‘आत्मूबाबा स्माईलीवाले’ या नावाच्या पाटीची तीनदा खात्री करुन आम्ही त्या आश्रमात शिरलो. आतील वातावरण टिपीकल म्हणजे सर्वच आश्रमात असते तसे आध्यात्मिक, सुवासिक वासाने भारावलेले आणि प्रसन्न होते. समोरच बाबा प्रशस्त अशा लाकडी व्यासपीठावर मांडी घालून बसलेले होते. गौरवर्ण, फिकट भगव्या रंगाची सॅटीनची कफनी, खाली त्याच रंगाची लुंगी, हातात गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, भाळी चंदनाचा लेप, त्यावर मध्यभागी केशरी टिळा असे दृष्ट लागण्यासारखे तेजस्वी रुप. त्यांच्या पुढ्यात लॅपटॉप होता, आणि त्यावर ते काहीतरी टंकण्यात मग्न होते. आम्ही त्यांच्या शेजारी एका बाजूला जाऊन उभे राहिलो. आणि आमच्या शेजारीच उभ्या असलेल्या त्यांच्या शिष्याला हळूच विचारल्यावर समजले की, बाबा सध्या ‘प्रतिसाद सुगंध’ नामक ग्रंथनिर्मितीत व्यस्त आहेत.
भाविक भक्त त्यांच्या दर्शनाला येत होते. त्यांच्यापुढे प्रत्येकजण एक वेगवेगळ्या रंगाचा धागा ठेवून त्यांना नमस्कार करत होते. धागा ठेवून बाबांच्या समोर कमरेतून वाकून नमस्कार करुन उभे राहिल्यावर प्रत्येक भक्त उजवा तळहात खोलगट करुन त्याच्याखाली डावा हात सपोर्टला धरुन बाबांच्या पुढे करत होता. आणि टंकण्यात मग्न असलेले बाबा त्यांच्याकडे ढुंकुनही न पहाता त्यांच्या शेजारी ठेवलेल्या कमंडलूमधून स्माईली काढून प्रत्येकाच्या हातावर देत होते. पण एखादा हात स्त्री भक्ताचा आहे असे लक्षात आले तर, स्माईली देताना वर पहात त्यांच्याकडे पाहून ‘स्माईल’ ही करत होते. आणि सर्व भक्त तो बाबांनी दिलेला प्रसाद मोठ्या भक्तिभावाने कपाळाला लावून तसेच मिटलेल्या दोन्ही डोळ्यांना एकदा उजवीकडील आणि एकदा डावीकडील डोळ्याला लावून आश्रमाबाहेर पडत होते.
हा सर्व शिस्तबध्द कार्यक्रम पहात आम्ही आपले त्यांच्या एका बाजूला थांबलो होतो. भक्तांच्या रीघ कमी होऊन क्षणभर थांबलेली दिसताच मोका साधून आम्ही झटकन पुढे झालो. आणि वाकून बाबांच्या गौरवर्णीय चरणकमलावर लोळण घेत ते पकडण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर ”काका मला वाचवा”च्या धर्तीवर “बाबा मजवर कृपा करा”चा धावा केला. या सर्व अनपेक्षित प्रकाराने बाबा एकदम गडबडले, आणि माझ्यावर ओरडले,
‘दूर हो, दूर हो चांडाळा’ असे ओरडत, कासव जसे आपले अंग आकसून घेते, तसे आपले चरणकमल लुंगीच्या आत आकसून घेत ते आमच्यावर कडाडले. तसे आम्ही झटकन त्यांच्यापासून दूर झालो.
थोडेस सावरल्यावर ते म्हणाले, ‘बोल वत्सा येथे का आलास तू?’
‘बाबा, आम्हालाही प्रसाद म्हणून स्माईली द्या’ आम्ही हात पुढे करुन म्हणालो.
‘तू माझ्यापुढे धागा ठेवलास?’
‘नाही’
‘मग तुला स्माईली कशा देणार?’
‘धागा न ठेवता मजवर कृपा करा बाबा, आम्हाला तुमचा अनुग्रह द्या.’
‘मूर्ख मनुष्या, आम्ही कुणालाही अनुग्रह देत नसतो. आमचा अनुग्रह म्हणजे काय केंद्र सरकारच्या अन्नसुरक्षेचे कुणालाही मिळणारे धान्य वाटले की काय तुला?’ आमच्याकडे तुच्छतेने कटाक्ष टाकून बाबा बोलले, ‘ आणि तरीही तुला आमचा अनुग्रह पाहिजेच असल्यास आधी आमच्या काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील तुला.’ आम्ही त्यावर होकारार्थी मान हलविली, आणि म्हणालो
‘अवश्य विचारा महाराज’
‘तू रहायला मुंबईत आहेस काय?’
