बर्याच दिवसांपासून ही पाककृती लिहायची राहून गेली होती. मागे महालक्ष्म्यांच्या लेखात उल्लेख केलेल्या येसर आमटीची ही पाकृ.
मराठवाड्यातली पारंपारिक आमटी. बर्याच लग्न कार्यात पाहुण्यांना जाताना शिदोरी म्हणून मसाला नि मेतकूट देतात. मराठवाड्यात येसर नि मेतकूट देतात. खूप भाज्यांची रेलचेल मराठवाड्यातल्या जेवणात अजूनही नसते. ग्रामीण भागात तर असेल ती पालेभाजी, घट्ट वरण आणि भाकरी हे जेवणच कॉमन आहे. अशा भागात चवबदल, चमचमीत झणझणीत काही खायचं असेल तर येसर करतात. लग्नकार्यात घरी पाहुण्यांची खूप गर्दी असे. आठ आठ दिवस आधी नि नंतर वर्हाडी मंडळी कामाला जुंपलेली असत. अशा वेळी पटकन होणारा हा 'कोरड्यास' फार महत्त्वाचा. कार्याच्या तयारीत मसाले भाजण्याबरोबर येसर भाजणे ठरलेलेच. मुहूर्त करायच्या वेळी आणि सूप वाजतं तेव्हा पानात येसर हवाच. पाहुणे परत जातानाही लाडू चिवड्यासोबत येसर नि मेतकुटाचे पुडे देण्याची प्रथा आजही आहे. मला वाटतं की कामाच्या गर्दीत कमी वेळात स्वयंपाक करायचा असतो तेव्हा करायला सोपा नि खमंग म्हणून या पदार्थाला येवढे महत्त्व असावे. महाल्क्ष्म्यांच्या दिवशी ज्यांच्या घरी रात्रीचा नैवेद्य असतो त्यांच्याकडे दुपारचे जेवण भाजलेले खावे म्हणून येसर नि भाजलेल्या डाळ तांदळाची खिचडी असते.
आजही माझ्या घरात खिचडी नि येसर हा झटपट होणारा नि सर्वांना आवडणारा हा प्रिय पदार्थ आहे. माझे तर हे कम्फर्ट फूड आहे. पावसातून भिजून आल्यावर किंवा बाहेर कडाक्याच्या थंडीत फिरून आल्यावर येसर ओरपणे म्हणजे स्वर्गसुख !
लहानपणी आजी बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत वाटीत येसर वाढायची. आम्हा मुलांना तो कमी तिखट लागावा म्हणून त्यात कच्च्या तेलाची धार. मग ते तेल येसरावर चांदण्यांसारखं चमकायचं. तयार व्हायची चांदण्यांची आमटी ! माझी लेकही ही चांदण्यांची आमटी आवडीने खाते.
तर हे पुराण पुरे करून मुख्य कृती आता लिहिते.
लागणारे साहित्य :
गहू - १ वाटी
चणा डाळ - १ वाटी
ज्वारी - १/२ वाटी
बाजरी - १/२ वाटी
धणे - १/२ वाटी
सुकं खोबरं / कीस - १/२ वाटी
जिरे - २ टे स्पू
मिरे - २ टे स्पू
लवंग - ७-८
मसाला वेलची - २
दालचिनी - बोटाच्या दोन पेरांएवढी
दगडफूल - २ टे स्पू
आमटीसाठी -
आमटी पीठ - २ टे स्पून
लसूण - ५-६ पाकळ्या किंवा एक मध्यम कांदा चिरून
लसूण घालणार असाल तर कढीलिंबाची ५-६ पानंही घालायची.
तेल
मोहरी,जिरे
हळद
४ वाट्या पाणी
कोथिंबिर वगैरे..
मीठ
क्रमवार पाककृती:
गहू, डाळ, ज्वारी बाजरी हे कोरडेच;वेगवेगळे मंद आचेवर रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे. मग मसाल्याचे पदार्थ थोड्या तेलावर घरभर घमघमाट सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. एकत्र करून मिक्सरवर कोरडे बारीक दळून घ्यायचे. आता बरणीत भरून ठेवा. पुढचे ३-४ महिने जेव्हा जेव्हा झटपट पण खमंग आमटी खावी वाटेल तेव्हा करा.
