गाभा:
२३- २४ वर्षे IT प्रोजेक्ट management / delivery वगैरे करून झाल्यावर शिकवायची हौस म्हणून २-३ वर्षांपासून campus to corporate, data wareshousing concepts वगैरे ट्रेनिंग केली ...अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला ...
एकूणच 'शिकवणे' हे तुला उत्तम जमते हा अनेकांचा अभिप्राय आहे आणि म्हणूनच ..हल्ली बरेच दिवस, ट्रेनिंग देणे हा पूर्ण वेळ व्यवसाय करावा असे मनात येते आहे ...
मी ह्याच्यात उत्तम काम करू शकेन हा आत्मविश्वास आहे ..परंतु वयाच्या मध्य चाळीशीत हे उद्योग करावेत का ? आणि नक्की सुरुवात कशी कुठे करावी ह्या बद्दल जरा घोळ आहेत मनात ...
शेवटी म्हटले जरा माहेरी आप्तस्वकीयांना सल्ला विचारावा आणि म्हून हा प्रपंच ...
आपल्या बहुमोल सल्ल्यांबद्दल आधीच मन:पूर्वक आभार ...
प्रतिक्रिया
19 Dec 2014 - 8:20 pm | पैसा
तुम्हाला जे करावेसे वाटते आणि जमते, ते करण्यासाठी मनापासून शुभेच्छा! मध्य चाळिशीत नव्याने सुरुवात करायला काहीच हरकत नाही. मात्र त्यासाठी तुमचा आर्थिक पाया भक्कम करून ठेवा. घराचे कर्ज शिल्लक असले तर ते कसे फेडायचे, काही दिवस काम न मिळाल्यास रोजच्या घरखर्चाची तरतूद असली पाहिजे. म्हणजे आवश्यक सामान, रोजचा दूध भाजी, अन्नधान्य खर्च, कधीतरी लागणारे डॉक्टर्स, आपल्या हौसेसाठी काही खर्च, घराचे कर्ज संपले नसेल तर हप्ता, मुलांच्या शिक्षणाचा खर्च हे भागतील इतके उत्पन्न आपल्या शिल्लक पुंजीच्या व्याजातून मिळाले पाहिजे. मग जास्तीचे उत्पन्न मिळवण्यासाठी, किंवा एखादी रिस्क घेण्यासाठी फार टेन्शन रहाणार नाही.
19 Dec 2014 - 8:29 pm | सुबोध खरे
पाण्यात उडी टाकल्याशिवाय पट्टीचे पोहणारे होणार नाही. फारतर काय परत आय टी मध्ये जावे लागेल अशा स्पष्ट विचाराने पुढे जा.प्रतिकूल तेच बहुधा घडेल हे समजून चला (इति स्वा. सावरकर) मी साडे अठरा वर्षे सरकारी नोकरी करून विना निवृत्ती वेतन विना संतोष फंड( GRATUITY) बाहेर पडलो. घराचे आणी दवाखान्याचे दोन्ही कर्जे शिरावर घेऊन.( नोकरी सोडल्यावर कोण कर्ज देणार होते?). पुढचा मागचा विचार करून ठेवा.
हिम्मते मर्दा तो मददे खुदा.
19 Dec 2014 - 8:42 pm | श्रीगुरुजी
मी अनेक वर्षे (दोन दशके) आयटी मध्ये काम करून नंतर आयटीतून कायमस्वरूपी बाहेर पडलो आणि नंतर पूर्णपणे वेगळा नॉनआयटी विषय शिकविणार्या शिक्षकी पेशाकडे वळलेलो आहे. विषय आवडीचा असेल तर तो विषय शिकविणे सहज जमू शकते व शिकविताना खूप मजा येते.
19 Dec 2014 - 8:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शिकवतांना खूप मजा येते.
+१००००० सहमत.
-दिलीप बिरुटे
19 Dec 2014 - 9:37 pm | अत्रन्गि पाउस
करतो आहे
20 Dec 2014 - 10:08 am | सतिश गावडे
अत्रन्गि साहेब शुभेच्छा.
