===================================================================
सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९...
===================================================================
...पुढच्या भागापासून आपण बृहद् दम्मामच्या बाहेर पडून सौदी अरेबियातील इतर प्रेक्षणीय ठिकाणांना भेट देणार आहोत.
दम्मामच्या आजूबाजूस एखाद्या दिवसाची सफर करण्याजोगी जी ठिकाणे आहेत त्यात जी तीन मुख्य आहेत ती अशी: अल् हफूफ, अल् कतीफ व अल् जुबेल. त्यांची स्थाने खालच्या नकाश्यात दाखवली आहेत...
पूर्व प्रांतातील दम्मामजवळची प्रेक्षणीय स्थळे (मूळ नकाशा जालावरून साभार)
अल् अहसा
पूर्व प्रांताचा मोठा हिस्सा अल् अहसा या विभागाने (गव्हर्नरेट) व्यापला आहे. स्थानिक बोलीभाषेत याच्या नावाचा उच्चार बहुदा "हास्सा" असाच करतात. हास्सा म्हणजे अरबीमध्ये वाहत्या पाण्याचा आवाज. या भागात मुबलक पाणी आहे आणि हे जगातले सर्वात मोठे मरुवन आहे. येथे असलेल्या खजुरांच्या झाडांची संख्या दहा लाखांपेक्षा जास्त आहे. काही लिखाणांत ती संख्या २० लाख इतकी मोठी असल्याचेही नोंदलेले आहे. पण सौदी अरेबियाचे इतर वाळवंटी प्रदेश पाहता दहा लाख झाडे हीसुद्धा फार आश्चर्यकारक वाटावी इतकी मोठी संख्या आहे. त्याच्या भौगोलिक स्थानामुळे आणि पाण्याच्या मुबलकतेमुळे हास्सा प्राचीन व्यापार आणि दळणवळणाच्या मार्गांवरील एक महत्त्वाचे ठाणे होते. आताही दोन विद्यापीठे, शेतकी संशोधन संस्था आणि उद्योगधंदे यामुळे ते सौदी अरेबियातला एक महत्त्वाचा प्रभाग आहे. अल् हफूफ हे या प्रभागातील मुख्य शहर आहे.
अल् अहसा विभागाला जुन्या काळी अल् बहरेन असे म्हणत आणि आधुनिक सौदी अरेबियाच्या पूर्व किनार्याचा भाग आणि अवल बेटे (आधुनिक बहरेन देश) त्यात सामील होते. इ स ८९९ मध्ये अबू ताहीर नावाच्या कॉर्मेशियन सरदाराने हा भाग बगदादच्या अब्बासिद खलिफतीपासून स्वतंत्र केला आणि हफूफ शेजारी आपली राजधानी स्थापली. सत्तर ऐंशी वर्षांच्या स्थैर्यानंतर येथे खूप राजकीय उलथापालथी झाल्या. प्रथम आयुनिद, नंतर उसफुरीद असे करत जाब्रीद घराण्याची सत्ता तेथे स्थिरावली होती.
इ स १५२१ मध्ये पोर्तुगीजांनी अवल बेटे (आधुनिक बहरेन) जिंकून घेतली आणि जाब्रीद घराण्याला उतरती कळा आली. त्यातच त्या काळात ऑटोमन साम्राज्य आणि त्याला सहकार्य करणार्या स्थानिक जमातींनी हल्ले करायला सुरुवात केली. अखेर १५५० मध्ये अल् अहसा ऑटोमन साम्राज्याचे मांडलिक संस्थान झाले. साधारण शतकभराच्या स्थैर्यानंतर परत एकदा या विभागाचा ताबा बदलत राहिला. इ स १६७० मध्ये बानू खालिद जमातीच्या सरदारांनी अल् अहसा ऑटोमन साम्राज्यापासून स्वतंत्र केले. १७९५ मध्ये अल् अहसा आणि त्या भागातले अल् कतीफ हे भाग पहिल्या सौदी वहाबी राज्यात सामील केले गेले. १८१८ मध्ये ऑटोमन साम्राज्याने हा भाग परत जिंकून घेतला. पण १८३० मध्ये दुसर्या सौदी राज्याने ते परत आपल्या आधिपत्याखाली आणले. नंतर १८७१ मध्ये हा भाग ऑटोमन साम्राज्याच्या ताब्यात गेला तो १९१३ मध्ये इब्न सौदने आधुनिक सौदी अरेबियाच्या स्थापनेच्या कारवाईत परत जिंकून घेईपर्यंत.