आमटीची कृती
आमटीचे पीठ वाटीभर पाण्यात नीट मिसळून घ्या. पातेल्यात तेल गरम करा. जिरं मोहरी लसूण कढिलिंबाची फोडणी करा. त्यावर हे वाटीतलं पीठ घाला. वरून अजून ३ वाट्या पाणी टाका. साधारण ५ मिनिटे उकळू द्या. येसर तयार.
गरम भात, खिचडी किंवा भाकरी पोळी यात कुस्करून ओरपा. चव वाढवण्यासाठी लिंबूपण घाला.
वाढणी/प्रमाण:
मसाला साधारण १/४ किलो , २ टे स्पू आमटी पिठाची ४ - ५ वाट्या आमटी होते.
डाएटवाल्यांना गवार, दुधी, वांगे अशा भाज्यांमध्ये रस्सा करायचा असेल तर हे पीठ दाणे किंवा खोबर्याच्या वाटणाऐवजी वापरता येईल.
तळटीप : या आमटीचा फोटू नाही म्हणून चुकचुकणे म्हणजे सुरेल गाणं ऐकताना गायकाचा चेहरा दिसत नाही म्हणून चुकचुकण्यासारखे आहे ;)
प्रतिक्रिया
18 Dec 2013 - 9:01 pm | जेपी
वाचनखुण साठवत आहे . बाकी येसर मेतकुट म्हटल की , लग्न कार्याची आठवण येते .
20 Dec 2013 - 2:48 am | टिवटिव
येसर मेतकुट आणि लग्न कार्य यांची जोडी डोक्यात बसली आहे.
18 Dec 2013 - 9:01 pm | सूड
अनवट पाकॄ !!
18 Dec 2013 - 9:04 pm | त्रिवेणी
नवीन पदार्थ कळला.
आता वाचला, खाण्यासाठी प्रत्यक्षच येईन.
18 Dec 2013 - 9:23 pm | पैसा
वेसवार नावाचा एक मसाल्याचा प्रकार माहित आहे. साधारण तशाच प्रकारचा दिसतो आहे. एकदा करून ठेवला की कधीही खमंग आमटी पटकन तयार!
18 Dec 2013 - 9:54 pm | राही
अगदी हेच लिहायचे होते.
18 Dec 2013 - 9:50 pm | बहुगुणी
आणि बहुतेक अशा एकत्रित नावाने चाखलेलंही आहे. पण येसर आणि आणि मेतकुट हे भिन्न पदार्थ आहेत असं इथे वाचून वाटतंय (मग मी चाखलं ते मेतकुट होतं की येसर हे शोधून काढावं लागेल!)
गहू, ज्वारी आणि बाजरी ही धान्ये उपलब्ध नसतील पण त्यांची पीठे उपलब्ध असतील तर ती भाजून वापरली तर चालेल का?
कृतिबद्दल धन्यवाद!
18 Dec 2013 - 11:06 pm | मुक्त विहारि
नक्की करून बघणार.
19 Dec 2013 - 10:47 am | दिपक.कुवेत
अच्छा म्हणजे बाकि पाकॄं वर तुम्हि धन्यवाद मानले (च) तर ते मनापासुन नसतात तर! मुवि आमटी पीठ तयार करुन ठेवा. मार्च मधे आलो कि फोडणी देउन ओरपु!
19 Dec 2013 - 12:05 am | कवितानागेश
वाह!!
19 Dec 2013 - 1:24 am | संदीप चित्रे
मी करण्याची शक्यता नाही पण घरी नक्की कळवीन :)
बाकी शेवटचं वाक्यं म्हणजे एकदम शेवटच्या चेंडूवर मारलेला षटकार आहे, मितान :)
19 Dec 2013 - 1:50 am | प्रभाकर पेठकर
अरे व्वा! वेगळीच पाककृती आहे. नक्कीच करून पाहणार.
>>>>>या आमटीचा फोटू नाही म्हणून चुकचुकणे म्हणजे सुरेल गाणं ऐकताना गायकाचा चेहरा दिसत नाही म्हणून चुकचुकण्यासारखे आहे<<<<
हे शेवटचे विधान बाकी पचायला अंमळ कठीणच आहे. गायकाच्या चेहर्यावर गाण्याचा सुरेलपणा अवलंबून नसतो पण पाकसिद्धीत रुप, गंध, स्वाद ह्या तिनही घटकांचे महत्व पदार्थाला उच्च स्तरावर बसविण्यास कारणीभूत असतेच असते. कोल्हापुरी तांबडा रस्सा किंवा सुकं मटण, केळ्याच्या शिक्रणासारखं दिसून कसं चालेल? असो.
