लोकहो,
सध्या मराठी संकेतस्थळांवर सुप्रसिध्द उर्दू शायरांच्या उत्तमोत्तम ग़ज़लांचे "भावानुवाद" करण्याचे पेव फुटले आहे.
या नवीन, 'उमलत्या' अनुवादकांच्या तडाख्यातून ग़ालिबसारखे शायरही सुटलेले नाहीत. नुकतेच एका संकेतस्थळावर आमच्या आराध्य दैवताच्या, म्हणजेच मिर्झा असदुल्लाह खान बेग़ उर्फ 'ग़ालिब' यांच्या अत्यंत नावाजलेल्या ग़ज़लेचा असा भावानुवाद वाचण्याचे भाग्य लाभले.
या नवोदित अनुवादकांच्या लेखनकंडूमुळे, यापुढे ग़ालिब, मीर तक़ी मीर, फ़िराक़ गोरखपुरी, शक़ील बदायुनी , क़तील शिफ़ाई, जिगर मुरादाबादी, फ़ैज़ अहमद फ़ैज़, जोश मलिहाबादी, ख़ुमार बाराबन्क्वी यांच्यावर काय दिवस येतील याची चिंता आम्ही करतो आहोत.
मराठी ग़ज़ल लिहिणार्या एका तथाकथित नावाजलेल्या शायराने क़तील शिफ़ाईच्या काही ग़ज़लांचे असेच 'मराठीकरण' करून त्यांच्या ग़ज़लसंग्रहात छापल्याही आहेत. खरे तर क़तीलच्या ग़ज़लांवर झालेले मराठी बलात्कार, आम्हाला बघवले नाहीत. त्या भावानुवादाला केवळ
'धिंडवडे' हा एकच शब्द आम्हाला सुचतो.
मुळात कोणतीही एखादी ग़ज़ल मराठीत किंवा अन्य कोणत्याही भाषेत भाषांतरीत होत असतांना तिच्या लहजा मध्ये आमूलाग्र बदल होत असतो हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
त्यामुळे ती ग़ज़ल तिच्या मूळच्या ताकदीने भाषांतरित होऊ शकत नाही.
त्यातल्यात्यात उर्दू ही अशी भाषा आहे की, जिची 'नज़ाकत' जगातील कोणत्याही भाषेला नाही. त्यामुळेच की काय कोण जाणे, जगातील सर्वोत्तम साहित्य या अत्यंत अर्वाचीन भाषेत निर्माण झाले.
दुसरी गोष्ट म्हणजे, दोन विभिन्न भाषांच्या संस्कृतीत फरक आणि तफावत असल्याने, एका भाषेतील प्रभावी प्रतीके दुसर्या भाषेत त्यांची ताकद टिकवू शकत नाहीत, हे वास्तव आहे.
'शमअ़'चा (ज्याचा मराठीत चुकीचा उच्चार शमा शमा असा करतात) उर्दू अर्थ मराठी 'दिवा' मधून प्रकट होत नाही. अशा वेळेस ओढूनताणून शमअ़ (अ खाली नुक़्ता आहे) चे भाषांतर करतांना सरळ दिवा म्हणून त्या शब्दाची किंमत कमी करायची याला काही अर्थ उरत नाही.
'ह़स्रत' या उर्दू शब्दाचा खरा अर्थ, केवळ एखादी अपूर्ण इच्छा एवढा मर्यादित नसून, अशी इच्छा जी कधीही पूर्ण होऊ शकणार नाही असा आहे. याचा भावानुवाद मराठीत काय होईल? या शब्दाला समान शब्द मराठीत आहे का?
त्यापेक्षा उर्दूचा रसास्वाद त्याच भाषेत घ्यावा. ग़ालिबचे शेर त्याच्याच भाषेत गरज पडल्यास एखाद्या जाणकाराकडून समजावून घ्यावेत. संकेतस्थळावर ग़ालिबच्या ग़ज़लांचे भावानुवाद करून आपले काव्यकौशल्य सिध्द करण्याचा अकारण आक्रस्थाळेपणा न करता, मूळ ग़ज़ल तिच्या अर्थासोबत प्रकाशित करावी , म्हणजे ज्यांना उर्दू येत नाही त्यांनाही त्याचा अव्यभिचारी आस्वाद घेणे शक्य होईल.
