काही leaders मंडळी खालच्या टप्प्यात आली. आता एक एक करत मुख्य आरोहाणा ला सुरुवात झाली. १-२ सदस्य पुढे गेल्यावर मी आरोहणाला सुरुवात केली. पहिला ३० एक फुटांच्या टप्प्यासाठी बिले ची गरज नव्हती. Self -anchor वर भागण्या सारखे होते. रोप ला anchor केले आणि नैसर्गिक खाचा शोधत वर सरकू लागलो. ह्या टप्प्यात नैसर्गिक खाचा बऱ्यापैकी आहेत. Safety rope असला तरी जिथे नैसर्गिक खाचा आहेत तिथे त्यांचा वापर करणे आवश्यक आहे अन्यथा प्रस्तरारोहणाचे तंत्र विकसित होणार नाही. खिंडीतच भन्नाट वाऱ्याने ओळख करून दिली होती. वरती तर वारा अजूनच जास्त जाणवत होता.

ह्या टप्प्यावरून पुढे बिले ची गरज भासणार होती. तिथे असलेल्या leader ने थांबायला सांगितले. पुढचा सदस्य अजून बिले रोप वर होता. तो पुढे सरकल्यावर बिले रोप वरच्या leader ने खाली सोडला. खालच्या leader ने तो माझ्या कमरेच्या carabiner मध्ये अडकविला.

वरील टप्पा खरोखरच कठीण दिसत होता. बिले , safety rope असूनही मनात धाक धुक वाटत होती. बाहेर पूर्ण अंधार, घोंघावणारा सुसाट वारा आणि समोर उभा असलेला सह्याद्रीचा कातळ! अंगावर रोमांच आणणारे वातावरण . अशातच कानात शब्द घुमले ‘Belay tight, Climbing On, Climb!’. दीर्घ श्वास घेतला आणि वर सरकायला सुरुवात केली. थोड्याच अंतरात नैसर्गिक खाचा मिळेनाश्या झाल्या आणि safety रोपचा आधार घेण्या वाचून पर्याय उरला नाही. पुढे मग मिळेल तिथे नैसर्गिक खाचा आणि नसेल तिथे रोप असा आधार घेत वरच्या टप्प्यावर आलो. मागेवळून पाहिले तर खोल वर दरीत अंधारच होता. वारा अजूनही पिसाटल्या सारखाच होता. Safety रोप देखील वाऱ्याने हलत होता. प्रशांत, ऋतुराज मागून येतच होते. इथून पुढे असेच टप्पे पार करत वर जायचे होते.

एक एक टप्पा पार करत वर सरकत होतो. गुहा जवळ येत आहे का ते पहात होतो. एक टप्पा पार करून वर आल्यावर जरा सपाटी लागली. उजाडायला अजून अवकाश होता पण तांबडे फुटायला सुरुवात झाली होती . इतक्या वेळात पहिल्यांदा घड्याळ पहिले ६:३० वाजले होते. म्हणजे खिंडीतून इथवर ४५ min लागली होती. इथे चुकून गुहे कडे उजवी कडे जाण्या ऐवजी डावीकडे traverse वर गेलो. पुढील टप्प्या साठी दोर लावलेला दिसला. पण leaders पैकी कोणीच तिथे नव्हते. मग सरळ मागे परत आलो तेवढ्यात explorers चे प्रमुख श्री. आनंद केंजळे आले. कोणी चुकून पुढ्च्या टप्प्यावर जाऊ नये म्हणून ते आले होते. त्यांच्या बरोबर गुहेत गेलो. प्रशांत आणि ऋतुराज पोहचतच होते पण इतर बरेचसे सदस्य अजून वर येत होते. ह्या टप्प्यावर सगळे सदस्य येउन पोहोचल्या खेरीज गुहेच्या वरच्या टप्प्यातील आरोहण सुरु होणार नव्हते. तेव्हा मग तिथे पाठीवरच्या पिशव्या सोडवल्या आणि निवांत बसलो. तहान लाडू आणि भूक लाडू काढून पोट पूजा आटोपली. बाहेर आता उजाडायला सुरुवात झाली होती. समोरच रायलिंग पठार दिसत होते. उजवीकडे बोराट्याची नाळ दिसत होती. आपण कुठून आलो ह्याचा अंदाज घेतला.

