कोकणी मांसाहारी थाळी

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in अन्न हे पूर्णब्रह्म
15 Aug 2013 - 4:38 pm

'अन्न हे पूर्णब्रह्म'च्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सर्व मिपाकरांचे व रेवतीचे खास अभिनंदन. ह्या सदरामुळे आम्हाला वेग-वेगळे पदार्थ बनवता व शिकता आले, त्यात मिपाकरांचे प्रतिसाद नवीन, वेगळे काही बनवण्यास प्रोत्साहित करत होते. कोकणातले निवडक पदार्थ घेऊन चवीने खाणार्‍यांसाठी मी कोकणी मांसाहारी थाळी सादर करत आहे , आशा आहे तुम्ही त्याचा आस्वाद घ्याल.

.

कोकणी मांसाहारी थाळीत भात, तांदळाच्या भाकर्‍या, त्याबाजूला घावने, तळलेले पापलेट, कांद्याच्या चकत्या, वाटपाचे वरण, सोलकढी, तळलेले पापलेट, सुकं चिकन, मालवणी पापलेटचे कालवण व गोडात मालवणी सोजी.

सुरुवात वाटपाच्या वरणाने करुयात. आता तुम्ही म्हणाल मांसाहारी थाळीत वरणाचे काय काम तर त्याचे असे आहे की आमच्याकडे हे वरण खास मांसाहार असेल तर बनवतातच म्हणून त्याची पाककृती देतेय :)

वाटपाचे वरण

साहित्यः

१ वाटी तूरीची डाळ स्वच्छ धुवून, १० मिनिटे भिजत ठेवणे
अर्धी वाटी खोवलेला ओला नारळ / सुकं खोबरे
पाव वाटी कांदा बारीक चिरुन
१/२ टीस्पून जीरे
१ टीस्पून हळद
मीठ चवीनुसार

पाकृ:

तुरीची डाळ कुकरला नेहमी प्रमाणे शिजवून घ्यायची.
खोबरे + जीरे + कांदा + हळद एकत्र करुन, थोडे पाणी घालून मुलायम वाटून घ्यावे.
हे वाटण शिजवलेल्या तूरीच्या डाळीत घालून चांगले शिजवून घेणे.
चवीप्रमाणे मीठ घालणे.

सुकं चिकन

साहित्यः

अर्धा किलो चिकन साफ करुन घेणे
१/२ वाटी दही
३ टेस्पून कोथींबीर + पुदिना + हिरवी मिरची + आले + लसूण पेस्ट
दीड टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी - जास्तं)
१ टीस्पून हळद
२ टेस्पून गरम-मसाला
१/४ वाटी सुके खोबरे किसून घेणे
१/२ छोटा कांदा बारीक चिरलेला
२-३ लसूण पाकळ्या
चवीप्रमाणे मीठ

पाकृ:

साफ केलेल्या चिकनला दही, कोथींबीर + पुदिना + हिरवी मिरची + आले + लसूण पेस्ट लावून २-३ तास मॅरिनेट करणे.
थोड्या तेलात किसलेले सुके खोबरे + कांदा + लसूण एकत्र लालसर परतून घेणे.
थंड झाले की त्यात थोडे पाणी घालून मुलायम वाटून घेणे.
जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून त्यात मॅरिनेट केलेले चिकन, हळद, लाल तिखट, गरम-मसाला व मीठ घालणे.
चिकन वाफेवर शिजवायला ठेवावे, साधारण शिजले की त्यात कांदा-खोबर्‍याचे वाटप घालणे व परतून परतून शिजवणे.
शिजल्यावर चिरलेली कोथींबीर वरून पेरावी.

