काल फार दिवसांनी काही तरी झँटमॅटीक करायची हुक्की आली होती. म्हटलं आलीये लहर तर काही तरी करुच.
लेकीला चीज प्रकार फार आवडतो. पिझ्झा म्हणजे तिचा जीव का प्राण. मग त्याच्या जोडीने येणारे स्टफ्ड ब्रेड, गार्लीक ब्रेड हे प्रकारही. वार्षीक परीक्षा नुकत्याच आटोपल्याने आत्तापासुनच मे महिन्याच्या सुट्टीचे वेध लागलेत. तर ती येण्या पुर्वी एखादी रंगीत तालिम करावी म्हणुन हा प्रयत्न. (हो आयत्या वेळी लेकी समोर पोपट नको व्हायला.)
धो.सु. : हेल्थ काँशस मंडळींनी या ओळीच्या पुढे स्क्रोल करू नये. तरीही अट्टाहासाने खाली पाहिलंत किंवा वाचलच आणि जर तुमच्या तब्येतीला काही अपाय झाला तर त्या बद्दल अस्मादिक जबाबदार असणार नाही.
साहित्य :
ब्रेडसाठी
दोन वाट्या मैदा.
१ चमचा साखर.
१ ते १.५ मोठा चमचा यीस्ट.
२ चमचे तेल.
चवी नुसार मीठ.
गरजे नुसार कोमट पाणी. (अंदाजे पाऊण वाटी.)
बारीक रवा (ब्रेड लाटताना.)
स्टफिंगसाठी
मॉझ्झरेला / चेडर चीज
कांद्याची पातं बारीक चिरलेली.
१ चमचा लसुण पावडर
१ चमचा बटर
चिली फ्लेक्स
एका अंड्यातला पांढरा भाग.
habanero peppers. ही अती जहाल असते.
त्यामुळे तिचा तिखटपणा कमी करण्यासाठी थोडं व्हिनेगर.
मिरचीच्या चकत्या करुन त्या व्हिनेगरमध्ये मुरत ठेवाव्या.
कृती :
खोलगट भांड्यात मैदा घेऊन त्यात यीस्ट, साखर, मीठ, १ चमचा तेल घालून मिश्रण हातानं एकत्र करून घ्यावं.
नंतर त्यात गरजे नुसार थोडं थोडं कोमट पाणी घालत पीठ मळुन घ्यावं. थोडं सैलसरच ठेवावं.
पीठ किमान १० मिनीटं तरी तिंबून घ्यावं. वरुन तेलाचा हात लावून भांडं उबदार कोपर्यात किंवा (फक्त दिवा पेटतो त्या तापमानाला) ओव्हनमध्ये ३०-४० मिनीटं ठेवावं. तेवढ्या वेळात ते किमान दुप्पट फुलून येईल.
फुलून आलेलं पीठ हलक्या हाताने मळुन घ्यावं. फार जोर लावू नये.
थोडा रवा पसरवून त्यावर पीठाचा गोळा ठेऊन त्याची जरा जाडसर पोळी लाटुन घ्यावी. (अंदाजे ३/४ सेमी जाड.)
आंड्यातला पांढरा भाग आणि बटर एकत्र फेटुन घ्यावं. लाटलेल्या पोळीवर ते मिश्रण ब्रशने लावावं.
अर्ध्या भागात मॉझ्झरेला चीज पसरवावं. त्यावर मिरचीच्या फोडी रचाव्यात. कांद्याची पातं. तिखट आवडत असल्यास चिली फ्लेक्स टाकावे.
सामिष आवडणार्यांनी चिकनचे शिजवलेले तुकडे वा मी वापरलय तसं सॉसेजेसच्या चकत्या वापरायला हरकत नाही.
शाकाहारी मंडळींनी परतेलेले मश्रूम वापरले तरी चालेल.
वरुन परत चीज पसरवावं.
पोळीचा वरचा भाग दुमडून करंजी सारखा आकार द्यावा, आणि कडा हाताने दाबून सिलबंद करुन घ्याव्या.
पिझ्झा कटरने वा सुरीने उभे काप द्यावे. आणि वरुन परत अंड्+बटरच्या मिश्रणाचा ब्रश फिरवावा.
एकीकडे ही तयारी चालू असतानाच ओव्हन १८०°C वर १० मिनिटं प्रीहिट करुन घ्यावा.