माझी पहिली नोकरी अभियांत्रिकी महाविदयालयातील व्याख्यात्याची होती. आयटीत येण्यासाठी एक सत्र शिकवून मी ती सोडली. मात्र शिकवताना मला स्वतःला आनंद वाटायचा. अजून बारा पंधरा वर्ष आयटीत काम करुन मी ही पुन्हा शिक्षक होणार आहे.
काही सन्माननिय अपवाद सोडले तर अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकवणारे व्याखाता, प्राध्यापक हे दुसरे काहीच मिळत नाही किंवा इंडस्ट्रीत शिरकाव होत नाही म्हणून कुठयातरी अबक अभियांत्रिकी महाविदयालयात पदवुत्तर शिक्षण घेतात आणि व्याखाता किंवा प्राध्यापक होऊन पाटया टाकतात.
आम्हाला एका सत्रात सरासरी सहा या हिशोबाने चार वर्षांच्या आठ सत्रात अठ्ठेचाळीस विषयांचा अभ्यास करावा लागला. या अठ्ठेचाळीस विषय शिकवणार्यांपैकी फक्त दोन विषय शिकवणार्या प्राध्यापकांनी त्यांचे विषय मनापासून, झोकून देऊन शिकवले. बाकीचे सेहेचाळीस विषय आम्ही आधी घोकून आणि मग परिक्षेत ओकून पास झालो.
20 Dec 2014 - 7:20 pm | टवाळ कार्टा
सध्ध्या तरी असाच विचार आहे...पुढचे पुढे बघू...मला स्वताला सुध्धा शिकवायला खुप आवडते...आणि मुलांना ते चक्क समजतेपण :)
19 Dec 2014 - 9:18 pm | बोका-ए-आझम
मी गेली ११ वर्षे याच क्षेत्रात आहे आणि तीन गोष्टी जरुर सांगेन -
१. हे ठरवून घ्या की शिकवण्यामागचं उद्दिष्ट काय आहे. जर शिकवणं आवडतं म्हणून शिकवणार असाल तर प्रश्नच नाही पण जर आर्थिक प्राप्तीही महत्वाची आहे तर Coaching and Training Institutions या कधीही काॅलेजेसपेक्षा जास्त पैसे देतात. शिवाय तुम्हाला शिकवण्याची आवड आहे पण त्याच्या अनुषंगाने येणा-या इतर गोष्टी - पेपर काढणे, तपासणे, Assignment & Projects तपासणे इ. मध्ये interest नसेल तर काॅलेजमध्ये हे सगळं करावं लागेल. तो विचार करा.
२. शक्यतो असा विषय निवडा ज्यात लोक कमी आहेत आणि तुमचा अनुभव हा तुम्ही शिकवताना वापरू शकाल. माझा अनुभव असा आहे की विद्यार्थी theory ऐवजी practical विषयांच्या lectures ना खूष असतात. त्यांना काहीतरी नवीन शिकल्यासारखं वाटतं. Value Addition झाल्यासारखं वाटतं. जर तुम्ही त्यांना हा wow factor देऊ शकलात तर प्रश्नच नाही.
३. कधीही ' बघा, मला किती माहीत आहे ' असं विद्यार्थ्यांना सांगू नका किंवा त्यांचं तसं मत होऊ देऊ नका. माझा अनुभव आहे अाणि इथले सगळे शिक्षक त्याच्याशी सहमत होतीलच - आपण विद्यार्थ्यांकडून कधीही जास्त शिकतो.त्यामुळे त्यांचं मत आणि विचार यांना महत्त्व द्या.
मन:पूर्वक शुभेच्छा!
