अमृतसरला जायचे तेव्हा खटकरकलांला भेट द्यायचीच असे ठरवले होते.
अमृतसर चंदिगड महामार्गावर असलेले खटकरकलां हे महान देशभक्त व हुतात्मा भगतसिंग यांचे काका सरदार अजितसिंग यांचे जन्मस्थान. येथे हुतात्मा भगतसिंग यांचे वडीलोपार्जित घर आहे. अमृतसर पासून अंतर १३० किलोमिटर. शहिद भगतसिंगनगर जिल्ह्यात बंगाजवळ खटकरकलां गाव आहे, खटकरकलां गाव चा रस्ता महामार्गावरुन जिथे सुरु होतो तिथे हुतात्मा भगतसिंग स्मृति संग्रहालय आहे.
हे स्थळ दुर्दैवाने पर्यट्कांच्या यादीत नसते व साहजिकच हॉटेलांच्या पर्यटन आयोजकांनाही विशेष महिती नसते असे आढळुन आले. मात्र पर्यटन विकास मंडळाचे अधिकारी अतिशय तत्पर व सुस्वभावी आहेत. मुख्य पर्यटन अधिकारी श्री. बलराज सिंग यांनी आम्हाला चांगली माहिती दिली व संग्रहालय सोमवारी बंद असते हेही सांगितले. जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल व हुतात्मा भगतसिंग यांच्याविषयी आदर असेल तर तिथे अवश्य जा असे त्यांनी आवर्जुन सांगितले. आमचा सारथीही अनेक वर्षे या क्षेत्रात असूनही तिथे गेला नव्हता.
या संग्रहालयात हुतात्मा भगतसिंग, त्यांचे सहकारी, गदर उत्थानातील हुतात्मे व सहभागी व अनेक देशभक्त तसेच हुतात्मा भगतसिंग यांच्या कुटुंबातील अनेक व्यक्तिंचे दुर्मिळ फोटो आहेत. हुतात्मा भगतसिंग यांचे अवशेष ज्यात गुंडाळुन आणले गेले तो ट्रिब्युन चा रक्ताने भरलेला अंक, हुतात्मा भगतसिंग यांच्या वापरातील काही वस्तु, लाहोर प्रथम अभियोगाच्या निकालपत्राची प्रत, हुतात्मा भगतसिंग यांचे हस्तलिखित, त्यांच्या तुरुंगात असताना लिहिलेल्या रोजनिशीतील काही पाने, त्यांच्या फाशीचा हुकुमनामा ज्या लेखणीने लिहिला गेला तो लेखणी, हुतात्मा भगतसिंग यांच्या स्वक्षरीची त्यांना लाहोर तुरुंगात भेट दिली गेलेली भग्वदगीतेची प्रत, सरदार अजितसिंग यांचे काही कपडे हा व अन्य बहुमोल खजिना आहे. मात्र आतमध्ये चित्रणास परवानगी नसल्याने यापैकी काही टिपता आले नाही.
हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा सुखदेव व हुतात्मा राजगुरू यांच्या ५० व्या हौतत्म्यदिनी म्हणजे दिनांक २३ मार्च १९८१ रोजी या संग्रहालयाचे अनावरण केले गेले. आत शिरताच समोर हुतात्मा भगतसिंग यांचा पुतळा आहे.
परिसरातील छोट्याश्या उद्यानात या तेजस्वी, कर्तृत्ववान व ध्येयवादी घराण्यातील तीन वीर - हुतात्मा भगतसिंग यांचे पिता सरदार किशनसिंग व दोन काका सरदार अजितसिंग व सरदार स्वर्णसिंग यांच्या स्मृत्यर्थ एक स्तंभ आहे, ज्याच्या तीन बाजुंवर एकेकाची अल्प माहिती दिली आहे.
त्या पवित्र वास्तुला अभिवादन करुन आम्ही बाहेर पडलो. लगतच खटकरकलांकडे जाणारा रस्ता होता व प्रवेशाला हुतात्मा भगतसिंग स्मरणार्थ उभारलेली कमान होती.
साधारण दिड-दोन किलोमिटर अंतरावर हुतात्मा भगतसिंग यांची वडिलोपार्जीत वास्तू आहे. ही वास्तू राष्ट्रिय स्मारक म्हणुन संरक्षित वास्तु घोषीत केली आहे. मात्र आपल्या देशात राष्ट्रिय स्मारकाची नासधूस, नुकसान करणार्यास केवळ पाच हजार पर्यंत दंड व वा/ तीन महिन्यांपर्यंत कारावास इतकीच शिक्षा आहे. हुतात्मा भगतसिंग यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या वास्तूतली धूळ मस्तकी लावत ती वास्तू भक्तिभावाने पाहिली. काचेच्या बंद दरवाजांआड काही भांडी कुंडी,कपाटे, पलंग इत्यादी वस्तू आहेत. इतकी वर्षे आपण इथे कधीच का आलो नाही याचा अचंबा करत आमच्या सरदार सारथ्याने या वास्तुचे दर्शन घडवल्याबद्दल आमचे आभार मानले.
ही वास्तू तर पाहिली, मात्र आणखी एक दिवस असता तर फिरोझपूर येथील हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा सुखदेव आणि हुतात्मा राजगुरु यांचे स्मारक पाहता आले असते अशी हुरहुर लागली. एकदा लाहोरही करायच आहे.
प्रतिक्रिया
18 Jan 2015 - 6:32 pm | दिपक.कुवेत
फोटो छान.
19 Jan 2015 - 3:36 am | मुक्त विहारि
सहमत
18 Jan 2015 - 11:16 pm | खटपट्या
छान फोटो !!
19 Jan 2015 - 1:19 am | रेवती
फोटो व माहिती आवडली.
1 Feb 2015 - 3:48 pm | स्वाती दिनेश
रेवतीसारखेच म्हणते.
(हा लेख वाचायला नजरेतून सुटला होता.. )
स्वाती
19 Jan 2015 - 6:05 am | स्पार्टाकस
खूप सुंदर!
पुन्हा गेलात तर हुसैनीवाला चेकपोस्टची भेट चुकवू नका!
वाघा बॉर्डरसारखाच तिथेही रोज संध्याकाळी ध्वज उतरवण्याचा सोहळा असतो. वाघा बॉर्डरच्या तुलनेत गर्दीही कमी असते.