‘नाही’
‘मग ठाण्यास आहे का?’
‘नाही’
‘गेला बाजार पुण्यात तरी रहातोस काय?’
‘नाही’
‘क्षूद्र माणसा, मग तू रहातोस तरी कुठे?’ या तीन ठिकाणाव्यतिरिक्त रहाण्यास योग्य असे ठिकाण कोणते असा प्रश्न बहुदा बाबांना पडला असावा.
‘बाबा आम्ही सोलापूर जिल्ह्यातील एका ग्रामीण भागात रहातो.’
आम्ही ग्रामीण भागांत रहातो म्हणल्यावर, बाबांचा आमच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन आणखीनच बदलून गेला. ते म्हणाले, ‘अरेरे पातकी माणसा, सोलापूर जिल्ह्यात रहातोस म्हणजे तू काय स्वतःला नागराज मंजुळे समजतोस काय?’
आम्ही बाळबोधपणे म्हणालो, ‘बाबा हा नागराज मंजुळे कोण?’
‘दृष्ट, दुर्जन पापी माणसा, म्हणजे तू चित्रपटही पहात नाहीस की काय?’
आम्ही म्हणालो, ‘बाबा आम्ही यापूर्वी एकदा शोले पाहिल्याचे आम्हाला स्पष्टपणे आठवते आहे. त्यातील काही डायलॉग आपणांला म्हणून दाखवू का?’
‘मूर्खा ते जाऊ दे, तुला कट्टा म्हणजे काय ते माहित आहे का?’
‘बाबा गावठी पिस्तुलाला कट्टा म्हणतात असे आमचे ज्ञान आहे.’
त्यावर संतप्त होऊन बाबा बोलले, ‘अतिमूर्ख आमच्या कट्ट्याकडे असल्या अपराधी नजरेने पहातोस, थांब आता तुझ्याकडे पहावेच लागेल.’
‘काय झाले बाबा?’ आमचा बाळबोध प्रश्र्न.
‘मूर्खा, कट्टा म्हणजे आमच्या शहरी ‘लँग्वेज’मध्ये एकत्र भेटण्याची, मौजमजा करण्याची जागा. संकल्पना म्हण हवं तर. आणि तू ग्रामीण भागातला खेडवळ प्राणी, आमच्या कट्ट्याला गावठी पिस्तुल म्हणतोस?’
‘पण बाबा तुमचा तो कट्टा म्हणजे ते मीन खाण्याची आय मीन मत्स्य खाण्याची आय मीन मासे खाण्याची पार्टीच ना? पण आम्ही पडलो शुध्द शाकाहारी’ आम्ही आमचे ज्ञान बाबांसमोर पाजळण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
बस्स झाले, कीटका बस्स! आता एक शब्दही पुढे बोलू नकोस. बाबा क्रुध्द होऊन बोलले.
तरीही भानावर येत पुढे थोडीशी समंजस भूमिका घेत ते बोलते झाले,
‘असो वत्सा, आता मला तू असे सांग की, तुला साहित्यातले काही कळते का? आय मीन तुला काही साहित्यिकांची नांवे ठाऊक आहेत का? मीन्स अमेरिकन, फ्रेंच, रशियन साहित्यिकांपैकी एखादे नांव तरी तुला माहित आहे का?’
‘बाबा चिनी साहित्यिक चालेल का?’ हे आमचे वाक्य उच्चारुन पूर्ण व्हायच्या आतच बाबा संतापले
‘अरे खेडवळ मूर्ख माणसां, आपल्याकडे चिनी माल खपत नाही हे तुला कधी समजणार?’
‘पण बाबा मला, आपल्या भारतीयच काय पण महाराष्ट्रीयन साहित्यीकांची नांवे सुध्दा माहित नाहित.’ आम्ही अपराधीपणे कबुली दिली
‘बरं ते जाऊ दे, तुला कविता माहिती आहे का?’
‘बाबा एबीपी माझा चॅनेलवर कविता राणे नांव आम्ही रोजच ऐकतो.’
‘फालतूपणा बंद कर, मी कवितेविषयी विचारतोय, शाळेत शिकला होतास ना?’