19 Dec 2013 - 2:37 am | प्यारे१
वेगळाच प्रकार. बाकी फोटो बद्दल पेठकर काकांशी सहमत.
पाकृ म्हणून भे(स)ळीचे फोटो सुद्धा आम्ही पाहिलेले आहेत आणि तुम्ही ह्या आमच्यासाठी अपरिचित पदार्थाचा फोटो देत नाही आहात म्हणजे काय? ;)
19 Dec 2013 - 3:36 am | रेवती
आमटीचा नवीन प्रकार समजला. खमंग होत असणार.
फोटू न देण्याचे कारण आवडले पण पटले नाही. ;)
19 Dec 2013 - 9:07 am | मितान
बहुगुणी, तयार पीठे वापरून करून बघायला हरकत नाही. पण हे आमटीचे पीठ इतर पिठांएवढे बारीक नसते. जरासे रवाळच असते. त्यात वेगळाच खमंगपणा असतो.
पेठकर काका, तुम्ही अचूक पकडलंत ! आता फोटो काढते नि टाकते. बाकी ही 'सुंदर दिसणारी' पाकृ नव्हे. शेंगदाण्याच्या आमटीचा फोटोही इथे खपून जाईल :)
19 Dec 2013 - 9:43 am | प्रभाकर पेठकर
>>>> आता फोटो काढते नि टाकते. <<<<
धन्यवाद. एक बारीकशी शंका अशी की ह्यात लाल तिखट वापरायचे नाही का? पीठात गरम मसाल्याचे जे प्रमाण आहे (२ टे. स्पू. मिरे आणि ५-६ लवंगा) ते पाव किलो पिठास झणझणीतपणा आणण्यास पुरेसे आहे?
19 Dec 2013 - 9:49 am | मितान
धन्यवाद काका
फोडणी देताना भरपूर लाल तिखट घालतात. मी लिहायची विसरले. :(
माझ्या आजोळी जो येसर होतो त्यात धान्य भाजताना त्यात पांढरट असलेल्या पण तिखट असलेल्या सुक्या मिर्च्या भाजून घालतात. आईकडे घालत नाहीत.
19 Dec 2013 - 10:00 am | प्रभाकर पेठकर
ह्या शनिवारी किंवा रविवारी नक्की करून पाहणार.
19 Dec 2013 - 9:13 am | प्रीत-मोहर
मस्त पाकृ. नक्की ट्राय मारीन
19 Dec 2013 - 9:31 am | मितान
ए बयो, ट्राय 'मारू' नको प्लीज. चुकून डोळ्यात गेले ना तर चार तास बोंबलत बसण्याची निचिंती.. ;)
19 Dec 2013 - 10:52 am | दिपक.कुवेत
आमटीचा प्रकार दिसतोय......बाकि ती खमंग होत असणार ह्यात शंका नाहि पण एकदा चाखायला मिळाली तर नक्कि चव कळली असती!
19 Dec 2013 - 11:58 am | प्रभो
भारी!!!
19 Dec 2013 - 12:32 pm | बॅटमॅन
खाणे सोडा हे नावही पहिल्यांदाच ऐकले. वर्णन तरी तोंपासू आहेच!
19 Dec 2013 - 7:17 pm | अनन्न्या
मस्त असणार नक्कीच! फोटु पाहून अंदाज येतो आपण केलेला पदार्थ असाच दिसतोय की काही वेगळेच झालेय.
19 Dec 2013 - 7:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बोकडयाच्या कार्यक्रमाला (कंदूरी) ला आई असा मसाला सांगते बहुतेक मितान तसेच काही सांगतेय वाटतं
आमच्या आजीला स्वप्नात 'पीर'दिसला घोड्यावरून त्यांनी आमची जिथे
टरबुजाची वाडी होती तिथे चक्कर मारला. आजीने पिराला नवस बोलला दर तीन वर्षाने बोकड्याचा कार्यक्रम करू तेव्हा केला जाणार मसाला येसुर.
एका हंड्या चा मसाला त्याचे नाव येसुर..... आईने सांगितलं ते असं
बाजरी,चनाडाळ, धने, तांदुळ, मिरची, खोबरं,लसुन, कांदा, अद्रक,प्रवीन मसाला, हळद , गरम मसाला.
लसुन, कांदा, अदरक, कोथनबिर, खोबरं,याचे पेष्ट गरम मसाला. बाकी दळन आणून हे सर्व मटनात उक्लायचे मीठ कांदा परतुन असं ते येसुर. (आई लै रिपीट रिपीट सांगते आहे घोळ होऊ राहिला लिहिण्यात ) मलाच मिपाकरान्साठी असा येसुराचा जंगी बेत करावा लागेल :)
-दिलीप बिरुटे
19 Dec 2013 - 7:54 pm | बॅटमॅन
चला हा शब्द आलाय त्यानिमित्ताने विचारतोच...कंदुरी म्हणजे काय हो सर? नक्की कधी असतो आणि कशानिमित्त असतो, काय करतात त्यात?
19 Dec 2013 - 8:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
''नवस पूर्ण झाल्यावर किंवा नवसाच्या निमित्तानं पै पाहुण्यांना बोकड्याचं मटन, भाकरी, भात खाऊ घालण्याच्या बेताला 'कंदूरी' असे म्हणतात''
-दिलीप बिरुटे
19 Dec 2013 - 8:11 pm | बॅटमॅन
ओह अच्छा, धन्यवाद सर!!
20 Dec 2013 - 1:52 am | अभ्या..
कंदुरी... आह्ह्हा
ब्याट्या मी चक्क कंदुरीसाठी हाय का कुठं? हाय का कुणाकडं? असं तडफडणार्या लोकांना पाह्यलय. पाहतो. :)
येच एकदा लका हिकडं.
20 Dec 2013 - 1:58 am | बॅटमॅन
ओहो! येतोच थांब!!! :)
19 Dec 2013 - 8:00 pm | मुक्त विहारि
"मलाच मिपाकरान्साठी असा येसुराचा जंगी बेत करावा लागेल."
कधी?
कधी?
कधी?
20 Dec 2013 - 9:09 pm | त्रिवेणी
सर आम्हाला पण बोलवा ह. प्लीजच.
20 Dec 2013 - 9:26 pm | मुक्त विहारि
कधी आलात तर येसर आमटी-भात नक्की खायला घालीन.
आणि क्रुपया मला "मुवि" म्हणालात तर फार उत्तम.
("सर,साहेब" वगैरे नको.)
24 Dec 2013 - 5:35 pm | सूड
डोंबोलीत कधी कट्टा झाला आता अधेमधे तर घेऊन या बनवून !! ;)
19 Dec 2013 - 9:29 pm | मितान
बिरुटे सर, घरोघरीच्या गरम मसाल्यांप्रमाणे येसराच्याही घरोघरी वेगळ्या पद्धती असणारच !
तुम्ही सांगितलेली पद्धत जास्त खमंग वाटतेय. खोबरं नि आलं लसूण अजून लज्जत वाढवत असणार !! मी पण या पद्धतीने करून बघणार नक्की !!!!
19 Dec 2013 - 9:46 pm | अजया
नक्की करुन पाहीन आणि तुला फोटो पाठवेन.
19 Dec 2013 - 10:00 pm | अमेय६३७७
भारीच, नक्की करून पाहणार
20 Dec 2013 - 12:36 pm | सविता००१
नक्की करते आता......
20 Dec 2013 - 1:35 pm | मुक्त विहारि
ती खावून बायको खूष झाली.
एक चविष्ट पाकक्रुती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद....
20 Dec 2013 - 1:47 pm | गणपा
मस्त !
येसरबद्दल पहिलांद्याच ऐकतोय.
या पारंपारिक पाकृसाठी धन्स मितानताय. :)
24 Dec 2013 - 5:09 pm | सुहास..
खंगरी !!
मराठवाड्यातला
3 May 2017 - 1:14 am | सत्यजित...
>>>मग ते तेल येसरावर चांदण्यांसारखं चमकायचं. तयार व्हायची चांदण्यांची आमटी ! >>>एवढी निरागसता कशी बरं आणावी लेखनात?
बाकी,ही आमटी आवडतेच! याच आमटीत,घट्ट बेसन/पिठल्याच्या वड्या (ताटावर तेलाचा हलकासा हात फिरवून,त्यावर पसरवून,खोबऱ्याचा किस भुर-भुरुन कट केलेल्या!) आणि सोबत खरपूस भाजलेल्या(चुलीवर) भाकरी...म्हणजे अहाहाच!