याबाबतीत आपली मते जरूर नोंदवावीत.
आपला,
(उर्दूप्रेमी) धोंडोपंत
प्रतिक्रिया
26 Nov 2007 - 12:34 pm | विसोबा खेचर
धोंड्या झकास लिहिले आहेस...
या नवीन, 'उमलत्या' अनुवादकांच्या तडाख्यातून ग़ालिबसारखे शायरही सुटलेले नाहीत.
'उमलते अनुवादक' हा शब्द आवडला! :)
मुळात उर्दूमधील एखादी ग़ज़ल मराठीत किंवा अन्य कोणत्याही भाषेत भाषांतरीत होत असतांना तिच्या लहेजा मध्ये आमूलाग्र बदल होत असतो हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
त्यामुळे ती ग़ज़ल तिच्या मूळच्या ताकदीने भाषांतरित होऊ शकत नाही.
सहमत आहे...
त्यातल्यात्यात उर्दू ही अशी भाषा आहे की, जिची 'नज़ाकत' जगातील कोणत्याही भाषेला नाही.
क्या बात है, अगदी खरं!
त्यापेक्षा उर्दूचा रसास्वाद त्याच भाषेत घ्यावा.
लाख रुपये की बात! 'फ्रुटी' किंवा 'मँगोला' किंवा 'माजा' ला अस्सल देवगडी कलमी आंब्याची सर कधीच यायची नाही!
असो..
आपला,
(अस्सल तेच मानणारा!) तात्या.
26 Nov 2007 - 12:56 pm | दिगम्भा
धोंडोपंत,
आपण उर्दू शा'यरीचे शौकीन आहात याचा अंदाज पूर्वीपासूनच आला होता. लेखातील भावनांशी पूर्ण सहमत आहे. सर्व नुक्ते काळजीपूर्वक टंकित केल्याबद्दल धन्यवाद. हल्लीच्या काळात एवढी मेहनत कोण घेतो?
एक किरकोळ शंका -
"शक़ील बदायुनी , क़तील शिफ़ाई, जिगर मुरादाबादी, फ़ैज़ अहमद फ़ैज़, ज़ोश महिलाबादी, ख़ुमार बाराबन्क्वी यांच्यावर काय"
ज़ोश महिलाबादी नसून जोश मलीहाबादी असावे असे वाटते.
एकदा तपासून पहावे ही नम्र विनंती.
- दिगम्भा
26 Nov 2007 - 1:03 pm | धोंडोपंत
धन्यवाद दिगम्भा,
टंकलेखनाची चूक दुरूस्त केली आहे. अभिप्रायाबद्दल आभार.
आपला,
(धांदरट) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
26 Nov 2007 - 1:18 pm | आजानुकर्ण
तुमच्या भावनांशी सहमत असलो तरी
अनुवाद केल्यानेच मूळचे इंग्रजी नसलेले अनेक साहित्य इंग्रजीत आले आहे व त्यांचा तथाकथित व्याभिचारी आस्वाद वाचकांनी घेतला आहे. अनुवादाला असे कमी लेखणे योग्य नाही.
अनेक गजला खूपच सुंदर असतात हे निर्विवाद. पण बहुतेक गजला या चार मद्यपींनी आपल्या व्यसनामुळे आपल्याला सोडून गेलेल्या प्रेयश्यांबद्दल केलेल्या कोल्हेकुई सारख्या आहेत. हेच जगातील सर्वोत्तम साहित्य आहे असे म्हणणे पटले नाही.
(अनुवादप्रेमी) आजानुकर्ण
26 Nov 2007 - 1:30 pm | धोंडोपंत
श्री आजानुकर्ण,
पण बहुतेक गजला या चार मद्यपींनी आपल्या व्यसनामुळे आपल्याला सोडून गेलेल्या प्रेयश्यांबद्दल केलेल्या कोल्हेकुई सारख्या आहेत. हेच जगातील सर्वोत्तम साहित्य आहे असे म्हणणे पटले नाही.
लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपले मत असण्याचा अधिकार असतो. तो तुम्हालाही आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो. तुमच्या मताचा स्विकार केला नाही तरी तुम्हाला तुमचे मत असण्याच्या अधिकाराचा आदर करतो.
आपल्या पहिल्या परिच्छेदातील प्रश्नाचे उत्तर आम्ही देणार होतो पण आपल्या अभिप्रायाचा दुसरा परिच्छेद वाचल्यावर आम्ही आमचा विचार बदलला आहे.
उर्दू साहित्य आणि त्यातल्यात्यात उर्दू ग़ज़लेचा तुमचा 'व्यासंग' पाहता, तुमच्या अभिप्रायाला उत्तर न देणे हेच इष्ट ठरेल, असे आम्हाला वाटते.
जाताजाता... आमचे आदरणीय दादा स्वर्गीय श्री. सुरेश भट यांचे वाक्य लिहावेसे वाटते.
दादा म्हणाले होते की, " उर्दू साहित्यात जर ताकद नसती तर जगभरातले हजारो लोक त्या उस्तादांचे 'दीवान' घेऊन रात्रीच्या रात्री जाळत बसले नसते."
त्यामुळे कोल्हेकुई वगैरे ठरविण्याआधी त्याचा अभ्यास करा आणि मग त्यावर भाष्य करा ही विनंती.
आपला,
(मूक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
26 Nov 2007 - 1:45 pm | आजानुकर्ण
आमचा गजलांचा अभ्यास "हजारो ख्वाहिशे ऐसी, "आह को चाहिये" वगैरे काही मोजक्या चांगल्या गझला सोडल्या तर "शेखजी थोडीसी पीके आईये" प्रकारचाच आहे हे मान्य.
पण अनुवादित साहित्याला असे उणे लेखल्यामुळे तोल जाऊन काही बरळलो गेलो असेल तर क्षमस्व.
उर्दू गजलांविषयी तुमचा व्यासंग खूप चांगला दिसतो. तुम्हीच त्याबद्दल थोडी माहिती मराठीतून द्या.
(गजलज्ञानोत्सुक) आजानुकर्ण
27 Nov 2007 - 7:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पंत,
स्त्रीयांची वर्णने, रुपे, तिचे डोळे, चाल, मयखाने, शराब, साकी, आणि शब्दांची नजाकत म्हणजे उर्दु गझल. अशी आमची त्याकडे पाहण्याची दृष्टी आहे. खरे तर व-हाडी बोली दख्खणी भाषा होती म्हणतात.तिच्यात अरबी, पार्शियन शब्दांनी तिचे रुप बदलत गेले आणि आता जेव्हा तिचा अनुवाद मराठीत होत असेल तेव्हा उर्दु गझलाची मजा नक्कीच नसणार. म्हणूनच शायर जफर, गालिब, मोमिन, यांची आठवण होत असते.
बाकी आपण गझलांचे जाणकार आहात, तेव्हा उर्दु गझलांवर जबरा लेख येऊ देत.
आपला स्नेही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
27 Nov 2007 - 9:45 pm | धोंडोपंत
प्राध्यापक साहेब,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण आमच्याशी सहमत आहात याचा आनंद आहे. ग़ालिबसारख्या अत्यंत उत्तुंग प्रतिभेच्या शायरांच्या ग़ज़लांचे अनुवाद म्हणजे स्कॉचमध्ये कोकाकोला घालून त्याची चव बिघडवण्यासारखे आहे. किंवा आमच्या "कलकत्ता नवरतन- १२० "मध्ये गुलकंद घालण्यासारखे. असो.
ग़ज़ल ही केवळ मद्यालय, तेथील साक़ीबाला, तिचे कटाक्ष यापुरती मर्यादित नसून जीवनाचे तत्वज्ञान भरलेली एक अत्यंत लोभसवाणी चीज आहे. माणसांच्या भावनांचे इतके उत्कट आणि अप्रतिम प्रकटीकरण करण्याचे दुसरे माध्यम अस्तित्वात नसेल. तिची तबियत इश्किया आहे. ती शृंगारिक आहे. पण ती अश्लील नाही.
