===================================================================
सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९...
===================================================================
...पुढच्या भागापासून आपण दम्माम शहरातून बाहेर पडून आजूबाजूला हिंडणार आहोत.
महाकंपनी सौदी आराम्को (Saudi Aramco)
सौदी आराम्को या महाकंपनीचे सौदी अरेबियात आणि जगात इतके मोठे महत्त्व आहे की तिची ओळख करून घेतल्याशिवाय त्या देशाची ओळख अपुरी राहील. सौदी आराम्को (Saudi Arabian Oil Company) ही सौदी सरकारच्या आधिपत्याखालील खनिज तेल आणि वायूचे व्यवस्थापन करणारी कंपनी आहे. सद्द्या या कंपनीच्या ताब्यात सबळ पुराव्यांच्या आधारे सिद्ध झालेला २६० बिलियन बॅरल्स येवढा तेलसाठा आहे. फिनान्शियल टाईम्सच्या मूल्यमापनाप्रमाणे या कंपनीची किंमत US $ १०,०००,०००,०००,००० (दहा ट्रिलियन) म्हणजेच साधारणपणे भारतीय रुपयांत ६,००,००,००,००,००,००० (साठ लाख कोटी) आहे. अर्थातच तेलाच्या वाढणार्या भावाप्रमाणे ती वर अथवा खाली (बहुदा वरच) जाते. नवीन तेलसाठ्यांचा शोध लागल्यास अर्थातच तिची किंमत वर जाते. जगतील दुसर्या क्रमांकाची कंपनीची किंमत सौदी आराम्कोच्या निम्म्यापेक्षा कमी आहे.
जगातले सर्वात मोठे असणार्या घवार आणि शायबा या दोन तेलसाठ्यांच्या जवळ असलेल्या दाहरान या शहराला या कंपनीच्या मुख्यालयाच्या जागेचा मान मिळाला आहे. आणि हा मान असा की जवळ जवळ सर्व दाहरान शहर या कंपनीच्या कार्यालयांनी आणि कर्मचार्यांच्या वसाहतींनी व्यापून गेले आहे.
या कंपनीचा इतिहास आणि त्याचा जगातील अर्थकारणावर आणि राजकारणावर पडलेला प्रभाव मोठा मनोरंजक आणि बोधकारक आहे. त्याची एक धावती उजळणी अशी आहे...
पहिल्या महायुद्धात झालेल्या मोठ्या प्रमाणावरच्या खनिज तेलाच्या (आणि त्यामुळे उर्जेच्या) तुटवड्याने युद्धात, उद्योगधंद्यांत आणि एकूणच अर्थकारणात खनिज तेलाचे अनन्यसाधारण महत्त्व जगापुढे आले. इ स १९२० च्या सान रेमो कराराप्रमाणे ब्रिटन आणि फ्रान्सला ऑटोमान साम्राज्यापासून स्वतंत्र झालेल्या (त्या वेळेस माहीत असलेल्या) तेलाने समृद्ध सिरीया व मेसोपोटेमिया (आताच्या इराकचा भाग) या देशांत शासकीय अधिकार (अड्मिनिस्ट्रेटिव्ह राइट्स) मिळाले. अर्थातच तेथे अमेरिकेचा प्रभाव नगण्य झाला. त्यामुळे अमेरिकेचा त्या वेळेचा वाणिज्य मंत्री हर्बर्ट हूवरने परदेशात तेलसंशोधन करून तेथून तेल आयात करण्यासाठी "खुला दरवाजा धोरण (Open Door policy)" जाहीर केले.
Standard Oil of California (SoCal) या कंपनीने या धोरणाचा उपयोग करून मध्यपूर्वेत तेल उद्योगधंद्यात शिरकाव करायला सुरुवात केली. SoCal ने १९२९ मध्ये Bahrain Petroleum Co. (BAPCO)च्या रूपाने पहिली उपकंपनी स्थापन केली. या कंपनीला बहारेनमध्ये १९३२ मध्ये तेलाचा शोध लागला. यामुळे मध्यपूर्वेतील तेलसाठ्यांकडे जगाचे लक्ष वेधले जाऊन तेथे तेलसंशोधनाला चालना मिळाली. २९ मे १९३२ रोजी सौदी सरकारने तेलसंशोधनाचे हक्क ब्रिटिश प्रभावाखालील Iraq Petroleum Co. ला डावलून SoCal ला दिले.