या त्रोटक इतिहासावरून या भागाचे किती महत्त्व होते हे ध्यानात येते. त्याचे मुख्य कारण म्हणजे येथील मुबलक पाणी आणि त्यामुळे असलेली शेती व उद्योगधंदे. हा भाग भातशेतीसाठी प्रसिद्ध होता. अल् हफूफ लोकर, रेशीम आणि कापसाच्या व्यापाराचे केंद्रही होते.
.
अल् हफूफ
हफूफ हे हास्सा प्रभागातील १२ लाख वस्तीचे मुख्य शहर आहे. हे सौदी अरेबियातील एक सांस्कृतिक केंद्र समजले जाते. येथील विद्यापीठात इतर विषयांबरोबर शेती, प्राणीवैद्यकशास्त्र (veterinary medicine) आणि प्राणी संपत्ती (animal resources) व्यवस्थापन शिकवले जाते. याशिवाय येथे स्त्रियांसाठी स्वतंत्र वैद्यकीय, दंतवैद्यकीय आणि गृहवित्त महाविद्यालये आहेत. या विभागाला पर्यटन आकर्षण बनविण्यासाठी सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाचे प्रयत्न चालू आहेत.
दंतकथांतही या शहराला महत्त्वाचे स्थान आहे. लैला-मजनू या प्रेमी युगुलांचे दफन याच जागी झाले असे म्हणतात. तसेच येमेनच्या प्रसिद्ध शिबा राणीनेही या शहराला भेट दिली होती असे म्हणतात.
चला तर अश्या या अनेक ऐतिहासिक आणि आधुनिक पैलू असलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या मरुवनाच्या सफरीला...
दम्मामपासून साधारण १३० किमी दूर असलेल्या या ठिकाणी चारचाकीने (तुमच्या गाडीच्या वेगाप्रमाणे) सव्वा ते दोन तास लागतात. हाफूफ जसे जवळ येऊ लागते तसे रुक्ष वाळवंट संपून डोळ्याला थंडाई देणारी हिरवळ दिसायला सुरुवात होते...
हाफूफमधल्या मरुवनाचे प्रथम दर्शन
आणि सौदी अरेबियात दुर्मिळ असणारे पाण्याचे ओहोळ पण दिसायला लागतात...
वाळवंटातला पाण्याचा पाट
.
खजुराच्या झाडांमधिल शेती आणि भाजीपाल्याची लागवड
मधून पाण्याचा पाट, त्याच्या दोन्ही बाजूंनी मातीचे रस्ते आणि त्याच्या बाजूला शेती, बागा व फार्म हाउसेस अशी या सर्व मरुवनामध्ये रचना आहे...
पाण्याचा पाट, त्याच्या बाजूचे रस्ते व बागा
.
अशाच एका पाटाच्या बाजूच्या रस्त्यावरून आमची गाडी मरुवनात शिरली...
.
बागेत शिरल्यावर आपण सौदी अरेबियात आहोत हे विसरवून टाकणारी हिरवाई समोर आली. सर्वत्र असणारी खजुरांची झाडे ती काय सौदी अरेबियाची आठवण करून देत होती...
हफूफमधले फार्महाउस : ०१
.
हफूफमधले फार्महाउस : ०२
.
हफूफमधले फार्महाउस : ०३
.
हफूफमधले फार्महाउस : ०४
.
खुर्च्या सोडून सर्वप्रथम पारंपरिक बैठकीबर आरामात रेलून बसत काहवा (अरबी कॉफी) चा आस्वाद घेतला...
