हॅप्पी न्यु इयर मिपाकर्स!! हॅप्पी न्यु इयर!!
करु करु म्हणत, गेल्यावर्षी मागे राहिलेल्या सगळ्या गोष्टी आता पूर्ण करायच्याच असं मनोमन ठरवुन, मी या वर्षी गेल्या वर्षीची आणखी एक गोष्ट पुरी करतेय.
त्याच काय झालं; गेल्या वर्षी शिर्डीला जन्मात पहिल्यांदाच जाणे झाले. इतकी वर्षे उठसुठ नाशिकला जाउन त्र्यंबकेश्वराचे दर्शन घ्यायच्या व्यसनापायी शिर्डी राहूनच जायची!! :( गेल्या वर्षी मात्र एखाद्या कानात वारं भरलेल्या वासरासारख उनाडायला मिळाळं, अन ते ही समवयिन पै तै बरोबर.) मिपाने मला काय दिलं असं जर विचारायचं ठरवलं, तर परिघाबाहेरचे समविचारी लोक, अन त्यांच्या बरोबर नेहमीचे कुटुंब, नातेवाईक यांची बोटं न धरता स्वच्छंदी फिरणे या दोन गोष्टी मी ठासून सांगेन. घरातल्यांबरोबर अथवा नातेवाईंकाबरोबर असताना जो एक रोल प्ले असतो तो येथे नाहीसा होउन, मी म्हणुन आवडेल ते करता, खाता येते ते मिपाकरांबरोबरच!!
तर असो!! तर अश्या आम्ही शिर्डीला दर्शनासाठी गेल्या असताना, मी जन्मात पहिल्यांदा सब्जा पाहिला!!! काय नवल आहे ना? भारतात राहून मला सब्जा ही वनस्पती फक्त ऐकून माहिती होती, फालुद्यात घातलेल्या सब्जा बिया मला माहित होत्या, पण ही वनस्पती मी कधीच पाहीली नव्हती. भारताबाहेर मात्र, थायी बासिल, अथवा स्वीट बासिल म्हणुन मी हिच्या अगदी प्रेमात होते. तर तो सब्जा पाहून मी,"अग ही बासिल!! बासिल!!" करुन भरपूर गोंधळ घातला!!
तर या बासिलने अनेक थायी डिश बहारदार होतात, त्यातली एक डिश म्हण़जे "क्रा पाव राईस"!!
कोणत्याही हॉटेल मध्ये गेलं की कायम काहीतरी वेगळं मागवायचं अशी माझी खोड आहे. त्याच माझ्या स्वभावाला जागून मी एकदा हा राईस मागवुन खाल्ला, अन काय सांगू महाराजा!!! आक्शी घासा घासाला अहाहा!!
अन लागत तरी असं काय या रेसिपीला? अहो चक्क शिळा भात!! आहात कुठे? तर नेहमी आदल्या दिवशीच्या भाताचा तोच तोच फोडणीचा भात करुन कंटाळलात? फ्राईड राईसला चव नाही उरली? न्युट्रीशीअस व्हॅल्यु वाढवायची आहे जेवणात? पाहूण्यांना काहीतरी नविन करुन घालावसं वाटतयं? तर करा! करा!! करा!! आमचा क्रापाव राईस करा!!
तर आता गप्पा थांबवा!! उगा काम सोडुन विषय कोठल्या कोठे नेला राव तुम्ही?? तुमची पण ना! कम्मालच आहे बाई!!
तर चला!! चला!! चला!! सामग्री गोळा करा.
सामग्री:-
२ वाट्या थंड मोकळा भात.
(२ वाट्या म्हणायला, असेल नसेल तेव्हढा सगळा भात घ्या आदल्या दिवशीचा. :) मी तर सगळ्यांचे डबे भरायला म्हणुन जरा जास्तच भात लावते आदल्या रात्री. सकाळी हवा तसा भात तैयार!!)
