आज दुपारी जेवणाच्या वेळी घरीच होते. मुलींच ताट मीच वाढून दिल. डाव्या बाजूला कोशिंबीर, चटणी; उजवीकडे एक भाजी, वाटीत आमटी, ताक, पोळ्या आणि मग गरम गरम वरण-भात दोघी अगदी मनापासून जेवल्या. आमच्याकड़े कामाला येणा-या बाई सगळ बघत होत्या. मला म्हणाल्या,"वाहिनी, अस रोज वाढून द्या. बघा मुलींची तब्बेत कशी महिन्याभरात सुधारेल." मी हसले; म्हणाले,"अहो, कस शक्य आहे? मग माझी बाहेरची कामं, जवाबदा-या कोण पूर्ण करणार?" मी आणि बाई दोघी हसलो आणि विषय तिथेच संपला.
मात्र विषय संपला अस मला वाटल तरी विचार मनात घोळत राहिले. आता तो काळ मागे पडला.. जेव्हा; स्त्री केवळ घरातल्या अर्थकारणाला हातभार लावण्यासाठी शिक्षण घेऊन नोकरी करायची. आज आपण आपल्या मुलांना कोणताही भेदभाव न करता शिक्षण देतो... निदान दिल पाहिजे; हां विचार मान्य करतो. आज कमी शिकालेले आई-वडिल ही आपल्या मुलीने चांगले शिक्षण घ्यावे आणि तिच्या आयुष्यात चांगली प्रगति करावी ही इच्छा मनात ठेवतात. आणि त्या दृष्टीने कायम प्रयत्न करतात. 10वि 12वि च्या रिजल्ट्स नंतर वर्तमान पत्रातून आपन जे वाचतो ते फ़क्त ट्रेलर असत. अशी अनेक मूल आणि त्यांचे पालक स्वमेहतीने पुढे येतातच की.
आजचे आई-वडील आपल्या मुलाला देखिल संसार, स्वयंपाक आणि घराच्या जवाबदा-यांची जाणिव देतात. आज नविन लग्न झालेले मुलगा-मुलगी एकमेकांच वैयक्तिक स्वातंत्र्य जाणतात. मुल जन्माला घालण्याची त्यांना घाई नसते. कारण त्यांना आपल्या एकुलत्या एका बाळाला सर्व प्रकारची सुख द्यायची असतात. त्याच बरोबर स्वतःच स्वातंत्र्य... 'स्पेस'.... जपायची असते.
पण मग यासर्वात आपण कुठेतरी कुटुंब व्य्वस्था आणि पुढील पिढीवरील संस्कार या भारताच्या कण्याला धक्का देतो आहोत का?
आज मनात येणारे काही प्रश्न फ़क्त तुमच्या समोर मांडते आहे. पूर्वी शाळेच्या वर्गातील मुलांमधे केवळ 1 किंवा 2 टक्के मुलांना चश्मा असायचा. कदाचित त्यामुळेच चश्मा असलेल्या मुलांना 'बॅटरी' म्हणून इतर मूलं चिडवायची. आज मात्र एका वर्गातील किमान 8/10 मुलांच्या डोळ्यावर सर्रास चश्मा दिसतो... काय असाव याच कारण? आज मुलांना घरातील भाजी-पोळी, वरण-भात, आमटी-ताक, चटणी-कोशिंबीर अस जेवण मुळात माहीत आहे का? असेलच तर आवडत का? वयाच्या 12-13व्या वर्षीच ब्यूटी पार्लरची पायरी मुली चढायला लागल्या आहेत...का?
मला आजही आठवत; माझ्या आईला खूप लहानपणी कगश्मा लागला होता. आणि भावाला देखिल केवळ मुळचे डोळेच कमजोर असल्यामुळे चश्मा लागला होता. तरीही माझ्या आईने अनेक प्रयत्न केले होते त्याचा चश्मा जावा म्हणून. रोज सकाळच्या शाळेला जायला आम्ही 6.30 ला निघायचो. त्यागोदार उठून रात्रि भिजत घातलेले बदाम ती सहाणेवर उगाळून आमच्या दुधात घालायची. इडली, डोसा, थालीपीठ, परोठे हे पदार्थ घरीच बनायचे. दर रविवारी उगाळलेल हलकुंड आणि तेल लावून मगच अंघोळ करण्याचा नियम होता.
म्हणजे दोन पिढ़या मागे गेल तर एक लक्षात येत की त्या काळात घरातील पुरुष 'कमावता' होता आणि स्त्री 'कुटुंब वत्सला' होती. पुरुष जे आणि जितके कमवून आणायचा त्यातच घर चालत असे. 'वाघळे की दुनिया' मधील मिस्टर वाघळे म्हणा किंवा आर. के. लक्षुमण यांचा 'कॉमन मॅन' म्हणा. परवडत नाही म्हणून एकाच ताग्यातुन घरातील पड़दयांपासून ते कपड्यां पर्यंत सर्व शिवणे ही जरी सीरियल मधिल अतिशयोक्ति वाटत असली; तरी निदान मुलांचे कपडे एकाच ताग्यातिल असणे त्या काळात ख़रच 'कॉमन' होते. आदल्या दिवशी उरलेल्या पोळ्यांचे लाडू दुस-या दिवशी डब्यात हमखास असत. 'आज मी जेवणात फोडणीचा भात किंवा गुळ आणि भाकरी खाल्ली'; हे सांगताना कोणी ओशाळत नसे. आणि असे शिळे पदार्थ खाणारी पिढी जास्त मजबूत हाड़ा-पेराची होती हेदेखिल तेवढेच खरे.