मालवणी पापलेटचे कालवण

साहित्यः

पापलेट साफ करुन, तुकडे करुन हळद + मीठ लावून ठेवावे
१ वाटी खोवलेला ओला नारळ
१०-१२ बेडगी मिरच्या
२ टीस्पून धणे
१-२ लसूण पाकळ्या
१ छोटा कांदा बारीक चिरुन
१/२ टीस्पून हळद
७-८ कोकमं (आबंटपणानुसार कमी - जास्तं)
मीठ चवीनुसार

पाकृ:

बेडगी मिरच्या + धणे अर्धा तास गरम पाण्यात भिजत ठेवावे.
ओला नारळ + कांदा + हळद + भिजवलेल्या मिरच्या + धणे + लसूण एकत्र करुन मुलायम वाटून घेणे.
पातेल्यात १ चमचा तेल गरम करून वाटण, मीठ, कोकमं व थोडे पाणी घालावे.
कांद्याचा वास जाईपर्यंत उकळावे.
उकळल्यावर पापलेटचे तुकडे सोडून शिजवून घ्यावे.

पापलेट फ्राय

साफ केलेल्या पापलेटच्या तुकड्यांना कोथींबीर + हिरवी मिरची + लसूण + चिंचेचा कोळ ही पेस्ट, लाल तिखट , हळद व मीठ लावून १५-२० मिनिटे मॅरिनेट करुन ठेवावे. फ्राय पॅनमध्ये तेल गरम करुन घेणे. तुकड्यांना तांदळाच्या पिठात किंवा ज्वारीच्या पिठात घोळवून दोन्ही बाजूने खरपूस तळून घेणे.

घावने

घावन करायचे असल्यास सुवासिक तांदूळ स्वच्छ धुवून ५-६ तास भिजत घालावे व नंतर मुलायम वाटून घ्यायचे. त्यात पाणी किंवा दूध किंवा नारळाचे दूध , मीठ घालून पातळ मिश्रण तयार करायचे. नॉन-स्टीक तव्यावर कांद्याने तेल पसरवून घावने घालावीत. कोकणात बिडावर घावने बनवली जातात.

हल्ली सुवासिक तांदळाची (बासमती) मोदक पिठी विकत मिळते बाजारात, चांगल्या प्रतिची घेऊन त्यात पाणी, मीठ घालून ही घावने बनवता येतात.

सोलकढी:

एक नारळ वाटून दूध काढून घेणे. त्यात कोकमाचे आगळ, हिरव्या मिरच्या +लसूण + जीरे वाटून घालणे.
चवीनुसार मीठ घालावे.
आगळ नसल्यास कोकमं गरम पाण्यात तासभर भिजवून ठेवावी, थोडी पिळून, गाळून त्याचा रस घ्यावा व तो नारळाच्या दुधात मिसळावा.

तांदळाची भाकरी:

दीड वाट्या तांदळाचे पीठ
गरम पाणी

तांदळाचे पीठ परातीत घेऊन , गरम पाणी घालून भिजवावे. त्याचे सारखे भाग करुन घ्यावे, एक गोळा परातीत घेऊन पाण्याच्या हाताने चांगले मळून घ्यावे. कोरडे पीठ घेऊन भाकरी थापावी. तव्यावर भाकरी टाकून, पाण्याचा हात फिरवून घ्यावा. पाणी सुकले की उलटावे व चांगली भाजली की आचेंवर टाकून सर्व बाजूंनी सारखी भाजून घ्यावी.

तुम्ही उकडीचीही तांदळाची भाकरी बनवू शकता.

मालवणी सोजी (गोड पदार्थ)

साहित्यः

१ वाटी लापशी रवा
१ वाटी गुळ
१/२ वाटी ओला नारळ
१ टीस्पून जीरे
१/२ टीस्पून हळद
मीठ चिमूटभर
१ टीस्पून वेलचीपूड
२ टेस्पून साजूक तूप

पाकृ:

कढईत तूप गरम करुन त्यात लापशी रवा मंद आचेवर परतून घ्यावा.
एकीकडे पाणी गरम करायला ठेवावे.
ओला नारळ + हळद +जीरे ह्यांचे मुलायम वाटण करुन घ्यावे.
रवा खमंग भाजला की त्यात डावाने थोडे-थोडे करुन गरम पाणी घालावे व रवा शिजवून घ्यावा.
सोजी खीरीप्रमाणे पातळ हवी असल्यास आणखीन पाणी घालावे.
रवा शिजला की त्यात वाटण, गुळ घालून शिजू द्यावे.
चिमूटभर मीठ व वेलचीपूड घालून एकत्र करावे.
वरुन हवे असल्यास एक चमचा साजूक तूप सोडावे.
ही सोजी गरम छान लागते, हवे असल्यास थंड ही सर्व्ह करता येते.
आवडत असल्यास तुम्ही ह्यात सुकामेवा ही घालू शकता.