SoCal ला १९३६ पर्यंत सौदी अरेबियात तेल शोधण्यात यश मिळाले नाही. त्यामुळे तिचे ५०% समभाग Texas Oil Co. (Texaco) विकावे लागले. चार वर्षांच्या असफल प्रयत्नांनंतर दाहरान जवळ सातव्या प्रयत्नात "दम्माम क्रमांक ७" या तेलविहिरिला यश मिळाले. मात्र ही विहीर इतकी लाभदायक ठरली की तिने त्वरित दर दिवशी १,५०० पिंपे तेल देण्यास सुरुवात केली ! अश्या तर्हेने अर्थकारणीय राजकारणाच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली, जे अजून चालू आहे.
३१ जानेवारी १९४४ ला SoCal चे नाव बदलून Arabian American Oil Co. (Aramco, आराम्को) असे ठेवले गेले. या नवीन कंपनीत SoCal आणि Texaco बरोबर Esso आणि Mobil या दोन कंपन्याच्या पूर्वाश्रमीच्या अवतारांचाही सहभाग होता.
इ स १९५० मध्ये राजा अब्दुल अझिझ ने देशातील तेलसाठ्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याची धमकी देऊन आराम्कोच्या ५०% फायद्यावर हक्क मिळवला. या वेळेपर्यंत ही तेलकंपनी इतकी प्रबळ झाली होती की तिने या "फायद्यातल्या घाट्या"ला उपाय म्हणून सौदी सरकारला द्यायचा ५०% फायदा उत्पन्नकरातून वजा करण्याची तरतूद अमेरिकन सरकारकडून मंजूर करवून घेतली ! या प्रकाराला "सोनेरी युक्ती (golden gimmick)" असे नाव पडले आहे ! नंतर हा प्रकार कायदेशीर बनवण्यासाठी कंपनीचे मुख्यालय अमेरिकेतील न्यू यॉर्क येथून सौदी अरेबियातील दाहरान येथे हलवले गेले.
१९७३ मध्ये झालेल्या योम किप्पूर नावाने ओळखल्या जाण्यार्या अरब-इझ्रेली युद्धात अमेरिकेने इझ्रेलला मदत केल्याच्या कारणावरून दबाव आणून सौदी सरकारने आराम्कोचा २५% हिस्सा मिळवला. १९७४ मध्ये सौदी सरकारने त्याचा हिस्सा ६०% पर्यंत वाढवून आणि पुढे १९८० मध्ये १००% केला. त्यानंतर १९८८ मध्ये सौदी सरकारने या कंपनीवर पूर्ण व्यावसायिक ताबा मिळवून तिचे सौदी आराम्को (Saudi Aramco) असे नामकरण केले. पूर्ण सौदी मालकी असली तरी या कंपनीने पूर्वीच्या भागधारक कंपन्यांशी असलेले तेलसंशोधन आणि तेलव्यवस्थापनाचे करार मात्र अबाधित ठेवलेले आहेत.
या कंपनीच्या ताब्यात असलेल्या प्रचंड तेलसाठ्यांमुळे आणि विकाऊ तेलाच्या मोठ्या आकारमानामुळे तिचा जागतिक तेलव्यवसाय व तेलाच्या किमतीवर प्रबळ प्रभाव असणे आश्चर्यकारक नाही. आता ही कंपनी देशाच्या सीमा ओलांडून बाहेर पडली आहे. Saudi Aramco Asia Co नावाच्या तिच्या एका उपकंपनीचा इंडोनेशियाच्या Pertamina या राष्ट्रीय तेलकंपनीबरोबर US$ ८ बिलियनचा करार करण्याचा मानस २०१३ मध्ये जाहीर झाला आहे.
अश्या या जगातील सर्वात बलाढ्य कंपनीच्या प्रचंड आवारात शिरकाव करायला जवळ जवळ एखाद्या देशात प्रवेश करण्यासारखेच सोपस्कार करावे लागले तर आश्चर्य नाही. कंपनीचे व्यावसायीक निमंत्रण अथवा आतल्या एखाद्या महत्त्वाच्या रहिवाशाचे आमंत्रण असल्याशिवाय तेथे प्रवेश अशक्य आहे. शिवाय मुख्य व्दारावर पूर्ण चौकशी होऊन आणि रहिवाशाबरोबर दूरव्धनीवर संभाषण करून मगच आत प्रवेश मिळतो. आवार इतके मोठे आहे की विभाग, रस्ता आणि घर क्रमांक माहीत असले तरी रस्ता चुकण्याचे प्रमाण कमी नाही ! हे आवार एका प्रकारे "देशामध्ये देश (State within State)" आहे कारण इथे सौदी पोलिसांना मुक्त प्रवेश नाही आणि ही एकच जागा आहे की जिथे स्त्रिया (फक्त आवाराच्या आतच) चारचाकी चालवू शकतात.