त्या काळात संपूर्ण सोसायटीमधे एखाद्याच घरी फोन किंवा फ्रिज असायचा. ज्या एकाच घरात टी. व्ही. असायचा त्या घरात संपूर्ण सोसायटीने मिळून शनिवार-रविवारचा सिनेमा बघणे हा ठरलेला कार्यक्रम.
त्यानंतरच्या पिढीच्या मात्र थोड्या अपेक्षा वाढल्या. एका ताग्यातले कपडे घालायला मूलं नकार देऊ लागली. प्रत्येक घरात एक टू व्हीलर, फोन, फ्रिज, टी.व्ही. दिसू लागले. वाढणा-या अपेक्षांमुळे घरच्या स्त्रीला देखिल कमावण्यासाठी बाहेर पडण्याची गरज वाटू लागली. त्यासाठी बि. ए., बि. कॉम. किंवा मग बि. एड. असे शिक्षण घेऊन बैंक किंवा सरकारी कारकुनि किंवा शिक्षिका अशी नोकरी करायला स्त्री बाहेर पडु लागली. पण तिचे विश्व तरीही ऑफिस आणि घर इतकेच मर्यादित होते. ऑफिसमधुन निघताना आज संध्याकाळी काय नाश्ता द्यावा सर्वाना हां विचार तिच्या मनात घोळत असे आणि रात्रि झोपताना सकाळची भाजी चिरून, कणिक मळल्याशिवाय तिला झोप येत नसे.
लंच अवर्स मधे गप्पांचे विषयदेखिल ठरलेले असत. 'अग माझ्या अभयला चश्मा लागला ग.' 'अरे फ़क्त पहिलित ना ग तो? आत्ताच? त्याला गाईच तूप घाल खायला.' नाहीतर...'माझी मंजू बाहेर बसायला लागली बर का.' 'मग डिंकाचे आणि मेथीचे लाडू तुला आणून देते उद्याच्. मी केले आहेत माझ्या शोभासाठी.'
आता मात्र बदलत्या काळाचे विचार बदलले आहेत; अपेक्षा बदलल्या आहेत. आज जिजामाता उद्यान, जुहू, चौपाटी, हैंगिंग गार्डन असे जवळचे ऑप्शन्ससुद्धा आपण विचारात घेत नाही. कधीतरी एखाद वेळेस दाखवले की आपले कर्तव्य संपले असे आपल्याला वाटते. मग तर किल्ले, लेंणी दाखवणे तर दूरच. आज 15 दिवसातून एकदा बाहेर जाऊन जेवायचे आणि कंटाळा आला की घरी हॉटेल मधिल काहीतरी मागवायचे हे खूपच कॉमन झाले आहे.
आजच्या 'कॉमन मॅन'ची परिभाषा जशी बदलत चालली आहे; तशी कुटुंब संस्थेची देखिल बदलायला लागली आहे.
आणि आज मला फ़क्त एकच प्रश्न भेडसावतो आहे; या नविन युगात जन्मणा-या नविन पिढीला आपण 'सर्व दृष्टीने सुदृढ़ भविष्य' देतो आहोत का? याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या मनातच द्याव... कारण जर कुटुंब सुखी आणि सुदृढ़... तर समाज सुखी आणि सुदृढ़... आणि जर समाज सुखी आणि सुदृढ़.... तरच प्रगत आणि यशस्वी देश! हे आपण सर्वच जाणतो.
प्रतिक्रिया
3 Feb 2015 - 5:10 pm | स्वप्नांची राणी
चष्मा लागण्याचा संबंध बहुतेक कॉर्निअल कर्व्हेचरशी आणि अनुवांशीकतेशीही असतो, असे डॉ. ईब्लिस यांच्या प्रतिसादात वाचलेले आठवते. त्यामुळे याबाबतीत गवींशी सहमत.
सध्या चष्मा लागण्याचे प्रमाण वाढलेले आहे याचे कारण म्हणजे वाढलेला अवेअरनेस, परवडणे आणि उपलब्धता. त्यामुळे घरचे खाणे ई.ई. वरुन कोणी गील्ट देऊ अथवा घेऊ नये. गायीच्या तुपाने, घरी कढवल्याने चष्मा जात नसतो.
जस्ट एक ऑब्जर्वेशन... धागालेखिकेच्या आईलाही चष्मा होता आणि त्या काळी टीव्ही, मोबाईल हे कारण तरी नक्की नसावे.
3 Feb 2015 - 7:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
जस्ट एक ऑब्जर्वेशन... धागालेखिकेच्या आईलाही चष्मा होता आणि त्या काळी टीव्ही, मोबाईल हे कारण तरी नक्की नसावे.
त्याच्या फार पूर्वीच्या काळात कोणालाही चष्मा लागत नव्हता... कारण चष्मेच नव्हते :)3 Feb 2015 - 7:31 pm | जेपी
हे चांगलय...
