हिंदु अंत्यसंस्कार आणि दफन
हिंदु धर्मात दहन केले जाते. पण एक माणूस जाळायला लाकूड फार लागते. विजेवरची दहन सोय सगळीकडे उपलब्ध नसते.
त्यामुळे हिंदु लोकानाही दफनाची सोय करता येईल काय? ( सध्या लिंगायत समाजात अशी पद्धत आहे. ) दफनाला लाकूड लागत नाही. शिवाय ठराविक काळ ८-१० वर्षे वगैरे गेला की त्याच जागेत पुन्हा पुन्हा दफन होऊ शकते.
दफन करायचे असेल तर हिंदु धर्मातही एक सोय आहे. मोठा संत होणे आणि समाधी घेणे, पण सामान्याना ते जमणारे नाही. मग सामान्याना अशी सोय आपल्या धर्माने किंवा शासनाने का केली नाही? तसेच एखादी व्यक्ती स्वतःला निधर्मी समजत असेल ( पण जन्माने हिंदु असेल ) तर तिचीही सोय होईल.
हिंदुनी पुढाकार घेऊन हिंदुंसाठी दफनभूमी करावी, अशा विचाराचे कुणी आहे का? अशी दफनभूमी सध्या कुठे आहे का? ( याबाबत धर्म काय सांगतो, हे संबंधितानी जरुर पहावे. पण आपण मेल्यावर एक झाड मरु नये अशी तळमळ असलेल्यानी याबाबत चिंता करायची गरज नाही. ) , एका पंचक्रोशीत तरी अशी सोय हवी.
मेडिकल कॉलेजात देणे, हाही सर्वाना जमणारा पर्याय नाही. ( आणि तसेही, मेडिकल कॉलेजात विद्यार्थी होऊन एका मढ्याला त्रास देऊन झालेला आहे. :) आता पुन्हा स्वतः मढे होऊन अजून पाच विद्यार्थ्याना त्रास द्यायची इच्छा नाही. :) )
हिंदु धर्मात सरसकटपणे दहन आणि दफन असे दोन ऑप्शन उपलब्ध होऊ शकतील का? याची चर्चा अपेक्षित आहे. दहन : सत्य की थोतांड हा विषय इथे अपेक्षित नाही. ( पण तरीही कुणी चर्चा करत असल्यास त्याला प्रतिबंध केला जाणार नाही. :) )
शाहण्याने आपुले थडगे खणावे
आणि खणताना गाणे म्हणावे. :)
प्रतिक्रिया
6 Dec 2013 - 12:51 pm | अत्रन्गि पाउस
मला स्वतःला दहन विधी अत्यंत भेसूर वाटतो ... लाल गुलाल, बुक्का, कणकेचे गोळे म्हणजे गेलेल्याच्या नातेवाईकांना दुख्खावर मीठ चोळल्या सारखे वाटते...
ख्रिश्चन दफन त्यामानाने जरा सोबर आणि गांभीर्ययुक्त वाटते...
अवांतर : पूर्वी 'मूठमाती' हा शब्द आपल्याकडे होता तो माणसांना लागू होता का?
6 Dec 2013 - 11:56 pm | पामर
"एखाद्या गोष्टीला मुठमाती देणे" हा वाक्प्रचार आपल्याकडे मुस्लीमांच्या दफनविधी वरुन आलेला आहे.त्यांच्याकडे अंत्यविधीला जमलेला प्रत्येकजण एक एक मुठ माती मृताच्याविषयी 'श्रद्धांजली' म्हणुन वाहत जातो, अशी पद्धत आहे...
6 Dec 2013 - 12:53 pm | प्रभाकर पेठकर
अरेरे! ह्या उथळ विचारांनी विषयाचे गांभिर्य हरवले आहे.
देहदान, अवयवदान ही काळाची गरज आहे. आपल्या पश्र्चात ७ जणांना नवजीवन प्राप्त करुन देण्याची संधी नाकारून आपला निष्प्राण आणि एक व्यक्ती म्हणून कोणालाही कसलाही उपयोग नसलेला देह जाळून-पुरुन टाकणे मनाला पटत नाही. मी स्वतः, अवयवदान करण्याचा निर्धार केला आहे.
हिन्दू धर्मात छोट्या बालकांचा मृतदेह पुरण्याची प्रथा आहे.
6 Dec 2013 - 1:22 pm | उद्दाम
अहो, ते गंमत म्हणून लिहिले आहे. शिवाय देहदान, अवयवदान प्रत्येकाला शक्य नाही. सगळे अवयव निरोगी असणे, जवळ त्याची सोय असणं आणि आपण मेल्यावर नातेवाइकांनी त्याबद्दल त्वरीत हालचाल करणं हे सगळं जमल्याशिवाय देहदान , अवयवदान शक्य नाही.
6 Dec 2013 - 1:59 pm | नगरीनिरंजन
दहनाची कल्पना मलाही पसंत नाही पण मोठ्या लाकडी पेटीत ठेवून पुरण्याचे चोचलेही आवडत नाही.
मुळात जगताना केले तेवढे नखरे पुरेत असे वाटते. हत्ती जसे खोलवर जंगलात जाऊन एकांतात देह ठेवतात तसे करावे असा माझा विचार आहे. माझा देह पोसण्यासाठी अनेक जीवांचा बळी गेला आहे त्याची भरपाई उघड्यावर माझा देह प्राणी-कीटकांना खायला घालून करता येईल असे वाटते.
6 Dec 2013 - 2:05 pm | अमोल मेंढे
पारशी समुदायात असेच केले जाते...
6 Dec 2013 - 4:38 pm | नगरीनिरंजन
पारशी समाजात शहरातल्याच स्मशानभूमीतल्या कोरड्या विहीरीत नेऊन प्रेत टाकतात. तशी माझी कल्पना नाही.
जिथे मानवी वास्तव्य फारसे नसेल अशा जंगलात जाऊन मरावे थोडे प्राण्यांनी खावे व थोड्या शरीराचे कुजून खत व्हावे असे मला वाटते आणि तशी सोय आहे की नाही त्याने काहीही फरक पडत नाही. शहरात सगळं आयुष्य काढल्यावर मरायला तरी जंगलात जाता यावं एवढीच अपेक्षा; पण त्याआधीच अचानक फटकन मेलो तर घरचे काय करतील ते खरं
असो.
6 Dec 2013 - 4:42 pm | परिंदा
अशी किती जंगले उरली आहेत? आणि ती उरणार आहेत?
यातही पुन्हा आपले आजारी शरीर प्राण्यांनी खाऊन त्यांना काही इजा व्हायला नको. आजारी गुरांना दिलेल्या डायक्लोफाम औषधामुळे त्या गुरांचे शरीर खाल्ल्याने गिधाडे मरत आहेत. तसे काही व्हायला नको.
6 Dec 2013 - 6:45 pm | नगरीनिरंजन
किती हा निराशावाद!
खुळचट स्वप्ने पाहू द्या की, पुढे जे व्हायचंय ते होईलच.
6 Dec 2013 - 2:07 pm | बाळ सप्रे
दहन काय नि दफन काय मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे २ मार्ग एवढ्याच नजरेने पहा..
आणि तुम्हाला रुचलेल्या वाटेने जा.. कायदा अडवायला येत नाही ..
बाकी राहिले फायदे तोटे.. एकात ईंधन लागते. दुसर्यात जागा अडुन रहाते.. लोकसंख्यावाढीमुळे इंधन संपणे जेवढे काळजीचे तेवढेच जागा संपणेही..
बाकी अवयवदान देहदान म्हटले तरी वापरलेला अवयव सोडुन कींवा विच्छेदन झाल्यावर विल्हेवाट ही लावावी लागतेच.
6 Dec 2013 - 3:15 pm | उद्दाम
बाकी अवयवदान देहदान म्हटले तरी वापरलेला अवयव सोडुन कींवा विच्छेदन झाल्यावर विल्हेवाट ही लावावी लागतेच.
अगदी सहमत.
शिवाय तरुणपणी हिरिरीने अवयवदानाचा फॉर्म भरला तरी म्हातारपणा येईपर्य्ण्त त्यातील किती अवयव निरोगी रहातील हा विचार नको का करायला? की नुस्तं फॉर्म भरलं म्हणजे झालं ? ७०-८० पब्लिक हे कोणते ना कोणते अवयव बाद होऊनच मरत असतं . तरुण वयात अपघातामुळे कोमा वगैरे होऊन शरीर मरणार, पण इतर अवयव निरोगी आहेत, अशा एखाद्या केसमध्येच ते सात अवयवांचे दान वगैरे शक्य असते. प्रत्येकाला ही संधी मिळत नाही.
दहन श्रेष्ठ की दफन श्रेष्ठ हा मुद्दा इथे अपेक्षित नाहीच आहे. हिंदु धर्मात दफनाचा पर्याय मुक्तपणे उपलब्ध व्हावा , हा चर्चेचा मुख्य उद्देश आहे.
6 Dec 2013 - 6:37 pm | विकास
हिंदू धर्मात सगळे करायला परवानगी आहे... हिंदू धर्म काहीच म्हणत नाही. प्रश्न सेक्यूलर देशातील कायद्याचा आहे. मला वाटते भारतात स्मशानभुमी हा प्रकार धर्मानुसार आहे. म्हणजे भले दफनच करत असतील तरी मुस्लीम स्मशानभुमीत ख्रिस्ती लोकांना दफन करता येत नाही. इतकेच काय तिथल्या इमामांनी मला वाटते मुस्लीम सत्यशोधक समाज स्थापल्यामुळे हमीद का हुसेन दलवाईंना का अजून कुणाला आत्ता आठवत नाही, पण त्यांच्या मुस्लीम विरोधक विचारसरणीमुळे दफनाला जागा देणार नाही म्हणून सांगितले होते. ते तसे सांगू शकतात कारण कब्रस्तानावर मुस्लीम धर्मगुरूंचे म्हणणे चालत असावे.
