भीमाशंकरच्या देवराईत मिपाकर – भाग १
वनभटकंती
भीमाशंकर धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं, तसंच पर्यावरणदृष्ट्याही अतिशय महत्त्वाचं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये निसर्गाला देवाशी अनेकविध मार्गांनी जोडलेलं आहे, त्यापैकी एक म्हणजे ‘देवराई’ (देवासाठी राखून ठेवलेलं रान). देवराईमध्ये कोणीही शिकार अथवा वृक्षतोड करत नाही. त्यामुळे तिथल्या स्थलविशिष्ट (endemic) वनस्पतींचं आणि प्राणिसृष्टीचं संरक्षण आणि संवर्धन होतं. महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेलं ‘शेकरू’ म्हणूनच इथे तग धरून आहे. कोकणात देवराया पाहायला मिळतात, तशाच इथेही.
इथे भीमा नदीचा उगम होतो. १९८४ साली इथल्या १३० चौ.मी. दाट जंगल परिसराला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आणि हा परिसर संरक्षित केला गेला. ‘निमसदाहरित विषुववृत्तीय पावसाळरान’ (semi-evergreen tropical rain forest) या प्रकारात हे जंगल मोडतं. अधूनमधून जंगलतोड झाली आहे, पण देवरायांमुळे जंगल टिकूनही राहिलं आहे. काही ठिकाणी तर सूर्यप्रकाश जमिनीवर जेमतेम पोहोचेल इतकी दाट झाडी आहे. या दाट जंगलात दोन दिवस-रात्र मस्त भटकंती केली.
वनभ्रमणाला निघालेले मिपाकर
जांभळ्या सुंदर फुलांचा अंजन (स्थानिक नाव – करप), वारस, आंबा, माकडलिंबू, शेंदरी, अशा खास या मातीतल्या अनेक वृक्षांनी हे जंगल समृद्ध आहे.
जंगलात गेल्यावर प्राणी दिसणं तसं दुर्मीळच. (प्राणी बघायचे असतील, तर प्राणिसंग्रहालयात जावं.) पण प्राण्यांच्या अस्तित्वाच्या विविध खुणा मात्र जागोजागी दिसतात.
बिबट्याची विष्ठा - यात भेकर/रामगाय यासारख्या प्राण्याच्या मांडीचं हाड स्पष्ट दिसत आहे. (यावरून भक्ष्य आणि भक्षक या दोघांचंही अस्तित्व लक्षात येतं.)
शेकरू (Giant Indian Squirrel, Ratufa Indica Elphinstony) हा इथला मुख्य प्राणी. महाराष्ट्राचा राज्यप्राणी. शेकरू खूप लाजाळू असल्यामुळे ते पटकन दिसत नाही. उंच वृक्षांच्या शेंड्यांवर ते वाळक्या पानांची तीन-चार घरटी बांधतं आणि आपली पिल्लं आळीपाळीने या घरट्यामध्ये ठेवतं.
इथे राणी पाकोळी (Blue Mormon) हे भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं फुलपाखरू खूप सापडतं, पण त्याचा फोटो काढता आला नाही. मात्र क्र.२च्या (लेसर ग्रास ब्लू) या चिमुकल्या फुलपाखराचा फोटो घेता आला. आणि हे फनेल स्पायडरचं जाळं.
आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण कीटक इथे सापडला – सिकाडा (मराठीत झिल्ली) नर. (नर कशावरून?) त्याच्या छातीच्या दोन्ही बाजूंना हवेच्या पिशव्या दिसताहेत. त्यात हवा भरून तो कर्रर्र कर्रर्र आवाज काढतो. अंड्यातून बाहेर पडलेलं पिलू आधी मातीखाली आणि नंतर खोडाच्या सालीखाली सुप्तावस्थेत राहून झाडाच्या रसावर जगतं. ही सुप्तावस्था काही जातींमध्ये सतरा वर्षं इतकी असते. मग प्रौढ नर/मादी कीटक बाहेर पडतो, जोडीदाराबरोबर मिलन होतं आणि काही दिवसांतच कीटकाचा मृत्यू होतो. (मादीला मात्र आवाज करता येत नाही. म्हणूनच एका इंग्लिश कवीने म्हटलं आहे – ‘Happy the cicada lives, They have voiceless wives.’ ते असोच.)
