कोल्हापूरी मसाल्याच्या अनेक पाककृती आंजावर, पुस्तकांमध्ये शोधल्या आणि मग माझ्या अंदाजाने , आमच्या चवीत बसेल अश्या प्रमाणात तो बनवला.
कोल्हापूरी मसाला साहित्यः
१०-१२ लाल सुक्या मिरच्या
३-४ तमालपत्र
२ टेस्पून सुके खोबरे
३-४ लसूण पाकळ्या
३-४ कढीपत्ता
४ हिरवे वेलदोडे
१ दालचिनीची काडी
१/२ टीस्पून काळीमिरी
३ मसाला वेलदोडे
१/२ टीस्पून लवंगा
१ नागकेशर
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून हिंग
१ टीस्पून खसखस ( पांढरे तीळ माझ्याकडे नव्हते, असल्यास ते ही १ टीस्पून घ्यावे)
१ टीस्पून धणे
थोडेसे दगडफूल
१ टीस्पून शहाजीरे
मीठ
पाकृ मसाला:
एका नॉन-स्टीक पॅनमध्ये १ चमचा तेलावर काळीमिरी, हिरवे वेलदोडे, मसाला वेलदोडे, दालचिनी,धणे, शहाजीरे, दगडफूल, नागकेशर, खसखस, लवंगा परतवून घ्यावे.
एका ताटात हा खडा-मसाला काढून घ्यावा व त्याच पॅनमध्ये थोड्या तेलावर सुक्या मिरच्या व तमालपत्र खमंग परतवून घ्यावे. ते ही त्याच ताटात काढून पॅनमध्ये आधी कढीपत्ता कुरकुरीत तळून घ्यावा व त्याच पॅनमध्ये लसूण + सुके खोबरे खमंग भाजून घ्यावे.
सर्व मसला एकत्र करावा व पूर्ण गार झाल्यावर मिक्सरवर बारीक दळावे.
वाटलेल्या मसाल्यात थोडे हळद, मीठ घालून पुन्हा एकदा मिक्सरवर फिरवून घ्यावे. ( हळद, मीठाबरोबरच आता हवे असल्यास एक चमचा काश्मिरी मिरची पावडर ह्यात मिसळु शकता)
तयार मसला हवाबंद डब्यात भरून ठेवावा.
लागेल तसा उसळी, चिकन, मटणात वापरु शकता.
साहित्य चिकन रस्सा:
१ किलो चिकन साफ करुन आले + लसूण + हि. मिरची पेस्ट लावून मॅरिनेट करावे.
१ छोटा कांदा बारीक चिरलेला
२-३ लसूण पाकळ्या
१/२ वाटी खोवलेला ओला नारळ
थोडीशी कोथींबीर
१/२ छोटा कांदा चिरलेला फोडणीसाठी
३ टेस्पून तयार कोल्हापूरी मसाला (आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
१/२ टीस्पून हळद
मीठ चवीनुसार
पाकृ:
एका पॅनमध्ये थोड्या तेलावर लसूण पाकळया परतवून घ्यावा.
त्यातच बारीक चिरलेला कांदा टाकून गुलाबीसर परतवून घ्यावा.
आता त्यात ओला नारळ घालून तांबुस रंगावर परतणे.
थोडे गार झाले की मिक्सरच्या भांड्यात सगळे एकत्र करावे, त्यात थोडी कोथींबीर घालावी व थोडे पाणी घालून मुलायम वाटून घ्यावे.
मोठ्या भांड्यात तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा घालून परतवून घ्यावे.
वाटलेला मसाला घालून चांगले परतावे.
त्यात मॅरिनेट केलेले चिकन, हळद, कोल्हापूरी मसाला घालून एकत्र करावे व परतावे.
आवश्य्कतेनुसार पाणी घालून, झाकून शिजवावे.
चिकन शिजत आले की चवीपुरते मीठ घालावे व झाकून पुन्हा शिजू द्यावे.
