‘दिवाळी अंक’ हे आपल्या दिवाळीचं आणि मराठी संस्कृतीचं अविभाज्य अंग. १९०९ मध्ये पहिला दिवाळी अंक ‘मनोरंजन’ प्रसिद्ध झाला. शंभराहून अधिक वर्षांची परंपरा काळाच्या ओघात नामशेष झाली नाही हे विशेष. २०१२ मध्ये ८०० पेक्षा जास्त दिवाळी अंक प्रसिद्ध झाल्याची बातमी वाचल्याचं आठवतं. याच्या सोबत आता ‘ई दिवाळी अंक’ पण मोठ्या संख्येने निघत आहेत.
बाकी महागाई वाढली तशा दिवाळी अंकांच्या किमतीही वाढल्या आहेत. मर्यादित बजेटमध्ये काही ठराविक दिवाळी अंक घेता येतात. ज्यांना वाचनालयात दिवाळी अंक मिळतात ते कदाचित अधिक दिवाळी अंक वाचत असतील. पण मी कधी त्या वाटेने गेले नाही कारण वाचनालयाची अंक परत करायची मुदत पाळणं मला जमणार नाही हे मला माहिती आहे.
मी गेली अनेक वर्ष – दरवर्षी - पाच दिवाळी अंक विकत घेतेय. ‘अंतर्नाद’, ‘मिळून सा-याजणी’ आणि ‘अक्षर’ हे अंक इतक्या वर्षांत कायम राहिले आहेत माझ्या यादीत. यंदा ‘अनुभव’ आणि ‘मुशाफिरी’ हे दोन अंक प्रथमच घेतले आहेत.
या पाचच अंकाच्या खरेदीमुळे माझं दिवाळी अंकांचं वाचन फार मर्यादित राहतं. इतर अनेक चांगले अंक निघत असतील; पण ते कळणार कसं? एखादा अंक अगदी पूर्ण चांगला नसला तरी त्यातला एखादा लेख, एखादी कथा आपल्याला प्रचंड आवडून जाते. सदस्यांनी त्यांना आवडलेले लेख, कथा, व्यंगचित्रे, कविता ... याबद्दल इथं माहिती दिल्यास तो अंक, तो लेख, ती कथा मिळवून वाचता येईल.
काय आहे, भारंभार अंक प्रसिद्ध होतात तेव्हा सगळं तपासून पहायला वेळ नसतो आणि तितका वकूबही नाही माझा. अनेकदा अशा प्रयत्नांत नको ते अंक निवडले जाऊन अपेक्षाभंग होतो. इतरांनी शिफारस केली तर दर्जेदार साहित्य शोधण्याचे कष्ट कमी होतील. या लेखांचा दुवा उपलब्ध असेल तर तोही जरूर द्यावा.
मी सुरुवात करते मला आवडलेला एक लेख सांगून. ‘अक्षर’ दिवाळी अंकात (किंमत १२०/- रुपये) ‘रिपोर्टिंग करताना’ अशी पाच लेखांची ‘विशेष लेखमाला’ आहे. त्यातला युवराज मोहिते यांचा ‘दुर्बीण’ लेख मला आवडला. ‘पत्रकारांनी रिपोर्टिंग करताना भूमिका घ्यावी का, धोके पत्करावेत का’ या प्रश्नाभोवती अनुभव मांडलेले आहेत त्यांनी. सामाजिक जाण असलेले पत्रकार ‘बातमी’ लोकापर्यंत पोचावी म्हणून काय करतात, त्यांना कोणत्या प्रलोभनांना, दबावांना तोंड द्यावं लागतं याचं अनुभवाधारित चित्रण या लेखात आहे. हा लेख मला आवडला कारण समाजातल्या शोषित वर्गाला आणि त्यांच्या बाजूने संघर्षाला उभ्या राहणा-या लोकांना कशातून जावं लागतं याची थोडी कल्पना या लेखातून येते. तसंच प्रश्नांची व्याप्ती किती आहे याचाही पुन्हा एकदा अंदाज येतो. लेखाची भाषा जड नाही हे आणखी एक वैशिष्ट्य.
