नवरात्र उत्सवानिमित्त इथल्या काही लेण्या, मंदिरांतून टिपलेली आदीशक्तीची ही काही रूपं.
सुरुवात करूयात ती वैदिक कालखंडाच्याही आधीपासून असलेल्या स्त्री शक्तींपासून.
लज्जागौरी
लज्जागौरी ही स्त्रीच्या प्रजनन शक्तीचे प्रतिक. वैदिक कालखंडाच्याही अगोदरपासून अशा मूर्ती प्रचलित होत्या. वैदिक कालखंडात ह्या प्रकारच्या मूर्ती तंत्रमार्गात समाविष्ट झाल्या. मुख्यतः ह्या मूर्तींना मस्तकाच्या जागी कमळ असते. तर काही वेळा ह्या मस्तकासह असतात. ह्या नग्न असून उपड्या बसलेल्या स्थितीत असतात. ह्या मूर्तींच्या अशा स्वरूपामुळेच ह्यांचे नष्टचर्य ओढवले. परकिय आक्रमकांबरोबरच स्वकीयांनीही ह्यांना नष्ट केले.
१. ही पेडगावच्या भैरवनाथ मंदिरातील लज्जागौरीची प्रतिमा. इ.स. साधारण १३ वे शतक. यादव राजवट.
हिच्या योनीतून दोन सर्प बाहेर आले असून ते पुरुष शक्तीचे प्रतिक आहेत.
२. ही वेरूळमधली रामेश्वर लेण्यातील (लेणी. क्र. २१ ) येथील नंदीपीठाच्या मागील बाजूस कोरलेली आहे. इ.स. ७ / ८ शतक.
सप्तमातृका
ब्राम्ही माहेश्वरीचैव कौमारी वैष्णवी तथा।
वाराही च तथेंद्राणी चामुंडा: सप्तमातरः॥
सप्तमातृका मूळाच्या अनार्य देवता. कोकणात ह्यांनाच साती आसरा अथवा जलदेवता म्हणत असावेत. सृजनशक्तीची ही प्रतिकं. यातल्या ब्राह्मी, कौमारी, ऐन्द्राणी आणि वैष्णवी ह्या वैदिक अंश असलेल्या तर माहेश्वरी, वाराही, चामुंडा ह्या मूळच्या अवैदिक अर्थात अनार्य अंशाच्या. काही वेळा सात मातृकांबरोबरच आठवी नारसिंहीही दिसते.
सप्तमातृका ह्या नेहमी पट ह्या स्वरूपात दिसतात. म्हणजे सुरुवातीला वीरभद्र आणि शेवटी गणेश आणि मध्ये सात मातृका त्यांच्या बाळांसह. मातृका ओळखणे तसे फार सोपे. मातृकांखालीच प्रत्येकीची वाहने कोरलेली असतात.
ब्राह्मणी - हंस
माहेश्वरी - बैल
कौमारी - मोर
वैष्णवी - गरूड
वाराही - वराह किंवा महिष. ही काही वेळा वराहमुखी पण दाखवली जाते.
ऐन्द्राणी - हत्ती
चामुंडा - प्रेत, शृगाल, कुत्रा किंवा घुबड
यातली चामुंडा सर्वात सुप्रसिद्ध. कदाचित चालुक्यांची ती कुलदेवता असल्याने तीला मानाचे स्थान मिळालेय. कंकालस्वरूप शरीर, लोंबलेले स्तन, पोटात असलेला विंचू (हे तिच्या सतत जागृत असलेल्या भुकेचे प्रतिक) आणि पायांतळी प्रेत ही तिची सर्वसाधारण लक्षणे. सप्तमातृकापटांसह ही एकच मातृका स्वतंत्ररीत्या कोरलेलीही बर्याच वेळा आढळते.
वेरूळच्या 'रावण की खाई' (लेणी क्र. १५) मधील सप्तमातृका पट
३. ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी अनुक्रमे हंस, बैल, मोर आणि गरूड ह्या वाहनांसह
४. वाराही, ऐन्द्राणी आणि चामुंडा अनुक्रमे वराह, हत्ती आणि घुबड ह्या वाहनांसह
वेरूळ येथील कैलास एकाश्ममंदिरातील यज्ञशाळेतील सप्तमातृका
५. वीरभद्र (नंदी), ब्राह्मणी (हंस) आणि माहेश्वरी (बैल)
६. कौमारी आणि वैष्णवी अनुक्रमे मोर आणि गरुडासह
७. वाराही (महिष), ऐन्द्राणी (हत्ती) आणि चामुंडा (शृगाल अथवा कुत्रा)
८. सप्तमातृकापट कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर
९. पूर्णपणे उभ्या स्थितीतील सप्तमातृकापट, वेरूळ
१०. चामुंडा, सोमेश्वर मंदिर, पिंपरी दुमाला (१३ वे शतक)
११. चामुंडा, भुलेश्वर मंदिर, यवत (१२ -१३ वे शतक)
१२. चामुंडा, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर (११-१२ वे शतक)
१३. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातीलच अजून एक देखणी चामुंडा
सप्तमातृकांसोबतच नंतरच्या काळात गणेशाचे स्त्रीरूपसुद्धा तंत्र पंथात समाविष्ट झाले. विनायकी अथवा गणेशिनी ह्या नावाने हे रूप ओळखले जाते.