पु.ल.देशपांडे यांनी ग़ज़लेचे वर्णन करतांना असे म्हटले आहे की -
"ग़ज़ल हे केवळ वृत्त नसून ती एक वृत्ती आहे आणि त्यात सूक्ष्म निवृत्तीही आहे".
माणसाच्या दैनंदिन जीवनात त्याला येणार्या गोडकटू अनुभवांचे कथन म्हणजे ग़ज़ल. मुळात इश्क़िया असलेली ही ग़ज़ल पुढे पुढे तरक्कीपसंद (सुधारणावादी) होत गेली आणि जीवनातल्या विविध अंगांवर आणि ढंगांवर भाष्य करू लागली.
आणि त्यामुळेच इतके विविध प्रवाह साहित्यात येऊनसुध्दा ती टिकून राहिली. काळाच्या ओघात अनेक काव्यप्रकार लोप पावले पण ही ग़ज़लसुंदरी आजही तिच्या असमान्य सौंदर्याने आणि नज़ाकतीने तळपते आहे, तळपत राहील.
कारण जो पर्यंत मानवी सृजन अस्तित्वात आहे तोपर्यंत तिला मरण नाही.
आपला,
(ग़ज़लदिवाणा) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
27 Nov 2007 - 10:15 pm | टग्या (not verified)
> स्कॉचमध्ये कोकाकोला घालून त्याची चव बिघडवण्यासारखे
नेमकी कशाची चव बिघडणे अभिप्रेत आहे, हे कळले नाही. प्रस्तुत प्रतिसादकाच्या मते स्कॉचची चव तर बिघडत असावीच, पण कोकाकोलाची चवसुद्धा निश्चितच बिघडते.
- (कोकभूमिवासी) टग्या.
अतिअवांतर: यावरून एक पाचकळ विनोद आठवला.
एकदा एक बाई कोकचा कॅन पिण्यासाठी उघडते. आता झालेले काय असते, की आमच्या अटलांटाच्या कोकच्या फ्याक्टरीत जेव्हा कोक भरून हा क्यान शीलबंद होत असतो, नेमक्या त्याच क्षणी एका माशीने क्यानमध्ये शिरून आत अंडे घातलेले असते, आणि नंतर क्यान शीलबंद होण्याच्या निमिषार्धापूर्वी ती माशी क्यानबाहेर सटकून पसार झालेली असते. आमच्या बाईसाहेब कोक पिण्यासाठी कॅन उघडायला आणि ते अंडे फुटून माशीच्या पिल्लाचा जन्म व्हायला एकच गाठ पडते, आणि ही नवजात बाळमाशी बाईसाहेबांच्या भोवती घोंगावत त्यांना 'आई, आई' म्हणून पुकारू लागते.
बाईसाहेब तिला 'चल ग! मी काय तुझी आई नाहीये काही!' म्हणून झिडकारतात.
बाळमाशी केवळ एखादे लहान मूलच काढू शकेल अशा केविलवाण्या आवाजात त्यांना म्हणते, 'पर माँ, मैं तुम्हारे कोक में से पैदा हुई हूं!'
27 Nov 2007 - 10:45 pm | सर्किट (not verified)
स्कॉच मध्ये कोक नाही, ऑरेंज सोडा घालावा. रम मध्ये कोक, आणि जिन मध्ये लिम्का.
(बाकी "कोक से पैदा हुई खल्लास" टगेबुवा !!)
- सर्किट
27 Nov 2007 - 11:26 pm | कोलबेर
स्कॉच मध्ये कोक नाही, ऑरेंज सोडा घालावा.
म्हणजे ग्लेन फिडिच मध्ये ऑरेंज सोडा घालता की काय राव?? ऑरेंज ज्यूसच प्यायचा आहे तर ९ डॉलरला २ लिटर मिळणारी पोपॉव्ह कींवा तत्सम नावाची व्होडका काय वाईट??
28 Nov 2007 - 12:30 am | सर्किट (not verified)
"घालायचाच असेल तर" असे वाक्याच्या सुरुवातीला घाला :-)
- सर्किट
27 Nov 2007 - 10:31 pm | धनंजय
तुम्ही म्हणता ते सर्व विषय आहेत, पण तसव्वुफ, म्हणजे सूफी विचार हे अभिजात उर्दू गजलमध्ये प्रकर्षाने जाणवतात.