वास्तवीक सेक्यूलर विचारवंतांनी स्मशानभुमी सेक्यूलर असावी म्हणजे धर्माधारीत नसावी अशी मागणी करायला हवी. एकाच स्मशानभुमीत दहन आणि दफनाची व्यवस्था जी अमेरीकेत अनेक ठिकाणी आहे. कदाचीत तथाकथीत सेक्यूलर विचारवंताना त्यात त्यांच्या विचारांचेच दहन अथवा दफन झाले तर काय अशी भिती वाटत असावी. ;) असो जोक अपार्ट...हा मुद्दा कायद्याचा आहे, आणि एकीकडे धर्मनिरपेक्ष म्हणत समोरच्याला धर्माच्या चष्म्यातूनच चुकीच्या कारणासाठी बघत निर्णय घेण्याच्या वृत्तीचा आहे.
7 Dec 2013 - 11:13 am | उद्दाम
हिंदू धर्मात सगळे करायला परवानगी आहे..
मी हा प्रश्न एका साधकाना विचारला होता. ते बोलले--- लहान मूल व संत याना देहाबद्दल असाक्ती नसते. म्हणून त्यांचे प्रेत पुरतात . इतरांची प्रेते जाळावीत म्हणजे आत्मा घुटमळत नाही ( म्हणे.) म्हणून अशी सोय आहे.
7 Dec 2013 - 11:45 am | मृत्युन्जय
इतरांची प्रेते जाळावीत म्हणजे आत्मा घुटमळत नाही ( म्हणे.)
गंमत अशी की नेमके याच कारणासाठी ख्रिश्चनांमध्ये जाळत नाहित. ख्रिश्चन धर्मानुसार देव (आणि केवळ देवच) एखाद्या शरीरात परत जीव ओतायचे नाही की ते ठरवु शकतो. त्यामुळे शरीर जाळणे हे इश्वराच्या इच्छेविरुद्ध असेल (म्हणे.) (कारण मग देव ते शरीर परत पुनर्जिवित करु शकणार नाही) (म्हणे.)
इस्लाम मध्ये तर काय पुरावे हे अल्लाहनेच सांगितले आहे. त्यामागे काही कारण दिलेले नाही कारण अल्लाहला मर्त्य मानवांना नसते ज्ञान देण्याच्या भानगडीत पडायची गरजच नाही. त्यामुळे पुरायचे म्हणजे पुरायचे. का वगैरे विचारायचे नाहिच नाहितरी. एकदा अल्लाहने पुरायच म्हणुन सांगितल्यावर जाळणे वगैरे आपोआप निषिद्ध होते (म्हणे.) कारण ती पद्धती सांगितलेलीच नाही.
7 Dec 2013 - 12:59 pm | सुहासदवन
फॅनटॅस्टीक! सुपर लाईक!!!
7 Dec 2013 - 7:27 pm | विकास
इतरांची प्रेते जाळावीत म्हणजे आत्मा घुटमळत नाही ( म्हणे.) म्हणून अशी सोय आहे.
हिंदू धर्मात साधक म्हणजे काय याची एकच व्याख्या होऊ शकत नाही. त्यामुळे उत्तरे देखील वेगळी मिळू शकतात. हिंदू तत्वज्ञानाप्रमाणे (प्रथा-परंपरा-पंथ नाही) कुठलीही गोष्ट ही पंचमहाभूतांनी - "पृथ्वी-आप-तेज-वायू-आकाश"यांनी बनलेली असते. त्यात मानवी शरीर देखील आले. जेंव्हा निराकार प्राण जातो तेंव्हा तो परत निराकार आकाशाचा भाग होतो, जळणार्या मृतदेहातून, अग्नीत अग्नीचा भाग जातो, राहीलेल्या राखेतून पृथ्वी-आप आण वायू यांच्यात त्यांचे त्यांचे घटक परत निघून जातात.
ख्रिश्चनांमध्ये (भारतातील माहीत नाही पण असावे) पुरत असताना "Earth to earth, ashes to ashes, dust to dust" असे म्हणायची पद्धत आहे ती काही अंशी अशाच पद्धतीने पण त्यांच्या तत्वज्ञानाला/श्रद्धेला धरून आहे. त्यात "ashes to ashes" हा भाग केवळ बायबल मधे कुठून तरी आला म्हणून आहे.
ज्यू लोकांमधे मला वाटते पांढर्या चादरीत गुंडाळून (म्हणजे शवपेटी़का न वापरता) पुरतात. कारण देह मातीचा असतो आणि मातीत परत जाउंदेत ही श्रद्धा.
लहान मूल (साधार १२ वर्षाखालील) आणि संत (अथवा तसे स्वतःस समजणारे बुवा-बाबा) यांच्या बाबतीत दफन करण्याची पद्धत का आली माहीत नाही, कदाचीत भावनात्मक कारणाने पण आली असेल. ती देखील कायम वापरली जाते अशातला भाग नाही...
6 Dec 2013 - 2:57 pm | बॅटमॅन
मरणोत्तर पार्थिव देह पर्यावरणाला शक्य तितकी कमी तोशीस देऊन नष्ट करावा असे वैयक्तिक मत आहे. विद्युद्दाहिनी वैग्रे भानगडी सोलार वरती किंवा एकूणच रिन्यूएबल एनर्जीवर चालवल्या तर उत्तम होईल. दफन करण्यात वाईट काहीच नाही पण जागा लै अडते. भारताची लोकसंख्या पाहता दफन सुरू केले तर रेसिडेन्शिअल फ्लॅटसारखे स्मशानातल्या स्पॉटच्या झैराती येतील- त्यात परत १ बीएचके, पेंटहौस, पिर्यामिड, इ.इ. नकोच ते. लिंगायत वैग्रे लोक संख्येने थोडे आहेत म्हणून चालते. पारशांची पद्धत तशी पाहता ठीक, पण मुंबै अन कराचीमध्ये शहराची लोकसंख्या वाढू लागताच आरोग्याचा प्रश्नही भेडसावू लागला.
बाकी देहदान योग्य पर्याय आहे. एक तर देहदान नैतर कमी खर्चिक दहन हेच पर्याय मला व्यक्तिशः ठीक वाटतात.
6 Dec 2013 - 3:45 pm | प्रकाश घाटपांडे
सहमत आहे.
6 Dec 2013 - 3:55 pm | मालोजीराव
भारतात हिंदूंमध्ये दफनविधी नाहीच असे असे नाही म्हणता येणार,
राजस्थान,महाराष्ट्रात काही क्षत्रिय घराणी दफनविधी करतात. ओरिसा ,कर्नाटक येथेही काही हिंदू लोक दफनविधी करतात. पण ओव्हरऑल हिंदूंमध्ये हा टक्का १-२% असावा.
6 Dec 2013 - 4:01 pm | बॅटमॅन
भारतात इतके प्रचंड वैविध्य आहे की सर्व प्रकार चालतात खरे.अशी "हिंदू थडगी" मात्र मी इथे पहिल्यांदाच पाहतो आहे. लिंगायत सोडून अन्य समाजांतील दफनाबद्दल माहिती नव्हती. एक अंत्ययात्रा पाहिली ती अजून आठवते आहे. मिरजेला शाळा संपवून परत घरी चाललो होतो. मार्केटमध्ये पाहतो तर लोकांचा एक जमाव, त्यामध्ये हातगाडीवर एक खुर्ची ठेवून त्या खुर्चीवर एक माणूस बसला होता. दृश्य अंमळ विचित्र वाटले म्हणून अजून जवळ जाऊन पाहिले तर तो खुर्चीवरचा माणूस मेलेला होता. पहिल्यांदा टरकली पण नंतर कळाले की लिंगायत समाजात हा प्रकार असतो म्हणून.
वरील थडग्यांचे प्रकार पाहता ख्रिश्चन प्रभाव जाणवतो आहे खरा.
6 Dec 2013 - 5:10 pm | चौकटराजा
दिल्ल्लीला जाताना ग्बालियर ते मोरेना या दरम्यान बाहेर नजर टाकली तर काही वास्तू अशा दिसतात. एका स्थानिकाला
विचारता त्य्याने ही दफने असल्याचे सांगितले होते.
6 Dec 2013 - 5:12 pm | बॅटमॅन
रोचक!
6 Dec 2013 - 6:00 pm | मालोजीराव
तुळजाभवानी चे पारंपारिक पुजारी असलेल्या कदम-पाटलांच्या घराण्यात दफन करण्याची प्रथा आहे असं ऐकून आहे.
6 Dec 2013 - 6:08 pm | बॅटमॅन
हे अजूनच रोचक. कुठे कशा प्रथा अस्तील कै सांगता यायचं नै.
7 Dec 2013 - 1:27 pm | इरसाल
ज्यांनी कोणी महानुभाव पंथ स्वीकारला आहे त्यांचे मृत्युनंतर दफन केले जाते.(उदा. माझ्या मावशी)
7 Dec 2013 - 2:06 pm | बॅटमॅन
खानदेश सोडून अन्यत्र महानुभावांत ही प्रथा आहे की कसे?
6 Dec 2013 - 6:50 pm | जेपी
नाही तशी कुठलीही प्रथा नाही .
पुर्वार्श्रमीचा तुळजापुरकर -तथास्तु
7 Dec 2013 - 11:24 am | उद्दाम
देहदान हा पर्याय सोपा नाही.
मेडिकल कोलेजात १०० पोरे असतील , तर सहा लोकांमध्ये १ मढे लागते. म्हणजे १०० पोराना फार्फार तर २० मढी लागतात. ही मढी एका मोठ्या टँकमध्ये फॉर्मलिनच्या द्रावणात लोणचं घातल्यागत ठेवलेली असतात . भारतातल्या सगळ्या ८० कोटी लोकान्ना योग्य होईल असा हा पर्याय नक्कीच नाही.
