(हेच वर्णन इंग्रजीमध्ये माझ्या ब्लॉगवर येथे वाचता येईल)
काश्मीरला जोडणारी रेल्वे हा एक अवाढव्य आणि आश्चर्याने तोंडात बोटे घालायला लावणारा प्रकल्प आहे. मी काही इंजीनीअर नाही. पण या रेल्वेमार्गावर निर्माण होऊ घातलेला चिनाब नदीचा पूल पाहताच हे एक जगावेगळे आणि असामान्य महत्वाकांक्षी प्रकरण आहे, हे समजायला कोणालाही अभियांत्रिकी विद्येची गरज भासू नये.
कटरा (वैष्णोदेवी) ते काझीगुंड हा या प्रकल्पाचा सर्वात खडतर टप्पा आहे. या पर्वतीय भूभागात, साधारण २०० किमी लांबीचा हा लोहमार्ग बनवता यावा म्हणून रेल्वेने आधी सुमारे ७०० किमीचे रस्ते बांधले आहेत, यावरून कल्पना करावी. मुळात पीरपंजाल पर्वतरांगात लोकवस्ती विरळ. जी लहानसहान गावे आहेत, ती बहुतेक गाडीरस्त्यापासून (किमान) पाच ते सहा तास दूर आहेत. याअगोदर मैलोनमैल भागात रस्तेच नव्हते. रेल्वेचे काम सुरू झाल्यापासून प्रथमच अशी कित्येक गावे रस्त्यांना जोडली गेली आहेत.
चिनाब रेल्वे पूल हा कुरी नावाच्या अशाच एका चिमुकल्या गावाजवळ आहे. त्याचे स्थानिक पातळीवर आत्तापासूनच "कुरी ब्रिज" असे नामकरण झाले आहे. एकूणच या भागात रस्त्यांची खस्ता हालत असल्यामुळे, पर्वतरांगातून वाट काढत, जीव मुठीत घेऊन धक्के खात तिथे पोचणे हे एक दिव्यच आहे. ("मागच्या आठवड्यात वरच्या आळीतला तात्या जोग जाऊन आला. चारपाच हाडं हरवली म्हणतो त्या गाडीत!" इ.)
एकूण, तीव्र इच्छाशक्ती आणि वैष्णोदेवीचा आशीर्वाद दोन्ही आवश्यक!
कटरा येथून रियासीमार्गे अर्नास गावी पोहोचावे. तेथून उजवीकडे वळून सरोंडी नामक खेड्यावरून पुढे कुरीला पोहोचता येते. वाटेत सरोंडी गावात रेल्वेने बनवलेले बांधकामसाहित्याचे महाकाय गोदाम दुरूनच दिसू लागते.
नियोजित पुलाचे स्थान तिथून जवळच आहे.
(यापुढील वर्णन शक्यतो जे दिसले आणि ऐकले त्याप्रमाणे केलेले आहे. तांत्रिक चुका अथवा उणीवा आढळल्यास जाणकारांनी दुरुस्त कराव्यात. स्वागतच आहे.)
हा पूल प्रचंड आणि सरळसोट अशा दोन कड्यांना जोडेल. सध्या या दोन बाजूंना सांधणारा कोणताही मार्ग अस्तित्वात नाही. मधून वाहणारी चिनाब नदी विहंगदृष्टीने अवलोकिल्यास (सांडलेल्या!) बशीभर पाण्याइतकी भासते. पुलाची पाण्यापासूनची उंची सुमारे ३५० मीटर आहे.
पूल बांधण्यासाठी दोहोबाजूंना सुमारे १५० मीटरचे दोन मनोरे उभारण्यात आले आहेत (तुलना: विद्युतवाहिन्यांचे मनोरे हे साधारणपणे ४० ते ५० मीटरचे असतात. तसेच छायाचित्रात तळाशी दिसणारी कार पहावी.). त्यावर कप्प्या लावून सामानाची आवकजावक होते. अवजड सामान उचलण्यासाठी क्रेनही तिथे उंचावर बसवण्यात आल्या आहेत. मला असे वाटले की प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईल, तेव्हा पुलाचे अजस्र हिस्सेसुद्धा याच कप्प्यांवरून बहुधा वाहून नेले जातील.
विशेष म्हणजे हे भीमरूपी मनोरे केवळ एका मध्यवर्ती स्प्रिंगवर तोलले जातात. त्यांचे चार पाय हे हवेत डुलत असतात. कारण त्या उंचीवर सतत वाहणारे सुसाट वारे. जर मनोरा चार पायांवर उभा ठाकला, तर वादळी वारे त्याला मोडून टाकू शकतात. असे झालास मनोरा सरळ चिनाबास्तृप्यंतु होईल आणि पुन्हा दिसणारही नाही. त्यामुळे त्याला "झोपाळ्यावाचून" झुलायला वाव देण्यात आला आहे.
