हरीश्चंद्रगड हा ट्रेकर्स आणि नॉन-ट्रेकर्स दोन्हीकडे प्रसिद्ध असलेला किल्ला आहे. बहुतेकांना तो परिचित आहे ते निसर्गाचा अविष्कार असलेल्या रौद्रभीषण कोकणकड्यामुळे, त्याच्या लांबच लांब न संपणारया खिरेश्वर / टोलार खिंडीच्या वाटेमुळे, किंवा अतिप्राचीन आणि शिल्पकलेचा उत्तम नमुना असणाऱ्या तेथील शिवमंदिरा मुळे. ह्या किल्ल्याचा विस्तार बघता त्याला एक किल्ला न म्हणता अनेक डोंगरांचा समूह म्हणणे जास्त योग्य राहील. विस्तार आणि उंची दोन्ही बाबतीत हा किल्ला भव्य म्हणावा असाच आहे. दक्षिणेला तारामती हे सर्वोच्च शिखर, बालेकिल्ला, पश्चिमेला कोकणकडा, पूर्वेला टोलार खिंड, मुख्य गडा पासून जरासे बाजूला पडलेले रोहिदास शिखर असा साधारण ह्याचा विस्तार आहे. हा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगेत ऐन घाट माथ्यावर वसलेला आहे. सह्याद्रीची एक उपशाखा, हरिश्चंद्र-बालाघाट सुरु होते ती इथेच. सह्याद्रीच्या मुख्य रांगेत असल्याने निसर्गाचे मनमोहक आणि तितकेच रौद्र असे दर्शन येथे घडते. पावसाळ्या दरम्यान निसर्गाचा चमत्कार, इंद्रवज्र, देखील येथे पाहायला मिळते.
भव्य विस्तारामुळे गडावर येणाऱ्या वाटा देखील बऱ्याच आहेत. त्यातील माळशेज घाटाच्या सुरवातीला उतरून खुबी-खिरेश्वर-टोलार खिंडी मार्गे येणारी वाट आणि पलीकडून पाचनई वरून येणारी तुलनेने सोपी वाट ह्या दोन वाटा बहुतेकांना परिचित आहेत. ह्या सोडून खिरेश्वर वरूनच जुन्नर दरवाज्यातून येणारी फारशी प्रचलित नसलेली वाट आहे. नियमित ट्रेकर्सना मात्र अजून एका वाटेचे खास आकर्षण नेहमीच असते ती म्हणजे ‘नळीची वाट’. हे नाव ऐकताच ट्रेकर्स मंडळीना वेगळेच स्फुरण चढते. ही वाट कोकणातून, बेलपाड्यातून, सुमारे १००० मीटर्स चढून कोकणकड्या पाशी येते. नळी म्हणजे दोन डोंगरांच्या मध्ये असणारी अरुंद जागा. ह्या वाटेची वैशिष्ट्ये म्हणजे मोठ मोठ्या खडकातून असणारी, प्रस्ताराचे ३-४ टप्पे असणारी, सुमारे ६०-७० अंशातील खडी चढण. तसेच कोकणातून थेट गडावर चढत असल्याने चढायला लागणारी १००० मीटर्स ची सलग उंची. एवढी सलग उंची सह्याद्रीत क्वचितच कुठे चढायला मिळते. ह्या सर्व वैशिष्ट्यांमुळे ह्या वाटेचे ट्रेकर्सना आकर्षण वाटल्यास नवल नाही.
नळीच्या वाटेची सुरुवात
अशा ह्या आव्हानात्मक वाटेने गडावर पोहचायला क्षमते नुसार ५-६ ते अगदी ८-९ तास देखील लागू शकतात. मात्र ह्या वाटेने जाण्या साठी बरोबर माहितगार व्यक्ती आणि सुरक्षे साठी दोर असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तरारोहणाचा अगदी तांत्रिक नसला तरी प्राथमिक अनुभव असणे मात्र गरजेचे आहे. ह्या वाटेने जाताना कोकणकड्याचे भव्य रूप दिसते.