दाहरानमधे असलेली अजून एक महत्त्वाची संस्था म्हणजे किंग फाहाद पेट्रोलियम आणि खनिजे विद्यापीठ (King Fahd University of Petroleum and Minerals, KFUPM). येथे मॅसेचुसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) च्या सहकार्याने नवअविष्कर्त्यांना आणि नवसंकल्पनाकारांना (inventors and designers) प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी एक खास विभाग (incubator cell) आहे.
असो. इतकी माहिती घेतल्यावर आता सौदी आराम्कोच्या आवारातल्या तेल उद्योगावर आधारीत खास प्रदर्शनाची एक प्रकाशचित्रसफर करूया...
सौदी आराम्को प्रदर्शन
ज्या एकमेवाव्दितीय कंपनीने सौदी अरेबियाला जागतिक अर्थकारणात आणि राजकारणात मानाचे स्थान मिळवून दिले तिच्या संबंद्धीच्या तिच्या स्वतःच्या कायमस्वरूपी प्रदर्शनाला भेट देण्याबद्दल खूपच उत्सुकता होती. हे प्रदर्शन कंपनीच्या आवारातच असल्याने तेथे मुक्त प्रवेश नाही. ते बघण्याची संधी आमच्या हॉस्पिटलाच्या क्रीडा व मनोरंजन विभागाने (रिक्रिएशन डिपार्टमेंट) एक सहल आयोजित करून दिली.
प्रदर्शनाच्या आवारात मुख्य प्रवेशव्दाराच्या समोर असलेला पृथ्वीचा गोल आपले स्वागत करतो. त्याच्या पलीकडे एका उंचवट्यावर खर्याखुर्या तेलवाहकांच्या व्हाल्वज् चे मानशिल्प आहे...
प्रवेशव्दारासमोरचे प्रांगण
.
प्रवेश्व्दार
.
स्वागतकक्षातून दिसलेली पहिली झलक
.
आत गेल्यावर आपल्याला एक मार्गदर्शक पत्रिका मिळते. तिच्यात प्रदर्शनाचा नकाशा आणि सर्व विभागांची तोंडओळख असते. या पत्रिकेमुळे कोणाच्याही मदतीशिवाय हे प्रदर्शन आपल्या मनाप्रमाणे फिरून बघता येते. इथेच आपल्याला आतापर्यंत ऐकलेल्या सौदी आराम्कोच्या व्यवस्थापकीय वेगळेपणाची खात्री पटू लागते.
.
भूस्तरांची मांडणी आणि त्यांत खनिज तेलाच्या खाणाखुणा
.
तेलाच्या विहिरीची किचकट मांडणी
.
समुद्रातल्या तेलविहीरीतले तेल तेलवाहू जहाजावर चढवण्यासाठीची यंत्रणा
.
तेलवाहू जहाजाची रचना
.
खनिज तेलापासून रॉकेल, पेट्रोल, डिझेल, इ भाग उर्ध्वपतनाने वेगळे करणारे मनोरे
.
खनिज तेलापासून तयार होणारी अनेक उत्पादने
.
समुद्रातल्या तेलविहिरीचा खूप काळाच्या वापरानंतर काढून टाकलेला, त्याच्यावर वाढलेल्या पाणजीवांसह, एका भाग
.
प्रदर्शनातील बहुतेक सर्व वस्तूंजवळ त्यांची अरबी व इंग्लिशमध्ये माहिती देणारे फलक आणि दृकश्राव्य व्यवस्था आहे. त्यामुळे मनातल्या बहुतेक सर्व शंका मार्गदर्शकाविना दूर होण्यास मदत होते आणि प्रत्येक भाग आपल्या आवडीप्रमाणे वेळ देउन बघता येतो. हे माहितीपूर्ण प्रदर्शन बघायला खूपच मजा येते. मला सर्वच विभाग आवडले पण सर्वात जास्त रोचक वाटलेला होता "खनिज तेल तयार होण्याची दशकरोडो वर्षांची प्रक्रिया, तिला हिमयुगांमुळे समुद्राच्या पाण्याच्या वरखाली होणार्या पातळीची मदत आणि आधुनिक तेलसंशोधन प्रणाली" दाखवणारा विभाग.