१४. पाटेश्वर येथील विनायकी, साधारण १४ वे शतक
१५. भुलेश्वर येथील विनायकी
सरिता देवता
भारतात नद्यांनासुद्धा देवता मानले जाते. गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या तीन प्रमुख सरिता देवता. ह्या आपल्याला वेरूळ येथे कोरलेल्या दिसतात. गंगेचे वाहन मकर, यमुनेचे कूर्म तर सरस्वतीचे कमळ
१६. मकरारूढ गंगा
१७. कूर्मारूढ यमुना
१८. कमलारूढ सरस्वती
१९. वेरूळ येथील रामेश्वर लेणीतील (क्र. २१) गंगेचे अप्रतिम शिल्प
२०. यमुना, धुमार लेणे (लेणी क्र. २९), वेरूळ
पार्वती
बहुतेक वेळा पार्वतीची मूर्ती ही उमा-माहेश्वर अशा स्वरूपात आढळते. स्वतंत्रपणे कोरलेल्या तीच्या अगदी मोजक्या मूर्ती आढळतात. पार्वतीचे वाहन गोधा अर्थात घोरपड, पार्वतीच्या भोवती पाच अग्नी दाखवतात. ४ यज्ञकुंडातले अग्नी आणि पाचवा सूर्य. शंकर हा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तीने पंचाग्नीसाधन करून कठोर तप केले अशी पौराणिक कथा.
२१. वेरूळ येथील लंकेश्वर लेणीतील पार्वती. लक्षपूर्वक पाहिल्यास पार्वतीच्या एका हाती गणेश तर दुसर्या हाती शिवपिंडी दिसेल. भोवती अग्नी धगधगत असलेले दिसतील, वाहन गोधा
२२. पार्वती, धुमार लेणे (लेणी क्र. २९), वेरूळ
अन्नपूर्णा
हे ही देवीचेच एक स्वरूप. पार्वतीचा अवतार. आपल्या घरी अन्नपूर्णा सौख्य आणि समृद्धी घेऊन येते अशी समजूत. तिची सर्वसाधारण लक्षणे म्हणजे एका हातात पळी तर दुसर्या हाती कणीस, तर कधी कमंडलू. खिद्रापूरच्या मंदिरात अंतराळाच्या भिंतीत अन्नपूर्णेची पळी हातात घेतलेली एक सुरेख मूर्ती आहे. दुर्दैवाने माझ्याकडील ते छायाचित्र खराब झाले.
२३. वेरूळच्या कैलास एकाश्ममंदिरातील प्रदक्षिणापथाच्या भिंतीत कोरलेली अन्नपूर्णा
लक्ष्मी
लक्ष्मी म्हणजे धनाची देवता. हिंदू धर्मात ती कोठून आली हे विवाद्य आहे. काही जण ती जैन तर काही जण ती बौद्ध धर्मातून आली असे मानतात तर बरेच जण ती मूळची हिंदू धर्मातीलच असे मानतात. माझ्यापुरते मी ती सप्तमातृकांतील वैष्णवीतून उत्क्रांत झाली असावी असे मानतो.
लक्ष्मीचे सर्वपरिचीत स्वरूप हणजे गजान्तलक्ष्मी.
सरोवरातील कमळपुष्पावर आरूढ लक्ष्मीला दोन गजांकडून जलाभिषेक होत आहे हे तिचे स्वरूप.
२४. गजान्तलक्ष्मीचे सर्वात सुंदर रूप वेरूळ येथे शिल्पांकित केलेले आहे.
२५. गजान्तलक्ष्मी, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर
२६. गजलक्ष्मी, रावण की खाई (लेणी क्र. १५)
२७. लक्ष्मी, यज्ञशाळा, कैलास लेणे, वेरूळ
दुर्गा
हे शक्तीचे सर्वात सुप्रसिद्ध स्वरूप. हिचे वाहन सिंह. आदिशक्तीने निरनिराळी रूपे घेऊन राक्षसांचा संहार केला. पैकी महिषासुराचा वध करणारी ती दुर्गा अथवा महिषासुरमर्दिनी. हिला ८, १०, १६ किंवा १८ हात दाखवतात. हिची आयुधे म्हणजे ढाल, तलवार, त्रिशूळ, धनुष्य, अंकुश, बाण, मुंड, अक्षमाळा, दंड, शंख, पद्म, चक्र, परशु. पैकी चक्र हे विष्णूकडून तर त्रिशूळ हे शंकराकडून तिला मिळाले असे मानतात. दुर्गेची रूपे केवल दुर्गा व महिषासुरमर्दिनी अशा दोन्ही स्वरूपात दिसतात. केवल दुर्गा म्हणजे सिंहारूढ असणारी दुर्गा तर महिषासुरमर्दिनी ह्या रूपात ती महिषाचा संहार करताना दाखवली जाते.
आता दुर्गा व महिषासुरमर्दिनीची विविध रूपे पाहूयात.
२८. दुर्गा, यज्ञशाळा, वेरूळ
२९. दुर्गा, रावण की खाई (लेणी क्र. १५) वेरूळ
३०. दुर्गा, सिद्धेश्वर मंदिर, कायगाव टोके (१८ वे शतक)
३१. महिषासुरमर्दिनी, कैलास लेणे वेरूळ, येथे महिष राक्षस स्वरूपात दाखवलाय तर त्याचे महिष असणे हे डोक्यावरील दोन शिंगांद्वारे सूचित केलेय.