मी काय तर नवा प्रतिसाद असेल मनुन येतो.पण स्वसंपादनाचा फायदा करुन घेतलेला दिसतो.
*beee*
मला पण स्वसंपादन पायजे.
3 Feb 2015 - 5:44 pm | उमा @ मिपा
ज्योतिताई, तुमच्या मनात विचार आला, नंतर प्रश्नही आला. तुम्ही तो मांडलात, याबद्दल अभिनंदन. अजून एक करा प्लीज, त्या शेवटच्या प्रश्नाचे तुमच्या मनाला तुम्ही दिलेले उत्तर काय, नवीन युगात जन्मलेल्या नवीन पिढीला सर्व दृष्टीने सुदृढ भविष्य देण्यासाठी तुम्ही काय काय करताय किंवा करणार आहात? तेही सांगा.
धागा शतकी झाला तरी अजून धागाकर्त्या ताई आलेल्या नाहीत. का बरं?
3 Feb 2015 - 5:51 pm | पिलीयन रायडर
सगळ्यांनी इथे आधीच सगळं सांगुन झालय.. तरीही माझेही २ पैसे..
आधीच कमावत्या आयांना उगाच गिल्ट + सुपर वुमन सिंड्रोम असतो.. त्यांना प्रत्येकच आघाडीवर आपण लढलो पाहिजे असं वाटत असतं. असे लेख त्यात भर घालतात.
कमावणे हे फक्त आर्थिक गरज म्हणुन नसते. ती एखाद्याची मानसिक गरजही असु शकते. बाहेर जाणे, लोकांना भेटणे, स्वतःच्या कष्टाचा पैसा मिळवणे ह्यातुन अनेक गोष्टी माणुस मिळवत असतो. केवळ घरात मुल लहान असताना त्याला सांभाळण्यासाठी आयुष्यभर घरात बसण्याचा त्याग मुळात कुणीच करायची गरज नाही. मुल तान्हे असण्याचा कालखंड तसा फार थोडा असतो. त्यात तर काही मॅनेज होत असेल तर मल मुल + नोकरी + संसार हे नवरा- बायकोनी मिळुन सांभाळणं कठीण नाही. नोकरी मधुनही ह्यासाठी १-२ वर्ष रजा सुद्धा मिळते. ह्या काळात पहिले काही महिने सोडले तर मुलाचे वडीलही मुलांना सांभाळू शकतात. आयांप्रमाणे बाबांमध्येही माया उचंबळुन येत असतेच. तिला नेहमी दुर्लक्षिले जाते. उलट अनेल गोष्टी मुलांना बाबां सोबतच करायच्या असतात. त्यामुळे घरातली स्त्री नोकरी करत असेल तर मुलांची हेळसांड होते हे म्हणणं चुकच आहे. नवरा सुद्धा मुलांना प्रेमाने भरवु शकतो, त्यांच्या साठी पौष्टि़क जेवण तयार करु शकतो, मांडीवर घेऊन गाणी म्हणुन झोपवु शकतो (हे सगळं माझा नवरा करतो...).. आणि हे करताना आई एवढाच आनंद बाबांना होतो..
शिवाय ताटात गरम पोळी मिळणं हे एक अत्युच्च सुख असलं तरी पुरेसा पैसा असल्याने मोठ्या घरात रहायला मिळणे, वडीलांना नोकरी गेली तर काय असा ताण नसणे, मोठ्या कॉलेजात शिकायला पैशाच्या दृष्टीने त्रास न होणे असे अनेक प्रॅक्टीकल फायदेही आहेत आणि ते चांगल्या जेवण इतकेच महत्वाचे आहेत.
मुळात तर आई-वडील नोकरी करत असले तर मुलांच्या एकंदरीत आयुस्।याची हेळसांड होते हे ग्रुहितकच चुकीचे आहे. इथे आम्च्या सारखे लोक जीवाचं रान करुन पोराला सर्वोत्तम आयुष्य मिळावं (म्हणजे खुप पैसा नाही... उत्तम जेवण, उत्तम शाळा, उत्तम संगत..) म्ह्णुन धडपडत असतात.. तेव्हा हे असे लेख / विचार मनाला खुप त्रास देऊन जातात. तुम्हाला कल्पनाच नाही की माझ्या मुलाच्या ताटात गरम पोळी पडावी म्हणुन मी १२ तास जॉब करुनही किती मरमर करते. उलट नोकरी करणारे लोक जास्त मेहनत घेत असतात त्यांच्या मुलांसाठी..
विटेकर काकांचे विचार पाहुन आश्चर्य, खेद, वाईट वगैरे वाटलं नाही. त्यांचे विचार पारंपारिक आहेतच. बालसंगोपन हा त्यांच्यामते महत्वाचा मुद्दा आहे (जो आहेच..) फक्त ते पुरुषही करु शकतो हे त्यांना अजुन समजायचे आहे. त्यामुळे त्यांना समानता "फाजिल" वाटली तरी हरकत नाही. बाकी काका "पुरुष जे जे करतो, ते ते स्त्रीनेही करावचे.." ही आमची समानतेची व्याख्या नाहीये. तुम्ही मात्र तसं समजुनच प्रतिसाद लिहीले आहेत असं वाटलं.. आमची व्याख्या नक्की काय हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. त्याची वेगळी ऑर्डर द्यावी!