अवयवदानचेही तसेच आहे. माणसाचे मढे ७० किलोचे असले तर दान देण्यायोगे अवयव खच्चुन १५ किलोचे निघतील. ते काढून घेऊन उरलेले ५५ किलोचे मढे नातेवाइकानाच साभार परत करतात. ते पुन्हा जाळावे किंवा पुरावेच लागते.
7 Dec 2013 - 11:55 am | सुबोध खरे
ए एफ एम सी मध्ये शवविच्छेदन करीत असताना आमचे प्राध्यापक डॉ. वि रा म्हैसुरकर( हे ग्रे ऐनाटोमीच्या पुस्तकाच्या लेखक वर्गातील एक होते) यांनी आम्हाला शवाबद्दल आदर बाळगावा अशी शिकवण दिली आहे. त्यांच्याच शब्दात हा मनुष्य मृत्युनंतर सुद्धा तुम्हाला शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. तेंव्हा कमीत कमी त्याच्या बद्दल अनादर दाखवू नका. कितीतरी लोक जिवंत असताना सुद्धा लोकांच्या उपयोगी पडत नाहीत.
शवविच्छेदन हे वैद्यकीय शिक्षणाचे अतिशय अहम असे अंग आहे. त्यासाठी पुरेसे मृतदेह मिळत नाहीत हि आजही वस्तुस्थिती आहे. जर त्याबद्दल गैरसमज दूर केले तर पुढच्या पिढीत उत्तम डॉक्टर होण्यास मदतच मिळेल. कितीजारी त्रिमितीतील पुस्तके आणि प्रतिरूपे(मॉडेल) असली तरी प्रत्यक्ष मृतदेहावर काम करून मिळालेले शिक्षण हे फार वरच्या दर्ज्याचे असते.
तेंव्हा "आणि तसेही, मेडिकल कॉलेजात विद्यार्थी होऊन एका मढ्याला त्रास देऊन झालेला आहे. Smile आता पुन्हा स्वतः मढे होऊन अजून पाच विद्यार्थ्याना त्रास द्यायची इच्छा नाही " हे वाक्य मनाला पटले नाही.तसेच मृत माणसाच्या शरीराला "मढे" म्हटलेले पण पटत नाही.पार्थिव हा शब्द जास्त योग्य आहे असे मला वाटते.
मी स्वतः माझा देह जे जे रुग्णालयाला देण्याचे शपथ पत्र सही केलेले आहे. "आप मेलं आणि जग बुडालं".
मी एका शवविच्छेदनातून शिकलो ते ऋण काहीअंशी तरी परत व्हावे.
7 Dec 2013 - 12:33 pm | विद्युत् बालक
लायकीवर प्रवेश मिळालेल्या माणसाला च असते शिक्षणाचे महत्व !
7 Dec 2013 - 12:39 pm | उद्दाम
मृत शरीराला पार्थिव म्हणायचे असेल , तर तुम्ही जरुर म्हणा.
मढे या शब्दाचा डिक्शनरी अर्थ मृतदेह इतकाच आहे. मला संस्कृत मराठीपेक्षा सामान्य मराठी आवडते. म्हणून मी असे शब्द वापरतो. मढे शब्द मी वापरला याचा अर्थ मला त्याबद्दल अनास्था आहे, असा अर्थ काढायचा कुणालाही अधिकार नाही.
कितीतरी लोक जिवंत असताना सुद्धा लोकांच्या उपयोगी पडत नाहीत.
याची जाणीव आहे, म्हणूनच माझे मढे जमिनीत मिसळून सूक्ष्मजीवांनी त्यांचे कार्य करावे, ही माझी इच्छा आहे. बाबा आमटेंच्याही मृतदेहाचे त्यांच्या इच्छेनुसार दफन केलेले आहे. महात्मा फुले यांचीही त्यांच्या पार्थिवाचे दफन करावे, ही इच्छा होती. ( त्यांचे काय झाले ते माहीत नाही. ) . तलाश सिनेमातही तो येडा आमीरखान झाडाखालून करिनाची लाश काढून पुन्हा जाळून टाकतो, तेंव्हा मी त्याला मनोमन खूप शिव्या घातल्या होत्या. इतकं छान नदीकाठी फुलांच्या झाडाखाली मला पुरणार असतील तर मी आनंदानं धर्म बदलीन.
( या प्यारेग्राफात मढे, मृतदेह , पार्थिव, लाश हे सारे शब्द एकाच अर्थाने वापरलेले आहेत, याची कृपया नोंद घ्यावी. )
7 Dec 2013 - 12:45 pm | विद्युत् बालक
बदला न मग कोणी अडव्लेय ?
बाकी धर्मांतर केलेल्या माणसाला निधर्मी म्हणू शकतो का?
7 Dec 2013 - 12:57 pm | सुबोध खरे
अर्थ एकच असतो पण एखाद्या वेश्येच्या मुलाला अनौरस संतती आणि हरामजादा म्हणणे यात जेवढा फरक आहे तेवढाच आहे.
पेरिले ते उगवते, बोलण्यासारिखे उत्तर येते
मग कर्कश बोलावे काय निमित्य
असो आपले विचार आपल्यापाशी.
7 Dec 2013 - 1:26 pm | वेताळ
आपल्या धर्मात दोन्ही करण्याची मुभा आहे.
7 Dec 2013 - 2:15 pm | प्रभाकर पेठकर
शब्दाशब्दाशी सहमत.
7 Dec 2013 - 7:44 pm | विकास
शवाबद्दल आदर बाळगावा
शवाबद्दल आदर बाळगणे हे कुठ्ल्याही सुसंस्कॄत व्यक्तीत आणि समाजात दिसते.
मरणान्तानी वैराणी निवृत्तम नः प्रयोजनम।
क्रियतामस्य संस्कारो ममाप्येष यथा तव।।
मला वाटते बिभिषणास आणि लंकेच्या जनतेस उद्देशून): (शत्रूस) मरण आले आता त्याच बरोबर शत्रूत्व (वैर) देखील संपले. आता तो (रावण) माझा देखील आहे जसा तो तुमचा.
ओसामाला मारल्यावर त्याची समाधी होऊ नये म्हणून "बरीअल अॅट सी" केले गेले पण मुल्लाकडून विधिवत. तेच कसाबचे केले गेले आणि तेच अफजल गुरूचे देखील...
13 Dec 2013 - 4:08 pm | प्रसाद गोडबोले
बाकी सगळं ठीक , पण
>>> ह्या बाबत फुल्ल डाऊट आहे ... हे जाता जाता नोंदवत आहे .
6 Dec 2013 - 3:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
१.
( आणि तसेही, मेडिकल कॉलेजात विद्यार्थी होऊन एका मढ्याला त्रास देऊन झालेला आहे. Smile आता पुन्हा स्वतः मढे होऊन अजून पाच विद्यार्थ्याना त्रास द्यायची इच्छा नाही. Smile )
हे वाक्य देहदान अथवा अवयवदान या सारख्या फार उपयोगी आणि स्त्युत्य गोष्टींबद्दल सर्वसाधारण लोकांत गैरसमज आणि वैचारीक गोंधळ निर्माण करणारे आहे. केवळ "गम्मत (?!)" म्हणूनही असे करणे एका वैद्यकीय व्यावसाईकाकडून तरी अपेक्षित नव्हते.
याबतीत "प्रभाकर पेठकर" यांच्या प्रतिसादाशी १००% सहमत
२. दहन-दफन या विकल्पांबद्दल "बाळ सप्रे" यांनी किमान शब्दात चपखल प्रतिसाद दिला आहे.
त्यांत अजून थोडी भर अशी की माणूस म्हटला म्हणजे त्याच्या इछा-भावना आल्याच... मग त्या मेलेल्या माणसाच्या असो अथवा त्याच्या जिवंत नातलगांच्या. सभ्य समाजात माणसाच्या प्रेताला केवळ एक बिघडलेली, बंद पडलेली अथवा टाकावू गोष्ट समजली जात नाही, ते याकरताच. युद्धात मारलेल्या शत्रूचे प्रेतही सन्मानाने वागवले जाते तेही यासाठीच. तेव्हा भावनांना "योग्य तेवढे" (आणि केवळ तेवढेच) महत्व देऊन जशी इच्छा असेल तशी आणि जसे जमेल तशी प्रेताची विल्हेवाट लावण्याचे स्वातंत्र्य भारतिय घटनेने सर्व नागरिकांना दिलेले आहे. त्या कृतिचा काही बेकायदेशीर, व्यक्तीविघातक अथवा समाजविघातक परिणाम झाला तर सद्याचा कायदा त्या बाबतीत कारवाई करायला सक्षम आहे. यात धर्म मध्ये आणून वाद घालणे म्हणजे वितंडवादच होईल.
३. लाकडे जाळणे आणि दफनाने जमीन व्यापणे अथवा दूषित करणे यापेक्षा विद्युतदाहिनी हा एक चांगला पर्याय हल्ली शहरांत उपलब्ध असतो.
6 Dec 2013 - 3:31 pm | आनन्दा
दहन केल्यानंतर त्या देहाची झालेली "राख" नातेवाईकांना तत्काळ पहायला मिळते, आणि तुम्ही ज्या व्यक्तीसाठी इतका शोक करत आहात, त्या देहाचे आताचे अस्तित्व केवळ "माती" एव्हढेच आहे, या भावनेने माणूस दु:खातून लवकर सावरतो असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे.
6 Dec 2013 - 3:33 pm | बॅटमॅन
सॅड बट ट्रू...विशेषतः मृतदेहाची राख सुपले घेऊन सावडताना जे वाटते ते शब्दात सांगणे अशक्य आहे.
6 Dec 2013 - 4:46 pm | प्यारे१
पटलं. खालचा माहितगार ह्यांचा प्रतिसाद देखील आवडला.