३२. महिषासुरमर्दिनी, कैलास लेणे, वेरूळ
३३. महिषासुरमर्दिनी, रामेश्वर लेणे, लेणी क्र. २१, वेरूळ
३४. महिषासुरमर्दिनी, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर
३५. महिषासुरमर्दिनी, भुलेश्वर मंदिर, यवत
३६. महिषासुरमर्दिनी, चांगावटेश्वर मंदिर, सासवड, १३ वे शतक
आतापर्यंत ढोबळमानाने आपण काही रूपे अगदी संक्षिप्त स्वरूपात पाहिली. भैरवी, सरस्वती, हरिती, ज्येष्ठा गौरी, अंबिका अशी अजूनही काही रूपे आहेत त्यावर परत कधीतरी.
प्रतिक्रिया
28 Sep 2014 - 6:34 pm | काउबॉय
.
28 Sep 2014 - 6:36 pm | भिंगरी
इतकी शिल्प पहायला मिळाली.
धन्यवाद!वल्ली
१
28 Sep 2014 - 6:39 pm | टवाळ कार्टा
मी पयला (सगळे फोटो छानच आहेत)
28 Sep 2014 - 6:48 pm | दिपक.कुवेत
मानलं बुवा तुमच्या अभ्यासाला.
28 Sep 2014 - 7:14 pm | किसन शिंदे
वाह!! इतर ठिकाणांच्या चामुंडेपेक्षा भुलेश्वरच्या मंदिरातले चामुंडेचं शिल्प माझ्या सगळ्यात जास्त आवडीचे.
29 Sep 2014 - 1:25 pm | प्रशांत
अगदी... अगदी...
29 Sep 2014 - 11:37 pm | प्रचेतस
भुलेश्वरच्याच दर्पणसुंदरीच शिल्प माझ्या सर्वाधिक आवडीचं ;)
28 Sep 2014 - 7:24 pm | माहितगार
छान, लेख आणि फोटोंच्या निमीत्ताने नवरात्रात देवींच दर्शन सोबत इतिहासाच जरास ज्ञान मिळण्याचा योग धन्यवाद. अशात मराठी विकिवरील गौरीपूजन लेखाच्या निमीत्ताने जरा गूगल शोध झालेलाच आहे तर या निमीत्ताने काही शंकांची माहिती अनुषंगिक विषयांतराचा भाग म्हणून कुणी देऊ शकल्यास हवी आहे.
१) सबंध भारतात मिळून किमान ९ प्रकारच्या गौरीपूजनाच्या परंपरा आढळल्या त्या खालील प्रमाणे
*विवीध गौरी आणि त्यांची व्रते:
**ज्येष्ठा गौरी
**करवा चौथ - हे गौरी गणेशाशी संबंधीत व्रत असण्याबद्दल दुजोरा हवा
**जयपार्वती व्रत - आषाढ महिन्यातील गूजराथेतील व्रत - अधिक माहिती हवी
**स्वर्णगौरी व्रत - शुक्ल तृतीया भाद्रपद (गणेश चतुर्थीच्या आधीचा दिवस - कर्नाटक - अधिक माहिती हवी
**चैत्र गौरी - अधिक माहिती हवी
**सौभाग्य गौरी व्रत - आंध्रप्रदेश - अधिक माहिती हवी
**मंगळा गौरी - अधिक माहिती हवी
**केदार गौरी व्रत -तामीळनाडू - अधिक माहिती हवी
**ललिता गौरी - अधिक माहिती हवी
**लज्जा गौरी -
१ अ) लज्जा गौरीचे पूजन होत होते असे इतिहास विषयक लेखांवरून वाटते या पूजनाचे आणि व्रताचे नेमके स्वरूप काय होते;
१ आ) लज्जागौरीचा आणि इतर गौरी पूजन प्रथांचा आपापसात काही संबंध आहे का ?
१ इ) भारत भरातील सर्व गौरी पूजने परस्परांशी संबंधीत असतील तर हे संबंध नेमके कोणते आणि हि सर्व प्रकारची गौरी पुजने वेगवेगळ्या दिवशी होण्याची कारणे काय असावीत
१ उ) ज्येष्ठा गौरींच्या बाबतीत गौरी आणि महालक्ष्मी हि दोन्ही नावे प्रचलीत दिसतात; बर्याच ठिकाणी गौरी हे पार्वती स्वरूप असल्याचे उल्लेख येतात तर लक्ष्मी ही विष्णू पत्नी मानली जाते तर यात काही सरमिसळ/ गल्लत होते आहे का ?
चुभूदेघे.
28 Sep 2014 - 10:28 pm | प्रचेतस
यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर कदाचित आत्मूबुवा देऊ शकतील कारण हे सर्व प्रकार आध्यात्मिक कर्मकाण्डांमध्ये गणले जातात. त्याचा मला फारसा गंध नाही.
लज्जागौरीचे पक्षी योनीदेवतांचे / मातृदेवतांचे पूजन वैदिक काळाआधीपासून होत होते. डेक्कन कॉलेजातील ताम्रपाषाण विथिकेमध्ये इनामगाव उत्खननात मिळालेल्या स्त्री देवतेची मातीपासून तयार केलेली मूर्ती (टेराकोटा) आहे जी मी स्वतः पाहिली आहे. डेक्कन कॉलेजच्या संग्रहालयातील विथिंकेवर कधीतरी धागा काढण्याचा विचार आहे.