वरून थोडी कांद्याची पातं, लसणाची पावडर भुरभुरावी. आणि मग ती संपुर्ण आरास बटर पेपरला किंचीत बटर लावून बेकिंग ट्रेवर ठेऊन, ट्रे ओव्हनमध्ये सारावा.
साधारण २० ते २५ मिनीटांनी ब्रेड तयार होईल. (मधे-मधे लक्ष ठेवावं.) वरुन थोडंस चीज भुरभुरावं आणि ओव्हन बंद करुन ब्रेड त्यात ५ मिनीटं ठेवावा.
हा पदार्थ थंड झाल्यावर तेवढी लज्जत रहात नाही. तेव्हा ओव्हन मधुन बाहेर आल्या आल्याच त्यावर तुटुन पडावं.
प्रतिक्रिया
25 Mar 2014 - 9:09 am | यशोधरा
किती तो उत्साह! :) एकदम भारी! लेकीला आवडलं की नाही?
25 Mar 2014 - 4:04 pm | अत्रुप्त आत्मा
25 Mar 2014 - 9:20 am | स्पंदना
मला पहिला द्यायचा होता ना प्रतिसाद!! :(
सुरेख हो गणपा भौ!! मिपावर स्वागत ;)
25 Mar 2014 - 9:29 am | इरसाल
एक ब्रश मला मिळेल काय ?
आम्ही पाकृबद्द्ल सध्या बोलत नसतो.....(उगाच लाळ गळुन पडते तोंडातुन)
25 Mar 2014 - 9:39 am | पियुशा
व्वाह क्या बात है , कसली भन्नाट चव असेल याची यम्म यम्म !
25 Mar 2014 - 9:52 am | अजया
अहाहा! शेवटचा फोटो कातिल आहे!!
25 Mar 2014 - 10:16 am | समिर१२३
गनअपा यआ रेसिपे बद्दल अभिनन्दन !!!
फक्त एक "त्याकझोनोमिकल" / नोमेनक्लएचरल दुरुस्ति-
याच सारख्य्या पदार्थआला इतालियन कुसिन मधे "कलझोन" म्हनतात.
http://en.wikipedia.org/wiki/Calzone
शाकाहरि लोकआनि सौसेज ऐवजि मश्र्रोम आवदत नसल्यास वानग/ बताता/ + जुलिअन कत कोबि/ चिरलेलि मेथि वापरलए तरि चालेल.
समिर१२३
ताकः इथे मराथि ताइप करने म्हनजे फोर्क न नाइफ ने पिझ्झा खान्या सारखे आहे (नवशिक्यास). चूभूद्याविघ्यावि.
6 Apr 2014 - 8:46 pm | जातवेद
पण वाचताना आमच्या जिभेची रेशेपी तयार झाली :)
25 Mar 2014 - 10:18 am | प्रचेतस
अरे काय अत्याचार करतोस रे सकाळी सकाळी.
25 Mar 2014 - 3:40 pm | स्वप्नांची राणी
ही प्रतिक्रिया समीर१२३ आणि गणपा दोघांसाठी पण आहे का..?
27 Mar 2014 - 11:14 am | पैसा
=))
25 Mar 2014 - 10:20 am | वेल्लाभट
काहीच्या काही आवडलं... रेसिपी सुद्धा आणि फोटो तर..... अशक्य!
जबर्दस्त
25 Mar 2014 - 10:45 am | सुहास झेले
फोटो बघून शब्द हरवलेत... मिळाले की प्रतिसाद लिहू ;-)
25 Mar 2014 - 11:31 am | तुमचा अभिषेक
शेवटच्या फोटोवर फोटोशॉप वगैरे प्रकार केलाय अशी दाट शंका... एवढे कातिल कसे दिसू शकते यार.. खूप आवडीचा प्रकार हा, अधूनमधून खाणेही होते.. पण हे काहीतरीच भन्नाट दिसतेय यार.. याला मार्केटमध्ये आणलात तर इतर ब्रांडेड पिझावाल्यांची दुकाने बंद कराल. आणि हे कराच, जाम लुटतात ते लोकं
25 Mar 2014 - 11:36 am | बाळ सप्रे
ब्रेड करायचे काही प्रयत्न फसलेयत आमचे आत्तापर्यंत.. यीस्ट घालून भिजवलेलं पीठ फुगुन येतचं नै :-(
पण हे फोटो बघून परत एकदा प्रयत्न करावासा वाटतोय :-) .. ड्राय यीस्ट्च वापरलयत ना??