19 Dec 2014 - 9:46 pm | पिंपातला उंदीर
वर अनेक वयाने आणि कर्तुत्वाने श्रेष्ठ आणि ज्येष्ठ लोकांनी भारी अनुभव शेयर केले आहेत . माझी पण एक छोटी काडी . मी Media मध्ये ६ वर्ष काम केल . ते करत असताना माझे हिंदी चित्रपट सृष्टीत संहिता लेखनाचे प्रयत्न चालू होते . मी स्वतःच दुसऱ्यांनी लिहिलेल्या संहिता वाचून सगळ शिकत गेलो . माझी स्क्रिप्ट घेऊन अनेक दिग्दर्शकांचे उंबरठे झिजवले . ओळखी झाल्या या क्षेत्रात आणि आता मी एका बड्या हिंदी मधल्या दिग्दर्शकासाठी त्याचा चित्रपट लिहित आहे . मी नौकरी सोडली .मी आता ३१ वर्षाचा आहे . या वयात आर्थिक आघाडीवर अस्थैर्य असणे म्हणजे लोकांना विचित्र वाटत . भविष्यकाळ अनिश्चित आहे . चित्रपट पूर्ण होईल का ? चालेल का ? नाही चालला तर दुसरे काम मिळेल का ? काही माहित नाही . पण सध्या मी जितका आनंदी आहे तितका आनंदी कधीच नव्हतो . विक्रमादित्य मोट्वाने च्या उडान चित्रपटाच शीर्षक गीत भारी आहे आणि इथे खूप लागू पडत .
कहानी खतम है
या शुरुवात होने को है .
सुबह वोही है या फिर रात होने को है
आने वाला वक्त देगा पनाहे ,
या फिर से मिलेंगे दोराहे
19 Dec 2014 - 9:50 pm | पैसा
तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा! तुमचा चित्रपट लवकरच पडद्यावर येवो! मात्र नंतर मिपावर यायला विसरू नका! :D
20 Dec 2014 - 10:18 am | पिंपातला उंदीर
आभारी आहे पैसा ताई . आम्ही कसलं सोडतो मिपा . जोपर्यंत कोणी ban करणार नाही तोपर्यंत आम्ही आहोत इथेच . ह . घ्या : ))
20 Dec 2014 - 2:07 am | कपिलमुनी
मी हिंदीमधल्या एका बड्या दिग्दर्शकासाठी
21 Dec 2014 - 2:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शुभेच्छा. अहो, लिहित राहा. उत्तम लेखक व्हालच, नावारुपाला येण्यासाठी आम्हा सर्व मिपाकरांच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
आम्हाला तेवढं विसरु नका भो. तुमच्या बरोबर, हिरो-बिरोबरोबर फोटो बिटो काढायपुरतं तरी आमची वळख ठीवा भो. :)
वय वाढेल तसं अनुभवही वाढेल. संभलकर चलो, संभलकर रहो. संहिता देतांना अगोदर पैसे घ्या . उगाच स्क्रीप्ट हातात ठेवायची नै कोणाच्या. कितीबी वळखीचा असला जीवाभावाच असला तरी मनात असलेली थीम कोणालाही उलगडून दाखवायची नै. काय कल्ला की नाय लोक बेक्कार आहेत, तसे काही चांगलेही सापडतील. शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
22 Dec 2014 - 12:22 am | पिंपातला उंदीर
धन्यवाद बिरुटे सर. यथाशक्ति कालजी घेत आहोत : )
22 Dec 2014 - 8:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉ.सुधीर निकम नावाचा माझा एक मित्र आहे, चांगली चालत असलेली ओपीडी सोडली आणि संहिता लेखनात उतरला. काही मराठी चित्रपटांच्या कथा लिहिल्या, लिहितोय. एकदिवस मस्त गप्पा झाल्या त्याच्याशी तेव्हा मराठी चित्रपट कथांच्या खुप गोष्टी झाल्या. ''सापडना राव गुगलगाव' या नव्या चित्रपटाचं स्क्रीप्ट त्याचं. म्हणुन तुमची आठवण झाली. त्याच्यामुळेच मकरंद अनासपुरेला भेटायचा आणि गप्पा मारायचा योग आला होता. ती सर्व आठवण झाली.
-दिलीप बिरुटे
22 Dec 2014 - 1:08 pm | चाणक्य
उडी मारल्याबद्दल हाभीणंदण आणि पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा
19 Dec 2014 - 9:54 pm | vikramaditya
खुप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. मोलाचे सल्ले मिळत आहेत. हेच आपल्या मिपाचे वैशिष्ट्य!
यातुन ब-याच गोष्टी सर्वांनाच शिकायला मिळतील.
फक्त मला असे वाटते की एकदा जुन्या आय. टी. क्षेत्राशी संपर्क सुटल्यावर परत त्यात जाणे आणि परत अॅडजस्ट होणे कठीण असेल. I could be wrong but I feel once you leave the 'typical' so called corporate culture and work as a self employed professional, its very difficult to fit in again in that culture.