लज्जागौरी वर रा. चिं. ढेरे यांनी याच नावाचे एक पुस्तक लिहिले आहे त्यात आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे बहुधा मिळतील. मी ते पुस्तक वाचलेले नाही, संग्रहीपण नाही. पैसाताई अधिक माहिती देऊ शकेल.
बाकी गौरी म्हणजे पार्वती. शुभ्र हिमालयाची ती मुलगी म्हणून गौरी हे नाव.
28 Sep 2014 - 10:34 pm | धन्या
"अध्यात्मिक कर्मकांडांमध्ये" च्या ऐवजी "धार्मिक कर्मकांडांमध्ये" अशा शब्दप्रयोग जास्त योग्य होईल. अध्यात्मामध्ये कुठलेही कर्मकांड नसते. कर्मकांड धार्मिक गोष्टींमध्ये असते.
28 Sep 2014 - 10:35 pm | प्रचेतस
सहमत.
हा शब्द प्रतिसाद देतांना सुचला नाही.
28 Sep 2014 - 8:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
लेख नेहमीप्रमाणेच अप्रतिम !
वल्लीबुवा, नेहमीचेच म्हणणे परत : तुमच्या या आणि इतर अनेक मूर्तींच्या अभ्यासाचे अश्याच सर्वसामान्यांना समजेल अश्या भाषेत पुस्तक काढा.
29 Sep 2014 - 1:28 pm | सुहास झेले
ह्येच बोलतो... तुझे लेख म्हणजे आम्हा सर्वांना पर्वणीच.. प्रत्येकवेळी नवनवीन काही शिकायला मिळते :)
29 Sep 2014 - 11:38 pm | प्रचेतस
:)
30 Sep 2014 - 5:01 am | पहाटवारा
हेच म्हणतो .. नेहमीप्रमणेच अभिनिवेश्-विरहित माहिती अन अप्रतीम फोटोंनी लगडलेला सुरेख लेख !
-पहाटवारा
28 Sep 2014 - 9:22 pm | संजय क्षीरसागर
शिल्पकलेचा असा व्यासंग कौतुकास्पद आहे!
29 Sep 2014 - 4:30 pm | शिद
_/\_
28 Sep 2014 - 9:42 pm | अनुप ढेरे
वा... मस्तं!
28 Sep 2014 - 10:00 pm | अजया
नेहेमीप्रमाणेच अप्रतिम.साध्या सोप्या भाषेत मूर्तीकला समजावुन सांगणारा वल्लीसरांचा मूर्तीकलेचा तास!
ती गंगा फारच सुंदर आहे.
29 Sep 2014 - 12:11 am | अत्रुप्त आत्मा
सध्या नवरात्र असल्याने, चालू असलेल्याच विषयातली(सप्तशती..) मंडळी प्रत्यक्ष भेटल्या सारखं वाटलं अगदी!
ही बघा ..\/ही खाली\/...रोज श्लोकातून भेटत असतात,तीच हाइत नव्हं फोटुंमदी?
प्रेतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासना
ऐन्द्री गजसमारूढा वैष्णवी गरुडासना
माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना
श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना
ब्राह्मी हंससमारूढा सर्वाभरणभूषिता
29 Sep 2014 - 12:26 am | मुक्त विहारि
... अजूनही काही रूपे आहेत त्यावर परत कधीतरी."
तो योग लवकरात लवकर यावा असे वाटते.
लेख मस्तच...
29 Sep 2014 - 12:28 am | खटपट्या
सर्व माहीती आणि फोटो जबरदस्त !!
29 Sep 2014 - 12:33 am | आतिवास
'परत कधीतरी'
- वाट पाहते त्या लेखाची.
29 Sep 2014 - 1:05 am | अर्धवटराव
पाषाणांचं मनोगत उमगायला एक विशिष्ट प्रकारचं काळिज लागतं, आणि त्यांचा मूकसंवाद कळायला विशिष्ट कान. वल्ली किती सहज बाळगतो हे.
अप्रतीम रे मित्रा.
29 Sep 2014 - 10:05 am | एस
वैशिष्ट्यपूर्ण वल्लींचा वैशिष्ट्यपूर्ण लेख आवडला! ;-)
29 Sep 2014 - 9:37 am | ज्ञानोबाचे पैजार
मस्त नेहमीप्रमाणे माहितीपुर्ण लेख.
वल्लीसर तुमचे लेख वाचायला नेहमीच मजा येते.
पैजारबुवा,
29 Sep 2014 - 1:36 pm | सस्नेह
उच्च संग्रह.
देवीच्या मूर्तींची दुरवस्था पाहून यातना झाल्या.
29 Sep 2014 - 12:56 pm | प्यारे१
वल्ल्यानं हे त्याचं स्पेशयालझेशन किमान थोडाकाळ तरी 'वेगळी'कडं वळवावं ही त्याला विनंती. ;)
नेहमीप्रमाणंच उच्च अभ्यासू लेख आहे. (नवं काय लिहावं?)
29 Sep 2014 - 4:54 pm | अत्रुप्त आत्मा
@वल्ल्यानं हे त्याचं स्पेशयालझेशन किमान थोडाकाळ तरी
'वेगळी'कडं वळवावं ही त्याला विनंती.>>> जोरदार समर्थन!!