Lingana3

गुहेतून समोर दिसणारे रायलिंग पठार

खिंडीपासून थोड्याच अंतरात बरीच उंची गाठली होती. अर्थात अजूनही निम्मा टप्पा बाकी होता. पण सर्वजण येई पर्यंत पुढे जाता येणार नव्हते. मग तिथेच फोटो काढत बसलो. सगळे गुहे पर्यंत येता येता ७:३० वाजून गेले. तिथे मग परत पुढील कार्यक्रमाची उजळणी झाली आणि Leaders रोप fix करायला पुढे गेले. साधारण अर्ध्या तासाने निघायचा इशारा झाला.

Lingana4

खालील दरीत पडलेली लिंगाण्याची सावली

गुहे पासून डावीकडे Traverse मारून पुढच्या कातळ टप्प्या पाशी आलो. इथे पुन्हा बिले ची गरज भासणार होती. Leaders एक एक करून वर सोडत होते. तिथे मग रांगेत वाट बघत बसण्याखेरीज पर्याय नव्हता. हा टप्पा खालून तसा फारसा कठीण वाटत नव्हता. ऋतुराज ने वर चढायला सुरुवात केली आणि वरच्या एका टप्प्यात थोडा अडकल्या सारखा झाला अर्थात लगेचच त्याला होल्ड्स मिळाले आणि तो पुढे सरकला. तिथेच हा टप्पा खालून वाटतो तितका सोपा नाही हे लक्षात आले. रांगेतून एकदाचा नंबर लागला. बिले fix केला आणि चढायला सुरुवात केली. वरच्या टप्प्यात पोहचल्यावर एक छोटासा बाहेर आलेला खडक ओलांडून पलीकडे जायचे होते. तिथे कसोटी लागली. Self -anchor आणि बिले असून पण हा टप्पा पार करणे अवघड वाटत होते . Overhang पार करायला थोडेसे बाहेर झुकून जावे लागणार होते आणि तीच खरी परीक्षा होती. अशा काही टप्प्यांमध्ये तुमच्या शारीरिक क्षमते बरोबरच मानसिक तयारीचा कस लागतो. एक क्षण थांबून नीट अंदाज घेतला आणि safety rope चा आधार घेऊन overhang पार केला.

Linagana5

गुहेनंतर चा पहिला टप्पा

इथून पुढे असेच आव्हानात्मक १-२ टप्पे पार करत पुढच्या एका टप्प्या पाशी आलो. इथे झुलती शिडी लावली होती. तिच्यावर पाय देऊन वर जात वरच्या टप्प्यातील खाचा पकडून वर जावे लागणार होते. शिडी खालून धरायला lead होताच पण तरीही झुलत्या शिडीवरून होल्ड्स पकडून शरीराचा भार वर खेचणे हे जाम जिकीरीचे वाटत होते. शेवटी कसाबसा शिडीच्या दुसऱ्या पायरी पर्यंत गेलो आणि सरळ पाय पूर्ण ताणून डावीकडील कातळावर fix केला आणि उजवा हात वरील खाचेत घालून स्वतःला वर उचलून घेतले. इथून पुढचे टप्पे देखील असेच आव्हानात्मक होते. प्रत्येक टप्प्यावर खाली आणि वर दोन्ही कडे support साठी leads होतेच.

Lingana6

Linagana7

Lingana8

Lingana9

वरच्या टप्प्यातील आव्हानात्मक चढाई (फोटो सौजन्य: प्रशांत पाटील )

असे ३-४ टप्पे पार केल्यानंतर माथा टप्प्यात दिसू लागला. आता एखादाच टप्पा पार केला कि समोर छोटीशी चढण आणि लगेच माथा. त्यामुळे हालचालींना वेग आला शेवटचा तुलनेने सोपा टप्पा पार केला आणि समोर ऋतुराज आणि प्रशांत माथ्या च्या दिशेने चालताना दिसले.

Lingana10

Lingana11

माथ्याजवळ

लगेच झपाझप पावले टाकत माथ्यच्या दिशेने चालू लागलो. काही क्षणातच माथ्यावर पाऊल टाकले आणि पहिले लक्ष गेले ते समोर असलेल्या दुर्गदुर्गेश्वर रायगडाकडे. नकळत हात जोडले गेले आणि मान लवली गेली. शतकानुशतके गुलामीत खितपत पडलेल्या मराठी मनात हिंदवी स्वराज्याची आस जागविणाऱ्या शिवछत्रपतींच्या राजधानी समोर नतमस्तक झालो!