27 Mar 2014 - 10:53 am | प्रभाकर पेठकर
यीस्ट जुनं झालं असेल तर अशी समस्या येऊ शकते. यीस्ट ताजे असावे. शिवाय, यीस्ट, मैदा,पाणी, तेल अगैरे सर्व सामान्य तापमानास (रूम टेम्परेचर) असावे. सर्व मिश्रण उबदार जागी ठेवावे.
27 Mar 2014 - 12:44 pm | बाळ सप्रे
mfg date सहा महिन्यांपूर्वीची आणि exp date सहा महिन्यांनंतरची आहे.. बघु काय होतय यावेळी :-)
3 Apr 2014 - 2:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
यीस्टबद्दल भीती वाटत असेल आणि त्यामुळे बाकी सामान वाया जाऊ नये अशी काळजी वाटत असेल तर -
एका कपात थोडं कोमट पाणी घ्या. त्यात किंचित, चिमूट-दोन-चिमूट साखर आणि यीस्ट घालून ते मिश्रण साखर विरघळेपर्यंत ढवळा. बाकीचं सामान मोजेपर्यंत, पुढच्या पाचेक मिनीटांत, कपात वरच्या बाजूला फेस दिसायला लागला असेल तर यीस्ट निश्चित फुलणार. पावाची कणीक भिजवताना हे यीस्ट आणि बाकीचं पाणी वापरा.
पाणी खूप गरम असेल तर यीस्ट मरतं. कोमट म्हणजे कोमट पाणीच वापरा. उघडलेला यीस्टचा डबा साठवताना फ्रीजमधे ठेवला तर आर्द्रता आणि उष्णतेपासून त्याचं संरक्षण होईल.
25 Mar 2014 - 12:59 pm | प्यारे१
गणपा द शेफ,
बॅक विथ बँग का काय ते!
25 Mar 2014 - 1:09 pm | गणपा
@ यशो, सध्या लेकीनेही फक्त फोटोच पाहिलाय. बाबा एकटा एकटाच काय करुन खातोस असा दम ही मिळाला.
@ अपर्णाताय, स्वागता बद्दल मंडळ आभारी आहे. पुसपगुच्च काही मिळाला नाही. ;)
@ बा ईरसाला तुझ्यासाठी आठवणीने येताता घेऊन येईन हो असलाच ब्रश. :)
@ अभिषेक फोटोवर कॉर्प करण्यापलीकडे ( आणि वॉटरमार टाकण्या पलीकडे) कसलाही संस्कार केला नाहीये.
(बाकी फोटोशॉप संस्कार केल्यासारखी शंका येणं ही पाकृच्या यशाची पावती समजतो. ;) )
@ पिवशा, अजया, वेल्ला भट, वल्ली, सुझे, प्रशांत धन्यवाद.
@ समिर, तुमचा प्रतिसाद फार जड गेला राव वाचताना. इथे टंकन फार सोप्प आहे. हा मदतीचा धागा अवश्य वाचा.
तुम्ही सांगितलेल्या पर्यायामध्ये वांग्याचा पर्याय आवडला. पण वांग न आवडणारे ही बरेच आहेत. तस्मात ज्याने त्याने त्याच्या आवडीचं स्टफिंग करावं.
बाकी बटाट्याचा पर्यात तितकासा रुचला नाही (जरी बटाटा आवडीचा असला तर) व्हेज पर्याय म्हटला की बिचार्याला नेहमी वेठीस धरलं जातं. :P
@ बाळ सप्रे, होय ड्राय यीस्ट वापरलं आहे.
25 Mar 2014 - 6:03 pm | तुमचा अभिषेक
ती शंका पावती म्हणूनच होती, समजायचे काय त्यात :)
25 Mar 2014 - 1:22 pm | पिलीयन रायडर
कित्ती गोड बाबा आहत हो तुम्ही!!!! क्लासिक रेसेपी...!!!
25 Mar 2014 - 2:02 pm | अस्मी
व्वाह...अप्रतिम, निव्वळ अप्रतिम!!
कातील पाकृ, कातील फोटो!!! _/\_
25 Mar 2014 - 2:36 pm | मधुरा देशपांडे
भारी पाकृ आणि फोटो. नक्की करून बघणार.
25 Mar 2014 - 3:24 pm | दिव्यश्री
तुम्ही प्रत्यक्ष भेटल्यावर साष्टांग नमस्कार करणार आहे मी तुम्हाला . अहो किती गुण ,कला ई. आहेत तुमच्याकडे . शब्द साखरेत घोळून , गुळाच्या पाकात भिजवून मधाने त्या शब्दाला सजवून बोलता , मिपावर फोटो टाकण्यासाठी अतिशय सुंदर मार्गदर्शन करता इतक कि माझ्या सारखी ढ गोळा विद्यार्थिनी एका फटक्यात हे साध्य करू शकली , तुम्ही चांगले वडील आहात , उत्तम शेफ आहात आणि अजून बरंच काही ....