29 Sep 2014 - 1:00 pm | स्पा
अप्रतिम, देखणे कलेक्शन
मजा आली
29 Sep 2014 - 4:28 pm | काउबॉय
लज्जागौरी प्रतिमेतिल सर्प पुरुष शक्तीचे प्रतिक कसे ?
29 Sep 2014 - 11:36 pm | प्रचेतस
लज्जागौरी प्रतिमेतीलच असे नव्हे तर एकूणांतच हिदू मिथकांत सर्पांना प्रजननाचे प्रतिक (symbol of fertility) मानले गेले आहे. ह्याशिवाय येथे सर्प योनीतून बाहेर आले असून स्त्रीने ते धरून ठेवले आहेत. साहजिकच ते पुरुष शक्ती दर्शवत असावेत.
29 Sep 2014 - 11:50 pm | काउबॉय
थोडा आणखी विदा हवा कारण स्त्रियांना फर्टिलिटी सीमबोल/गॉड असे म्हटले जाते अर्थात ही अनार्याची वा जेंव्हा देव न्हवते तर निव्वळ निसर्ग दैवत गणला जात होता त्याकालीन बाब आहे आणि लज्जा गौरी जर अनार्या-अवैदिक असेल तर ती स्वत:च सिम्बोल ऑफ़ फर्टिलिटी ठरते व पुरुष हां होर्न गॉड ऑफ़ हंटिंग म्हणजेच शिंग असलेला शिकारिचा देवता ठरतो. पुरूषाचे हे शिंग चित्र व मूर्तिमधे प्रामुख्याने डोक्यावर दाखवलेले असे आणखी कुठे नाही :)
म्हणून एकाच ठिकाणी दोन दोन साप ही कलात्मकता नसून इतर काही दर्शवत असावेत असा संशय उरतो
29 Sep 2014 - 11:58 pm | प्रचेतस
अजून विदा काहीच नाही. मूळात ही प्रतिमा बर्याच उशिरा घडवली गेली आहे. यादवकाळात, साधारण १३ व्या शतकात. तेव्हा लज्जागौरीच्या प्रतिमा घडवणे जवळपास बंद झाले होते शिवाय त्या काळात आर्य-अनार्य, वैदिक- अवैदिक लागू होण्याचा काही प्रश्नच नाही.
30 Sep 2014 - 12:07 am | काउबॉय
हम्म! कहर आहे. मला एकाच वेळी दोन साप का याचे समाधानकारक कारण समजत नाहिये बाकी इतर डाउट्स महत्वाचे नाहीत तसेच दोन साप ही निव्वळ कलात्मकता तर नक्कीच नाही.
30 Sep 2014 - 12:14 am | प्रचेतस
शिल्पकलेत बर्याच गूढ गोष्टी आहेत त्यांचे आजही स्पष्टीकरण मिळत नाहीत. त्यातलीच ही एक मूर्ती. मला तरी हे साप पुरुषी शक्तीचे प्रतिक वाटतात. बाकी ते दोन का आहेत ते कळत नाही. सिमेट्रीसाठीही असावेत पण नक्की सांगता येत नाही.
30 Sep 2014 - 12:28 am | काउबॉय
त्यात एकवेळ वा अजुनही पुरुष फर्टिलायझर गणला जाउ शकेल fertility नाहीच. सकृत दर्शनी ज्या प्रकारे साप पकडले आहेत ते फर्टिलायझर न्हवे तर तिची अपत्ये वाटत आहेत.... असो... गोष्टी बऱ्याच गूढ़ आहेत खरे
29 Sep 2014 - 4:51 pm | झकासराव
:)
निराश होइल असं कधी लिहुच शकणार नाहीत अशा लोकांमध्ये वल्ल्ली आहेच.
सप्तमातृका आणि सातीआसरा (ग्रामीण बोलीत सात्यासरा) एकच का?
29 Sep 2014 - 11:33 pm | प्रचेतस
सातीआसरा म्हणाजे सात अप्सरा. ह्या प्रामुख्याने कोकणातच प्रचलित आहेत. ह्या जलदेवता. सप्तमातृकांपासूनच पुढे ह्या उत्क्रांत झाल्या असाव्यात कारण प्राचीन काळातील कोकणांतील शिलाहार, कदंब, कोंकण मौर्य आदी राजवटींत आसरांचे उल्लेख येत नाहीत मात्र मातृका आढळतात.
2 Oct 2014 - 5:06 pm | झकासराव
ओक्के जी. :)
29 Sep 2014 - 5:25 pm | बॅटमॅन
वा वल्लीशेठ. मान गये. प्रचंड माहितीपर.
29 Sep 2014 - 6:10 pm | गणपा
कोण म्हणतो रे तो की संपादक झालं की मंडळी लेखन करत नाहीत?
वल्ली शेट मन गये बॉस.
काय अब्यास.. काय अब्यास..... वाह वा!!!!
29 Sep 2014 - 8:57 pm | धन्या
अप्रतिम !!!
यातल्या बर्याच ठीकाणच्या बर्याचशा मुर्त्या वल्लीसोबतच पाहील्या आहेत.