Lingana12

दुर्गदुर्गेश्वर!!

साधारण १०:०० वाजले होते. हळू हळू एक एक जण माथ्यावर पोहचत होते. माथ्यावरून पूर्वेला समोर रायलिंग पठार, लांबवर मागे तोरणा , पश्चिमेला रायगड , दूरवर कोकणदिवा असा परिसर दिसत होता. माथ्यावर जागा किती ? जेमतेम २० लोक उभे राहू शकतील एवढी.

Lingana13

Lingana14

Lingana15

माथ्यावर (फोटो सौजन्य: प्रशांत पाटील )

त्यामुळे हालचाली करताना पण काळजी घेणे गरजेचे होते. सर्वजण माथ्यावर येई पर्यंत परत एकदा जठराग्नी शांत केला. त्यानंतर अर्थातच काही फोटो काढले. सगळे वर येई पर्यंत १२:०० वाजून गेले. सगळे आल्यावर मग group photo session झाले. शिखर तर सर झाले होते पण उतरायचा निम्मा भाग अजून बाकी होता. A summit is never complete without a safe descend !! उतरतानाचे तंत्र (Rapplling ) वेगळे होते. पुन्हा एकदा श्री. आनंद केंजळे ह्यांनी उतरतानाचे तंत्र आणि घ्यायची काळजी ह्याची उजळणी केली.

योग्य ती safety measures घेतल्यास Rappeling हा कडे उतरण्या साठीचा अतिशय जलद मार्ग आहे. ह्यात climbing सारखे होल्ड्स शोधावे लागत नाहीत आणि शरीराचा भारही उचलावा लागत नाही. Gravity नेच आपण उतरत असतो फक्त हातांनी दोर धरून आणि हळू हळू सोडणे आणि त्याच्या बरोबरच पाय सरळ ठेवून कड्याला लावत लावत खाली येणे हे तंत्र जमावे लागते. इथे हालचालींच्या synchronization ला महत्व आहे.

उतरताना नवीन सदस्यांनी पुढे राहायचे असे श्री. केंजळे ह्यांनी ठरविले. ह्यामुळे आपोआपच team चा उतरण्याचा वेग नियंत्रित होणार होता. पण त्यामुळे परत रांगेत वाट बघत बसण्याला पर्याय नव्हता. पहिले rappelling चे २-३ छोटे टप्पे तिथून मग थेट गुहे पर्यंत सुमारे १५० फुटाचा मोठा टप्पा आणि गुहे पासून खाली खिंडी पर्यंत परत सुमारे १५० फुटाचा दुसरा मोठा टप्पा फुटाचा असा मार्ग होता. उतरताना वारा फारसा नव्हता पण अतिशय अरुंद धार आणि दोन्ही बाजूला डोळे फिरविणारी खोल दरी असल्याने अतिशय सावधानतेने उतरावे लागत होते. येथेही safety रोपला self -anchoring करूनच उतरत होतो.

Lingana16

Lingana17

Lingana17

Lingana18

Lingana19

परतीची वाट (समोर बोरटा नाळ दिसत आहे, फोटो सौजन्य: प्रशांत पाटील )

पहिले २-३ टप्पे पटकन पार झाले आणि पहिल्या मोठ्या सलग १५० फूट rappelling च्या टप्प्या पाशी आलो. येथे रांग लागणे स्वाभाविक होते. Leaders ने पुढे जाऊन रोप खाली सोडला होता. एक एक करत सदस्य उतरू लागले. गुहेपर्यंत उतरून तिथे फार वेळ न थांबता थोडीशी पोटपूजा उरकून लगेच दुसरा टप्पा उतरून खिंडीत उतरायचे होते. तिथून सूर्यास्ताच्या आता रायलिंग पठारावर पोहचून लिंगाणा आणि रायगडच्या साक्षीने सूर्यास्त अनुभवायचा होता.