ह्या वैशिष्ट्यपूर्ण वाटेने हरिश्चंद्र गडावर जायचा योग अगदी अवचितपणे बराच लवकर आला. म्हणजे बरोबर ८ वर्षांपूर्वी आम्ही (तेव्हाच्या) सडाफटिंग मंडळींनी (मी, प्रशांत, ऋतुराज इ.) हरिश्चंद्रगडावर जायचा बेत आखला. नेहमीच्या वाटेने नको म्हणून जुन्नर दरवाजाने जाऊयात असे ठरले होते. पण अचानक कुठून तरी ‘नळीची वाट’ हा शब्द आला आणि ही वाट नक्की कशी आहे ह्याची काहीही माहिती नसताना बेत जुन्नर दरवाजावरून थेट नळीच्या वाटेवर आला. नळी च्या वाटेने आधी कोणी गेलेले नाही, वाटेच्या काठीन्य पातळीचा अंदाज नाही बरोबर पुरेशी सामुग्री नाही अशा परिस्थितीत काय काय होऊ शकते ते सर्व आम्ही अनुभवले. पुण्यातून निघाल्या पासूनच कोलमडलेले वेळापत्रक, बेलपाड्यात पोहचायलाच ३ वाजून गेले. तिथून भर उन्हात गच्च भरलेल्या पोटाने चढायला केलेली सुरवात, बरोबरच्या वाटाड्याला देखील नीट वाट माहित नाही (हे त्याने नंतर कबूल केले) ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही दमत, चुकत, धडपडत रात्री १२ च्या सुमारास कोकणकड्याच्या अलीकडच्या पठारावर पोहचलो होतो. तिथे उघड्यावर हाडे गोठवणाऱ्या थंडीत रात्र काढून दुसऱ्या दिवशी गड गाठला होता. असा हा अनुभव आमच्या सर्वांच्या चांगलाच स्मरणात राहिला आहे.
असे असले तरी नळीच्या वाटेने पुन्हा एकदा नीट तयारी करून जायचे आमच्या सर्वांच्याच मनात होते. पण तो योग यायला २०१४ उजाडावे लागले. तसा प्रशांत मागच्या वर्षी पासूनच सारखा नळीच्या वाटेचा विषय काढत होता. पण तो फायनल होता होता ह्या वर्षी चा सीझन आला.
कातळातून ६०-७० अंशाची चढण
प्रथेप्रमाणे बरोबर येणार्यांची संख्या ही निघायच्या दिवशी पर्यंत नक्की होत नव्हती. शुक्रवारी सगळ्यांनी ऑफिस मध्ये backpacks घेऊन यायचे आणि इथूनच निघायचे असे ठरले. पण शुक्रवारी ऑफिस मध्ये प्रशांतच दिसेना तेव्हा मला शंका आली. त्याला फोन केला तर बरे नाही म्हणून सुट्टी घेतली आहे असे म्हणाला. मी मनात म्हंटले गेला सगळा बेत गाळात! तितक्यात त्याने खुलासा केला की दोन दिवस सर्दीने त्रस्त होतो आणि आता बरे आहे पण नळीच्या वाटे साठी जरा विश्रांती मिळावी म्हणून आज आराम करतोय. हे ऐकून जरा जीवात जीव आला. मग लगेच बरोबर येणाऱ्या अंतिम सदस्यांच्या नावाची उजळणी केली आणि किती वाजता कुठून निघायचे हे नक्की केले. एकूण शिलेदारांची संख्या ७ झाली. बहुतेक सगळे अनुभवी होते.