पुलाकडे येणारा लोहमार्ग त्याच उंचीवरून नेण्यासाठी तितकेच विशाल स्तंभ उभारण्यात आले आहेत. (तुलना: छायाचित्रात बाजूला दिसणारी घरे.)
पैलतीरावर मातीची ने-आण करणारे मालवाहू ट्रक हे केवळ मुंग्यांएवढे दिसतात.
या पुलाची निर्मिती उत्तर रेल्वे आणि को़कण रेल्वे यांनी संयुक्तरीत्या स्थापन केलेली "अॅफकॉन" ही कंपनी करीत आहे. पुलाचे एक लघुशिल्प कंपनीच्या कार्यालयाबाहेर पहायला मिळते.
येथील स्थानिक दैवत "चनैना देवी" हिचे मंदिर कंपनीने उभारून दिले आहे. हे मंदिर उभारल्यावर कामातील वारंवार येणारे अडथळे दूर झाले असे गावकरी अभिमानाने सांगतात.
पुलाचे एक कल्पनाचित्र आंतरजालावरून साभार.
याहून अधिक तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे हे वर्णन इथेच आवरते घेतो. जिज्ञासूंनी आपल्या यापुढील शंका डॉ. के. के. गोखलेसाहेबांना विचाराव्यात. धन्यवाद!
******
नियोजित चिनाब रेल्वे पूल.
कसे पोचावे:
जम्मूवरून कटरा - रियासी - अर्नास मार्गे सुमारे ४ तासाचा प्रवास. अत्यंत दुर्गम मार्ग. (कटरापासून सुमारे ३ तास). शेवटचे ८-१० किमी अंतर हे रेल्वेने निव्वळ बांधकामसामग्री नेण्यासाठी काढलेल्या कच्च्या, जुजबी रस्त्याने कापावे लागते.
अन्य पाहण्याजोगे:
चहूदिशांना अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि सतत साथ देणारी चिनाब नदी.
राहण्यासाठी सोयः
कंपनीच्या अतिथीगृहाशिवाय काहीही नाही. गोखलेसाहेबांचा वशिला लावावा अगर कटराला आपल्या विश्रामगृहात परत यावे.
प्रतिक्रिया
17 Aug 2014 - 10:40 pm | खटपट्या
जबरी !! या पुलावरून जेव्हा रेल्वे धावेल तेव्हा प्रवाश्यांनी बाहेर पाहिल्यास त्यांना विमानात बसल्याचा भास होईल !!
17 Aug 2014 - 11:17 pm | सुहास झेले
व्वा... सहीच !!
खूप दिवस झाले ह्या पुलाच्या बांधकामाचे फोटो सोशल नेट्वर्किंग साईट्सवर फिरत होते.... Hats off टू इंजिनिअर्स !!
17 Aug 2014 - 11:39 pm | मुक्त विहारि
धन्यवाद..
18 Aug 2014 - 1:27 am | डॉ सुहास म्हात्रे
भन्नाट प्रकल्प दिसतोय ! पूर्ण झाल्यावर भारतिय अभियांत्रिकीचा मुकुट्मणी शोभेल !!
या प्रकल्पाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !
19 Aug 2014 - 4:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
माहिती आवडली. याशिवाय या पुलामुळे किती गावांचं अंतर कमी होईल, किती लोकांचा फायदा होईल वगैरे माहिती असेल तर ती सुद्धा वाचायला आवडेल. (असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प फक्त अभियंत्यांची खाज म्हणून निश्चितच बनत नाहीत.)
19 Aug 2014 - 7:28 am | कैलासवासी सोन्याबापु
च्यायला हा पुल फ्रांस च्या मिलाऊ ब्रिज चा पण विक्रम मोडतोय की काय देव जाणे!!!!, भारतीय रेल्वे इंजिनियर्स ना असले अशक्य गोवर्धन उचलायची हौस अन हातोटी आहे भो!!!!, अमेरिकन कन्सल्टंट्स ने सुद्धा "भारताच्या पश्चिम किना-यावर रेल्वे बनवणे अशक्य आहे" असा निर्वाळा दिला असताना ई. श्रीधरन अन बोजी राजाराम ह्यांच्या सारख्या आधुनिक विश्वकर्म्यांनी ती चॅलेंजेस उचलली अन लिलया उचलुन फेकुन दिली!!! हॅट्स ऑफ!!! _/\_
19 Aug 2014 - 1:26 pm | प्यारे१
>>> लिलया उचलुन फेकुन दिली!