Lingana20

पहिल्या १५० फुटाच्या टप्प्याची सुरुवात

इथे नंबर लागे पर्यंत तास भर तरी गेला असेल. प्रशांत माझ्या पुढे उतरू लागला आणि leaders ने वेळ वाचवा म्हणून रोपची दुसरी गुहेच्या जरा उजवीकडे उतरणारी line सुरु केली. ह्या line वरून उतरणारा मीच पहिला होतो. इथून साधारण ७०-८० कोनातून उतरायचे असल्याने वरून नेमके कुठे उतरायचे आहे ते दिसत नव्हते. त्यातून उतरायची जागा सरळ रेषेत नव्हती निम्म्यातून दोर थोडा डावीकडे गेला होता. त्यामुळे त्या अंदाजाने हळू हळू खाली यायचे होते. desecnder च्या मदतीने उतरायचा वेग नियंत्रित करत उतरू लागलो. वर म्हणल्या प्रमाणे rappelling मध्ये synchronization ला महत्व आहे. हातांची योग्य हालचाल करून उतरायचा वेग नियंत्रित करायचा आणि पाय शक्य तेवढे सरळ ठेवून कमरेतून ९० अंशां च्या कोनात कातळाला लावत खाली यायचे. Synchronization मध्ये गडबड झाली तर दोरा भोवती गिरकी घेऊन आपटायला होते. साधारण ५ एक मिनिटात तो टप्पा संपवून गुहेच्या बाजूला उतरलो. प्रशांतही दुसऱ्या line वरून खाली आला होता. ऋतुराज अजून मागेच होता.

Lingana21

गुहेत जाऊन पटकन खाऊन घेतले आणि गर्दी टाळण्यासाठी बाहेर येउन थांबलो. ऋतुराज तोवर खाली येतच होता. तो आल्यावर एका पाठोपाठ उतरता येईल म्हणून मग दुसरा टप्पा सुरु होतो तिथे जाऊन थांबलो. Leaders अजून खालच्या टप्प्याचा रोप fix करत होते. आधी उतरून आलेले काही सदस्य रांग लावून बसलेच होते. रोप fix झाला आणि एक एक जण उतरायला लागला . इथेही वेळ वाचवा म्हणून २ रोप लावून २ lines open केल्या होत्या. ऋतुराज येई पर्यंत रांग बरीच लांबली होती. परत थांबण्याला पर्याय नव्हता. सुमारे १:३० तासाने प्रशांत उतरू लागला त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या line वर मी. हा टप्पा पहिल्या टप्प्या पेक्षा मोठा होता. साधारण ५ मिनिटात आम्ही दोघेही खिंडीत उतरलो. ऋतुराज मागून उतरत होताच. त्याच्या साठी वाट पाहत मी थांबलो आणि प्रशांत बोराट्याच्या नाळे कडे निघाला.

ऋतुराज खाली आला तेव्हा ५ वाजून गेले होते. सूर्यास्ताच्या आत बोराटा नाळ पार करून वरती रायलिंग पठार गाठायचे होते. दिवस थंडीचे असल्याने लवकर होणारा सूर्यास्त ह्यामुळे हातात वेळ कमी होता. त्यामुळे झपाझप पावले टाकत निघालो. बोराट्याच्या नाळेच्या सुरवातीला प्रशांत थांबला होता. तसेच पटापट वर चढत राहिलो आणि ४० मिनिटात रायलिंग च्या पठारावर पोहचलो देखील.

पुढे आलेले सदस्य पठारावर बसून समोरचा थरारक नजारा डोळ्यात साठवत होते. सूर्यास्ताला अजून २०-२५ मिनिटे बाकी होती. समोर उभा असलेलं लिंगाण्याचं रौद्र पण तितकच देखणं रूप मनाला मोहून टाकत होतं. इथून त्याची ती अरुंद धारे वरून चढणारी वाट अजूनच बिकट वाटत होती.

Lingana22

अरुंद धारेवरून चढत जाणारी अवघड वाट. (फोटो सौजन्य: प्रशांत पाटील )

अस्ताला जाणाऱ्या सूर्यबिंबाचा रायगडला स्पर्श झाला तसा ते दृश्य आणि लिंगाण्याच्या आठवणी मनात साठवत परतीच्या वाटेला लागलो.

Lingana23

रायगडा मागे होणारा सूर्यास्त. डावीकडे लिंगाण्याचा सुळका.