हफूफमधले फार्महाउस : ०५
.
हफूफमधले फार्महाउस : ०६
.
नंतर बागेत थोडा फेरफटका मारून आणि जेवण करून हाफूफमधील एक खास आकर्षण पाहायला बाहेर पडलो...
गारा (कारा) डोंगर
हाफूफच्या जवळ एक गारा / कारा नावाचा वालुकाश्मांचा डोंगर आहे. हजारो वर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेने त्याची झीज होऊन बाहेर वालुकाश्मांचे उंच खांब आणि डोंगराच्या पोटात मोठमोठ्या गुहा तयार झाल्या आहेत. त्यांच्या उंचीमुळे या गुहांमधली हवा उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम असते. हा निसर्गाचा चमत्कार पाहायला अनेक पर्यटक इथे येत असतात.
गारा डोंगरातले वालुकाश्माचे खांब : ०१
.
गारा डोंगरातले वालुकाश्माचे खांब : ०२
.
गारा डोंगरातले वालुकाश्माचे खांब : ०३
.
गारा डोंगरातले वालुकाश्माचे खांब : ०४
.
गारा डोंगरातले वालुकाश्माचे खांब : ०५
.
चित्रविचित्र आकाराचे वालुकाश्माचे खांब पाहत पाहत आपण डोंगराच्या जवळ आल्यावर त्याच्या पोटातल्या गुहांची व्दारे दिसू लागतात. डोंगरांच्या माथ्यापासून पायापर्यंत झीज झाल्यामुळे या गुहांची उंची खूप मोठी आहे. काही ठिकाणी तर या गुहांचे छप्परही झिजून त्या उघड्या पडल्या आहेत आणि त्यांना उंच कड्यांमधल्या चिंचोळ्या दर्यांचे रूप आले आहे. काही गुहा डोंगराच्या पोटात १०० ते १५० मीटरपर्यंत खोल आहेत.
गारा डोंगरामधली गुहा : ०१
.
गारा डोंगरामधली गुहा : ०२
.
गारा डोंगरामधली गुहा : ०३
.
गारा डोंगरामधली गुहा : ०४
.
नंतर आमच्यापैकी काहींनी गिर्यारोहण करून गाराचा माथा गाठला. डोंगरमाथ्यावरून दिसणारे आसमंताचे विहंगम दर्शन भान विसरवणारे होते...
गारा डोंगरमाथ्यावरून दिसणारा परिसर आणि नजरेपलीकडे पोचणारे मरुवन : ०१
.
गारा डोंगरमाथ्यावरून दिसणारा परिसर आणि नजरेपलीकडे पोचणारे मरुवन : ०२
.
गारा डोंगरमाथा आणि नजरेपलीकडे पोचणारे मरुवन : ०३
.
तो नजारा पाहत राहावा असाच होता. पण मार्गदर्शकाने वेळेची जाणीव देत अजून दोन ठिकाणे पाहायची आहेत याची आठवण देत आम्हाला डोंगर उतरणे भाग पाडले.
स्थानिक कला
हाफूफमध्ये मातीच्या वस्तू आणि खजुराच्या पानांपासून वस्तू बनवण्याचा उद्योगधंदा प्राचीन काळापासून चालत आला आहे. मात्र आता जगभरच्या मालाने सौदी बाजारपेठ काबीज केल्यामुळे या कला एक सांस्कृतिक ठेवा आणि पर्यटन आकर्षण म्हणून जतन केल्या जात आहेत. आमचा पुढचा थांबा एका स्थानिक कारागिराच्या कार्यशाळेचा होता...
मातीच्या वस्तू बनवणारा एक स्थानिक कलाकार
.
मातीच्या वस्तू : ०१
.
मातीच्या वस्तू : ०२
.
मातीच्या वस्तू : ०३
.
खजुराच्या झावळ्यांपासून बनवलेल्या रोजच्या वापरातल्या वस्तू
.