मला वाटल होत कि वेज पाकृ. आहे . ही पण णोणवेजच निघाली . तरी आमच्या प्यांटवाल्यांसाठी करून बघावी अशी इच्छा आहे . आशीर्वाद असू द्या गुरु . :)
25 Mar 2014 - 3:42 pm | सानिकास्वप्निल
खतरा पाकृ आणी जबरद्स्त फोटो :)
परफेक्शन म्हणतात ते ह्यालाच ...हॅट्स ऑफ!
25 Mar 2014 - 3:47 pm | परिजात
खुप भरि आहे.... १ नो.
25 Mar 2014 - 4:08 pm | प्रभो
बॉर्र्र्र्र!!
25 Mar 2014 - 4:09 pm | प्रभो
खायला मिळेल तेंव्हा सांगू. ;)
25 Mar 2014 - 4:09 pm | इशा१२३
फोटो ,पाकॄ,सजावट अवर्णनीय सुंदर.....
25 Mar 2014 - 5:16 pm | रेवती
अर्रे, हा तर कालझोन! छान दिसतोय.
25 Mar 2014 - 5:25 pm | भाते
धो. सु. साठी.
धो. सु. वाचल्यावर मी पुढची पाकृ आणि अर्थातच फोटोसुध्दा पाहिले नाहित. त्यामुळे वेळ आणि त्रास दोन्ही वाचले. शिवाय जळजळ सुध्दा झाली नाही.
हि अशीच धो. सु. तुमच्या प्रत्येक पाकृच्या धाग्यावर टाकावी हि णम्र विनंती. :)
25 Mar 2014 - 5:40 pm | सखी
खूप दिवसांनी एकदम भारी पाकृ दिली आहे. शेवटच्या फोटुने खल्लास झालेय, आता ऑफिसमधे कोरडा टोस्ट शिवाय काही मिळणार नाही :(
25 Mar 2014 - 6:47 pm | जेपी
छान पाकक्रुती . गणपा भौ अशे पदार्थ ओव्हन न वापरता कश्या कराव्या याबद्दल ही सांगावे ही विंनती .
25 Mar 2014 - 7:24 pm | बॅटमॅन
भावना चाळवणारे, भडकवणारे, इ.इ. फटू टाकल्याबद्दल गणपाशेठचा कचकून निषेध असो!!!!!!!!!!
25 Mar 2014 - 7:32 pm | पिंगू
इट इज ओन्ली झान्टॅमॅटिक..
25 Mar 2014 - 10:39 pm | अनुरोध
गव्हाच पीठ किंवा मल्टि ग्रेन ब्रेड असं काही हेल्दी व्हेरीअन्ट करता येइल का....????
25 Mar 2014 - 10:53 pm | कवितानागेश
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स :)
26 Mar 2014 - 1:48 am | मराठे
ठार मेलोय. वजन कंट्रोलवाल्यांनी मुद्दामहून फोटो बघावे म्हणजे जळजळ होऊन आणखी वजन कमी होईल :)
26 Mar 2014 - 4:24 pm | सूड
जळजळ होऊन एक किलो कमी झालं. ;)
26 Mar 2014 - 6:15 pm | झकासराव
अरे ह्या गणपाला ते ह्ये करुन ह्याच्यात घालुन ह्याच्यात बुडवा रे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
कहर!!!!!!!!!!!!!!
26 Mar 2014 - 6:35 pm | अनन्न्या
मस्त!!!!!!!!!!
27 Mar 2014 - 11:06 am | प्रभाकर पेठकर
चीझ, मैदा इ.इ. माझे फार फार जुने घनिष्ट मित्र माझा विश्वासघात करून सध्या शत्रूपक्षात आघाडीची फळी सांभाळत आहेत. माझ्या फळीसदृश देहाचा भरभक्कम ओंडका झाल्यापासून मी त्यांच्या वाट्याला जात नाही.
27 Mar 2014 - 11:18 am | पैसा
कस्लं भारी दिसतंय! सध्या माझ्या मुलांच्या नजरेला हा धागा पडणार नाही याची दक्षता घेईन.