शिक्षणाशी संबधीत व्यवसाय हे रिसेशन-प्रुफ आहेत असे मानायला हरकत नाहे. तुम्हाला खुप शुभेछा. तुम्हाला जरुर यश लाभेल.
After all, doing what you like is freedom and liking what you do is happiness.
19 Dec 2014 - 10:56 pm | अमित खोजे
वरिल वाक्यास आपला दुजोरा.
- सध्या freedom च्या तयारीत असलेला
20 Dec 2014 - 12:58 am | विलासराव
फक्त मला असे वाटते की एकदा जुन्या आय. टी. क्षेत्राशी संपर्क सुटल्यावर परत त्यात जाणे आणि परत अॅडजस्ट होणे कठीण असेल
माझ्या एका मित्राने २००४ ला असाच रिलायन्सचा जॉब सोडुन व्यवसाय चालु केला. २००६ ल परत रिलायन्स.
आता २०१२ ला परत सोडला. खुप जोरात प्रयत्न केला व्यवसायासाठी पण नाही जमले, आता मागच्या आठवड्यात परत रिलायन्सला जॉईन झाला.
मला विचाराल तर मी म्हणेल काय विचार करायचा तो एकदाच करा आनी निर्णय झाला की मागचा दोर कापुन टाका. तुम्हाला यशस्वी व्हावेच लागेल. मीतरी असेच केले होते आणी यशस्वीही झालो बॉ. आणी हे सगळे कर्जबाजारी झालेलो असताना.
22 Dec 2014 - 9:35 am | सुनील
आयला. ही तर माझी गेल्या अनेक वर्षांपासून असलेली सही!
19 Dec 2014 - 10:54 pm | खेडूत
एकूण तुमच्यासाठी ते योग्य ठरेल असे दिसते. चांगल्या ट्रेनर्सचा तुटवडा आहे.
साधारण असाच काहीसा विचार आहे. फरक एकच- मी नॉन आयटीत जास्त काळ काम करत आहे. भारतात परतायचे ठरवल्यावर हाच व्यवसाय करायचा मुख्य विचार डोक्यात होता. सध्या गृहपाठ सुरु आहे . पूर्वी असे काम केले आहे .
काही मुद्दे:
१. आताची नोकरी सोडूनच पहिले काम घेता येईल- कारण तसे आपल्या सेवाशर्तीत म्हटलेले असू शकते. पूर्णवेळ दिल्याशिवाय हे होत नाही. बराच प्रवास करावा लागतो.
२. कधी एक एक महिना काम नाही मिळालं तरी धीर ठेवावा लागतो.
३. आपल्या विषयाला सोडून थोडे वेगळे प्रशिक्षण देण्याची मागणी येते ती सोडू नये . त्यासाठी इतर ट्रेनर्सशी संपर्क असावा- तेच आपले विपणन करतात.
संधी :
शिकवता-शिकवता कधी सल्लागार म्हणून काम करायची संधी येते. मोबदला पण चांगला असतो. पण त्याने नोकरीत परतल्यासारखे होते. मूळ उद्देश बाजूला राहतो - त्यावेळी मूळ व्यवसाय सांभाळून ही संधी पण घेण्याची तयारी असावी. तसे सहकारी पाहून ठेवावेत.
19 Dec 2014 - 11:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुमच्याकडे प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा अनुभव आहे, म्हणून थोडक्यात सांगायचे तर... "Hope for the best, but prepare for the worst."
इथे prepare for the worst म्हणजे तुमचा नविन उपक्रमाचे नियोजन (प्लॅनिंग) असे करा की... वर्स्ट केस सिनॅरिओ तुमच्यासाठी फार वाईट नसावा अथवा त्यावर मात करण्यासाठी तुमच्याकडे स्विकार्य पर्याय (प्लॅन बी) असावा.
व्यवसायाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलताना आर्थिक हालाखी येउ नये यासाठी नियोजन तर हवेच पण त्याबरोबर मानसिक ताण सोसण्याची तयारी हवीच (यात स्वतःला बदलामुळे वाटाणारी असुरक्षितता तर असतेच पण त्याबरोबर सहव्यवसायी आणि नातेवाईकांच्या विचित्र नजरा आणि शेरे सहन करण्याची तयारी असायला हवी).
