आयुकाचे श्री चैतन्य राजर्षी आणि श्री उमेश वाघेला यांच्यासोबत या शनिवारी गिरवली गावाजवळ असलेल्या आयुकाच्या वेधशाळेला भेट देण्याची संधी मिळाली.
आयुकाचा टेलीस्कोप बघणे हे या भेटीचे मुख्य आकर्षण होते.
रिफ्लेक्टींग प्रकारच्या या टेलीस्कोपच्या आरशाचा व्यास २ मीटर आहे. आरशाच्या व्यासाच्या आकारावरून, कावलूर टेलीस्कोप (२.६ मीटर) आणि लडाख मधील एका टेलीस्कोपनंतर याचा नंबर लागतो. भारतातील तीन नंबरचा टेलीस्कोप.
टेलीस्कोप टेक्नॉलॉजीज लिमीटेड (लिव्हरपूल, UK) या कंपनीने हा टेलीस्कोप तयार केला व २००६ मध्ये आयुकाला हस्तांतरीत केला. या टेलीस्कोपसाठी अंदाजे २५ कोटी रूपये खर्च आला.
गिरवली गावाजवळील डोंगर निवडण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुण्यापासून जवळ असल्याने सर्व प्रकारच्या दळणवळाच्या साधनांची सहज उपलब्धता. आयुका पुणे केंद्राच्या शास्त्रज्ञांना सोयीचे असणारे ठिकाण आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे समुद्रसपाटीपासून जसजसे उंचावर जावे तसे वातावरणातील अडथळे कमी होत जातात व ग्रह तार्यांची आणखी स्पष्ट प्रतिमा मिळते. ही वेधशाळा समुद्रसपाटीपासून १००० मीटर उंचावर आहे.
भीमाशंकरला निवांत भेट देवून सर्वजण दुपारी गिरवलीच्या डोंगरावर दाखल झालो.
टुमदार गिरवली गावापासून वेधशाळा सहा किमी दूर आहे.
पूर्वीपासून गिरवलीच्या डोंगरावर एक BSNL चा टॉवर आहे.. पूर्वी तेथपर्यंत रस्ता होता. वेधशाळा त्याच्याही वरच्या बाजूला आहे. वेधशाळेचा रस्ता हा एक प्रचंड मोठा कातळ फोडून केला आहे.
वेधशाळेचे आवार सुनियोजीत व आवश्यक त्या सर्व सोयींनी सुसज्ज आहे. सिक्युरीटी हाऊस, जनरेटर्स, गेस्ट हाऊस आणि टेलीस्कोप बिल्डींग विस्तीर्ण आवारात वसवले आहेत.
आत गेल्यानंतर या टेलीस्कोपची थोडक्यात माहिती, आयुकाची पार्श्वभूमी, टेलीस्कोपसाठी गिरवली गावाची निवड का केली अशी माहिती दिली गेली व सर्वांनी टेलीस्कोप बिल्डींगमध्ये प्रवेश केला.
टेलीस्कोप बिल्डींग
टेलीस्कोप डोम
तळमजल्यावर कंट्रोल रूम आहे, एका प्रेझेंटेशनच्या सहाय्याने आणखी विस्तृत माहिती दिली गेली.
वेगवेगळ्या ठिकाणी डिस्प्ले केलेले जुने फोटो व कात्रणे नक्की काय काय व कसे कसे घडत गेले ते सांगत होतेच!
कंट्रोल रूममध्ये टेलीस्कोपमधून दिसणार्या फोटोची एक झलकही दाखवण्यात आली.
वरच्या मजल्यावर टेलीस्कोप आणि डोम आहे.
टेलीस्क्प २२ अंश ते ९० अंशात व उभा फिरतो आणि स्वत: भोवती ३६० अंशात फिरतो त्यामुळे या मोजमापांमध्ये दिसणार्या सर्व ग्रहतार्यांचा अभ्यास करता येतो. एखादा ग्रह २२ अंशापेक्षा खाली असेल तर तो वर येण्याची वाट पहावी लागते.