सांगा तर तुम्हाला आवडलेल्या अंकाबद्दल, लेखाबद्दल. मोघम ‘मस्त आहे’ किंवा ‘बेक्कार आहे’ (हो, काय टाळावे हेही जरूर सांगा) हे न सांगता विस्ताराने सांगितल्यास अधिक मजा येईल. आणि हो, छापील दिवाळी अंकांसोबत ई-दिवाळी अंकही असू द्या ध्यानात – ते तर वाचायला जास्त सोपे आणि बिनखर्चिक :-)
आणि हो, एखादा लेख/कथा/ कविता मला आवडला/आवडली, पण दुस-या कुणाला ती मुळीच आवडली नाही असंही होऊ शकतं! त्यातून साहित्याचे, समाजाचे, वाचकांच्या अपेक्षांचे काही नवे पैलू समोर आल्यास अधिक उत्तम!
प्रतिक्रिया
1 Nov 2013 - 7:59 am | स्पंदना
सुरेख धागा.
येथे येणार्या प्रतिसादातून बरेच काही वाचायल मिळेल. समजेल.
1 Nov 2013 - 8:56 am | मुक्त विहारि
मस्त...
जमतील तसे आणि लेख वाचीन तसे प्रतिसाद टाकीन.
1 Nov 2013 - 9:06 am | नाखु
गाजलेल्या दिवाळी अंकाची "नाव नक्कल" करणार्या अंकाबद्दल हि लिहाच..
(कालच रविवार जत्राच्या नावाखाली "बोगस" धमाल रविवार जत्रा अंक मिळालेला)
फसलेला वाचक
नाद खुळा
1 Nov 2013 - 2:08 pm | आतिवास
"नाव नक्कल" उत्पादन बाजारात येण्याची प्रथा दिवाळी अंकांच्या क्षेत्रातही रुजलेली दिसतेय आता.
त्या बोगस अंकात काही वाचनीय सापडलं का तुम्हाला? का सगळं काही फसवं निघालं त्यातलं?
7 Nov 2013 - 8:46 am | नाखु
तर बाकि काहिच साधर्म्य नाही.मुळात हा अंक आपल्या प्रकाशन संस्थेची जाहिरात अंक आहे.
त्यावर "पाप क्षालनार्थ" कालच मोहिनी दिवाळी अंक मिळवला.मोहिनी परंपरेला साजेसा आहे..(आधि वाचनालयातून अंक वाचून) मगच संग्राह्य अंक विकत घेण्याचे शहाणपण आलेला.
नाद खुळा
7 Nov 2013 - 1:28 pm | आतिवास
वाचनालयात अंक वाचून तो आवडला तर विकत घ्यायची युक्ती चांगली आहे.
"मोहिनी"त काय कथा आहेत का फक्त?
1 Nov 2013 - 9:28 am | यशोधरा
वाचते आहे.
1 Nov 2013 - 2:25 pm | म्हैस
बहुतेक सगळेच दिवाळी अंक छान असतात . वेगवेगळ्या अंकात दर वर्षी वेगवेगळे लेख आणि गोष्टी असतात . तेव्हा नेमका कोणता अंक घ्यावा आणि कोणता नाही हे सांगण फार कठीण आहे
1 Nov 2013 - 2:28 pm | आतिवास
तुम्हाला आवडलेला एखादा लेख/एखादी गोष्ट याबद्दल सांगाल का? म्हणजे मग ती मिळवून वाचता येईल.
1 Nov 2013 - 11:46 pm | आतिवास
या ठिकाणी (आत्ता) उल्लेख असलेल्या ४३ दिवाळी अंकांपैकी माझ्या पाहण्यात फक्त 'अक्षर' आला आहे. कदाचित 'मौज'ही घ्यायला हवा आहे!
2 Nov 2013 - 6:14 pm | चित्रगुप्त
निवडक दिवाळी अंक एकत्रितपणे महाराष्ट्राबाहेरच्या गावी घरपोच मागवण्याची काही सोय आहे का?