Marathon पटू आणि गटनेता आदित्य, नुकताच मनाली-लेह सायकल वर करून आलेला श्रीनिधी, सह्यभ्रमंतीची पन्नाशी-शंभरी पार केलेले तरुण भिडू भूषण आणि केतन, तसेच थेट तंजावरच्या प्रांतातून आलेला जॉन, प्रशांत आणि मी असा पंचविशी ते पस्तीशी पर्यंत पसरलेला गट तयार झाला. गिरीभ्रमणाचा हा एक फायदा आहे तिथे मैत्री पटकन जुळते त्यात वय, व्यवसाय, प्रदेश, भाषा असे अडसर फारसे येत नाहीत. डोंगरयात्री ह्या धाग्याने सगळे जोडले जातात.
बरोबर ६:३० ला laptop hibernate वर टाकला आणि packup करून खाली उतरलो. शुक्रवारच्या संध्याकाळच्या भयानक traffic मधून वाट काढत बरोबर ७:३० ला गाडी प्रशांतच्या पार्किंग मध्ये लावली. प्रशांत खाली उतरतच होता. आदित्य यायच्या वाटेवर होता. श्रीनिधी इतर तिघांना घेऊन नाशिक फाट्याला थांबणार होता. प्रशांतने ओझे कमीत कमी करण्याच्या दृष्टीने कॅमेरा बरोबर न घेण्याचा निर्णय घेतला होता. कॅमेरया शिवाय प्रशांत म्हणजे bat शिवाय सचिन तेंडुलकर ! माझ्या सूचनेचा आदर करून प्रशांत परत कॅमेरा घ्यायला वर गेला. तितक्यात धडधडत (बुलेट!) आदित्य तेथे येऊन पोहचला.एव्हाना पावणेआठ वाजून गेले होते. नाशिक फाट्यावर मंडळी कधीच येऊन पोहोचली होती. लगेचच backpacks गाडीत टाकल्या आणि निघालो. नवीनच झालेल्या JRD TATA उड्डाणपुलामुळे ५-१० मिनिटातच नाशिक फाट्याला पोहचलो. तिथे मग दोन्ही गाड्यांतील सर्व सदस्यांची ओळख परेड झाली आणि दोन्ही गाड्या मार्गस्थ झाल्या.
निघे पर्यंत आठ वाजून गेले होते. आता वाटेत गाडया आणि उतारू आणि दोघांच्याही पोटात इंधन भरणे आवश्यक होते. अशात सर्वानुमते उतारूंच्या उदरभरणाला प्राधान्य देण्यात आले. तिथून पुढे मग गाड्यांच्या पोटात पण इंधन टाकून पुढे निघालो. रात्रीची वेळ लक्षात घेऊन जुन्नर वरून न जाता सरळ आळेफाट्या वरून जायचे ठरले. आळेफाट्याला चहा मारला आणि गाड्या ओतूरच्या रस्त्याला लागल्या. हवेत गारवा फारसा जाणवत नव्हता. रात्रीच्या वेळे मुळे वाहनांची गर्दी पण माफकच होती. माळशेजच्या अलीकडे पोलिसांची वाहन तपासणी सुरु होती. सुदैवाने त्यांना आम्ही सज्जन असून कुठलेही इतर धंदे करायला निघालेलो नाही हे पटवून द्यायची गरज पडली नाही. मस्त पसरलेल्या चंद्रप्रकाशात दोन्ही गाड्या माळशेज घाट उतरू लागल्या. खुबी मागे पडले तसे उजवीकडे हरिश्चंद्राचा विस्तार जाणवू लागला. पटकन सावर्णे पण मागे पडले. इथून खरे तर नळीच्या वाटेच्या ट्रेक ची सुरुवात होते. इथे गाड्या लावून एक छोटासा डोंगर ओलांडून १.५-२ तासात बेलपाड्यात पोहचता येते. पण पुढून मोरोशी वरून गाडीवाट थेट बेलपाड्यात जात असल्याने आम्ही तो मार्ग निवडला. मोरोशी च्या अलीकडे पुन्हा पोलीस भेटले. इथेहि त्यांनी फार चौकशी न करता उलट आम्हाला बेलपाड्याचा रस्ता समजावून दिला. मोरोशी फाट्यावर गाड्या वळविल्या. पुढे एका छोट्या पुलावर गाड्या थांबवून बंद केल्या आणि नीरव शांततेत धवल चंद्रप्रकाश अनुभवला. इथून पुढे फार तर अर्धा तास लागणार होता. त्यामुळे मग तिथे काही वेळ आकाशदर्शन केले. मग ज्याने त्याने आपापल्या खगोलशास्त्राच्या माहितीची पोतडी उघडली. मी पण मग आनंद कडून घेतलेल्या जुजबी माहितीच्या जोरावर Orion, Canis Major, Big Dipper अशी नक्षत्रांची विंग्रजी नावे टाकून आपणही मागे नाही हे दाखवून द्यायचा प्रयत्न केला. अर्थात त्रिपुरी पौर्णिमा नुकतीच होऊन गेली असल्यामुळे तारका फारशा स्पष्ट दिसत नव्हत्या हा भाग वेगळा!
बेलपाड्यात पोहचे पर्यंत एक वाजून गेला होता. खरे तर ह्या गावाचे नाव वालीवरे आहे पण समस्त ट्रेकर्स मंडळीमध्ये बेलपाडाच प्रचलित आहे. एक वाजून गेला असला तरी गावात जाग होती. त्यावरून इतर ग्रुप्स आपल्या आधीच येथे मुक्कामी येऊन राहिले असावेत असा अंदाज आला. मग गावातल्या मारुतीच्या देवळाच्या बाजूला एक प्रशस्त सभागृह दिसले. तिथेच मुक्काम टाकायचा ठरले. सर्वजण झोपायच्या तयारीला लागले. तेवढ्यात प्रशांत गावांत जाऊन दुसरया दिवशीच्या चहा-नाष्ट्याची सोय करून आला. इतर दोन ग्रुप्स आल्याच्या अंदाजावर त्याने शिक्कामोर्तब केले. आल्या आल्या त्याने इतर ग्रुप्स निघायच्या आत निघता यावे ह्या उद्दात हेतूने सकळी ४:३० ला उठायचे फर्मान काढले. सर्वजण झोपायच्या तयारीत होते त्यामुळे त्याचे बोलणे कुणी फारसे मनावर घेतले नसावे. त्यातून गटातील ५०% लोक तरी पट्टीचे घोरणारे असल्याने मुळात झोप लागेल की नाही हीच शंका होती. पण सुदैवाने कुणाचीहि पट्टी लागायच्या आतच झोप लागली.
बरोबर ४:३० ला गजर (आधी घड्याळाचा आणि मग प्रशांतचा) ठणाणला. ‘आत्ताच तर पहिला गजर झालाय झोपू अजून ५ मिनिटे’ ह्या विचारला प्रशांत ने लगेचच सुरुंग लावला. सगळ्यांना वेळेत (खरे तर वेळेच्या आधी) नळीच्या वाटेवर लावयचा त्याने चंगच बांधला होता. आता उठावेच लागणार होते. एक एक करत सगळे जागे झाले आणि वळकट्या (स्लीपिंग bags) आवरायला लागले. श्रीनिधी मात्र काही उठायचे नाव घेईना. म्हणजे तसा तो जागा होता पण त्याने रात्री उठायची वेळ (सोयीप्रमाणे) ४:३० च्या ऐवजी ५:३० अशी ऐकली होती त्यामुळे तो निषेधाच्या पवित्र्यात होता. पण प्रशांतच्या ठोस भूमिके पुढे त्याला नमते घ्यावेच लागले. प्रत्येकाने मग निघायच्या तयारीने backpacks आवरून पाठीवर लोड केल्या. प्रशांत ने अखेर कॅमेरा बरोबर न घेण्याचा निर्णय घेतला. तिथून श्री. कमळूमामा ह्यांच्या अंगणात सगळे जमले. आधीच्या ग्रुप पैकी एका ग्रुप चे हि जवळपास आवरून झाले होते. तिथे मग पहाटे ५:३० ला पोह्याने होणारी acidity ह्यावर चर्चा करत एक-एक plate पोहे आणि चहा रिचवला. आमचे पोहे खाऊन होई पर्यंत मुंबईहून आलेल्या ९ जणांच्या ग्रुपला घेऊन कमळूमामा मार्गस्थ झाले. ते पाहून आम्हीही पटापट आवरून निघालो. कमळू मामांनी त्यांच्या पुतण्याला आम्हाला नळी च्या तोंडापर्यंत वाट दाखविण्या साठी सांगून ठेवले होते. त्याला सोबतीला घेतले आणि झपाझप पावले टाकत नळीच्या वाटेकडे निघालो.
सूर्योदय उशिरा असल्याने बाहेर अजूनही अंधार होता. त्यातून बेलपाडा कोकणकड्याच्या अगदी कुशीत असल्याने येथे सूर्यकिरणे उशिरानेच पोहचतात. ह्याचाच फायदा घेऊन सूर्य वर यायच्या आत शक्य तेवढे अंतर कापायचे होते. अंधारातही कोकणकड्याच्या भव्यतेचा अंदाज येत होता. माथ्यापासून सरळ ४०० मीटर्स तुटलेला अर्धवर्तुळाकार असा हा कडा आहे. खालून पाहिल्यास दोन्ही हात पसरून आपल्याला कवेत बोलावत असल्या प्रमाणे भासतो.
कोकणकडा !
थोड्याच वेळात ओढ्याच्या सुरवातीलाच पुढे गेलेला गट भेटला. तिथून थोडे पुढे गेल्यावर मग कमळू मामांच्या पुतण्याला परत पाठवून दिले आणि कमळूमामांना पुढे ठेवून मार्गक्रमण सुरु केले. पहाटेची वेळ, हवेतला गारवा ह्यामुळे पावले झपाझप पडत होती. मध्ये एका ठिकाणी अजून पाणी वाहत होते. इथून पुढे पाणी नसल्याने इथे पाणी पिऊन घेतले. प्रशांतने तेवढ्यात तहाने बरोबरच tiger pose मध्ये पाणी प्यायची हौस भागवून घेतली!
इथून मागे पहिले तर सूर्याची कोवळी किरणे दूरवर शेतांवर पडलेली दिसत होती. नळी मध्ये मात्र पूर्ण सावली होती. आल्हाददायक वातावरणामुळे आणि मुख्यत्वे ऊन लागत नसल्याने फारसे न थांबता मार्गक्रमण सुरु होते.
पुढे काहीच वेळात नळीच्या तोंडा पर्यंत येऊन पोहचलो. नळीची ओळख पटली असली तरी मागील वेळे सारखा घोळ नको म्हणून कमळूमामा मागून येत होते त्यांच्यासाठी थांबलो. त्यांनी येऊन हीच नळीची सुरुवात असल्याची खात्री दिल्या नंतर उठून नळीतून वरती चढायला सुरुवात केली. मोठ -मोठ्या खडकांवरून कमीत कमी efforts ची वाट शोधत वर चढायला मजा येत होती. थोड्याच वेळात पहिला तुलनेने सोपा प्रस्ताराचा टप्पा लागला. तिथे उजव्या बाजूने मार्ग काढत प्रशांत वर सरकला. त्याच्या मागोमाग एक एक करत सगळे जण वर आले. इथून पुढे असे छोटे मोठे प्रस्ताराचे टप्पे पार करत जायचे असल्याने सगळे जण फार अंतर न ठेवता बरोबरच निघालो.