27 Mar 2014 - 12:21 pm | ऋषिकेश
मी हे किंचित वेगळे करतो
आय मीन बेस लाटेपर्यंत तसंच
मग एक दुसरा बेस लाटतो नी त्याच्या चकत्या काढतो नी पहिल्या बेसवर चौकटी कडून टाकतो. - घरी बरीच लोकं असल्याने एका वेळी बराच मोठा ब्रेड होतो.
आणि एक राहिलं, आवडत असल्यास त्या जाळीतून सर्व करण्यापूर्वी थोडे मेल्टेड चीज सोडतो ;)
27 Mar 2014 - 12:53 pm | गणपा
@ जेपी, ओव्हन शिवाय बेकिंग कठीणच आहे राव. एकवेळ मायक्रोवेव्ह असता तरी चालेल. ओव्हनमध्ये सर्वांगाने पदार्थाला उष्णता मिळते ती शेगडीवर मिळणे कठीण.
@अनुरो
नक्कीच, अवश्य बदल करुन पहा आणि आम्हालाही कळवा. :)
@बाळ सप्रे, आद्यबल्लवाचार्यांनी आपल्या शंकेचे समाधान केलं आहेच. :)
@पेठकर काका, मी ह्या मंडळींच्या बॅडबुकात शिरण्यापुर्वी लुत्फ उठववून घेतो. ;)
@ऋषिकेश, कल्पना आवडली.
सर्व वाचक प्रदिसादकांचे मनःपुर्वक धन्यवाद. :)
27 Mar 2014 - 1:44 pm | ऋषिकेश
+१
@जेपी, मायक्रोवेव्ह सुद्धा कन्व्हेक्शन मोड असणारा हवा. नुसत्या "मायक्रोवेव्ह" मोड मध्ये बेकिंग होत नाही हे एक.
दुसरे मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये कन्व्हेक्शनवर बेकिंग करताना (मी असेच करतो) जरा अनुभव वाढवणे गरजेचे आहे. अश्या पाककृतींमध्ये दिलेले तापमान आणि वेळ या दोन्हीमध्ये फरक होतो, तो नेमका किती हे अनुभवाने समजेल. तुमच्या शेगडीचा आकार (आतली मोकळी जागा) लहान असेल तर दिलेल्या तापमानापेक्षा १०-१५डिगरी तरी नक्की कमी ठेवा - नाहितर आतमधून पूर्ण बेक होण्याआधीच वरील आवरण जळु लागेल.
वेळेचे गणित तर अगदीच अनुभवजन्य आहे. मी सहसा दिलेली वेळ -(वजा) २०% वेळ झाली की सतत चेक करत रहातो. प्रत्येक पदार्थाच्या पहिल्या प्रयोगाला एकदा का तपमान/वेळ नक्की समजली की नोंद करून ठेवा.
पाश्चात्य पद्धतीचे पदार्थ हे अतिशय "प्रमाण बेस्ड" असतात, आपल्या रोजच्या जेवणातील पदार्थांच्या विपरीत अंदाजाने थोडे-इथे तिथे झाले तर बर्याचदा मोठा बिघाड होतो.
27 Mar 2014 - 1:45 pm | ऋषिकेश
"जेपी मायक्रोवेव्हसुद्धा..." हे
@जेपी, मायक्रोवेव्हसुद्धा... असे वाचावे
27 Mar 2014 - 2:02 pm | गणपा
किंचीत सुधारणा.
नुसत्या मायक्रोव्हेमध्येही ब्रेड करता येतो ऋ.
अर्थात इलेक्ट्रीक ओव्हनमध्ये शिजवलेला पदार्थ आणि मायक्रोव्हेवमध्ये यांची तुलना करु नये.
खालील चित्रफितीत मायक्रोव्हेव मध्ये ब्रेड बनवण्याची कृती दिली आहे. (चित्रफिती जालावरुन साभार.)
बाकी वेळेच्या गणिता बद्दल एकदम सहमत.
तसच अंड्याला पर्याय म्हणुन कॉर्नसटार्च पाण्यात मिसळुन वापरता येईल, किंव मेपल सिरप मिळाल्यास ते.
तेही नसेल तर मध पाण्यात मिसळुन किंवा साधं दुध ही वापरता येईल.
27 Mar 2014 - 3:57 pm | ऋषिकेश
विडीयो हाफिसातून दिसत नाहिये, घरी जाऊन नक्की बघतो. आभार.