या फोटोमध्ये छताला दिसणारा प्रकाशमान भाग म्हणजे आकाश आहे. डोमच्या वरून व एका बाजूने डोममध्ये असणारी स्लिट बाजूला होते व टेलीस्कोप आकाश पाहू शकतो.
वरच्या डोमच्या फोटोमध्ये जो उजवीकडे बाहेर आलेला उलटा L चा आकार दिसतो आहे तीच ही स्लिट
तसेच या फोटोमध्ये एक सलग पिवळी आडवी पट्टी दिसत आहे.. त्याच्या वरचा डोम ३६० अंशात फिरतो व टेलीस्कोपला हव्या त्या दिशेचे आकाश दिसते.
संपूर्ण डोम व टेलीस्कोप यांच्यामध्ये अत्यंत कमी अंतर होते त्यामुळे एका फोटोमध्ये टेलीस्कोप कव्हर करता आला नाही.
टेलीस्कोप बिल्डींगवरून दिसणारे सूर्यास्ताचे विहंगम दृष्य पाहिले.
दिवसभरात भीमाशंकर भेट झाली होती. सुदैवाने एका शेकरूने बराचवेळ दर्शन दिले होते आणि अनेक दिवसांपासून ठरवलेल्या टेलीस्कोपचीही व्यवस्थीत माहिती मिळाली होती. :)
******************
१) मी या ठिकाणी एक पर्यटक म्हणून भेट दिली होती. वरील तपशीलांमध्ये काही चुकीचे असल्यास अवश्य प्रतिसादावे.
२) मला खगोलशास्त्र व टेलीस्कोपची फारशी माहिती नाहीये. टेक्नीकल तर नाहीच नाही. मात्र आपल्या काही शंका असल्या तर त्याची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न जरूर करेन
३) येथे दिलेली माहिती कमी / त्रोटक आहे याची कल्पना आहे. आलेल्या शंकांमधून व श्री चैतन्य यांच्याकडून मिळालेल्या उत्तरातून माहितीची भर पडेल असा विश्वास आहे.
४) श्री चैतन्य राजर्षी आणि उमेश वाघेला यांचे विशेष आभार!
******************
प्रतिक्रिया
29 Jan 2014 - 7:07 pm | सौंदाळा
माहीतीपुर्ण लेख आणि त्याला सुंदर फोटोंची जोड.
जाण्याची वेळ, ग्रुपच्या संख्येचे वगैरे काही बंधन आहे का? तिकीट आहे का? आधी परवानगी घ्यावी लागते का? प्रेझेंटेशन सगळ्यांना देतात का?
आणि महत्वाचे आपल्याला दुर्बिणीतुन बघायला देतात का?
खोडदची दुर्बिणपण मोठी आहे ना आणि याच परिसरात (गुगल मॅप ३० कीमी दाखावतोय)? त्याचा वापर नक्की कशासाठी होतो?
दोन महाकाय दुर्बिणी आहेत म्हणजे परिसराचे महत्व असणारच, लेखात ते छान सांगितलय.
29 Jan 2014 - 7:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
माहितीपूर्ण लेख. आणि वरच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मलाही हवी आहेत.
ही दुर्बीण आणि नारायणगावची Giant Metrewave Radio दुर्बीण, ही पुण्यापासून जवळच असलेली दोन्ही ठिकाणे बघायची फार इच्छा आहे.
30 Jan 2014 - 1:07 pm | मोदक
जाण्याची वेळ, ग्रुपच्या संख्येचे वगैरे काही बंधन आहे का? तिकीट आहे का?
नाही.
आधी परवानगी घ्यावी लागते का? प्रेझेंटेशन सगळ्यांना देतात का?
हो.
आणि महत्वाचे आपल्याला दुर्बिणीतुन बघायला देतात का?
या टेलीस्कोपच्या प्रकारामध्ये इमेजेस सिस्टीमवर घेवून त्याचे अॅनालिसीस करतात. त्यामुळे प्रत्यक्षात मायक्रोस्कोप सारखा आयपीस बहुदा नसावा. जर असलाच तर आपण त्याची चौकशी करूया.
उत्साही मिपाकर येण्यास तयार असतील कळवा. परवानगी आणि बाकी सोपस्कार करता येतील.
