भाज्या-१ .५ वाटी कोबी लांब चिरुन, गाजरे १/२ वाटी लांब पातळ चिरुन, १/२ वाटी फरसबी चौकोनी चिरुन, १/२ वाटी मटारदाणे,१/२ वाटी फ्लॉवर बारीक चिरुन, लाल,पिवळी,हिरवी पैकी सर्व किवा ज्या असतील त्या ढोबळी मिरच्या लांब,पातळ चिरुन -सगळ्या मिळून साधारण वाटीभर,२ कांदे लांब चिरुन, २ कांदापाती बारीक चिरुन.
आले बोटभर बारीक चिरुन, ५/६ लसूण पाकळ्या बारीक चिरुन, ४/५ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन, सोया सॉस १ च. चमचा
२ टेबलस्पून तेल,मीठ व अजिनोमोटो चवीनुसार
२ वाट्या तांदूळाचा पाणी कमी घालून भात जरा फडफडीत शिजवून घ्यावा. एका ताटात शिजलेला भात मोकळा करुन ठेवावा.
तेलावर कांदा परतून घ्यावा, शिजत आला की गाजर,फ्लॉवर,फरसबी,मटार घालून परतावे,कोबी घालून परतावे.आले,लसूण घालून परतावे. १ लहान चमचा सोया सॉस घालून परतावे. मीठ व अजिनोमोटो घालावे आणि परतावे. मीठ व अजिनोमोटो दोन्ही खारट असते हे लक्षात ठेवून प्रमाण घालावे.
भाज्या पूर्ण शिजवू नयेत, थोड्या कचवट राहू द्याव्या.
मोकळा शिजलेला भात ह्या भाज्यात घालावा व शीत न मोडेल असे हलक्या हाताने परतावे. एक दोन वाफा येऊ द्याव्यात.सर्वात शेवटी बारीक चिरलेली कांदा पात घालावी.
फ्राइड राईस तयार आहे!
व्हेज मांचुरियन + फ्राईड राईस !
राईस खाताना सोया सॉस, चिली सॉस जसे हवे तसे घ्यावे.
प्रतिक्रिया
12 Nov 2008 - 10:14 pm | प्रभाकर पेठकर
ढोबळी मिरची आवडत नाही का? छान लागते आणि दिसते भातात.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
12 Nov 2008 - 10:23 pm | स्वाती दिनेश
घाईत लिवायला विसरलेच.. सगळ्या रंगीत सिमला मिरच्या छान दिसतात.. संपादन करते. धन्यु,:)
स्वाती
12 Nov 2008 - 10:36 pm | शाल्मली
अरे वा वा!!
कृतीची मागणी केल्यावर लगेच हाजिर.. क्या बात है!!
बाई.. हल्ली तुम्ही फार कामाला लावता बुवा..
--(बाईंची शिष्या) शाल्मली.
13 Nov 2008 - 12:59 am | शाल्मली
स्वातीताई,
फ्राईडराईस आणि मांचुरियन लगेच करुन पाहिले.
एकदम मस्त झाले आहे :) . हा पहा फोटो.
-- (गृहपाठ लगेच करणारी) शाल्मली.
12 Nov 2008 - 10:36 pm | लिखाळ
वा.. हा प्राईड राईस मस्तच लागतो हे मी स्वानुभवाने सांगतो :)
-- लिखाळ.
12 Nov 2008 - 11:25 pm | रेवती
लिखाळजींशी सहमत.
मी घरी नाही केला फारसा, पण आता करून बघीन.
त्याच्याबरोबर व्हेज मांचूरियनही करीन.
रेवती
13 Nov 2008 - 1:15 am | प्राजु
चला.. आज संध्याकाळी काय करावं हा प्रश्न सुटला. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Nov 2008 - 3:04 am | चतुरंग
मस्तच आहे फ्राईड राईस! :) आणि बरोबर वेज मांचूरियन म्हणजे पर्वणीच =P~
(खुद के साथ बातां : रंगा, आत्ता कट्टा होऊन फक्त ४ दिवस होताहेत तोवर सुरु झाली का रे तुझी खादाडीची भाषा? जरा, जरा जनाची लाज बाळग रे (मनाची कधीच सोडली आहेस). ;) )
चतुरंग
13 Nov 2008 - 9:21 am | विसोबा खेचर
पाकृ आणि फोटू नेहमीप्रमाणे छानच परंतु,
कॉर्न सूप, आणि स्प्रिंग रोल असे काही आयटम सोडले तर आम्ही चायनीज जेवणाचे प्रेमी नाही..
फ्राईडराईस पेक्षा आमची लखनवी बिर्याणी केव्हाही उत्तम..!
अर्थात, प्रत्येकाच्या आवडीनिवडी..
(लखनवी) तात्या.
13 Nov 2008 - 1:47 pm | वेताळ
मी फ्राईड राईस करताना एकतर तो चिकट होतो किंवा सर्व नीट मिक्स होत नाही.पण स्वाती ताई फ्राईड राईसला तांदुळ कोणता वापरावा? बाजारात पण चायनिझ तांदुळ मिळतो तो वापरावा काय? तिखट करण्यासाठी त्यात ओल्या मिरचीची पेस्ट वापरावी काय?
चायनिझ वेताळ
13 Nov 2008 - 1:55 pm | स्वाती दिनेश
मी बासमती तांदूळ वापरते, पण कोलमचाही फ्राइडराइस चांगला होतो.जुना तांदूळ घेतला की भात चिकट होत नाही.
भात तिखट हवा असेल तर खाताना जास्त चिली सॉस घाला.पण भात करतेवेळी त्यात आले, लसूण , मिरच्या - सर्व बारीक चिरुन घातलेले चांगले, मिरचीची पेस्ट मी तरी घालत नाही.
स्वाती
13 Nov 2008 - 1:57 pm | सुनील
चायनीज सहसा बाहेरच खातो पण आता घरीही करायला हरकत नाहीसे वाटते!
पाकृ आणि फोटो छानच.
अजिनोमोटोशिवाय चायनीजचा स्वाद येत नाही हे खरे, पण अजिनोमोटो जरा जपूनच खावा!
फ्राईड राईस उत्तम होण्यासाठी भात फडफडीत राहणे जरूरीचे. भात चिकट झाला तर तो इंडियन फ्राईड राईस (म्हणजे आपला फोडणीचा भात हो!) होईल.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.