मला ब्रेड घरी बनवायचा चस्का लागायचे क्रेडित जाते रुचीतै ला. इथे ऐसीवरचे तिचे 'ब्रेड अँड बटर' सिरीज मधील सर्वच धागे नवीन उत्सुकांना मार्गदर्शक ठरावेत, त्यातही हा धागा (किंबहुना त्यावरील चर्चा) बरेच प्रश्न - भारतात मिळणार्या यीस्ट वगैरेच्या दृष्टीने - उपयुक्त आहे.
27 Mar 2014 - 3:57 pm | ऋषिकेश
सॉरी दुवा विसरलो: http://www.aisiakshare.com/node/1473
27 Mar 2014 - 4:15 pm | गणपा
दुव्याबद्दल धन्यवाद ऋ.
27 Mar 2014 - 2:46 pm | मृत्युन्जय
खपल्या गेलो आहे
27 Mar 2014 - 3:48 pm | त्रिवेणी
खतरी पाक्रु.
मी एकदा ब्रेड बनवायचा प्रयत्न केला होता पण दगडापेक्शाही कड्क झाला होता, ड्राय यीस्ट वापरले होते, यीस्टची एक्सपायरी झाली नव्ह्ती. तर कोणत्या कंपनीचे यीस्ट वापरावे. आणि माझ्याकडे एलजीचा कनव्हेक्शन आहे, तर त्याच्यात किती वेळ लागेल ते सांगा ना.
27 Mar 2014 - 3:56 pm | प्रभाकर पेठकर
मैद्याचं वजन आणि यीस्टचं प्रमाण तसेच पाण्याचे प्रमाण (तयार गोळ्याचा मऊपणा), उबदार जागी किती वेळ ठेवलं ह्यावर पीठ फुलून येण्याचं यश अवलंबून असतं.
27 Mar 2014 - 4:03 pm | त्रिवेणी
धन्यवाद काका.
ऋशिकेश आता दुवा वाचुन बघते.
27 Mar 2014 - 4:48 pm | llपुण्याचे पेशवेll
करून खाऊन बघेन आणि मगच वाहवा म्हणेन. हा गणपा नुसत्या पाकृ आणि फोटो टाकून जळवतो. असो.
गणपा,
व्हेज बिर्याणि पाकृप्रमाणे करून पाहीली छान झाली. अर्थात पहिल्या अनुभवामुळे थोडा गोळा झाला पण चव भारी होती. मला थोडी मसालेदार अजून चालली असती. पण अजून पदार्थांचा अंदाज नाही येत नक्की.
27 Mar 2014 - 5:39 pm | शिद
एक्दम सॉल्लीड प्रकार आहे हा... स्स्स्स्स्स.....!!!!
भुक चाळवल्या गेली आहे.
30 Mar 2014 - 11:53 am | मदनबाण
वाह... :)
{गार्लिक ब्रेड प्रेमी} :)
30 Mar 2014 - 12:03 pm | सस्नेह
आणि शेवटचा तर भारीच !
आजवर बेकरीत पाहिला होता असा ब्रेड ! लैच खटपट आहे बॉ !
2 Apr 2014 - 9:43 pm | आरोही
उगाच गणपा भाऊ न मिपाशेफ नाही म्हणत ...खरेच अप्रतिम आहे ...लगेच उचलून खावासा वाटतोय +)
3 Apr 2014 - 9:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देवा गणपाला क्षमा कर इतकेच म्हणतो._/|_ :)
-दिलीप बिरुटे
6 Apr 2014 - 7:23 pm | दिपक.कुवेत
बघुनच जीव कासावीस झालाय. अतीशय खत्रा....
6 Apr 2014 - 9:03 pm | जातवेद
गुडलकला जाउन मसका-पाव खाणार्यांनो, जळा आता :)
11 Apr 2014 - 11:37 pm | अनन्या वर्तक
गणपा खूप दिवसांनी मिसळपाव वर येण्यासाठी वेळ मिळाल. आल्याबरोबर प्रथम नेहमीच्या नावांच्या पाककृती शोधत होते, तुमचे नाव अर्थात त्यात होतेच. मस्त वाटले तुमची स्टफ्ड चीज ब्रेड पाककृती पाहून. नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर सादरीकरण जे मला नेहमीच भावते.
25 Apr 2014 - 12:47 pm | परिजात
आग आय आय आय..... भारीच..... तोंडाला पाणी सुटुन बादली भरली............
17 Jun 2015 - 6:41 pm | सप्तरंगी
सहि.…हा काल्झोने चा भाऊ किंवा बहिण दिसतेय