.

अन्न हे पुर्ण्ब्रह्मला अनेक शुभेच्छा !!

प्रतिक्रिया

पैसा's picture

15 Aug 2013 - 5:15 pm | पैसा

भारतात कधी येणार आहेस?

चित्रा's picture

17 Aug 2013 - 4:35 am | चित्रा

खपले!

गणपा's picture

15 Aug 2013 - 5:41 pm | गणपा

आज संपुर्ण अन्न टिमनं लोकांचे प्राण घेऊन त्यांना कायमचं स्वातंत्र्य दायचं ठरवलेलं दिसतय.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Aug 2013 - 10:15 pm | अत्रुप्त आत्मा

@त्यांना कायमचं स्वातंत्र्य दायचं ठरवलेलं दिसतय. >>> =))

स्वाती२'s picture

15 Aug 2013 - 5:52 pm | स्वाती२

है शाब्बास!

प्रसाद गोडबोले's picture

15 Aug 2013 - 6:24 pm | प्रसाद गोडबोले

श्रावण आहे... चातुर्मास आहे ...

काय ह्या वेळी काही खरं नाही .

अवांतर : ह्यासोबत काजु फेणीचीही पाकृ देणार का ? ;)

दिपक.कुवेत's picture

15 Aug 2013 - 6:29 pm | दिपक.कुवेत

पाकॄ काय नंतरहि वाचता येईल. निव्वळ अप्रतिम!

दिपक.कुवेत's picture

15 Aug 2013 - 6:49 pm | दिपक.कुवेत

माशाच्या आकाराच्या केळिच्या पानावर पापलेटचे तळलेले तुकडे ठेवण्याची आयडिया आवडली.

सानिकास्वप्निल's picture

15 Aug 2013 - 8:41 pm | सानिकास्वप्निल

ती कल्पना माझ्या आईची :) तिने सजेस्ट केले तसे.

प्यारे१'s picture

16 Aug 2013 - 11:30 pm | प्यारे१

हम्म्म्म
आता समजलं वारसा णक्की 'कुठून' आला ते! ;)

प्रभाकर पेठकर's picture

15 Aug 2013 - 6:54 pm | प्रभाकर पेठकर

चविष्ट पदार्थांनी मस्तं सजवलेले सुंदर ताट. आंबट, गोड, तिखट अशा चवी सोबत माशाचे कालवण, तळलेले मासे तसेच कोंबडीचे सुके वगैरे, शब्दांत वर्णन करता येणार नाही असे, चित्ताकर्षक पदार्थ आणि मस्तं जाळीदार घावणे. काय खाऊ आणि काय नको? नजरेनेच तृप्ततेची पातळी वाढायला सुरुवात झाली आहे.

आदूबाळ's picture

15 Aug 2013 - 6:56 pm | आदूबाळ

ए अरे ए....

रेवती's picture

15 Aug 2013 - 8:25 pm | रेवती

Deva, kay sundar sajawaT, surekh foToo.
Sanike, dhanya aahes. Mazya shejaree rahayala ye na!

हे काय आज्जे चक्क आंग्ल भाषेत प्रतिसात लिहतेयस तू ! जय बजरंगलीचा असा प्रभाव ? ;)

बाकी धाग्या मधील पदार्थ खाता येत नसल्याने फक्त पास म्हणतो.

चक्क आंग्ल भाषेत प्रतिसात लिहतेयस तू
Te kaay vicharoo nakos baba. Sadhya Bajarangbali chi heech ichchhaa aahe. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Aug 2013 - 8:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

अश्या जेवणाची चित्रे पाहणे म्हणजे भयानक छळ आहे... त्यांत अशी सुंदर सजावट म्हणजे... कुठे फेडाल ही पापं ???