2 Nov 2013 - 7:50 pm | आतिवास
'मायबोली' संकेतस्थळावर* या ठिकाणी असे अंक मागवण्याची व्यवस्था दिसते आहे.
(* वाचकांना ही अन्य संकेतस्थळाची जाहिरात वाटणार नाही अशी आशा आहे.)
3 Nov 2013 - 12:53 am | आदूबाळ
बुकगंगा
http://www.bookganga.com/eBooks/Books?CID=5258511375217638788
4 Nov 2013 - 8:35 am | आतिवास
ही आणखी एक सोय दिसतेय - पण महाग दिसतेय प्रचंड!
28 Oct 2016 - 3:44 pm | अन्कुश शिन्दे
बुकगंगा.कॉम या साईटहून तुम्ही दिवाळी अंक मागवू शकता
4 Nov 2013 - 10:46 am | प्रभाकर पेठकर
पूर्वीच्या काळी 'लोकसत्ता'चा दिवाळी अंक आमच्या घरी न चुकता यायचा. तो अथं पासून इति पर्यंत वाचला जायचा. जरा 'कळत्या' वयात 'आवाज', 'जत्रा' वगैरे अंकांचे आकर्षण वाटायचे. पण ते अंक घरात यायचे नाहीत बाहेर वाचनालयात वगैरे शोधायला लागायचे. 'दक्षता' चा दिवाळी अंकही त्यातील पोलीशी कथांमुळे वाचला जायचा. 'किर्लोस्कर', 'स्त्री' आणि 'मनोहर' आणि नंतर 'किस्त्रीम' वाचण्याचीही उत्सुकता असायची. वि.आ. बुवा, वपु काळे, सुमती क्षेत्रमाडे, विजया राजाध्यक्ष, मधु मंगेश कर्णिक, गिरीजा किर, जयवंत दळवी, रमेश मंत्री, वसंत सबनिस अशा अनेक दिग्गजांच्या साहित्यकृती वाचायला मिळाल्या आहेत. १९८१ साली भारत सोडून आखाती प्रदेशात आलो आणि मराठी 'दिवाळी अंकांची' आपल्या आयुष्यातील उणीव भासू लागली. ती भूक, कांही प्रमाणात, कालनिर्णयची दिनदर्शीकेची मागची बाजू भागवायची. आजही कालनिर्णय आणलं की आधी त्या मागील 'साहित्य' आवर्जून वाचलं जातं. मराठी माणसाच्या आयुष्यात दिवाळी अंकाला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणूनच, मिपाचा दिवाळी अंक प्रसिद्ध झाल्याबरोबर, पूर्वीची दिवाळी अंक वाचन परंपरा राखित, पहिल्या २-३ दिवसांत संपूर्ण वाचून काढला.
4 Nov 2013 - 11:10 am | आतिवास
आता काही अंक (छापील अंक) ऑनलाईनही प्रसिद्ध केले जातात. जसे मिळतील तसे दुवे देईन, इतरांनीही द्यावेत.
'साधना दिवाळी अंक' इथं आहे. मी उतरवून घेतला आहे, अजून वाचला नाही
4 Nov 2013 - 11:12 am | प्रभाकर पेठकर
धन्यवाद. नक्कीच वाचले जातील.
4 Nov 2013 - 11:16 am | यशोधरा
साधनाच्या लिंकबद्दल धन्यवाद!
6 Nov 2013 - 11:37 am | आतिवास
"प्रभाकर देवधर" हे नाव माहिती आहे पण त्यांच्या कार्याची फारशी माहिती नव्हती मला. "अंतर्नाद" दिवाळी अंकात अ.पां. देशपांडे यांच्या "प्रभाकर देवधरः व्यक्ती आणि कार्य" या लेखातून एका कर्तबगार मराठी माणसाची ओळख झाल्याचा आनंद झाला.