४-५ वाट्या वेगवेगळी भाजी. ( या मध्ये मी कॅप्सिकम, ब्रोकोली, चॉप्सॉय अन गाजर घेतलं आहे. पण तुम्ही फ्रीजवर धाड टाकून त्यातल्या सगळ्या भाज्या वापरु शकता. या रेसीपीत पालेभाजीसुद्धा चालते. एक वेगळाच गोडवा येतो. मशरुम्स चालतात नव्हे पळतात!! मी असलेले मशरुम्स विसरले :) )
३-४ लसणाच्या पाकळ्या सोलुन, अन तुकडे करुन.
१ टेबलस्पून साखर.
१ टेबलस्पून सोयासॉस.
१ टेबलस्पून थायी मिरचीचे तुकडे ( सोसण्यावर!! माझ्या घरात ही बुलेट मिरची आणली तरी चालत नाही. मी फोटोत दाखवली आहे ती बाटलीतली,चायनिज क्रंची मिरची वापरते. तुम्ही सरळ आपली ओली लाल मिरची वापरा)
१ वाटी स्वीट बासिल अथवा सब्जाची पाने धुवुन.
१ वाटी छानसा चिरलेला कांदा. (हा मात्र जरा बारीक चिरा. मस्त एकसारखे चौकोनी तुकडे!!)
४-५ काड्या कोथींबीर.
२ पळ्या तेल.
आणि
चवीनुसार मिठं.
आता पाककृती:-
एका कढईत २ पळ्या तेल गरम करा. त्यात कापलेले लसूण तुकडे टाकून चांगले सोनेरी होइतो परता. आता त्यात मिरचीचे तुकडे मिसळा अन परत एकदा दोन मिनिटं परता. मग त्यात सगळ्या भाज्या घाला अन परत एकदा चांगले परतुन कढईला झाकण ठेवुन एक ३-४ मिनीट भाज्या मऊसर होउ द्या. असे नका डोळे मोठ्ठे करुन पाहू!! मला माहिती आहे आपल्याकडे कांदा आहे बारीक चिरलेला.
आता भाज्या साधारण शिजल्या असतील, तर त्यात सोया सॉस घाला. आणखी एकदा परता आणि थंड भात मोकळा करुन त्यात मिसळा. हवं असेल तसं मिठ घाला. (माझ्या भातात मिठ नसते त्यामुळे मला भाज्या अन भात या दोन्हीच्या वाटणीचे घालावे लागते.)
आता या भाताला अन भाज्यांना मिळुन एक मस्त दणदणीत वाफ आणा. परत झाकण काढुन आता, हो आत्ताच!! या भातात साखर, कांदा, बासिलची चिरलेली पाने मिसळा.
आणखी एकदा मस्तपैकी मिसळा सगळ एकत्र अन वरुन चिरलेली कोथिंबीर घालुन गॅस बंद करा.
झाला तयार थायी क्रापाव राईस!! रोजच्या डब्याला आणखी एक नवा पर्याय!! इतक्या सगळ्या भाज्या असल्याने जास्त न्युट्रीशीयस!! यात चिकन मिसळायचे असेल तर चिकनचे तुकडे भाज्यांबरोबर वाफवुन घ्या.
सो पेश है!! क्रापाव राईस!!
( मध्यंतरी सोयासॉस बद्दल बरच काही ऐकलं. त्यात सोया सॉस अंगावर पडल्यावर तेथे त्वचेवर सोयासॉसच्या रंगाचा डाग पडुन दुसर्या दिवशी खाज अन रॅश आल्याचे एका मैत्रीणीने सांगितले. तेंव्हापासून निदान मी तरी सोयासॉस न वापरताच हा भात करते! छान होतो. इव्हन साखर मी कधी घालते, कधी नाही.)
ताजा कलमः - कुणाला अंडी घालायची हौस असेल, त्याला आमची ना नाही!! ;)
कळावे
__/\__
अपर्णा.
प्रतिक्रिया
10 Jan 2015 - 11:01 am | मुक्त विहारि
लेखनाची स्टाइल पण मस्त...
10 Jan 2015 - 11:13 am | टवाळ कार्टा
हायला...सहीच हाये बे बाकी थायी पदार्थ हे माझे नाजूक टोक :)
10 Jan 2015 - 11:23 am | खटपट्या
दिसायला तवा पुलावासारखा दिसतोय !!
