१९८९ साल हे कम्युनिझम/साम्यवादासाठी निर्णायक नसेल कदाचीत पण महत्वाची कलाटणी देणारे वर्ष होते. त्या आधी एक दोन वर्षे तत्कालीन सोव्हीएट राष्ट्राध्यक्ष गोर्बाचेव्ह यांनी पेरीस्त्रॉईका (सामाजीक पुर्नबांधणी) आणी ग्लास्तनोस्त (सामाजीक स्वांतत्र्य/मोकळेपणा) हे शब्द प्रचलात आणले होते आणि हळूहळू रशियाची आर्थिक आणि राजकीय घडण बदलण्यास सुरवात केली होती. पोलंड, हंगेरी, पूर्व जर्मनी, झेकोस्लोव्हाकीया, बल्गेरीया आणि रोमानिया हे देश सोव्हिएट मगरमिठीतून या वर्षी सुटले.
असाच प्रयत्न अजून एका ठिकाणी झाला तो म्हणजे माओच्या कम्युनिस्ट चीनच्या तिआनमेन चौकात. तत्कालीन कारणे वेगळी होती पण वास्तव तेच होते; स्वातंत्र्य - आर्थिक, वैचारीक आणि सामाजीक. जून ५, २०१४ ला पंचवीस वर्षे पूर्ण होत असलेल्या या एका अर्थाने अपयशी दुर्घटनेची थोडक्यात कहाणी... (माहिती जालावरील विविध स्त्रोतांमधून, विशेष करून पिबीएस आणि विकीची विविध पाने)
(खालील छायाचित्र इंटरअॅक्टीव्हआहे)
१९८० च्या काळातील हु योबांग या कम्युनिस्ट पार्टी चेअरमनने दूरदृष्टी दाखवून अनेक बदल करायचा घाट घातला. या बदलांमुळे आर्थिक स्वातंत्र्य मिळणार होते, भ्रष्टाचार कमी होणार होता आणि राजकीय स्वातंत्र्य देखील थोडेफार मिळणार होते. पण अर्थातच ते कुठल्याही हुकूमशाहीतील दरबारी जनतेला न आवडणारे होते कारण त्यांच्या हितसंबंधांना धक्का बसणार होता. परीणाम व्हायचा तोच झाला आणि हु योबांग यांच्या हातातली सत्ता गेली. कारण घडले ते १९८७ साली झालेले विद्यार्थांचे आंदोलन. या आंदोलनाचे कारण हे हू यांच्या धोरणाची "चुकांमधे" धरले गेले. हुं नी राजीनामा दिला. अर्थात जनतेचे प्रेम लक्षात असल्याने त्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाई झाली नाही. ते पॉलीटब्युरोचे सदस्य राहीले.
हे हू १९८९ च्या १५ एप्रिलला हृदयविकारामुळे निधन पावले. झाले. त्यावेळेस त्यांची धोरणे आमलात आणावीत म्हणत आधी विद्यार्थ्यांनी आणि नंतर विविध कर्मचार्यांनी आंदोलन चालू केले. एप्रिल २२, २०१४ पर्यंत लाखाच्यावर जनता आंदोलनात उतरली होती. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे तत्कालीन सेक्रेटरी झाओ झियांग हे काही अंशी विद्यार्थ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. विद्यार्थ्यांना चीनचे राष्ट्रप्रमुख ली पेंग यांच्याशी भेट हवी होती. अर्थातच त्याकडे दुर्लक्ष केले गेले. २७ एप्रिलपर्यंत चीनचे नावीक दलातील काही सैनिक पण या आंदोलनात सामील झाले. थोडक्यात केवळ कम्युनिस्टपार्टीचे वरीष्ठ अधिकारी सोडल्यास इतर सर्वच आंदोलनकर्ते होणार अशी भिती वाटू लागली. झाओ झियांग हे उत्तर कोरीयाच्या दौर्यावर असताना लि पेंग यांनी चीनचे सर्वेसर्वा डेंग झिआओपेंग यांच्याशी सल्लामसलत केली आणि हे आंदोलन कसे चिरडले पाहीजे हे गळी उतरवले. तरी देखील तात्काळ काही केले गेले नाही.
ही बातमी जगभर झालेली होती. तुमच्यापै़की काही जणांना त्यावेळेस भारतात नव्याने चालू झालेला (मला वाटते प्रणव रॉय यांचा) "दि वर्ल्ड धीस वीक" हा कार्यक्रम हा आणि अशा अनेक घटना दूरदर्शनवर दाखवू लागला होता. (तेंव्हा खाजगी वाहीन्या नव्हत्या. दूरदर्शन देखील जास्त करून १ चॅनेलपुरतेच होते!).
मे महीन्यात गोर्बाचेव्ह हे १९५९ नंतर चीन ला भेट देणारे पहीले सोव्हिएट प्रमुख होते. पण त्यावेळेपर्यंत तिआनमेन चौकात ३००० हून अधिक विद्यार्थी + इतर उपोषणास बसले असल्याने तेथे मोठा कार्यक्रम करता आला नाही. अर्थात तो पर्यंत हे सर्व सहन केले गेले कारण झाओ झियांग यांचे म्हणणे होते की यातील बहुतांशी हे राष्ट्रप्रेमीच आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधला पाहीजे. पण ती भुमिका सरतेशेवटी डेंग यांनी बदलली आणि मार्शल लॉ जाहीर करण्याचे ठरवले. झाओ यांनी एकदा तेथे जाहीर सांगून पाहीले पण काहीच उपयोग झाला नाही. मे १९च्या रात्री मार्शल लॉ जाहीर करण्यात आला.
पिपल्ज लिबरेशन आर्मी ४० वर्षात प्रथमच बिजिंगचा कब्जा करायला आली. तरी देखील नागरीकांवर गोळ्या झाडू नका असे आदेश होते. बिजिंगच्या जनतेने त्यांना अडवले. त्यांना आंदोलकांनी अहींसेच्या मार्गाने प्रतिक्रीया दिली. परीणामी ३ दिवस तेथे राहून ते तिआनमेन चौकात पोहचू देखील शकले नाहीत आणि नंतर माघार घ्यावी लागली. मे २५ ते जूण १ असा काळ आला, जेंव्हा या चौकात लोकशाहीने कब्जा केला असे वाटावे. त्यामुळे आनंदाचे वातावरण आले. पण नंतर चित्र बदलले. कारण कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वास हा त्यांच्या अधिकारावरील हल्ला वाटला होता आणि तो जर चालून दिला तर कम्युनिझमला तिलांजली द्यावी लागेल परीणामी सत्ता सोडावी लागेल ही भिती होती... त्यातूनच लष्करी बळाचा वापर करण्याचे ठरवले.
लष्कर परत बिजिंगमधे तिआनमेन चौकात जाण्याचा प्रयत्न करू लागले. परत बिजिंगवासीय मधे उभे राहीले. मात्र यावेळेस त्यांना अनपेक्षित घडले... लष्कराने एके ४७ च्या फैरी झाडण्यास सुरवात केली आणि त्यात कितीजण मृत्यूमुखी पडले हे कधीच समजू शकले नाही.
सरतेशेवटी चिनी लष्कर, ४ जून १९८९ च्या पहाटे चौकापर्यंत पोचले. त्यांना तेथे गोळीबार न करता चौक मोकळा करण्याच्या आज्ञा होत्या. पण चौक सकाळच्या सहा पर्यंत मोकळा झालाच पाहीजे असे सांगितले गेले होते.
त्यावेळेस विद्यार्थ्याच्या नेत्याने चौक सोडायचा का मरणाला सामोरे जायचे असा प्रश्न उपस्थित आंदोलकांना विचारून आवाजी मतदान घेण्याचा घाट घातला. उपस्थित पाश्चिमात्या पत्रकारांच्या म्हणण्याप्रमाणे मतदान हे लष्कराला (परीणामी मरणाला) सामोरे जाण्याच्या बाजूने होते. पण तरी देखील नेतॄत्वाने उलट मतदान झाले असे जाहीर करून चौक मोकळा करण्याचे ठरवले!
सकाळच्या वेळेस अनेक विद्यार्थ्यांचे पालक हे चौकात जाण्याचा प्रयत्न करू लागले. लष्कर त्यांना थांबवत होते. पण ते ऐकायला तयार नव्हते म्हणून गोळीबार केला गेला. अनेक जणांना प्राण गमवावे लागले. मग परत काही जण साधारण ४० एक मिनिटात पुढे येत असत. परत तेच असे ६-७ वेळेस झाले. आणि सरतेशेवटी हुकूमशाहीने परत आपली पकड घट्ट केली... चिनी सरकारच्या अधिकृत आकड्याप्रमाणे दोन दिवसात केवळ २४० लोक (त्यात सैनिक देखील आले) मृत्युमुखी पडले आणि ७००० जखमी झाले अशी होती/आहे.
पण या सर्वाचा शेवट अत्यंत गुढमय झाला... जून पाचला तिआनमेन चौकात काही रणगाडे कूच करत होते. बिजिंग शांत झाले होते. अशा वेळेस अचानक एक पांढरा शर्ट घातलेला युवक दोन हातात दोन पिशव्या घेऊन रणगाड्याच्या समोर उभा राहीला. रणगाड्याने त्याला चुकवून जाण्याचा प्रयत्न केला तर तो परत मधे उभा राहीला. असे काहीवेळेस होई पर्यंत हा युवक सरळ रणगाड्यावरच जाऊन उभा राहीला. मग त्याला काही लोकांनी ओढून खेचले आणि त्या जमावात तो लुप्त झाला. तो कोण होता, त्याचे काय झाले हे कधीच कुणाला कळले नाही.
खालील पहील्या फोटोत क्रॉसिंगपाशी एक पांढरा ठिपका दिसेल. हे फोटो काही पाश्चात्य पत्रकारांनी बाजूच्या हॉटेलमधून काढलेले आहेत.
आज पंचविस वर्षांनंतरनी असलेल्या चीननमधील तरूण पिढीस या "टँकमॅन"ची माहिती देखील नाही, पण पोलादी सत्तेला झालेल्या विरोधाचे गुढ प्रतिक म्हणून चीन सोडून उर्वरीत जगाच्या लक्षात राहीला.
प्रतिक्रिया
5 Jun 2014 - 4:15 am | खटपट्या
आज मी पयला !!!
वाचतोय
5 Jun 2014 - 1:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
चान माहिती ! आजही तिआन आन मेनचा दु:खभरा इतिहास खूप जणांना आठवतो आणि चीनच्या राजसत्तेला अडचणीचा वाटतो.
5 Jun 2014 - 1:24 pm | कवितानागेश
हे सगळं आठवतंय... जालिअयनवाला बागेबद्दल वाचताना जसं सगळं अंगावर येतं तसंच झालं होतं...
चीनचे नावीक दलातील काही सैनिक पण या आंदोलनात सामील झाले ही गोष्ट खरोखरच खूप महत्त्वाची होती. खूप मोठी क्रांती होउ शकली असती.
5 Jun 2014 - 2:41 pm | मदनबाण
या घटने बद्धल आणि रणगाड्यांच्या बद्धल थोडेफार माहित होते.२ दिवसांपूर्वी या तिआनमेनच्या अॅनिव्हर्सरी बद्धल Reuters वर बातमी वाचली होती की चीन ने गुगलची सेवा विस्कळीत केली आहे.
संदर्भ :- China disrupts Google services ahead of Tiananmen anniversary
5 Jun 2014 - 2:45 pm | बन्डु
प्लीज सांगाल का?
5 Jun 2014 - 7:05 pm | विकास
कोण आहे हा "टँकमॅन" ? प्लीज सांगाल का?
ते कुणालाच माहीत नाही. पण त्याचे छायाचित्र एकापेक्षा अधिक माध्यम प्रतिनिधिंनी हॉटेलच्या खिडक्यांमधून टिपले होते त्यामुळे ते विश्वासार्ह नक्कीच आहे.
5 Jun 2014 - 7:22 pm | संपत
काही जणांच्या मते वांग वेलिन (Wang Weilin)हा टँकमॅन आहे, पण नक्की नाही. विकिपीडियावर त्याची माहिती मिळेल.
5 Jun 2014 - 3:02 pm | मुक्त विहारि
लेख आवडला.
5 Jun 2014 - 7:34 pm | एस
इथे टँकमॅन ची चित्रफीत पहायला मिळेल.
6 Jun 2014 - 9:19 am | स्पंदना
अजुनही बातम्यांमधे पाह्यलेली चित्रे आठवतात, अतिशय क्रुर सत्ता!
6 Jun 2014 - 9:40 am | पिंपातला उंदीर
माहितिपुर्ण लेख
6 Jun 2014 - 10:08 am | आत्मशून्य
डु आयडी असावा
10 Jun 2014 - 11:17 pm | मस्तानी
धन्यवाद विकास माहितीपूर्ण लेखाबद्दल !
( तुम्हाला तारीख एप्रिल २२, १९८९ अशी लिहायची असणार ती चुकून एप्रिल २२, २०१४ अशी लिहिली गेली आहे 'हे हू १९८९ च्या १५ एप्रिलला हृदयविकारामुळे निधन पावले' या परिच्छेदात)