प्रभाकर देवधर 'अॅपलॅब' कंपनीचे संस्थापक; इलेक्ट्रॉनिक कमिशनचे माजी अध्यक्ष; राजीव गांधी यांचे जवळचे स्नेही असूनही तत्त्वाने काम करणारे; १४०० रुपयांत १४ इंची कृष्णधवल टेलिव्हिजन संचाचे जनक ... अशी त्यांची विविधांगी कर्तबगारी आहे. लेखकाने त्यांची ओळख साध्या सोप्या शब्दांत - दिवाणखान्यात बसून गप्पा माराव्यात अशा त-हेने - करुन दिली आहे. देवधर या व्यक्तीबद्दल अजून जाणून घेण्याची भावना हा लेख निश्चित जागवतो.
7 Nov 2013 - 8:51 am | नाखु
मोहन जोशींची आगामी पुस्तकातील काही भाग दिला आहे तोहि वाचनीय.
7 Nov 2013 - 9:11 am | ऋषिकेश
काल 'पालकनीती' चा दिवाळी अंक घरी आला आहे.
यंदाचा दिवाळी अंक बालसहित्य विशेषांक आहे.
वरवर चाळला. लेखन करणारी मंडळी आणि लेखन दोन्ही अत्यंत रोचक आहे. अंक लहानग्यांच्या चित्रांनी भरलेला आहे. बालसाहित्यावर विविध अंगाने विचार झालेला दिसतोय.
अधिक प्रतिक्रीया अंक वाचल्यावरच देईन.
7 Nov 2013 - 1:31 pm | आतिवास
'पालकनीती' नेहमीच वाचनीय असतो. दिवाळी अंक अद्याप ऑनलाईन दिसत नाहीये. तो तुम्हाला दिसल्यास कृपया त्याचा दुवा इथं द्याल का?
7 Nov 2013 - 2:55 pm | ऋषिकेश
अंक अद्याप ऑनलाईन प्रकाशित झालेला नाहिये. झाल्याचे समजताच इथेही दुवा देईन
7 Nov 2013 - 3:55 pm | मनिष
'अनुभव' आणि 'अंतर्नाद' ह्या नेहमीच्या अंकावरोबरच यावेळेस 'कथाश्री' हा दिवाळी अंक घेतला. हा 'पर्याय (option) विशेषांक' आहे...त्यातली डॉ. आनंद नाडकर्णींची मुलाखात 'आदर्श पर्याय असे काही नसतेच' ही आवडली. स्वेच्छामरणाच्या चर्चेमधे तेंडुलकरांविषयी डॉ. प्रयाग यांचा लेख अवश्य वाचावा असाच आहे!
7 Nov 2013 - 4:02 pm | मनिष
इथे थोडी झलक वाचता येईल
http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5261592358709251422?BookNa...
7 Nov 2013 - 6:21 pm | आतिवास
धन्यवाद मनिष. अंकाची आणि तुम्ही सुचवलेल्या लेखांची नोंद घेतली आहे. 'कथाश्री' अंक मी आजवर एकदाही वाचला नाहीये - आता मात्र नक्की वाचेन.
8 Nov 2013 - 3:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
'फ फोटोचा' यांचा दिवाळी अंक तुलनेने नवा असावा. पण त्यातले फोटो प्रचंड आवडले. स्ट्रीट फोटोग्राफी या (माझ्या आवडत्या) विषयाला चांगला न्याय दिला आहे.
आत्तापर्यंत पाहिलेले केरळ - एक अनोखी संस्कृती, ऑफबीट, स्लाईड शो, इस्तंबूल - एक झलक, जत्रा हे धागे मला फारच आवडले.
8 Nov 2013 - 8:27 am | आतिवास
धन्यवाद अदिती. बहुधा मागच्या वर्षी पाहिला होता आणि आवडला होता. यंदा विसरले होते - आता नक्की पाहते.
8 Nov 2013 - 12:37 pm | पांथस्थ
आताच खालील दिवाळी अंक मागवले आहे (या वर्षी पुण्यात जायला जमले नाही म्हणुन ऑनलाईन) -
ग्रंथव्दार कडूनः
१. अक्षर
२. मौज (*)
३. अनुभव
बुकगंगा कडूनः
१. साधना
२. साप्ताहिक सकाळ (*)
३. अंतर्नाद
(*) हे अंक दरवर्षी घेतोच घेतो!