‘होय बाबा, शाळेनंतर कवितेपासून फारकत घेतलीय ती आजपर्यंत कायम आहे बघा!’
‘म्हणजे साहित्याची माहिती नाही, कवितेपासून फारकत! बरं आता आम्हाला कळू दे की, लघुकथा, कथा, कादंबरी, आत्मचरित्र याबद्दल तुला काय माहिती आहे?’
‘आम्हाला आत्मचरित्र लिहायला अजून वेळ आहे महाराज.’
‘म्हणजे कथा, काव्य, विनोद याबद्दल सगळाच आनंद आहे म्हणायचे!’
‘तसा आमच्या आवडीचा विषय विनोदच आहे बाबा, हे मात्र तुम्ही बरोबर ओळखले. आम्ही ईटीव्हीवरची ‘सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस’ सहसा चुकवत नाही.’
‘फालतू कॉमेडी करु नकोस हं, नाहीतर शिष्यांना सांगून पोकळ बांबूंचे लगवायला लावीन.’
‘बरं आम्हाला सांग तुझे वाचन काय?’
‘महाराज आम्ही दररोजचे वर्तमानपत्र सोडून इतर काहीच वाचत नाही.’
‘तुझ्या घरात किती पुस्तके आहेत?’
‘शालेय जीवन संपल्याबरोबर पुस्तकांपासून फारकत घेतलीय ती आजतागायत कायम आहे.’
‘तुला काही जड वाचायला जमते का?’ अतिशय संयम ठेवत बाबांनी प्रश्न केला.
‘बाबाजी, जड वाचायचे आहे म्हणल्यावर आम्हाला आधीच झोप यायला लागते, वाचणे तर लांबच राहिले. त्यासाठी आम्ही सकाळमधल्या ‘ढिंगटांग’सारखे काहीतरी हलके फुलके वाचतो, आणि जेवणातही पचायला ‘हलके’ असे एकदोन ‘फुलके’च खातो.’
आता मात्र आतापर्यंत बाबांनी मोठ्या मुश्किलीने राखून ठेवलेला त्यांचा संयम सुटला, ते जोरात ओरडले
‘खामोश! असल्या पांचट कोट्या आम्हाला ऐकवायला तू इथे आलास काय? तुला साहित्य, कला, संगीत, नाटक, अभिनय, गायन यातले काहीएक येत नाही, त्याबद्दल काहीच माहिती नाही, तरीही तुला आमचा अनुग्रह मिळावा असा तुझा हट्ट आहे.’
‘अज्ञ बालका, आमच्या ‘प्रतिसाद सुगंध’ ग्रंथनिर्मीतीत अडथळा आणल्याचा परिणाम तुला आता भोगावाच लागेल आम्ही तुला शाप देतो की, ‘तू ब्लॉगर अथवा वर्डप्रेसवर एखादा ब्लॉग टाकून ग्राहकांची आयमीन वाचकांची वाट पहात बसशील!’
ही शापवाणी ऐकताच आमची पाचांवर धारण बसली. गयावया करीत आम्ही म्हणालो, बाबा एवढा कठोर शाप देऊ नका, मज पामरांवर एवढे कोपीत होऊ नका. तुम्ही दिलेला शाप मागे घ्या आम्ही तुमच्या पाया पडतो.
आमच्याकडे तुच्छपणे कटाक्ष टाकत बाबा म्हणाले, ‘हे मूढमती बालका, बाय डिफॉल्ट, एकदा उच्चारलेली शापवाणी मागे घेता येत नाही. त्यामुळे आता तुला या शापाची फळे भोगावीच लागतील.’
‘बाबाजी आम्हाला क्षमा करा! गयावया करत आम्ही म्हणालो. तुम्ही शाप मागे घेईपर्यंत आम्ही तुमचे चरण सोडणार नाही. पण पुरातन कालापासून शापाला उःशाप नावाचे ‘ऑप्शन’ वापरले जाते याची कल्पना आहे आम्हाला.’
आमचे एवढे उच्चारण पूर्ण होत नाही तोच बाबाजींना पुढचा धोका ध्यानी आला असावा. एकदा धरलेले पाय हा काही सोडणार नाही हे ओळखून लुंगीतून किंचीत बाहेर दिसणारे त्यांचे चरणकमल त्यांनी घाईघाईने आत ओढून घेतले आणि ते म्हणाले,
‘ठीक आहे बालका, आम्ही तुला उःशाप देतो की, मागेपुढे आमचे तुझ्याविषयी मत परिवर्तन झाल्यास, किंवा आमचे न झाल्यास, आमच्याऐवजी दुसरा कोणी आमच्यासारख्याच एखाद्या ‘पॉवरफुल्ल’ बाबाची तुझ्यावर मागेपुढे केव्हातरी कृपा होईल आणि तेव्हाच तुझा उध्दार होईल. तुझी मनोकामना पूर्ण होऊन, तुझे डोळे कायमचे मिटल्यावर तुला मोक्षप्राप्ती होईल. तथास्तु!’
