एखाद्या शहराला भेट द्यायची असं खूप डोक्यात असतं पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने जमत नाही. मग पुन्हा एप्रिल-मे महिन्यात लागून चार दिवस सुट्ट्या आहेत म्हणजे कुठेतरी जाऊ शकतो असा विचार मनात येतो. मग दोघांनाही दोन वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असतं. हवामानाचे अंदाज घेत, हातातला वेळ आणि खर्च, आपल्याला काय बघायचं यावर चर्चा होतात. उन्हाळा सुरु होतोय, तेव्हा यावेळी शांत, रम्य अशा ठिकाणी जाऊया असे ठरते. पण नियोजन काहीच होत नाही. ऑफिस आणि इतर कामाच्या गडबडीत हे मागे पडते आणि म्हणता म्हणता सुट्ट्यांना अगदी एक आठवडा राहतो. आता आधी ठरवले होते त्या ठिकाणाची तिकिटे अशक्यप्राय महाग झालेली असतात. मग तुझ्यामुळेच ही पण सहल होणार नाहीये टाईप ची भांडणे होतात. भांडणाचे वादळ शांत झाले की मग हळूहळू पुन्हा कुठ जायचे ही मुख्य चर्चा सुरु होते आणि अचानक दोघांकडूनही या बरेच दिवसांपासून मनात असलेल्या एकाच शहरावर शिक्कामोर्तब होतं - ड्रेस्डेन. पूर्व जर्मनीतील सॅक्सोनी या राज्याची राजधानी. दुसऱ्या महायुद्धात अतिप्रचंड नुकसान सोसाव्या लागणाऱ्या शहरांपैकी एक प्रमुख शहर. आणि मग तिथपर्यंत जातोय तर एक दिवस जवळच असलेले अजून एक प्रसिद्ध शहर - प्राग. चेक रिपब्लिक या देशाची राजधानी. २ महिन्यांपासून रखडलेल्या सहलीचे बुकिंग अचानक एका रात्रीत मार्गी लागतात. बॅग्स भरून होतात आणि सहलीचा दिवस उजाडतो.
सुट्टी असल्याने जर्मनीकर सुस्तावले होते. या दिवसात युरोपात प्रामुख्याने दिसणारी रेपसीड ची पिवळी फुले आजूबाजूच्या शेतांमध्ये डोलत होती. जसे जसे पुढे जाऊ लागलो, तसतशी तशी ही पिवळी फुले अधिकाधिक दिसू लागली. सगळीकडे हिरवेगार डोंगर, त्या डोंगरांमध्ये मधूनच कुठूनतरी दिसणारे पिवळ्या फुलांचे गालिचे, त्याच्या जवळपास पन्नास शंभर घरांची लोकवस्ती असलेली टुमदार खेडी, खेड्याची ओळख म्हणून उंच दिसणारे चर्च, सगळीकडे दिसणाऱ्या पवनचक्क्या आणि निळे निरभ्र आकाश. या अवर्णनीय दृश्याने जरा मागे जावे तोवर एखादा छोटासा घाट. त्या वळणदार रस्त्यांवरून आजूबाजूला दोन मिनिटे फक्त डोंगर आणि शेवटचा वळसा घालून जेव्हा गाडी घाट संपण्याच्या वाटेवर येते, तेव्हा अचानक विस्तीर्ण अशी पिवळीधमक रेपसीडची शेते आणि त्यासोबतीला हिरव्या पिवळ्या रंगसंगतीने आच्छादलेले डोंगर आणि शेती. मुळातच सुंदर दिसणारी ही फुले शेजारच्या हिरव्या शेतांनी अजूनच खुलत होती. आजूबाजूच्या गावांमध्ये अजूनही विशेष वर्दळ दिसत नव्हती. या शांत वातावरणात उगीचच चर्च मधून घंटेचे सूर कानावर पडत आहेत असा भास होत होता. एकीकडे गाडीतल्या गाण्यांची साथ होती. मधूनच सुसाट वेगाने जाणाऱ्या पोर्शे, फरारी चा आवाज येत होता. गाडीच्या वेगामुळे चांगले फोटो काढणे शक्य नव्हते. तरीही शक्य तेवढे क्लिक्स सुरु होते.
सगळीकडे दिसणाऱ्या पवनचक्क्या
जसे राज्य बदलते तसे इतर काही भौगोलिक बदल जाणवू लागतात. जेव्हा सॅक्सोनीत शिरलो, तेव्हा पठारी प्रदेश जास्त दिसत होता. थोड्याच वेळात ड्रेसडेन च्या पाट्या दिसू लागल्या. हॉटेल वर जाऊन सामान टाकले आणि लगेच शहराकडे जाण्यासाठी मोर्चा वळवला. बसने अर्ध्या तासात ड्रेस्डेन च्या मध्यवर्ती स्थानकावर पोहोचलो.