8 Nov 2013 - 5:19 pm | आतिवास
'मौज'मधल्या तुम्हाला आवडलेल्या एखाद्या लेखाची इथं जरुर ओळख करुन द्या.
9 Nov 2013 - 9:10 am | नाखु
"मेनका" दिवाळी अंक वाचत आहे अरुण कुलकर्णींची दिर्घकथा वाचनीय.पण मला आवडलेले दोन लेख म्हणजे:
१.अमिरिकेच्या तथाकथित तत्वांची चिरफाड करणारा निरंजन घाटे यांचा स्नोडेन वरिल लेख
२.ईशान्येकडिल "गोरखपूर" येथिल भयावह वैद्यकिय अनागोंदी व ज्वर लागण (अजगरी विळ्खाच जणू)या बाबत प्रत्यक्श काम केलेल्या वैद्यकिय अधिकार्याने केलेले अनुभव कथन
9 Nov 2013 - 11:30 am | मनिष
हे वाचायला आवडतील खरच! ऑनलाईन आहेत का?
11 Nov 2013 - 10:17 am | नाखु
पण काही ठिकाणी बहुतेक ग्रन्थद्वार या साईटवर झलक आहे.
9 Nov 2013 - 12:45 pm | आतिवास
या निमित्ताने एक गोष्ट ध्यानात येतेय - ती म्हणजे: मराठीत पुष्कळ काही चांगलं लिहिलं (आणि छापलं) जातंय अजूनही; आपणच (म्हणजे मी!!) ते मिळवून वाचायला कमी पडतोय.
10 Nov 2013 - 10:49 pm | सुधांशुनूलकर
।। श्री गुरवे नमः ।।
सध्या दोन दिवाळी अंक वाचून झालेले आहेत. ‘मौज’ आणि (मी स्वत: मुद्रितशोधन केलेला) ‘विवेक’ यातल्या काही निवडक लेखांविषयी थोडंसं.
मौज : (खरं म्हणजे मौजमधल्या सर्वच लेखांवर लिहायला हवं.)
इंदिरा संत यांचं विजय कुवळेकर यांनी लिहिलेलं व्यक्तिचित्र इंदिराबाईंइतकंच सात्त्विक आणि सोज्ज्वळ आहे. वाचायलाच हवं. इतरही व्यक्तिचित्रं वाचनीय आहेत. मुखपृष्ठ आहे सुप्रसिद्ध चित्रकार अंबादास यांचं; आणि प्रभाकर कोलते यांनी लिहिलेलं अंबादासांचं (रंगीत चित्रांसह) व्यक्तिचित्र अंतर्मुख करणारं.
आपल्या देशात बुद्धिमत्ता आणि गुणवत्ता असूनही विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात आपण मागे का? या विषयावर डॉ. बाळ फोंडके यांनी एका प्रदीर्घ लेखात सविस्तर ऊहापोह केला आहेच, शिवाय भारतीय वैज्ञानिकांनी केलेल्या मूलभूत संशोधनांचीही सविस्तर माहिती दिली आहे (ज्यांना आपल्या प्रसारमाध्यमांनी अजिबात प्रसिद्धी दिली नाही). या लेखाला पूरक म्हणून, देवकणांवर संशोधन करणारे अमोल दिघे, गुळवेलीवर संशोधन करणारे कृष्णा सैनिस आणि ‘एपिजेनेटिक्स’मध्ये संशोधन करणारे संजीव गलांडे यांचेही लेख आपल्याला विचार करायला लावतात.
भारतातल्या महागाईविषयी लेख (रूपा रेगे-नित्सुरे), डेट्रॉइटचं दिवाळं (निळू दामले) हे अर्थशास्त्रविषयक लेख आणि ‘डियर पार्क’वरचा विनया जंगले यांचा लेख अगदी वेगळे, मनोरंजक आणि माहितीपूर्ण आहेत.
कविता विभाग अतिशय समृद्ध. प्रसिद्ध/अप्रसिद्ध कवींच्या तब्बल ५०-५२ अप्रतिम कविता.
********
विवेक : हे माझं ‘अपत्य’. (मी ‘विवेक’चं मुद्रितशोधन केलं आहे.)
रिझर्व बँकेचे गव्हर्नर निवृत्त झाल्यावर त्यांचं पोर्ट्रेट रंगवायचं काम करताना आलेल्या अनुभवांवर आधारित, प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांच्या (रंगीत चित्रांसह) लेखातून या मोठ्या व्यक्तींच्या सहृदय स्वभावाचं मनोज्ञ दर्शन घडतं. तर, एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणाऱ्या, ‘गिरिप्रेमी’ या संस्थेच्या वीरांना प्रोत्साहन देण्यासाठी एव्हरेस्ट बेस कँपपर्यंतचा ट्रेक करणाऱ्या प्रसिद्ध बिल्डर सुरेश हावरे यांचं (रंगीत फोटो आणि छोट्याछोट्या चौकटीमधून दिलेल्या रोचक माहिती यासह) अद्भुत अनुभवकथन वाचून आपणही हा ट्रेक करावा असं वाटायला लागलं.
नीरज हातेकर पती-पत्नी + एकूण ३५-३६ (प्राणी)सदस्य असलेल्या परिवाराचा परिचय अत्यंत खुसखुशीत, तितकाच हृद्यही. तर, उमा आणि विरुपाक्ष कुलकर्णी हे दांपत्य म्हणजे सहजीवनातल्या समरसतेचं एक उदाहरणच, हे मुक्ताईनंदनलिखित परिचयलेखातून जाणवतं. जातिकल्लोळ (ले. रवींद्र गोळे) हा आजच्या जातीय समाजवास्तवाचा तटस्थ आढावा घेणारा लेख अंतर्मुख करणारा आहे.
औरंगाबादच्या डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या निरपेक्ष सेवाकार्याच्या प्रवासाचा सविस्तर आढावा घेणारा लेख (ले. अश्विनी मयेकर) आणि चँपियन घडवणाऱ्या ‘पुलेला गोपीचंद अकादमी’वरचा लेख (ले. ऋजुता लुकतुके) हे दोन्ही लेख अशा अतिशय वेगळ्या संस्थांच्या परिचय करून देतात, जिथे पैशांपेक्षा कार्य आणि उद्दिष्ट यांना महत्त्व दिलं जातं.
विवेकचा हा दिवाळी अंक आठवडाभरात www.evivek.com या संकेतस्थळावर (टप्प्याटप्प्याने) वाचता येईल.
(मूळ धाग्यापेक्षा प्रतिसाद मोठा झाला की!)
सर्वांचाच,
सुधांशुनूलकर
10 Nov 2013 - 11:20 pm | आतिवास
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हा विषयच असा आहे की मूळ धाग्यापेक्षा मोठे प्रतिसाद अपेक्षित आहेत.
'मौज' आता मिळवून वाचायलाच हवा याची खात्री झाली आहे. 'विवेक'चा दुवाही नक्की पाहीन.
27 Dec 2013 - 12:09 pm | नाखु
१.मोदींवर दोन लेख आहेत माहीतीपूर्ण आणि मोदिच्या १५ वर्षांच्या वाटचालींचा गुण-दोषांसकट उहापोह केला आहे.एकूण दोन्ही लेख संतुलित आणि तटस्थपणे लिहिलेले वाटले(या आधी "साधना" दिवाळी अंक वाचताना सगळे उजवे पक्ष/संघटनाच कश्या अनिस च्या विरुद्ध आहेत असा लेखणसूर दिसला होता) त्यामानाने हे लेख जास्त संतुलीत आहेत.
२.मिपावरिल मागिल महिन्त्यातिल शतकी धाग्यातिल विषयावर एक लेख व एक कथा(गुरुनाथ तेंडुलकर) आहेत्.जिज्ञासू (चाणाक्ष) वाचकांनी त्या जरूर वाचाव्यात्.लेख डा.अनंत लाभसेटवार्(अमेरिका स्थीत) यांचा आहे.
३.सर्वात भावलेली कथा पु.रामदासी यांची ,वेगळ्या धाटणीच्या लेखन व मानवी नातेसंबधांची गुंतागुंत अशी आहे.
४.या अंकाचा कळसाध्याय म्हणजे रामदास स्वामींवर आलेला शामसुंदर मुळे यांचा लेख्.रामदासांसबधीचे सर्व आक्षेप्/आरोप यांचे पुराव्यानिशी खंडन केले आहे.ज्या दस्तएवजांचे आधारे आरोप झाले आहेत त्यांचाच आधार घेवून विवेचन केले आहे. "स्वतःला सोयीस्कर असे शेंडा-बुड्खा नसलेले संदर्भ देणार्या वृत्तींचे" यात चांगलेच वस्त्रहरण केले आहे.
27 Dec 2013 - 2:57 pm | आतिवास
अंकाची ओळख करुन दिल्याबद्दल आभार.
मोदींवरचे दोन लेख कुणाचे आहेत? लेखकांची नावं कळू शकतील काय?
30 Dec 2013 - 9:08 am | नाखु
आणि दुसरा श्रीपाल यांचा,याच अंकात स्थापत्य कलेच्या विकास्-र्हास बाबत चांगला लेख (वल्लिदा स्पेशल) आहे.
सोनवणी हे "पेड" (मराठी शब्द काय?)लेखकू आहेत याची दिवसोंदिवस खात्री होत आहे.
29 Dec 2013 - 1:06 pm | मारकुटे
किस्त्रीम मधील सोनवणींचा संस्कृतवरील लेख म्हणजे विनोदाचा धबधबा आहे
29 Dec 2013 - 10:10 pm | आतिवास
हं! अपेक्षित!!
30 Dec 2013 - 5:33 pm | बॅटमॅन
आयला, हा प्राणी आता दिवाळी अंकांतही लिहायला लागला का? ब्लॉग, फेबु अन स्वतःची खंडीभर पुस्तके वगळता अजून एक मार्ग सापडला म्हणायचा विनोदी लिहायचा. साहित्य संमेलनाच्या निवडणुकीला उभा राहिला तेव्हा काय वल्गना चालवल्या होत्या. सपाटून पडला तरी नाक उप्परच अशा थाटात काम सुरूच आहे.
पण काय तो विषयांचा आवाका अन काय ती प्रॉडक्टिव्हिटी...मान गये =))
1 Jan 2014 - 9:26 am | नाखु
जम्मू/काश्मीर वरील डॉ.गिरीश दाबके यांचा लेखा-जोखा मस्त मुद्देसूद आहे. संदर्भासाठी घेतलेल्या पुस्तकांवरून अभ्यास दिसतो.मागे एका धाग्यावर राजकारणी लोकांनी हा विचका केला नाही हे जरा धाडसी विधान केले होते तेव्हा हा लेख वाचलाच नव्हता.अभ्यासूंनी जिज्ञासा म्हणून / तटस्थांनी माहीती म्हणून वाचायला हरकत नाही.
