१५ ऑक्टोबर २०१४ या दिवशी महाराष्ट्र व हरयाना राज्यांच्या विधानसभेची निवडणुक आहे. निकाल १९ ऑक्टोबरला जाहीर होतील.
हरयानात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. गेली १० वर्षे काँग्रेस सत्तेत असून भूपेंद्रसिंग हूडा सलग १० वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविरूद्ध जोरदार अँटीइनक्युम्बंसीचे वातावरण आहे. गेली ३-४ दशके हरयानाचे राजकारण देवीलाल, भजनलाल व बन्सीलाल या ३ लालांभोवती केंद्रीत झाले आहे. भजनलाल व बन्सीलाल कधी काँग्रेसमध्ये असायचे तर कधी काँग्रेसबाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापून काँग्रेसविरोधात लढायचे. देवीलाल कायमच काँग्रेसविरोधात असायचे. तिघेही अनेकवेळा मुख्यमंत्री झाले होते. आता तिघेही नाहीत व त्यांच्या पुढील पिढ्या राजकारणात आहेत. देवीलालांचा मुलगा ओमप्रकाश चौतालासुद्धा २०००-२००४ या काळात मुख्यमंत्री होता. मागील वर्षी ओमप्रकाश चौताला व अजय चौतालाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगवासाची शिक्षा झाली. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत परंतु कायद्याने ते निवडणुक लढवू शकत नाहीत. ओमप्रकाश चौतालाचा दुसरा मुलगा अभय चौताला आपल्या भारतीय राष्ट्रीय लोकदल या पक्षाची धुरा सांभाळत आहे. भाजप हा हरयानातील प्रमुख पक्ष कधीच नव्हता. भाजप कधीच दुसर्या क्रमांकावरील पक्ष देखील नव्हता. परंतु आता अचानक भाजप तिथला प्रमुख पक्ष बनला आहे. कारण अर्थातच मोदीलाट. हरयानात भाजपकडे चेहरा नाही. तरीसुद्धा या निवडणुकीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष बनेल असं दिसतंय.
कालच इंडियाटीव्ही-सी व्होटर ने आपले सर्वेक्षण प्रसिद्ध केले. त्यानुसार हरयानात भाजपला ९० पैकी ३३ जागा (३८% मते), भारतीय राष्ट्रीय लोकदलाला २८ जागा (२२% मते), काँग्रेसला १६ जागा (१६% मते), भजनलालचा मुलगा चालवीत असलेल्या हरयाना जनहीत काँग्रेसला ९ जागा व इतरांना ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला १० पैकी ७ जागा व काँग्रेसला १ जागा मिळाली होती.
महाराष्ट्रात गेली १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. हे अत्यंत बदनाम झालेले सरकार आहे. या सरकारमधील अनेक मंत्र्यांवर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. महाराष्ट्रात या सरकारविरोधात तीव्र जनभावना आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने भाजप्-शिवसेना युती तुटली तर त्याच कारणाने काँग्रेस्-राष्ट्रवादी आघाडी तुटली. त्यामुळे हे चारही पक्ष एकमेकांविरूद्ध लढत आहेत. यातला ५ वा कोन आहे मनसे. एकंदरीत महाराष्ट्रात अत्यंत चुरशीची लढत आहे.
शिवसेनेच्या १५१ जागांच्या हट्टामुळे भाजपला युती तोडावी लागली. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्ष, रिपब्लिकन पक्ष हे सहकारी पक्ष वार्याची दिशा ओळखून भाजपबरोबर गेल्यामुळे शिवसेनेचा तिळपापड झाला आहे. आता सामनातून व जाहीर सभातून रोज भाजपसहीत या सर्व पक्षांना शिवसेना झोडपत आहे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे.