हा उःशाप ऐकल्यावर आम्ही सद्गदीत होऊन डोळे मिटून घेतले. आमच्या नयनातून अश्रूंच्या धारा वाहतील असे आम्हाला वाटले होते, परंतु तसे काही घडले नाही. आणि सद्गदीत झाल्यामुळे आतूनही गदगद होईल असा अंदाज होता तोही साफ चुकला. पण अंदाज चुकूनही आमचा देह मात्र गदगद हलत असल्याची जाणीव झाल्यामुळे आम्ही आमचे डोळे उघडले आणि पहातो तो काय? बाबाजींच्या दोन शिष्यांनी आमच्या दोन्ही दंडाला धरुन आम्हाला आश्रमाच्या बाहेर आणून सोडले होते.
आता आमचा उध्दार करणाऱ्या दुसऱ्या कोणत्या ‘पॉवरफुल्ल’ बाबाला कुठे गाठावे? याचे चिंतन करीत आम्ही जड पावलाने पुढील वाटचाल सुरु केली.
* * *
प्रतिक्रिया
17 Feb 2014 - 8:38 am | प्रमोद देर्देकर
खीSSक *lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :lol:
एवढी कांडी टाकुन आग लावली आता तो आत्मु बाबा सोडणार हाय व्हंय.
पळा आता.
17 Feb 2014 - 9:49 am | मुक्त विहारि
एक साधा आणि सरळ उपाय.....
तुमच्या गावांत पण भरवा एखादा कट्टा...
आता तुम्ही सोलापूर जिल्ह्यातच राहता म्हणजे काहीच त्रास होणार नाही.
सिद्धेश्र्वर एक्सप्रेस झिंदाबाद.
17 Feb 2014 - 10:25 am | योगी९००
‘अज्ञ बालका, आमच्या ‘प्रतिसाद सुगंध’ ग्रंथनिर्मीतीत अडथळा आणल्याचा परिणाम तुला आता भोगावाच लागेल आम्ही तुला शाप देतो की, ‘तू ब्लॉगर अथवा वर्डप्रेसवर एखादा ब्लॉग टाकून ग्राहकांची आयमीन वाचकांची वाट पहात बसशील!’
शाप लागलेला दिसतोय...इतकी वाचने झाली तरी माझा धरुन तिसराच प्रतिसाद...
बाकी लेख आवडला...
17 Feb 2014 - 10:32 am | यशोधरा
बाबांचे लक्ष गेले की नाही अजून? :D
17 Feb 2014 - 10:33 am | विटेकर
तुम्हारा थोडासा चुक्याच !
एखादे मस्त पैकी १२०/३०० पान बाबांना खिलवले असते तर आजन्म कृपा झाली असती .. स्मायल्यांचा पाऊस पडला असता...
17 Feb 2014 - 12:29 pm | अत्रुप्त आत्मा
धागाकर्त्यानी आमच्या केवळ अंतर जाळीय....आपलं ते हे... अंतर-जालीय माहितीच्या आधारावर लेखन केलं आहे. एव्हढं विटेकर काकांच्या प्रतिसादातून प्रतीत होते आहे. :D
18 Feb 2014 - 11:56 am | ऋषिकेश
हे पान क्र १२०
आहे पण हे ३०० तर अस्तित्त्वातच ठेवलेले नाहिये.
बाबांची कृपा होऊ नये म्हणून हे पान उडवले असेल काय?
17 Feb 2014 - 10:42 am | सुहास झेले
हा हा हा =))
हे तर भारीच :)
आता बुवांच्या स्मायल्या अस्त्रांना सामोरे जाण्यास तयार रहा ;-)
17 Feb 2014 - 10:47 am | आनन्दिता
गुर्जींच्या प्रतिसाद अस्त्राच्या प्रतिक्षेत..