मरजान बेट
दम्माम शहराशेजारी अरबी आखातात मरजान नावाचे एक छोटेसे बेट आहे. सौदी आराम्कोने त्याचा विकास करून त्यावर एक मळसूत्राकार अथवा कुंडलाकार मनोरा व बाग बनविली आहे. हे बेट सार्वजनिक वापरास खुले आहे. बेटावर जाण्यासाठी मुख्यभूमीपासून एक अर्धवर्तुळाकार बंधारा बांधून त्याच्यावर चारचाकीने जाण्यासाठी रुंद रस्ता केलेला आहे. आठवड्याच्या सुट्टीत (शुक्रवार-शनिवारी), शाळा-कॉलेजच्या सुट्ट्यांत आणि विशेषतः ईदच्या सुट्ट्यांत हे बेट तेथे फिरायला जाणार्या लोकांनी फुलून जाते. चला तर मरजान बेटावर सहलीला...
.
दम्मामचा समुद्रकिनारा आणि मरजान बेट (मूळ नकाशा जालावरून साभार)
.
मरजान बेटाचे पहिले दर्शन
.
दुरून दिसणारा मनोरा आणि बागेचा एक भाग
.
चारचाकीच्या पार्किंगमधून दिसणारा मळसुत्राकार मनोरा
.
मळसुत्राकार मनोरा, जवळून
.
मनोर्यावरून होणारे बागेचे दर्शन
.
मनोर्यावरून होणारे बागेचे आणि एका पर्यटन बोटीचे दर्शन
.
बेटाच्या जवळ एक धक्का आहे तेथून पर्यटन बोटींनी बेट आणि दम्मामच्या समुद्रकिनार्याचे समुद्राच्या बाजूने दर्शन घेता येते. दम्मामचा जवळ जवळ १५-२० किमी लांबीचा समुद्रकिनारा हिरवळ, फुलझाडे आणि मुलांच्या खेळाच्या व्यवस्थांनी सजविलेला आहे. असे समुद्रकिनारे कॉर्निश या नावाने ओळखले जातात. समुद्रकिनार्यांंवर वसलेल्या अनेक शहरा-गावांना असे कॉर्निश आहेत. तेथे संध्याकाळी, विशेषतः हिवाळ्यात, फिरायला जाण्याची मजा लोक भरभरून घेतात. ईदच्या मोठ्या सुट्ट्यांत तर कॉर्निश लोकांच्या गर्दीने भरलेले असतात. काही लोक संध्याकाळचे जेवण तेथे आणून त्याचा कुटुंबासह हिरवळीवर बसून आस्वाद घेतात तर काही उत्साही मंडळी तेथे चक्क बार-ब-क्यु पार्टी करतात.
तर चला बोटीतून मरजान बेटाचा आणि दम्माम कॉर्निशचा नजारा बघायला...
बोटीतून दिसणारे मरजान बेट : ०१
.
बोटीतून दिसणारे मरजान बेट : ०२
.
बोटीतून दिसणारे दम्माम कॉर्निश
.
जसजसा सूर्य खाली येऊ लागतो तसतसा हा सर्व परिसर प्रथम धूसर प्रकाशात आणि नंतर दिव्यांच्या झगमगाटात नवनवीन रूप धारण करू लागतो...
.
मरजान बेटावरची संध्याकाळ : ०१
.
मरजान बेटावरची संध्याकाळ : ०२
.
मरजान बेटावरची संध्याकाळ : ०३
.
मरजान बेटावरची संध्याकाळ : ०४
.
पुढच्या भागापासून आपण बृह्द् दम्मामच्या बाहेर पडून सौदी अरेबियातील इतर प्रेक्षणीय ठिकाणांना भेट देणार आहोत.
क्रमशः
===================================================================
सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९...
===================================================================
प्रतिक्रिया
20 May 2014 - 3:54 pm | कुसुमावती
सौदी आराम्कोबद्द्ल कुतुहल होतेच त्या कंपनीचा इतिहास कळाला. सर्व फोटो मस्त.
पुभाप्र.
20 May 2014 - 7:41 pm | मधुरा देशपांडे
असेच म्हणते. प्रत्येक भागावर प्रतिसाद दिला जात नाही पण आवर्जून वाचते आहे.
