पिझ्झासोबत आणि पास्त्यामध्येही खाताना ब्रोकोली मला प्रचंड आवडली. पण सॅलॅडमध्ये कच्चीच खायची तर अगदी कसंसंच झालं. आधीच ब्रोकोलीचा उग्र वास आणि मग त्यासोबत काय काय एकत्र जाईल ही एक शंका होतीच. थोड्या ट्रायल-एरर नंतर ही पाककृती सध्या बरी वाटतेय.
सर्वसाधारण स्वयंपाकात सतत तंतोतंत मापं असू शकत नाहीत. जिथे शक्य आहेत, तिथं दिली आहेत. नाहीत तिथं मात्र आपल्या आपल्या मगदुराप्रमाणं किती-काय-कसं हे थोडंसं आपलं आपणच उमजून घ्यावं हे उत्तम.
लागणारा वेळ
जास्तीत जास्त २० मिनिटे, भाज्या कापून तयार असल्यास पाच मिनिटांहूनही कमी.
साहित्य:-
- तर एक लहानसा ब्रोकोलीचा गड्डा. दुकानात मिळतो साधारण तेवढा एक.
- एक ते दीड वाटी उभा चिरलेला कोबी
- एक वाटी ताज्या पनीरचे साधारण एक सेमीXएक सेमी आकाराचे तुकडे
- एक ते दीड वाटी गाजराचेही एक सेमीXएक सेमी आकाराचे तुकडे
- मूठभर पार्सली
- हवे असल्यास कोवळी पालकाची पाच-सहा पाने
- दोन-तीन बदाम
- एक बारीक कापलेली हिरवी मिरची
- पाच-सहा खजूरांचे उभे कापलेले तुकडे
- अर्धा चमचा तेल (शक्यतो ऑलिव्ह ऑईल)
- आठ-दहा मधोमध कापलेली काळी द्राक्षे/ मनुका (वैकल्पिक)
ड्रेसिंग
- एक वाटीभर टांगलेलं दही. (यासाठी रात्रभर टांगायचीही गरज नाही. स्वयंपाकास सुरूवात करण्याआधी एका चहाच्या गाळणीत दही ठेवून ते गाळणं एका वाटीभर ठेवून द्या. अतिरिक्त पाणी खाली वाटीत जमा होईल.)
- काळं मीठ
- अर्धा-पाऊण चहाचा चमचा साखर
- काळी मिरी
- मस्टर्ड सॉस
कृती-
- ब्रोकोली सोडून इतर भाज्या, मिरची व खजूरचे तुकडे कापून तयार ठेवले.
- ब्रोकोली अशीच खायला चांगली लागत नाही. त्यामुळे मी सहसा ब्रोकोलीचे तुरे मायक्रोवेव्हमध्ये एक मिनिटभर ठेवून खायला घेते. या वेळेस अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये गॅस हायफ्लेम वरती ठेवून दीडेक मिनिट चटचट भाजून घेतली व थंड होण्यासाठी बाजूला ठेवली.
- एका लहान कुंड्यात/बोलमध्ये पाणी काढलेले दही फेटून घेतले
- दह्यात मीठ+साखर+मस्टर्ड सॉस घातले*. त्यातच काळी मिरीची पावडर पेपर मिलमधून अगदी ताजी ताजी घातली. सर्व मिश्रण पुन्हा एकदा फेटून घेतले.
- थंड झालेली ब्रोकोली, पार्सली व इतर भाज्या+खजूर इ.वर हे ड्रेसिंग ओतले
- हलक्या हाताने भाज्या वरखाली करून सर्व ठिकाणी हे ड्रेसिंग नीट लागेल हे पाहिले.
- सलाद तयार.
टीप:-
- *दह्यात थोडीशी पुदीन्याची पाने देखील चुरून घालता येतील.
- द्राक्षे घातल्याने चव आणखीच वाढते. दाताखाली खजूर किंवा द्राक्ष आलं की मस्त वाटतं.