नै म्हणजे बरोबरे तुम्ही म्हणताय ते पण लिलया उचलून फेकली वगैरे अतिशयोक्ती नाही वाटत का? कोकण रेल्वे प्रत्येक पावसाळ्याच्या दिवसात बर्याचदा ढेपाळते.
कॉस्ट किती वाढली आहे त्या प्रोजेक्टची त्या तुलनेत रेवेन्यु किती वगैरे नाही विचारत कारण सरकारी कामं बर्याचदा गरज म्हणून केली जातात.
20 Aug 2014 - 3:31 pm | नन्दादीप
रेवेन्यु किती म्हणत असाल तर कायम कोकण रेल्वे ओसंडून वहात असते.... ३६५ पैकी कोणत्याही दिवशी आरामात बसून येवून दाखवा... सांगाल ते हरेन.....
गणपती, शिमगा, उन्हाळी सुट्टी या साठी स्पेशल ६०-७० ट्रेन सोडतात त्या काय रेवेन्यु नसतो म्हणून???? बरे आगाऊ आरक्षण म्हणाल तर आरक्षण चालू झाल्यानंतर १०-१५ मिनिटात सगळ्या गाड्या फूल....
20 Aug 2014 - 3:54 pm | प्यारे१
प्रवाशांच्या तिकीटांतून रेल्वे प्रोजेक्ट कॉस्ट रिकव्हर करते असं म्हणायचं असल्यास .... अभ्यास वाढवायला हरकत नाही.
9 Feb 2016 - 2:56 pm | आदिजोशी
रेलवे, रस्ते, इत्यादी कामं सरकार त्यातुन फायदा मिळवण्यासाठी करत नाही. त्या दळवळण, उद्योग, व्यापार, निवास असल्या गोष्टींसाठीच्या बेसिक गरजा आहेत. त्यांच्या खर्च प्रत्यक्ष वापरकर्त्यांकडून निघणे हा अधीकचा फायदा मानायला हरकत नाही.
उ.दा. मुं-पु ई वे च्या खर्चाचा टोल आपण अजूनही कैक वर्ष भरत राहणार आहोत. पण त्यामुळे व्यापार-उदिमाला मिळालेल्या चालनेमुळे हजारो कोटी रुपयांचा महसूल सरकारच्या तिजोरीत कधीच जमा झालेला आहे. तस्मात, असल्या तुलना करू नये. हाताला काही लागत नाही.
19 Aug 2014 - 8:58 am | चौकटराजा
उधमपूर ते जम्मू हा प्रवास मी रेलेवे ने केलाय .या सेगमेंट मधे ही दोन तीन टेरर पूल आहेत.
19 Aug 2014 - 12:12 pm | खुशि
छान माहिती. अमरनाथ यात्रेला जाताना बरेच काम बघायला मिळाले होते.फोटो सुन्दरच आहेत.
19 Aug 2014 - 12:13 pm | राही
या पुलाविषयी बरीच माहिती कानावर पडत होतीच. आज छायाचित्रे पाहून खरोखर आपल्या अभियंत्यांचा आणि योजनाकारांचा (प्लॅनर्स) अभिमान वाटला. हा प्रकल्प केवळ नागरी उपयुक्ततेचा नक्कीच नसावा. त्याला थोडेसे लष्करी परिमाणही असावे, म्हणजे आहेच.
ईशान्य भारतातील अत्यंत अवघड आणि दुर्गम जागी बांधलेले रस्ते आणि पूल पहाताना असाच अभिमानाने ऊर भरून येतो. भुटान मधला इंदिरा गांधी राजरस्ता हाही आपल्या भारतीय लष्कराची आणि अभियंत्यांची कमाल करामत आहे.
एका चांगल्या प्रकल्पाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
जय हो!
20 Aug 2014 - 6:06 pm | कवितानागेश
अभिमान वाटला.
19 Aug 2014 - 2:21 pm | धन्या
माहितीपुर्ण लेख आवडला.
8 Feb 2016 - 7:08 pm | यशोधरा
चांगला लेख. माहितीबद्दल धन्यवाद!
9 Feb 2016 - 12:55 pm | गामा पैलवान
चलत मुसाफिर,
लेखाबद्दल धन्यवाद! आकडे पाहूनच डोळे फिरले. प्रत्यक्ष पूल पाहिल्यावर आकाशात गटांगळ्या खाणं होईल! :-)
आ.न.,
-गा.पै.
10 Feb 2016 - 3:34 pm | नया है वह
+१