झणझणीत कोल्हापूरी चिकन रस्सा खाण्यासाठी तयार आहे.
आवडीप्रमाणे भाताबरोबर, भाकरी, वडे, आंबोळी, घावन्यांसोबत गरम सर्व्ह करावे.
प्रतिक्रिया
23 Jul 2014 - 1:22 pm | आयुर्हित
मानले आपल्याला, शोधाशोध करुन बनवलेली पाकॄ उत्तम आहे हो.
23 Jul 2014 - 1:27 pm | अनुप ढेरे
जेवणाच्या वेळेला हे असले फोटो टाकण्यात काय आनंद मिळतो? छ्या:
23 Jul 2014 - 1:39 pm | एस
जब देखो तब हमारे वजन कम करनेके निश्चय को सुरुंग लगाता हय.
बाकी ते चिकन किती वेळ मॅरिनेट करून ठेवायचं (मुरवत ठेवायचं हे कसं वाटतं?). आणि हो, हे फोटू कोण काढतं बरं? म्हणजे तुम्ही पाकृ बनवत असताना? :-)
23 Jul 2014 - 2:03 pm | सानिकास्वप्निल
चिकन अर्धा तास जरी मुरवत ठेवले तरी चालेल, बाकी मॅरिनेट, मुरत, मुरवत काहीही म्हणा :)
आणि हे फोटो मीच काढते पाकृ बनवताना, अगदी पाकृपासून प्रेझेंटेशनपर्यंत .
धन्यवाद.
23 Jul 2014 - 3:16 pm | एस
मला फूड फोटोग्राफी शिकवाल का? :-)
23 Jul 2014 - 4:44 pm | सानिकास्वप्निल
आम्ही काय शिकवणार ...आम्ही तुमच्याकडून शिकणार :)
मला फारसे त्यातले टेक्निकल कळत नाही , आवड म्हणून फोटो काढते, त्यात फूड फोटोग्राफी बरी जमते. फोटोग्राफीबरोबरच पदार्थाचे सादरीकरण ही मह्त्वाचे असावे असे वाटते, म्हण्जे सर्व्ह करायचे भांडे, प्लेट्स, त्याची रंग-संगती, प्लेसमॅट्स, किचन टॉवेल्स, काही फूड प्रॉप्सचा वापर, फोटो काढताना बॅक लाईटचा वापर (मी नॅचर्ल लाईटचा जास्तं वापर करते) आणि मुख्य म्हणजे भांडी किमान ज्याच्यात सर्व्ह करणार आहोत ती स्वच्छ असावी, सर्व्हिंग टेबल स्वच्छ असावे.
मी काहीवेळेला खिडकी चे बॅकग्राऊंड, खुर्ची, टेबल, वुडन बोर्डचा वापर ही करते फोटो काढण्यासाठी. सध्या तितकी जागा नाही म्हणून मला काही गोष्टी करता येत नाहीये, पण लवकरच मी घरगुती लाईट बॉक्सचा वापर , वुडन प्लँक्सचा वापर करायचे ठरवले आहे आणि तशी शोधा-शोध ही करत आहे.
अगदीच बेसीक डिटेलींग करते, हा पण आय किप प्रॅक्टिसींग :)
धन्यवाद.
23 Jul 2014 - 5:32 pm | एस
बघा! आणि म्हणताहेत फूड फोटोग्राफी काय शिकवणार! :-) अहो हीच तर फूड फोटोग्राफी... तुम्हांला झक्कास जमतेय की. तांत्रिकता नंतर येते हो. आधी विषयात रस असला पाहिजे. इथे तर अन्नपूर्णाच स्वत: छायाचित्रणही करतेय मग अजून काय पाहिजे! :-)
आमचं जाऊ द्या. आम्हांला विषयात जरा जास्तच रस असतो त्यामुळे फोटोग्राफी करायला फूडच शिल्लक रहात नाही. ;-)
23 Jul 2014 - 6:43 pm | बॅटमॅन
आम्हांलाही!!!