इब्राहिमाचा राजवाडा
हाफूफमध्ये इब्राहिमाचा राजवाडा नावाची एक गढी आहे. ही गढी ऑटोमनपूर्व काळातली आहे आणि ऑटोमन पर्वात ती या प्रांतामधल्या सैन्यदळाच्या मुख्य छावणीचे ठिकाण होते. जीर्णोद्धार करून तिला आता एक पर्यटक आकर्षणाचे स्वरूप दिले गेले आहे.
इब्राहिमाचा राजवाडा : पूर्वरूप (जालावरून साभार)
.
इब्राहिमाचा राजवाडा : जिर्णोद्धारानंतरचे बाह्यरूप
.
तेथे असलेल्या स्थानिक मार्गदर्शकाने आम्हाला मोठ्या आत्मीयतेने सर्व गढी फिरवून माहिती दिली. नंतर गढीसंबंद्धी एक माहिती चलत्चित्रपट दाखवून आम्हाला गढीच्या आवारात मोकळे फिरायला सोडले. ही तिची काढलेली काही प्रकाशचित्रे...
इब्राहिमच्या राजवाड्याचे आतले रूप : ०१
.
इब्राहिमच्या राजवाड्याचे आतले रूप : ०२
.
इब्राहिमच्या राजवाड्याचे आतले रूप : ०३
.
इब्राहिमच्या राजवाड्याचे आतले रूप : ०४ : सेनापतीचे निवासस्थान
.
इब्राहिमच्या राजवाड्याचे आतले रूप : ०५
.
हे सगळे होईपर्यंत रात्र झाली होती. दिवसभराच्या धावपळीने सगळेजण थकलेही होते. गाडीच्या वातानुकूलित वातावरणात आरामदायक खुर्च्यांवर बसल्यावर जरा हायसे वाटले. हफूफच्या रात्रीच्या गर्दीतून वाट काढत आमची गाडी दम्मामच्या दिशेने धावू लागली...
.
पुढची सफरीत आपण अल् कतीफ नावाच्या दुसर्या एका वैशिष्ट्यपूर्ण आणि विविधरंगी मरुवनात जाणार आहोत.
क्रमशः
===================================================================
सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९...
===================================================================
प्रतिक्रिया
22 May 2014 - 7:40 am | नरेंद्र गोळे
एक्का साहेब,
आपल्या नेहमीच्या समर्थ शैलीने आणि नेमक्या प्रकाशचित्रांनी सजलेली सुरेख वर्णने वाचून, आपल्या लेखांबाबत कायमच उत्सुकता वाटत आलेली आहे. सदरहू लेखही अशा सर्व अपेक्षा पूर्ण करणाराच आहे. आवडला.
22 May 2014 - 9:35 am | प्रचेतस
अफाट आहे हे मरुवन. गारा डोंगरातल्या वालुकाश्मांचे आकारही भारीच आहेत.
मजा येतेय सौदी अरेबियाच्या सफरीत.
22 May 2014 - 12:06 pm | अत्रुप्त आत्मा
@गारा डोंगरातल्या वालुकाश्मांचे आकारही भारीच आहेत.>>> वालुकाश्म ज्जाम अवडले! *i-m_so_happy* त्यातल्या ३ नंबरच्या फोटुत आमचा
अंश आहे... ;)
तो मधला उंच सुळका..साइडनी, आदिमानवाची कवटी असल्यासारखा भासतो आहे! *biggrin*
22 May 2014 - 9:42 am | मुक्त विहारि
मी मागच्या जुबैलच्या ट्रिपला इथे गेलो होतो.
लक्षांत काय राहीले तर, आमच्या साहेबांच्या बायकोने आणलेले छोले आणि दुसर्या मित्राने (त्यावेळी तो नुकताच भारतातून आला होता.) आणलेल्या गूळ-पोळ्या आणि साजूक तूप.
इब्राहिमचा राजवाडा मात्र बघायचा राहिला.ग्रुप मध्ये थोडी बच्चे कं. असल्याने आम्ही तिथल्याच एका छोट्या प्राणी संग्रहालयांत गेलो होतो.