आता मिर्जा गालिब यांची आपल्या सर्वांच्या ओळखीची गजल घेऊ :
یہ نہ تھی ہماری قسمت کہ وصالِ یار ہوتا
اگر اور جیتے رہتے یہی انتظار ہوتا
यह न थी हमारी क़िस्मत कि विसाल-ए यार होता
अगर और जीते रह्ते यिही इन्तिज़ार होता
(अर्थ स्पष्ट आहे.)
वरवरचा अर्थ शृंगारिक, खोलवरचा अर्थ आध्यात्मिक आहे. कोणी म्हणेल खोलवर तसा अर्थच नाही, तर ते बरोबर नाही. कारण हा शेवटून दुसरा शेर घेतला, तर आध्यात्मिक अर्थ प्रकर्षाने जाणवतो, उलट शृंगारिक अर्थ नीट विचार करून "लावून" घ्यावा लागतो.
اسے کون دیکھ سکتا کہ یگانہ ہے وہ یکتا
جو دوئی کی بو بھی ہوتی تو کہیں دو چار ہوت
उसे कौन देख सक्ता कि यगानह है वह यक्ता
जो दूई की बू भी होती तो कहीं दो चार होता
यगानह = एकमेव, यकता = एकटा
दूई = "दोनपणा" = द्वैत
दो-चार होना = भेटणे
मग शेवटी आपल्या तसव्वुफची सौम्य टिंगल करतो!
یہ مسائلِ تصوّف یہ ترا بیان غالب
تجھے ہم ولی سمجھتے جو نہ بادہ خوار ہوتا
यह मसाइल-ए तसव्वुफ़ यह तिरा बयान ग़ालिब
तुझे हम वली समझ्ते जो न बादह-ख़्वार होता
मसाइल = मिसाल चे बहुवचन
बादह्ख्वार = दारुड्या
27 Nov 2007 - 10:46 pm | सर्किट (not verified)
धनंजयराव,
काही शब्दांचे अर्थ समजले नाहीत बॉ:
विसाल, बू, वली ?
- (अडाणी) सर्किट
27 Nov 2007 - 10:52 pm | धनंजय
विसाल : मिलन
बू : गंध (या ठिकाणी "शक्यता, अगदी थोडेसुद्धा ज्ञान" हा अर्थ - "त्याला या गोष्टीचा गंधदेखील नव्हता" या मराठी प्रयोगाप्रमाणे.)
वली : संत
चित्रा सिंग यांनी गायलेली ही गजल :
http://ww.smashits.com/music/ghazals/songs/2204/mirza-ghalib-jagjit-chit...
हबीब वली मुहम्मद यांनी गायलेली हीच गजल :
http://www.muziq.net/showpage.php?page=album.php?show=showall&artistid=7...
27 Nov 2007 - 11:11 pm | सर्किट (not verified)
उसे कौन देख सक्ता कि यगानह है वह यक्ता
जो दूई की बू भी होती तो कहीं दो चार होता
वाह ! फारच सुंदर विचार आहेत !
- सर्किट
27 Nov 2007 - 11:54 pm | मनिष
म्हणतो मी. आता "कोल्हेकुई" नाही हे पटेल असे वाटते! :)
29 Nov 2007 - 10:59 am | दिगम्भा
बाकी ठीकच आहे, पण
"वरवरचा अर्थ शृंगारिक, खोलवरचा अर्थ आध्यात्मिक आहे. कोणी म्हणेल खोलवर तसा अर्थच नाही, तर ते बरोबर नाही. कारण हा शेवटून दुसरा शेर घेतला, तर आध्यात्मिक अर्थ प्रकर्षाने जाणवतो, ........."
असे दुसर्या शेराचा आधार घेऊन एखाद्या शेराचा अर्थ लावणे सर्रास योग्य वाटत नाही. प्रत्येक शेर म्हणजे स्वतंत्र व पूर्ण कविता या तत्वाला ते धरून होणार नाही.