नव्या व्यवसायाबद्दलचे तुमचे आकर्षण ताकदवान असेल, वस्तूस्थितीवर आधारलेले असेल, तुमचा आत्मविश्वास पक्का असेल, तुमचे बदल नियोजन शास्त्रिय असेल आणि यदाकदाचित तुमचा बेत फसला तर पर्यायी व्यवस्था (फॉल बॅक प्लॅन / प्लॅन बी) तयार असेल तर हा बदल तुम्ही कमीत कमी मानसिक ताण सहन करत करू शकाल.
महत्वाचे : व्यवसाय बदल करताना सर्वात महत्वाचा नियम म्हणजे पहिल्या व्यवसाय/नोकरीतील मैत्रीपूर्ण संबंध ठेउन बदलावा. याला व्यवस्थापन शास्त्रात "डू नॉट बर्न ब्रिजेस." असे म्हणतात... कारण, दुर्दैवाने तुमचे नविन बेत यशस्वी झाले नाही तर मूळ व्यवसाय्/नोकरीत (कायमचे/तात्पुरते) जाणे हा सर्वात सोपा प्लॅन बी असतो, आणि यात काहीच कमीपणा समजण्याचे कारण नाही. कारण... "बचेंगे तो और भी लढेंगे ।"
शक्य असेल तर आताची नोकरी सांभाळून नविन व्यवसायाचा अर्धवेळ अनुभव घ्या आणि खात्री झाल्यावर पूर्ण बदल अमलात आणा.
सर्वात महत्वाचे म्हणजे इतके सगळे नियोजन करूनही खर्या आयुष्यात एकदम अनाकलनिय व अनपेक्षित (unknown unknown) अडचणी येउ शकतात. त्यांच्याकरिता आर्थिक व मानसिक तयारी ठेवावीच लागेल... अश्या अडचणी वाटतात तितक्या दुर्मिळ नाहीत हे मी आतापर्यंत माझ्या व्यवसायात केलेल्या पाच मोठ्या बदलांच्या अनुभवांवरून खात्रीने सांगू शकतो.
तुमच्या भविष्यातल्या उपक्रमासाठी अनेक शुभेच्छा !
20 Dec 2014 - 1:14 pm | vikramaditya
20 Dec 2014 - 12:05 am | अत्रन्गि पाउस
म्हणजे वरील सर्व प्रतिक्रिया व पुढे येणाऱ्या सर्व प्रतिक्रिया नीट वाचतोय वाचणार आहे ...
प्रत्येक मुद्दा नोंदवून माझ्या प्लान मध्ये ते सामावून घेतोय ...
काहींना व्य णी करतोय ...
आणि आपले सगळ्यांचे मनापासून आभार ...
20 Dec 2014 - 12:41 am | मुक्त विहारि
पण व्यक्तीगत मते सांगतो...
१. तुमच्या जोडीदाराची संमती आणि संपूर्ण पाठिंबा असल्याशिवाय, कुठलेही नविन कार्य हाती घेवू नये.
२. व्यवसाय मग तो कुठलाही असो, ज्याला आपण सेवा देतोय तो समाधानी असलाच पाहिजे.अर्थात काही जणांना आपण पुर्ण समाधान देवू शकत नाही.अशांना विसरून जायचे.
माझी अर्धांगिनी जर्मन शिकवते.कुठल्याही प्रकारची जाहीरात न करता पण तिच्याकडे शिकायला कुणी ना कुणी येत असतेच.तोंडी जाहीरात जे काम करते ते छापील काम करत नाहीत.असा आमचा अनुभव आहे.
20 Dec 2014 - 1:16 am | आयुर्हित
दुरून डोंगर साजरे दिसते, पण प्रत्यक्षात कोठे खाच खळगे आहेत ते जवळ गेल्यावरच कळते. त्यामुळे आपण निवडलेल्या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घ्याव्यात मगच योग्य तो (well informed) निर्णय घ्यावा.