वल्लीचा या विषयातील व्यासंग दांडगा आहे यात शंकाच नाही. अक्षरधारामध्ये जेव्हा काचेच्या डीस्प्लेमधील डॉ. ग. ह. खरे लिखित "मुर्तीविज्ञान" हे पुस्तक पाहतो तेव्हा मुखपृष्ठावरील रुपनारायण (की कसल्याशा) मुर्तीचा फोटो वल्लीने काढलेला आहे हे आठवून आमच्या या मित्राचा अभिमान वाटतो.
इतकंच काय एकदा दुसर्या दिवशी पहाटे वेरुळला जायचे म्हणून वल्लीकडे वस्तीला गेलो असताना वल्लीच्या आईने त्याची "कशाला रे नेटवर्किंगमध्ये गेलास बाबा. पुरातत्व खात्यात का नोकरी शोधत नाहीस?" अशी कान उघाडणी केल्याचे चांगलेच आठवते. :)
29 Sep 2014 - 11:30 pm | प्रचेतस
लैच :)
29 Sep 2014 - 11:56 pm | काउबॉय
.
30 Sep 2014 - 1:55 am | काउबॉय
हे वाचुन तर अराउंड एव्हरी सक्सेसफुल वल्ली देर इज अ धन्या असे म्हणावेसे वाटत आहे ;)
30 Sep 2014 - 9:57 am | डॉ सुहास म्हात्रे
पुरातत्व खात्यात का नोकरी शोधत नाहीस?"
हे मात्र एकदम पटलं. जेव्हा छंद व्यवसायही असतो तेव्हा दुधात साखर पडते. नेटवर्किंगने एक पुरातत्ववेडा हिरावून नेलेला आहे हे मात्र खरे ! :)30 Sep 2014 - 7:13 pm | अर्धवटराव
वल्ली पुरारत्व खात्यात गेला असता तर उगाच फायली, वरिष्ठांचे अनावष्यक आदेश, पॉवर असुन नसल्याची तगमग यामधे त्याच्यातला संशोधक दबुन गेला असता.
असं म्हणतात कि आय.टी. पुरातत्व शोधन भारतात तगलं कारण ते सरकारी सावलीच्या बाहेर बहरलं.
3 Oct 2014 - 3:34 pm | हाडक्या
हे नवीनच..!! आम्ही वल्लींना पुरातत्व, उत्खनन वगैरे संदर्भातले कोणी तज्ञ समजत होतो.
या माहीतीने तर वल्लींच्याबद्दलचा आदर अजूनच दुणावला.!
30 Sep 2014 - 12:19 am | विकास
फोटो आणि लेख छानच आहे. आत्ताच वाचला. बरीच माहीत नसलेली माहिती समजली!
30 Sep 2014 - 6:17 am | कंजूस
मी पयला शेवटी.
भारतात लिंग आणि योनी पुजा पूर्वी अनार्य कालापासून आहे. इथे निसर्गाच्या सृजन शक्तीचे सतत अप्रुप वाटत राहिले आहे. शिव आणि शक्ति ही वेगवेगळ्या पूर्णरूपांत समोर येतात. आर्य कालात विष्णू,महालक्ष्मिसारखी सौज्वळ दैवते सुबत्ता असणाऱ्यांसाठी आली.अधयात्म उगाच आपले.त्यांना '{सधनता}आहे तैसेची राहो' याचाच विचार होता.
[माया संस्कृतीत पुनजन्म आणि इजिप्तमध्ये मृत्यू या कल्पना सतावत राहिल्या. ]
इतिहासाच्या पुस्तकांसाठी माती दगडाच्या अनादि पानांशिवाय आणखी कोणताही चांगला पर्याय नाही.वल्ली तुमचा अभ्यास फारच मंदगतीने चालला आहे कधी वाचणार ही सर्व पुस्तके या पृथ्वीतलावरची? {गंमतीने}.
या वल्लीला आणखी सतुती न करता डिवचले पाहिजे.आणखी कोणते स्पेशलाइझेशन वाढवणार आहेत बरं ते कळू द्या.
हा लेख फारच आवडला.
30 Sep 2014 - 9:10 am | प्रमोद देर्देकर
वल्लीसाहेब सॅल्युट तुम्हाला. एकदा तुम्हाला भेटले पाहिजे.
@ कंजुस साहेब- नुसत्या भारतातच नाही तर जपानमध्ये सुध्दा असा प्रकार चालतो. फालिक उत्सव (phallic-festival) म्हणुन अजुनही ते लोक साजरा करतात.
30 Sep 2014 - 9:32 am | माहितगार
https://en.wikipedia.org/wiki/Mother_goddess हा लेख पहा. सर्वच देशातील मूळ मानवी संस्कृतींच्या नैसर्गीक विकासात कोणत्या न कोणत्या स्वरूपात मातृकापूजन प्रचलीत असावे असे वाटते.
https://en.wikipedia.org/wiki/Sheela_na_gig ह्या शीला ना गीग प्रतिमा प्रथमदर्शनी लज्जागौरी प्रतिमां प्रमाणेच वाटतात.