20 May 2014 - 4:24 pm | बिपिन कार्यकर्ते
येऊ द्या! छान चालू आहे.
20 May 2014 - 4:56 pm | प्रचेतस
खरोखरच महाकंपनी.
मरजान बेट पण सुरेख आहे अतिशय.
आराम्को आणि मरजान बघून ते इतक्या ओसाड वाळवंटी वाळवंटी प्रदेशात वसलेले आहे असे वाटतच नाही.
20 May 2014 - 5:08 pm | बॅटमॅन
हे बाकी लै खतरनाक काम केलंत बघा. नैतर सौदीच्या वाळवंटात आहेच काय?????? असा प्रष्ण आमच्या डॉक्षात कायम असतो.
20 May 2014 - 5:12 pm | आतिवास
+१
20 May 2014 - 5:45 pm | स्वप्नांची राणी
अरे...त्या मळसुत्राकार मनोर्या सारखाच एक मनोरा कतारमधे पण आहे. ती 'फनार' म्हणजे 'कतार ईस्लामिक कल्चरल सेंटर' ची बिल्डिंग आहे.
बाकी, सौदि अराम्को ची महिती मस्स्स्त!!! आणि हि सगळीच लेखमाला पण खूप इन्टरेस्टींग!!! माझ्या एका एक्स-सौदि सद्य-कतार मयत्रिणीला पण दिली वाचायला तर तिला भरुन-बिरुन येतेय!!!
21 May 2014 - 10:24 am | डॉ सुहास म्हात्रे
फनार म्हणजे दीपगृह (लाईट हाउस). त्या पद्धतीचे बांधकाम "मार्गदर्शक प्रकाश" या अर्थाने अरबी इमारतींमध्ये वापरले जाते. उदा: फनार (कतार इस्लामिक कल्चरल सेंटर):
21 May 2014 - 11:51 am | डॉ सुहास म्हात्रे
(वरचे चित्र जालावरून साभार)
20 May 2014 - 6:14 pm | अनन्न्या
मनोय्रावरून बाग छान दिसतेय!
20 May 2014 - 6:20 pm | सूड
मस्त!! पुभाप्र !!
20 May 2014 - 6:44 pm | अत्रुप्त आत्मा
20 May 2014 - 7:08 pm | एस
येईच्च बोलताय
20 May 2014 - 7:07 pm | सुहासदवन
Saudi Aramco Asia Co नावाच्या तिच्या एका उपकंपनीचा इंडोनेशियाच्या Pertamina या राष्ट्रीय तेलकंपनीबरोबर US$ ८ बिलियनचा करार करण्याचा मानस १९१३ मध्ये जाहीर झाला आहे.
20 May 2014 - 7:24 pm | मुक्त विहारि
अशा थोड्या चुका होणारच...
मनातल्या मनांत, कदाचित एक्का साहेबांनी, संपादक मंडळाला थोडे कामाला लावायचा पण विचार केला असावा.)
21 May 2014 - 10:28 am | डॉ सुहास म्हात्रे
गलतीसे मिष्टेक हुवा, वो सुधर्या हई *pardon* । तिकडे लक्ष वेधल्याबद्दल आभार !
20 May 2014 - 7:27 pm | मुक्त विहारि
ह्या आमच्या यानबू विषयी काही माहीती असेल तर लिहा ना?
इथे कुणालाच जास्त काही माहित नाही.सध्या आम्ही ३ मिपाकर इथेच (यानबूलाच) आहोत.
काही तरी, गाडी-घोड्याची व्यवस्था करून थोडे आस-पास फिरून येवू.
20 May 2014 - 7:27 pm | मुक्त विहारि
लेख आवडला...
हे सांगायचे राहिलेच.
पुभाप्र.
20 May 2014 - 8:09 pm | भाते
करा कि एक कट्टा यांबूमध्ये आणि येऊ द्या सचित्र वृत्तांत.
आम्हालासुध्दा बघु द्या कि ते यांबू फोटोतुन.
20 May 2014 - 10:54 pm | मुक्त विहारि
तुम्ही त्या टवाळ कार्ट्यांना भेटायला पण जात नाही. आणि आम्हाला मात्र कट्ट्याचे फोटो पाठवायला सांगता.
(भेंडी, मी नसतांना कट्टे करता काय?सध्या आम्ही रोज दुपारी मिपा कट्टा करतो.)