आमचं जंगलप्रेम पाहून तिथल्या वनरक्षकांनी रात्री पाणथळीवर जायचा बेत आखला. अंधार पडतापडताच आम्ही वीर तळं नावाच्या पाणथळीवर जाऊन पोहोचलो. थोडासा प्रकाश होता. सन्नाटा अंगावर काटा आणत होता. थोड्या वेळाने मोराचं एक जोडपं सावधपणे पावलं टाकत आलं आणि शेजारच्या झाडीत निघून गेलं. पुन्हा निरव शांतता. मग एक भेकर हळूहळू येताना दिसलं. आमच्या अगदी जवळ आलं, आणि... आम्ही त्याच्या दृष्टीस पडलो. त्याबरोबर ‘भॉऽक’ असा घुमावदार आवाज काढून क्षणार्धात दिसेनासं झालं. थोड्याच वेळात मागच्या झाडीतून खसफस ऐकू आली. एक हुप्प्या नर आमच्यावर इतका वेळ नजर ठेवून होता, आणि आम्हाला त्याचा पत्ताच नव्हता. त्याने खकर्रर्र असा खर्जातला आवाज काढला आणि आम्ही तिथून उठलो. धोक्याच्या या दोन इशाऱ्यांनंतर निदान एक तासभरतरी कोणताही प्राणी इकडे फिरकणार नाही, याची खातरी होती.
रविवारी सकाळी गुप्त भीमाशंकरच्या रानवाटेवर शेकरू अगदी अचानक दिसलं. त्याचा फोटो/व्हिडिओ काढता आला नाही, मात्र शेवटचा दिस गोड झाला! मग न्याहारी करून निघालो.
परतीच्या प्रवासातली खादाडी
पहिल्या दिवशी ज्या हॉटेलमध्ये जेवलो होतो, तिथेच जेवायचा बेत होता. पुणे-नाशिक महामार्गावरच नारायणगावजवळ हे हॉटेल आहे. आई-बाबा, त्यांची दोन मुलं आणि मुलांच्या बायका असं सगळ कुटुंब मिळून ते चालवतात. हॉटेल प्रशस्त, हवेशीर आहे.
जेवणाची सुरुवात करायला आपला मराठमोळा ‘स्टार्टर’ – नाचणी पापड.
इथली खासियत म्हणजे पिठलं आणि मेथी-लसूण भाजी, झणझणीत लाल ठेचा आणि खुरासणी, शेंगदाणा आणि जवस या तीन चटण्या (तेलासहित). पिठल्याबरोबर गरम गरम भाकरीही हवीच! याच्या जोडीला कारलं, अळूवडी आणि व्हेज कोल्हापुरी असा फक्कड बेत जमला.
मिपाकरांची खवय्येगिरी बघून मालकांनी घरची कैरी चिरून त्यावर तिखट-मीठ लावून पेश केली.
पिठलं तर इतक उत्कृष्ट होतं की त्याचं जागतिक पेटंट घ्या असं त्यांना सुचवलं! नुसत्या आठवणीने तोंडाला पाणी सुटलं बघा!
जेवणात मग्न झालेले मिपाकर
जेवण संपल्यावर भूलोकीचं अमृत - ताक आणि मुखशुद्धी...
असे मिपाकर जेवुनी तृप्त झाले...
भरल्या पोटाने आणि तृप्त मनाने मार्गस्थ झालो. पण खादाडी एवढ्यात संपली, तर ते मिपाकर कसले? स्थानिक गावकरी रानमेवा घेऊन रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यांना न्याय दिला नाही, तर कसं चालेल? मुंबईला पोहोचेपर्यंत या रानमेव्याने तोंडाला काम दिलं.