वाटेत असे अनेक छोटे-मोठे प्रस्ताराचे टप्पे लागतात - फोटो सौजन्य - जॉन
काहीच वेळात पहिला मोठा प्रस्ताराचा टप्पा लागला. साधारण २० फूटाचा हा टप्पा आहे. मागल्या खेपेस इथे येई पर्यंत पूर्ण अंधार झाला होता आणि अंधारात तोंडात torch घेऊन चढताना प्रशांतचा torch खाली पडला होता त्याची आठवण झाली. आम्ही खडकांमधील खोबणी शोधे पर्यंत कमळू मामा सरसर चढून वर गेले आणि सुरक्षे साठी दोर बांधायच्या कामाला लागले. तोपर्यंत natural holds चा वापर करून प्रशांत वर गेला. तोपर्यंत मामांनी सुरक्षे साठी दोर बांधून तो खाली सोडला होता. पण शक्य तेवढे नैसर्गिक आधाराने वर जावे असा विचार करून मी चढायला सुरुवात केली. अगदी वरच्या टप्प्यात पोहचल्यावर पाठीवरच्या backpack मुळे जरा त्रिशंकू अवस्थेत अडकल्या सारखी स्थिती झाली तेव्हा मग शहाणपणाने दोराचा आधार घेऊन वर आलो. पाठोपाठ एक एक करत दोन्ही गटातील भिडू वर आले. प्रशांतकडे कॅमेरा नसल्याने त्याने शक्य तिथे mobile शूट करून आमच्या ट्रेक चा video blog तयार करण्याचे ठरवले होते. त्याप्रमणे तो वर येणाऱ्या लोकांचे शूट घेत होता. नळीत आधीच चिंचोळी जागा असल्याने गर्दी होऊ नये म्हणून एक एक करून पुढे सरकू लागलो (क्रमश:)
पहिला मोठा प्रस्तराचा टप्पा - फोटो सौजन्य - जॉन
प्रतिक्रिया
25 Nov 2014 - 8:04 pm | गणेशा
जबरदस्त फोटो .. वाचननखुन साठ्वली आहे, निवांत उद्या वाचतो नंतर
25 Nov 2014 - 8:21 pm | अत्रुप्त आत्मा
शेवटचे वर्णन उत्कंठावर्धक!
पुभाप्र!
25 Nov 2014 - 10:00 pm | विशालभारति
सह्याद्रिचे हे रौद्र रुप उरात धडकी भरवते.
25 Nov 2014 - 11:04 pm | प्रचेतस
अफाट आहे ही वाट.
पुढचा भाग लवकर येऊ द्यात.
26 Nov 2014 - 1:30 am | बॅटमॅन
अफाट!!!!! सुरसुरी येऊ लागली आहे आता.
26 Nov 2014 - 2:03 am | कंजूस
उत्सुकता वाढतेय. गाड्या घेण्यासाठी परत नळीनेच खाली येणार का? एकट्याने जाता येईल का? बाकीच्या दोन एकट्याने केल्यात. गाईड सध्या किती घेतात(कंजूस प्रश्न)?
26 Nov 2014 - 11:10 am | सह्यमित्र
गाईड आजकाल थोडे जास्त पैसे घेऊ लागले आहेत. नळीच्या वाटेने वर नेणे आणि परत खाली आणणे ह्याचे साधारण १५०० रुपये घेतात. उतरताना नळीची वाट नाहीये कोणती आहे ते पुढल्या भागात :-)
26 Nov 2014 - 11:11 am | सह्यमित्र
एकट्याने जाणे सुरक्षेच्या आणि खर्चाच्या दोन्ही दृष्टीने तितकेसे योग्य नाही.
26 Nov 2014 - 4:27 am | चाणक्य
वाचतोय
26 Nov 2014 - 5:18 am | खटपट्या
झकास !!
26 Nov 2014 - 7:11 am | मुक्त विहारि
बाकी, गणेशा ह्यांना फोटो दिसल्यामुळे, आम्हाला पण फोटो दिसले, हे सांगायला नकोच....