(वैषयिक आपलं विषयप्रेमी ;) ) बॅटमॅन.
23 Jul 2014 - 7:31 pm | टवाळ कार्टा
ते विषय वेगळे असतात बाबा ;)
23 Jul 2014 - 7:44 pm | प्यारे१
स्टॅण्ड बदलला काय? ;)
'विषयद्वेष्टा' म्हणून होऊ घातलेली अथवा झालेली ओळख बदलण्याच्या निर्णयाबद्दल हार्दिक अभिनंदन.
23 Jul 2014 - 8:33 pm | बॅटमॅन
अरेरेरेरे.....तुमच्यासारख्या अधि़कारी व्यक्तीने षड्रिपूंची वाजवायची सोडून त्यांची अशी भलामण केल्याचं पाहून वाईट वाटलं. :)
23 Jul 2014 - 10:03 pm | प्यारे१
आपण 'विषयां'मध्ये असलं तरी फारसं बिघडत नाही. मात्र आपल्या आत 'विषय' नको.
बाकी एखाद्या विषयात 'जास्त रस' घेऊन त्यातच बॅचलर्स पदवी घालवावी. :)
चिकनचा धागा आहे. सध्या त्यात रस घ्या.
24 Jul 2014 - 1:46 am | बॅटमॅन
कृपया आपल्या भक्तगणांना उपदेश करण्यात रस घ्या. नाही तिथे नको. कसं?
24 Jul 2014 - 12:55 pm | प्यारे१
:)
23 Jul 2014 - 8:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रथम सुंदरसुंदर पाकृ जिवघेण्या फोटोंसह टाकणार आणि मग त्याला असे विनयाने गार्निश करणार !
हे म्हणजे हिर्याला सोन्याचे कोंदण झाले :)
23 Jul 2014 - 4:11 pm | यशोधरा
सानिका, खरेच धागा काढ. मला पण आवडेल शिकायला फूड फोटोग्राफी.
23 Jul 2014 - 1:42 pm | स्वाती दिनेश
चिकन रस्सा लै भारी दिसतोय..
स्वाती
23 Jul 2014 - 1:51 pm | प्यारे१
>>> हे फोटू कोण काढतं बरं?
एवढी फेमस होत असेल तर चिकननं 'सेल्फी' क्लिक केली तर नवल काय? ;)
(स्वॅप्स विचारतोय फोटो कोण काढतं म्हणजे नक्कीच कौतुक आहे)
23 Jul 2014 - 1:51 pm | सस्नेह
दिसतो आहे रस्सा !
कोल्हापुरी, जगात भारी ! *i-m_so_happy*
23 Jul 2014 - 2:00 pm | भिंगरी
कोल्हापुरी मसाल्याला चटणी म्हणतात
23 Jul 2014 - 2:03 pm | सानिकास्वप्निल
ती कांदा-लसूण मसाल्याला म्हणतात असे माहित आहे.
23 Jul 2014 - 2:06 pm | भिंगरी
जाळीदार घावने बघून तोंडाला इतके पाणी सुटले कि इथे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
सानिका स्वप्नील लवकर आपत्कालीन व्यवस्थापन मंडळ पाठवा.(घावने घेऊन.)
23 Jul 2014 - 2:10 pm | दिपक.कुवेत
फोटो पाहुन तोंपासु शब्द सुद्धा फिका पडावा. मसाला करुन ठेवायला हवा. छानच आहे. एक शंका आहे...हे तमालपत्र मिक्सरमधे एवढं बारीक वाटलं जात? आय मीन नंतर कचकच नाहि ना लागत?
23 Jul 2014 - 4:45 pm | सानिकास्वप्निल
तमालपत्र मिक्सरमधे वाटलं जातं थोडं जास्तं फिरवायचे..कचकच नाही लागत.
23 Jul 2014 - 2:14 pm | Mrunalini
वा.. काय मस्त दिसतय चिकन. आ़ संध्याकाळी चिकनचाच बेत आहे. तर आता आज असा मसाला करुन बनवते चिकन.