30 Sep 2014 - 10:57 pm | पैसा
लज्जागौरी: हे स्त्रीच्या जननशक्तीचे देवतास्वरूप आदिम काळापासून जवळपास सर्व जगभर मानले गेलेले. रेणुका, यल्लम्मा, एकवीरा, जोगुळांबा, सांतेरी ही सगळी एकाच मातृशक्तीची रूपे मानली गेली आहेत. सांतेरी ही वारूळस्वरूपात पुजली जाते. वारूळ ही भूमीची योनी तर नाग हा पुरुषतत्त्वाचे प्रतीक मानला गेला. मुरुगन, खंडोबा, जोतिबा, रवळनाथ, भैरव हे क्षेत्रपाल त्यामुळे नागरूप मानले जातात. वारूळ आणि नाग हे स्त्री-पुरुष मीलनाचे आणि जननशक्तीचे प्रतीक ठरले. वारुळात रहाणारा नाग लज्जागौरीच्या शिल्पात का असावा त्याचं हे कारण आहे.
http://www.misalpav.com/node/25606 या धाग्यावरील प्रतिसादात काही माहिती लिहिली होती. ती इथे पेस्ट करीत आहे.
आसरा हा शब्द अप्सरा यावरूनच आला आहे. आणि मूळ मातृकांनाच लोकव्यवहारात साती आसरा हे नाव मिळाले. नुकतेच पं महादेवशास्त्री जोशी यांचे "भारताची मूर्तीकला" हे पुस्तक हाती आले आहे. त्यात ते म्हणतात की या मातृका म्हणजे ब्रह्मा, शिव, स्कंद, विष्णू, यम, इंद्र, रुद्र यांच्या क्रियाशक्ती आहेत. त्या आपापल्या स्वामींचीच आयुधे व वाहने धारण करतात. या ७ जणींत महालक्ष्मीचा अंतर्भाव केला की त्या अष्टमातृका होतात. काही लोक महालक्ष्मीच्या जागी योगेश्वरी किंवा चर्चिका यांची स्थापना करतात.
ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा |
वाराही च तथेन्द्राणी चामुंडा सप्तमातरः ||
असा त्यांचा उल्लेख असलेला श्लोक आहे.
या सप्तमातृकांच्या रक्षणासाठी एका बाजूला वीरभद्र तर दुसर्या बाजूला गणपती असतो. या सार्या वर्णनावरून त्या मूळ अनार्यांच्या देवता असाव्यात हे स्पष्ट आहे. या मुलांचे रक्षण करणार्या मातृका आहेत तशाच "बालघातिनी माता" सुद्धा वर्णन केल्या आहेत. त्यांच्यात पूतना चे नाव आहे. त्यावरून साती आसरांनी पाण्यात ओढून नेले किंवा कोणाचा बळी मागितला इ. कहाण्या प्रचलित झाल्या असाव्यात.
प्रत्येक मातृकेचा एक प्रिय वृक्ष असतो पाणवठ्याजवळ किंवा डोंगरकपारीत मातृकांची स्थाने असतात.विवाह वगैरे मंगलकार्यात सुपार्या मांडून मातृकापूजन करतात. तसेच सुलभ प्रसूतीसाठीही मातृकापूजन केले जाते. उत्तर भारतात या मातृका १६ मानल्या गेल्या आहेत. आणि तिकडे मातृकापूजन जास्त लोकप्रिय आहे.
स्त्रीरूपी गणेश/विनायकीबद्दल ढेरे म्हणतात की लक्ष्मीची मोठी बहीण म्हटलेली अलक्ष्मी (ज्येष्ठा) हिचे रूप विनायकाप्रमाणेच (गजमुख, लंबोदर इ.)वर्णन केले आहे. अलक्ष्मीचे सर्व गुण लक्ष्मीच्या उलट सांगितले आहेत. गणेश हा जसा विघ्नकर्ता आणि नंतर विघ्नहर्ता मानला गेला तशीच लक्ष्मी आणि अलक्ष्मी ही एकाच देवतेची द्वंद्वात्मक रूपे आहेत. अलक्ष्मी विघ्ने आणणारी देवता मानली गेली आहे. तशीच बालघातिनी सप्तमातृकांमधीलही एक मातृका मानली गेली आहे. उद्दालक मुनीने तिच्याशी विवाह करून तिच्या अशुभ आवडी पाहून तिचा त्याग केला अशी एक कथा आहे. गणेशाचे एक नाव ज्येष्ठराज आहे. तर लक्ष्मीबरोबर गज हे असतातच. अशा गजान्तलक्ष्मीचे चित्र दाराच्या पट्टीवर कोरण्याची पद्धत होती. असा हा लक्ष्मी, ज्येष्ठा आणि गणेश यांचा परस्पर संबंध आहे. या शिल्पांमध्ये मुळात कदाचित या अलक्ष्मीला स्थान दिलेले असावे. जे काळाच्या ओघात स्त्रीरूप गणेश असे मानले गेले.
विष्णु, महेश इ. देवांना त्यांची रूपे आणि गुण बहुधा गुप्तकाळात मिळाले. तशाच मातृकांनाही गुप्तकाळात सध्याची नावे आणि गुण शिल्पे तयार करण्यासाठी म्हणून दिले गेले असावेत. मातृकापूजा ही त्याच्याही फार आधीची. वेगळ्या नावांनी आणि मुख्यतः बालघातिनी स्वरूपात, त्यांनी मुलांचा घात करू नये म्हणून त्यांची पूजा आदिम काळापासून केली जात होतीच. आधीच्या काळात पूतना, षष्ठी, शकुनी, ज्येष्ठा (दु:सहा) शीतला, मातंगी इ मातृकांची नावे होती. स्कंद हा मातृकांचा पुत्र आणि मुळात तोही बालग्रह मानला गेला होता. नंतरच्या काळात त्यांच्या भीतीने पूजा करायचा रिवाज विसरला गेला आणि त्यांना आताचे वरद रूप मिळाले.