पुभाप्र.
26 Nov 2014 - 8:47 am | प्रमोद देर्देकर
आवडलं. शेवटचे दोन फोटो थरारक.
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.
26 Nov 2014 - 8:55 am | जयंत कुलकर्णी
मस्त फोटो.......व ट्रेक......छानच !
मस्त फोटो.......व ट्रेक......छानच !
मस्त फोटो.......व ट्रेक......छानच !
26 Nov 2014 - 9:53 am | नाखु
बिना दोराची वाट आहे का? का हीच अधिकृत वाट आहे नळीची?
26 Nov 2014 - 11:14 am | सह्यमित्र
२ मुख्य टप्पे आहेत जिथे दोर वापरणे हितावह आहे. बाकी टप्पे दोराशिवाय चढता येतत. पण प्रस्तरारोहणाचा चांगला अनुभव असल्यास दोर न वापरता हे २ ही टप्पे पार करता येतील आमच्यातल्या २ जणांनी केले तसे. अर्थात अवजड bags वर ओढून घ्यायला मात्र दोर लागतोच
26 Nov 2014 - 10:57 am | फोटोग्राफर243
झकास, पुढचा भाग लवकर येऊ द्या
26 Nov 2014 - 11:16 am | वेल्लाभट
काय बोलायचं?
केवळ कमाल..... केवळ कहर....
पुढच्या भागाची वाट बघतोय... येउद्यात
काय फोटो आहेत राव!... श्या ! (चांगल्या अर्थी)
26 Nov 2014 - 12:27 pm | कंजूस
एकंदर धोका आणि काम पाहता वाटाड्याने दोन दिवसांचे मागितलेले पंधराशे रुपये योग्य वाटताहेत हरिश्र्चंद्र गड मला फारच आवडला होता. खासकरून कोकणकड्यापेक्षा हरि॰-तारामती शिखरांवरून दिसणारा माळशेज घाट. शिवाय निरशा दुधाचा चहा.
पुढचे वर्णन येऊ द्या सावकाश.
26 Nov 2014 - 1:46 pm | कपिलमुनी
भटकंती आवडली .
पुन्हा एकदा हरिश्र्चंद्रगड करायला हवा असे वाटू लागले आहे .
एक कट्टाच करू या तिथ
27 Nov 2014 - 6:15 am | मुक्त विहारि
जरूर...
बिलकूल....
बेलाशक...
हमखास आणि नक्कीच...
26 Nov 2014 - 8:34 pm | मितान
फोटो आणि लेखन दोन्ही आवडले.
फोटो अजून द्या.. अजून लिहा... :)
27 Nov 2014 - 5:07 pm | जय२७८१
मी हि छोटे मोठे ट्रेक, बाईक टुर करतो .......नळीच्या वाटे विषयी मी हि खूप ऐकले होते.मात्र वर्णन वाचून एक कळाले
'ये अपने बस कि बात नही'
तुमचे वर्णन,फोटो खूप छान....! पुढील भागाची वाट पहातो.
29 Nov 2014 - 6:45 pm | आनंदराव
अपने भी बस की बात नहि.
आपण आपले बाईक आणि कार मधून फिरायचे. :)
1 Dec 2014 - 11:55 pm | पैसा
अप्रतिम लिखाण आणि तितकेच सुंदर फोटो!
3 Dec 2014 - 7:10 pm | राजेंद्र मेहेंदळे
वाचुन मजा आली...आम्ही आपले खुबी खिरेश्वर मार्गे टोलार खिंडीतुन गेलो होतो...एकदा नळीची वाट बघितली पाहीजे
7 Dec 2014 - 7:15 pm | मनिमौ
मजा आ गया.
12 Dec 2014 - 10:50 am | स्वीत स्वाति
लेख आणि फोटो दोन्हिही छान ..