गावात पोहचलो. तिथे श्रमपरिहार म्हणून भाजी भाकरी बरोबरच गुलाबजामचा बेत होता. दिवसभर जेवण असे नीट झालेले नव्हते त्यामुळे भूक तर सपाटून लागली होती. त्यातून असा मस्त बेत. यथेच्छ जेवण झाल्यावर तृप्त मनाने सुस्त शरीराने गाडी मध्ये जाऊन बसलो. सगळे जमून निघे पर्यंत ८ वाजले. मोहरी गावाचा निरोप घेतला आणि गाडीने पुण्याकडे प्रस्थान ठेवले. दमल्यामुळे परतीचा प्रवास जवळपास सर्वांनी झोपेतच केला. (अर्थातच चालक सोडून).

जाता जाता माझ्या भ्रमंती मधून मला भावलेले काही; सह्याद्री / हिमालयातील भौगोलिक शिखरे काय किंवा जीवनातील यशाची लौकिक शिखरे काय ती गाठण्याला खरा अर्थ तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा मनाला त्या उंची वर नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून होईल.
इति लेखन सीमा!

(ह्या संपूर्ण ट्रेक चे केलेले उत्कृष्ठ आयोजन आणि प्रत्येक सदस्याला केलेले सहकार्य ह्यासाठी Explorers चे श्री. आनंद केंजळे आणि त्यांच्या संपूर्ण टीम चे आभार)

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

5 Feb 2015 - 1:49 pm | प्रचेतस

अफाट आहे सह्याद्री.
छान लिहिलंय.

अजया's picture

5 Feb 2015 - 2:09 pm | अजया

बिकट वाट खरी!मस्त लेख.घरबसल्या ट्रेकचा थरार अनुभवला.सुर्यास्ताचा फोटो सुरेख.

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 Feb 2015 - 3:01 pm | राजेंद्र मेहेंदळे

लिंगाणा भेदक दिसतोय फोटोतुन. एक्स्प्लोरर्स ची इ मेल्स येत असतात नव्या मोहिमांची. एकदा अशा मोहिमेला जाउन बघावे लागेल.

जबरदस्त .. लेखन आणि ट्रेक दोन्ही एकदम झकास.
शेवटच्या भावलेल्या लाईन पण मस्त.

फिरत रहा..

स्पंदना's picture

5 Feb 2015 - 4:44 pm | स्पंदना

काय बोलु?
तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहात.
इथे असे साहस करणारे तरुण आहेत अन ते मराठी आहेत याचा अतिशय अभिमान वाटला.

पैसा's picture

5 Feb 2015 - 4:51 pm | पैसा

लिंगाण्याचे फोटो बघून पोटात खड्डा पडला! वर जायचा विचार सोडाच! खूप छान लिहिलंय आणि फोटो अप्रतिम! ९ वीतल्या मुलांनाही सांभाळून नेणार्‍या तुमच्या आयोजकांचे प्रचंड कौतुक!

सुंदर प्रकाशचित्रे आणि अलौकिक चित्रचौकटींनी हे वर्णन अतिशय रुचकर झालेले आहे.
लिंगाण्याचे रायलिंगावरूनचे प्रकाशचित्र तर अप्रतीम.
सोंडेवरूनची वाट दर्शवणारे प्रकाशचित्र चित्तथरारक.
आणि रायगडावरील सूर्यास्ताचे चित्र तर कळस आहे.

तुमच्या यशस्वी साहस सहलीचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
अशीच साहसे निर्भयपणे जगा. तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

लिंगाणा दिसतो सुरेख अगदी, हाती धरावा तसा ।
नंदी रायगडास जणू सुबकसा, केला समोरी उभा ॥

स्वच्छंदी_मनोज's picture

5 Feb 2015 - 6:17 pm | स्वच्छंदी_मनोज

भन्नाट...
बोराट्याची आणी सिंगापूरची वाट ह्या करायच्या राहील्यात, लिंगाणावर चढाई तर अजूनही स्वप्नच आहे..