बाकी अवयव/ देहदानांमध्ये वैद्यकिय महाविद्यालयांमध्ये सुद्धा योग्य तर्हेनं वापर केला जात नाही असं ऐकिवात आहे. वैद्यकिय महाविद्यालयं जनरली ट्रस्ट किंवा सरकारी इस्पितळांशी संलग्न असतात नि त्यांचा कारभार बर्यापैकी भोंगळ असतो.
मध्ये स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणी डॉ. मुंडेनी मृत भ्रूणांची विल्हेवाट लावायला कुत्री पाळली होती असं ऐकलं आहे. तसाच प्रकार अवयवांचाही होतो (भटके कुत्रे व्हिसेरा खाणं इ.इ.) असं बातम्यांमध्ये बघितलंय.
दहनानं व्यवस्थित 'माती' होते. दफन केल्यावर त्याच जागी दुसर्या मृतदेहाचं दफन होतं का? भावनिक गुंता होत असल्यानं विरोध होत असेल का?
बाकी पारशी लोकांसारखं नैसर्गिक विल्हेवाट लावणं ह्या प्रकारासाठी शहरां मध्ये हल्ली गिधाडं अथवा मांसाहारी शिल्लक नाहीत असंही ऐकलं आहे.
7 Dec 2013 - 11:26 am | उद्दाम
दफन केल्यावर त्याच जागी दुसर्या मृतदेहाचं दफन होतं का?
होय. जर त्यावर कायमस्वरुपी शिभ्वंत शिळा वगैरे नसेल, तर पुन्हा तिथेच उकरुन १०-२० वर्षानी नवी मढी पुरता येतात . मध्यंतरी मोहम्मद रफी, मधुबाला यांच्या कबरी नष्ट केल्या गेल्या अशी काहीतरी बातमी वाचली आहे.
7 Dec 2013 - 11:27 am | उद्दाम
कायमस्वरुपी शोभिवंत शिळा
6 Dec 2013 - 3:32 pm | प्रसाद गोडबोले
अंत्य संसाराबाबत आपली तर वैयक्तीक इच्छा ही आहे =))
6 Dec 2013 - 3:34 pm | बॅटमॅन
=)) धन्य _/\_
6 Dec 2013 - 10:54 pm | अनुप ढेरे
आणि परत जिवंत झाल्यावर एलिझाबेथ हर्ली मिळणार... मजाच मजा...
6 Dec 2013 - 4:20 pm | माहितगार
इतिहास पुर्व काळातील उत्खनात दफनविधीच होत असे असे पुरातत्व पुराव्यांवरून दिसून येते पण नंतर केव्हातरी दहन संस्कारांची सुरवात झाली.भारताच्या काही भागात गंगेत सोडून दिले जात असे.तर मंगोलीयात म्हणे उंच डोंगरांवर मोकळेच सोडले जाते आणि पक्षी हे मृत मानवाचे मांस खातात. हे पक्षी बाकी कुठे कुठे स्थलांतरीत होऊन मेल्यानंतर इतर प्राण्यांच्या अन्न साखळीत जाऊन माणसांकडे साथीचे आजार परत आणू शकत असणे कसे नाकारणार ?
१) दहन केल्या नंतर बरेच संसर्गजन्य आजाराचे जिवाणू विषाणूंचे मातीत पुन्हा मिसळले जाणे कमी होत असावे. दफन प्रकारात जिवाणू विषाणूंचे काही वर्ष/दशक/शतकांनतर दुसर्या प्राण्यांच्या अन्न्साखळीत जाऊन मानवापाशी पुन्हा परतू शकतात
२) दफन प्रकारातही दफनपेट्या आणि जागेची किमंत या बाबी बर्याच महागड्या ठरून दफनविधी लग्नखर्चापेक्षाही महागडे होतात असे ऐकून आहे.
6 Dec 2013 - 4:38 pm | वेताळ
तुम्ही जी चर्चा घडवुन आणत आहात त्यातील कोणता प्रकार तुम्ही अबलंबणार आहात. कारण हिंदु धर्म पध्दतीत दहन व दफन दोन्ही गोष्टी केल्या जातात.मेल्यानंतर काय करावे हे ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न असतो.तुम्ही तुमच्या म्रुत्युप्रत्रात तसा उल्लेख करा म्हणजे झाले.
(संपादित)
6 Dec 2013 - 5:10 pm | जेपी
विल्हेवाट नीट लावली जात नाही . आमच्याइथे देहदान केलेल्या व्यक्तीचे देह गच्चीवर आणी पाण्याच्या ड्रमात सडायला ठेवले . बातमी फुटल्यावर अभ्यासासाठी असे केल्याच्या दावा केला . एक ही अवयव काढला नाय
7 Dec 2013 - 1:17 pm | उद्दाम
देहदान केलेला देह मेडिकल कॉलेजात अनेक पद्धतीनी वापरतात. फॉर्म्लिन ट्यांकात घालून ठेऊन डीसेक्शनसाठी वापरणे, त्यातील मांस लवकर नष्ट करुन त्याचा केवळ बोनसेट करणे, सरफेस मार्किंग शिकण्यासाठी देह वाळवून वापरणे , एखादा अवयव चांगल्या तज्ञाकडून डिसेक्शन करुन तो पार्ट परिक्षेला ठेवण्यासाठी वापरणे, म्युझियमम्ध्ये ठेवण्यासाठी स्पेसिमेन तयार करणे इ इ .
डिसेक्शनसाठी संघाच्या 'आरम' अवस्थेत वारलेले देह अधिक उपयोगी पडतात. देह पाचपन्नास ठिकाणी सांध्यात वाकून मेलेला असेल तर नव्या मुलाना डिसेक्शन करणे अवघड जाते. शिवाय आतील अवयवांची रिलेटिव्ह पोझिशन समजून घेणेही अवघड बनते.
7 Dec 2013 - 1:20 pm | उद्दाम
आरम म्हणजे पाय एकमेकांपासून थोडेसे दूर ठेवलेले.
( आणि हात मात्र अंगालगत असावेत, मागे बांधलेले नव्हेत. )
6 Dec 2013 - 5:16 pm | राही
महानुभावांतही मृतदेह जमिनीत पुरण्याची पद्धत आहे/होती.
ऊर्जेचा वापर आणि व्यय कमीत कमी होईल अशा पद्धतीने दहन व्हावे असे वाटते.
6 Dec 2013 - 5:40 pm | मृत्युन्जय
सहमत आहे. गंमत म्हणून कोणी काय लिहावे याला थोड्या मर्यादा हव्यात. एखाद्या कारकूनाने लिहिले असते तर ठीक होते. डो़टरच्या तोंडी शोभत नाही. "पाणी नाही तर आता काय मुतु का?" हे एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या तोंडी शोभत नाही तसेच. असो. तो वेगळा मुद्दा. एका डो़क्टरसाठी संवेदनाहीन असला तरी त्यांनी विनोद करायचा प्रयत्न केला होता हे स्पष्टीकरण ग्राह्य धरुन सोडुन देउयात.
बाकी दहन करण्याच्या पद्धतीतत लाकडे वाया जातात हा प्रॉब्लेम आहेच. त्यासाठी दफन सुरु करणे हा रोगापेक्षा इलाज जालीम प्रकार वाटतो. भारताची लोकसंख्या आणि जागेचा अभाव लक्षात घेता १० वर्षांनी तीच जागा परत वापरता येइल असे गृहीत धरुनही प्रचंड जागा लागेल. ते बॉर्डर मधले "इतनी लाशी गिरा दुंगा की तुम्हारे देश की जमीन कम पडेगी" वगैरे डायलॉग आठवला. हे असले उफराटे उद्योग करण्यापेक्षा विद्युत दाहिन्यांची सोय करणे जास्त योग्य राहिल.
शिवाय ब्यांमॅ म्हणतात त्याप्रमाणे हस्तिदंती शवपेटी, लाकडी शवपेटी, प्लॅटिनम शवपेटी वगैरे असले प्रकार सुरु होतील. शिवाय मोठ्या माणसांच्या मढ्यांचे चोचलेही मोठे याप्रमाणे त्यांच्यासाठी खाजगी दफनभूमी, एक बेडरुमचा बंगला वगैरे प्रकार सुरु होतील (पिरेमिड त्याचीच पुढची आवृत्ती).
6 Dec 2013 - 7:27 pm | पुष्करिणी
दफनाचा अजून एक प्रॉब्लेम म्हण्जे मोठ्या लोकांच्या दफना नंतर समाध्या बनायला लागतील, परत जे पुतळ्यांच्या बाबतीत होतय आजकाल तसंच कबरींबाबतही होण्याची शक्यता आहे; मग त्यावरून दंगे, मारामार्या ; महागड्या शवपेट्यांत काही ऐवज सापडतो का ते बघायला चोरांकडून शवपेट्या उचकणे; इ. गोष्टींसाठी कबरींना संरक्षण इ. इ.
मी राहते तिकडे चर्चच्या दफनभूमीत दफन करण्यासाठी त्यांची जीवन्भर त्या चर्च्मधे मेंबर्शिप घेतलेली असते आणि मृत्यूनंतर जवळच्या नातवाईकाला पुढील ३५ वर्ष त्या कबरीची काळजी ( स्वच्छता, फूलं वगैरे ठेवणं दर रविवारी इ. )घेणं बंधनकारक असतं. आणि ही जागा ३५ वर्ष वापरण्यासाठी दरमहा काही रक्कम जीवनभ्र द्यावी लागते. हे फार खर्चिक आहे ( दफन किंवा दहन काहीही असलं तरी शवपेटी असतेच ); त्यामुळे ख्रिश्चन लोकंसुद्धा आजकाल दहनच करतात इकडे आणि मग नातेवाईक मृत व्यक्तीच्या इच्छेनुसार उरलेली रक्षा घरात दिवाणखान्यात सुबक भांड्यात ठेवतात अथवा आवडत्या जागी नेउन विखुर्तात.
6 Dec 2013 - 6:30 pm | गवि
जाळण्यापेक्षा पुरणे हा उपाय तुलनेत कमीतकमी टप्प्यांमधे निसर्गाला शरीरातली मूलतत्वे परत देणारा उपाय आहे. पण जागेचा प्रश्न आहेच.
पण समजा मृत्यूनंतर काही संवेदना शिल्लक राहात असेलच (बाहेरुन मोजता येणारी किंवा दिसणारी नसली म्हणून आतून नसेलच असं ठाम म्हणता येत नाही आणि ते जिवंतपणी कळणं अशक्य.) अशा वेळी पूर्णपणे अंत होणे असं काही व्हायला वेळ लागत असेल तर जे आहे ते लवकर जाळून मोकळं केलेलं बरं.
6 Dec 2013 - 7:35 pm | सुबोध खरे
आमचे सासरे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी जळणाच्या गैसवर मृतदेह जाळण्याची प्रणाली विकसित करून ती बर्याच सरकारी स्मशानभूमी मध्ये बसविली आहे. यात पनवेल, लातूर बार्शी इ महापालिका येतात. यात एका माणसाला पूर्ण जाळण्यासाठी एका सिलिंडर चा खर्च येतो. व्यवसायिक सिलिंडर साधारण नऊशे रुपयात मिळतो.(सरकारने जर सबसिडी चा सिलिंडर दिला तर हेच काम ४४० रुपयात होऊ शकेल) यात एकावेळेस आठ ते बारा सिलिंडर वापरले जातात म्हणजे मध्येच गैस गेला आणि पार्थिवाचे अर्धवट दहन झाले असे होत नाही.
या खर्चात धूर काजळी न होता कमीत कमी प्रदूषणात स्वच्छपणे हे काम होते. आपल्याला किती पातळीपर्यंत जाळायचे आहे त्यावर पूर्ण नियंत्रण ठेवता येते. पूर्ण भस्म करायचे कि अस्थि शिल्लक ठेवायच्या ते आपल्यावर आहे. तसे लिहून दिल्यावर अस्थि मिळण्याची व्यवस्था होते.
यात अजूनही सर्व लोक सहभागि होत नाहीत. बर्याच लोकांना लाकडाच्या तिरडीवर जाळणे पसंत आहे. असो समाज प्रबोधन केल्यावर त्याला जास्तीत जास्त मान्यता मिळेल.
दफनभूमी मध्ये दफन करण्यासाठी याहून जास्त खर्च येतो. याचे कारण शहरात दफनभूमी साठी जागा कमी पडत आहेत. सर्वसाधारण दफन भूमीतील पार्थिव विशिष्ट कालावधी नंतर उकरून काढले जाते आणि त्या जागी दुसर्या पार्थिवाची सोय केली जाते. जर आपल्याला आपल्या नातेवाईकाचे थडगे उकरू नये वाटत असेल तर त्या धर्माच्या दफनभूमी ट्रस्ट ला पैसे मोजावे लागतात.
जर हिंदू लोकांनी दफन करायला सुरुवात केली तर सर्वच लहान मोठ्या शहरात अशी परिस्थिती उद्भवेल असे वाटते.
6 Dec 2013 - 7:58 pm | अनिरुद्ध प
वाचना नुसार विद्युत दाहिनी हा सर्वात कमी खर्चिक प्रकार आहे आणि वर एका प्रतिसादात म्हट्ल्या प्रमाणे तो जर सौर उर्जेवर चालवला तर अजुनही खर्च कमी होण्याची शक्यता आहे.
6 Dec 2013 - 10:44 pm | अत्रुप्त आत्मा
@जळणाच्या गैसवर मृतदेह जाळण्याची प्रणाली विकसित करून ती बर्याच सरकारी स्मशानभूमी मध्ये बसविली आहे. >>> वैकुंठ स्मशानभूमी(पुणे) इथे निकतीच अशी दाहिनी कार्यान्वित झाली आहे. पण ती बहुतेक गोबरगॅसवर आहे.
6 Dec 2013 - 10:46 pm | अत्रुप्त आत्मा
हो! आणी मी सुद्धा दहन'च योग्य समजतो. कालमानानुसार...विद्युत/गॅस दाहिनी वरील.
7 Dec 2013 - 9:44 am | चौकटराजा
बाडीस ! ( काये रे जुन्या मिपाकरानो शब्द बराबर हाय ना ? )
7 Dec 2013 - 8:20 pm | सुबोध खरे
गैसवर मृतदेह जाळण्याची प्रणाली तयार करणारे बरेच लोक भारतात आणि जगात आहेत.शिवाय त्यात एक तासात मृताच्या नातेवाईकांना अस्थि देता येतात. त्यात मृताच्या नातेवाईकाला स्वतः अग्नी देता येतो. (हि सोय विजेच्या प्रणालीत आहे काय हे मला माहित नाही). दोनही प्रणाल्या एक हजार सेल्सियस पेक्षा जास्त तापमानाला चालत असल्याने कोणताही धूर आणि प्रदूषण होत नाही. फक्त कार्बन डाय ओक्साईड आणि वाफ हा हवेत ३ मीटर उंचीवर धुराड्याने सोडला जातो(प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियमाप्रमाणे).
एल पी जी वर चालणारी प्रणाली हि विजेवर चालणार्या प्रणाली पेक्षा बरीच कमी खर्चाची आहे. एल पी जी वर चालणारी प्रणाली हि १२ ते १४ किलो गैस वापरते म्हणजे सहाशे ते सातशे रुपये खर्च येतो. हा खर्च दफनापेक्षा खूपच कमी आहे.
दफन करण्याचे नक्की काय कायदे आपल्याकडे आहेत ते माहित नाही परंतु फारसे कोणी खोलवर दफन करीत नाहीत. त्यामुळे संसर्गजन्य रोगांचे जंतू आणि प्रदूषण करणारी द्रव्ये( कीटक नाशके इ) भूजलात(ground water) मिसळून प्रदूषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर नदीकाठी किंवा विहिरींच्या जवळ पुरत असतील तर हि शक्यता अगदी नक्कीच आहे.
हा सर्व विचार वास्तववादी आहे पण एखादया माणसाच्या धार्मिक श्रद्धांपुढे खर्च हा मुद्दा अतिशय गौण आहे. दहनासाठी ६०० व दफनासाठी अगदी सहा हजार जरी खर्च येत असेल तरी माणसाच्या आयुष्याच्या किमतीपेक्षा हि किंमत काहीच नाही.
(एक दिवस हॉटेलात राह्लात तरी एवढा खर्च येतो.)
6 Dec 2013 - 7:52 pm | विकास
चर्चेतील प्रश्न एकतर्फी आहे. वर आधी एका प्रतिसादात त्या संदर्भात म्हणलेले आहेच. पण जर एखाद्या मुस्लीम अथवा ख्रिस्ती व्यक्तीस दहन करायचे असेल तर ते भारतात शक्य आहे का? कदाचीत याच्या मुळाशी पण समान नागरी कायदा नसणे हे असू शकेल. आज अमेरीकेत अनेक ख्रिस्ती (गोरे) लोकं अगदी त्यातील कॅथलीक्सपण दहन करणेच पसंद करतात, कारण कदाचीत खर्च असेल आणि तसेच काहींच्या बाबतीत पर्यावरणवादी असणे देखील असेल.
7 Dec 2013 - 1:04 am | खटपट्या
जर कोणी मुस्लिम किवा ख्रिश्चन त्यांच्या नातेवाईकांचे दहन करू इच्छित असेल तर तर त्यांना कोणी अडवेल असे वाटत नाही. कारण बहुतेक स्मशान भूमी स्थानिक महापालिकांच्या ताब्यात आहेत. आणि तिथे फक्त हिंदुनीच यावे असा नियम असेल असे वाटत नाही.
6 Dec 2013 - 8:05 pm | विवेकपटाईत
१.पेतांची जाळून अन्तक्रिया करणे ही सर्वात उत्तम विधी आहे. स्मशानात एका प्लेटफार्म (१०x १० फूट) वर वर्षात ८० - १०० प्रेतांची अन्तक्रिया करता येते. जर हिंदुधर्मात दफन विधी असती तर दफन भूमी साठी जागा उपलब्ध करणे अशक्य प्राय झाले असते. कल्पना करा दरवर्षी ८०-१०० प्रेतांसाठी किती जागा लागेल.
२. लाकडांची कमी जास्त झाडेलाऊन पूर्ण केल्या जाऊ शकते. विजेवर चालणारे स्मशान ही बांधता येतील. एकट्या दिल्लीतील ५० लाख वाहने एका महिन्यात जेवढे पेट्रोल जाळतात. तेवढ्या उर्जेवर देशातल्या सर्व प्रेतांची अन्तक्रिया होऊ शकते.
३. दफन साठी जागेची मागणी वाढत चालली आहे. शिवाय समाजातले श्रीमंत आणि उच्च लोक थडगी ही बांधणारच. दफनभूमीच्या जागेसाठी आपल्या देशात पुष्कळ ठिकाणी वाद होतात. त्यात बहुसंख्यक समाजाने ही प्रेतांना दफन करणे सुरु केले तर निर्माण होणार्या परिस्थितीची कल्पना करणे अशक्य.
४. युरोप मध्ये विशेषत: UK इथे आता लोक जागेच्या कमतरतेमुळे प्रेतांना जाळू लागले आहेत.
५. शिवाय प्रेतांची चोरी इत्यादी प्रकाराना जाळल्या मुळे आळा बसतो.
६. संपूर्ण शरीर दान दिले तरी ही, गरज नसलेल्या शरीराच्या भागांना जाळूनच नष्ट केल्या जाते.
७. शेवटी दफन करण्याचा खर्च जाळण्यापेक्षा कित्येकपट जास्त असतो.
८. आरोग्याच्या दृष्टीने ही जाळणे उत्तम.
7 Dec 2013 - 6:52 am | मुक्त विहारि
विशेषतः
"शिवाय ठराविक काळ ८-१० वर्षे वगैरे गेला की त्याच जागेत पुन्हा पुन्हा दफन होऊ शकते."
हा तर एकदम योग्य....
असो....
7 Dec 2013 - 9:42 am | अत्रन्गि पाउस
व्यावहारिक बाजू (जागा/खर्च/पर्यावरण) वगैरे हा एक भाग झाला ..
परंतु हिंदू अन्त्यासंस्कारांचा जो दृश्य परिणाम आहे तो मी आधी म्हटल्या प्रमाणे 'भेसूर' वाटतो...भडक्क वाटतो ..
मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांचे वियोगाचे दुखः + इतक्या सार्या प्रोटोकोल चे ओझे अति होत असावे..त्यात काही बदल करणे धुरिणांना शक्य नही का?
त्या मानाने ख्रिश्चन अंत्यसंस्कार (३ इदिओत , प्रहार सिनेमात बघितलेले) फार सौम्य आणि दिलासा दायक वाटतात.
माझ्या एका जैन मित्राच्या आईच्या अंत्यसंस्कार प्रसंगी पहिले कि १ -२ हार घालून घरून तडक विद्युत दाहिनीत नेले..सर्व उपस्थित 'नमो अरीहान्ताय' मंत्र पुटपुटत होते..बस्स इतकेच..तिथेही औपचारिकता कमी असल्याने ताण कमी जाणवत होता...
7 Dec 2013 - 12:30 pm | राही
आजकाल निदान मुंबईतल्या मराठी सुशिक्षित वर्गात तरी असेच करतात. मृत व्यक्तीला बिछान्यावरून उचलून खाली चटईवर किंवा चादरीवर ठेवतात. (अलीकडे नुसत्या जमिनीवर ठेवत नाहीत.) आंघोळ वगैरे घालीत नाहीत. सर्व नातेवाईक आले आणि खाली तिरडी बांधण्याचे काम पूर्ण झाले की प्रेत खाली आणून थोडा वेळ तिरडीवर ठेवतात. घरात कोणाचे हार वगैरे घालायचे राहिले असतील तर इथे घालतात. शेवटचा नमकार वगैरे घरातच होतो. तिरडी लगेचच उचलली जाते. स्मशाने दूर असतात आणि रस्त्यावरच्या गर्दीतून अंत्ययात्रा नेणे कठीण असते, म्हणून शववाहिका बोलवली जाते. स्मशानातले विधीही आटोपशीर असतात. धनिक कच्छी दात्यांच्या कृपेने आणि महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईतली पुष्कळशी स्मशाने स्वच्छ आणि सुविधायुक्त असतात. बाग असते, हिरवळ असते, बसायला बाके असतात, आंघोळीसाठी स्नानगृह, स्वच्छतागृहही असते. शंकराचे छोटेसे देऊळ असते, कुठेकुठे दशक्रियाविधीसाठी छोटासा हॉल किंवा चौथराही असतो. प्रसन्न वातावरण असते.
7 Dec 2013 - 2:51 pm | अर्धवटराव
मेलो =))
7 Dec 2013 - 3:22 pm | प्यारे१
मी दहावीचा अभ्यास पाचगणीच्या हिंदू स्मशानभूमीत केला आहे.
लई भारी आहे. खरंच प्रसन्न वाटतं.
- दहावीला ८९ टक्के मिळून नंतर एक्स्पोनेन्शियल डिके कर्व्ह वाला ;) प्यारे
7 Dec 2013 - 3:37 pm | विद्युत् बालक
सामान्यतः दहावीत गुण मिळवणारे हे बारावी किंवा अभियांत्रिकीला जोरात आपटतात !
----दहावीत ७९ गुण मिळवून बारावीत व अभियांत्रिकीला असेमटोटिक कर्व्ह वाला --बालक
7 Dec 2013 - 3:41 pm | विद्युत् बालक
तुम्हाला बहुतेक दहावीच्या पेपरात कोण्या पिशाच्या ने मदत केली असेल
पुढे पण तुम्ही तिथेच अभ्यास करायला हवा होता :)
सामान्यतः दहावीत गुण मिळवणारे हे बारावी किंवा अभियांत्रिकीला जोरात आपटतात !
----दहावीत ७९ गुण मिळवून बारावीत व अभियांत्रिकीला असेमटोटिक कर्व्ह वाला --बालक
7 Dec 2013 - 3:57 pm | अर्धवटराव
धावीला असता कंची फीहेचडी केली म्हन्न्ता...
7 Dec 2013 - 6:28 pm | प्यारे१
अहो कसलं काय?
रट्टा मारायचं तेवढं जमायचं तेव्हा. नंतर काहीच जमेना ;)
असो, दहन केलेले नि दफन झालेले असे दोन्ही साईडचे आत्मे कावतील. =))
7 Dec 2013 - 6:45 pm | यसवायजी
:))
आत्मा कावतोय गा ग्रुप.
7 Dec 2013 - 3:27 pm | राही
निदान भेसूर तरी नसते. मृताच्या जवळच्या नातेवाईकांचे दु:ख हलके होईल इतपत प्रसन्न वातावरण असते. आणि तसेही, अगदी जवळचे नातेवाईक सोडून बाकी गर्दीमध्ये गांभीर्य नसतेच. आपल्याकडे लोक शांततेने उभे राहू शकत नाहीत. त्यांना काही ना काही तरी बोलायला/चघळायला हवे असते. फक्त ती हलकी कुजबूज असते इतकेच. एखादा बरासा तरूण मुलगा दिसला तर कोण,कुठला अशी स्थळविषयक चौकशीसुद्धा होते. 'स्मशानशांतता' हा शब्द आता कालबाह्य होऊ घातला आहे.
7 Dec 2013 - 4:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्मशानशांतता आता तशी गेली आहे. जवळचे नातेवाईक मित्र तेवढे दु:खी असतात बाकीचे औपचारिकता किंवा हजेरी लावणारे असतात तसे ते बळजबरी आल्यासारखे वाटतात. बाकी,स्मशानात आता फुलझाडे, आरामशीर टेकून बसायला बाके वगैरे असतात तेव्हा प्रसन्न वातावरण असते याच्याशी सहमत. हलक्या फुलक्या गप्पा, लक्षात येईल असे खदखदुन हसणारेही पाहिले आहेत.
-दिलीप बिरुटे
7 Dec 2013 - 4:12 pm | अर्धवटराव
स्थळाच्या चौकशीचं कौतुक वाटलं.
7 Dec 2013 - 5:42 pm | यसवायजी
सगळ्यात नावडता प्रकार म्हणजे मंगळसुत्र तोडणे/बांगड्या फोडणे..
विधवा स्त्रीची त्यावेळची मानसीक अवस्था पाहता हा खुपच भयानक प्रकार वाटतो.
7 Dec 2013 - 12:08 pm | तुमचा अभिषेक
आत्मा मोक्ष मुक्ती वगैरे वगैरे खुळचट(??) कल्पनांमधून सर्वच समाज (मग तो कोणत्याही धर्माचा असो) एकाचवेळी बाहेर पडू शकत नसल्याने असे पर्यायी मार्ग सुचले तरी ते अंमलात किती प्रमाणात येतील हा एक प्रश्न किंवा अडसर असल्याने शेवटी हि चर्चा कागदावरच राहणार.
माझे म्हणाल तर माझ्या मरणाच्या वेळी समाज आजच्यास्थितीपेक्षा फार पुढे गेला नसेल तर माझा देह दान करायलाच आवडेल. त्यातून जे मिळेल ते मिळेल, त्याउपर त्याची विल्हेवाट कोणीही कशीही लावली तरी माझा आत्मा तळमळणार नाही.. किंबहुना तळमळायचे नाही असे मी आधीच स्वताच्या आत्म्याला बजावले आहे.
7 Dec 2013 - 4:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीपूर्ण चर्चा. वाचतोय.
-दिलीप बिरुटे
8 Dec 2013 - 2:17 pm | भाग्यश्री कुलकर्णी
आमच्यात म्हणे बायका स्मशानभुमीत जात नाहीत. कदाचित प्रिय व्यक्तीचा विरह, स्त्री तिच्या कोमलस्वभावामुळे बघु शकत नाही ही धारणा असावी.पण आपली व्यक्ती दुर जाताना दारातुनच इतरांच्या खांद्यावर सोपवताना आपणही अजुन थोडावेळ त्याच्या पार्थिवदेहाकडे बघावे वाटतेच ना.आणी त्या व्यक्तीच्या देहाला अग्नी द्यायला बाईला अधिकार नाही.त्या वेळी भांडण्यापेक्षा दारातुन निरोप घेणेच इष्ट असे वाट्ते.असो. काहीसे अवांतर आहे हे.पण.... बाईचे मंगळसुत्र काढुन त्यातला मणी तिच्या नवर्याच्या तोंडात घालतात.आपले माणुस गेल्याचे दु:ख आणी त्यात या विधींचे अवडंबर....... नको वाटते हे सर्व.......
8 Dec 2013 - 2:46 pm | पैसा
भाग्यश्री....
8 Dec 2013 - 3:06 pm | बॅटमॅन
ती एक मूर्खपणाची प्रथा आहे. समजा कुणा स्त्रीला जावे वाटले तर गैर काय त्यात? जायला नको वाटत असेल तर ठीके पण वाटत असेल तर इतरांनीही बाऊ करता कामा नये.
अवांतरः स्मशानात गेल्यावर काय वाटते हे शब्दात सांगू शकत नाही- विशेषतः मृतदेहाची राख पोत्यात भरताना. इतकी वर्षे आधार म्हणून वाटत असलेल्या व्यक्तीच्या देहाची राख अशी सावडताना मृत्तिकेत्येव सत्यम् हे जाणवत राहते पदोपदी. काळाप्रमाणे अर्थातच हा सुन्नपणा पुढे कमी होतो पण आठवणी राहतात खर्या.
8 Dec 2013 - 3:50 pm | प्रसाद गोडबोले
मलाही लहानपणी असंच वाटायचं , मग नंतर काही वेळा स्मशानात जायचा 'योग' आला ... एकदातर अगदी माझ्या वयाच्या मित्रासाठी :(
तेव्हा स्मशानवैराग्य हा काय प्रकार असतो ह्याचा अनुभव घेतला आहे ...
कदाव्हित हे असे स्मशानवैराग्य येवु नये म्हणुन बायकांना मनाई असावी बहुतेक ...
8 Dec 2013 - 4:56 pm | बॅटमॅन
स्मशानात मीही गेलेलो आहे. एकदा नैतर दोनदा. पण मनाई करण्यात कै अर्थ नाही असेच वाटते अजूनही. ते पाहून जो कै शॉक बसेल तो हँडल करण्याइतक्या समर्थ नक्की असाव्यात बैका.
8 Dec 2013 - 5:05 pm | बॅटमॅन
विशेषतः गुलाबबाई अमृतलाल त्रिपाठी या महिला किरवंतांबद्दल वाचून तर वरील विचार अजूनच पक्के झाले. वडील किरवंत होते त्यांच्या पश्चात त्यांनी हा व्यवसाय सुरू ठेवला-प्रचंड विरोध सोसून. लै खंबीर स्त्री.
ते एक सोडा, अगदी तेवढे नसले तरी असले बिनबुडाचे नियम तरी किमान काढावेत असे वाटते.
8 Dec 2013 - 11:30 pm | अत्रुप्त आत्मा
@ विशेषतः मृतदेहाची राख पोत्यात भरताना. इतकी वर्षे आधार म्हणून वाटत असलेल्या व्यक्तीच्या देहाची राख अशी सावडताना मृत्तिकेत्येव सत्यम् हे जाणवत राहते पदोपदी. >>> अगदी सहमत आहे...
8 Dec 2013 - 3:32 pm | प्यारे१
:( ....
8 Dec 2013 - 3:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
सहमत.
तुम्ही सांगितलेल्या आणि इतर बर्याच बिनबुडाच्या प्रथा प्रत्येक समाजात धर्माच्या नावाखाली वेळोवेळी घुसडल्या गेलेल्या आहेत. पण त्या केवळ प्रथाच असतात. अनिष्ट अथवा केवळ वेडगळ प्रथांना विरोध करून त्या दूर करणे आपणच करायला हवे. हे काम नातेवाईक किती अंधश्रद्धाळू आहेत त्याप्रमाणे कमीजास्त कठीण आहेच. पण सुरुवात केल्याशिवाय ते आपोआप निश्चित होणार नाही.
8 Dec 2013 - 4:01 pm | मुक्त विहारि
पचंड सहमत...
8 Dec 2013 - 11:52 pm | अर्धवटराव
एका नुकत्याच इंजीनीअरींग पूर्ण केलेल्या एका पंजाबी मुलीचे वडील वारले. अंतयात्रेच्यावेळी मुलीची आई बेशुद्ध पडली. मुलीने आईला उचलुन पलंगावर झोपवलं. वडीलांचा अंत्यसंस्कार स्वतः केला, चितेला अग्नी दिला. ( पुढेही अत्यंत हिमतीने त्या मुलीने प्रचंड कष्टाने लहान-सहान नोकर्यांपासुन सुरुवात करत हळुहळु आपलं करीअर व्यवस्थीत सेटल केलं, आपल्या बहिणींच्या शिक्षणाची सोय केली) तिच्या याच गुणांवर एक मराठी मुलगा फिदा झाला व आपलं सर्व आयुष्य तिच्या हाती सोपवुन स्वतः टगेगिरी करायला मोकळा झाला.
आज ति मुलगी अर्धवटराव आणि ज्यु. अर्धवटराव अशा दोन टग्यांना सांभाळत आहे :)
सौ रॉक्स.
9 Dec 2013 - 12:09 am | डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या सौं चे मनःपूर्वक अभिनंदन केवळ स्पृहणिय !
आणि स्वतःची टगेगिरी भर चौकात मान्य केल्याबद्दल तुमचेही ;)
9 Dec 2013 - 9:04 am | पैसा
+१ इस्पिक एक्का!
9 Dec 2013 - 12:26 am | विकास
तुमच्या सौं चे (सौ. आवडाबाईंचे ;) ) खरेच कौतुक आहे! :)
9 Dec 2013 - 1:06 am | अर्धवटराव
आयला... म्हणजे आमचं काहि कौतुकच नाहि होय ??? आपल्याला बिन्धास उडाणटप्पुपणा करायचा असेल तर अशी खंबीर जोडीदारच पाहिजे सोबतीला, हे आम्हि अगदी व्यवास्थीत ओळखलं होतं ;) ... स्वतःच्या पारखी नजरला अगदी दाद देतो मी :D
शिवाय वाघिणीसोबत संसार करणं सोपं नाहि महाराज... :P
9 Dec 2013 - 9:11 am | आनन्दिता
मान गये.... आपकी पारखी नजर और आपकी सौ. दोनोंको.....!!
9 Dec 2013 - 10:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मान गये.... आपकी पारखी नजर और आपकी सौ. दोनोंको.....!!
-दिलीप बिरुटे
9 Dec 2013 - 10:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
-दिलीप बिरुटे
9 Dec 2013 - 12:20 pm | बॅटमॅन
तुमच्या सौंच्या पायाची प्रिंट पाठवून देणे.
9 Dec 2013 - 1:15 pm | अर्धवटराव
चेपुवर आमची थोबाडछवी आहे कि :D
9 Dec 2013 - 2:08 pm | बॅटमॅन
हा हा हा :D
8 Dec 2013 - 4:34 pm | ज्ञानोबाचे पैजार
चर्चा वाचली.
त्यात एक मुद्दा जाणवला की दफन करायला फार जागा लागते. भारतातल्या सगळ्या हिंदु लोकांनी दफन करायचे ठरवले तर जागा कमी पडेल.
इथे आपण गृहित धरतोय की मृतदेह आडवा जमिनीत दफन करायचा.
त्या ऐवजी जर त्याचे उभ्याने दफन केले तर? जागा कमी लागेल.
त्यातही जमिनीत खोल बोअर मारुन एकावेळी एका पेक्षा अधिक मृतदेह कमीत कमी जागेत दफन करता
येतील.
या पर्याया मुळे दहना ऐवजी दफन पर्यावरण पुरक ठरेल का?
9 Dec 2013 - 7:10 pm | अत्रन्गि पाउस
लाटारल ठ्यीन्किंग
11 Dec 2013 - 6:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
पन हे तर "व्हर्टीकल" ठींकींग हाय त्याच काय?
12 Dec 2013 - 6:07 pm | विजुभाऊ
बोअर मारल्यावर पाणी लागले तर ?
12 Dec 2013 - 7:06 pm | उद्दाम
बरं आहे की . आधी ५० वर्षे पाण्यासाठी बोअर वापरायची. मग हाडं कुजुन त्याचं तेल होईल. मग तीच बोअर तेलाची विहिर म्हणून वापरायची.
13 Dec 2013 - 1:33 am | बॅटमॅन
काय बोअर मारताय राव =))
13 Dec 2013 - 1:03 pm | गब्रिएल
मग हाडं कुजुन त्याचं तेल होईल
.आयला, इतकं डोंबलाचं सायन्सचं अज्ञान आहे तर वैचारिक धागा काठायचा आव काय म्हणुन? सरळ जोक, विनोद, टिंगलटवाळी आसा विषय या धाग्याला द्यायचा ना, हाकानाका :)13 Dec 2013 - 1:26 pm | उद्दाम
आमचा धागा चितळे मास्तरच्या शिकवणीगत असतो. इथे गोदीच्या पदरापासून एलफिस्टनच्या स्पेलिंगापर्यंत सगळं ज्ञान- अज्ञान खुलेपणाने चर्चायची परवानगी आहे.
13 Dec 2013 - 2:01 pm | गब्रिएल
म्हंजे तेच. उद्दामपणे केलेला जोक, विनोद, टिंगलटवाळी ; शिरेपना काडिचा न्हाय. खर्का नाय?
13 Dec 2013 - 3:00 pm | अत्रुप्त आत्मा
16 Dec 2013 - 12:13 pm | बॅटमॅन
हे बाकी आवडलं =))
9 Dec 2013 - 12:12 pm | एम.जी.
देहदानासाठी निरोगी शरीरापेक्षा मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स अस्तील तर विद्यार्थ्यांना जास्त ज्ञान मिळते का ?
9 Dec 2013 - 1:20 pm | उद्दाम
नॉर्मल आणि अॅबनॉर्मल दोन्हींसाठी दोन स्वतंत्र विषय असतात. दोन्हीकडे त्याप्रमाणे अवयव लागतात.
9 Dec 2013 - 1:20 pm | प्रभाकर पेठकर
माझ्या माहितीनुसार मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स असणारे, कुपोषित 'बेवारशी' मृतदेह मिळतात पण आरोग्यसंप्पन्न, व्यवस्थित पोषण झालेले देह आणि पर्यायाने आतील अवयव जसे यकृत, हृदय, फुफ्फुसे, मुत्रपिंड इ.इ.इ. महत्त्वाचे शारीरिक भाग प्रत्यक्ष अभ्यासण्यासाठी उपलब्ध होत नाहीत.
9 Dec 2013 - 3:06 pm | म्हैस
सहमत आहे .
कुठेतरी वाचलं होतं . शरीराचा मृत्यू झाला तरी वासनादेह शरीर भोवतीच काही काळ घुटमळत असतो . जाळल्यामुळे तो लवकर पार्थिव देहापासून मुक्त होतो आणि पुढच्या प्रवासाला जातो . म्हणून हिंदू धर्मात जाळण्याची पद्धत आहे
10 Dec 2013 - 9:08 am | उद्दाम
हाच नियम लावायचा झाला, तर सगळे प्राणीही जाळून टाकायला नकोत का? खाण्यासाठी कोंबडी कापली, प्रेत जाळायला झाड कापले तर त्यांच्या आत्म्याचे काय होते?
9 Dec 2013 - 4:33 pm | कवितानागेश
काय ठरलं शेवटी?
9 Dec 2013 - 4:44 pm | प्रभाकर पेठकर
मृतदेह जाळण्यात वृक्ष संपत्तीचा र्हास होतो.
पुरण्यामुळे जमीन कमी पडेल, जंतू संसर्गाचा धोका आहेच.
अवयव दान केले तरी बाकीच्या देहाची विल्हेवाट लावावीच लागते.
विद्युत दाहिनीस भयंकर प्रमाणात वीज लागते. आधीच वीजेच्या कमतरतेने ग्रस्त महाराष्ट्रास उच्च दाबाची वीज वापरणे जरा कठीणच आहे.
गॅस दाहिनी प्रणालीनुसार माणशी एक सिलेंडर, नातेवाईकांनी आपापल्या घरून आणला तरच शक्य आहे.
तेंव्हा सध्यातरी......
मरना मना है।
9 Dec 2013 - 5:20 pm | बॅटमॅन
जर मरना मना है तर जगणे त्याहूनही मना असायला पायजे. सक्तीने नसबंदी प्रोग्र्याम वापरलाच पायजे!
12 Dec 2013 - 1:37 pm | मृत्युन्जय
नसबंडीने जगण्याला मनाई होत नाही. जन्माला घालायला मनाई होते ;)
12 Dec 2013 - 3:31 pm | गब्रिएल
नसबंडीने जगण्याला...
ही बंडी कोंन्ती? डिसेंबर्च्या थंडिला बरियका !12 Dec 2013 - 4:46 pm | मृत्युन्जय
सगळ्या प्रकारच्या थंडी आणि गरमीला उत्तम. आजच घ्या.
11 Dec 2013 - 6:24 pm | म्हैस
कोंबडीच शरीर लगेच नष्ट होता नाही का? लगेच त्याला धुवून बिवून शिजवला जातं . पुरलेल्या मृतदेहाच काही लगेच विघटन होत नाही . वासना देह हा मनुष्यात strong असतो . कारण वासना मनुष्यांना अस्ते. प्राण्यांना , झाडांना नहि. झाडांच्या संवेदना अतिशय क्षीण असल्यामुळे त्यांना अतिशय कमी वेदना होतात . तसेच हि प्रथा जेव्हा सुरु झाली तेव्हा वाळलेली झाडं विपुल प्रमाणात होति कारण हिरवं झाड विनाकारण तोडू नये असं हि हिंदू धर्म शास्त्रांमध्ये सांगितलेल अहे.
12 Dec 2013 - 2:02 pm | उद्दाम
म्हशे, अगं कोंबडी हे फक्त उदाहरण म्हणून होते. रस्त्यावर मांजर मेले, गाडीखाली बेडूक मेला, कावळ्याने चोचीने उंदीर फाडला ... इथे तर ही शरीरे लगेच नष्ट होत नाहीत. मग त्यांच्या आत्म्याचे काय होते?
12 Dec 2013 - 3:27 pm | गब्रिएल
अश्या खंग्री पद्धतिने मर्लेल्या प्रान्याचा आत्मा एकाद्या उद्दाम प्रान्याच्या रुपामद्ये जन्म घेतो ;)
12 Dec 2013 - 7:54 pm | टवाळ कार्टा
=)) =)) =))
12 Dec 2013 - 7:03 pm | उद्दाम
हिंदु लिंगायतांच्यात शरीर पुरतातच की. त्यांचा आत्मा घुटमळत नाही का? एकाच हिंदु धर्मात लिंगायतांना एक पद्धत आणि इतरांना दुसरी प्द्धत , असं डिस्क्रिमिनेशन का आहे ?
12 Dec 2013 - 6:02 pm | म्हैस
सांगीतल ना वासना मनुष्यांना अस्ते. प्राण्यांना , झाडांना नहि. अश्या प्राण्यांचे देह लगेच पुढच्या जन्माला जातात. प्राण्यांना चांगलं वाईट कळण्याची बुद्धी नसल्यामुळे त्यांना पाप पुण्याची भानगड नस्ते.
12 Dec 2013 - 6:35 pm | प्यारे१
+१
मनुष्य शरीर सोडून इतर सगळ्या भोगयोनी आहेत.
12 Dec 2013 - 8:10 pm | सूड
ते मरु देत. डू आयडींनी जालीय आत्महत्या केली तर त्यांचा आत्मा घुटमळतो का?
12 Dec 2013 - 9:29 pm | प्यारे१
आत्महत्याच काय, खून किंवा वध झाला तरी घुटमळतो, मोक्ष लाभत नाही.
एकतर पुनर्जन्म किंवा ह्या लोकावरुन त्या लोकावर....
जाणकार सांगतात ब्वा! आम्हाला माहिती नश्शे! =))
13 Dec 2013 - 12:54 am | अत्रुप्त आत्मा
@ डू आयडींनी जालीय आत्महत्या केली तर>>>
13 Dec 2013 - 12:40 pm | मृत्युन्जय
नुसताच घुटमळत नाही तर धागे पण काढतो.
12 Dec 2013 - 7:02 pm | उद्दाम
वासना असणं नसणं ही एक गोष्ट आहे.
पाप पुण्याची जाणीव ही वेगळी गोष्ट आहे.
प्राण्यांना , झाडाला वासना नसते असं कुणी सांगितलं? वासना असो वा नसो, आत्मा तर असतोच ना?
13 Dec 2013 - 11:31 am | उद्दाम
म्हशे, तुझे हे विचार वाचून एक अभद्र शंका उचमळली बघ .. तू म्हणतेस शरीर नष्ट नाही झालं की आत्मा घुटमळतो. वर काही लोक अवयवदानाचा आग्र्ह करताना म्हणाले आहेत.. की ते मेल्यावर सात अवयव दान करु शकतील म्हणून ... मग असे जर कुणी केलं तर मग त्यांचा आत्मा सात ठिकाणी घुटमळणार का? :)
12 Dec 2013 - 6:09 pm | विजुभाऊ
डास झुरळे ढेकुन , देवीचे जम्तु , शेतातली कीड याचंया आत्म्याचे काय होते?
बोकड ,कोंबडी मारल्यावर तिचे भूत झाले तर ?
12 Dec 2013 - 7:01 pm | परिंदा
त्यांच्या अतृप्त आत्म्यांचे भूत होत असावे. पण जसे माणसाचे भूत माणसालाच झपाटते, दिसते, त्रास देते, इतर प्राण्यांना नाही; तसेच कोंबडी, बकरा यांचे भूत पण कोंबडी, बकरा यांनाच बाधत असावे.
याबद्दल एखाद्या कोंबडी, बकर्याचे मत, अनुभव जाणून घेण्यास उत्सुक आहे. :)
12 Dec 2013 - 7:06 pm | परिंदा
आपण जसे आपल्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी याविषयी धागे काढून वाद्/चर्चा करतो, तसे कोंबडी, बकरा असे प्राणी काय करत असावेत?
त्यांनाही नैसर्गिक मृत्यू यावा असे वाटत नसेल का? :)
13 Dec 2013 - 11:31 am | म्हैस
आत्मा असणं आणि वासना असणं ह्या २ वेगळ्या गोष्टी आहेत . आत्म्याचं मूळ स्वरूप हे शुद्ध , पवित्र ,वासनारहितच अहे. वासना आली कि तिथे पाप आलं . असो हा विषय वेगळा आहे . पण प्राण्यांना वासना असतात हे जर उदाहरणासह सांगाल काय?
13 Dec 2013 - 1:21 pm | उद्दाम
म्हशे, अजुन एक डब्बल अभद्र शंका उचमळली बघ.
एकाच्या शरीरात दुसर्याचा अवयव दान करुन बसवला आहे. काही वर्षे जगून तोही मेला. तर त्याच्या शरीराभोवती दोन आत्मे घुटमळतील का? :) :)
13 Dec 2013 - 3:59 pm | परिंदा
नाही तो होरक्रक्स होईल. हॅरी पॉटरमध्ये हॅरी जसा वोल्डमोन्डचा होरक्रक्स होतो ना तसा. :)
13 Dec 2013 - 3:31 pm | म्हैस
हे त्या आत्म्यावर depend आहे त्याने किती ठिकाणी घुटमळायच . घुटमळनं काही compulsary नहिये.
कसं असतं, बराच वेळ मेलेल्या माणसाला कळतच नाही तो मेलाय म्हणून . आणि कळल्यावर मग त्याला दुख होत. आयुष्यभर माझ माझ म्हणून ज्या गोष्टींवर आपल फार प्रेम असतं ती गोष्ट तुटली , फुटली , हरवली कि आपल्याला दु:ख होता न. मग इतकी वर्ष ज्या शरीराने साथ दिली त्या शरीराला सहज सोडायला आत्मा तयार नसतो. म्हणून तो तिथे घुटमळतो. म्हणून ते शरीर लवकर नष्ट करून टाकणं आवश्यक असत म्हणजे त्याला जास्त त्रास होत नाही . एखादी गोष्ट तुटली कि आपण त्याला पुन्हा जोडून वापरण्याचा प्रयत्न करतो . पण ती खूपच damage झाली तर तिला फेकून देवून आपण विसरून जतो. साधारण तसच