कंजूस काकांनी लिहिलेल्या येऊर भटकंती-संजय गांधी उद्यानह्या धाग्यामुळे एप्रिल मध्ये केलेल्या आंबा घाटाच्या भ्रमंतीची आठवण आली.
पुण्यावरून दुपारी मी व माझा एक मित्र असे दोघेच निघालो ते संध्याकाळी ६ च्या सुमारास आंबा गावात पोहोचलो. कराड - कोकरूड - मलकापूर - आंबा असा हा प्रवासाचा टप्पा. आंबा हे घाटमाथ्यावरचे गाव तर साखरपा हे पायथ्याला, अर्थात कोकणात. आंबा गावात राहण्याच्या सोयी बर्याच आहेत त्यापैकीच एका ठिकाणाची निवड करून तिथे मुक्काम टाकला. ते होते गुप्ते यांचे हॉर्नबिल जंगल रिसोर्ट.
दुसर्या दिवशी लवकरच उठून त्यांचा एक उत्तम माहितगार वाटाड्या घेऊन सड्यावरच्या भ्रमंतीसाठी निघालो. सडा म्हणजे ज्वालामुखीजन्य दगडांपासून बनलेले खडकाळ पठार. गाडी घेऊन विशाळगडाच्या फाट्यावर वळलो. आंबा गावातून विशाळगड साधारण ३० किमी तर पावनखिंड २५ किमी. तर सड्याचा डोंगराचा फाटा १३/१५ किमी. हा सड्याचा डोंगर तिथल्या परिसरातला सर्वोच्च पॉइन्ट. आंबा गाव सोडताच २/३ किमीवरच जंगलाचा भाग चालू होतो. सह्याद्रीतील सदाहरित पट्ट्याचा हा भाग नेहमीच गर्द आणि घनदाट वनराईने नटलेला. थोडं पुढं जाऊन गाडी रस्त्याच्या लावली. इथून एक पायवाट सड्याच्या डोंगरावर जाते. ह्या पायवाटेवरून ६/७ किमी चालले की आलाच सड्याच्या डोंगराचा माथा.
महाराष्ट्रातलं एक सर्वोत्तम जंगल इथल्या भागात आहे. चांदोली विभाग. इतकं घनदाट जंगल तर जावळीच्या खोर्यातही मी पाहिलेलं नाही.
रस्त्यानजीकच गाडी लावून जंगलात घुसलो. सुरुवातीला रूंद असलेली पायवाट थोड्याच वेळात अरुंद होत जाऊन चढणीला लागते.
पायवाट सुरु होताना
गच्च रानाची सुरुवात
हळूहळू रान अधिकाधिक घनदाट होत गेलं. पाऊलवाटा बुजायला लागल्या. इथे पायवाटांवर सर्वच ठिकाणी पानांचा प्रचंड सडा पसरलेला आहे त्यामुळे वाट अजिबात ध्यानात येत नाही. अर्थात काही काही ठिकाणी दिशादर्शनासाठी झुडपांना लाल रंगातल्या रिबीनी बांधलेल्या आहेत पण तरीही येथे माहितगाराशिवाय कदापिही जाऊ नये.
आता वाट चढाला लागली होती. हुप्प्यांचे किच किच आवाज येत होते, बुलबुलांची किलबिल तर सदैव चालू होती. मधूनच एखादा तांबट किटिर्र..कुर्र अशी साद घालत होता. अचानक डोक्यावरील झाडीतून एक तुरेवाला सर्पगरुड उडत गेला. निसर्गाची किमया बघत बघत एका पाणवठ्यावर पोहोचलो. खडकाच्या कपारीतून स्त्रवणारा एक लहानसा जीवंत झरा. शेजारच्या माती दगडांवर इथे असंख्य प्राणी, पक्षी येऊन गेल्याच्या खुणा. थोडेसे पाणी पिऊन पुढच्या वाटेला लागलो.
घनदाट अरण्य
आता पदराची वाट संपून छातीवरील वाट सुरु झाली होती.