- फ्रीजध्ये साधारण एक तासभर ठेवल्यास सलाद चांगले मुरते व दही ड्रेसिंग+मिरचीची चव छान जमून येते.
- गॅस किंवा स्टोव्हशिवाय स्वयंपाक करायचा असल्यास हा प्रकार अगदी उत्तम.
- दही आणि पनीरमधून मिळणारे बी१२ हा या पाककृतीचा मुख्य घटक मानला जाऊ शकेल.
- शक्यतो ताजी मिरीपावडर वापरावी, चवीत नक्कीच फरक पडतो. त्यसाठी हे उपकरण उपयुक्त ठरावं.
प्रतिक्रिया
21 Apr 2014 - 7:20 pm | पैसा
फोटो खूप छान आलेत! पण ब्रोकोली आणि कोबी दोन्ही एकत्र? ब्रोकोली परतून घेतली तरी वासाच्या बाबतीत डब्बल ट्रबल नै ना?
21 Apr 2014 - 7:58 pm | मस्त कलंदर
आमच्याकडे पांढरट कोबी मिळतेय. तिला तितकासा उग्र वास नाही. पनीर परतून घेतलं तरी चालेल, पण मग पुन्हा शॅलो फ्राय-तेल म्हणून टाळलंय.
21 Apr 2014 - 7:39 pm | कवितानागेश
पनीरपण थोडे परतले तर छन लागेल असा अंदाज आहे. पण बाकी मस्तच आहे कॉम्बिनेशन. :)
21 Apr 2014 - 7:57 pm | प्रभाकर पेठकर
बाकी पाककृती ऊत्तम आणि मांडणी अगदी आकर्षक आहे.
मात्र, वैयक्तिक आवडीनुसार मी गाजर किसून घेईन आणि बदामाची सालं काढून त्याचे पातळ तुकडे करून टाकेन.
पण सलाड आहे बाकी मस्तं. ब्रोकोली मला आवडतेच. थोडी वाफवून घेतो. ब्रोकोली जास्त वाफवायची नाही नाहीतर त्यातील कॅन्सरशी झुंजण्याची शक्ती कमी होते.
21 Apr 2014 - 7:59 pm | यशोधरा
सॅलड भारी दिसतंय!
21 Apr 2014 - 8:11 pm | त्रिवेणी
नं २ फोटो एकदम मस्त.
करायचे ठरवले तर कोबी वगळून करेन.
21 Apr 2014 - 9:14 pm | शुचि
पाकृ आवडली. खतरनाक टेस्टी दिसतेच आहे.
21 Apr 2014 - 9:14 pm | प्यारे१
मस्त हेल्दी रेसिपी! आवडली.
21 Apr 2014 - 9:19 pm | आयुर्हित
आजपर्यंत मिपावर पाहिलेली सर्वात जास्त चांगली आरोग्यदायी पाकृ!!!!!
प्रत्येक घटक आरोग्यदायी असून बनवायची पद्धतही सोपी आणि साधी आहे.
महत्वाचे म्हणजे, मिपा वापरणाऱ्या(अर्थात पिसीवर काम करणाऱ्या, डोळ्यावर ताण येणाऱ्या व बैठे जीवन जगणाऱ्या)प्रत्येक व्यक्तींनी नियमित खावी अशीच हि पाकृ आहे.
मस्त कलंदरजी, अजून अश्याच आरोग्यदायी पाकृच्या प्रतीक्षेत!
धन्यवाद.
22 Apr 2014 - 10:01 pm | आयुर्हित
मधुमेही रुग्णांसाठी व मधुमेहाचा धोका असणाऱ्यांसाठी सुद्धा हे सॅलॅड उपयोगी आहे:
एक उपयुक्त दुवा मधुमेह रोखण्यासाठी ब्रोकोली सॅलॅड
21 Apr 2014 - 10:18 pm | कंजूस
फोटो ,कृती ,सजावट ,अन्नद्रव्यमुल्य किती वगैरे छानच .दह्याचे ड्रेसिंग फळांच्या कापांसाठी "डिप"म्हणून वापरतात तसे आहे असे दिसते .