7 Oct 2014 - 2:58 am | काउबॉय
.
7 Oct 2014 - 5:58 am | स्पंदना
__/\__!!
2 Oct 2014 - 10:09 am | जेपी
आवडल.
2 Oct 2014 - 3:38 pm | यशोधरा
सुरेख धागा वल्ली. खूप आवडला. वाचनखूण साठवली आहे.
3 Oct 2014 - 9:29 pm | दशानन
लेख अप्रतिम!
4 Oct 2014 - 10:23 am | मिसळलेला काव्यप्रेमी
धन्य आहेस रे बाबा!!
7 Oct 2014 - 5:59 am | स्पंदना
हुश्श!!
संपला एकदाचा वाचुन लेख.
एकेक शिल्प बघत संदर्भ पहात लेख संपता संपत नाही वल्लींचा.
7 Oct 2014 - 11:43 pm | माहितगार
वल्लींसाठी काही प्रश्न काही शंका, अशी काही शिल्पे आहेत का की शिल्प कालावधी आधीचा असण्याची शक्यता असेल आणि संस्कृतातील मिथक रचनेचा संभाव्य काळ नंतरचा असेल. जाणून घेण्याचा उद्देश हा की काही लोककथा संस्कृत मिथकांनी दखल घेण्या पुर्वी पासूनच्या असू शकतील का ? कारण असंख्य भारतीय शिल्पातून अॅक्रॉस इंडीया प्रतिकांचा नेमकेपणा काटेकोरपणे जपला गेला असावा असे वाटते. ज्या काळात चित्रकलेसाठी कागदासारखे एका ठिकानाहून दुसर्या ठिकाणी चित्र नेण्याचे चांगले माध्यम नव्हते. संस्कृत जाणणार्या प्रत्येकाला स्वतःला शिल्पकला येत नसेल आणि शिल्पकला येणार्या प्रत्येकाला संस्कृत येत नसेल. एकच शिल्पकार कितीही म्हटले तरी त्या काळात अडवळणाच्या जागी जाऊन किती लेण्यांचा अभ्यासकरून लक्षात ठेऊन पुन्हा दुसर्या जागी जाऊन सेम टू सेम प्रतिकांची शिल्पे बनवणार.
अर्थात मातीच्या अथवा दगडाच्याही ट्रांसपोर्टेबल छोट्या छोट्या प्रतीमा बनवून दुसर्या शिल्पकारांना डेमोसाठी म्हणून उपलब्ध केल्या जाण्याची तुरळक शक्यता असू शकेल पण तसे असेल तर तसा उल्लेख कुठे मिळतो का ?
8 Oct 2014 - 8:51 am | प्रचेतस
तशी बरीच आहेत. मुख्यतः अवैदिक शिल्पे उदा. गणेश वगैरे. अर्थात ही शिल्पे घडवली गेली तदनंतर. पण काही उत्खननांत हत्ती मुखाची टेराकोटा शिल्पे आहेत. शिवाय योनी, लिंग आदी जननशक्तीसंदर्भातही बरीच शिल्पे सिंधू खोरे, राखीगढी, इनामगाव,, नेवासा इथल्या उत्खननांमध्ये मिळाली आहेत. अशा प्रकारची शिल्पे नंतर वैदिकांमध्येही समाविष्ट झाली.
तसे काही उल्लेख नाहीत पण एकंदरीत मौर्यकालीन शिल्पकलेवर ग्रीक, रोमन शैलीचा मोठा प्रभाव होता. संस्कृतींचे आदानप्रदान व्यापारानिमित्ताने इकडून तिकडे होत राहिल्यामुळे शिल्पशास्त्रातही तदनुषंगाने बदल घडत गेले.
6 Sep 2021 - 3:19 pm | Bhakti
आज पिठोरीनिम्मित हा फोटो कायप्पावर आला,मागच्या ढोकेश्वरचा लेख वाचून हा सप्तमातृका पट आहे हे लगेच ओळखता आले,मग हा लेख वाचला.पैसाताईंचा प्रतिसादही छान आहे.प्रश्न असा आहे की ह्या फोटोत बाळ का दिसत नाही? आणि प्रत्येकीच्या हातात वेगळी आयुधे आहेत ना?
7 Sep 2021 - 9:15 am | प्रचेतस
सप्तमातृकापटच आहे मात्र अपूर्ण आहे. डावीकडे वीरभद्र आणि उजवीकडे गणेश याशिवाय मातृकापटाला पूर्णत्व नाही.
बैल-माहेश्वरी, मोर-कौमारी, वराह- वाराही, प्रेत-चामुंडा आणि हत्ती-इंद्राणी या मातृका लगेच ओळखू आल्या. त्यांच्या हातातील आयुधे त्यांच्या इष्ट देवतांच्या असतात.
7 Sep 2021 - 11:11 am | Bhakti
प्रचेतस माहितीसाठी खुप खुप धन्यवाद!
7 Sep 2021 - 11:36 am | तनमयी
सुरेख धागा वल्ली. खूप आवडला. वाचनखूण साठवली आहे.