21 May 2014 - 10:32 am | डॉ सुहास म्हात्रे
यानबू दम्माम्हून १४०० किमी दूर आहे. तेथे जाण्याची इच्छा होती पण ते जमले नाही. त्यामुळे त्या शहराची माहिती इथे टाकण्याची जबाबदारी तुमच्यावर पडली आहे असे मी सर्व मिपाकरांतर्फे जाहीर करत आहे ;)
21 May 2014 - 2:56 pm | मुक्त विहारि
आम्ही आपले फुकटांत काही तरी आशा मनी बाळगून होतो आणि पदरांत काहीतरी वेगळे वाचायला मिळेल म्हणत होतो, तर तुम्ही आमच्याच खांद्यावर आणि त्यातून गंमत म्हणजे, आमच्या कॅमेराच्या लेन्स वर जबाबदारी टाकून मोकळे.
असो,
जबाबदारी घेतो...पण हा कट्टा समुद्र किनारी असल्याने..फोटो जास्त आणि व्रुत्तांत कमी, असेच होणार आहे.
20 May 2014 - 8:05 pm | भाते
माहिती आणि फोटो आवडले.
भरदिवसा रस्त्यावरचे दिवे चालु ठेवण्याची परंपरा फक्त मुंबईतच नाही तर सौदीमध्ये पाळली जाते हे बघुन हायसे वाटले.
तरीही आपल्या इथे लोक ऊगाच त्याला शिव्या घालतात. :)
20 May 2014 - 9:15 pm | पाषाणभेद
छान सफर चालू आहे.
अवांतरः दिवसा जर खांबांवरचे दिवे चालू असतील तर सहसा त्या भागातील दिव्यांची/ विजेची देखभाल चालू असते.
20 May 2014 - 10:58 pm | मुक्त विहारि
एक सांगा,
तुम्ही इतके स्पष्ट आणि सुंदर फोटो कसे काय काढता?
आमचा कॅमेरा बरा आहे, मुलं फार सुंदर फोटो काढतात.पण तोच कॅमेरा आमच्या हातात आला की लेन्स टाकतो.हे नक्की काय गौडबंगाल आहे, तेच कळत नाही.
21 May 2014 - 12:11 am | शुचि
हाहाहा
21 May 2014 - 10:40 am | डॉ सुहास म्हात्रे
=)) आमचे फोटो बरे येतात यात आमचा कायबी दोष नाय बगा ! क्यामेरा द्येव आमाला परसन्न आसावा, तेचिच सर्वी क्रुपा. तेचि रोज पुजा करा. (मुलान्ला चांगले फोटो काडता येतात म्हंता म्हंजे) नक्की फरक पडंल ;)
21 May 2014 - 3:06 pm | मुक्त विहारि
तो प्रयोग, पहिल्यांदा जेंव्हा कॅमेरा हातात आला, तेंव्हाच करून बघीतला.कॅमेर्याला मस्त पाण्यातून धुवून काढला.वर हळद-कूंकू आणि चंदन पण लावले.
वडीलांनी, आमच्या पाठीवर चंदनाचा मार्क काढला.(तुमचे ते वॉटर-मार्क पुसले जातील पण हे चंदन-मार्क काही पुसले जात नाहीत.)शिवाय पाहुण्यांची सरबराई करतांना अजून पण हा "कॅमेर्याच्या पुजेचा किस्सा" सांगीतल्या जातो.
अन, तुम्ही सांगताय, परत पूजा करायला.चांगला आमचा सुखाचा संसार चालला आहे, तो चालू द्या.
22 May 2014 - 8:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
म्हणजे तुम्ही चांगलेच जाणकार आहात या बाबतीत ! मग आम्ही काय शिकवणार तुमाला ? =))
21 May 2014 - 5:20 am | वॉल्टर व्हाईट
एका अमेरिकन कंपनीचे सौदी कंपनीत झालेल्या रुपांतराचा इतिहास रोचक वाटला. एक्झॉन मोबिल वैगेरे याच्याशी कश्या निगडीत होत्या वैगेरे जाणुन घेण्याची उत्सुकता आहे.