पिवळा डांबिस's picture

6 Feb 2015 - 3:00 am | पिवळा डांबिस

वाचतांनाही एक वेगळा अनुभव मिळाला.
वर्णन आणि फोटो दोन्ही सुरेख!
विशेषतः तो रायगडाचा फोटो आवडला...
"गड बहुत चखोट, दीड गाव उंच" असं वर्णन महाराजांनी का केलं असेल ते उमजलं...
पुढील ट्रेक्ससाठी शुभेच्छा!

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Feb 2015 - 10:52 am | ज्ञानोबाचे पैजार

वृत्तांत वाचताना पोटात गोळा येत होता आणि फोटो पहातानाच डोळे गरगरत होते.
लिंगाण्यावर जाण्यासाठी आता पुर्नजन्म घ्यावा लागेल.

लिंगाणा म्हटले की हा व्हिडिओ आठवतो.

आणि हा सुध्दा

(कधीकाळी असा वेडसर पणा केलेला) पैजारबुवा,

सह्यमित्र's picture

6 Feb 2015 - 12:03 pm | सह्यमित्र

होय हे दोन्ही व्हिडिओ पाहूनच लिंगाणा सर करायच्या इच्छेने मनात जोर धरला. श्री. झुंजारराव ह्यांची कामगिरी अभिमानास्पदच आहे.

कपिलमुनी's picture

6 Feb 2015 - 2:32 pm | कपिलमुनी

_/\_

अफाट चित्रफित आहे !

सह्यमित्र's picture

6 Feb 2015 - 12:04 pm | सह्यमित्र

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद !!

किसन शिंदे's picture

6 Feb 2015 - 11:36 pm | किसन शिंदे

अत्यंत थरारक आहे सगळं, तुम्हा सगळ्यांच विशेष कौतुक!!

अर्धवटराव's picture

7 Feb 2015 - 4:06 am | अर्धवटराव

ऑस्सम.
__/\__

सुबोध खरे's picture

7 Feb 2015 - 1:11 pm | सुबोध खरे

_/\__/\__/\__/\_

शित्रेउमेश's picture

17 Feb 2015 - 2:07 pm | शित्रेउमेश

मनः पूर्वक अभिनंदन.... लिंगाणा सर केलात मालक....

आनंद केंजळेचं नाव वाचुन खूप छान वाटलं.... आमचे मित्र आहेत ते.....

मुक्त विहारि's picture

17 Feb 2015 - 6:59 pm | मुक्त विहारि

आवडले.....

सुहास झेले's picture

18 Feb 2015 - 8:55 am | सुहास झेले

अफाट...

चौकटराजा's picture

19 Feb 2015 - 11:31 am | चौकटराजा

आता फक्त एक नजर टाकली आहे. पहिल्यांदा गूगल अर्थ मधून लिंगाण्याला जाउन येतो.मग सावकाश आपला धागा वाचतो.
आपल्यी लेखन शैली चांगलीच आहे राव !

वाचताना आणि फोटो पाहताना थरार जाणवला.

हकु's picture

23 Mar 2016 - 2:48 pm | हकु

लिंगाणा सर करणं म्हणजे खरंच थरारक प्रकार !!
आणि लिंगाण्यावरून दुर्गदुर्गेश्वर रायगडाचे दर्शन घेणे म्हणजे अहोभाग्य!!!
जेव्हा हा उल्लेख लेखातून आला तेव्हा खरंच अंगावर सरसरून काटा आला.
टू डू लिस्ट मध्ये अजून एक गोष्ट वाढली.

तिरकीट's picture

23 Mar 2016 - 5:22 pm | तिरकीट

अफाट

यशोधरा's picture

24 Mar 2016 - 5:18 am | यशोधरा

अफ्फाट!

अभिजीत अवलिया's picture

2 Apr 2016 - 1:19 pm | अभिजीत अवलिया

जबरदस्त. लिंगाणा एकदा सर केलाच पाहिजे आता.

गरिब चिमणा's picture

3 Apr 2016 - 3:43 pm | गरिब चिमणा

छानच,एकदा आपण भैरवगड नागेश्वर ट्रेक करुयात,तोही पावसाळ्यात, येणार का?????

प्रसाद गोडबोले's picture

3 Apr 2016 - 9:04 pm | प्रसाद गोडबोले

वाह वाह !

किसनरावजी , एकदा वल्लीसर आणि गावडे सरांना घेवुन हा ट्रेक करुयात का ? ;)