22 May 2014 - 10:13 am | सौंदाळा
मज्जा मज्जा.
लहानपणीचा अरेबियन नाईट्सचा पगडा अजुन कायम आहे. सौदीला भेट द्यायची खुप इच्छा आहे. युरोप, अमेरिकापेक्षा सौदी, इजिप्त, दक्षिण अमेरिकेबद्दल मनात अजुनही गुढरम्य आकर्षण आहे.
पुभाप्र
22 May 2014 - 12:37 pm | मंदार कात्रे
सर्व भाग वाचतो आहे . मालिका सुरेख होते आहे.
घरबसल्या सौदी चे दर्शन घडवल्याबद्दल आभार ,इतर आखाती देशात जाउनही सौदी बद्दल भयमिश्रित आकर्षण असतेच !
22 May 2014 - 6:14 pm | रेवती
हे लेखनही आवडले. छायाचित्रेही चांगली आलीयेत. फोटोतील ठिकाणी धूळ फार असणार असे वाटत आहे.राजवाडा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर जे येते त्यापेक्षा वेगळे चित्र आहे. फार्महाऊसवर लाल व हिरव्या रंगाचा वापर जास्त वाटला. पिवळसर रंगाचे ओले खजूर आणि नेहमीचे काळपट रंगाचे असे घोस देठासकट प्याकबंद करून आलेले ग्रोसरी स्टोअरमध्ये बघितले आहेत तेवढीच या भागाबद्दल माहिती होती.
22 May 2014 - 7:18 pm | मुक्त विहारि
+ १....
प्रचंड सहमत...
22 May 2014 - 6:34 pm | सूड
मस्त !!
22 May 2014 - 6:39 pm | शिद
हा ही भाग मागच्या भागांसारखा मस्तच...फोटो पण उत्तम.
22 May 2014 - 6:46 pm | दिपक.कुवेत
आवडला. लेखमाला उत्तरोत्तर रोचक होत चालली आहे.
22 May 2014 - 6:48 pm | अनन्न्या
मातीची भांडीही कलात्मक आहेत. खजूर लागलेल्या झाडाचा फोटो नाही? का तुम्ही गेलात तेव्हा सिझन नव्हता?
23 May 2014 - 6:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
नरेंद्र गोळे, वल्ली, अत्रुप्त आत्मा, मुक्त विहारि, सौंदाळा, मंदार कात्रे, रेवती, सूड, शिद, दिपक.कुवेत आणि अनन्न्या : अनेक धन्यवाद !
25 May 2014 - 12:37 pm | सस्नेह
खिळवून ठेवणारी चित्रे अन सुरेख मालिका.
25 May 2014 - 1:46 pm | प्यारे१
नेहमीच प्रतिसाद देईन असं नाही पण वाचतोय मालिका.
मत मात्र बदलणार नाही असं वाटतंय. फिरायला येऊ इ ए न्ची मालिका वाचून, कामासाठी नाही ब्वा! ;)
25 May 2014 - 8:00 pm | पैसा
वाचताना प्रत्यक्ष तिथे भटकून आल्याचा अनुभव येतोय!
25 May 2014 - 8:08 pm | मदनबाण
झकास्स... :)
25 May 2014 - 11:25 pm | डॉ सुहास म्हात्रे
स्नेहांकिता, प्रशांत आवले, पैसा आणि मदनबाण : अनेक धन्यवाद !
26 May 2014 - 12:20 am | सुहास झेले
अप्रतिम.... वालुकाश्माचे खांब आणि इब्राहीमचा राजवाडा जबरीच :)
26 May 2014 - 2:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
30 May 2014 - 12:39 pm | सविता००१
काय अफलातून फोटो काढता हो तुम्ही! फारच छान. मालिकाही सुरेखच आहे.
30 May 2014 - 12:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छायाचित्र आणि वर्णने दोन्हीही छान. मजा येतेय. पुभाप्र.
-दिलीप बिरुटे