कालच इंडियाटीव्ही-सी व्होटर ने आपले सर्वेक्षण प्रसिद्ध केले. त्यानुसार महाराष्ट्रात भाजपला २८८ पैकी ९३ जागा (२३% मते), शिवसेनेला ५९ जागा (१९% मते), राष्ट्रवादी काँग्रेसला ४७ जागा (१८% मते), काँग्रेसला ४० जागा (१७% मते), मनसेला २७ जागा (९% मते) व इतरांना भजनलालचा मुलगा चालवीत असलेल्या हरयाना जनहीत काँग्रेसला ९ जागा व इतरांना २२ जागा (१४% मते) मिळण्याची शक्यता आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला ४८ पैकी २३, सेनेला १८, राकाँला ४ व काँग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या.
हे निकाल खालील संकेतस्थळावर आहेत.
http://www.indiatvnews.com/politics/national/india-tv-tracking-poll-hung...
कोणत्याही सर्वेक्षणाचे अंदाज कधीच १०० टक्के बरोबर येत नाहीत. परंतु त्यातून जनतेचा कल दिसतो. वरील सर्वेक्षणावरून असे दिसते की दोन्ही राज्यात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसून दोन्हीकडे भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरेल. दोन्ही राज्यात सत्ताधारी काँगेसच्या पराभव होणार असून दोन किंवा अधिक पक्षांनी एकत्र आल्याशिवाय नवीन सरकार बनणार नाही.
निवडणुकीला अजून १२-१३ दिवस आहेत. अजून मोदींनी प्रचाराला सुरूवात केलेली नाही. त्यांच्या झंझावाती सभांनी भाजपसाठी निश्चितच सकारात्मक बदल घडेल. परंतु बहुमत मिळण्यासाठी त्यांच्या सभांचा उपयोग होईल का ते १९ ऑक्टोबरलाच ठरेल.
आज 'झी'चे सर्वेक्षण प्रसिद्ध होणार आहे. साधारणपणे १०-११ ऑक्टोबरला जी सर्वेक्षणे येतील त्यात बराचसा अचूक अंदाज आलेला असेल.
प्रतिक्रिया
14 Oct 2014 - 3:02 pm | विटेकर
उत्तम अन्यालिसिस् !
तुम्ही अंमळ उशीरच केला यायला.
तुमच्याशी सहमत आहेच पण भाजपला अजून २५ जागा मिळतील असे वाटते अर्थात मतदानाची टक्केवारी किती येते त्यावर अवलम्बून आहे. लोकसभेला झाले एवढे मतदान झाले तर भाजप पूर्ण बहुमतात येईल असे वाटते.
15 Oct 2014 - 2:23 am | निनाद मुक्काम प...
काय गंमत आहे नाही
आधुनिक शिवशाहीत मावळा धारातीर्थी पाडणाऱ्या गनीमाच्या पक्षाला पाठिंबा देणाऱ्या सेनेस सादर प्रणाम
15 Oct 2014 - 7:05 pm | क्लिंटन
चाणक्यच्या एक्झिट पोलप्रमाणे:
भाजपः ५२ (३२% मते)
काँग्रेसः १० (२३% मते)
आय.एन.एल.डी: २३ (२६% मते)
इतरः ५ (१९% मते)
म्हणजे हरियाणात भाजपला प्रथमच बहुमत मिळेल असे चाणक्य म्हणत आहे. तसे झाल्यास आतापर्यंतच्या निवडणुकांमधील समीकरणांना धक्का बसून वेगळीच समीकरणे उदयास येतील असे वाटते.
आता महाराष्ट्राच्या आकड्यांची वाट बघत आहे.
15 Oct 2014 - 7:23 pm | क्लिंटन
चाणक्यचे महाराष्ट्रासाठीचे आकडे:
भाजपः १५१
शिवसेना: ७१
काँग्रेसः २७
राष्ट्रवादी: २८
हे आकडे खरे ठरल्यास महाराष्ट्रासारखे मोठे राज्य स्वबळावर भाजपच्या हातात येईल. देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम घडवायची क्षमता असलेले हे आकडे आहेत. तसे झाल्यास प्रादेशिक पक्षा़ंना आणि युतीच्या राजकारणाला जबरदस्त तडाखा बसू शकेल.
15 Oct 2014 - 8:53 pm | श्रीगुरुजी
चाणक्यच्या मतदानोत्तर चाचणीवर आधारीत महाराष्ट्रातील निकालाचा अंदाज
http://www.todayschanakya.com/maharashtra-assembly-elections-2014.html
भाजपः १४२-१६० (२८-३४ टक्के मते), शिवसेना: ६२-८० (२१-२७ टक्के मते), काँग्रेस: २२-३२ (१७-२३ टक्के मते), राष्ट्रवादी: २३-३३ (१२-१८ टक्के मते), मनसे व इतर : ६-१६ (७-१३ टक्के मते)
चाणक्यच्या मतदानोत्तर चाचणीवर आधारीत हरयानातील निकालाचा अंदाज
http://www.todayschanakya.com/haryana-assembly-elections-2014.html
भाजपः ४५-५९ (२९-३५ टक्के मते), भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला): १६-३० (२३-२९ टक्के मते), काँग्रेस: ५-१५ (२०-२६ टक्के मते), इतर : २-८ (१६-२२ टक्के मते)
15 Oct 2014 - 8:55 pm | श्रीगुरुजी
इतर मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज
http://www.rediff.com/news/report/exit-polls-bjp-clear-leader-in-maharas...
15 Oct 2014 - 9:09 pm | श्रीगुरुजी
हरयानातील मतदानोत्तर चाचणीच्या इतर काही वाहिन्यांच्या निकालानुसार,
(१) सी-व्होटरः भाजप - ३७, भारालो - २८, काँग्रेस - १५, हरयाना जनहीत काँग्रेस - ६, इतर - ४
(२) एसी-नेल्सन : भाजप - ४६, भारालो - २९, काँग्रेस - १०, हरयाना जनहीत काँग्रेस - २, इतर - ३
15 Oct 2014 - 9:15 pm | नानासाहेब नेफळे
ग्रामीण भागात हा एक्झीट पोल झालेला नाही, शहरी नीमशहरी भागात झालेला हा पोल आहे व सँपल साईज अत्यंत थोटका आहे .भाजप 100 च्या पूढे अजिबात जाणार नाही ,काँग्रेस व सेना प्रत्येकी 70 व राष्ट्रवादी 45 व बाकीच्या जागा इतरांना मिळतील, परदेशातले बरेच लोक शहरी भागात असल्याने तिथे हे पोल खरे ठरतात, भारतात नाही.
15 Oct 2014 - 11:54 pm | श्रीगुरुजी
एबीपी-माझा-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार, भाजप १४४, शिवसेना ७७, काँग्रेस ३०, राष्ट्रवादी २९ अशी परिस्थिती असेल.
या सर्वेक्षणातील अंदाज जरा विचित्र आहे. यात विदर्भामध्ये ६२ पैकी भाजपला ५१ जागा दाखविल्या आहेत, तर कोकणात १८ पैकी शिवसेनेला १३ व भाजपला शून्य जागा दिल्या आहेत. विदर्भ व कोकण ही महाराष्ट्राची दोन टोके असली तरी या दोन्ही विभागात इतके टोकाचे निकाल लागतील असे वाटत नाही.
16 Oct 2014 - 12:05 am | श्रीगुरुजी
इंडिया-टुडे ची मतदानोत्तर चाचणी
http://indiatoday.intoday.in/story/maharashtra-india-today-cicero-exit-p...
संभाव्य मतांची टक्केवारी
16 Oct 2014 - 12:07 am | श्रीगुरुजी
इंडिया-टुडेच्या अंदाजानुसार हरयानामध्ये भाजप ३७, भारालो २८, हरयाना जनहीत काँग्रेस ६, इतर ४ व काँग्रेस १५ जागा जिंकण्याची शक्यता आहे.
16 Oct 2014 - 1:04 pm | श्रीगुरुजी
बहुतेक सर्व मतदानोत्तर चाचणीतले निष्कर्ष हे मतदानपूर्व चाचणीशी सुसंगत आहेत. या निष्कर्षांवर आधारीत खालील अंदाज काढता येतो.
(१) काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा पराभव निश्चित आहे. निकालानंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले तरी ते बहुमताच्या जवळपास सुद्धा पोहोचणार नाहीत.
(२) मनसेला अत्यंत कमी जागा मिळतील (कदाचित १० पेक्षा कमी). त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता मनसेला अजिबात स्थान नाही हे दिसून येते. शेकाप जसा प्रत्येक निवडणुकीनंतर दुर्बल होत गेला तसेच मनसेचे झाले आहे. काही काळानंतर विशेषतः २०१७ मधील महानगरपालिका निवडणुकीनंतर बहुतेक मनसे कायमचा कोमात जाईल.
(३) शिवसेना बहुमतापासून खूपच लांब राहील व भाजप सर्वाधिक मोठा पक्ष ठरणार आहे.
(४) जर भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही (बहुतेक चाचण्यांचा हाच निष्कर्ष आहे) तर अतिशय विचित्र स्थिती निर्माण होणार आहे.
अशा परिस्थितीत भाजप + सेना अशी युती होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे कारण आता दोन पक्षात पराकोटीचे वितुष्ट आले आहे.
कदाचित भाजप + मनसे अशी युती आकाराला येईल. परंतु भाजप राज ठाकर्यांसारख्या अत्यंत अहंकारी, हटवादी व बेभरवशाच्या नेत्याबरोबर जाणे टाळण्याची शक्यता आहे.
काँग्रेस + राष्ट्रवादी + शिवसेना अशी युती होण्याची थोडीशी शक्यता आहे. राजकारणात काहीही अशक्य नसते. तथापि जानेवारी २०१५ मध्ये झारखंडमध्ये निवडणुक आहे व डिसेंबर २०१५ मध्ये बिहारमध्ये निवडणुक आहे. शिवसेनेच्या बिहारीविरोधातल्या भूमिकेमुळे शिवसेनेबरोबर युती केल्यास राष्ट्रीय पातळीवर याचा किती फटका बसेल याचा विचार करूनच काँग्रेस शिवसेनेबरोबर युती करण्याचा विचार करेल.
कोणालाच सरकार स्थापन करता आले नाही तर राष्ट्रपती राजवट येण्याची शक्यता आहे.
बघूया १९ तारखेला काय होतंय ते.
(५) भाजपबरोबर युती तोडल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी ऐवजी उद्धव ठाकर्यांनी विनाकारण मोदी व भाजपला टीकेचे लक्ष्य करून घोडचूक केली आहे. भविष्यात भाजप बरोबर नसल्याचा शिवसेनेला मोठा फटका बसणार आहे.
16 Oct 2014 - 1:35 pm | दुश्यन्त
१)मागे एका धाग्यावर लिहिले तसेच हे एक्झिट पोलचे सर्व्हे पाहिल्यावर वाटते. भाजपा सर्वात मोठा पक्ष बनेल किंवा काही जणांच्या मते बहुमतपर्यंत पोहचेल असे अंदाज आहेत मात्र विभागवार अंदाजात मोठी तफावत आहे. एबीपी वाले भाजपला विदर्भात ६२ पैकी ५०-५० तर कोकणात शून्य दाखवत आहेत हे दोन्हीही मला टोकाचे अंदाज वाटतात. झी वाले आधी आणि आताही विदर्भात भाजपला २५-३० हि रेंज देतात विदर्भात भाजपा जास्त जागा जिंकेल मात्र बाकींना एकदम चिल्लरमध्ये काढण्यात अर्थ नाहि. असे अनेक झोल विभागवार पाहिले तर लक्षात येतात. असो १९ तारीख लांब नाही काय ते कळेलच
२)शिवसेनेला जे काही यश मिळेल ते स्वतःचे असेल. पंतप्रधान मोदी आणि केंद्रातला त्यांचा बाकी फौज फाटा (राजनाथ, सुषमा, उमा, गडकरी वगैरे) तसेच आजूबाजूचे भाजपचे मुख्यमंत्री, मंत्री , आमदार वगैरे हे सगळे राज्य भाजपसाठी प्रचारात होते. सेनेकडे तसे मुख्यकरुन उद्धव, आदित्य आणि बाकी राज्यातले नेते होते. तरीही सेना जर ७५-८०च्या घरात खेळत असेल तर सेनेसाठी लक्षणीय यश मानायला हवे. या आधीचा त्यांचा उच्चांक ७३ आहे ते पण बाळासाहेब आणि युती असताना. शिवसेनेला पुढे राज्यात अजून विस्तारायची संधी आहे.मात्र पुढील काळात त्यांना नवीन मुद्दे खास करून विकासाचे जास्त प्रमाणात हाती घ्यावे लागतील.खरा फटका एनसीपीला आहे. कॉंग्रेस तरुन जाइल त्यांचा खास मतदार अजूनही त्यांच्याकडे आहे.
16 Oct 2014 - 4:32 pm | अर्धवटराव
आदित्य ?? =))
आलिया भट, राखी सावंत आणि आदित्य ठाकरे हि मंडळी बीग बॉस मधे एकत्र जावी अशी फार इच्छा आहे :D
17 Oct 2014 - 3:39 am | प्यारे१
रागांची एन्ट्री कधी ठेवायचीये?
17 Oct 2014 - 6:55 am | अर्धवटराव
;)
16 Oct 2014 - 8:46 pm | श्रीगुरुजी
>>> शिवसेनेला जे काही यश मिळेल ते स्वतःचे असेल. पंतप्रधान मोदी आणि केंद्रातला त्यांचा बाकी फौज फाटा (राजनाथ, सुषमा, उमा, गडकरी वगैरे) तसेच आजूबाजूचे भाजपचे मुख्यमंत्री, मंत्री , आमदार वगैरे हे सगळे राज्य भाजपसाठी प्रचारात होते.
भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याकडे इतर रा़ज्यातील नेते प्रचारासाठी उपलब्ध आहेत. शिवसेना प्रादेशिक पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याकडे महाराष्ट्राबाहेरील नेते प्रचारासाठी अस्तित्वातच नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे कडे देखील फक्त स्थानिक नेतेच आहेत. भाजपप्रमाणे काँग्रेस हा देखील राष्ट्रीय पक्ष असल्याने महाराष्ट्राबाहेरील अनेक नेते प्रचारासाठी येऊन गेले (सोनिया गांधी, राहुल, गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंदिया इ.).
>>> सेनेकडे तसे मुख्यकरुन उद्धव, आदित्य आणि बाकी राज्यातले नेते होते. तरीही सेना जर ७५-८०च्या घरात खेळत असेल तर सेनेसाठी लक्षणीय यश मानायला हवे. या आधीचा त्यांचा उच्चांक ७३ आहे ते पण बाळासाहेब आणि युती असताना. शिवसेनेला पुढे राज्यात अजून विस्तारायची संधी आहे.मात्र पुढील काळात त्यांना नवीन मुद्दे खास करून विकासाचे जास्त प्रमाणात हाती घ्यावे लागतील.
अफझलखान, कोथळा, छाताड, मर्दमराठा, मावळे, थडगं, वाघनखे इ. १७ व्या शतकातल्या ऐतिहासिक गोष्टी सोडल्या तर शिवसेनेकडे विकास, आर्थिक, परराष्ट्र धोरण, सामाजिक धोरण, शैक्षणिक धोरण असे कोणतेही मुद्दे नाहीत आणि भविष्यात देखील शिवसेनेच्या धोरणात हे मुद्दे येण्याची शक्यता शून्य आहे.
>>> खरा फटका एनसीपीला आहे. कॉंग्रेस तरुन जाइल त्यांचा खास मतदार अजूनही त्यांच्याकडे आहे.
अनेकवेळा पक्ष बदललेले पवार साहेब या पराभवानंतर काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करण्याचा प्रयत्न करून आपले अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करतील. काही झालं तर एखाद्या छोट्याशा ओहोळाला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी एखाद्या मोठ्या ओढ्यात किंवा नदीत मिसळावेच लागते. नाहीतर काही दिवसातच ओहोळ सुकुन जाऊन अस्तित्वहीन होईल.
16 Oct 2014 - 7:35 pm | धर्मराजमुटके
आमच्या एका ज्योतीषी मित्राच्या म्हणण्याप्रमाणे मतदान बुधवारी ठेवायला नको होते. बुधाच्या अमलाखाली केलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्या लागतात तेव्हाच त्यात अपेक्षीत यश मिळते. त्याच्यामते राष्ट्रपती राजवट चालू राहिल आणि पुन्हा निवडणूका घ्याव्या लागतील.
खरे खोटे मित्र आणि देव जाणे.
16 Oct 2014 - 8:55 pm | श्रीगुरुजी
>>> आमच्या एका ज्योतीषी मित्राच्या म्हणण्याप्रमाणे मतदान बुधवारी ठेवायला नको होते. बुधाच्या अमलाखाली केलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्या लागतात तेव्हाच त्यात अपेक्षीत यश मिळते. त्याच्यामते राष्ट्रपती राजवट चालू राहिल आणि पुन्हा निवडणूका घ्याव्या लागतील.
निव्वळ मूर्खपणा! ज्योतिषांचे निवडणुकीबद्दलचे अंदाज कधीही खरे ठरत नाहीत. माझ्याकडे १९८९ चा "भाग्यसंकेत" या ज्योतिषाला वाहिलेल्या मासिकाचा दिवाळी अंक आहे. हा अंक १९८९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एक-दीड महिन्यांपूर्वीच प्रसिद्ध झाला होता. त्यात निवडणुकीविषयी भाष्य करताना लिहिले होते की "काँग्रेस २७०-२८५ जागा मिळवून नाट्यमयरित्या सत्तेवर येईल. प्रत्यक्षात काँग्रेसला त्या निवडणुकीत फक्त १९५ जागा मिळून सत्ता गमवावी लागली होती.
त्याच अंकात अजून १०-१२ भाकीते केली होती. त्यातले एक भाकीत असे होते की वि.प्र.सिंग कधीही पंतप्रधान बनणार नाहीत. हे भाकीत पूर्ण खोटे ठरले.
अजून एक भाकीत असे होते की १९९१ साली शरद पवार व सुशीलकुमार शिंदे केंद्रीय मंत्रीमंडळात जातील. पवार १९९१ मध्ये केंद्रात संरक्षणमंत्री झाले, परंतु सुशीलकुमार शिंदे प्रथम केंद्रीय मंत्री झाले ते २००६ मध्ये (म्हणजे तब्बल १५ वर्षांनंतर). त्यामुळे पवारांच्या बाबतीतले भाकित वगळता उरलेली १०-१२ भाकीते पूर्ण खोटी ठरली होती.
17 Oct 2014 - 1:00 am | बॅटमॅन
पण सांगताना मात्र ज्योतिषी फक्त बरोबर आलेल्या दाव्यांबद्दलच बोलतात. बाकीच्या दाव्यांबद्दल गुळणी धरून बसतात.
17 Oct 2014 - 1:16 pm | श्रीगुरुजी
भाजपने शिवसेनेशी युती का तोडली?
एक जबरदस्त विश्लेषण
How the risk-taking Amit Shah went for broke in Maharashtra
17 Oct 2014 - 2:32 pm | काळा पहाड
अतिशय हुशार माणूस आहे तो गुरुजी. गुजराती-मराठी, शेटजी/भटजी-बहुजन, या जातीला आरक्षण, त्या जमातीत भांड्ण लावणं असली कृत्यं करून वजाबाकीची गणितं मांडणार्या रेम्याडोक्या मराठी राजकारण्यांना आणि त्यांच्या बगलबच्च्यांना त्यानं साफ उलथं पाडलं. मराठीपणाचा आणि बहुजन जातीय राजकारणाचा माज करणार्या पक्षांनी आता समाधी घेण्यासाठी जागा शोधावी हे उत्तम.
17 Oct 2014 - 4:06 pm | नानासाहेब नेफळे
काळा पहाडजी थंड घ्या! ते रेम्याडोक्याचेच ६० बहुजण भाजपाने त्यांच्या पक्षात घेतलेत व तेच आता राज्य भाजपावर कब्जा करतील तेव्हा अमित शहाला कळेल इथले राजकारण....
17 Oct 2014 - 9:03 pm | श्रीगुरुजी
स्वप्नात रहा आणि मजेत रहा!
भाजपने बाहेरच्यांना आत घेतले कारण ते बहुमतासाठी उपयोगी पडतील म्हणून. रा़ज्यातले मूळचे जुने नेते सोडून बाहेरच्यांच्या हातात संपूर्ण पक्ष देण्याइतके भाजप व शहा/मोदी मूर्ख नाहीत.
17 Oct 2014 - 9:32 pm | अर्धवटराव
अन्बिलीव्हेबल... अशा धंद्याच्या गोष्टी कळायला खरच सालं हे गुजराती-मारवाडी-पंजाबी रक्त हवं. ठाकरेंना मुंबईचा कब्जा घेऊनही हा साधा व्यवहार कळु नये ना :(
17 Oct 2014 - 5:08 pm | प्रसाद१९७१
मनसे ला इतक्या कमी जागा मिळतील असे वाटत नाही.
जरी तो अगदी पक्ष राष्ट्रवादी सारखाच घाणेरडा असला तरी, युती तुटल्यामुळे त्यांना २५-३० जागा मिळतील असे वाटते. अजुन जास्त मिळाल्या तर महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
17 Oct 2014 - 9:00 pm | श्रीगुरुजी
तेलगू देसमने स्थापनेनंतर केवळ ९ महिन्यात सत्ता मिळविली होती. बिजदने स्थापनेनंतर केवळ २ वर्षात सत्ता मिळविली होती. तृणमूल काँग्रेसने स्थापनेनंतर १३ वर्षात सत्ता मिळविली, परंतु स्थापनेनंतर केवळ ३ वर्षात विरोधी पक्षनेतेपद मिळविले होते. त्या तुलनेत स्थापना होऊन ९ वर्षे होऊन गेली तरीसुद्धा मनसे अजूनही ५ व्या क्रमांकावरच आहे.
त्यामुळे या निकालानंतर सर्वात पहिल्यांदा मनसेच्या दुकानाच्या फळ्या लागायला लागतील व सर्वात पहिल्यांदा मनसेचे दुकान बंद व्हायला सुरूवात होईल. पक्ष काढून तब्बल ९ वर्षे झाल्यानंतर व २ लोकसभा व २ विधानसभा निवडणुका लढल्यानंतरसुद्धा मनसेचे हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार व शून्य खासदार निवडून येत असतील तर मनसे नेते व कार्यकर्ते पक्ष सोडायला सुरूवात करतील. बहुतेक सर्व जण शिवसेनेत परत जातील व काही जण उगवत्या सूर्याशी म्हणजे भाजपशी घरोबा करतील. दस्तुरखुद्द रा़ज ठाकर्यांना कोठेही स्थान नसेल.