महायुद्धाचे परिणाम जर्मनीतील अनेक शहरांना भोगावे लागले. परंतु ड्रेस्डेन हे त्यापैकी सर्वाधिक नुकसान झालेले शहर. येथील मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर १९४५ साली झालेल्या बॉम्ब हल्ल्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले. युद्धानंतर पुन्हा सगळे नव्याने बांधले गेले. पूर्व पश्चिम एकत्रीकरण होण्यापूर्वी पूर्व जर्मनीतील हे महत्वाचे स्थानक होते. २००२ साली आलेल्या पुराने पुन्हा एकदा या स्थानकाला हिसका दिला. त्यानंतर पुन्हा बांधकाम करण्यात आले. कुठल्या वर्षी कसे बांधकाम झाले, महायुद्धात काय नुकसान झाले आणि नुतनीकरण कसे होत गेले ही सगळी माहिती तपशीलवार लिहिलेले माहितीफलक इथे वाचायला मिळतात. पोटपूजा करता करता हे सगळे वाचून झाले. येथील स्थानक हे जर्मनीतील इतर स्थानकांपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने बांधले गेले आहे. ड्रेस्डेन चे मुख्य स्थानक (आंतरजालावरून साभार)
इतरत्र न्याहाळत एक चक्कर मारली. आणि सिटी सेंटर ला जाण्यासाठी कुठली ट्राम आहे याची माहिती काढून पुढे निघालो. शहरातील इमारती आणि रचना यांचे बर्लिनशी थोडेफार साधर्म्य जाणवले. आजूबाजूच्या इमारती, खास युरोपियन पद्धतीची पण तरीही थोडासा स्वतःचा वेगळेपणा जपणारी घरे आणि विस्तीर्ण आणि सगळीकडे दिसणाऱ्या ऐतिहासिक वास्तू. आणि या सगळ्या वास्तूंवर सर्वत्र चढलेला काळा रंग. (इतिहासातील एका काळ्या पर्वाची आठवण सतत करून देणारा ?) प्रथमदर्शनी यामागे युद्धकाळात झालेले बॉम्बिंग कारणीभूत असावे असा माझा अंदाज होता. परंतु आंतरजालावर दिलेल्या माहितीप्रमाणे नैसर्गिक रित्याच या दगडी इमारती काळ्या पडल्या आहेत अशी माहिती मिळाली. कुठल्याही कारणाने असले तरीही ते नजरेला खुपत होते. पण मूळ इमारती मात्र सुंदर आहेत.
प्रमुख स्थळांपैकी फ्राऊएनकिर्श (Frauendkirche) म्हणजेच येथील प्रमुख चर्च आणि ग्रीन व्होल्ट संग्रहालय (Green Vault) या दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी पुढचा एक दिवस राखीव होता. त्यामुळे इतर ठिकाणी जाण्यासाठी हा दिवस मोकळा होता. मध्यवर्ती भागात वसलेल्या या काही वास्तू.
इथेच सेम्पर ओपेरा जगातील काही नावाजलेल्या ओपेरा हाउस पैकी एक आहे. येथील तिकिटे आधी काढलेली नव्हती. वेळेवर दोन्ही दिवस इथे तिकीट काढण्याचा प्रयत्न असफल ठरला. *sad* इच्छा असूनही बघता आले नाही. पुन्हा कधी जायला जमले तर आधीच तिकिटे काढून ठेवायची हे पक्के केले आहे.
इथे उतरून एक फेरफटका मारला. थोडेफार फिरून त्स्विंगर राजवाड्यापाशी ( Zwinger palace ) आलो. या राजवाड्यावर देखील बॉम्बिंग झाले. युद्धोत्तर काळात शक्य तेवढी दुरुस्ती करण्यात आली. बाहेरील बागेतला प्रवेश आणि राजवाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर चा प्रवेश विनामूल्य आहे. आतमध्ये एक पोर्सीलेन संग्रहालय आणि इतर काही वस्तूंचे संग्रहालय आहे. त्यातही बराचसा भाग नूतनीकरणासाठी बंद आहे. वेळेचा अंदाज घेता फक्त बाहेरून बघणे शक्य वाटत होते. आधी बाहेरील बागेत फेरफटका मारला आणि राजवाड्याच्या गच्चीवर गेलो.
भव्य राजवाड्यातील बाग आणि पर्यटक
ओपेरा हाउस पासून दिसणारा ड्रेस्डेन महाल जेथे आता ग्रीन व्होल्ट आणि इतर काही संग्रहालये आहेत. याविषयी पुढील भागात येईलच.