3 Feb 2015 - 6:34 pm | सुबोध खरे
पिरा ताई,
गरम पोळी पानात वाढायला आईनेच घरात राहिले पाहिजे हे कशासाठी? स्वयम्पाकाच्या बाईसुद्धा वर्षानुवर्षे उत्तम पोळ्या करीत असतात त्यांच्या हातची गरम पोळी खाल्ली तर काय पचत नाही काय?
माझ्या डॉक्टर बायकोने मला गरम पोळी पाहिजे म्हणून घरी बसून राहणे मला अजिबात मान्य नाही. त्या ऐवजी तिने एक रुग्ण पाहिला तरी स्वयमपाकाच्या बाईना देण्यासाठी लागणाऱ्या पैश्यापेक्षा जास्त पैसे मिळतात. (आमची मुले शाळेत असेस्तोवर ती केवळ नौदलाच्या दवाखान्यात मानधनावर रुपये २५००/- महिना रोज ७०-८० रुग्ण पाहत असे. वेळ सकाळी ८.३० ते १२.३०. जेंव्हा मुले शाळेत होती.) आता स्वतः चा व्यवसाय करते.
मुली शिकल्या तर घर शिकते हि उक्ती सत्य आहे आणि उच्च शिक्षित मुलीने घरी बसून राहणे हा शिक्षणाचा अपव्यय चा नव्हे तर अपमान आहे.
आणि स्त्रियांनी पैसा का मिळवू नये? गरिबीत सुख असते हि शिकवण सोडून देणे हि काळाची गरज आहे.
स्त्रियांना घरी बस सांगणे म्हणजे राष्ट्राची ५० % बैद्धिक संपत्ती वाया घालवणे असे माझे स्पष्ट मत आहे. सर्व अरब देशात हेच आहे त्यांची मुले सुधारली का?
ज्या पुरुषांना असे वाटते कि मुली नोकरी करू लागल्यामुळे आमच्या नोकरीच्या संधी कमी झाल्या त्यांनी स्वतःची उंची वाढवणे आवश्यक आहे. स्त्रियांची उंची कमी करा असे म्हणण्यापेक्षा.
बाल संगोपनाबद्दल मी इतक्या वेळेस लिहिले आहे कि केवळ जन्माला घालणे आणि दुध पाजणे या गोष्टी सोडून मी सर्व गोष्टी केलेल्या आहेत तेंव्हा द्विरुक्ती टाळतो. आणि मी अभिमानाने सांगू इच्छितो कि मुलांबरोबर माझे भावनिक संबंध माझ्या बायकोपेक्षा काकणभर सरसच आहेत.
4 Feb 2015 - 1:19 am | पिवळा डांबिस
इतर वादात मला पडायचं नाहीये, पण
वरील प्रत्येक शब्दाशी सहमत आहे.
असा माझाही अनुभव आहे. किंबहुना बालसंगोपनातील काही गोष्टींमध्ये माझं स्किल तिच्यापेक्षा जास्त चांगलं आहे हे तिनेही वेळोवेळी मान्य केलेलं आहे.
फक्त आईपेक्षा सरस असं माझ्या बाबतीत तरी मी म्हणणार नाही कारण शेवटी ती त्याची आई आहे...
3 Feb 2015 - 9:16 pm | स्रुजा
हांग्गाशी ! तरीच म्हणलं प. पु. अपर्णाबै वगैरे सारखे तुझे लाडके विषय आलेत आणि तू कुठे गेलीस ;)
बाकी प्रतिसाद लेट तरी थेट ! अत्यंत आवडेश :)
3 Feb 2015 - 6:04 pm | गवि
बाकी सर्व स्त्रीपुरुष समानता, कमावणं वगैरे सध्या बाजूला ठेवू. लहान पोरांना वाढवणं,फिरायला नेणं, खाणंपिणं, शी शू काढण्यापासून सर्व संगोपन हा जो प्रकार आहे ना, तो आपल्याला केवळ पुरुष असल्याने जमणार नाही असं म्हणत त्या वाटेला न गेलेल्या आणि स्वतःची पोरे पत्नीच्या संगोपनात मोठी झालेल्या पुरुषांनी एक जबरदस्त मोठा आनंद गमावला आहे आणि तो आता परत मिळणे नाही..
अंगावरचं दूध बाळाला आईच पाजते. पण तेवढं सोडून बाकीच्या गोष्टी स्त्रीलाच आई म्हणून जमतात आणि बापाला नाही ही प्र चं ड मोठी सोयीस्कर गैरसमजूत आहे. बापांना कित्येकदा जास्त चांगलं जमतं आणि पोरं बापाला सोडत नाहीत.
3 Feb 2015 - 6:34 pm | सुबोध खरे
+१००
3 Feb 2015 - 8:34 pm | संदीप डांगे
सत्य परिस्थिती.
3 Feb 2015 - 8:58 pm | आदिजोशी
लहान पोरांना वाढवणं,फिरायला नेणं, खाणंपिणं, शी शू काढण्यापासून सर्व संगोपन हा जो प्रकार आहे ना
हे सगळं मला मनापासून आवडतं. मी प्रचंड एंजॉय करतो.