21 May 2014 - 10:53 am | डॉ सुहास म्हात्रे
१९४८ मध्ये आराम्को मधिल ३०% समभाग Standard Oil of New Jersey म्हणजे नंतरची Esso ने आणि १०% समभाग Socony Vacuum म्हणजे नंतरची Mobil या दोन कंपन्यांनी खरेदी केले. या दोन्ही कंपन्या Iraq Petroleum Co. च्या भागधारक होत्या. त्यामुळे त्याकाळच्या आंतरराष्ट्रीय ताकदींमधिल कराराप्रमाणे त्यांना हे करणे शक्य नव्हते. राजकीय वजन वापरून तो करार (Red Line Agreement) बदलून घेऊन ही गुंतवणूक केली गेली. अर्थकारण आणि राजकारण हे कसे एकमेकात गुंतलेले असते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
21 May 2014 - 7:19 am | राही
प्रतिसाद लिहिलाच आहे असे नाही पण आपल्या इतर अनेक लेखमालांप्रमाणेच ही लेखमालासुद्धा अतिशय आवडते आहे. आरॅम्को ची माहिती रंजक होती. फोटो तर (हेही नेहमीप्रमाणेच) अप्रतिम. नुसते फोटो बघूनच डोळे निवले. प्रत्यक्ष बघणार्यांचे काय होत असेल!
आपल्याकडे अशी सुबत्ता कधी अवतरेल असे वाटून थोडी विषण्णता येते.
21 May 2014 - 10:13 am | जेपी
21 May 2014 - 10:18 am | तुषार काळभोर
शेवटचे ३ फोटो (मरजान बेटावरची संध्याकाळ : ०२-०३-०४) तर कडक!!
21 May 2014 - 10:50 am | मृत्युन्जय
सौदी मध्ये बायकांना बुरख्याशिवाय कुठेही जाता येत नाही आणी चेहर्यावरुन बुरखा काढता येत नाही आणि इतर अनेक अशी बंधने ऐकली आहेत. त्याबद्दल वाचायला आवडेल.
21 May 2014 - 11:29 am | डॉ सुहास म्हात्रे
सौदीमध्ये "सर्व" स्त्रियांना आबाया (म्हणजे गळ्यापासून पायापर्यंत असलेला पायघोळ झगा) घालावा लागतो. मात्र सर्व सौदी स्त्रिया केसांवरून ओढ्णी सारखे वस्त्र घट्ट बांधतात. बहुतांश सुन्नी मुस्लीम स्त्रिया बुरख्याने चेहरा झाकतात पण शिया स्त्रियांमध्ये हे प्रमाण बरेच कमी आहे. परदेशी स्त्रियांनी केस व चेहरा झाकणे आवश्यक नसते.
दुसरा महत्वाचा नियम म्हणजे स्त्रिया चारचाकी चालवू शकत नाही. या नियमाबद्दल सद्या तेथे चर्चा चालू आहे.
मोठ्या कंपन्या व हॉस्पीट्ल्समध्ये बर्याच सौदी स्त्रिया काम करतात. हॉस्पीटलमध्ये आल्यावर आबाया उतरवून नेहमीच्या बाह्य कपड्यांवर (शर्ट-पँट अथवा टॉप आणि पायघोळ ड्रेस) हॉस्पीटलचा पांढरा कोट घालून काम करणे हे नेहमीचे आहे.
थोडक्यात काही इतर देशांपेक्षा वेगळे नियम आहेत पण त्या देशाची संस्कृती म्हणून थोडेसे समजून घेतले तर ते इतकेसे जाचक आहेत असे जाणवले नाही... शिवाय जशी वेळ जाते तसे या नियमांचा कडकपणा कमी होत आहे असे निरिक्षण आहे.
21 May 2014 - 11:43 am | डॉ सुहास म्हात्रे
आबाया (मानेपासून पायापर्यंत पायघोळ वस्त्र) आणि हेजाब (लेडिज हेडगियर)...
.
निकाब (चेहरा झाकणारे वस्त्र)...
(सर्व चित्रे जालावरीन साभार)
21 May 2014 - 11:50 am | डॉ सुहास म्हात्रे
कुसुमावती, मधुरा देशपांडे, बिपिन कार्यकर्ते, वल्ली, बॅटमॅन, आतिवास, अनन्न्या, सूड, अत्रुप्त आत्मा, स्वॅप्स, भाते, पाषाणभेद, शुचि, राही, जेपी, पैलवान : आपल्या सर्वांचे या खूप वेगळ्या देशाच्या सफरीत स्वागत आहे. पुढची सफरही अशीच रोचक वाटेल अशी आशा आहे.