तासभर येथे फिरत नाही तेवढ्यात अचानक विजांचा कडकडात सुरु झाला. आभाळ भरून आले. हवामानाचा अंदाज पाहिला तर पुढचे ३ तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. तसाही प्रवासाचा थकवा आला होता. हे सगळे बघता इथून लगेच काढता पाय घेतला आणि कमीत कमी पावसात हॉटेल वर पोहोचलो. पुढचा दिवस होता प्राग चा. प्राग आणि उर्वरीत ड्रेस्डेन लवकरच…
क्रमशः
प्रतिक्रिया
22 Jun 2014 - 3:41 pm | एस
सगळं मिपा भटकायला निघालंय की काय! :-) चला आमची मजा आहे. अजून एक मेजवानी सुरू. बाकी लेख नेहमीप्रमाणेच अप्रतीम हो. पुभाप्र.
22 Jun 2014 - 3:50 pm | इशा१२३
मस्त फोटो आणि वर्णन मधुरा.पिवळी शेत अप्रतिम दिसतात.ती रेपसीडची फुल आहेत हे आत्ता समजले.एप्रीलमधे केलेल्या युरोपट्रिपच्या वेळेस सगळीकडे अशी शेत पसरलेली पाहिली होती.टुमदार खेडिही तशीच.कितीही फोटो काढले तरी समाधान होइना.नाव मात्र आत्ता समजले.धन्यवाद.
22 Jun 2014 - 3:58 pm | यशोधरा
हिरव्या शेतीमध्ये उभी असलेली पिवळी फुले पाहून मला पंजाबमधली सरसोंची पिवळ्या फुलांची शेती आठवली. तेही अशीच सुरेख दिसतात. हिरव्याकंच शालूवर सोनेरी बुट्टी पसरलेली पाहताना कसं सुरेख वाटेल, तसं! :)
मस्त लेख आणि फोटो. मिपावर पर्यटन महोत्सव सुरु झालाय, असं दिसतं आहे!
22 Jun 2014 - 4:08 pm | असंका
तिथले लोक 'सरसों का साग' फार खात असतील नाही?
22 Jun 2014 - 4:31 pm | रेवती
सुरेख फोटो आहेत. सध्या सुट्ट्या सुरु झाल्याने आम्हाला बरीच ठिकाणे पहायला मिळतायत. धन्यवाद.
22 Jun 2014 - 4:45 pm | अनन्न्या
पुभाप्र.
22 Jun 2014 - 4:46 pm | प्यारे१
भारीच्च!
22 Jun 2014 - 9:38 pm | अजया
मस्तच गं मधुरा! तुझ्या ब्लॉगवर वाचलं होतंच.फोटोही सुरेख आहेत.
23 Jun 2014 - 10:20 am | मृत्युन्जय
मस्त फोटो आणि माहिती.
23 Jun 2014 - 11:26 am | चौकटराजा
सुरूवातीचे प्रकटन ही छान व फोटोही. एकच नम्र विनंति सर्वानाच . अडोब फोटोशॉप मधे किंवा इतर फ्री लायसन्स
पिक एडीटर मधे इमेज- अॅडजस्टमेंट- आटो लेव्हल या मार्गाने जाऊन फोटो एडीट केल्यास सावलीतील तपशील जास्त
नीटपणे दिसू लागतात. बरोक स्टाईलच्या युरोपियन इमारतीत असे तपशील फार प्रमाणात असतात व ते पहांण्यासारखे ही
असतात. आपल्याकडील बेलूर हळेबिडू ई ठिकाण्च्या कोरीव कामाचे फोटो काढतानाही एकतर एच डी आर मोडमधे फोटो काढावेत वा वर दिलेला मार्ग अनुसरावा. आपला फोटो एडीट करू नये असा आग्रह नसावा.
युरोपातील देखणे वास्तूशास्त्र व कमालीचे भव्य चौक हे पहायला मिळत असल्याबद्ल आपला हेवा करावा तेवढा थोडाच !
23 Jun 2014 - 12:33 pm | आतिवास
'ड्रेस्डेन' आवडले.
23 Jun 2014 - 12:39 pm | दिपक.कुवेत
देखणे फोटो आणि मस्त वर्णन. पुभाप्र.
23 Jun 2014 - 1:31 pm | राजेंद्र मेहेंदळे
चला, अजुन एक मेजवानी. पुभाप्र.
23 Jun 2014 - 7:15 pm | सखी
छान प्रवासवर्णन आणि फोटो, पिवळी शेतं तर सुरेखच.
26 Jun 2014 - 12:49 pm | स्वाती दिनेश
छान लिहिले आहेस..
स्वाती
26 Jun 2014 - 1:02 pm | मधुरा देशपांडे
स्वॅप्स, इशा१२३, यशो, कंफ्युज्ड अकौंटंट, रेवती, अनन्या, प्रशांत आवले, अजया, मृत्युन्जय, चौकटराजा, आतिवास, दिपक.कुवेत, राजेंद्र मेहेंदळे, सखी, स्वाती ताई सगळ्यांचे मनापासून आभार.
27 Jun 2014 - 10:39 pm | पैसा
सुंदर लिहिलंय आणि फोटो पाहून डोळे निवले अगदी!