रात्री मुंबईला सुखरूप पोहोचलो, ते पुढच्या सहलीचा विचार करतच...
शेवटी एक गोष्ट सांगितलीच पाहिजे. खरं तर मिसळपाव हे महाजालावरचं एक संकेतस्थळ, आभासी (व्हर्चुअल). पण जिंदादिल मिपाकरांमुळे ते केवळ आभासी न राहता कट्टे, प्रत्यक्ष भेटी अशा माध्यमातून मिपाकर एकमेकांच्या जवळ आले, हे मला फार अद्भुत वाटतं. म्हणूनच मिपाकरांना मन:पूर्वक सलाम करत पुढच्या सहलीचे बेत आखायला लागतो...
प्रतिक्रिया
8 May 2014 - 12:50 pm | गणपा
वाह साहेब सुंदर माहिती.
पहिल्या भागही आवडला होता पण सांगायचं रहुन गेलं होतं.
शेवटचे काही फोटो मात्र दिसले नाहीत. ;)
8 May 2014 - 12:54 pm | यशोधरा
मस्त! :)
8 May 2014 - 1:01 pm | मनराव
मस्त !!!
8 May 2014 - 1:21 pm | प्रचेतस
मस्त वृत्तांत.
नुकतेच आंबा घाटानजीकच्या घनदाट जंगलात आणि तिथल्या देवराईत भ्रमंती केल्यामुळे जंगलाशी जवळून परिचय झालाच आहे.
हा सिकाडा म्हणजे दिवसकिडा ना? हे दिवसभर किर्र किर्र करत असतात.
गुप्त भीमाशंकरची रानवाट खूप सुंदर आहे. तिथल्या झाडावंर एक विशिष्ट प्रकारची बुरशी आढळते. ऐन पावसाळ्यात रात्री ह्या जंगलात गेलं तर ही बुरशी लागलेली झाडे प्रकाशमान झालेली आढळतात.
बाकी नागफणीवर जाऊन का नाही आलात? तिथे उभे राहून सह्यकडे न्याहाळण्यात विलक्षण सुख लाभते.
8 May 2014 - 4:47 pm | आत्मशून्य
यप, मी तर इतका भारव्ला होतो की आजू बाजू ला ब्लुस्किन पीपल दिसतील की काय शंका मनाला चाटून गेली. थोड़ सावरल्यावर लक्षात आले ते लोक फक्त जेम्स केमेरों च्या मूवी मधेच आजुबाजुला आलेले दिसतात ;)
8 May 2014 - 5:02 pm | शैलेन्द्र
ज्योतीवंती म्हणतात तीला..
8 May 2014 - 5:53 pm | प्रचेतस
ज्योतवंती. खास गोनीदांनी दिलेले नाव
8 May 2014 - 1:37 pm | भाते
सगळे फोटो आवडले. विशेषत: तो फुलपाखराचा फोटो छानच आहे.
खादाडीचे फोटो बघुन अजिबात जळजळ झाली नाही. जेवण आवडले.
8 May 2014 - 2:32 pm | अजया
सुरेख आणि माहितीपूर्ण वृत्तांत. जेवणही मस्त !!
8 May 2014 - 2:41 pm | आत्मशून्य
मिपा परंपरेला पाईक राहून खादाडीचे फ़ोटो टाकल याबद्दल विशेष आभार. अन्यथा धागा मध्यवर्ती ठिकाणी मारावा काय विचार होता.
8 May 2014 - 3:25 pm | स्मिता श्रीपाद
काही काही फोटो दिसत का बर नाहीत ?
बाकी मस्त वृत्तांत...:-)
8 May 2014 - 3:32 pm | शैलेन्द्र
मस्त वृत्तांत..
शेकरु बघायच्या असतील तर माथेरान मस्त..