29 Jan 2014 - 7:16 pm | सौंदाळा
शेकरुचा पण एखादा फोटो डकवा की राव.
आम्ही भिमाशंकरपासुन सिध्द्गड ट्रेक केला होता पण एकही शेकरु दिसले नाही :( आणि अचानक सावंतवाडीला नरेंद्र डोंगरावर दिसले होते.
30 Jan 2014 - 1:19 pm | मोदक
शेकरूचा फोटो काढला नाही कारण माझ्याकडे वल्लीसारखा हायफाय कॅमेरा नाही.
(पण माझ्याकडे एक शक्तीशाली बायनाक्युलर आहे.. त्यामुळे शेकरू आणि त्याच्या घरट्याचे निरीक्षण करता आले.)
वरील फोटोच्या मध्यभागी पानांचा गुच्छ आहे तेच शेकरूचे घरटे. एक शेकरू साधारणपणे ६ ते ७ घरटी बांधतो व त्यात वास्तव्य करून असतो.
तुमच्या समाधानासाठी फोटो - अंतर्जालावरून साभार. :)
आम्हालाही १५ ते २० घरटी दिसल्यानंतर एका घनदाट ठिकाणी दर्शन झाले.
संपूर्ण अल्बममधले अपलोड करायचे राहिलेले असे दोनच फोटो.. ते पण देतोच आता. ;)
भीमाशंकर.
कोरीवकामाच्या या प्रकाराला काही नांव आहे का..? याचे काही वैशिष्ट्य आहे आहे का..?
29 Jan 2014 - 7:44 pm | अनिरुद्ध प
वर्णन आवडले.
29 Jan 2014 - 8:41 pm | बहुगुणी
धन्यवाद!
आता अदिती यांनी या धाग्यातील प्रश्नांची उत्तरे द्यावीत याची वाट पाहुयात. त्यांचा GMRT विषयीचा जुना लेख आठवला.
29 Jan 2014 - 10:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
ही लिंक दिल्याबद्दल बहुगुणींना अनेक धन्यवाद ! सुंदर माहिलीपूर्ण लेख.
भारताची अशी नविन शक्तीस्थानं बघण्याची ओढ आहे.
29 Jan 2014 - 9:11 pm | प्रचेतस
मस्त रे.
नेमका शनिवारी हापिसात होतो. :(
29 Jan 2014 - 10:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आयुकाच्या दुर्बिणीबद्दल मला फार माहिती नाही. मी तिथे दोन-तीनदा गेले होते ते मेंढपाळ म्हणून. GMRT मधे उन्हाळी विद्यार्थ्यांना फिरवल्यावर सगळा ताफा गिरवलीला गेला होता.
तिथे जायला तिकीट लागत नाही. सरकारी आहे. GMRT मधे जायलाही नाही. GMRT ला जाण्यासाठी आधी परवानगी काढावी लागते, पण तिथे काम करणारे कोणी ओळखीचे असतील तर त्याचीही गरज नाही. दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी स्वतःचं वाहन असलेलं बरं. गिरवलीला, टेकडीवर एस्टी जात नाही. GMRT च्या दारातून एस्टी जाते.
या दुर्बिणीतून बघायला काय मिळेल, हे कधी जाताय त्यावर अवलंबून आहे. रात्री गेलात तर गिरवलीच्या दुर्बिणीतून काही दिसेल. संशोधक किंवा विद्यार्थी डोळ्यांनी काही बघत नाहीत, त्यामुळे तशी सोय आहे का नाही हे पहावं लागेल. दुर्बिणीच्या मागे CCD कॅमेरा लावणं तसं जिकीरीचं असतं. त्यामुळे कदाचित डोळ्यांनी संगणकावरच्या प्रतिमाच बघाव्या लागतील. तशाही प्रोसेस केलेल्या प्रतिमा जास्त चांगल्या (माझं मत) आणि उपयुक्त दिसतात.
बाकी काही प्रश्न असतील तर प्रतिसाद देऊन ठेवा. माझ्या सवडीने उत्तरं किंवा लेख लिहेन.
29 Jan 2014 - 11:57 pm | बहुगुणी
भारतातील अशा दुर्बिणींची एकत्रित माहिती कुठे उपलब्ध आहे का?
आयुकाच्या संस्थळावरून गिरावली बद्दल थोडी आधिक माहिती मिळाली.
30 Jan 2014 - 12:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
एकत्रित माहिती ... गुड क्वेश्चन. ;-) नाही, पण लिहीण्याचा प्रकल्प करता येईल.
माझ्या आठवणीनुसार यादी:
वर दोन दिलेल्या आहेतच.
३. उटी रेडीओ दुर्बीण. याच्या आधी कल्याणला (तेच ते, मुंबईजवळचं) प्रोटोटाईप बनला होता. त्याची माहिती कुठे मिळेल ते शोधायला पाहिजे.
४. हान्ले, लडाखची इन्फ्रारेड दुर्बीण
५. उटीलाच असणारी वैश्विक किरण मोजणारी दुर्बीण
आणि भारताबाहेर असणाऱ्या काही दुर्बिणींमधे भारताची भागीदारी आहे. या सगळ्या बनत आहेत, कागदावर काम सुरू आहे:
१. Square kilometre Array (SKA). ही रेडीओ दुर्बीण अाहे.
२. आयुका दोन दुर्बिणींमधे सहभागी आहे. एक गुरूत्वीय लहरींसाठी आहे. आणि एक मोठी दृष्य दुर्बीण आहे.
31 Jan 2014 - 1:52 am | बॅटमॅन
मस्त रे मोदका. इथे नक्की जाणार!!!! भारी मजा येईल. :)
31 Jan 2014 - 6:20 am | मदनबाण
छान माहिती दिलीस रे मोदका !
31 Jan 2014 - 10:57 pm | मुक्त विहारि
मस्त
1 Feb 2014 - 9:00 am | सुहास झेले
सहीच रे... एकदा जाऊया आपण सगळे... प्लान कर :)
1 Feb 2014 - 7:22 pm | कंजूस
चांगली माहिती पोहोचवलीत ,धन्यवाद
हे गिरवली भिमाशंकरजवळ म्हणजे नक्की कुठे आहे ?डिंभे-पोखरी घाट-तळेघर यामध्ये कुठे ?
१)एवढी दुर्बिण बसवली त्याअर्थी तिकडे अंधार चांगलाच असणार .
मी आकाशदर्शनासाठी
भिमाशंकरला नेहमी जायचो
परंतु तिकडे सोनेरी दिवे
लागल्यापासून जात नाही .
गिरवली शोधायची आहे .
२)शेकरू पाहाण्यासाठी एप्रिलनंतर जा .१५ मे ते पहिला पाऊस हा काळ उत्तम .
पायऱ्यां जवळच्या उंबरांवर भांडत असतात .
३)मोठ्या आरशाच्या दुर्बिणीचा बघण्याचा आवाका अर्धा अंशापेक्षा कमी असतो त्याचा आपल्याला काही उपयोग नसतो . सहा अंश कोनवाल्या जर्मनीतल्या काही कामाच्या आहेत .
४)रेडिओ दुर्बिणीच्या अजस्त्र सांगाड्यांच्या कंट्रोल रूममध्ये आकाशाचा कार्डीओग्राम काढल्यागत एक पट्टी येत असते .ती वाचायला डॉक्टरच लागतात .आकाशात कुठे धडधडत आहे हे त्यांनाच समजते .
1 Feb 2014 - 8:38 pm | मोक्षदा
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
4 Feb 2014 - 10:17 pm | एस
आता गिरवलीच्या निमित्ताने पुन्हा एकदा भिमाशंकरला जाणे आले. एकदा तिथे या दुर्बिणीची आणि खोडदच्या जीएमआरटीची दीर्घ एक्स्पोजर व लाइट पेन्टिंग करून छायाचित्रे घ्यायची आहेत. बघूयात. एखाद्या अमावस्येला. :)
5 Feb 2014 - 8:21 pm | पैसा
मस्त माहिती आणि फोटो! मोदक पेश्शल!