खरेतर भाताच्या या प्रकाराला व्हेज बिर्याणी म्हटले पाहिजे असे काहि नाहि. रेसिपी बिर्याणीची आहे, पण मी माझ्या पद्धतीने त्यात थोडे फ़ेरफ़ार केले आहेत.
साहित्य:
भातासाठी:
१. २ वाटी बासमती तांदुळ,
२. १ वाटी फ़ुलकोबी
३. १ किसलेले गाजर,
४. १/२ वाटी मटार,
५. २-३ फ़रसबी तोडुन त्याचे तुकडे करुन घ्या
६. १/२ बटाट्याचे तुकडे
ओला मसाला:
१. ३-४ हिरव्या मिरच्या
२. ३ पाकळ्या लसुण
३. थोडेसे आले (आले म्हणजे अद्रक)
४. १/२ लहान कांदा
कोरडा मसाला
१. २-३ लवंग
२. दालचिनी पावडर
३. जीरा पावडर
४. धणे पावडर
५. हळद
६. तिखट
७. गरम मसाला
इतर साहित्य
१. मीठ
२. दीड वाटी दही
३. १ कॅरमलाईज़्ड कांदा. (कॅरमलाईज़्ड याला मराठी प्रतिशब्द काय आहे?)
कृती:
१. फ़ुलकोबी, गाजर, वाटाणा,फ़रसबीचे तुकडे, बटाट्याचे तुकडे अर्धकच्चे शिजवुन घ्यावे.
२. तांदुळाच्या अडिचपट पाणी घेउन त्यात तांदुळ घालावे. वरुन झाकण ठेवुन तांदुळ शिजवावा. उरलेले पाणी काढुन टाकावे. तयार भात परातीत मोकळा करुन ठेवावा.
३. ओला मसाला :
मिरच्या, लसुण, कांदा, अद्रक एकत्र करा. त्यात २ चमचे दही घालावे आणि हे मिश्रणा वाटुन एकजीव करावे.
४. एका भांड्यात थोडे तेल घालावे. तेल गरम झाल्यावर त्यात ओल्या मसाल्य़ाची पेस्ट टाकुन परतावे.
५. पेस्ट गुलाबी रंगावर परतुन त्यामध्ये लवंग, १/२ टीस्पून दालचिनी पावडर, १ टीस्पून जीरा पावडर,
१ टीस्पून धणे पावडर, १/२ टीस्पून हळद, १ टीस्पून तिखट, १ टीस्पून गरम मसाला घालावा.
१ मिनीट परतुन घ्यावे.
६. दीड वाटी दही आणि अर्धकच्च्या भाज्या घालुन २ मिनीट शिजवावे.
७. भात आणि कॅरमलाईज़्ड कांदा त्यात घालावा. सगळे पदार्थ व्यवस्थीत एकत्र करावेत.
८. २ मिनीट वाफ़वुन घ्यावे.
बिर्याणी तयार.
कांदा कॅरमलाईज़्ड कसा करावा?
१. कांद्याचे उभे बारीक काप करावे.
२. तव्यावर थोडे (२-३ चमचे) तेल घालावे. तेल तव्यावर सगळीकडे पसरेल याची काळजी घ्या.
तेल गरम झाले कि त्यावर कांदा परतवावा.
३. कांदा थोडा परतल्यावर २ चिमटी मीठ आणि १/२ टीस्पून साखर घालावी.
४. कांदा चांगला लालसर रंगावर परतुन घ्यावा
===========================================================
"मिपावर हे माझे पहिलेच लेखन.
हीच रेसिपी मी माझ्या ब्लोग वर पण लिहिली आहे.
मुविंनी दिलेल्या प्रोत्साहनाने मी हि रेसिपी मिपावर टाकतोय. मुवि, प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.
फोटो काढायचे लक्षात न आल्याने , फोटो नाहीत :(
रेसिपीचे फोटो इतके सुंदर येऊ शकतात हे मला मिपावरच कळले. (ह्या वाक्यात अज्जिब्बात अतिशयोक्ती नाहीय)
फोटो नसल्याची चूक माझ्याकडे. त्याबद्दल नावे ठेवा, अर्थात त्यासाठी मिपाकरांना माझ्या परवानगीची गरज नाही
पुढच्या वेळेस माझी रेसिपी आठवणीने फोटोसह लिहून ठेवीन."
प्रतिक्रिया
26 Dec 2014 - 11:48 am | मुक्त विहारि
बायकोला करायला सांगणार..
ही असली कामे तीच करू जाणे.
पण आजकाल ती पण फोटो मागायला लागली आहे...
आता काय करावे बरे?
26 Dec 2014 - 12:05 pm | मुक्त विहारि
माझे धन्यवाद मागू नकोस...
फक्त पुढची रेसीपी फोटो सकट पाठव...
नाहीतर नुसतीच रेसीपी का दिलीत? असे म्हणून बायको माझ्या पाठीत लाटणे मारेल.
26 Dec 2014 - 12:05 pm | पिलीयन रायडर
फोटो नसला तरी पाकॄ एक्दम समजेल अशी सुटसुटीत लिहीली आहे. पहिल्या प्रयत्नाच्या मानाने खरंच छान लिहिली आहे..
जेव्हा परत कराल तेव्हा फोटो टाका!
27 Dec 2014 - 2:34 am | अनन्त अवधुत
आईने सुरुवातीला अंदाजे , किंचित , साधारणपणे , व्यवस्थित वाफवून, चव येईल असे शिवाय चांगले भिजले , असले शब्द प्रयोग करून काही पदार्थांची रेसिपी सांगितली होती
हेच प्रमाण वापरून जे पदार्थ केले त्यात पोह्यांचा लगदा बाबांनी दुरुस्त केला, तांदळाची खिचडी दुरुस्तीपलीकडे होती आणि साबुदाण्याची उसळ (याला साबुदाण्याची खिचडी असे पण म्हणतात) दुरुस्तीपलीकडे जाण्याआधी मित्राने ठीक केली.त्यानंतर मी शक्यतोवर पदार्थाचे प्रमाण (मोजता येईल या पद्धतीने) आणि तो पदार्थ कशासाठी वापरतो आहोत हि नोंद करून रेसिपी लिहितो.
31 Dec 2014 - 9:22 pm | मितान
निवांत करण्याची रेसिपी असल्याने सुट्टीच्या दिवशी करून बघेन.
अवांतर : 'साबुदाण्याची उसळ'... आमच्या मराठवाड्यातले का हो तुम्ही ?
31 Dec 2014 - 9:27 pm | मधुरा देशपांडे
आमच्या विदर्भात पण 'साबुदाण्याची उसळ'च म्हणतात. ;)
1 Jan 2015 - 5:49 am | अनन्त अवधुत
आपल्या मराठवाड्याशी फार जवळचे संबंध आहेत.
पण मी विदर्भातला.
26 Dec 2014 - 12:20 pm | सविता००१
नक्की करणार
26 Dec 2014 - 12:49 pm | मधुरा देशपांडे
पाकृ आवडली. पुढच्या वेळी फोटो टाका.
बाकी फुलकोबी हा शब्द अनेक दिवसांनी ऐकला आणि अतिशय आनंद झाला. :)
27 Dec 2014 - 2:35 am | अनन्त अवधुत
उसळ
26 Dec 2014 - 1:46 pm | hitesh
कांदा क्यारामलाज करायची गरज नसते.
आधी भात व भाज्या अर्धवट शिजवुन घ्यायच्या.
दुसर्या स्टेपमध्ये ते लेअर रचताना खालच्या लेअरला कांद्याचाच लेअर रचायचा. तो आपोआप क्यारामलाइज होतो. खालच्या लेअरचा भातही जळत नाही.
27 Dec 2014 - 2:36 am | अनन्त अवधुत
पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करतो
26 Dec 2014 - 2:00 pm | hitesh
http://www.maayboli.com/node/12868
27 Dec 2014 - 3:29 am | अनन्त अवधुत
मायबोलीवर असून ते पान पाहता येत नाही. मायबोलीला शेवटची भेट देऊन काही वर्ष होऊन गेलेत.
"तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.
हे पान वाचण्यासाठी तुम्ही पाककृती आणि आहारशास्त्र
या ग्रूपचे सभासद असणे आवश्यक आहे."
असा संदेश दिसत आहे
काय आहे तिथे?
27 Dec 2014 - 9:16 am | hitesh
.
26 Dec 2014 - 2:05 pm | सस्नेह
आणि डीट्टेल दिल्यामुळे खूपच आवडली.
फोटो असता तर आणखी मजा आली असती.
27 Dec 2014 - 3:30 am | अनन्त अवधुत
फोटो असता तर आणखी मजा आली असती.
26 Dec 2014 - 2:53 pm | स्पंदना
हे आणि एक अ.अ.
स्वागत आहे भावा.
बाकी पठ्ठीचे आचारी दिसता. अतिशय व्यवस्थीत आणी सुटसुटीत लिहीली आहे पाककृती. आणी लालसर रंगावर परतलेला कांदा किंवा कुरकुरीत कांदा म्हणता येइल कॅरमलाइज्ड कांद्याला. फोटो काढताना बिर्याणी शिजल्यावर तिचा एक पोर्शन वाढुन घ्या आणी फोटो काढा.
एक सांगू का? या बिर्याणीत वांगे घालुन पहा. (हुइ!! अंडे घालुनच्या चालीवर झाले ) वांग अतिशय मस्त लागते व्हेज बिर्याणीत असा अनुभव आहे.
27 Dec 2014 - 7:15 am | अनन्त अवधुत
अ अ सुचनेबद्दल आभारी.
कुरकुरीत कांदा हे नाव योग्य वाटते. चव आणि पोत दोन्हीला पण हे नाव चपखल बसते.
वांगी भात हा वेगळा पदार्थ आहे.
पुढच्या वेळेस वान्ग्यासह बिर्याणी खाईल
27 Dec 2014 - 11:51 pm | एस
कॅरमलाईज़्ड कांदा म्हणजेच परतलेला कुरकुरीत कांदा.
हम्म, कधी बोलावताय मग खायला? ;-)
बाकी पाककृती अगदी डिट्टेलवार आणि सुटसुटीत आहे. आमच्यासारख्या 'शेफ देस टेरिबल' लोकांसाठी येकदम योग्य. करून पाहतो कधीतरी.
28 Dec 2014 - 9:03 am | स्पंदना
येवा महाराजा
कंदी बी येवा!! तुम्ही आलात की अर्ध्या तासात बिर्याणी करु. हाकानाका? :)
27 Dec 2014 - 10:09 am | मदनबाण
फोटो ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लोकमान्य { एक युगपुरुष } Releasing 2nd January, 2015
27 Dec 2014 - 10:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो प्लीज.
-दिलीप बिरुटे
27 Dec 2014 - 11:21 pm | निवेदिता-ताई
मस्तच
28 Dec 2014 - 12:39 pm | त्रिवेणी
बिर्याणी मसाले भात करणे कधीच सोडले. एंड प्रॉडक्ट खिचडी हाच होतो म्हणून.
बिर्याणी आता परत करून आम्हाला फोटो दाखवा.
31 Dec 2014 - 2:11 pm | मनिमौ
सुटसुटीत पाक्रु. नक्कि करुन पाहीन.
31 Dec 2014 - 2:31 pm | पैसा
व्यवस्थित लिहिलेली आणि सोपी पाकृ आहे. पुढच्यावेळी फोटो जरूर द्या.
31 Dec 2014 - 3:31 pm | यमगर्निकर
31 Dec 2014 - 3:33 pm | मदनबाण
कय म्हन्तय हे असं कधि पसुन व्ह्य्ल लग्ले ? *LOL*
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business
Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project
Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions
US opening of oil export tap widens battle for global market
31 Dec 2014 - 4:17 pm | टवाळ कार्टा
अत्तच वत्ले असेल ;)
31 Dec 2014 - 6:26 pm | मुक्त विहारि
ह्यांना मिपाकर होवून एक महिना पण नाही झाला...
जरा कळ काढा की...
मराठीत टायपिंग करायला बर्याच जणांना सुरुवातीला अवघड जाते...
16 Jan 2015 - 11:57 pm | अनुपमा स्वप्निल
हि रेसिपी मी गेल्या रविवारी करून बघितली,फारच अप्रतिम झाली ख़ुप खूप आभार मिपा वर शेयर केल्या बद्दल *smile* :-) :) +) =) :smile:
17 Jan 2015 - 3:33 am | अनन्त अवधुत
:) वाचून आनंद झाला. कोणीतरी हि पा कृ केली आणि taste च्या test मध्ये पास झाली.
27 Jan 2015 - 2:09 am | palambar
बिर्यानि मधे पुदिना व कोथिन्बिर मसाल्याबरोबर वात्ले तर?? बाकि रेसिपि छान च.
27 Jan 2015 - 4:42 am | अनन्त अवधुत
कोथिंबीर ठीक आहे पण पुदिन्याचा वास बिर्याणीसाठी उग्र होईल त्यामुळे पुदिना नको असे माझे मत.
पुदिन्याची चटणी आणि रायता बिर्याणीसोबत खायला करता येईल