23 Jul 2014 - 2:18 pm | यशोधरा
झक्कास!
23 Jul 2014 - 2:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देवा... अरे दया कर रे, आमच्यावर..आमच्या पुण्याईने आम्ही स्वर्गात जावू पण असे फोटो पाहिल्यावर आमचे आत्मे असेच भूतलावरच भटकत राहतील ना भो...!
--दिलीप बिरुटे
23 Jul 2014 - 2:44 pm | अजया
उगाचच चक्कर टाकून ,फोटो पाहून गेले.ते मस्त्,सुंदर ,अप्रतिम वगैरे वगैरे..
23 Jul 2014 - 2:52 pm | मुक्त विहारि
पा.क्रु. आवडली...
वाचली...
लाळ गळली...
इ. इ.
23 Jul 2014 - 2:56 pm | प्रभाकर पेठकर
कोल्हापुरी कोंबडी म्हणून, डोळे मिटल्यावर जी कोंबडी डोळ्यासमोर येते, अगदी तश्शीच आहे.
करून पाहीन (आणि खाईन).
23 Jul 2014 - 3:00 pm | त्रिवेणी
दरवेळी कौतुकाचे नवीन शब्द नाही सुचत बाई. नेहमीप्रमाणेच सुंदर.
आंबोळीची रेसीपी आधी दिली आहेस का? नसेल तर दे प्लीज.
23 Jul 2014 - 3:10 pm | शिद
आहाहा!!!! शेवटचा फोटो क्लासच. *ok*
गटारीला हाच बेत करायला हवा.
23 Jul 2014 - 3:17 pm | पिलीयन रायडर
आता चिकनचा आणि आपला काही संबंध...पण तरी...
जित्याची खोड....
तू मास्टरशेफ मध्ये का जात नाहीस ग?
24 Jul 2014 - 6:03 pm | चिंतामणी
सहमत.
टिप- तीथे तुला फोटोग्राफी करायची गरज भासणार नाही. तुझे शुटींग करुन वाजत गाजत दाखवले जाईल.
23 Jul 2014 - 3:27 pm | टवाळ कार्टा
ठाण्यात कुठे मिळते का हे असले काही??? आल्यावर चापायचे आहे :)
24 Jul 2014 - 6:06 pm | चिंतामणी
क्षीण प्रयत्न.
24 Jul 2014 - 6:06 pm | चिंतामणी
क्षीण प्रयत्न.
23 Jul 2014 - 3:28 pm | मृत्युन्जय
मांसाहार करु शकत नाही म्हणुन हळहळलो. दिसतय तर लै भारी. यात चिकनऐवजी बटाटे आहेत अशी कल्पना करुन बघितली. लैच भारी वाटले ;)
23 Jul 2014 - 3:36 pm | युगन्धरा@मिसलपाव
मस्त मस्त...........
23 Jul 2014 - 4:07 pm | सुहास झेले
खल्लास.... !!
23 Jul 2014 - 6:24 pm | रेवती
उत्तम फोटू, सुरेख सादरीकरण.
23 Jul 2014 - 7:51 pm | मधुरा देशपांडे
नेहमीप्रमाणेच उत्तम फोटू, सुरेख सादरीकरण
23 Jul 2014 - 8:22 pm | अत्रुप्त आत्मा
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआआआआआआआआआ .. रस्सा बगून गत्प्रान झालो ना आमी!
अतृप्त आत्मू
.............फुल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल करंsssssssssssssssट!!!!
येकदम ४४० व्होल्ट गुनिले १००० चा झटका बसनार बगा..ह्यो असला,असली रस्सा पिल्याव!
ह्यो रस्सा बिगरचिकन बनावला,नी तेच्यात लसून मारलेली बट्टाटा भाजी न मुठभर फरसान/कांदा टाकलं..आनी आर्दी लादी पावा संगाट हानलं...तर कमीतकमी धा किलोमिटर नानश्टॉप पळत जान्या इतकी पावर येनार ..ह्ये नक्की!
============================
लाल रश्याचा फॅण---
23 Jul 2014 - 8:32 pm | vikramaditya
सानिका,
या पुर्वी कधी बटर चिकन ची रेसिपी दिली होतीत का? असेल तर प्लीज लिंक द्या.
23 Jul 2014 - 9:15 pm | मयुरा गुप्ते
अतिशय आखिव रेखीव मांडणी आणि सादरीकरण्..रोजच्या स्वयंपाकाला किंवा एका विशिष्ठ पदार्थ बनवताना पाककलानिपुणतेची खरी कसोटी चव व तितक्याच तन्मयतेने केलेली पेशकश..वाह..व्वा!
-मयुरा.
24 Jul 2014 - 1:50 pm | ब़जरबट्टू
हेच म्हणतो सानिकाजी.. मानलं बुवा तुमच्या स्किल ला... :)
23 Jul 2014 - 9:58 pm | पैसा
नेहमीप्रमाणे शिश्टिम्याटिक पाकृ आणि जबरदस्त फोटो!
23 Jul 2014 - 11:19 pm | हरकाम्या
एकदम झकास, या गटारीला करुन बघतो.
23 Jul 2014 - 11:35 pm | मराठे
म्मार डाला!
24 Jul 2014 - 1:43 am | खटपट्या
अरारारा !!! करुन बघायलाच पाहीजे ! येत्या रविवारी पक्का !!
24 Jul 2014 - 11:57 am | Maharani
वा वा अप्रतिम ....सादरिकरणाला तोड नाही *ok*
24 Jul 2014 - 1:55 pm | ब़जरबट्टू
अगदी तोपांसु..
पण तो वाटरमार्कचा कशाला ? आम्ही कधी शंका घेतलीय का ?? :)
24 Jul 2014 - 2:07 pm | यशोधरा
असूदेत वॉमा. आमच्या सानिकाचे फोटो कोणी ढापले म्हंजे? *dirol*
24 Jul 2014 - 2:34 pm | प्रभाकर पेठकर
छायाचित्रांना ढापणार्यांना जलखुणांनी (वॉटर मार्क्सनी) कांही फरक पडत नाही. जलखुणा पुसता येतात.
पण ह्या छायाचित्रांमधील जलखुणा नजरेस खुपणार्या आणि छायाचित्रांना उणेपणा आणणार्या नाहीत.
24 Jul 2014 - 2:48 pm | यशोधरा
कायमच्या जलखुणा. http://kb2.adobe.com/community/publishing/851/cpsid_85127.html
24 Jul 2014 - 3:04 pm | सानिकास्वप्निल
अगदी बरोबर आंजावर तसे काही फार सुरक्षित नाही पण तो वॉमा टाकण्याचा माझा उद्देश फक्त माझ्या ब्लॉगपुरताच आहे, कारण मागे माझ्या ब्लॉगवरुन माझे छायाचित्र चोरून कुणीतरी स्वतःहाच्या साईटवर लावले होते. सध्या तरी माझ्या ब्लॉगवर ह्याची काळजी घेतली आहे, पण ब्लॉग व्यतिरिक्त माझ्या पाककृती मी मिपा व फुडीमॅजिकवर देते त्यामुळे ब्लॉगवर देणारे छायाचित्रं इथेसुद्धा देते, वेगळे , वॉमा नसलेले देत बसत नाही.
बाकी तुम्ही शंका घेताय असे माझे म्हणणे अजिबात नाही आणि दुसरे कुणी वॉमाचा वापर केला तरी मला त्याचे छायाचित्र बघायला काही वेगळे वाटत नाही.
धन्यवाद.
24 Jul 2014 - 2:47 pm | ब़जरबट्टू
असं कसं हो, आता उद्या तो चिकनवाला प्रत्येक तंगडीवर "आमिर" असा ठसा उमटवायला लागला, तर चालेल का आपल्याला... :).
बाकी असा आ़क्षेप वैगरे नाही, पण तेव्हढीच मजा कमी होते... बघा जमलं तर..
24 Jul 2014 - 2:50 pm | यशोधरा
सानिकाने टाकलेले वॉमा नजरेला खुपणारे मुळीच नाहीत, त्यामुळे मजा वगैरे कमी होत नाहीये. उत्तम आणि सुरेख फोटो आहेत. लहान बाळाला नाही का तीट लावत नजर लागू नये म्हणून, तसं समजा. हाकानाका. :)
24 Jul 2014 - 3:44 pm | दिपक.कुवेत
आमा मियां तुम आम खाओ यार....एवढि जीवघेणी पाकृ/नयनरम्य फोटो बघायचे सोडुन वॉमाच्या कुठे पाठि लागलाय???
24 Jul 2014 - 6:28 pm | यशोधरा
ओ कुवेती काका, मी कुठे मागे लागलेय वॉमाच्या? :)
24 Jul 2014 - 9:09 pm | दिपक.कुवेत
माझा तो प्रतिसाद बजरबट्टु ह्यांना उद्देशुन होता आणि +१ तु जे म्हणालीस त्या करीता:
"सानिकाने टाकलेले वॉमा नजरेला खुपणारे मुळीच नाहीत, त्यामुळे मजा वगैरे कमी होत नाहीये. उत्तम आणि सुरेख फोटो आहेत. लहान बाळाला नाही का तीट लावत नजर लागू नये म्हणून, तसं समजा" वोक्के?? *pleasantry*
24 Jul 2014 - 9:12 pm | यशोधरा
अय्यो काका, माझ्या प्रतिसादाखाली तुमचा प्रतिसाद होता म्हणून तसं वाटलं की हो. सॉरी बघा. :P
24 Jul 2014 - 9:25 pm | दिपक.कुवेत
अक्सर उमर होने के बाद एसाहि होता है किंवा बडे बडे यशों मे (ते आपलं देशों में) एसी छोटि छोटि बातें होती रेहती है... *lol*
24 Jul 2014 - 9:44 pm | प्यारे१
तो क्या मुर्गी की उमर हो गयी थी चिकन बनने की? =))
24 Jul 2014 - 10:24 pm | यशोधरा
गप्पे कुवेती काका!
25 Jul 2014 - 3:05 pm | ब़जरबट्टू
काहीही ठोस असा आक्षेप नाहीच.. :)
किंवा साला आपल्याला हे असले काहिच जमत नाही, म्हणून आमची जळजळ समजा...
बाकी आपण @ सानिका फटूंचे पंखे आहोतच... :)
24 Jul 2014 - 2:13 pm | नानासाहेब नेफळे
एक लंबर फोटु आल्यात
24 Jul 2014 - 6:25 pm | प्रसाद गोडबोले
भारीच दिसतय चिकन ... तोंडाला पाणी सुटलेली स्मायली !!
मागे आते तो नीर डोसा काय ? बाकी एकदा त्याचीही पाकृ टाका ना ! आपल्याला लई आवडतो नीर डोसा !!
24 Jul 2014 - 9:27 pm | केदार-मिसळपाव
अगदी छान पाककृती टंकली आहे.
तो.पा.सु.
24 Jul 2014 - 11:07 pm | तुमचा अभिषेक
गेले आठवडाभर गटारीनिमित्त हेच सारे बघतोय, नव्हे हादडतोय म्हणून त्रास कमीच झाला, मात्र तरीही घावण्यांनी पाणी काढलेच. :) माझ्या विशेष आवडीचे आणि आमच्या घरी आईही छानच बनवते. मऊशार जाळीदार, माझ्या शाळा-कॉलेज-ऑफिसमधील सर्वांनाच आवडतात.
25 Jul 2014 - 3:21 pm | कविता१९७८
मस्तं प्रकार्र
9 Oct 2014 - 12:35 pm | सुहासभाऊ
लय भारि...................