वाचतोय !!
10 Jan 2015 - 11:49 am | कविता१९७८
मस्तच , चविष्ट असणार याबद्दल वादच नाही.
10 Jan 2015 - 11:51 am | सविता००१
चला, आता आजचा मेनू ठरला.
10 Jan 2015 - 12:36 pm | अनन्न्या
आधी सब्जा लावायला पाहिजे! वाचनखूण साठवते.
10 Jan 2015 - 1:02 pm | आदूबाळ
एक गरीब प्रश्न - आपलं नेहेमीचं सूर्यफूल तेलच वापरायचं ना?
10 Jan 2015 - 3:10 pm | अजया
अपर्णा द ग्रेट इज बॅक!
मस्त पाकृ.करुन घाल हो एकदा.नक्की खाईन!!
10 Jan 2015 - 4:06 pm | रेवती
मस्त पाकृ! फोटूवरून तरी करावासा वाट्टोय. चा. फ्रा. राईसचे मावसभावंड असावा असा आहे. लेखनष्टाईल चटकदार आहे.
10 Jan 2015 - 4:38 pm | सतिश गावडे
याच्या भारतीय आवृत्तीला "तवा पुलाव" म्हणतात. अर्थात त्यात ब्राझील सॉरी बासिल नसते.
फोटो छान आलेत. तुमचे दोन्ही हात पाकृत गुंतले असताना फोटो काढणार्या तुमच्या कुटुंबियांचे विशेष कौतुक.
10 Jan 2015 - 4:55 pm | सस्नेह
कधी येऊ खायला ? *biggrin*
10 Jan 2015 - 5:11 pm | बोका-ए-आझम
तोंपासु!
10 Jan 2015 - 5:17 pm | इशा१२३
रसाळ लिखाण,मस्त रंगीत फोटो.बघुनच तोपासु.
भाताचा नविन प्रकार कळला.अपर्णाताई धन्यवाद!
10 Jan 2015 - 5:56 pm | शिद
मस्त पाकृ. तोंपासू.
+१
10 Jan 2015 - 6:12 pm | सुप्रिया
मस्त रंगिबेरंगी दिसतोय राईस. एकदा करून पहावासा वाटतोय.
पण सब्जाची पाने कुठे मिळतील.
10 Jan 2015 - 6:17 pm | कौशी
आवड्ली. आणि करून बघते.
10 Jan 2015 - 6:25 pm | पिंगू
झकास दिसतोय क्रापाव राईस. चवपण नक्कीच भन्नाट असणार..
बाकी बुलेट मिरचीला भूत झोलोकिया तोडीस तोड म्हणून वापरता येईल..
10 Jan 2015 - 6:35 pm | दिपक.कुवेत
छान दिसतोय. "तेंव्हापासून निदान मी तरी सोयासॉस न वापरताच हा भात करते" - पण साहित्यात तर सोयासॉस घेतलेला दिसतोय आणि पाकॄतहि वापरलेला आहे...नक्कि काय??
11 Jan 2015 - 2:46 am | स्पंदना
मायबाप !! तुम्हांसाठी बनवताना पाककृती शास्त्रोक्त बनवली. पंण घरात बनवताना हल्ली फ्राइड राईस मध्ये वगैरे सोया घालायच बंद केलं आहे. सोयासॉस बनवायची पद्धत मागे एकदा टी.व्ही. वर पाह्यली होती. टेरेसवर वर्षानुवर्षे ठेवलेल्या पिंपातुन थेंब थेंब काळा अर्क गळताना दिसत होता. वरुन फक्त सोयाबीन आणि काहीतरी ओतत होते. पण या वेळखाऊ पद्धतिने आता एकदम सोयासॉसला आलेली मागणी पुरी होउ शकत नाही. तेंव्हा लिमीटेड लोकं सोया सॉस वापरायचे, खायचे किंवा सोयासॉस बद्द्लच्माहीत असणारे होते. आता गल्ली गल्लीतुन प्रत्येक गाड्यावर दिवसाला १० -१० बाटल्या लागत असतील सोयाच्या? कुठुन आणायच? मग करा काहीतरी "जुगाड" !! आणी मग ती "जुगाड" कधी कधी अशी अंगावर रॅश वगैरे आणते.
11 Jan 2015 - 12:59 pm | दिपक.कुवेत
गॉट ईट. धन्स.
10 Jan 2015 - 6:57 pm | डॉ सुहास म्हात्रे
तोंपासु पाकृ ! जरूर करवून चव घेतली जाईल.
10 Jan 2015 - 7:18 pm | मितान
वा वा ! काय मस्त फोटो आलेत!
हा भात नक्की आवडेल असं वाटतंय. करून बघते.
10 Jan 2015 - 7:29 pm | पैसा
मस्त पाकृ! लिखाण आणि फोटो नेहमीप्रमाणे झक्कास! सब्जा मिळणे कठीण आहे. न घालता केला तर चव वेगळी येईल.
उनाड भटकंतीसाठी +१०००!! जाम मजा आली होती. आता कधीही कोणी भटकायला बोलवा. म्या हजर!
11 Jan 2015 - 2:19 am | जुइ
मस्त पाकृ आणि फटुही झकास!
11 Jan 2015 - 2:33 am | मधुरा देशपांडे
खास अपर्णाताईच्या शैलीतले वर्णन आणि पाकृ. मस्त.
12 Jan 2015 - 10:08 am | स्पंदना
मुवि, टका, खटपट्या,कविता,सविता ;) अनन्न्या, आदूबाळ, अजया, रेवाक्का,धन्या,स्नेहांकिता, बोकासाहेब,ईशा,शिद, सुप्रिया, कौशी,पिंगू, दिपक, अपर्णा ;) इए, मितान, पै तै, जूई आणि मधुरा धन्यवाद. खूप दिवसांनी काही लिहीलं.
@ आदूबाळ- तुम्ही नेहमी जे तेल स्वयंपाकाला वापरता तेच वापरुन करा.
@ सतिश गावडे- पोट्टीला सुट्टी आहे, म्हंटल काढ जरा फोटु!! ;)
@ अनन्न्या, पै आपल्याकडे साधारण मशीदीजवळ अथवा मुस्लिम वस्तीत मिळेल सब्जा. नाहीतर सब्जाच्या बिया आणायच्या अन कुंडीत टाकायच्या. रोज पाणी घालणे. :))))
@ पिंगू- ही झोलकियाच असावी.
12 Jan 2015 - 10:17 am | सविता००१
झाला गं अपर्णाताई.
हा विकांत आमच्याकडे अपर्णाताई विकांत म्हणून साजरा झाला. तिने मागे दिलेला कट वडा आणि हा राईस करून.
जाम शायनिंग मारण्यात आलेले आहे गेले दोन दिवस तुझ्या कृपेने!
अशीच पाव गं माय ;)
12 Jan 2015 - 10:23 am | स्पंदना
:))
12 Jan 2015 - 10:48 am | अत्रुप्त आत्मा
सक्काळी सक्काळी भूक चाळवली ना...!
आता मला अत्ताच्या अत्ता पायजेsssssss! :-/
समांतरः-
म्हणजे पा.कृतीत? की धाग्यात!? 
@कुणाला अंडी घालायची हौस असेल,त्याला आमची ना नाही!! >>
12 Jan 2015 - 6:33 pm | दिपक.कुवेत
नाहि ना? मग ज्याला घालायची असतील त्याला असले प्रश्न पडणार नाहित....काळजी नसावी!!!
12 Jan 2015 - 8:05 pm | अत्रुप्त आत्मा
अरे बाप्प रे!
ब्वॉर!
12 Jan 2015 - 12:31 pm | आरोही
मस्त प्रकार आहे हा भाताचा ,नक्की करण्यात येईन ..लेखन शैली उत्तमच !!!
12 Jan 2015 - 7:20 pm | सखी
कसली सुरेख रंगसंगती आहे, लगेच करुन खावासा वाटतोय.
12 Jan 2015 - 8:21 pm | प्रचेतस
लेखन झक्कास, पाकृही झक्कास.
12 Jan 2015 - 9:13 pm | पिलीयन रायडर
मस्त रेसेपी!!! आणि तू लिहीणार म्हणजे सरळ सरळ थोडीच काही सांगशिल की बाबानो घ्या थोडा भात, टाका त्यात भाज्या.. तू म्हणजे शिर्डी व्हाया त्र्यंबकेश्वर जाणार!!!
शिळ्या भाताचे असले प्रकार मलाही फार आवडतात... परवाच कांदे, टॉमेटो, कॉर्न्स, मटार, गाजराची भाजी करुन घेऊन त्यात भात मिक्स करुन खाल्ला.. आता त्यात ही पण व्हरायटी करुन पाहीन!
आमची एक सौदेंडियन मैत्रिण ओला नारळ, कोबीची हिरव्या मिरचीचे वाटण करुन भाजी करायची आणि मग ती भातात मिक्स करुन डब्यात आणायची!! एक नंबर... सौदेंडियन लोक म्हणुन मला आवडतात!
13 Jan 2015 - 2:25 pm | पदम
नक्कि करेन. डब्यात देइन करुन.
14 Jan 2015 - 6:03 am | देशपांडे विनायक
आता आम्ही तुम्हाला मेहूण जेवण्यास घालण्याचे पुण्य देऊ शकतो
पण
तुमच्या मार्गदर्शनाशिवाय येऊ शकत नाही तुमच्याकडे
मेलबोर्न पर्यंत आलो कसे बसे
14 Jan 2015 - 11:43 am | स्पंदना
या! या!! निवांत या हो!!
14 Jan 2015 - 2:25 pm | स्पा
कचकचीत झालाय राईस
यम्मी
14 Jan 2015 - 3:30 pm | स्पंदना
ए स्पा!
मी तिकडे तुझ्या लेखावर तीन तीन कमेंटस दिल्या..आणि तू नावं ठेवतो माझ्या भाताला??
पुढच्या खेपेला तुला मॅक्डी मध्ये घोरपड पकडणारा वधुपिता भेटायला पाठवीन हां!!
15 Jan 2015 - 10:25 am | सविता००१
जाने दो. नया है वह. त्याला कचकचीत म्हणजे न शिजलेला असं म्हणायचं नसून एकदम यम्मी म्हणायचं असावं.
नको गं घोरपड पकडणारा वधुपिता पाठवू लगेच... ;)
19 Jan 2015 - 2:15 pm | टवाळ कार्टा
यालाच धमकी कंपू म्हणतात काय? =))
15 Jan 2015 - 9:55 am | अभिदेश
पण ती सब्जाची पाने कुठे मिल्तात....
19 Jan 2015 - 1:46 pm | उमा जितेन्द्र
मस्त!
22 Jan 2015 - 10:16 am | सविता००१
उमा आली एकदाची
कधीपासून हरवली होती
22 Jan 2015 - 9:04 am | त्रिवेणी
दिसतोय छान.
पण येवढ्या भाज्यांची कापाकापी करायला जाम कंटाळा येतो बाई. नेक्स्ट भारतवारीत तुच करुन खाऊ घाल.
22 Jan 2015 - 9:10 am | निनाद
एकदम छान आणि चविष्ट दिसतो आहे.
22 Jan 2015 - 10:16 am | मनिष
मस्त दिसतोय क्रापाव राईस आणि रेसिपी लिहिण्याची पध्द्त तर लाजवाब. नक्कीच करुन पाहीन, हे सब्जाची पाने म्हणजेच 'बासिल' हे मलाही माहित नव्हते. :-)
22 Jan 2015 - 9:40 pm | स्वाती दिनेश
हा राइस कसा काय सुटला नजरेतून? मस्त मस्तच एकदम!
पाकृ शिर्डी व्हाया त्रंबकेश्वर फ्राफु पर्यंत आली ग..
स्वाती
24 Jan 2015 - 8:13 am | चाणक्य
करणार...च
2 Jun 2015 - 1:10 pm | भाग्यश्री कुलकर्णी
छान रेसिपी.त्या सब्जाच्या पानाशिवाय करायला लागणार..
2 Jun 2015 - 1:58 pm | अनुप७१८१
तोन्ड को पाणी सुट्या