उदा. "हज़ारों ख़्वाहिशें ..." या जीवनानुभवी मतल्याचा व "वो जाता था के हम निकले" या शेराचा (एकाच ग़ज़लेत असले तरी) कितपत संबंध आहे?
29 Nov 2007 - 5:22 pm | धनंजय
हे बरोबर आहे की गजलेतला प्रत्येक शेर स्वतंत्र असला पाहिजे. पण फक्त रदिफ तोच असणे हे एकच सूत्र त्या शेरांना बांधत असावा हे ठीक नाही वाटत. प्रत्येक शेर अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असूनही ते एकत्र वाचल्याने "भागांपेक्षा पूर्ण अधिक" ("the whole is greater than the part") असा काही अर्थ गजलेतून निघावा.
त्यामुळे तुमचे हे म्हणणे बरोबर आहे की सहाव्या शेरातल्या नेमक्या शब्दांच्या अर्थातून पहिल्या शेराला अर्थ लावू नये. पण त्या गजलेतली समावेशक भावना काढता यावी. मक्त्यातला "तसव्वुफ"चा संदर्भ स्वतंत्र लावता आला, तरी खुद्द गजलेलाही लावता यावा.
7 Dec 2007 - 1:16 pm | दिगम्भा
पण फक्त रदिफ तोच असणे हे एकच सूत्र त्या शेरांना बांधत असावा हे ठीक नाही वाटत. प्रत्येक शेर अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असूनही ते एकत्र वाचल्याने "भागांपेक्षा पूर्ण अधिक" ("the whole is greater than the part") असा काही अर्थ गजलेतून निघावा.
माझीही अपेक्षा किंवा मत अशी/सेच आहे, पण ...
प्रचलित ग़ज़ला पहाता शायरांनाच हे आपले समाईक मत मान्य नसावे, नाहीतर ग़ालिबसारख्याने अशी "वो जाता था के हम निकले" (यावर माझा खास राग आहे) या प्रकारची घुसडंपट्टी केलीच नसती. इतरही उदाहरणे मिळू शकतील.
तरीही जर भागांपेक्षा पूर्ण अधिक होत असेल तर माझेसुद्धा गेश्टाल्टिक समाधान अधिक होते/होईल.
मात्र असा अपेक्षित रसपरिपोष नज़्ममध्ये नीट होतो.
नज़्मवाला साहिर या बाबतीत बरा वाटला. "ग़ज़ल" चित्रपटात त्याच्या "किसे पेश करूं" या रदीफच्या चक्क तीन ग़ज़ला आहेत लताची, रफीची आणि (गद्य) मुशायर्यात राजेंद्रनाथची विनोदी (त्यातील एक नमुनेदार शेर - "औरों का हूं मैं डाक्टर लेकिन तुम्हारा हूं मरीज़, नब्ज़ दिखाने को ये हाथ किसे पेश करूं") .
- दिगम्भा
26 Nov 2007 - 5:10 pm | मनिष
काही प्रतिमा त्या, त्या भाषेतच सुरेख दिसतात. पण म्हणून अनुवादच नको असे नाही. "मूळ ग़ज़ल तिच्या अर्थासोबत प्रकाशित करावी " ह्याच्याशी पुर्णपणे सहमत.
अवांतर - माझ्या एका उर्दू जाणकार मित्राच्या मते, काही उर्दू शब्द देवनागिरीत लिहिता येतच नाही. पण म्हणून (जमेल तसे) उर्दू ग़ज़ल देवनागिरीत लिहिलीच नाही तर माझ्यासारखे असंख्य चाहते ती वाचूच शकणार नाही. तसेच अनुवादाकडेही थोडे उदारपणे पाहता येईल.
योगेश (कर्णा) - इक्बाल, कैफी आझमी, आणि असंख्य अर्वाचीन उर्दू शायरांनी (साम्यवादीही होते ह्यात) खूप चांगले, विविध विषयांवर लिखाण केले आहे. ती कोल्हेकुई नक्कीच नाही. जमल्यास मी पण ग़ज़ल हया विषयावर लिहिन.
- मनिष
26 Nov 2007 - 5:34 pm | आजानुकर्ण
असे लिखाण येथे झाले तर वाचायला नक्कीच आवडेल.
-- आजानुकर्ण
28 Nov 2007 - 2:27 am | मनिष
http://www.misalpav.com/node/359
मत बदलले असेल तर वाचायला आवडेल! :)
26 Nov 2007 - 6:16 pm | धनंजय
प्रत्येक भाषेत ठेवणीचे शब्द आणि असतात, जे दुसर्या भाषेत सांगायला कठिण जातात.
गद्य साहित्याचे भाषांतर करताना या ठेवणीतल्या शब्दांचे बेमालूम स्पष्टीकरण देत अनुवाद करणे शक्य असते, ते काव्याचा अनुवाद करताना कठिण जाते.
उर्दूसारखीच अशा प्रकारची उदाहरणे तमिळ, तेलुगु, बंगाली भाषांबद्दल दिली जाऊ शकतील. या सर्व भाषांमध्ये समृद्ध काव्य आहे, जे की मूळ भाषेत वाचल्याशिवाय पूर्णपणे कळणार नाही.
पण आमच्या शाळेत तीन-चार भाषा शिकायचीच फक्त सोय होती. शिवाय प्रौढ वयात रोजगाराच्या निमित्त दिवस खर्च झाल्यावर या सर्व भाषा शिकायला वेळ मिळत नाही. (परदेशात राहिल्यामुळे, येथे सहज शिकता येतील अशा बिगरभारतीय भाषा शिकणे जे थोडे जमते तितकेच. - हा वैयक्तिक अनुभव) त्यामुळे बहुतेक मराठी रसिक साहित्यिक उर्दू शिकू शकतील असे वाटत नाही.
ताक हे दुधाऐवजी पीत असल्याची कल्पना असल्यास, ते आवडणार नाही, चवीला हिणकस वाटेल. पण ते ताक म्हणून प्याल्यास, ताकसुद्धा बर्यापैकी चविष्ट असते असे लक्षात येऊ लागते.
ता.क. नुक्त्याबाबत : अरबी/फारसीमधून आलेल्या लिपीत अनेक प्रकारचे ज़ आणि स़ आहेत. प्रत्यक्ष उच्चारात एकाच प्रकारे अभिजात उर्दूत त्यांचा उच्चार केला जातो. 'अइन या (अ़) वर्णाचा कंठ्य-स्पर्श व्यंजन असा अभिजात उर्दूत होत नाही.
त्यामुळे अगदीच लिपीला लिपी नीट लिहायची असेल तर
शम्अ़ असे म् पाय मोडून लिहावे लागेल, कारण म्+अ़ हे दोन व्यंजनांचे जोडाक्षर आहे.
अभिजात उर्दूतही उच्चार "शमा" असाच असल्यामुळे मराठीत तसे उच्चारसदृश लिहिता यावे.
पण "शमअ़" हे ना धड इथे झाले, ना तिथे
(बाद [= नंतर] च्या ठिकाणी "बअ़द" किंवा "ब्अ़द" असे लिहावे लागेल! हा विषयी अतिरेकी आग्रह न केला तर बरा असे वाटते.)
दुसर्या एका ठिकाणी याविषयी (उर्दूतील अरबी वर्णांच्या उच्चारांविषयी) चित्तरंजन यांनी उर्दूपंडितांचे संदर्भ देऊन माहिती दिली होती. त्यांनी ती येथे दिली तर चांगले होईल.
27 Nov 2007 - 12:12 am | सर्किट (not verified)
सदर चर्चाप्रस्तावाविषयी आमची द्विधा मनस्थिती आहे. आम्हाला उर्दू येत नाही, भावानुवादांतून मूळ अर्थाला काही प्रमाणात न्याय मिळत नाही, हेही पटते. परंतु त्यामुळे उर्दू भाषेतील उत्तमोत्तम साहित्याला आम्ही वंचित राहू ही कल्पनाही पटत नाही. त्यामुळे भावानुवादासोबत मूळ गझल देऊन त्यातील कठीण जागांवर विवेचन करावे, हा मधला मार्ग आवडेल.
- सर्किट