रशिअन सलाड येथे देण्याचा मोह आवरत नाही .
यात कोबी (महाबळेश्वरकडचा घ्यावा ,कमी उग्र आणि कुरकुरीत असतो ) ,आणि बेदाणे (शक्यतो मस्कतचे असावेत ,नाशिक ,तासगावचे हिरवे चालतील ) वापरायचे .ड्रेसिंगसाठी एका बॉटलमध्ये ऑलिव ऑईल +विनिगर +मिरपूड घालून बंद करून जोरात हलवले की एक पांढुरके इमल्शन बनते .हे कोबीवर ओतायचे .गोडीसाठी साखर अथवा मध वापरायचा .
सैलडच्या पाककृती डाइअट वर असण्याची खूण आहे .
21 Apr 2014 - 10:59 pm | अत्रुप्त आत्मा
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआ

हेच्या संगाट डाळिंबाचे दाणे टाकलेला कानडी श्टाइइलचा दहिभात...आणि नंतर १ निवां........त दुपार!!!
21 Apr 2014 - 11:39 pm | सुहास झेले
मस्त... उपयुक्त अशी पाककृती :)
22 Apr 2014 - 12:02 am | रेवती
छान दिसतय सॅलड!
22 Apr 2014 - 8:57 am | दिपक.कुवेत
सॅलेड "मस्त" आहे. फोटो तर फारच टेम्प्टींग आलाय. नक्कि करुन बघणार. पण पनीर एवजी फेटा चीज (लो फॅट) घातलं तर अजुन छान लागेल असं वाटतय.
22 Apr 2014 - 9:04 am | आतिवास
सॅलॅड छान दिसतंय.
खायला कधी येऊ? ;-)
22 Apr 2014 - 12:04 pm | पिंगू
आता खायला येण्याचा मुहूर्त शोधावा लागेल..
22 Apr 2014 - 2:17 pm | सविता००१
छानच गं. मी कधी सॅलड मधे ब्रोकोली नाही खाल्ली. आता नक्की करेन
22 Apr 2014 - 4:16 pm | अनन्न्या
पण कोल्हापूरला मिळतो, कधी जाणे झालेच तर नक्की ट्राय करीन.
22 Apr 2014 - 6:10 pm | मस्त कलंदर
पिंगू, अतिवास कधीही या..
एक नवा उपक्रम चालू केला आहे, वन डीश मील म्हणून खाता यावं असं सॅलड बनवणं. कालच ब्लॉग चालू केला आहे म्हणजे सगळ्या पाकृ एकत्र राहतील आणि शोधायचीही कटकट वाचेल.
ब्लॉगची लिंक- http://udarbharan-nohe.blogspot.in/
22 Apr 2014 - 6:14 pm | मस्त कलंदर
@कंजूसकाका, तुम्ही सुचवलेलं सॅलड ट्राय करेन नक्की.
तुमची सही आवडली. :-)
22 Apr 2014 - 6:15 pm | प्रचेतस
हे सॅलड पण भन्नाट झालंय.
22 Apr 2014 - 10:16 pm | विजुभाऊ
झकास...मस्त दिसत्येय
28 Apr 2014 - 10:26 pm | अनन्या वर्तक
ब्रोकोली सॅलॅड हेल्दी पाककृती. खजूर किंवा द्राक्ष सॅलॅडची चव वाढवतात. फोटो सुद्धा छान आहेत.
29 Apr 2014 - 4:39 pm | नानबा
इकडे बर्याचदा फ्रेश फूड मार्केटात ब्रोकोली पाहिली. एकदा आणून चिनी लोक खातात तशी फक्त उकडून खाल्ली. कित्येक महिने हास्पिटलात असल्यासारखा चेहरा झाला खाऊन.
पुढल्या वेळेस करून बघण्यात येईल.. :)