4 Feb 2015 - 4:59 pm | पदम
+१०० सहमत
5 Feb 2015 - 2:14 am | अर्धवटराव
एकदम खरं आहे.
3 Feb 2015 - 6:46 pm | जेपी
मला लेख कळाला नाय.
प्रतिसाद तर आज्याबात कळाले नाय.
तरीपण शेंच्युरी निमीत्त धागाकर्ती आणी मिपाकरांचा सत्कार एक एक आनंदाचे झाड देऊन करण्यात येत आहे.
शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते
3 Feb 2015 - 7:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
लग्नाळू आसताल तर भविक्ष्यात काय काय लिवून ठ्यंवलं हाय त्येचा ह्यो ट्र्यालर हाय. फुडच्या खर्या पिच्चरमदी "ह्ये क्येल तर हिकडची पार्टी धोपटंल" आनी "त्ये क्येल तर तिकडची पार्टी धोपटंल". आलं ध्येनात ?! ;)
चला, करा आब्यास सुरु... पैल्यांदा हा दोरा आणि तेच्यावर उडवलेले समदे रंग धा धा येळा वाचा आनि मंग बोला.
: इए गुर्जी
3 Feb 2015 - 8:38 pm | जेपी
जातय ..
जरा अभ्यास करतय.
(लाजाळु/शामळु/लग्नाळू)जेपी
4 Feb 2015 - 3:14 pm | टवाळ कार्टा
(लाजाळु/शामळु/लग्नाळू)जेपी >>> =))
4 Feb 2015 - 3:14 pm | टवाळ कार्टा
खिक्क
3 Feb 2015 - 9:47 pm | ज्योति अळवणी
माझा हा पहिलाच लेख आहे. त्याला इतका मोठा वाचकवर्ग मिळेल असे वाटले नव्हते.
मिळालेल्या प्रत्येक कमेंटसाठी धन्यवाद!
एक विचार या लेखात पूर्वीच्या काळी काय परिस्थिती होती आणि आता कुटुंब व्यवस्था कशी आहे; हे मांडायचा प्रयत्न केला आहे. स्त्रियानी खूप शिकाव... अगदी त्यांना आवडेल ते क्षेत्र निवडाव... आणि त्यात करियर कराव याबद्दल दुमत नाहीच. फ़क्त जर लग्न केलच आणि मूल जन्माला घातलच तर मग पति-पत्नी दोघानी मिळून त्याच संगोपन कराव; अस मला वाटत. दमुन आल्यानंतर हॉटेल मधून अन्न मागवणे चुकेचे नाही.
माझ्या मनात काही प्रश्न आहेत... उत्तरे तुम्ही स्वतःलाच दया.
1. ज्याप्रमाणे आज आपण सर्व आपल्या मराठी भाषेवरील प्रेमाखातर इथे एकत्र जमलो आहोत तसेच पुढची पीढ़ी करेल का?
2. संस्कार मग ते आई किंवा वडिलांनी केले तरी चालतील. पण ते करायची आपली मानसिकता आहे का?
3. केवळ आपल्या बेटर हाफ च्या तक्रारी एकमेकांना सांगाण्यापेक्षा आणि कुठे कोणता सेल आहे; ही चर्चा करण्यापेक्षा घर आणि मुलांबद्दल पॉजिटिव चर्चा करणे हास्यास्पद आहे का?
4. मुलांना मॉल्सपेक्षा बागेतुन ऐतिहासिक जागातून आठवद्यातुन एकदा तरी आपण नेतो का?
आज आपण आपल्या गरजा आणि सुख यातला फरक करायला शिकल पाहिजे आपण. जरा गरजा कमी केल्या तर कदाचित मुलांना वेळ देणे शक्य होईल. सुखवस्तु कुटुंब आणि higher middle class यातला फरक करणे आवश्यक आहे.
मिसळ पावची ऑन लाइन रेसिपी 'सर्वार्थने' जर पुढची पिढी उचलणार असेल आणि त्याची इथे कमेंट करणा-या प्रत्येक व्यक्तीला खात्री असेल तर मी लिहिलेल्या लेखाचे सार्थक झाले; असे मी म्हणेन.
3 Feb 2015 - 10:31 pm | सस्नेह
इतर प्रतिसादकांच्या आणि तुमच्या या प्रतिसादात फारसं अंतर नाही. मग धाग्यात गल्ली चुकला की काय ?
4 Feb 2015 - 12:11 am | पुष्करिणी
१. बालसंगोपन आणि मराठी भाषा यांचा संबंध कळला नाही. आई-बाप दोघे मुलांच्या उशा-पायथ्याशी बसून राहिले तरीही मराठी भाषेवरच्या मुलांच्या प्रेमाची गॅरंटी देता येणार नाही.
२. 'संस्कार' म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे?
३. चर्चा कशाबद्दलही करावी. मॉल, सेल, हॉटेल, मुलं, सिनेमा..गॉसिप काहीही.
४. प्रश्नाचा रोख कळला नाही; जशी आवड्,गऱज्,पैसा आणि वेळ असेल त्याप्रमाणे लोकं मुलांना फिरायला नेतात.
सुखवस्तु कुटुंब आणि उच्च मध्यम वर्ग यांचाच विचार का म्हणून करायचा....इतर आर्थिक स्तरावरिल लोकांना का बरं असं एक्स्क्लुड केलय?
4 Feb 2015 - 1:29 am | प्रभाकर पेठकर
माझ्या मनात काही प्रश्न आहेत... उत्तरे तुम्ही स्वतःलाच दया.
तुमच्या मनातल्या प्रश्नांना आम्ही आमच्या मनात उत्तरे द्यायची हे कांही समजलं नाही.
1. ज्याप्रमाणे आज आपण सर्व आपल्या मराठी भाषेवरील प्रेमाखातर इथे एकत्र जमलो आहोत तसेच पुढची पीढ़ी करेल का?
प्रत्येक पुढची पिढी मागच्या पिढी पेक्षा काही तरी नविन, वेगळं, एक पाउल पुढे (बाप से बेटा सवाई) असे वागत असते. जे मागच्या पिढीने केले ते आम्ही केले नाही आणि (म्हणूनच) जे आम्ही करतो आहोत तेच पुढची पिढी करेल अशी अपेक्षाच नाही.
2. संस्कार मग ते आई किंवा वडिलांनी केले तरी चालतील. पण ते करायची आपली मानसिकता आहे का?
ती नाही किंवा नसेल असे तुम्हाला का वाटते आहे? जो तो आपल्या परीने भले-बुरे संस्कार करीतच असतो.
3. केवळ आपल्या बेटर हाफ च्या तक्रारी एकमेकांना सांगाण्यापेक्षा आणि कुठे कोणता सेल आहे; ही चर्चा करण्यापेक्षा घर आणि मुलांबद्दल पॉजिटिव चर्चा करणे हास्यास्पद आहे का?
अजिबात नाही. असे प्रश्न तुम्हाला का पडताहेत? प्रत्येक आई-वडील मुलांच्या भल्याचा विचार, चर्चा, प्रयत्न करीतच असतात.
4. मुलांना मॉल्सपेक्षा बागेतुन ऐतिहासिक जागातून आठवद्यातुन एकदा तरी आपण नेतो का?
इतिहास न जाणता ऐतिहासिक जागेतून फिरण्यात काय अर्थ आहे? साद्यंत इतिहास आपल्याला तरी माहित आहे का? मराठे, मुघल, इंग्रज वगैरेंबाबत आपल्याला कितपत माहिती आहे. आपले इतिहास वाचन आणि समज कितपत समृद्ध आहे? त्यामुळे, आधी मुलांना ह्या विषयाची माहिती मुलांना देऊन त्यांचे इतिहासाविषयी औत्सुक्य वाढवून ऐतिहासिक स्थळांना भेट दिली तरच त्याला कांही अर्थ आहे नाहीतर ते एक पर्यटन स्थळ आहे.
तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना माझे उत्तर होकारार्थी आहे. मी हे सर्व केले आहे, अजूनही करतो आणि मरेपर्यंत करेन.. तरी सुद्धा माझ्या मुलाला, पुढच्या पिढीला मी 'मला हव्या त्या वैचारीक साच्यात' बसवू शकणार नाही. कारण तो एक विचार करणारी स्वतंत्र व्यक्ती आहे. त्याच्या विचारांना सकारात्मक दिशा देण्याचे प्रयत्न मी करू शकतो, ते मी करतो.
4 Feb 2015 - 3:04 am | संदीप डांगे
मला हव्या त्या वैचारीक साच्यात
हेच प्रत्येक पिढीचं वास्तविक दुखणं आहे.
पेठकर काकांनी मांडलेला मुद्दा त्यामुळेच भावला. प्रत्येक पिढी आपापले चांगले वाईट गुण घेऊन येते त्यातून त्यांना काय शिकायचं, ठेवायचं ते ते बघतील, त्यांचे आयुष्य त्यांचे प्रश्न वेगळे असतील. आपल्या उत्तरात त्यांचे प्रश्न बसवणे चुकीचेच. आपण जगलो तेच छान आणि पुढच्या पिढ्यांनी पण तसंच जगावं हा चुकीचा अट्टाहास आहे.
स्वत:च्या तारुण्यात जगातले सगळे संस्कार झुगारून द्यायचे असतात, मुले तारुण्यात आली कि तेच झुगारून द्यायची इच्छा झालेले संस्कार आपल्या मुलांनी पाळावे अशी तीव्र इच्छा असते. त्यातूनच असे विचार जन्मतात आणि मग प्रश्न छळत राहतात.
माणूस नुसता वेगवेगळ्या वयातून प्रवास करत नाही तर वेगवेगळ्या भूमिकेतून प्रवास करत असतो. आणि ज्यावेळेस ज्या भूमिकेत असतो तेच एकमेव सत्य आहे असे त्यास वाटत असते. भले आधीची भूमिका त्याच्या अगदी उलट घेतलेली असू देत.
युवावस्थेत आई-बापांना काय कळतं, जमाना कुठे चाललाय आणि हे काय सांगतात आम्हाला असा पवित्रा. तोच युवा एका युवकाचा बाप झाला कि आपल्या पाल्यास तुझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत, तुला काय कळतं चा दम द्यायला मोकळा.
3 Feb 2015 - 10:07 pm | काकाकाकू
ज्योतिताई कित्ति कित्ति प्रश्न वाट बघतायत.....
4 Feb 2015 - 12:49 am | रेवती
उत्तरे, माझ्यापुरती.
१)माझी पुढील पिढी मराठी भाषेवर मी करते तेवढे प्रेम करू शकणार नाही पण मला त्याचे फारसे काही वाटत नाही कारण माझी मूळ भाषा कानडी आहे पण महाराष्ट्रात आल्यानंतर सगळे नातेवाईक मराठी शाळेत गेलो, मराठी शिकलो, त्यावेळी माझ्या आजी आजोबांनी कानडीचा आग्रह धरला नाही कारण परप्रांतात स्थायीक होतानाचे त्यांचे कष्ट वेगळे होते. ते अगदी रोजच्या जेवणाशी संबंधित होते. म्हणून बाबा, काका, आत्यांना कानडी फक्त बोलता येत होते, लिहिता येत नव्हते (तेवढा कोणाकडे वेळ नव्हता). आम्हाला तर तेवढेही येत नाही. माझा मुलगा मराठी बोलतो, अडखळत वाचायला शिकलाय, काही वर्षात (आशा करते) सफाईदारपणे वाचेल, लिहिण्याचा आग्रह मी करणार नाही, त्याला हवे असल्यास तो शिकेल.
२) सगळे आईवडील (जे आपल्यासारखे साधे लोक आजूबाजूला आहेत ते!) आपापल्या मुलांवर संस्कार करण्याचे प्रयत्न करत असतात (ज्यातले काही नवे संस्कार तर काही जुने असतात), चांगल्या सवयी लावायचा प्रयत्न करत असतात. सगळेजण काही बाबतीत यशस्वी होतात तर काही बाबतीत फारसे यशस्वी होऊ शकत नाहीत. काही गोष्टी मुले समाजातून सहजपणे, काही गोष्टी धडपडत, तर काही बाबतीत धडा मिळून शिकतात. त्याचा त्रास आपल्यापैकी प्रत्येकाला होत असतो.
३)बेटर हाफच्या तक्रारी कधी वैतागून केल्या गेल्या तर क्वचित असतात. हा म्हणजे अस्स्सा आहे किंवा ही म्हणजे अश्शी आहे. आणि एवढे चालायचेच. गंभीर तक्रारी केल्या गेल्या तर सहकारी हे काऊन्सेलर किंवा वकिलाचा सल्ला घेण्यास सुचवू शकतात व प्रकरण हाताबाहेर चाललेय हे मनुष्याला समजू शकते.
४)मुलांना अठवड्यातून एकदा स्थलदर्शनाला नेणे माझ्याकडील हवामानात शक्य नाही. उन्हाळ्यात मात्र जसे मुलाचे वय असेल त्यानुसार बागेत रोज, अठवड्यातून एकदा/दोनदा/तिनदा, ऐतिहासिक स्थळाला वर्षातून दोनदा वगैरे नेले जात असे. आता मोठी मुले आपापलीच जातात व ग्राऊंडवरून घामेजून/ बर्फातून कुडकुडत घरी परतात.
या मुलांचे मिसळपाव नाही पण पिझ्झा/ बर्गर नावाचे संस्थळ निघेल असा अंदाज आहे. ;)
4 Feb 2015 - 4:16 am | नंदा
मला ज्योती ताईंचे म्हणणे काही प्रमाणात पटते. लहान असताना आई आणि बाबा दोघेही नौकरी करायचे. दुपारी शाळेतून घरी आल्यावर, दारावरचे मोट्ठे कुलूप उघडून आत येणे, स्वत:च्या हाताने वाढून घेणे, मग स्वत:च अभ्यास करत एकटे बसणे वगैरे नको वाटायचे. आम्ही कनिष्ठ मध्यम वर्गीय होतो. आई शिक्षिका होती. ती दुपारच्या शाळेत शिकवायची. ती संध्याकाळी घरी येण्याची चातकासारखी वाट बघायचो तेंव्हा एकटे वाटायचे. या व्यतिरिक्त आई वडलांनी छान संगोपन केले, लाड पुरवले . कदाचित आईच्या नौकरीमुळे असेल , पण पुस्तके,ट्युशन, फी कशाची आबाळ झाली नाही. पण लहानपणी आई अधिक मिळायला हवी होती असे वाटते . निदान बाबा तरी! पण फार बिघडले नाही. एकुण बर चाललय. आई वडलांनी कष्ट करून मिळवलेल्या पैशांनी लावलेल्या गणित आणि विज्ञानाच्या शिकवण्यांचा परिणाम असेल, आज आय टी हमाल आहे. पण तक्रार नाही .
4 Feb 2015 - 9:31 am | विशाखा पाटील
ज्योती ताई, तुमच्या प्रश्नांची उत्तरे फक्त स्वत:लाच द्यावी, हे पटले नाही. त्यामुळे इथे देण्याचे ठरवले.
मी स्वत:ला उत्तरे दिलीत ती अशी-
१.पुढची पिढी वेगळं काहीतरी शोधेल. आम्ही करतोय तेच श्रेष्ठ आहे का? पुढच्या पिढीला मागे पळायला कशाला लावायचे? उलट आपण त्यांच्याबरोबर पुढे पळायचे.
२. संस्कार करण्याची मानसिकता नाही असे चित्र दिसत नाही. काय चांगले, काय वाईट हे जवळजवळ सगळे पालक सांगत असतातच.
३. चर्चा सगळ्या विषयांवर झाल्या पाहिजे. फक्त घर आणि मुलं यांच्यावरच का? एवढ्यापुरती आपली चौकट आखून घेतल्यावरच आपली मुलं सुदृढ होतात, असं होत नाही. बायदवे, आता तुमचा हा मुद्दा लक्षात आला . लंच अवर्स मधे गप्पांचे विषयदेखिल ठरलेले असत. 'अग माझ्या अभयला चश्मा लागला ग.' 'अरे फ़क्त पहिलित ना ग तो? आत्ताच? त्याला गाईच तूप घाल खायला.' नाहीतर...'माझी मंजू बाहेर बसायला लागली बर का.' 'मग डिंकाचे आणि मेथीचे लाडू तुला आणून देते उद्याच्. मी केले आहेत माझ्या शोभासाठी.'
४. फिरायला जाण्यासाठी फक्त ऐतिहासिक वास्तूच कशाला हव्यात? निसर्गस्थळ असतात, चांगला सिनेमा किंवा कार्यक्रम असतो. मुलाला ऐतिहासिक स्थळामध्ये रस वाटत नाही, हे लक्षात आल्यावर आम्ही निसर्गाकडे वळलो.
आपल्या अवतीभवतीचे जग प्रवाही असते, त्यामुळे आपल्या पिढीचेच तेवढे बरोबर होते, असं कोणत्याही पिढीने का म्हणावे?
4 Feb 2015 - 2:31 pm | ज्योति अळवणी
सर्वच reply मी मनापासून वाचले. काही मतं पटली काही नाही पटली. पण अनेकांना मी विचार करायला प्रव्रुत्त केल हयात मला आनंद आहे.
धन्यवाद!
4 Feb 2015 - 4:09 pm | सस्नेह
इथे वेगवेगळ्या विचारधारांचा महापूर रोजच ओसंडत असतो. तुम्ही अजून कोरड्याच आहात.
5 Feb 2015 - 1:41 pm | पलाश
+१११
4 Feb 2015 - 4:26 pm | बाळ सप्रे
काही न पटलेल्या मतांनी तुम्हाला विचार करायला प्रवृत्त केले की नाही? केल्यास त्यात तुम्हाला आनंद वाटला की नाही ?
4 Feb 2015 - 11:18 pm | संदीप डांगे
वा वा वा छान
आपकी तारीफ में एक शेर अर्ज है
गुलिस्तान में युं पंछी तो बहोत थे,
तुम्हारे आनेसे पहेले
फुलोंकी क्यारीया लहराके झुमती थी
तुम्हारे आनेसे पहेले
सारा गुलिस्तान खिल गया है अब और
पंछी भी गाने लगे हैं
तुम्हारे आनेसे ये सब होने लगा है
कीस गधेने तुम्हे बताया
5 Feb 2015 - 8:37 am | यशोधरा
मस्त टैमपास धागा!
5 Feb 2015 - 1:23 pm | पलाश
ठीक लेख!
अतिशय उत्तम विचार मांडणारे प्रतिसाद ! तीस वर्षांच्या पुर्वी अनुक्र्मे नोकरी, लग्न आणी मुले या तीन आघाड्यांवर दक्षिण महाराष्ट्रातल्या तालुक्याच्या ठिकाणी झालेली दमणूक आठवली. नोकरी करणारी चे घर, नवरा आणी मुले दुर्लक्षित असणार हा समज बाया बिनधास्त बोलून सुद्धा दाखवीत कधीकधी!! अशा वेळी दुप्पट अवसान
आणून सगळा गाडा ओढला. नवरा फार काही मदत करु शकतो हे माहीतच न्ह्वते. यामुळे त्याला दोष देता येत नाही. मुख्य दोष होता/आहे स्वत:ला कमी किंमत देण्यात.एक बाई जी फक्त घराची गरज म्हणून नोकरी करते आहे. यात अभिमान न वाटता कमीपणा वाटे. असे वाट्ण्यात माझी मोठी चूक होती हे आज मला इथले प्रतिसाद वाचून उमगले. मनावरचे एक ओझे उतरले. तुमच्यातील बरेचजण वयाने बरेच लहान असतील. तुमचे स्पष्ट विचार आणि त्यांची मांडणी दोन्हीला सलाम. सकारात्मक बदल होतो आहे हे अस काही वाचलं की फार चांगल्या पद्ध्तीने पटतं. धन्यवाद ! शुभेच्छा !!
जाता जाता माझ्या इथल्या नावाबद्दल : स्त्री अथवा पुरुष हे दर्शवणारे नाव न घेता बदल म्हणून सहजच झाडाचे नाव घेतले आहे. ( पहिल्यांदाच लिहिते आहे. पण इथे बरेच काही वाचले आहे. भावी चर्चेचा धोका टाळण्यचा क्षीण प्रयत्न करते आहे.) :)