8 May 2014 - 3:43 pm | सूड
ह्म्म हे साग्रसंगीत झालं!! आवडेश! *i-m_so_happy*
8 May 2014 - 5:23 pm | कंजूस
फोटो आणि खादाडी छानच .
8 May 2014 - 6:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त भटकंती, खादाडी आणि लेखन !
9 May 2014 - 5:20 am | नंदन
>>> मस्त भटकंती, खादाडी आणि लेखन !
--- असेच म्हणातो.
8 May 2014 - 6:33 pm | स्पंदना
शेकरु मी दोनदा पाहिली आहे. अन दोन्हीवेळा महाबळेश्वर!!
सुरेख माहीती.
पिठलं.....असोच.
मजा केलात ना? बास!
आम्ही त्यातच सुखी. मिपाकर असे एकमेकांना भेटत राहोत. मस्तीत राहोत अशीच शुभेच्छा!!
8 May 2014 - 7:00 pm | रेवती
मस्त भटकंती आणि खादाडी! सगळे फोटू व वर्णन आवडले.
8 May 2014 - 7:20 pm | मुक्त विहारि
पण हरकत नाही.
निदान तुम्ही सगळ्यांनी मजा केलीत. त्यातच भरून पावलो.
8 May 2014 - 7:25 pm | अत्रुप्त आत्मा
सर्व खायचे पदार्थ पाहून
आणि परचं.............ड जळजळल्याही गेले आहे! :-/
शिवाय...करवंद-द्रोण-हल्ल्यानी गतप्राण होऊन..मम आत्मा वरंध घाटात भटकायला गेला आहे
8 May 2014 - 8:07 pm | प्रचेतस
वरंध घाटातच का?
इथे जवळच ताम्हिणी घाटात कचकून करवंदं आहेत.
8 May 2014 - 8:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
"त्या" आत्म्याचं" झाड बहुतेक वरंध घाटात असेल, त्यामुळे ! ;)
8 May 2014 - 8:23 pm | प्रचेतस
*biggrin*
8 May 2014 - 8:45 pm | प्यारे१
झाड ला पण अवतरण चिन्ह " .." टाकावं ही णम्र विणंती.
सुधांशू जी अभ्यासू वृत्तांत खूप आवडला.
कृपया खादाडीच्या फोटोंना गुप्त करावं.
9 May 2014 - 1:04 am | अत्रुप्त आत्मा
@झाड बहुतेक वरंध घाटात असेल>>> =)) व्हय जी व्हय..पयलं करवंद वरंद घाटातच खाल्लं! =))
26 Mar 2017 - 10:20 pm | ऋतु हिरवा
ही नाचणारी पिवळी सोंगे कुठे मिळतात ?
8 May 2014 - 8:42 pm | शिद
सहीच झालेली दिसतेय भटकंती आणि खादाडी...लेख पण मस्तच जमलाय.
8 May 2014 - 9:25 pm | केदार-मिसळपाव
"शेवटी एक गोष्ट सांगितलीच पाहिजे. खरं तर मिसळपाव हे महाजालावरचं एक संकेतस्थळ, आभासी (व्हर्चुअल). पण जिंदादिल मिपाकरांमुळे ते केवळ आभासी न राहता कट्टे, प्रत्यक्ष भेटी अशा माध्यमातून मिपाकर एकमेकांच्या जवळ आले, हे मला फार अद्भुत वाटतं."
अगदी हेच म्हणतो.
8 May 2014 - 9:32 pm | सखी
छान भटकंती वृत्तांत, दोन्ही भाग आवडले. भाग १ मधला नीलमोहोरही आणि यामधला रानमेवा खासच. मिपाचे भ्रमणमंडळ असेच भटकंती करत राहो.
8 May 2014 - 10:05 pm | येडगावकर
कायेकी तुर्तास काही कारणांमुळे आमची भटकंती हे फक्त 'येडगाव ते डोंबोली' येवढीच मर्यादित झालेली आहे! म्हणुन तुमच्यासारख्या मंडळींनी केलेली भटकंती एनजॉयतोय!