3 Jan 2014 - 10:51 am | श्रीनिवास टिळक
पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघातर्फे दीडशे रुपयात दीडशे दिवाळी अंक असा उपक्रम यंदा होता त्याचा लाभ घेऊन मी आत्तापर्यंत तीस एक अंक वाचले. त्यापैकी खालील अंक मला स्वतःला फार उद्बोधक वाटले: अंतर्नाद, ऋतुरंग, किस्त्रीम, दीपलक्ष्मी, पद्मगंधा, प्रसाद, आणि विवेक. धर्मभास्करचे नाव यादीत आहे पण तो अजून मला मिळाला नाही. ऋतुरंगचा विषय आहे “मनोरथा चल त्या सफरीला.” त्याला धरून प्राध्यापक उज्ज्वला दळवी यांचा मेघादुतावर बेतलेला “कालीदासकालीन प्रवास” हा लेख अत्यंत वाचनीय आणि मननीय आहे. राजपथ, स्थानीयपथ, व्यूहपथ (access road) विशिखापथ (reserved for government mint workers and goldsmiths to transport valuable assets), ग्रामपथ असे वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते होते. माणसांसाठी मनुष्यपथ, बैल घोड्यांसाठी महापशुपथ, आणि शेळ्यामेंढया साठी क्षुद्रपशुपथ वेगळे असत. अवजड माल नेण्यासाठी महामार्ग होते त्यांवर माणूस किंवा पशुला जायची/न्यायची परवानगी नसे.
दीपलक्ष्मी मध्ये डॉक्टर गिरीश दाबके यांचा डॉक्टर धरमपाल यांच्या साहित्यावरिल लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे. धरमपालनी १८-१९व्या शतकात ब्रीटीशानी भारतावर ताबा आणि अंमल मिळविण्यापूर्वी काय सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती होती त्यावर दहा खंड लिहिले. नागपूरच्या भारतीय शिक्षण मंडळाने त्यांचे मराठी भाषांतर नुकतेच प्रसिद्ध केले आहे.
3 Jan 2014 - 1:59 pm | आतिवास
मी आत्तापर्यंत तीस एक अंक वाचले.
तुम्हाला एक नमस्कार घ्या माझ्याकडून.
इतके अंक तुम्ही वाचलेत याबद्दल मला थोडा हेवाही वाटतो आहे तुमचा. :-)
तुम्ही उल्लेखलेले दोन्ही लेख मि़ळताहेत का ते पाहते आता. डॉ. धरमपाल यांचाही अधिक शोध घेते.
9 Nov 2015 - 4:19 pm | आतिवास
२०१५ च्या दिवाळी अंकाबाबतची माहिती दिल्यास नेमकं काय वाचावं हे ठरवायला सोपं जाईल मला.
9 Nov 2015 - 5:15 pm | तुषार काळभोर
कोणत्या अंकाची साधारण क्याटेगरी काय आहे, ते पण येऊद्या..
उदा विनोदी लिखन/कथा
दीर्घ कथा
राजकीय
वर्तमान घटना (करंट अफेअर्स)
चित्रपट
रहस्य कथा इत्यादी.
10 Nov 2015 - 4:06 pm | आतिवास
यांची हेरंब कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत 'साप्ताहिक सकाळ'च्या दिवाळी अंकात वाचली.
चंद्रपूर जिल्हा आणि परिसरातले 'एल्गार' संस्थेचे काम ज्यांना माहिती असेल, त्यांनाही या मुलाखतीतून नवी माहिती मिळेल.
अवश्य वाचावी अशी मुलाखत आहे.
28 Oct 2016 - 1:49 pm | आतिवास
यावेळचे छापील अंक मला वाचता येणार नाहीत.
पण आवडलेल्या लेखांची सदस्यांनी माहिती दिली तर मला फायदा होईल. नंतरही हे लेख वाचता येतील मला.
28 Oct 2016 - 2:26 pm | अमु१२३
क्याटेगरी : भयकथा, रहस्य कथा, युद्ध कथा, हेर कथा आणि sci-fi
28 Oct 2016 - 2:39 pm | आतिवास
कुणाकुणाच्या आहेत याबाबत उत्सुकता आहे.
28 Oct 2016 - 3:35 pm | अमु१२३
http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=508421017998887...
28 Oct 2016 - 3:51 pm | अन्कुश शिन्दे
"नवल" दिवाळी अंक घ्या, एकदा वाचला तर दरवर्षी घ्याल. "आवाज" चा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे, तरीही वर्षानुवर्षे असलेली सवय जात नाही, हेच आवाज चे यश असावे.
28 Oct 2016 - 3:46 pm | यशोधरा
लोकसत्ता दिवाळी अंक २०१६ आवडला.