17 Feb 2014 - 12:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
17 Feb 2014 - 12:19 pm | अत्रुप्त आत्मा
दखल "घेतली" आहे. (पण अजून पूजे'त नेमकं काय म्हटलय? हे पाहिलेलं नाही ;) )
अत्ता एका सत्संगात आहे... दुपारी आल्यावर इथेही एक सत् संग घडणार हे निश्चित! :p =))
17 Feb 2014 - 12:40 pm | दिपक.कुवेत
मजा आली वाचुन.
‘दूर हो, दूर हो चांडाळा’ असे ओरडत, कासव जसे आपले अंग आकसून घेते, तसे आपले चरणकमल लुंगीच्या आत आकसून घेत ते आमच्यावर कडाडले." - हे वाचुन तर गडाबडा लोळतोय.
17 Feb 2014 - 4:14 pm | शिद
+१०००... असेच म्हणतो.
बाकी लेख एकदम खुशखुशीत.
6 Apr 2014 - 3:49 pm | जातवेद
+२ अगदी असेच
17 Feb 2014 - 1:36 pm | पाषाणभेद
बाजार उठवलाय सारा.
आत्मूबाबा की जय.
17 Feb 2014 - 5:26 pm | सूड
>>दृष्ट, दुर्जन पापी माणसा
स्मायलीवाले बाबा असं म्हणाले? म्हंजे नक्कीच तुमचा समज चुकलेला आहे. स्मायलीवाले बाबा फक्त 'दु दु पा माणसा' असं म्हणतात.
17 Feb 2014 - 9:34 pm | अत्रुप्त आत्मा
अत्ता धागा नीट वाचाला. पण आमचे फक्त नाम आणि सही..सही सही वापरलेली आहे. आंम्ही मजकुरात कुठेही विशेषत्वानी आलेलो नाही. ;) तसे नाही म्हणताही,या वाक्यात- बाबा सध्या ‘प्रतिसाद सुगंध’ नामक ग्रंथनिर्मितीत व्यस्त आहेत. काही स्ट्राँग दोरे या धाग्यात असल्याचा अंदाज येतो आहे. पण एकूण रोख मजेशीर आहे. आणि लिहिलायही गमतीदार!
यामुळे आंम्ही देऊळ शिनूमातील..दत्त..दत्त..या गाण्याच्या तालात काहितरी लिहिण्यास उद्युक्त होणार हे मात्र नक्की! 
17 Feb 2014 - 10:04 pm | प्रचेतस
बरं पण तुम्ही ते स्वत:चेच डोके का बडवून घेत आहात ते सांगा ना आधी.
18 Feb 2014 - 6:00 pm | आनन्दिता
+१ हेच्च विचारतेय..
18 Feb 2014 - 10:39 am | आयुर्हित
अहो ती सॅटीनची कफनी कुठे मिळते ते सांगा बरं!
उत्तम लेख झालाय अगदी पचायला ‘हलके’ असे एकदोन ‘फुलके’च येवू द्या अजून.
18 Feb 2014 - 1:19 pm | चौकटराजा
बुवाचा आश्रम मोबाईल आहे. त्यात दिव्य संवादाचा ( दंग्यासह ) साक्षात्कार होतो. अट एकच येताना सी एन जी ने भरलेला फुगा घेऊन येणे. बाकी जास्त लिहित न्हाई !
बुवाच्या आश्रमातील एक साधक - चौ रा .
18 Feb 2014 - 1:24 pm | जोशी 'ले'
खुस-खुशीत लिहलय :-)
18 Feb 2014 - 2:10 pm | अभ्या..
अय्यायायाया. घोर आपराध मालक.
बाबांना पुण्याभाईर सगळेच ग्रामीण दिसते. तस्मात सोताच बाबा व्हा. वाटल्यास आमी तुमचे शिष्य होऊन फ्लेक्सात बसवू तुम्हाला. :)
18 Feb 2014 - 5:15 pm | निश
सू डोकू साहेब , लेख भारी झाला आहे. पण आमच्या गुरुजींची चेष्टा नव्हे मिश्कील थट्टा केल्याबद्दल तुम्हाला ह्या लेखाचा दुसरा भाग लिहीण्याची क्षिक्षा सुनवावी काय? असो पण लेख भारी मस्त झाला आहे.
6 Apr 2014 - 2:13 pm | चित्रगुप्त
एकदम झकास लेख.

आणि ही साटिणीची कफनी:
6 Apr 2014 - 2:32 pm | शशिकांत ओक
सदेह परदेशस्थ वासी कि काय?
6 Apr 2014 - 6:47 pm | विवेकपटाईत
झकास सुंदर