आरोग्याची साथ, किमान १५ महिने सर्व खर्चाची तरतूद व सक्षम आर्थिक नियोजन, मानसिक संतुलन ढासळू न देता खंबीरपणे लढा देण्याचा चिवटपणा अंगी असला तरच नोकरी सोडण्याचा विचार करा.
मला नेहमी आवडणारे एक वाक्य : I Don't Believe In Taking Right Decisions, I Take Decisions & Then Try 2 Make Them Right. Always Believe In Yourself: RATAN TATA
आर्थिक नियोजन/ज्योतिष/आरोग्य विषयक सल्ला हवा असल्यास व्यनी करावा.
20 Dec 2014 - 10:12 am | सतिश गावडे
हे तुमचे नेहमीचे झाले आहे आयुर्हित साहेब. याआधी इतरांनी लिहिले आहे. मी ही लिहितो. जे काय त्यांना व्यनित सांगणार आहात ते इथेच लिहा की. इतर वाचकांनाही त्याचा फायदा होईल.
20 Dec 2014 - 11:24 am | सस्नेह
पहिले सल्ल्याची फी विचारा ! उगा मिपाकरांना भुर्दंड नको ...
20 Dec 2014 - 12:27 pm | सतिश गावडे
हो ते ही आहेच. नाही तर त्यांच्या "health, wealth & happiness" विषयक सल्ल्याचा ते आपल्याकडे मोबदला मागतील.
22 Dec 2014 - 12:21 pm | आयुर्हित
व्य नि चे कारण....
जे सर्वांसमोर विचारता येत नाही,आणि सांगणाऱ्याला सर्वांसमोर सांगता येत नाही, तेच मी व्यनित विचारतो!
आणि जे सर्वांसमोर सांगायचे असते, ते आधीच सांगून झालेले असते!
24 Dec 2014 - 11:10 am | सतिश गावडे
खुलाशासाठी धन्यवाद.
24 Dec 2014 - 11:20 am | टवाळ कार्टा
आता परत विचारशील उगाच :P
20 Dec 2014 - 12:44 pm | स्पंदना
जे काही करताय ते शिस्तीत आणि विचारपूर्वक करा यशस्वी व्हालच!!
:)
०
20 Dec 2014 - 3:09 pm | अत्रन्गि पाउस
लक्षात आहे माझ्या :D
20 Dec 2014 - 3:14 pm | अनुप ढेरे
शुभेच्छा तुम्हाला!
21 Dec 2014 - 4:44 pm | अत्रन्गि पाउस
आज बोका इ आझम ह्यांना भेटून आलोय ... अजून काही व्य णी आलेत ...
अतिशय हुरूप आणि योग्य तो सावध पणा घेऊन चाललोय ...
22 Dec 2014 - 9:55 am | सुनील
सुमारे पनास विद्यार्थी असलेल्या वर्गास, C सारखी भाषा शिकवण्याचे काम मी (अनेक वर्षांपूर्वी) काही काळ केले होते.
सीप्झहून ऑफिस झाल्यावर दादरला क्लासमध्ये शिकवायचे आणि मग रात्री उशीराने घरी पोचायचे. दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा सीप्झ! पैसे फार मिळत होते असे नाही, पण मजा यायची.
पुढे प्रोजेक्टच्या कामातच गुरफटलो आणि वेळ मिळेनासा झाला तेव्हा शिकवणे सोडले. आज पुन्हा त्या गोष्टीचा विचार करताना असे वाटते की त्या दोन वर्षांत मी बरेच काही शिकलो -
स्टेज फिअर पूर्णपणे गेली, ज्याचा पुढील आयुष्यात खूप फायदा झाला.
नेहेमीच्या कामात सहसा न वापरले जाणारे ज्ञान, शिकवण्याच्या निमित्ताने घासून-पुसून लख्ख करता आले.
वेळ आल्यास, शिकवण्याचे एक पर्यायी करियर करता येईल, हा आत्मविश्वास आला.
तुम्हाला शुभेच्छा!
22 Dec 2014 - 11:33 am | टवाळ कार्टा
तुमी पन शी वाले...वा वा :)
22 Dec 2014 - 10:42 am | श्रीरंग_जोशी
अत्रन्गि पाउस साहेब माझ्या धाकट्या भावाची कहाणीपण तुमच्यासारखीच आहे.
सिओइपीमधून इंजिनिअर झाल्यावर त्याने एक वर्ष अॅक्सेंचरमध्ये नोकरी केली. त्या कामात मन रमले नाही अन शिकवण्याची खूप आवड असल्याने त्याने ती नोकरी सोडून आय टी ट्रेनरची नोकरी सुरू केली. गेल्या तीन वर्षांपासून तो त्याच्या विद्यार्थ्यांचा आवडता शिक्षक आहे.
तुम्हाला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा!!
22 Dec 2014 - 11:30 am | अत्रन्गि पाउस
विचार कणा कणाने अक्शन प्लान कडे सरकतोय...
22 Dec 2014 - 12:44 pm | उपास
मी पंधरा वर्षांचा अनुभव गाठीशी घेऊन आयटीच्या धंद्यात उतरलोय, ५-६ महिने झालेत पुण्यात कंपनी सुरु करुन खूप शिकतोय.. 'कामाचं समाधान' हे सगळ्यात महत्त्वाचं! मी जावा सोल्युशन आर्किटेक्ट असून जावा/ जावास्क्रिप्ट वेब आणि मोबाईल डेव्हलपमेंट मध्ये काम करतोय.. खूप विचारांती पण ठाम निर्णय घेऊन उडी घेतलेय, हौसले बुलंद आहेत!
वर म्हटल्याप्रमाणे अर्धांगिनीची तसेच घरातिल सगळ्यांची मानसिक साथ हवी, आर्थिक प्लानिंग करुन कव्हर युर बेसेस! मेडिकल/ हेल्थ/ लाइफ इन्शुरन्सेस पुरेश्या प्रमाणात घेऊन ठेवाच!
आता ट्रेनिंगच्या बाबतित - सौ. स्वतः जावा/ जावस्क्रिप्ट (अँग्य्लर जेएस/ नोड जे एस./ एक्स्प्रेस जे एस/ मोंगो) तसंच कोअर जावा / जावा वेब डेव्हलपमेंट असं ट्रेनि़ग घेतेय (पाषाण). मार्केटच्या अभ्यास करुन ज्याची मागणी आहे त्यात ट्रेनिंग सुरु करणे उत्तम आणि आवश्यक.. शेवटी आपण आयटी मध्ये ट्रेनिंग देउन मुलांना उत्तम संधी घेण्यासाठी तयार करतोय आणि दिशा देतोय हे लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचे! विद्यार्थी यशस्वी झाले तरच आपण यशस्वी..
22 Dec 2014 - 4:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
छान. हल्ली स्कॅला,क्लोजर वगैरे संगणकीयभाषांना बरीच मागणी असणार आहे असे वाचले होते.
24 Dec 2014 - 8:19 am | vikramaditya
माई तुम्ही मेन फ्रेम पासुन आता पर्यंतची सगळी वाटचाल पाहिली ना?
नाना पण बिचारा काय कोडींग करायचा नाही?
24 Dec 2014 - 8:50 am | टवाळ कार्टा
त्या "पंच कार्ड"च्या जमान्यातल्या वाटतात :)
24 Dec 2014 - 9:03 am | अत्रन्गि पाउस
तो पण एक प्रकार होता हां ....
कोडींग शीट वर प्रोग्राम लिहिणे ...बापरे *boredom*
22 Dec 2014 - 4:07 pm | पैसा
मनापासून शुभेच्छा!
22 Dec 2014 - 5:56 pm | अद्द्या
माझं सुद्धा सध्या हेच चालू आहे . .
आठवड्या चे सहा दिवस नोकरी . आणि रविवार CCNA चे क्लासेस .
मजा येते खूप शिकवायला . आणि रस्त्यावरून जाताना मधेच कोणी तरी वयस्कर गृहस्थ रस्त्यात थांबवून . "सर तुम्ही शिकवत होता माझ्या मुलाला . चांगली नोकरी लागली होत त्याला त्यामुळे . . " असं काही ऐकलं कि खूप छान वाटतं .
भरपूर शुभेच्छा तुम्हाला .
पण वर कोणी तरी म्हणल्या प्रमाणे Hope for the best and prepare for the worst.