मध्येच एका ठिकाणी बिबट्याची विष्ठा दिसली. काळसर आणि केस अडकलेली. त्यामुळे ही बिबट्याची हे सहजच ओळखू येते. इथल्या रानात पूर्वी पट्टेदार वाघ खूप होते पण आता केवळ बिबटेच. जवळपास दीड तासाने जंगलातून बाहेर आलो. आता इथे खडकांचे लहानमोठे गोटे लहानशा पठारावर पसरलेले दिसायला लागले. एव्हाना आम्ही बर्याच उंचीवर आलो होतो. सड्याची सुरुवात झाली. अचानक डाव्या बाजूला एक उग्र कुबट असा वास पसरला. ह्याच वासाचा अनुभव मी राजमाचीलाही एका भल्या सकाळी घेतलेला होता. हा वास होता बिबट्याचा. वासावरून हा प्राणी सहज ओळखता येतो. जंगलात बिबट्या आमचा पाठलाग करत होता. हा प्राणी लाजाळू. तुमच्या अगदी जवळ असूनही तुम्हाला कधीच दिसणार नाही. सहसा हल्ला करणार नाही. शिवाय आम्ही तिघे असल्याने तो हल्ला करेल अशी दुरुनही शक्यता नव्हती. थोड्याच वेळात हा वास नाहीसा झाला. वाट परत एका लहानशा जंगलपट्ट्यात घुसली आणि पाचेक मिनिटात बाहेर आली ती एका विस्तीर्ण सड्यावर.
सड्याची सुरुवात
सडा
सडा
सड्यावरून चालत जात जात कड्याच्या टोकाशी गेलो. तिथेच सड्याचे दगड बुरुजांसारखे रचून उंचवटा तयार केला आहे आणि त्यावर भगवा ध्वज रोवलेला आहे. संपूर्ण सड्यावर गव्यांची विष्ठा अतिशय प्रचंड प्रमाणावर पसरलेली आहे. शिवाय त्यांचे खुरांचे ठसे सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. इथल्या जंगलात गवे भरपूर. रात्री शिरलात तर अगदी सहज दिसावेत. इथल्या सड्यावर रात्री ते मुक्कामासाठी येत असणार. जागा सुरक्षित.
सड्यावरील बुरुजांचे बांधकाम.
सड्याच्या टोकाला तुटलेला कातळ आहे. डेड एन्ड. इथून विशाळगड आणि तिथे जाणारा रस्ता दिसतो. आम्ही जिथून आलो ती जागाही येथून दिसते.
आमची गाडी उभी आहे ती जागा. झूम इन.
इथल्याच उजवीकडच्या पायवाटेने दाट जंगलात घुसलो होतो.
सड्याच्या टोकावरचे विभाजीत झालेले कातळ
सड्यावरून दिसणार्या सह्याद्रीच्या रांगा
सह्याद्रीच्या रांगा
विशाळगड
विशाळगडावरील मलिक रेहानचा दर्गा
अंजनाची फळे
फुलपाखराचे विभ्रम
सड्यावर आधी चोहोंकडचा निसर्ग बघून अर्धा तास एका जागी शांत पणे बसून राहिलो. आता येथून परतायची वेळ झाली होती. निघालो. आलो त्याच आणि एकमेव वाटेने छातीवरील चढण उतरून पदरातल्या दाट झाडीत शिरलो व तासाभरात रस्त्यावर आलो. जिथे गाडी होती तिथे. आता संध्याकाळी जायचे होते ते पावनखिंडीत.
प्रतिक्रिया
23 Nov 2014 - 10:18 am | यशोधरा
मस्त! :) थोडे अजून लिहायचेस की. अंजनाच्या फळा,चा फोटो भारी आलाय. बाकीचेही छान.
23 Nov 2014 - 10:20 am | एस
अप्रतीम!
प्रचीतगडावरून नंतर रुंदीव व पांढरपाणी या पूर्वीच्या वस्त्यांकडे येताना असाच भला थोरला सडा लागतो. माहितगाराशिवाय गेल्यास हमखास वाट चुकणार!
आता त्या भागात जाऊ देत नाहीत कारण चांदोली अभयारण्याचा तो कोअर भाग आहे. आणि काही प्रमाणात पट्टेरी वाघांचे अस्तित्त्वही नक्कीच आहे.
बिबट्यांबद्दलची तुमची माहिती बरोबर आहे. लेख वाचून पुनःप्रत्ययाचा अनुभव आला! फोटोही मस्त... :-)
हे जपलं गेलं पाहिजे... :-|
23 Nov 2014 - 11:27 am | कुहू
क्रमशः असेल अशी अपेक्शा
23 Nov 2014 - 11:35 am | संजय क्षीरसागर
हा खरा संकेतस्थळाचा उपयोग! मस्त!!
23 Nov 2014 - 12:02 pm | बहुगुणी
अप्रतिम वर्णन आणि प्रकाशचित्रं
हा खरा संकेतस्थळाचा उपयोग!
पूर्ण सहमति!23 Nov 2014 - 11:35 am | कंजूस
एप्रिलपासून एवढा चांगला लेख आणि फोटो कशाला दडपलेत हो ? असो .फोटोंमुळे फारच मजा आली इकडून ठाणे -मुंबई हून हा भाग फारच दूर पडतो त्यामुळे वाचनाचाच पर्याय उरतो.
खेड चिपळूणकडून नागेश्वर केलं आहे. त्यामुळे कोयनापरिसराच्या अरण्याची कल्पना आहे याबद्दलचा लेख अगोदर इतरत्र लिहिल्यामुळे इथे दिला नाही.
बिबळ्या मानेवर मागून हल्ला करतो म्हणून मी खांद्यावर छत्री धरतो. शिवाय माकडेही टरकून राहतात. काठी पाहिल्यास मात्र फार उचकतात. छत्री बहुगुणी आहे.
23 Nov 2014 - 1:51 pm | प्रचेतस
तसे बरेच लेख अजून लिहिलेले नाहीत अजून. आज तुमचा येऊर भटकंती लेख पाहून लिहावेसे वाटले.
खेड चिपळून कडून म्हणजे चोरवण्याच्या वाटेने नागेश्वर केलेलं दिसतंय. लेख इकडे पण येऊ द्यात. आंबा घाटाचं अरण्य कोयनानगर परिसरात न मोडता चांदोली विभागात मोडतं. खरोखरच अस्पर्श अरण्य.
23 Nov 2014 - 11:14 pm | सुहास झेले
तसे बरेच लेख अजून लिहिलेले नाहीत अजून..... आता मनावर घ्या साहेब लिहायचे. आमच्या भटकंतीला ब्रेक लागला, किमान तुम्ही तरी मनोसोक्त फिरा आणि आम्हाला सफर घडवून आणा हि बिनंती :)
23 Nov 2014 - 11:37 am | किसन शिंदे
मस्तच! पावनखिंडीत गेला होतास तर त्याचंही लिहायचं ना
23 Nov 2014 - 11:38 am | खटपट्या
जंगलाचे फोटो जबरद्स्त आलेत.
23 Nov 2014 - 11:47 am | डॉ सुहास म्हात्रे
मस्त भटकंती, लेख आणि निसर्गसौंदर्याने भरलेले फोटो !
पावनखिंडीवरचा लेख येउंद्या लवकर.
23 Nov 2014 - 12:04 pm | अजया
सुंदर फोटो,मस्त भटकंती.अंजनाची फळं अप्रतिम.गाडीचा वरुन काढलेला फोटो, अॅमेझाॅन रेन फाॅरेस्टचे फोटो येतात तसं दिसतंय,घनदाट जंगल!
23 Nov 2014 - 12:49 pm | दिपक.कुवेत
असेच म्हणतो.
23 Nov 2014 - 12:56 pm | प्रभाकर पेठकर
ते होते गुप्ते यांचे हॉर्नबिल जंगल रिसोर्ट.
आंबा गावात 'पावनखिंड' नांवाने एक, श्री. प्रकाश आणि माधुरी शिरगावकर ह्यांचे, रिसॉर्ट आहे, तेही चांगले आहे.
सडा म्हणजे ज्वालामुखीजन्य दगडांपासून बनलेले खडकाळ पठार.
नव्यानेच माहिती मिळाली. ह्या ज्वालामुखीच्या दगडांचा सर्वत्र 'सडा' पडलेला असल्याने ह्या पठाराला 'सडा' असे नांव पडले असेल का?
आता पदराची वाट संपून छातीवरील वाट सुरु झाली होती.
हे शब्दप्रयोग नवीन आहेत. जरा नीट विस्कटून नाही सांगितले तर मनांत नाही नाही ते विचार येताहेत.
थोड्याच वेळात हा वास नाहीसा झाला.
कदाचित बिबट्याच्या शंकेने तुम्हा तिघांपैकी कोणाला जास्त भिती वाटली असेल आणि तो वास असह्य होऊन बिबट्या माघारी वळला असेल. असे तर नाही?? *lol* . *lol*
अंजनाची फळे
मला तरी ही फळे पहिल्यांदाच दिसत आहेत. कशी असतात? खातात का? वगैरे माहिती दिली तर ज्ञानात भर पडेल.
एकूणात लेख, वर्णन आणि छायाचित्र अप्रतिम आहेत. रुंद वाट, अरुंद वाट, घनदाट अरण्य आणि निबिड अरण्य असे वर्णन वाचताना प्रत्यक्ष अनुभव घेतल्याचा भास होतो.
पावनखिंडीवरही असेच रसभरीत वर्णन आणि मुबलक छायाचित्र येऊ द्यात. वाट पाहतो आहे.
23 Nov 2014 - 1:12 pm | दिपक.कुवेत
गोड दिसतात ती सगळीच फळे आपण खातो का?? अहो काहि नुसती डोळ्यांनी अनुभवायची असतात... :D
23 Nov 2014 - 2:05 pm | प्रचेतस
हो. अगदी तसेच. हे जांभ्याचे सच्छिद्र दगड. कोकणात डोंगरपठारांवर तर सर्रास लहानमोठे सडे आढळतात. सह्यादीत घाटमाथ्यावर वारणा-आंबोली आणि चांदोली विभागात मोठे सडे आहेत.
सह्याद्री ज्वालामुखीजन्य असल्याने छाती, पदर ही त्याची खास वैशिष्ट्ये आहेत. डेक्कन ट्रॅप- उतरत्या पायर्यासारखी अशी ही रचना.
सर्वप्रथम येतो तो डोंगराचा माथा. कधी कधी त्यावर डाइक किंवा वॉल्केनिक प्लग ह्या रचनांमुळे तयार झालेली शेंडी आढळते. मग येतो तो काहीसा सपाट असा डोंगरमाथा. त्याखाली तीव्र उताराचा गळा. ह्या पट्ट्यात एक लहानसा दाट झाडीचा टप्पा असतो. मग त्याखाली येते ती छाती. जवळपाश नव्वद अंशातला हा उभा कातळ. छातीखाली येते ती पदराची वाट. ही वाट पायथ्यापर्यंत जाते. मंद उतार आणि घनदाट झाडी हे याचे वैशिष्ट्य. सह्याद्रीतील अरण्यातील विविध पशू पक्षी, चित्रविचित्र झाडे, फुले ही ह्याच पदरातील भागात आढळतात.
सह्याद्रीतील पर्वतांची शेंडी, माथा, छाती, पदर आदी वैशिष्ट्ये दाखवणारी रतनगडाची ही संरचना
बाकी बिबट्याची भिती अशी कुणालाच वाटली नाही. एकतर तिघे जण होतो आणि त्यातला एक स्थानिक माहितगार असल्याने निर्धास्त होतो.
अंजनाची फळे म्हणाजे अंजन वृक्षाची फळे. सह्याद्री घाटमाथ्यावरील पर्वतात अंजन, साग, हिरडा, अर्जुनसादडा हे वृक्ष सर्रास आढळतात. आता ही फळे का फुले याबाबत माझा अजूनही गोंधळ आहे.
ही अंजनाची फुले
23 Nov 2014 - 2:52 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद वल्ली.
ज्या पद्धतीने तुम्ही आयुष्य उपभोगता आहात ते पाहता 'वल्ली' हे नामाभिमान अगदी चपखल आहे.
23 Nov 2014 - 8:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
ज्या पद्धतीने तुम्ही आयुष्य उपभोगता आहात ते पाहता 'वल्ली' हे नामाभिमान अगदी चपखल आहे.
अगदी हेच !23 Nov 2014 - 11:32 pm | अत्रुप्त आत्मा
+++१११ म्हणूनच तर आंम्ही हे नाव बदलू नका ..असे मागे म्हणालो होतो.
बाकि लेख ...आंम्ही काय बोलावे?
24 Nov 2014 - 12:57 am | बहुगुणी
सह्याद्री ज्वालामुखीजन्य असल्याने छाती, पदर ही त्याची खास वैशिष्ट्ये आहेत. डेक्कन ट्रॅप- उतरत्या पायर्यासारखी अशी ही रचना.
सर्वप्रथम येतो तो डोंगराचा माथा. कधी कधी त्यावर डाइक किंवा वॉल्केनिक प्लग ह्या रचनांमुळे तयार झालेली शेंडी आढळते. मग येतो तो काहीसा सपाट असा डोंगरमाथा. त्याखाली तीव्र उताराचा गळा. ह्या पट्ट्यात एक लहानसा दाट झाडीचा टप्पा असतो. मग त्याखाली येते ती छाती. जवळपाश नव्वद अंशातला हा उभा कातळ. छातीखाली येते ती पदराची वाट. ही वाट पायथ्यापर्यंत जाते.
हे असं वर्णन म्हणजे अप्रतिम निसर्ग-काव्य आहे!
24 Nov 2014 - 10:52 am | प्रमोद देर्देकर
@ पेठकर काका : होय ती फळे खातात खुप छान लागतात.
वल्लीशेठ खुप छान माहितीपुर्ण सचित्र लेख.
पु.ले.प्र.
24 Nov 2014 - 3:17 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद प्रमोद साहेब.
23 Nov 2014 - 1:14 pm | आदूबाळ
जबरी भटकंती...
शेवटून दुसरं फुलपाखरु हलतंय चक्क! ते कस्काय बावा?
23 Nov 2014 - 2:07 pm | प्रचेतस
ती ५/६ फोटो एकत्रित करून बनवलेली .gif फाईल आहे. :)
23 Nov 2014 - 1:16 pm | दिपक.कुवेत
वल्ली ते फक्त निर्जीव शील्पांच्या बाबतीत सांगतो....हो कि नाहि रे वल्ली???
23 Nov 2014 - 2:26 pm | बॅटमॅन
आई शप्पथ. लय भारी बे, खूप उच्च.
23 Nov 2014 - 3:24 pm | प्यारे१
मिपा'सदस्य' वल्लीचे मित्र आहोत ह्याबद्दल आम्ही स्वतःला नशिबवान मानतो.
24 Nov 2014 - 12:51 am | निनाद मुक्काम प...
मस्तच
24 Nov 2014 - 1:06 am | मुक्त विहारि
आता "पावनखंडीचा" पण धागा काढाच.
24 Nov 2014 - 6:27 am | स्पंदना
असा सडा अन त्या पुढच्या दरीच्या दुसर्या टोकाला धबधबा अशी जागा बेळगाव पासून जवळच आहे. गोव्याकडे जायला जो मार्ग आहे तेथेच. नाव विसरल आई, पण सडा फार मोठा आहे.
24 Nov 2014 - 6:28 am | लॉरी टांगटूंगकर
बहुत खूब!
24 Nov 2014 - 9:31 am | नाखु
अप्रतीम मुशाफिरी आणि तपशीलवार माहीती.
स्वगत:या जादूगाराच्या पोतडीत काय काय ठेवलय ते कुणा(गडावरील अभिसारिकेसच) ठाऊक?
24 Nov 2014 - 10:08 am | जेपी
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
24 Nov 2014 - 11:36 am | इरसाल
छान वाटले सगळ बघुन आणी हेवा पण.
24 Nov 2014 - 11:42 am | झकासराव
अरे वाह!!
भारीच भटकंती. :)
जंगल घनदाट आहे.
24 Nov 2014 - 11:52 am | सूड
मस्त!!
24 Nov 2014 - 12:48 pm | सस्नेह
चांदोलीत प्रत्यक्षच फेरफटका झाला की !
अवांतर : या माणसाच्या पायावर 'क्षत्रपाधिपती चक्रपाद भटकंतीसम्राट वल्लीश्वर' असे कायसेसे कोरलेले आहे असे आमच्या ऐकिवात आहे *smile*
24 Nov 2014 - 12:55 pm | बॅटमॅन
त्यांनी आपल्या गौतमीपुत्र सातकर्णी नामक डुआयडीने २००० वर्षांपूर्वी नहपान क्षत्रपास हरवले ते विसरलात काय? त्या डुआयडीची लाखो नाणी अजूनही आहेत.
24 Nov 2014 - 3:36 pm | गणेशा
अप्रतिम प्रवास वर्णन पुन्हा एकदा .
बाकी काय बोलु, वरील रिप्लाय सगळे मिच लिहिले आहेत असे समज.
24 Nov 2014 - 5:16 pm | पिंपातला उंदीर
अप्रतिम. डोळे निवले फोटु पाहुन
24 Nov 2014 - 5:42 pm | आतिवास
एकदम निवांतपणा जाणवला लेख वाचल्यावर.
दोन मिनिटं स्वस्थ बसायला प्रवृत्त करणारा लेख :-)
24 Nov 2014 - 6:18 pm | स्पा
मस्त रे
कचकचीत फोटू
24 Nov 2014 - 6:34 pm | निखळानंद
बहोत खूब ..!
24 Nov 2014 - 9:47 pm | सखी
झकास वर्णन आणि फोटोसुद्दा, नेहमी लिहावं ही विनंती.
ही घनदाट अरण्यं अशीच रहावी....
30 Nov 2014 - 10:31 am | विअर्ड विक्स
लेख आवडला… सध्या कार्यालयाच्या प्रकल्पावर "प्रकल्पग्रस्त" असल्याने भ्रमंतीस स्वल्पविराम… बाकी सह्य भ्रमंतीसाठी हिवाळ्यासारखा दुसरा ऋतू नाही.
30 Nov 2014 - 10:53 am | टवाळ कार्टा
"प्रकल्पग्रस्त" हा शब्द आवडला गेलेला आहे :)
30 Nov 2014 - 2:39 pm | बोका-ए-आझम
अप्रतिम. जाणार म्हणजे जाणार इथे!
30 Nov 2014 - 3:44 pm | सतिश गावडे
जेव्हा दगड धोंडे पाहायचे असतात तेव्हा आपण आम्हाला तिकडे बळेच नेता. आणि जेव्हा हिरवळ पाहायची असते, फेसाळता समुद्र पाहायचा असतो तेव्हा शाळेतल्या, कॉलेजातल्या मित्रांबरोबर सुमडीत कल्टी मारता. :(
30 Nov 2014 - 4:32 pm | प्रचेतस
तिथे तर दगड धोंड्यांचा सडाच होता की रे.
तरीही ह्या निबिड रानात आम्हास काही प्राचीन मूर्ती मिळाल्याच. ;)
1 Dec 2014 - 12:53 am | सूड
>>तरीही ह्या निबिड रानात आम्हास काही प्राचीन मूर्ती मिळाल्याच.
वशाडी येवो !!
1 Dec 2014 - 11:26 pm | पैसा
नेहमीप्रमाणेच क्लास!!!
25 Jun 2018 - 4:24 am | प्रसाद गोडबोले
फोटो पाहुन मन खुष झाले :)
पावसाळ्यात पावसाचा जरा जोर ओसरल्यानंतर इथे जायला काय मजा येईल !
25 Jun 2018 - 7:02 am | नाखु
प्रतिक्षेतला नाखु