बायदवे ते हाटील आमच्या एक्दम जवळ! गावाला गेलं की एकतरी फेरी होतेच तिथे! तिथे मिळणारी सगळ्यात जबरी गोष्ट म्हणजे 'अन् लिमिटेड लसुन चटणी'! आहाहा... आयला पुढच्या फेरीला अजुन १० दिवस आहेत!
8 May 2014 - 11:46 pm | लॉरी टांगटूंगकर
लै भारी !
11 May 2014 - 12:29 pm | सुधांशुनूलकर
सर्व प्रतिसादांसाठी आभार.
@ वल्ली, आत्मशून्य, शैलेन्द्र - ज्योतवंतीबद्दल नवी माहिती मिळाली. आता ती बघायला पावसाळ्यात भीमाशंकरला जाणं आलंच! कोणी मिपाकर येणार का?
जून-जुलैमध्ये कोयना अभयारण्यात जायचा बेत आहे. बरोबर यायची इच्छा असलेल्या मिपाकरांचे सहकुटुंब स्वागतच असेल.
11 May 2014 - 7:37 pm | प्रचेतस
मी तर येणारच.
जून जुलै मध्ये कोयना अभयारण्यात अगदी धो धो पाऊस असेल. इतक्या पावसात कोयना अभयारण्यात जाणे योग्य ठरेल काय?
12 May 2014 - 11:40 am | आत्मशून्य
जुन ते ऑगस्ट हे घडणे अशक्य वाटते. कोयना अभयारण्य मस्तच आहे, यायला नक्किच आवडेल.
12 May 2014 - 9:04 pm | सुधांशुनूलकर
जूनच्या तिसर्या-चौथ्या आठवड्यात प्रयत्न करतो आहे, तेव्हा फार पाऊस नसेल. जुलै-ऑगस्टमध्ये मात्र भरपूर पाऊस असेल, हे खरं. नाहीतर पाऊस ओसरल्यावर सप्टेंबरनंतर बघू...
12 May 2014 - 3:25 pm | मुक्त विहारि
तुमची कं.असेल तर ...
आणि
तरच....
12 May 2014 - 6:12 pm | आत्मशून्य
कोणतीही सक्ती नाही, आला नाहीत तरी चालेल, याची नोंद ठेवावी.
11 May 2014 - 3:08 pm | mdmagar
हॉटेलचे दर लिहायला हि मंडळी का बरं विसरतात !!
12 May 2014 - 8:56 pm | सुधांशुनूलकर
अतिशय स्वस्त.
उदा. पिठलं, मेथी-लसूण भाजी, प्र. ६०/-
प्रत्येकी अंदाजे १००/- होतील.
11 May 2014 - 7:18 pm | ऋतु हिरवा
अतिषय सुंदर माहिती. जेवणाचे फोटो पाहून पुन्हा एकदा श्री हरि ला भेट द्यावी असे वाटू लागले आहे.
26 Mar 2017 - 10:18 pm | ऋतु हिरवा
मस्त .. आठवणी जाग्या झाल्या
27 Mar 2017 - 6:40 pm | सिरुसेरि
सुरेख वर्णन आणी मस्त फोटो
30 Mar 2017 - 3:17 pm | प्रसाद गोडबोले
लेखन वर काढल्याबद्दल मनःपुर्वक आभार ! लेखपाहुन आमच्याही मिपाकरांसोबत केलेल्या भीमासंकरच्या ट्रिपच्या आठवणी जाग्या झाल्या .
गुप्त भीमा शंकरच्या वाटेवर जाताना आम्हाला तर शेकरु इतक्या जवळुन दिसला होता की अक्षरशः त्याला मांडीवर घेवुन मांजरासारखे कुरवाळता आले असते !
आता परत एकदा भीमा शंकरला जाणे आले !