कविता (देवद्वार छंद)

मनीषा's picture
मनीषा in विशेष
9 Nov 2008 - 3:29 am
छंदशास्त्र

सूर तुझे येथे
गुंजतात कानी
भारलेल्या रानी
साद देती |

स्वप्नांची इथेच
भेट अशी घडे
प्राजक्ताचे सडे
माझ्यासाठी |

नजरेत सारे
गूज हे मनीचे
श्वास कसे माझे
गंधाळले |

चांदणे शिंपीत
ये तुझी चाहूल
प्रितीचीच भूल
या र्‍हुदयी |

भेट तुझी माझी
घडता ही सारी
सृष्टी होई न्यारी
धुंदाउनी |

नवा नवा भासे
निसर्ग हा असा
जीव माझा पिसा
सुखावला |

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

9 Nov 2008 - 8:39 am | बेसनलाडू

एकंदरच सगळे देवद्वारी आलेले दिसतात. छान छान!
(देवभोळा)बेसनलाडू

धोंडोपंत's picture

9 Nov 2008 - 9:00 am | धोंडोपंत

एकंदरच सगळे देवद्वारी आलेले दिसतात. छान छान!
(देवभोळा)बेसनलाडू

हा हा हा. खरे आहे. एक छंद सांगितला तर लोक इतके भारावले आहेत सर्व भांडार उघडू तेव्हा काय होईल?

पण चाललाय हे मस्त आहे. गेयतेचा अवर्णनीय आनंद प्रत्येकाच्या लेखनात बघायला मिळतोय. निर्दोष काव्य लिहिल्याचे समाधान प्रत्येकाला मिळत आहे.

याचसाठी केला होता हट्टाहास!

मनीषाताई,

कविता छान आहे. लिहित रहा. एक एक वृत्त अंगी भिनवत रहा.

या पुढची पायरी म्हणजे लेखनातील सफाई. तंत्रशुद्धता ही पहिली पायरी आहे. ती ओलांडली की कवितेचे सौंदर्य आणि सफाईचा प्रांत सुरू होतो. अनावश्यक आलेले शब्द वगळणे, आशय नीट पोहोचतो आहे की नाही ते पहाणे, एखाद्या शब्दाला अधिक समर्पक शब्द शोधणे हे संस्कार कवितेवर करावे लागतात.

अर्थात हा सर्व सरावाचा भाग आहे. आपण लिहिलेली कविता स्वतःशी गुणगुणत रहावी. काय खटकताय ते पहावे. योग्य ते बदल करून काव्य अधिकाधिक निर्दोष व सुंदर करावे.

आम्ही कोणत्याही कवितेवर विचारल्याशिवाय आमचे परखड मत देण्याचे हल्ली टाळतो. मागे मिसळपाववर एका महान, प्रतिभावान आणि एका मोठ्या गजल उस्तादाची तालीम घेणार्‍या कवयित्रीने कुठल्यातरी स्पर्धेत पाठवलेली एक गजल इथे पेश केली होती. गजल तांत्रिकदृष्ट्या योग्य होती पण मतल्याच्या ऊला मिसर्‍यात शब्दांची अदलाबदल केली तर गजलेच्या गेयतेत फरक पडून गजलेचे सौंदर्य कसे वाढेल ते आम्ही दाखवून दिले. मिपावरील एक जाणते रसिक देवकाका व गजलेचे मुरब्बी बेसनलाडू यांनाही आम्ही सुचविलेला बदल भावला. पण त्या कवयित्रीने आमच्या प्रामाणिक सूचनेची दखल सोडाच पण आम्ही वेळ आणि शक्ती घालवून जे काही सुचवले त्याबद्दल कृतज्ञतेचा एक शब्द देखील उच्चारला नाही. लोकांकडे काही सांगण्यासारखं असतं हेच ज्या लोकांना मान्य नाही त्यांना काय सुचवणार कप्पाळ????? या लोकांची अपेक्षा असते की रसिकांनी यांच्या कविता वाचून कानावर हात ठेऊन " जी जी रं जी जी " म्हणावं. असो.

धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

विसोबा खेचर's picture

10 Nov 2008 - 12:22 pm | विसोबा खेचर

मिपावरील एक जाणते रसिक देवकाका व गजलेचे मुरब्बी बेसनलाडू यांनाही आम्ही सुचविलेला बदल भावला. पण त्या कवयित्रीने आमच्या प्रामाणिक सूचनेची दखल सोडाच पण आम्ही वेळ आणि शक्ती घालवून जे काही सुचवले त्याबद्दल कृतज्ञतेचा एक शब्द देखील उच्चारला नाही.

खरं आहे! ही गोष्ट आम्हालाही जरा खटकलीच होती! पण त्याकरता रसिकता, मनाचा मोठेपणा इत्यादी गोष्टींची आवश्यकता लागते..! असो.

लोकांकडे काही सांगण्यासारखं असतं हेच ज्या लोकांना मान्य नाही त्यांना काय सुचवणार कप्पाळ?????

सहमत आहे...!

आम्ही कोणत्याही कवितेवर विचारल्याशिवाय आमचे परखड मत देण्याचे हल्ली टाळतो.

पंत, आपल्याला एक सल्ला. एखाद्या/एखादी कडून जर आपल्या सुचवणीची दखल घेतली गेली नसेल (त्यावर अंमल व्हावा असं माझंही मुळीच म्हणणं नाही, परंतु 'ए वर्ड ऑफ ऍक्नॉलेड्जमेन्ट' हा केव्हाही महत्वाचा!) तर संबंधित कवीला/कवयत्रीला आपण आपले परखड मत किंवा सूचना करू नका, परंतु म्हणून सर्वांवरच हा अन्याय नको. अन्य मिपाकरांना काव्याला अधिकाधिक रसाळतेकडे आणि गेयतेकडे घेऊन जाणार्‍या आपल्या मार्गदर्शनाची नक्कीच गरज आहे असा आमचा विश्वास आहे!

प्रत्येकाला/प्रत्येकीला ज्याचा-त्याचा/जिचा-तिचा गुरू लखलाभ, परंतु पंत, आम्ही मात्र आपल्यालाच आमचे गुरू मानतो..!

तेव्हा गुरुवर्य, कृपया कुणा एकाच्या/एकीच्या वृत्तीचा राग न मानता आपले कार्य सुरूच ठेवा, ही विनंती..!

मानू नये राग
कवि कोती वृत्ती!
न धरावी चित्ती
तात्या म्हणे!

:)

आपला,
(काव्यप्रेमी) तात्या.

विसोबा खेचर's picture

9 Nov 2008 - 9:49 am | विसोबा खेचर

वा वा! :)

दत्ता काळे's picture

9 Nov 2008 - 3:13 pm | दत्ता काळे

नवा नवा भासे
निसर्ग हा असा
जीव माझा पिसा
सुखावला |

- छान . . .

जयेश माधव's picture

3 Dec 2008 - 4:50 am | जयेश माधव

जयेश माधव
कवीता तुझीच असेल तर खुपच॑ सु॑दर!!

मनीषा's picture

3 Dec 2008 - 7:12 am | मनीषा

अर्थात !! माझीच कविता आहे ..