21 May 2014 - 2:07 pm | रायनची आई
खुपच छान लिहिलय..अगदि पुन्हा पुन्हा नीट वाचाव अशी माहिती दिली आहे.
21 May 2014 - 2:46 pm | मदनबाण
आराम्को बद्धल खरं तर गेल्या वर्षी एका लेखात वाचलं होत... अर्थात कारण होत जगातल्या सगळ्यात मोठ्या या ऑइल कंपनीचे हँकिंग करुन केले गेलेले नुकसान ! १५ ऑगस्ट २०१२ ला या कंपनीचे संपूर्ण नेटवर्क हॅक झाले होते, हॅकर्सनी जवळ पास ३०,००० कॉप्युटर्सच्या हार्ड-डिस्क वाईप आउट करुन टाकल्या.हा आत्ता पर्यंतचा कॉर्पोरेट जगातील कुठल्याही कंपनीवर झालेला सर्वात घातक हल्ला होता...मेमरी {बहुधा हार्ड-डिस्क} ही ५ ते ६ वेळा री-राइट करण्यात आली, याचा अर्थ वाईप आउट मधुन डिलीट झालेली माहिती पुन्हा रिकव्हर करणे जवळपास अशक्य !
या बद्धलचा दुवा माझ्या प्रतिसादात अत्यंत वाचनिय लेख {Silent War}म्हणुन दिला होता. :)
जाता जाता :- या प्रतिसादाचा योगा-योग असा की हा प्रतिसाद हॅकिंग बद्धल आहे आणि आजची बदलली सही सुद्धा हँकिंग बद्धलच आहे. ;)
21 May 2014 - 10:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
खरं आहे. ती एक अत्यंत खळबळजनक घटना होती. त्यानंतर सगळ्या सौदी अरेबियामध्ये जालप्रणाली संरक्षक व्यवस्था खूप कडक करण्यात आली.
21 May 2014 - 5:26 pm | चाणक्य
मस्त चालू आहे मालिका.
21 May 2014 - 6:56 pm | इशा१२३
आधिचे भागहि वाचलेत...सुरेख फोटो आणि माहीती..
21 May 2014 - 7:17 pm | रेवती
ग्रेट लिहिलयत. फोटू तर नेहमीप्रमाणेच सुरेख आलेत.
वाळवंटात निर्माण केलेला जादुई देश पाहून आश्चर्य वाटते.
तेलसाठे असल्यावर काय काय होऊ शकते याच्या बर्याच सुरस आणि चमत्कारिक अथा ऐकल्या आहेत. त्यांची आठवण झाली.
21 May 2014 - 7:41 pm | आदूबाळ
आराम्कोचा इतिहास प्रचंड रोचक आहे. धन्यवाद!
21 May 2014 - 10:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
रायनची आई, चाणक्य, इशा१२३, रेवती आणि आदूबाळ : अनेक धन्यवाद !
22 May 2014 - 7:55 am | नरेंद्र गोळे
आराम्को कंपनीचा परिचय अत्यंत मोलाचा वाटला.
लेख आवडला. नेमक्या मराठी शब्दांचा वापर सुखद वाटला.
मात्र एक सूचना अशी की, आधी "प्रवेश" पूर्ण करून घ्या आणि मगच "द्वार" गाठा ना!
22 May 2014 - 8:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
आधी "प्रवेश" पूर्ण करून घ्या आणि मगच "द्वार" गाठा ना!
हे कळले नाही. जरा इस्काटून सांगा. *unknw*24 May 2014 - 9:05 am | नरेंद्र गोळे
प्रवेश्व्दार >>>>>
22 May 2014 - 8:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
आधी "प्रवेश" पूर्ण करून घ्या आणि मगच "द्वार" गाठा ना!
हे कळले नाही. जरा इस्काटून सांगा. *unknw*22 May 2014 - 8:23 pm | पद्मश्री चित्रे
आत्ता सर्व लेख वाचले. मरजान बेट किती सुंदर दिसतय....वाळवंट म्हण्जे सगळं रुक्ष असं वाटत होतं , आता तिथली सुंदरता पण दिसली आणि तुमच्या फ़ोटोनी आणखी बहार आणली.. पुढील सफरनामा वाचायला तयार...
22 May 2014 - 8:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
25 May 2014 - 5:21 pm | पैसा
सगळं वर्णन आणि फोटो खासच आहेत! अरबस्तानच्या सुरस आणि चमत्कारिक कथा!
26 May 2014 - 2:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !