कोंग्रेस चे राजकारण आणि रामदेवबाबा, अण्णा, केजरीवाल वगैरे...

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
23 Jan 2014 - 3:06 pm
गाभा: 

(मी एक कोन्स्पिरसी थिअरी मांडत आहे. सर्वांनी सहमत व्हावेच असे नाही.)
सध्या आम आदमी पार्टीने सर्वच मीडिया हायजॅक केला आहे.
सोमनाथ भारती प्रकरणात देखील दोन्ही प्रकारच्या बाजू समोर येतच आहेत. मला सध्या वेगळा प्रश्न पडला आहे.

तो प्रश्न आहे आम आदमी पक्ष काँग्रेस चे अपत्य आहे का?
याला अनुमोदन देणारी माझी निरीक्षणे -
२०१० पासून जेव्हा काँग्रेस च्या भ्रष्टाचाराची नवनवीन प्रकरणे बाहेर पडू लागली तेव्हापासूनच कॉम्ग्रेस अस्वस्थ होती. लोकांच्या मनात प्रस्थापितांबद्दर तीव्र राग आहे हे दिसतच होते. तेव्हा हा राग असाच धुमसत राहिला तर कॉंग्रेसचे पानिपत व्हावयास वेळ लागणार नाही हे कॉंग्रेसमधील महारथी नक्कीच जाणून असावेत. त्याच भावनेतून त्यांनी ३ प्रयत्न केले असे माझे मत आहे.
१. २००८-९ पासून रामदेवबाबांच्या मागे बरीच जनता होती, त्यांना अधिक बळ देऊन लोकांचे लक्ष त्यांच्या विधायक भारत स्वभिमानकडे वळवणे. रामदेवबाबांच्या मागे काँग्रेसचे बरेच पुढारी होते, हे सर्वांनाच माहीत आहे. - पण ही खेळी चुकली, पुरेशी ताकद मिळाल्यावर रामदेवबाबा उन्मत्त (? योग्य शब्द सुचवा) झाले आणि कॉंग्रेसच्या विरोधात उभे राहिले. २०११ मध्ये त्यांनी २ जून च्या रामलीलाच्या आंदोलनाची घोषणा केली. या घोषणेने कॉंग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली.
रामदेवबाबा कोंग्रेस सोबत नाहीत हे स्पष्टच झाले होते, आणि ते निवडणूक लढवण्याची भाषा देखील करत होते. त्यावेळी हे सर्व विरोधक एकत्र होते. अण्णा हजारे, केजरीवाल किरण बेदी, राजू दिक्षीत वगैरे सर्व भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या विरोधात उभे राहणार असे चित्र होते. त्यांच्यात फूट पाडायला कोंग्रेस ने दुसरी खेळी खेळली. आतापर्यंत एकत्र काम करण्याची भाषा करण्यार्‍यांपैकी केवळ रामदेवबाबांनाच राष्त्रीय स्तरावर प्रसिद्धी होते. त्यामुळे याच कार्यकर्त्यांमधील अण्णा, केजरीवाल आणि बेदी यांना घेऊन एक नवे आंदोलन उभारण्यात आले. महत्वाची गोष्ट अशी आहे, की रामदेवबाबांचे २ जून चे उपोषण ५-६ महिने अगोदर घोषित करण्यात आले होते. आणि रामदेवबाबा त्या शक्तिप्रदर्शनासाठी भारतभर सभा/ शिबिरे घेत होते. २ जून च्या आंदोलनाच्या वेळी रामदेवबाबा नव्या राजकीय पक्षाची घोषणा करणार अशी पण बातमी होती.
परंतु अचानक अण्णा, आणि केजरीवाल यांनी वेगळीच खेळी केली. त्यांनी एप्रिलमधेच उपोषण सुरु केले. सरळ आहे की हा प्रयत्न रामदेवबाबांच्या शिडातील हवा काढण्याचा पहिला प्रयत्न होता. तो सफल झाला आणि अण्णांच्या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. रामदेवबाबा काहीसे बॅकफूटवर ढकलले गेले.
ही खेळी सफल झाल्यावर पुढची खेळी खेळली गेली - ती म्हणजे रामदेवबाबांचे आंदोलन चिरडण्याची. त्यात काय झाले ते मी सांगण्याची गरज नाही. रामदेवबाबांचा कच्चा गृहपाठ या निमित्ताने समोर आला, आणि त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा पुढे ढकलली. त्यात कोंग्रेस ने नसत्या चौकश्या/ भानगडी मागे लावून त्यांना थोडे आणखीन मागे ढकलले. खरी गम्मत तर त्यापुढेच झाली.
रामदेवबाबांच्या चिरडल्या गेलेल्या आंदोलनाचा खरा फायदा झाला तो १५ ऑगस्ट्च्या आंदोलनाला. त्यावेळी मिळालेल्या
प्रतिसादामागे ४जून च्या रागाचा मोठा वाटा होता. अर्थात एव्हाना रामदेवबाबा कोपर्यात पडले होते, आणि सारी सूत्रे अण्णा आणि पर्यायाने केजरीवालांच्या पारड्यात पडली होती.

आता रामदेवबाबांचे खच्चीकरण सरकारने का केले असा प्रश्न पडू शकतो, याची माझ्या मते मुख्य कारणे अशी आहेत
१. रामदेवबाबांच्या मागे धर्मनिरपेक्ष (मिथ्या धर्मनिरपेक्ष नव्हे) लोक देखील बरेच ताकद होती त्यामुळे ते मुस्लिम सोडल्यास ग्रामिण भागात काँग्रेस ची मते खाण्याची बरीच शक्यता होती.
२. रामदेवबाबांचे अनुयायी अराजकीय, तसेच राजकीय देखील होते, त्यामुळे त्यांनी देशव्यापी निवडणूका लढवायची घोषणा केली असती, तर कदाचित त्यांच्या बलवान संघटनामुळे ते कदाचित किंगमेकरच्या भूमिकेत देखील येउ शकले असते, आणि तसे झाल्यास त्यांनी तटस्थ राहण्यापेक्षा भाजपच्या पारड्यात माप टाकले असते.
यामुळे रामदेवबाबांबी निवडणूकाच्या राजकारणात पडणे हे काँग्रेस साठी धोक्याचे घंटा होते.

असो.

रामदेवबाबांचे खच्चीकरण झाले, पण मुख्य प्रश्न सुटला नाही. रामदेवबाबा स्वतः निवडणूक लढवणार नाही, पण स्वछ उमेदवाराचा प्रचार करू असे सांगू लागले. म्हणजे आली का पंचाईत! कारण आता ते सरळ भाजप च्या वळचणीला जऊन बसणार हे स्पष्ट होते. त्यामुळे ही विरोधी मते फोडण्यासाठी निवडणूक लढवणारा पर्याय स्थापन करणे आवश्यक झाले. अण्णा तर निवडणूकीच्या राजकारणात उतरणार नव्हते, आणि १५ ऑगस्ट नंतर अण्णांच्या लोकप्रियतेला पण ओहोटी लागू लागली. मुंबईतील आंदोलनात याचा प्रत्यय आला. म्हणून मग पुढच्या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्लीत करण्याचे ठरले.
केजरीवालांची राजकीय महत्वाकांक्षा लक्षात घेऊन त्यांना निवडणूकीचे आव्हान दिले गेले. अपेक्षेप्रमाणे त्यांनी ते स्वीकारले आणि दिल्लीच्या विधानसभेत विरोधकांची बहुतांश मते खाऊन ते निवडून आहे. दुर्दैवाने केजरीवालांच्या डोक्यात ते यश गेल्याने ते लोकसभा लढवण्याची भाषा करत आहेत, आणि दिल्लीत जे झाले त्याची पुनरावृत्ती देशभर होईल असे दिसत आहे.

मला पडलेले प्रश्न असे
१. २०१४ ला प्राप्त परिस्थितीत आप पर्याय म्हणून आला, तर आपण आप ला मत द्याल क?
२. केजरीवाल हे सर्व समजून उमजून करत आहेत, किंवा अज्ञानामुळे याला बळी पडत आहेत किंवा कसे? कारण त्यांनी लोकसभा लढवल्यामुळे मतविभागणी होणार हे तर स्पष्ट आहेच.
३. केजरीवाल लोकसभेत कॉंग्रेस च्या परंपरागत (व्होट बँक) मतांपैकी किती मते खातील, आणि अ‍ॅण्टी इन्कम्बसी पैकी किती मते खातील?
४. केजरीवालांचा उदय भाजपाला काही प्रमाणात पथ्यावर पडेल का? उद. मुस्लीम मते खाणे वगैरे. आणि एकंदरीत २०१४ मध्ये स्थिती काय असेल?

प्रतिक्रिया

अनिरुद्ध प's picture

23 Jan 2014 - 3:32 pm | अनिरुद्ध प

तज्ञ जाणकार व्यक्तिंच्या उत्तराच्या प्रतिक्षेत.

निश्चितच. आप ही कॉंग्रेसची बी टीम, संघाची सी टीम (बी टीम भाजप) आणि आयएसआयची डी टीम (ते भूषण काश्मीरबद्दल काय म्हणता आहेत ठाऊक आह ना) आहे. अजून कोणाचा ऋणनिर्देश राहिला असेल तर क्षमस्व.

चिरोटा's picture

23 Jan 2014 - 5:34 pm | चिरोटा

कळत नाही आहे.आपचे राजकारण टिपिकल भारतिय धाटणीतले नसल्याने भाजप्/कॉन्ग्रेस दोघांचेही धाबे दणाणले आहे.मोठ्या शहरांमध्ये ह्यांचे उमेद्वार निवडून येण्याची बर्‍यापैकी शक्यता आहे. जात-पात न मानणारा,भ्रष्टाचाराला कंटाळलेला मोठ्या शहरांतला वर्ग 'आप'कडे वळ्ण्याची शक्यता वाटते.

कळत नाही आहे.आपचे राजकारण टिपिकल भारतिय धाटणीतले नसल्याने भाजप्/कॉन्ग्रेस दोघांचेही धाबे दणाणले आहे.मोठ्या शहरांमध्ये ह्यांचे उमेद्वार निवडून येण्याची बर्‍यापैकी शक्यता आहे. जात-पात न मानणारा,भ्रष्टाचाराला कंटाळलेला मोठ्या शहरांतला वर्ग 'आप'कडे वळ्ण्याची शक्यता वाटते.

हा प्रतिसाद सुमारे दोन आठवड्यांपूर्वी दिला असतात तर ते पटण्याजोगे होते.विशेषतः गेल्या तीन-चार दिवसात दिल्लीत जो धुमाकूळ यांनी घातल्या त्यानंतरही आपकडे मोठ्या प्रमाणावर लोक वळतील असे वाटते? हा दुवा कितपत प्रातिनिधिक आहे हे माहित नाही तरीही दिल्लीतील सरकार पुरस्कृत आचरटपणा कम अराजक सुरू झाल्यापासून आपला ऑनलाईन पैसे मिळायचे प्रमाण लक्षणीय रित्या कमी झाले आहे.

केजरीवाल सत्तेत आल्यापासून एकामागोमाग एक विवाद आआपने केले आहेत.कधी प्रशांत भूषण काहीतरी बरळतो तर चीप पॉप्युलॅरिटी मिळवायला राखी बिर्ला तिच्या गाडीवर हल्ला झाल्याची खोटी तक्रार देते.कधी त्यांच्या कायदेमंत्र्यावर कोर्टाकडून पुराव्यात फेरफार केल्याचे ताशेरे ओढले जातात आणि कोर्टाचे ताशेरे चुकीचे असल्याचे सर्टिफिकेट केजरीवाल देतात. अर्थातच आम्ही तेवढे शहाणे,शुध्द,सज्जन आणि बाकी सगळे भ्रष्ट अशी सोयीस्कर विभागणी यांनी करून ठेवलेलीच आहे त्याला अनुसरूनच केजरीवालांचे कोर्टावरील वक्तव्य होते.तोच कायदामंत्री युगांडन महिलांना "धडा शिकवा" असे त्याच्या कार्यकर्त्यांना सांगतो आणि कायद्याचे कोणतेही मॅन्डेट नसलेला घोळका त्यांच्या घरी घुसतो, त्यांच्या अंगाला हात लावतो आणि या सगळ्याचे समर्थन पक्षातर्फे केले जाते.परत त्या महिलांनी अंमली पदार्थ घेतले नाहीत हे एम्समधील टेस्टमध्ये सिध्द होते तरीही यांचे चर्‍हाट चालूच. सत्तेत येऊन एक महिना होत नाही तोच त्यांचा आमदार केजरीवाल हुकुमशहा आहेत असे म्हणतो.टिव्हीवर तर शाझिया इल्मी विरूध्द टिना शर्मा+गोपीनाथ आणि बिन्नी यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप बघून माझ्यासारख्या हाडाच्या आआप विरोधकाचे मात्र प्रचंड मनोरंजन होते.कालपरवा तर काही पोलिसांना निलंबित करावे या मागणीसाठी ते लाखो लोकांना वेठीला धरतात, प्रजासत्ताक दिनाचे संचलन होऊ देणार नाही अशा धमक्या देतात. बाकी कोणीही काहीही म्हणो पण आआपचे आंदोलन त्या सोमनाथ भारतीच्या दबावाला बळी न पडलेल्या पोलिसांना निलंबित करा (म्हणजे त्याचा इगो सांभाळा) यासाठी होते.पण नंतर लक्षात आले की हे आंदोलनासाठी योग्य कारण लोकांपुढे करता येणार नाही म्हणून मग दिल्ली पोलिसांचे नियंत्रण राज्य सरकारकडे द्या असे शेपूट नव्यानेच जोडण्यात आले हे काही लपून राहिलेले नाही. त्यांचा मंत्री इतर नेत्यांच्या तोंडांवर थुंका असे म्हणतो.

शुध्द शब्दात सांगायचे तर काय चालवले काय आहे या सर्कशीने?अजून निवडणुकांसाठी तीन महिने म्हणजे बराच वेळ आहे.एका महिन्यात इतके प्रताप तर तीन महिन्यात आणखी किती करतील्?मांडा त्रैराशिक. कधीतरी षटी-षण्मासी उगविणार्‍या कंसमामासारख्यांना हे सगळे "हृदयातून आलेले" वगैरे वाटत असेलही.पण यापुढच्या काळात असाच गोंधळ हे घालत राहिले तर असा पाठिंबा देणार्‍यांचीही संख्या कमीकमी होत जाईल असे वाटते (आणि तसे व्हावेच ही सदिच्छा).

" आप" कुणाचेही बालक आहे असे मला वाटत नाही. ते असलेच तर अशा एका समाजाचे प्रतिक आहे ज्याना १९६९ नंतरचे राजकारण मान्य नाही. काय आहे १९६९ चे राजकारण यावर एक मोठाच लेख लिहावा लागेल.थोड्क्यात एकच सांगतो की कालच राज ठाकरे यांची मते कमी होत आहेत असा अंदाज एका सर्वे मधे आला आहे. राज ठाकरे ही एक अभ्यासयोग्य अशी राजकारणाची केस आहे. काय आहे जी केस ? या माणसाला वाटते की राजकारण बदलण्याबरोबर्॑च लोकानाही सरळ करायला पाहिजे.आहेत तेच कायदे जर नीट वापरले तर लोकपाल वगैरे नव्या कायद्यांची गरज नाही. माझे १३ आमदार १३०० सारखे काम करतील ही त्यांची वल्गना ठरलेली आहे. त्यानी निराशा केल्यामुळे नवीन आशा या
स्वरूपात मी वर म्हटलेला समूह आपकडे वळत आहे. मोदी विकासाची भाषा करतात पण इलेक्टोरल रिफॉर्म , भ्रष्टाचार
ई वर ते गप्प असतात. हे न आवडणारा एक समूह आप कडे आशा लावून आहे. केजरीवाल कितीही " वेडे" वाटले तरी त्याना जाणत्या राजापेक्षा महाराष्ट्रात प्रधानमम्त्री म्हणून जास्त पसंती सर्वे मधे मिळाली आहे. जाणता राजा हा सर्वांचा नेता नाही हे यातून दिसून येते.
आजही जाणता राजा आपल्या गोटातील आणखी एक लोकसभेवर निवडून आणण्यासाठी राज्यसभेवर जात आहे असा संशय घेण्यास जागा आहे. हे १९६९ नंतरचे राजकारण आहे. आदित्य, प्रणीती, धनंजय, शीतल, ई ई त्या राजकारणाची प्रतिके आहेत. भारतातील सर्वात मोठी समस्या भ्र्स्टाचार ही नसून भारतातील न्यायव्यवस्थेतील दिरंगाई ही आहे. त्यामुळे आज सोसायटील एखादा सदस्य देखील म्हणतो " जा देत नाही वर्गणी सुप्रीम कोर्टात जा बेलाशक !"
शेवटी राज ठाकरे या विषयावर पुन्हा येऊ ! त्यांचे राजकारण हे देखील सोयीचे राजकारण आहे असे कळल्याने लोकांचा भ्रमनिरास होत आहे. जे सोयीचे वा कसे हे राजकारण निवडणुकीपूर्वी झाले पाहिजे निवडणुकीनंतर नव्हे ! या साठी निवडणुकीनंतरच्या कोणत्याही संमीलनावर बंदी आणली पाहिजे. अगदी हास्यास्पद विधान करायचे म्हटले तर निवडणुकीचा जाहीरनामा हा मतदार व राजकीय पक्ष यांच्यातील " करार " समजून तो करार कायद्याच्या खाली आणला पाहिजे. तर नंतरच्या भ्रष्ट घोडेबाजाराला शह बसेल.

राज ठाकरेंचा विषय निघाला आहे तर विचारुन घेतो, त्यांच्या म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाच्या ब्लुप्रिंटचे काय झाले? कुणाला काही माहिती, खबर?

विकास's picture

24 Jan 2014 - 10:02 am | विकास

मला वाटते " ब्लुप्रिंट" हा इंग्रजी शब्द असल्याचे लक्षात आल्याने, राजनी त्याला फाट्यावर मारले असावे.

विवेकपटाईत's picture

23 Jan 2014 - 8:03 pm | विवेकपटाईत

शेरखान मोगलीच्या जंगलाचा अबाधित राजा आहे. कुठल्या ही रेड्याने त्याला आव्हान दिले तरी तवाकीच्या मदतीने त्याचे राजा पद कायम राहील.

रामदेवबाबासाठी काँग्रेसने एवढ्या खेळ्या कराव्यात हे पटत नाही. कुठे इंद्राचा ऐरावत कुठे शामभटाची तट्टाणी

रामदेवबाबांसाठी कोंग्रेसने खेळ्या केल्या असे मी म्हटलेच नाही. रामदेवबाबांना ओळखण्यात काँग्रेसने चूक केली असे मला म्हणायचे आहे. रामदेवबाबांनी त्यांच्या राजकीय महत्वकांक्षा जाहीर केल्यावर काँग्रेसची पंचाईत झाली असे म्हणायचे आहे. कारण आपली ताकद देऊन कोंग्रेसने रामदेवबाबांना देशाच्या कानाकोपर्‍यात हातपाय पसरायला मदत केली होती. हे रामदेवबाबाही मान्य करतात की मी काँग्रेसच्या/सरकारच्या पाठिंब्यावरच मोठा झालो,
रामदेवबाबांना ताकद देण्यात काँग्रेसचा हेतु होता की विरोधकांची ताकद कमी करणे. आणि प्रस्थापित विरोधी लाट कमी करणे. रामदेवबाबा उलटल्यामुळ्रे हे सगळे फुकट गेले, आणि ही सर्व ताकद आयतीच भाजपला मिळण्याची शक्यता निर्माण झाली. म्हणून हे विरोधी आंदोलन हायजॅक करून लोकपालचे आंदोलन रचले गेले, असे माझे मत आहे.

विकास's picture

23 Jan 2014 - 10:00 pm | विकास

हल्ली कॉन्स्पिरसी थिअरीजचे पेव फुटले आहे. मर्यदीत स्वरूपात त्या मान्य करता येतील, पण कॉन्स्पिरसी थिअरी म्हणून नाही तर राजकीय पटा वरील बुद्धीबळातली एक खेळी म्हणून. कॉन्स्पिरसी म्हणजे दोन अथवा अधिक जणांनी मिळून केलेला कट. त्यात मग काँग्रेस आणि केजरीवाल एकत्र असायला हवेत. मला तसे नाही वाटत. शिवाय दिल्लीतल्या निवडणुकीतल्या यशामुळे केजरीवाल यांच्या महत्वाकांक्षा प्रचंड पंतप्रधान होण्यासाठी फुगल्या आहेत, ते वेगळेच.

केजरीवालना जरा पुढे जाऊन देण्यात काँग्रेसला फायदा वाटत आहे आणि ते समजून आपल्याला जेव्हढा फायदा होईल तितका उकळून घेयचा हा केजरीवाल यांचा डाव आहे. निवडणुकांसाठीचे हे सोयीचे राजकारण आहे. भाजपादेखील सगळी पाने उलगडून दाखवत नसले तरी ते गप्प बसले असेल असे वाटत नाही. पण ते काही असो. असल्या खेळी या खेळी असतात, त्यात चूक-बरोबर काहीच नसते. बेकायदेशीर तर काहीच नाही.

तिथेच केजरीवाल चुकतायत असे मला वाटते. त्यांनी थंड डोक्याने राजकारण केले तर कदाचित ते पुढच्या ५ वर्षांनी पंतप्रधान पण बनु शकतात, पण आत्ता सारखेच वागत राहिले तर मग ५ वार्षांनी आप औषधालापण उरणार नाही असे वाटते.

विकास's picture

24 Jan 2014 - 1:05 am | विकास

त्यांनी थंड डोक्याने राजकारण केले तर कदाचित ते पुढच्या ५ वर्षांनी पंतप्रधान पण बनु शकतात, पण आत्ता सारखेच वागत राहिले तर मग ५ वार्षांनी आप औषधालापण उरणार नाही असे वाटते.

सहमत. पण आत्ता पर्यंतच्या वर्तनावरून असे वाटते आहे की त्यांना खूपच घाई झालेली आहे.

मला सध्या वेगळा प्रश्न पडला आहे.

तो प्रश्न आहे आम आदमी पक्ष काँग्रेस चे अपत्य आहे का?

आप हे काँग्रेसचे औरस अपत्य नक्कीच नसावे. तरीही, पुढेमागे काँग्रेसने त्यास दत्त्क घेतले (अद्याप घेतले नसल्यास!) आश्चर्य वाटणार नाही. इथे प्रकर्षाने शिवसेनेच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण येते.

१. २०१४ ला प्राप्त परिस्थितीत आप पर्याय म्हणून आला, तर आपण आप ला मत द्याल क?

असा प्रश्न उघडपणे विचारणे हे गुप्त मतदान पद्धतीला छेद देते!

तरीही, माझ्याबाबतीत म्हणाल तर, ही शक्यता नाकारता येत नाही. अर्थात येत्या ३-४ महिन्यांत ठाण्याच्या खाडीतून बरेच पाणी वाहून जाईल. तेव्हा नक्की काहीच नाही!

२. केजरीवाल हे सर्व समजून उमजून करत आहेत, किंवा अज्ञानामुळे याला बळी पडत आहेत किंवा कसे? कारण त्यांनी लोकसभा लढवल्यामुळे मतविभागणी होणार हे तर स्पष्ट आहेच.

खरे-खोटे केजरीवालच जाणोत! पण ते अज्ञानी नक्कीच नसावेत!

३. केजरीवाल लोकसभेत कॉंग्रेस च्या परंपरागत (व्होट बँक) मतांपैकी किती मते खातील, आणि अ‍ॅण्टी इन्कम्बसी पैकी किती मते खातील?

(काँग्रेसच नव्हे तर इतर कुठल्याही पक्षाची) पारंपरिक मते खाणे फारसे शक्य वाटत नाही. अ‍ॅण्टी इन्कम्बसी नक्कीच. पण त्याची टक्केवारी आताच सांगणे कठिण.

४. केजरीवालांचा उदय भाजपाला काही प्रमाणात पथ्यावर पडेल का? उद. मुस्लीम मते खाणे वगैरे. आणि एकंदरीत २०१४ मध्ये स्थिती काय असेल?

केजरीवाल (पक्षी आप) मते खातील ती प्रस्थापित विरोधी. त्यामुळे भाजपाला फायदा होण्याची शक्यता वाटत नाही.

@क्लिंटन

विशेषतः गेल्या तीन-चार दिवसात दिल्लीत जो धुमाकूळ यांनी घातल्या त्यानंतरही आपकडे मोठ्या प्रमाणावर लोक वळतील असे वाटते ...

शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात, सेनाप्रमुखांची रोखठोक (पक्षी शिवराळ) भाषा, हटाव लुंगी- बजाव पुंगी सारख्या घोषणा, उडुपी हॉटेलांवरील हल्ले या सगळ्यांचा दादर-गिरगावातील मध्यमवर्गीय (पापभिरू इ.इ.) मराठी मतदारांवर कितपत परिणाम झाला? हे विभाग सेनेचे बालेकिल्लेच राहिले ना?

@विकास

त्यात मग काँग्रेस आणि केजरीवाल एकत्र असायला हवेत. मला तसे नाही वाटत

पुनश्च शिवसेनेचे सुरुवातीचे दिवस.

एक असण्यासाठी एकत्र दिसण्याची गरज (राजकारणाततरी) नसावी! तेव्हा बाळ ठाकरे तत्कालीन काँग्रेस नेतृत्वावर घणाघाती हल्ले चढवीत. पण त्यांच्या डरकाळ्या किती डेसिबलच्या असाव्यात हे कोण आणि कुठे ठरत होते? पण सेनेचा काँग्रेसला (तत्कालीन) फायदा होत होता.

अवांतर - पुढे कालांतराने नाईकांपासून ते पाटलांपर्यंत चाललेला सेना-काँग्रेसचा "वसंत" ओसरला. शरद पवारांबरोबर व्यक्तिगत स्नेह टिकून राहिला तरी ओल गेलीच! आपचेही तसेच काही होईलही. पण तूर्तासतरी ती शक्यता वाटत नाही.

क्लिंटन's picture

24 Jan 2014 - 5:09 pm | क्लिंटन

शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात, सेनाप्रमुखांची रोखठोक (पक्षी शिवराळ) भाषा, हटाव लुंगी- बजाव पुंगी सारख्या घोषणा, उडुपी हॉटेलांवरील हल्ले या सगळ्यांचा दादर-गिरगावातील मध्यमवर्गीय (पापभिरू इ.इ.) मराठी मतदारांवर कितपत परिणाम झाला? हे विभाग सेनेचे बालेकिल्लेच राहिले ना?

मान्य. शिवसेनेची स्थापना १९६५ मधली.त्यावेळी नाही म्हटले तरी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची पार्श्वभूमी होती.तसेच सरकारी नोकरी हा आजच्यापेक्षा बराच मोठा मुद्दा असल्यामुळे मराठी-अमराठी मुद्दाही लोकांना महत्वाचा वाटत होता.शिवसेनेनी अनेक वर्षे मुंबई महापालिकेत बर्‍यापैकी जागा जिंकल्या असल्या (अनेकवेळी सत्ता येऊन शिवसेनेचे महापौर झाले) तरी त्यापलीकडे शिवसेनेची झेप कितपत होती? कृष्णा देसाईंचा खून झाल्यानंतर परळमधून वामनराव महाडिक विधानसभेवर निवडून गेले (१९७२). नंतर शिवसेनेला पुढचा आमदार मिळवायला किती वर्षे वाट बघावी लागली? १९८५ मध्ये छगन भुजबळ विधानसभेवर निवडून गेले. १९७२-१९८५ मध्ये शिवसेनेचा अन्य कोणी आमदार होता का? मला वाटते नव्हता.१९८७ च्या पार्ल्यातील पोटनिवडणुकीत रमेश प्रभू हिंदुत्वाच्या मुद्दयावर निवडून आले आणि शाहबानो प्रकरण, अयोध्या प्रकरण या पार्श्वभूमीवर हिंदुत्व स्विकारल्यामुळे शिवसेनेची वाटचाल नंतरच्या काळात जोरात झाली. पण त्यासाठी त्यांना किती वर्षे थांबावे लागले? तसेच मुंबई-ठाण्याबाहेर शिवसेनेची काय परिस्थिती होती? १९८० च्या दशकाच्या शेवटी औरंगाबादमध्ये शिवसेनेने पाय रोवले पण ते पक्ष स्थापन होऊन २० वर्षे उलटून गेल्यानंतरची गोष्ट आहे.

या लेखात राष्ट्रीय पार्श्वभूमी आहे. तसेच देशातच (किंवा मिडियात) असे वातावरण होते/आहे की आआप हा राष्ट्रीय पातळीवर चांगला प्रस्थापित होईल.केजरीवालांना पंतप्रधानपदाचे उमेदवार वगैरेही लोक समजायला लागले होते/आहेत.तेव्हा माझ्या आधीच्या प्रतिसादाला राष्ट्रीय वातावरणाची पार्श्वभूमी आहे.दिल्लीच्या खिडकी एक्स्टेंशन भागात सोमनाथ भारती आणि केजरीवालांना जोरदार पाठिंबा आहे असे वर्तमानपत्रात वाचले आहे.अशा प्रकारचे लोकल बालेकिल्ले राहतीलच.कदाचित दिल्ली शहर हा सुध्दा त्यांचा बालेकिल्ला बनेल पण देशपातळीवर तसे काही होईल हे या क्षणी म्हणणे मला तरी अत्यंत धाडसाचे वाटते.

तसाही आआप हा पक्ष जास्त प्रमाणावर मिडिया आणि सोशल मिडिया यांनी उचलून धरलेला होता.अनेकदा एन.टी.रामारावांच्या तेलुगू देसमशी आआपची तुलना केली जाते. पण रामाराव हे नाव आंध्रमध्ये चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांमुळे अनेक वर्षे आधीपासून माहित होते.याउलट केजरीवाल हे नाव अण्णांच्या उपोषणाच्या इव्हेन्टच्या वेळीच बहुसंख्य लोकांना माहित झाले.राजकारणात प्रस्थापित करायला इतर नेत्यांना जितके कष्ट करावे लागले त्याच्या एक टक्काही कष्ट केजरीवालांना करावे लागले नाहीत.जनसंघ-भाजप साठी अटलजी,अडवाणी या नेत्यांपासून असंख्य सामान्य कार्यकर्ते किती वर्षे कष्ट करत होते हे वेगळे सांगायलाच नको.१९८४ ते १९९३ च्या दशकात मायावतींनी उत्तर प्रदेशातील अक्षरशः प्रत्येक गाव पिंजून काढले.त्यानंतर बसपा बर्‍यापैकी प्रस्थापित झाला.इथे आआपला मात्र बर्‍याच गोष्टी on platter मिळाल्या.आआपला मतदान करणारे माझ्यासारखे सुशिक्षित मध्यमवर्गीय होतेच तसेच झोपडपट्ट्यांमधील लोकही होते.सुशिक्षित मध्यमवर्गीयांचे आआपकडे झुकणे हे बर्‍याच अंशी सोशल मिडिया आणि मिडियावर अवलंबून नव्हते असे मला तरी म्हणता येणार नाही.पण ज्या माध्यमातून हा पक्ष मध्यमवर्गीयांमध्ये इतका पुढे आला ते माध्यम
म्हणजे दुधारी तलवार आहे. दिल्लीत या Absolutely Anarchist Party ने अराजक माजविले त्यानंतर तोच सोशल मिडिया किती प्रमाणात या पक्षाविरूध्द गेला आहे हे वेगळे सांगायलाच नको.तसेच फार न शिकलेल्या,पोटापाण्याची भ्रांत असलेल्यांना सबसिडींची लाच देऊन हा पक्ष आपल्याकडे टिकवून ठेऊ शकेलही.पण या मतदारांना जातीपाती आणि इतर मुद्द्यांवरून आपल्या बाजूला वळवून घेणे इतर पक्षांना अधिक सोपे आहे आणि तसे या इतर पक्षांनी अनेक वर्षे केलेही आहे. या प्रकाराला हा पक्ष कितपत तोंड देऊ शकेल यावर खूप काही अवलंबून आहे.

मला वाटते की आआप हा ओव्हरकिल करत आहे.सत्तेत येऊन एक महिना होतो आहे तोच दिल्लीसारख्या लोकसभेत २% पेक्षा कमी जागा असलेल्या राज्यात २९% मते जिंकली यावरून यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडायला लागत असतील तर हा फुगा प्रचंड प्रमाणात फुगलेला आहे हे नक्कीच.

असो.

विकास's picture

24 Jan 2014 - 5:34 pm | विकास

आप चे दिल्ली विधानसभेच्या वेळेस मतदार कोण होते ह्याचे रिडीफ मधील विश्लेषण आणि ग्राफिक्स बघण्यासारखे आहे.

क्लिंटन's picture

24 Jan 2014 - 5:53 pm | क्लिंटन

यात म्हटले आहे की तरूणांनी आआपपेक्षा भाजपला जास्त मते दिली आणि सुशिक्षित वर्गाने आआपला जास्त मते दिली. परवाच्या अराजकानंतर तरी या सुशिक्षितांना आपण नक्की कोणत्या रेम्याडोक्यांना॑ मत दिले होते हे समजून आले असणार असे वाटते. कालपरवाच फेसबुकवर दिल्लीमधल्या एका गाडीवरच्या स्टिकरचा फोटो आला होता.त्यात म्हटले होते:"Don't blame me.I did not vote for AAP" :)

विकास's picture

25 Jan 2014 - 5:00 am | विकास

इतक्या पटकन आशावादी होऊ नका! :)

क्लिंटन's picture

25 Jan 2014 - 10:28 am | क्लिंटन

:(

हा सर्व्हे नक्की कोणी केला आहे, सॅम्पल साईझ काय वगैरे गोष्टी सध्या बाजूला ठेऊ.पण त्यातील एक गोष्ट आश्चर्यकारक वाटते.जरी केजरीवालांचे धरणानामक नाटक सोमनाथ भारतींच्या इगोला सांभाळण्यासाठी असले तरी नंतर दिल्ली पोलिस दिल्ली सरकारच्या नियंत्रणाखाली असावे असे कारण नंतर मानभावीपणे जोडले गेले आणि मिडियामध्ये आणि अगदी मिसळपाववरही हे अराजक दिल्ली पोलिस दिल्ली सरकारच्या नियंत्रणाखाली असावे या मागणीसाठी होते असे चित्र उभे केले गेले. तरीही खुद्द दिल्लीतले बहुसंख्य लोक म्हणतात की दिल्ली पोलिसांवर केंद्र सरकारचेच नियंत्रण असावे आणि तरीही केजरीवालला समर्थन!! हे कसे शक्य आहे? नक्की काय ते समजत नाही.

दुसरे म्हणजे हंसा रिसर्च ही संस्था मार्केट रिसर्चसाठीचे पोल घेते (ज्याचा मार्केटिंगसाठी कंपन्या वापर करतात).त्यांनी निवडणुक विषयक किती ओपिनिअन पोल्स घेतले आहेत?

विकास's picture

25 Jan 2014 - 7:53 pm | विकास

सहमत. मला देखील हेच प्रश्न पडलेत. विशेष करून, हे सर्व वाचल्यावर कुठल्या "प्रफुल"ची ही हंसा आहे? असे वाटले :)

तिमा's picture

24 Jan 2014 - 6:31 pm | तिमा

मला वाटते की आआप हा ओव्हरकिल करत आहे

आआप चा लाँगफॉर्म 'आचरट आम पक्ष' असा घ्यायचा का ?

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 Jan 2014 - 6:06 pm | राजेंद्र मेहेंदळे

हे विषय जबरा ट्यार्पी खाऊन आहेत एव्हढे नक्की...मीडियाने तर रंग दे बसंती चोला किवा ए वतन ए वतन हमको तेरी कसम च्या लायनीत नेउन बसवलेय त्यांना.

काही असो. मला वाटते केजरीवाल खुप घाई करताहेत आणि त्यांचा बेस पक्का झाला नाहिये. खरेतर त्यांनी विरोधी पक्ष होउन सरकारवर वचक ठेवता ठेवता राजकारण शिकणे योग्य होते.लोकसभा तर दुरची गोष्ट...पण काँग्रेसने अचानक घुमजाव केल्याने सत्ता गळ्यात पडली आणि आता फेफे सांभाळताना उडलेय.

पैसा's picture

28 Jan 2014 - 10:00 pm | पैसा

काहीही शक्य आहे. तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे.