साहित्यः एक डझन तयार पण घट्ट हापूस आंबे, साखर, लवंगा ४/५, वेलची दाणे( खरं तर या मुरांब्याला हापूस आंब्याचा इतका सुंदर सुगंध असतो की वेलची पण फिकी पडते.)
कृती: फोटोत दाखवल्याप्रमाणे आंब्याच्या दोन्ही बाजूचे काप काढून त्यावर उभ्या आडव्या रेघा मारून चमच्याने फोडी काढून घ्याव्यात. तयार फोडी मोजून घ्याव्यात, जेवढ्या फोडी असतील तेवढीच साखर घ्यावी. साखर, लवंगा, वेलची दाणे सगळे एकत्र मिसळून दोन तास झाकून ठेवावे. साखर विरघळली की मिश्रण कढण्यास ठेवावे.
मिश्रण अधून मधून ढवळत रहावे. पुरेसे घट्ट झालेय असे वाटले की डीशमध्ये थेंब टाकून पहावा. थेंब पसरत नाही असे वाटले की झाला मुरांबा तयार!
आत्ता आंबे मिळतायत तोपर्यंत मुरांबा बरणीत भरून ठेवावा, एकदा सिझन संपला की मुरांबा खाऊन आंब्याची कसर भरून काढता येते. कोणत्याही मोसमात आंब्याची मज्जा!
प्रतिक्रिया
21 May 2014 - 7:11 pm | तुमचा अभिषेक
मुरांबा.. सह्ही.. हा तर खूप आवडीचा, अगदी शाळेत असल्यापासून डब्यात नेतोय.. खास करून चपातीबरोबर चण्यावाटाण्याची उसळीसारखी तिखट भाजी असली की हा तोंडाला लावायला आणखी मजा येते.
पण एक प्रश्न - याला शाही का म्हटले आहे? सहजच की याला साधा मोरंबा पासून शाही बनवायला काही स्पेशल यात टाकले आहे तर सांगा, म्हणजे तसे आईपर्यंत पोहोचवता येईल. बाकी तिची पद्धत अशीच आहे की भिन्न हे मला सांगता येणार नाही, मी जास्त ढवळाढवळ करत नाही स्वैंपाक घरात..
21 May 2014 - 7:15 pm | पिंगू
हापूस आंब्याचा असा मुरांबा कधी बघितला नाही. फक्त एक शंका आहे की, साखरेचे प्रमाण आंब्यांच्या फोडींच्या वजनाइतकेच घ्यावे ना.
बाकी मुरांब्याची चव किती शाही लागेल, याचाच विचार करतोय..
21 May 2014 - 7:18 pm | रेवती
वाह छान दिसतोय.
21 May 2014 - 7:24 pm | अनन्न्या
रत्नागिरी हापूस आहे, फळांचा राजा...म्हणजे शाहीच नाही का?
21 May 2014 - 7:59 pm | प्रभाकर पेठकर
ह्या मुरांब्यावर, पातळ केलेले, घरगुती, शुद्ध साजुक तुप, कमीतकमी १ टेबलस्पून, घ्यायचे आणि स्वर्गसुखाचा अनुभव घ्यायचा.
21 May 2014 - 10:04 pm | काकाकाकू
अगदी बरोबर!
लहानपणीची आठवण झाली.....आता १ टेबलस्पूनभर तूप घेतले तर आठवडाभर किमान १ तास जास्त चालायला लागेल!
21 May 2014 - 8:48 pm | सूड
आहाहा !! का आठवण करुन दिलीत या मुरांब्याची !! केला यावेळेस तर फोटो डकवतो नक्की. :)
21 May 2014 - 11:02 pm | अत्रुप्त आत्मा
22 May 2014 - 4:48 am | सानिकास्वप्निल
खूप आवडतो हापूसचा मुरांबा :)
22 May 2014 - 11:31 am | दिपक.कुवेत
पण साखरे एवजी गुळ घातला तर?? अधीक चविष्ट होईल का??
22 May 2014 - 11:49 am | अनन्न्या
गूळ कितपत चांगला लागेल माहित नाही, कच्च्या आंब्याचा गुळांबा चांगला लागतो.
बाकी तूप घालून मुरांबा खरच सुंदर लागतो.