तुमचा अभिषेक's picture

15 Aug 2013 - 9:55 pm | तुमचा अभिषेक

ते मध्ये पिवळे वरण आहे ते गोड्या वरणासारखे असते का??
तसे असेल तर त्यावर बोट ठेऊन मी उरलेल्या थाळीचा नजरेचे आस्वाद घेतला.. वरणाच्या ऐवजी भातावर ते मस्त मच्छीचे सार.. त्याबरोबर मी कितीही भात खाऊ शकतो.. अगदी कितीही :) आणि घावणे तर मी सुके किंवा खोबर्‍याच्या चटनी वा चहाबरोबरही आरामात पाच-सहा खाऊ शकतो, इथे तर मेजवानीच आहे..

आज कोकणी आणि गोवन थाळीचा आस्वाद घेऊन तृप्त झालो..
-एक सिंधुदुर्गकर

सानिकास्वप्निल's picture

16 Aug 2013 - 3:33 am | सानिकास्वप्निल

ते गोडं वरण नाहीये , ते वाटपाचे वरण आहे आणी मी आधी म्हणट्ल्याप्रमाणे आमच्या घरी मासे-मटणाचे जेवण असले की हे वरण लागतचं... भाताबरोबर वरण आणी माश्याचे कालवण / रस्सा असे काँबी झक्कास लागतं :)
तो पदार्थ तुमच्यासाठी ऑप्शन्ल आहे मी फक्त पाकृ दिली आहे ;)

अर्धवटराव's picture

15 Aug 2013 - 10:14 pm | अर्धवटराव

आजचा दिवस सार्थकी लागला. जगायला आणखी काय कारण हवे??

अर्धवटराव

जळजळ जळजळ जळजळ जळजळ जळजळ जळजळ :-(

कृपा करून असे फोटो अपलोड करू नका. हा फोटो बघून आज जर माझा मृत्यू झाला तर माझा आत्मा अतृप्त राहील. गेले एक वर्ष असे काही खाल्लेले नाही आहे.

कवितानागेश's picture

16 Aug 2013 - 12:02 am | कवितानागेश

या माशांबरोबर खायला सोजी हा गोड पदार्थ एकदम बरोब्बर आहे. यात दूध नाहीये. :)

पापलेट पण मालवणी बोलतात?? ;)

सानिकास्वप्निल's picture

16 Aug 2013 - 3:35 am | सानिकास्वप्निल

तुका माहित नाय? ;)

सूड's picture

16 Aug 2013 - 7:49 am | सूड

कान देव्न आयकूक होया आसा दिसता. ;)

स्पंदना's picture

16 Aug 2013 - 6:26 am | स्पंदना

भरलो गो भरलो, नुक्तं पघुनच प्वाट भरलं.
तरीही कोणत्या बाजुने तुटुन पडु सांग? भाकरीच्या का घावनाच्या?

अक्षया's picture

16 Aug 2013 - 10:29 am | अक्षया

शब्द सुचत नाही आहे.. :)

मी_आहे_ना's picture

16 Aug 2013 - 11:39 am | मी_आहे_ना

स्वगत - "का? का उघडलास हा धागा श्रावणात? मोडला आता!"

त्रिवेणी's picture

16 Aug 2013 - 12:49 pm | त्रिवेणी

अरे कित्ती कित्ती छळाल.
आत्ता तिकडे पेठकर काकाशी कट्टी घेवून आले,
मिपा मालकांना विनंती, या पुढे अशा छान छान पा कृ करणार्‍यांनी समस्त मिपा करांना त्यांच्या घरी जेवणाचे आमंत्रण देणे सक्तीचे करावे अशी अट घालणे.

सुहास..'s picture

16 Aug 2013 - 1:34 pm | सुहास..

तुमचा पत्ता मिळेल का ;)

धागा इग्नोर केला गेला आहे..

कपिलमुनी's picture

16 Aug 2013 - 3:16 pm | कपिलमुनी

डोळे जेवले पोटभरून !

भावना कल्लोळ's picture

16 Aug 2013 - 3:23 pm | भावना कल्लोळ

उच्छाद मांडला आहे या मुलीने, तुला काही श्रावण वैगेरे आहे कि नाही ग? आता डोळे गंगाजलाने धुवायला हवेत, नाहीतर श्रावण मोडेल ….

सौंदाळा's picture

16 Aug 2013 - 5:07 pm | सौंदाळा

रापचिक एकदम!
'अन्न हे पुर्णब्रह्म' चा बड्डे दणक्यात झाला म्हणायचा एकंदर..
बाकी मोदकाच्या सुवसिक पीठीपासुन घावन बनवायचे सुचलेच नव्हते. त्याबद्दल अगदी पेश्शल धन्यवाद.
तुम्हाला (आणि पेठकरकाकांना सुद्धा याच धाग्यात)एक विनंती की श्रावणी सोमवार निमित्त उपवास सोडायला अशीच एक मस्त सात्विक थाळीसुध्दा द्या ना प्लीज..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Aug 2013 - 11:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय बोलायचं आणि कौतुक तरी किती करायचं... केवळ सुप्पर. :)

-दिलीप बिरुटे

जागु's picture

17 Aug 2013 - 12:40 pm | जागु

खल्लास......

तोपासु.

आरोह's picture

17 Aug 2013 - 3:57 pm | आरोह

छान

वाटूळ's picture

19 Aug 2013 - 1:40 pm | वाटूळ

bhook lagalee :)

राही's picture

19 Aug 2013 - 5:47 pm | राही

वर्षपूर्तिदिन डोळे भरून पावला. पदार्थांची निवड उत्तमच. सादरीकरणाबद्दल आणखी खास काय लिहिणार? नेहेमीप्रमाणे उत्तमच.
जाता जाता : तांदळाच्या उकडीचे कुठलेही पदार्थ किंवा घावन-शेवयांसारखे पदार्थ करताना बासमतीपेक्षा आंबेमोहोर बरा आणि त्यातूनही नवा तांदूळ असेल तर उत्तमच. आंबेमोहोर किंवा नव्या तांदुळाला चिकटपणा असतो जो बासमतीमध्ये नसतो असे पट्टीच्या मोदकबनव्या बायकांकडून ऐकले आहे.

प्रभाकर पेठकर's picture

19 Aug 2013 - 7:08 pm | प्रभाकर पेठकर

आंबेमोहोर किंवा नव्या तांदुळाला चिकटपणा असतो जो बासमतीमध्ये नसतो असे पट्टीच्या मोदकबनव्या बायकांकडून ऐकले आहे.

घावण्यांसाठी 'सुरई' तांदूळही वापरतात. त्याला चिकटपणा चांगला असतो.

रॉजरमूर's picture

26 Aug 2013 - 8:36 pm | रॉजरमूर

मिसळ पाव वर नोंद केल्यानंतरचा पहिलाच प्रतिसाद तुम्हाला.
सानिका ताई ,
आम्ही तुमच्या आणि गणपा भाऊंच्या पाककृतींचे जबरदस्त fan आहोत
तुमचे सर्व videos आणि पाककृती प्राधान्याने वाचल्यात आणि त्यातील बऱ्याच करूनही बघितल्या आहेत .
धन्यवाद!

samandh's picture

15 Jun 2014 - 12:11 am | samandh

bhannat.!!!

खटपट्या's picture

15 Jun 2014 - 7:50 am | खटपट्या

आता हे जेवण मी नाही जेवलो तर मला मुक्ती मिळणार नाही ! पिंडाला कावळा शिवणार नाही !!

या डिशचे सादरीकरण एकदम भन्नाट आहे.
............ रंगां सोबत चविची उधळण आहे

आज परमेश्वराच्या प्रथमावतारास आहुती द्यावी अशी बळकट इच्छा होतेय.....

बॅटमॅन's picture

18 Nov 2014 - 5:57 pm | बॅटमॅन

*प्रथमावताराची आहुती.

ब्याट्या ग्रामर सुधार .नाहीतर आहुतीचा नेम चुकायचा बघ.

बॅटमॅन's picture

18 Nov 2014 - 6:41 pm | बॅटमॅन

हो बरोबरे ओ, सुधारलं बघा.

सतीश कुडतरकर's picture

2 Feb 2015 - 5:04 pm | सतीश कुडतरकर

तो फोटो पाहूनच लाळ गळायला लागली!
अप्रतिम

लय भारी.....जेवायला बोलवा कधीतरी....