@ पिंगू, हापूसांब्याच्या मुरांब्याच्या चवीबद्दल शंका?, एकदा करून , खाऊन बघाच! साखरेचे प्रमाण आंब्याच्या फोडींइतकेच घ्या.
सर्वांचे आभार! आंबे मिळतायत तोवर करून ठेवा.
22 May 2014 - 1:09 pm | पिंगू
नाही गं.. चवीबद्दल शंका नाही. साखरेचे प्रमाण जास्त झाले, तर मूळ हापूसची चव हरवायची शक्यता वाटते.
22 May 2014 - 3:17 pm | सूड
नाही होत रे. शंकाच असेल तर आधी मोजून चार आंब्याचा करुन बघ, नाही परत जास्तीचा केलास तर सगोत्री स्त्रीडूआयडी घेईन मी !! ;)
22 May 2014 - 11:57 am | इशा१२३
मस्त आहे मुरांबा.आवडतोच...
22 May 2014 - 12:01 pm | प्रचेतस
मस्तच.
22 May 2014 - 3:50 pm | सविता००१
हाल करते आहेस तू, इतके सुंदर पदार्थ देऊन. पण मी केलाय यावेळी. त्यामुळे नो जळजळ :)
22 May 2014 - 4:48 pm | सुधांशुनूलकर
नुसत्या आठवणीनेच तोंडाला पाणी सुटलं.
आम्ही दर वर्षी करतो. या वर्षी मात्र राहिलाय खरा...
22 May 2014 - 8:24 pm | मनिष
फोडींइतकीच म्हणजे किती साखर?
22 May 2014 - 8:27 pm | मदनबाण
ऑ... असा पण मोरांबा करतात ? फळांचा राजाच... त्यामुळे बाय डिफॉल्ट शाही ! ;)
पण... हा लवकर खराब होत नाही ना ? { शिल्लक राहिला/ठेवला तर खराब होइल ना ! ;) }
;;;
;;
;
मोरांबा की मुरांबा ? ;)
23 May 2014 - 6:28 pm | अनन्न्या
@मनिष, फोडी ज्या वाटीने, भांड्याने मोजून घेवू त्याच भांड्याने तेवढीच साखर घ्यावी.
@मदनबाण मुरांबा कमी कढला, पातळ झाला तर नाही टिकणार, पण व्यवस्थित घट्ट झाला तर वर्षभर टिकतो.
आमच्याकडे मुरांबा म्हणतात...तुम्ही मोरांबा म्हणा चव बदलणार नाही ती शाहीच राहणार!! *smile*
26 May 2014 - 1:07 pm | मदनबाण
मदनबाण मुरांबा कमी कढला, पातळ झाला तर नाही टिकणार, पण व्यवस्थित घट्ट झाला तर वर्षभर टिकतो.
ओक्के. :)
अरे हो आधीच्या प्रतिसाद जे सांगायचे राहिले होते ते सांगतो, पहिल्या फोटोतल्या आंब्याच्या फोडी अगदी मस्त कापल्या आहेत.
23 May 2014 - 10:19 pm | सस्नेह
मी गोवी आंब्याचा करते. हापूसचा कधी केला नाही. आता बगाहते करून.
बाकी, मे नन्तर वर्षभर हापूसची आठवण आली तर चांगला पर्याय आहे हं.
24 May 2014 - 7:48 pm | स्वाती दिनेश
मोरंबा म्हटलं की हाच असतो डोळ्यासमोर.. दुसर्या कोणालाही तिथे स्थानच नाही..
कैरीचा फोडींचा साखरांबा किवा गुळांबा आणि किसलेल्या कैर्यांचा साखरांबा
पण मोरांबा म्हणजे हाच आणि हाच फक्त...
(ह्या सिझनला भारतात आले तर इथे येताना याची एक लहानशी बरणी तरी असतेच सामानात..)
स्वाती
25 May 2014 - 5:31 pm | रामदास
एक बरणी ठेवतो राखून.
26 May 2014 - 11:23 am | स्वाती दिनेश
क्या बात है.. (आता यायला हवेच , :) )
24 May 2014 - 8:14 pm | प्यारे१
अम्मळ जळजळ झाली. :(
पण फोटो एक नंबर दिसत आहेत !